डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

छायानट, उत्तुंग आणि एकाकी संशोधक पाकिस्तान : लष्करी सत्तेचे अर्थरंग...

कोल्हापूर जिल्ह्यात एका छोट्या गावातली शारदा कोवळ्या वयातच आई-वडिलांचे छत्र हरवून बसली होती. मोठ्या बहिणीकडे पुण्यात आल्यावर सेवासदनमध्ये शिक्षण झाले. नंतरचे तिचे सारे आयुष्य म्हणजे 'झुंज आणि झेप' यांचाच इतिहास आहे. एक विलक्षण जिद्दी, करारी व बुद्धिमान स्त्री असे दर्शन या काळात घडते. या स्त्रीने शेती केली. टांगा जुंपून शेतावर जाणे त्याकाळी सोपे नव्हते. या शेतमालाच्या विक्रीवरही त्यांचे लक्ष असे. अकरा मुलांचा डोळसपणे सांभाळ केला. शरद पवार हे राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळवणारे त्यांचे पुत्र सर्वांना माहीत असतात; पण इतर मुलेही तेवढीच कर्तबगार निघाली, घरात तशी पार्श्वभूमी नसताना उद्योजक बनली. त्याचे धडे बाईंनीच दिले होते हे जाणवते. मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव त्यांनी करून दिलेली दिसते.

छायानट, उत्तुंग आणि एकाकी संशोधक पाकिस्तान : लष्करी सत्तेचे अर्थरंग,  कोरा कागद... निळी शाई, शाळा आहे शिक्षण नाही, शारदाबाई गोविंदराव पवार

छायानट : लोभस लेखन 

आनंद अंतरकर यांच्या ललितलेखनाच्या मी नेहमीच प्रेमात असतो. त्यांची 'रत्नकीळ' (व्यक्तिचित्रे), 'झुंजुरवेळ' (स्तंभ लेख संग्रह) आणि 'जळ-मृगजळ' (प्रवासानुभव) ही पुस्तके अधूनमधून उघडून मी वाचत असतो. आता त्यात छायानट' या त्यांच्या नव्या पुस्तकाची भर पडली आहे. हे पुस्तक वाचायच्या आधीच मी त्याच्या प्रेमात पडलो होतो. मोठा चौरस आकार, आर्ट पेपरवरची अत्यंत देखणी, बहुरंगी निर्मिती यातून पुस्तकाची 'श्रीमंती नेत्रसुख देते.

आनंद अंतरकर मला पहिल्यांदा भेटले ते संपादकाच्या भूमिकेत. नव्या लेखकांना उभारी देणारे अंतरकर मी पाहिले. नंतर त्यांनी लेखणी हाती घेतली आणि आपल्या ललितलेखनासाठी स्वतःचा चाहतावर्ग तयार केला. 'छायानट'मध्ये त्यांचे लोभस लेखन व देखणे छायाचित्रण वाचकाला आनंद देईल.

हा एक स्वतःलाच निसर्गात शोधण्याचा प्रयत्न आहे. लेखनातून व छायचित्रणातून, एका अर्थी हे 'चित्र लेख' आहेत. पण ते ठरवून लिहायला घेतलेले नव्हते. निसर्गात एखादी देखणी चित्रचौकट दिसली की त्यांच्याकडून कॅमेऱ्याची कळ जितक्या सहज दाबली जाते, तितक्याच सहजतेने मनातली कळ दाबली जाऊन हे लेखन कागदावर उतरले आहे. यात अंजुनाचा सूर्यास्त आहे, वेंगुर्ले बंदरावरची चमचम आहे, मुनारचा घाटमार्ग आहे, हंपीच्या कलासक्त छिन्न्या आहेत, पाचगणी महाबळेश्वर आकाश आहे, आंबोली मंदचरण धुकं आहे आणि तरीही हे प्रवासवर्णन नाही. हा सगळा प्रवास आऊट ऑफ फोकस' आहे. त्या प्रवासातील धुंदी, मस्ती, एखादा देखणा क्षण, सुंदर अनुभव एवढ्यावरच 'शार्प फोकस' आहे. साहजिकच या संग्रहातील दृश्ये आणि हे लेखन एकमेकांत लपेटून गेले आहे. यात प्रवासासाठी 'गाईड' म्हणून उपयोगी पडावे असे वेळापत्रक, मार्ग सापडणार नाही. किंबहुना 'धोपटमार्ग सोडू नको' हा विचार अंतरकरांना सुचला नाही, त्यामुळे किलोमीटरच्या व खर्चाच्या बेरजेत बसणारे प्रवास त्यांना जमले नाहीत. म्हणून हे पुस्तक केवळ पर्यटकांच्या नजरेने निसर्गाकडे पाहण्यासाठी उपयोगी पडणार नाही.

येथे निसर्गात हरवलेला कवी सापडेल, निसर्गाचा अनुवाद करू पाहणारा छायाचित्र-लेखक सापडेल एखाद्या रानवेलीवरून जुन्या साहित्यातील, चित्रातील, चित्रपटातील अवतरण उतरवून घेणारा रसिक सापडेल. चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी हे पुस्तक अधिक सुंदर करून हाती ठेवले आहे. लेखन व मांडणी दोन्ही पाहता पाहता अभिमान वाटू लागतो या पुस्तकाचा.

छायानट : आनंद अंतरकर 
ब्लू बर्ड (इंडिया) लिमिटेड, पुणे.
पाने 200, किंमत रु. 600/

----

उत्तुंग आणि एकाकी संशोधक : कोसंबींची ओळख 

दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून लिहिलेला भारतीय इतिहास आपल्याला माहीत असतो; पण त्यांच्यातील गणिती, वैज्ञानिक कुठे ठाऊक असतो? सुधीर पानसे यांनी 'उत्तुंग आणि एकाकी संशोधक : दामोदर कोसंबी' या पुस्तकात ही ओळख करून दिली आहे. डी.डी. कोसंबी यांनी विशुद्ध गणित, सांख्यिकी, नाणकशास्त्र, अनुवंशशास्त्र अशा विविध विषयांत स्वतंत्र व मौलिक संशोधन केले आहे, त्याची माहिती येथे होते.

दामोदर कोसंबी यांच्यावर त्यांच्या वडिलांचा, धर्मानंद कोसंबी यांचा विलक्षण प्रभाव होता. आपल्या वडिलांप्रमाणेच समाजवादी विचारसरणीचा, बौद्ध विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पण त्याच वेळी अगदी घडणीच्या वयात (वय 11 ते 21) त्यांचे अमेरिकेत वास्तव्य व शिक्षण झाले, त्यामुळे एका मुक्त संस्कृतीचाही त्यांच्यावर परिणाम झाला होता. शिक्षण मध्येच थांबवून ते दीड वर्षे भारतात राहून गेले. त्यामुळे इथली त्यांची मुळे घट्ट झाली आणि जागतिक परिप्रेक्ष्य विचार करण्याचीही क्षमता त्यांच्यामध्ये आली. इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची, प्रस्थापितांना धक्का देण्याची कुशलता त्यांना प्राप्त केली.

वैज्ञानिक कोसंबी' हा या पुस्तकाचा केन्द्रबिंदू आहे. इतिहासाचे एक अभ्यासक ही कोसंबींची आपल्यासाठी ओळख आहेच; पण त्यांनी केलेले वैज्ञानिक संशोधन तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वतंत्र भारतात वैज्ञानिक संशोधनाची पायाभरणी सुरू असतानाच्या काळात कोसंबी कार्यरत होते. 'टाटा मूलभूत संशोधन संस्था सारख्या एका अग्रगण्य संशोधन संस्थेच्या उभारणीत त्यांचा वाटा होता. हे लक्षात घेता, या काळात विज्ञान संशोधनाच्या संदर्भात अवलंबली गेलेली धोरणे व त्या काळातील घटना आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग आहेत. त्यामुळे त्यावेळची कोसंबींची भूमिका तपासण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे.

कोसंबींच्या लेखनातील आजही महत्त्वाचे ठरू शकतील असे मूलभूत मुद्दे कोणते आहेत, त्यांनी वर्तवलेली कोणती भाकिते खरी ठरली, हे जाणून घ्यायला हे पुस्तक उपयुक्त ठरेल. त्यांचे विज्ञानाच्या क्षेत्रातील किचकट संशोधन शक्य तेवढे सुबोध करण्याचा प्रयत्न येथे करण्यात आलेला आहे. कोसंबींच्या व्यक्तिमत्त्वाची व त्यांच्या संशोधनाची श्री. पानसे यांनी करून दिलेली ही ओळख मोलाची आहे.

उत्तुंग आणि एकाकी संशोधक: दामोदर कोसंबी 
लेखक : सुधीर पानसे लोकवाड्मय गृह, मुंबई.
पाने 128, किंमत रु. 75/

---

पाकिस्तान : लष्करी सत्तेचे अंतरंग  पाकिस्तानची लष्करी सत्ता 

बेनझीर भुत्तो स्फोटात ठार झाल्या आणि पाकिस्तानमधील लोकशाहीची सुरू होऊ घातलेली प्रक्रिया पुन्हा खंडित झाली. बेनझीर यांचे खुनी कोण, याचे उत्तर सापडेल, न सापडेल. पण पाकिस्तानमधील लोकशाहीचे मारेकरी कोण, याचे उत्तर स्पष्ट आहे. भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे एकाच वेळी जगाच्या नकाशावर एका देशाचे दोन भाग होऊन उदयास आली. पण एका देशात लोकशाही रुजते, तर दुसऱ्या देशात लोकशाही नेस्तनाबूत होते, याचे कारण काय? पाकिस्तानात लोकशाही न रुजण्याचे तेथील विचारवंतांनी दिले एक कारण 'गरिबी, निरक्षरता व धर्मश्रद्धा यांमुळे पाकिस्तानात लोकशाही रुजत नाही.' पण भारतात याहून वेगळी परिस्थिती कुठे होती? या गोष्टी भारतात असूनही येथे लोकशाही रुजली आहे. मग त्याचे काहीतरी वेगळे, महत्त्वाचे कारण असायला हवे.

आयेशा सिद्दिका यांच्या अभ्यासातून हे कारण पूर्ण स्पष्ट होते. हा अभ्यास 'पाकिस्तान : मिलिटरी आय.एन.सी.' या इंग्रजी पुस्तकात शब्दबद्ध झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'पाकिस्तान : लष्करी सत्तेचे अर्थरंग' या नावाने संजय आवटे यांनी केला आहे. पाकिस्तानच्या अभ्यासासाठी हा एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. पाकिस्तानात लोकशाही रुजणे हे तेथील लष्करालाच अमान्य आहे. देशाचे शत्रूपासून संरक्षण करणे एवढीच जबाबदारी आहे, असे तेथील लष्कर मानत नाही. त्या देशाची सत्ता आपल्या हाती राहावी असा त्या लष्कराचा पहिल्यापासून सतत प्रयत्न आहे. प्रारंभी सत्ताधाऱ्यांनी लष्कराच्या क्षमतेचा व सत्ताकांक्षेचा अंदाज न घेता, लष्कराची मदत घेतली आणि नंतर लष्कराचीच सर्वंकष सत्ता आली. लोकशाही रुजविण्याचे प्रयत्न फोल ठरले.

बेनझीरचे वडील झुल्फिकार अली भुत्तो यांनी लोकशाही आणण्याचा एक प्रयत्न केला होता. पण त्यांनी स्वतःकडे सत्ता एकवटू पाहताना, आपल्या डाव्या विचारसरणीच्या मित्रांनाही दूर केले. अंतर्गत स्पर्धा संपविण्याच्या नादात त्यांनी लष्कराला बलवान केले. त्याची फळे त्यांना भोगावी लागली. 

पाकिस्तानी लष्कराला सत्ता का हवी, असा प्रश्न पडेल. या पुस्तकात पूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित केले आहे. 'मिलिटरी बिझनेस' (मिलबस)साठी तेथील लष्करी दलांची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. सत्तेतील सहभागातून प्रशासनावर पकड मिळवता येते, त्याचा लाभ व्यक्तिगत आर्थिक सहभागातून घेऊन उद्योग उभारता येतात. लष्करातील अधिकारी श्रेणीतील व्यक्तींच्या लाभासाठी लष्कराची राजकीय सत्ता उपयोगी पडते. म्हणजे लष्करातील अधिकाऱ्यांचे राजकीय अर्थकारण हे तेथील लष्कराच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला कारणीभूत आहे.

आयशा सिद्दिका यांनी हे खूप तपशीलवार मांडले आहे. तेथील सैन्यदलाचा राजकीय प्रभाव कसा वाढत गेला व लोकशाही कशी नामशेष झाली हे या पुस्तकामुळे चांगले समजून घेता येते. त्यामुळेच कारगील युद्ध, मुशर्रफ यांचा अट्टहास, तेथील औद्योगिक व आर्थिक विकासाच्या दिशा या गोष्टींवरही प्रकाश पडतो.

संजय आवटे यांनी हे पुस्तक खूप जलदगतीने मराठीत आणले आणि मराठी वाचकांची सोय केली. हे पुस्तक खूप किचकट व गुंतागुंतीचे आहे. त्या मानाने ते अधिक सुबोध करण्याचा प्रयत्न आवटे यांनी केलेला आहे. मात्र वाक्यरचना मराठी वळणाची न करता, इंग्रजी वळणानेच बहुतेक ठिकाणी केली आहे. त्यामुळे भाषा प्रवाही वाटत नाही.

दुसरी गोष्ट जाणवते, ती म्हणजे हे वर्तमानपत्री भाषांतर वाटते. भाषांतरात शब्दाला शब्द, वाक्यात वाक्य दुसऱ्या भाषेत पर्याय म्हणून दिले जातात. पुस्तकाच्या अनुवादात त्याहून अधिक अपेक्षा असते. पुस्तकाचा अनुवाद आपण एक स्वतंत्र निर्मिती करीत आहोत या जाणिवेने करायला हवा. त्यात अनुवादाच्या भाषेची लय, प्रवाह आणायला हवा. अन्यथा अनुवाद शुष्क होतो. पण एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक नक्कीच मोलाचे आहे.

पाकिस्तान : लष्करी सत्तेचे अर्थरंग
आयशा सिद्दिका 
अनुवाद : संजय आवटे 
कॉन्सेप्ट बुक्स, पुणे.
पाने 236, किंमत रु. 295/

----

कोरा कागद... निळी शाई : अनवाणी शब्द निघाले

मनोज बोरगावकर यांचा कोरा कागद... निळी शाई हा कवितासंग्रह आत्ममग्नता व सामाजिक भान यांच्या सीमेवर रेंगाळतो. दोन्हींची तीव्रता पूर्ण ताकदीने शोषत नाही. तरीही त्याच्या या गोष्ट सांगण्याच्या शैलीने कवितांना वेगळेपण दिले आहे.

एक चांगली क्षमता असलेला हा कवी कवितेच्या वाटेवर ठाम खडा का राहात नाही, हे कळत नाही. प्रतिमा नेमक्या का असल्या पाहिजेत, याचाही पुरेसा विचार होत नाही. उदाहरणार्थ, 'तुला पांढरा कावळा शिवला' या कवितेची सुरुवात पहा:

'वाळत चाललेल्या पानाचा देठ 
फांदीपास्नं अलगद तुटून पडावा 
एवढ्या सहजी पोरगी भररस्त्यात 
मैत्रिणीला म्हणून गेली...
बाई गं तुला पांढरा कावळा जरा लवकरच शिवला...'

'कावळा शिवण्याची घटना स्त्रीच्या जीवनात महत्त्वाची आहे. ती आतून उमलून येण्याचा, नवी होण्याचा तो क्षण आहे. पण त्या घटनेसाठी वापरलेली प्रतिमा ही 'संपण्या च्या प्रक्रियेतील आहे. म्हणजे एकदम उलट. विरोधी प्रतिमांतूनही काव्य शोधता येते, पण येथे तसेही घडत नाही. या कवितेत काही काव्य पणाची शक्यता होतीही; पण ही कविता साध्या विधानांवरच रेंगाळते.

'पुनरागमनाय च' या कवितेत असाच गोंधळ आहे 
'तिरडी बांधतानाची ब्लेड 
बरोबर नेमक्या जागी 
खोचून ठेवावी - म्हणजे तिरडी 
घाटावर मोकळी करताना कामी येते; 
जगण्यावर एवढं मरेस्तोवर प्रेम 
केलंय आपणही पण 
सकाळी घराबाहेर पडलेलं 
माणूस संध्याकाळी जितंजागतं 
सहीसलामत परतेलच खात्री 
नाहीच देता येत 
एवढं असुरक्षित कसं जगावं? 

येथे अर्धविरामापूर्वीचा पूर्वार्ध व नंतरचा उत्तरार्ध यांची सांगड कशी घालायची हे मला उमगले नाही. पूर्वार्धातून उत्तरार्धात काही अर्थांतर होतेय का, हे शोधायचा माझा प्रयत्न विफल झाला. 

कवी मधूनच इंग्रजी शब्द वापरतो. पण त्या संपूर्ण कवितेची शैली म्हणून हा इंग्रजी शब्द येत नाही. मग अचानक येणारा शब्द बोचतो. काही ओळी - कल्पना सुरेख आहेत, पण ती तरलता संपूर्ण कविता तोलून धरायला तोकडी पडते. त्यासाठी रियाझ हवाच.

काही कवितांमध्ये षंढत्वाचा उल्लेख येतो. 'आत्महत्येपूर्वी स्वगत', 'काडेपेटीच्या डब्बीत', 'आताशा मी फार खुडूक बसलेला असतो', 'थोडंसं रुपा हत्तिणीविषयी', 'ऑपरेशन थिएटर', 'पुनरायमनाय च' या कविता पाहता येतील. आधुनिक कविता नपुंसकत्वाची भावना कित्येकांनी व्यक्त केलीय. 'गांडूंची पिढी' ही साठोत्तरी काळातील कवींना 'उपाधी होती. पण कवितांमधील भावना सामाजिक होत नाहीत; वैयक्तिक पातळीवर लैंगिकतेचा ध्यास एवढे मर्यादित स्वरूप राहते.

त्यामुळे कवितेला उंची मिळण्याची संधी गमावली जाते. आत्ममग्न की सामाजिक, या पेचात कवी अडकलेला दिसतो.

कोरा कागद... निळी शाई
मनोज बोरगावकर 
राजहंस प्रकाशन, पुणे.
पाने 96, किंमत रु.75/ ...

----

शाळा आहे - शिक्षण नाही : मोलाचं पुस्तक 

हेरंब कुलकर्णी यांचं 'शाळा आहे, शिक्षण नाही' हे पुस्तक खूप मोलाचं आहे. हेरंबची शिक्षक, पत्रकार, कवी ही सगळी रूपे अतिशय संवेदनशीलतेने या छोटेखानी पुस्तकात दिसतात.

गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ या भागांतील आदिवासी पाड्यांमध्ये हजारो किलोमीटर वणवण करून हा 'शाळा' शोधत राहिला. शाळेच्या इमारती त्याला पाहायला मिळाल्या, पण त्यात शिक्षण देणाऱ्या शाळा सापडल्या नाहीत. या परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी या सगळ्यांबरोबरचे संवाद, पाहणीचे निष्कर्ष येथे आहेत. अत्यंत संयमित शब्दांत, साध्यासोप्या निवेदन रूपाने हे सारे आपल्यासमोर येते. छायाचित्रे, चौकटी, आकडेवारी यामुळे मूळ मजकूर अधिकच बोलका होतो.

यातील माहिती आपल्यापर्यंत शैक्षणिक अवस्थेचे कटू सत्य घेऊन येते. निष्कर्ष थरकाप उडावा इतके भीषण आहेत. यातील शब्द संयमित असले तरी त्या आडून मनाची तडफड स्पष्ट दिसते आणि आपणही अस्वस्थ होतो. दोनशे आदिवासी गावांचा शिक्षणासाठी 'टाहो' आपल्याला ऐकू येत नाही याची शरम वाटते.

समाजातील शेवटच्या माणसापर्यंत स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनीही शिक्षण पोहोचविणे आपल्याला जमत नाही. या व्यवस्थेतील दोष लक्षात येत नाहीत की, ते अजूनही आपल्याला दूर करायचे नाहीत हा प्रश्न पडतो. एका संवेदनशील माणसाने ही शोधयात्रा केल्याने किमान आपल्याला परिस्थितीची जाणीव तरी झाली.

शाळा आहे - शिक्षण नाही
हेरंब कुलकर्णी 
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
पाने 100, किंमत रु. 100/

----

शारदाबाई गोविंदराव पवार : प्रेरक चरित्र 

'शारदाबाई गोविंदराव पवार' हा चरित्रग्रंथ नुकताच यु.एस. लायब्ररी ऑफ काँग्रेस (वॉशिंग्टन) या जगातील अतिशय जुन्या व मोठ्या ग्रंथालयाने आपल्या संग्रहासाठी निवडला आहे. सरोजिनी नितीन चव्हाण यांनी हे चरित्र लिहिले आहे. शारदाबाईंच्या आयुष्याचा सारा पटच भारावून टाकणारा आहे. महिला सबलीकरणाची चळवळ सुरू झालेली असताना हे चरित्र प्रेरक ठरेल.

कोल्हापूर जिल्ह्यात एका छोट्या गावातली शारदा कोवळ्या वयातच आई-वडिलांचे छत्र हरवून बसली होती. मोठ्या बहिणीकडे पुण्यात आल्यावर सेवासदनमध्ये शिक्षण झाले. नंतरचे तिचे सारे आयुष्य म्हणजे 'झुंज आणि झेप' यांचाच इतिहास आहे. एक विलक्षण जिद्दी, करारी व बुद्धिमान स्त्री असे दर्शन या काळात घडते.

या स्त्रीने शेती केली. टांगा जुंपून शेतावर जाणे त्याकाळी सोपे नव्हते. या शेतमालाच्या विक्रीवरही त्यांचे लक्ष असे. अकरा मुलांचा डोळसपणे सांभाळ केला. शरद पवार हे राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळवणारे त्यांचे पुत्र सर्वांना माहीत असतात; पण इतर मुलेही तेवढीच कर्तबगार निघाली, घरात तशी पार्श्वभूमी नसताना उद्योजक बनली. त्याचे धडे बाईंनीच दिले होते हे जाणवते. मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव त्यांनी करून दिलेली दिसते.

या बाई राजकारणातही उतरल्या. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी पुणे जिल्हा लोकल बोर्डात निवडून गेल्या. चौदा वर्षे तेथे काम केले. त्यांनी विविध समित्यांमध्ये अभ्यासपूर्ण योजना मांडल्या आणि कामे मार्गी लावली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यात सहभागी झाल्या. रोमांचकारक असे हे चरित्र आहे.

मात्र वाङ्मयीनदृष्ट्याही हे पुस्तक उंचीवर पोहोचविण्यात लेखिका यशस्वी झाली नाही. काही प्रकरणांची शालेय निबंधासारखी सुरुवात, द्विरुक्ती, बाळबोध प्रतिमा, काही वेळा चुकीची रूपके हे दोष या लेखनात आहेत. चरित्र हा वाङ्मयप्रकार इतिहास व ललित या दोन गुणांनी बनतो. त्याचा विसर पडला की ते लेखन तोकडे बनते. असे असले तरी चरित्रनायिकेच्या अंगभूत गुणांनी हा इतिहास वाचनीय ठरतो.

शारदाबाई गोविंदराव पवार
सरोजिनी नितीन चव्हाण 
सकाळ प्रकाशन, पुणे.
पाने 196, किंमत रु. 150/
 

Tags: शारदाबाई गोविंदराव पवार शाळा आहे शिक्षण नाही  कोरा कागद... निळी शाई उत्तुंग आणि एकाकी संशोधक पाकिस्तान : लष्करी सत्तेचे अर्थरंग छायानट साधना शिफारस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके