डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कथा-कादंबरी नाही, फिक्शन म्हणा...

साहित्य जीवनगौरव: श्याम मनोहर

श्याम मनोहरांचा हा शोधप्रवास एखादे प्रगल्भ असे जीवनविषयक तत्त्वज्ञान निर्माण करून त्यातून वाचकाला काहीएक स्थायी स्वरूपाची अशी जीवनदृष्टी देईल का, याचे उत्तर मिळवण्यासाठी वाचकाला त्यांच्या लेखनाचे पुनपुर्नर्वाचन करावे लागेल किंवा कदाचित त्यांच्या पुढच्या लिखाणाची प्रतीक्षा करावी लागेल. पण आज घडीला आपल्याला श्याम मनोहरांनी जे काही दिले, ते काय आहे? शहाणपणाचा पाठलाग जोवर आपण करत असतो, तोवर आपण जोशात आणि तोऱ्यात असतो. एक प्रकारची निर्बुद्ध निर्भयता आपल्या चेहऱ्यावर असते. पण शहाणपणाच्या या पाठलागात शहाणपणाला ओव्हरटेक करून गेल्यावर आपल्यामागे आपल्याला शहाणपणाचा भेसूर चेहरा दिसतो आणि भोवळ येते. शहाणपणाच्या दर्शनमात्रे असे हे भोवळणे आपण कुणापाशी कबूलही करू शकत नाही. श्याम मनोहरांनी आपल्याला ही दुर्मिळ भोवळ दिली आणि शहाणपणाच्या टेन्शनपासून मुक्त केलं. म्हणून श्याम मनोहर!!  

सलील वाघ

प्रश्न : कथा, कादंबरी, नाटक, स्फुट लिखाण, निबंध असे लेखनप्रकार आपण हाताळले आहेत. या सर्व लेखनांत आपण नेहमीच जीवन समजावून घेण्याच्या प्रयत्नात आहात, असे आढळते. आपल्या लिखाणाचं हे भक्कम सूत्र उलगडण्यासाठी कुठून सुरुवात करावी?

- स्फुट लेखन मी अत्यंत प्रासंगिक केलं आहे. काही लेख मी लिहिले आहेत. डोक्यात काय चाललं आहे याच्या नोंदी करण्यासाठी ते लिहिले; ते प्रसिद्ध केलेले नाहीत. अलीकडे म्हणजे गेल्या सात-आठ वर्षांत मी फिक्शनवरती जरूर विचार करतो. म्हणजे कादंबरी काय आहे, नाटक काय आहे वगैरे. तसा निबंध वा स्फुट लेखन याचा विचार केलेला नाही. उदाहरणार्थ- फिक्शन म्हणजे कथात्म साहित्य हे जीवनाचा अर्थ शोधते म्हणजे काय करते, असा प्रश्न मला पडतो. मग बरीच वर्षं हा प्रश्न डोक्यात राहतो आणि मग मला सुचते की, कथात्म साहित्याला जीवनाचा अर्थ सापडत नाही तर जीवनाचे गुणधर्म सापडतात. हे सुचले की, त्याचा एखादा पॅरॅग्राफ मी लिहून ठेवतो. मग योगायोगपरत्वे लक्षात येते की, हे एखाद्या कादंबरीत घालता येईल.

‘खूप लोक आहेत’ या कादंबरीत ‘कथात्म साहित्यातून जीवनाचे गुणधर्म सापडतात’ ह्याला जागा सापडली. ‘प्रेम आणि खूप-खूप  नंतर’ या आगामी कादंबरीत अशाच प्रकारे एक निबंध जागा पावला. इथे बोलता-बोलता ‘जागा पावला’ अशी वाक्यरचना केली. लेख कादंबरीत घातला, हे क्रियापद मला चांगले वाटले नाही; म्हणून मनात योग्य शब्द शोधण्याची घालमेल झाली आणि ‘लेखाला जागा पावली’ अशी वाक्यरचना मनात सापडली. पावली ह्या क्रियापदाच्या मागे ‘देव पावला’ हे मनात उमटले. अशा प्रकारे कुठली क्रियापदे वापरावीत, अशी घालमेल मनात चालू असते.

रिक्षावाल्याकडे जाताना रिक्षावाल्याशी पहिले वाक्य काय बोलावे, अशी घालमेल अजूनही सतत असते. हाक मारली, मिठी मारली... यातील ‘मारली’ हे क्रियापद मनाला पटत नाही. कित्येक दिवस मी त्यावर विचार करत आहे. हाक मारली याऐवजी ‘हाळी दिली’ हे मला चांगले वाटते. पण ‘मिठी मारली’ ह्याला चांगला पर्याय सुचलेला नाही. मिठी घातली, हेही काही योग्य वाटत नाही. ही क्रियापदांच्या शोधाची तऱ्हा ललित अंगाने लिहिता येईल, पण त्या ललित अंगात घालमेल येऊ शकत नाही. शोध घेणे आणि त्यामागची घालमेल याला फिक्शनमध्ये जागा असते. ही गोष्ट एरवी साधीच वाटते, किरकोळ वाटते; पण कादंबरीत वा नाटकात ही किरकोळ गोष्ट योग्य दर्जाने ठेवता येते.

प्रश्न : म्हणजे फिक्शनपासून सुरुवात करावी. आपल्या कथा प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली, त्या सुमारास मराठी साहित्यात नवकथा मान्यता पावलेली होती. तेव्हा कथा वा कादंबरी असे फिक्शनचे प्रकार असतात, ह्याची आपल्याला कितपत जाण होती?

 - सर्वसाधारणपणे अशिक्षितांनाही गाण्यांची बऱ्याच प्रमाणात जाण असते. सुशिक्षितांना शाळेतल्या पाठ्यपुस्तकांमुळे कविता ह्या वाङ्‌मयप्रकाराचा परिचय होतो. शाळांतून, महाविद्यालयांतून स्नेहसंमेलनात नाटक किंवा नाटकाचे प्रवेश केले जातात. त्यातून नाटक हा वाङ्‌मयप्रकार आहे, हे कळत होते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतून ‘किल्ल्याचे आत्मवृत्त लिहा’, अशा प्रकारचे निबंध यायचे. त्यातून आत्मवृत्त, आत्मचरित्र हे प्रकार माहीत होते; पण हे वाङ्‌मयप्रकार आहेत, हे माहीत नव्हते आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या  सभ्यतेत वाङ्‌मय, वाङमयप्रकार, नवकविता, नवकथा हे प्रकार कानांवरसुद्धा पडत नव्हते.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राज्य नाट्यस्पर्धेमुळे नाटक ह्या प्रकाराचा तालुक्यापर्यंत अधिक दाट परिचय होतो आहे. तसेच साठोत्तर काळात कविता या वाङ्‌मय प्रकाराचाही दाट परिचय झाला आहे. आणि मोठे लिहायचे आहे म्हणजे कादंबरी लिहायची, याचा प्रसार झाला आहे.

प्रश्न : मग आपण कथालेखनाला कशी आणि केव्हा सुरुवात केलीत?

 - कथालेखनाला केव्हा सुरुवात केली, हे सांगू शकत नाही. याचे कारण मला कोणतेही सन लक्षात राहत नाहीत. उदाहरणार्थ- इयत्ता आठवीमध्ये मी कोणत्या वर्षी होतो, हे मला आठवत नाही. खूप ताण घेऊन आठवावे, असे वाटत नाही. काळाच्या संदर्भात मला माझे आयुष्य आठवत-जाणवत नाही. अनुभवाच्या संदर्भातही मला माझे आयुष्य आठवत नाही. माझा पहिला पगार आला तेव्हा काय वाटले, असे मला आठवत नाही. इन जनरल, सर्वसाधारणपणे माझी आत्ताची आर्थिक परिस्थिती बरी असली तरी गरिबी म्हणजे काय, हे मला पक्के कळते. त्यानुसार माझ्या आयुष्यातली माझी गरिबी किंवा माझ्या मित्रांची गरिबी आठवते. शाळेत शिकत असल्यापासून आत्तापर्यंत बऱ्यापैकी श्रीमंत मित्रही होते, त्यामुळे श्रीमंती काय हे पण कळते. असे काही काही कळण्याच्या संदर्भातले माझे आयुष्य मला कळते.

आणि मला नीट वाक्यरचना कशी करावी, हे मनात म्हणायची लहानपणापासून सवय होती. शब्दांचे अर्थ कसे होतात, काय होतात हे बघायची सवय होती आणि आहेही. प्रासंगिकपणे कशाचेही चार-दोन वाक्यांत वर्णन लिहून काढायचीही मला माहिती होती. जे प्रचलित आहे ते उलटे करून बघायची सवय होती. ते उलटे करून   बघणे याला आसपासच्या परिसरात जागा नाही, हे मला कळत होते. पण हे करणे आवश्यक आहे, हेही मला कळत होते. आत भीती होती आणि आत्मविश्वासही होता. पण कृपा करून ह्यापुढे मला असे भूतकाळात जावे लागेल, असे प्रश्न विचारू नका.

प्रश्न : ठीक आहे, प्रयत्न करतो. पण आपल्याला कथा वा कथात्म लिखाण करता येते वा आपण ते केले पाहिजे, हा शोध कसा लागला?

 - पुन्हा हा आत्मचरित्रात्मक प्रश्न आहे. त्याचे हे शेवटचे उत्तर देतो. लिहीत होतो, पण मला लिहायचे नव्हते. मी शिकत होतो, पण शिकण्यात माझे खूप लक्ष नव्हते. मात्र, मला शिकलेले येत होते. सर्वच लोकांच्या डोक्यात वास्तवापेक्षा फँटसी वगैरे असतात, तशाच माझ्या डोक्यात होत्या. म्हणजे पैलवान व्हावे, तत्त्वज्ञानी व्हावे, सर्वज्ञ व्हावे; आणि वास्तवात मात्र मी मित्र हुडकून हिंडत होतो, गप्पा करत होतो.

पण त्या बिलकुल चिल्लर नव्हत्या. मित्रलोक त्यांच्या मानसिक, घरच्या अशा अडचणी सांगायचे आणि त्या अडचणींचा नक्की मुद्दा कोणता, हे पहायला मी धडपडायचो. ठामपणे काही सांगता यायचे नाही. लोक ठामपणे कसे बोलतात याचे मला अजूनही आश्चर्य वाटते. परवा ठामपणे बोललेले काल पडते, ही आज आठवण राहिली; तर आज तरी ठामपणे बोलायला नको, असे नको का व्हायला...? मग ठामपणे बोलायचे नाही, तर गप्प बसायचे का? तर गप्प बसा म्हणजे आवाज काढू नका, पण आतल्या आत बोला. आतल्या आत बोलताना आतल्या आत काय होते त्यासह बोला, ह्याला मी फिक्शन म्हणतो.

प्रश्न : मराठी साहित्यातील लघुकथा ह्या वाङ्‌मयप्रकाराच्या विरोधात भालचंद्र नेमाडे यांनी झोड उठवली. आपण आणि कमल देसाई यांच्या कथांचा मात्र त्यांनी अपवाद केला. लघुकथांचे दोन संग्रह आपल्या नावावर आहेत. त्यानंतर वा त्या सुमारास ‘हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव’ आणि ‘शीतयुद्ध सदानंद’ या दोन कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या. लघुकथा, कादंबरी ह्या वाङ्‌मय प्रकारांवर असलेली आपली हुकूमत त्यातून दिसते. मात्र ‘कळ’पासून ‘शंभर मी’ या कादंबरीपर्यंतचा आपला लेखनप्रवास एका वेगळ्या प्रांतातला वाटतो. मुलाखत घेण्यासाठी येताना असं ध्यानी आलं की, ‘कळ’ ही कादंबरी नाही. किंबहुना ‘कळ’पासून ‘शंभर मी’पर्यंत प्रसिद्ध झालेल्या आपल्या प्रायोगिक कादंबऱ्या या कादंबऱ्याच नाहीत; त्यांना फिक्शन म्हणता येईल. फिक्शन नावाची एक वेगळी कोटी त्यासाठी निर्माण करावी लागेल. तुम्ही हे कसे घ्याल?

- मला तुमच्याशी सहमत होण्यात काही अडथळा वाटत नाही. इंग्रजी शब्द आपल्या तोंडात रुळले आहेत म्हणून फिक्शन हा शब्द वापरायचा. एरवी मराठी शब्द काढायला हरकत नाही. लघुकथा किंवा कादंबरी ह्याची मूळ रचना ठेवून व्याप्ती वाढवता येते, हे साहित्य व्यवहारात अनेक उदाहरणांनी सिद्ध झाले आहे. परंपरेने निश्चित प्रमेये ठरवलेली कादंबरी, कथा, नाटक असे लिहिणे मला नेहमीच जमणारे नव्हते, हे मला कळत होते. मला त्याची गरजही वाटत नव्हती.

भाषा आहे, जगणे आहे आणि शोध घ्यायचा आहे ह्याच्या साह्याने शोध घेण्याची अभ्यासपद्धती निर्माण करायची वा लिहायची, असे माझ्या डोक्यासमोर असते. म्हणून अशी अभ्यासपद्धती करून छोटे किंवा मोठे केलेले लिखाण ह्याला फिक्शन हे नाव द्यायला हरकत नाही.

मराठी साहित्याच्या व्यवहारात कथा, कादंबरी, कविता, नाटक ह्यांबद्दल चर्चा झाली आहे; पण फिक्शन आणि फिक्शनचे मूळ धातू ह्याबद्दल अजिबात चर्चा झालेली नाही. त्यामुळे लेखकांना आणि वाचकांना लिहायचे म्हणजे लघुकथा, कादंबरी, कथा, नवकथा हे ठरलेले प्रकारच डोळ्यांसमोर येतात. पण फिक्शन लिहायचे वा फिक्शन वाचायचे असे म्हटले की, एकदम बौद्धिक स्वातंत्र्य प्राप्त होते. बौद्धिक स्वातंत्र्य घेऊन शोध लावणारी कामे करण्याने संस्कृती तयार होते. जमले तर फिक्शनला मराठी समर्पक शब्द जरूर शोधा, ही विनंती. आणि मला स्वतःला कादंबरी, कथा याच्यातून तुम्ही मानसिक दृष्ट्या मोकळे केलेत, त्यामुळे खरोखर मोकळेपणा वाटतोय.

प्रश्न : फिक्शनच्या रचनेवरती आपण थोडा अधिक प्रकाश टाकाल का?

- आत्तापर्यंत माणूसजातीला ज्ञान निर्माण करायच्या तीन तऱ्हा सापडल्या आहेत- विज्ञान, कला आणि फिक्शन. विज्ञानाचा परिसर- पदार्थ, अवकाश आणि काळ. कलेचा परिसर- आकार, रंग, ध्वनी, मिती. तसा फिक्शनचा परिसर काय? सर्वसाधारण समज असा आहे की, अनुभवातून ज्ञान मिळते. पण मग बुद्धीचा उपयोग काय? तर चिंतन, मनन, ध्यान यानेही ज्ञान निर्माण होते, हा दुसरा सिद्धांत आहेच.

सामान्य माणसांना ज्ञान निर्माण करायच्या अभ्यासपद्धती साधत नाहीत. विज्ञानाची अभ्यासपद्धती निर्माण करताना विवेकाची शिस्त वापरावी लागते. अर्थात विज्ञानातले शोध लागताना मात्र इंट्यूशनच वापरली जाते. कलांचे जास्त ध्यान सौंदर्यावर. विवेकवाद, अविवेकवाद, विश्वाचा माहीत नसलेला पसारा, वस्तूंची अगणितता, मनात काळाचा होणारा धरसोडपणा- असे वाट्टेल ते आहे. त्यातले इंट्यूशनने निवडून शोध घेण्याची अभ्यासपद्धती करणारं फिक्शन असतं. ‘वेटिंग फॉर गोदो’ ही एब्सर्डिटी सिद्ध करणारी अभ्यासपद्धती आहे.

सामान्य माणसांना भाषा आणि चिंतन-मनन या पद्धती वापरूनच ज्ञानापर्यंत पोचायची संधी असते. सामान्य माणसांची ही पद्धतच फिक्शनवाला अंगीकारतो आणि अनुभव व प्रज्ञा ह्याच्या साह्याने शोध लावण्याची अभ्यासपद्धती निर्माण करतो. त्यामुळे विज्ञान, कला यापेक्षा सामान्यांना फिक्शन हे जास्त जवळचे वाटते. अज्ञातातले शोधायचे हे अंधारात चाचपणे असते. ज्ञात असलेल्या अनेक कल्पना पुन:पुन्हा समोर येतात. त्यांतल्याच काही वापराव्यात असा उतावळेपणा होतो, पण त्या कल्पना निरुपयोगी आहेत, हेही कळत असते. ती घालमेल सोसत नव्या कल्पना काढाव्या लागतात. फिक्शनला सुरुवात असते म्हणजे भौतिक दृष्ट्या पहिले वाक्य म्हणजे सुरुवात एवढेच आहे. त्यामुळे पहिले भौतिक वाक्य हे पात्राच्या मानसिकतेबद्दल, शारीरिक ठेवणीबद्दल त्याच्या भूतकाळाबद्दल असले पाहिजे, असे काहीही नाही. मग काय असावे? तर, हजार शक्यता असतात.

प्रश्न : फिक्शनमध्ये संवाद असतात. संवाद नाहीतच, असे फिक्शन असू शकणार नाही? असा प्रश्न केला की संवादाची सक्ती जाते. माणसांच्या स्थिती, मानसिक प्रक्रिया, शारीरिक हालचाली, परिसरातल्या वस्तू या सगळ्यांचा तपशील देता येतो. तपशील दिलाच पाहिजे का? द्यायला नकोच का?

- ह्या दोन टोकांत अनेक शक्यता असतात. - शहरात फिक्शन घडते किंवा खेडेगावात फिक्शन घडते; तर त्या शहराचे वर्णन वा गावाचे वर्णन द्यायलाच हवे का, की अजिबात नको? या दोनमध्ये अनेक शक्यता आहेत. शोध घेण्याचा मुद्दा कुठेही येऊ शकतो. इतके केले की फिक्शनची रचना म्हणजे अभ्यासपद्धती तयार होते. प्रत्येक वाक्य लिहिताना दहा टक्के, पंचवीस टक्के, सत्तर टक्के खुलेपणा ठेवा; मग दुसरे वाक्य येऊ द्या. खुलेपणा ठेवत-ठेवत जायचे आणि लक्ष इतकेच ठेवायचे की, काही नवा शोध लागतो की नाही. नवा शोध लागत नसेल तर आधी केलेले काम फाडून टाकायचे.

प्रश्न : लेखन करताना फिक्शनच्या तुलनेत नाटक या वाङ्‌मयप्रकारासाठी खूप अटी आहेत. तो वाङ्‌मयप्रकार आपण कसा हाताळता?

- नाटक म्हणजे मला शारीरिक हालचाली असे दिसते. तर ड्रामा असा जो शब्द वापरला जातो, त्या अनुषंगाने मला काही भावत नाही. शारीरिक हालचाली अशा असतात की, ज्या गद्यामध्ये नेमकेपणे व्यक्त केल्या तर ठरावीकच होतील; पण अनेक प्रकारे अशा हालचाली होऊ शकतात हे माझ्या लक्षात येते, तेव्हा मी नाटक या वाङ्‌मयप्रकाराकडे येतो. उदाहरणार्थ- संताप आलेला माणूस, त्याच्या शारीरिक हालचाली. संताप आलेल्या माणसाच्या एका विशिष्ट पद्धतीनेच हालचाली होत असतील, तर त्या मी फिक्शनमध्ये लिहितो. पण संतापातून अनेक प्रकारच्या शारीरिक हालचालीही अर्थपूर्ण होऊ शकतात असे मला दिसले, तर मी नाटकाकडे जातो.

आणि बाकी म्हणाल, तर नाटक हे मी एक प्रकारचे निवेदनच समजतो. निवेदन आणि शारीरिक हालचाली ह्या दृष्टीने मी नाटकाकडे पाहतो. त्यामुळे संघर्ष, उकल करण्याच्या नाटकाच्या पद्धतीची मला गरज वाटत नाही.

प्रश्न : ‘शीतयुद्ध सदानंद’ या नाटकाचे चार दिग्दर्शकांनी रंगमंच सादरीकरण केले. ‘कळ’मधल्या काही भागांचे वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी रंगमचावर सादरीकरण केले. अलीकडे ‘कळ’मधल्या एका भागावर कोल्हापूरच्या एका ग्रुपने रंगमंचीय सादरीकरण केलेले आहे. ‘शंभर मी’ मधल्या काही भागांवर आविष्कारच्या ग्रुपने आणि देवल क्लब, कोल्हापूरच्या ग्रुपने रंगमंचीय सादरीकरण चालू ठेवले आहे. तुमची प्रतिक्रिया?

 - मी निवेदनात्मक गद्य लिहीत असतो, त्यातही नाटक असते.

प्रश्न : सध्या कोणतं लिखाण सुरू आहे आणि केव्हा प्रकाशित होण्याची शक्यता आहे?

- आता कादंबऱ्या हा शब्द न वापरता फिक्शन हा शब्द वापरून बोलायचे झाले, तर गेली चारएक वर्षं तीन कथात्म साहित्याचं लिखाण चाललेलं होतं. त्यांतल्या एका कथात्म साहित्याचा पहिला खर्डा 2001 मध्ये झालेला होता. त्याचा तिसरा खर्डा पूर्ण झालेला आहे. उरलेल्या दोनमधल्या एकाचा दुसरा खर्डा पूर्ण झालेला आहे आणि एकाचा पहिला खर्डा चालू आहे. याच्यातच वेगळे सुचले म्हणून वरील खर्डे बाजूला ठेवले आणि ते काय आहे त्याच्या नोंदी काढायला लागलो, तर ते पुढेपुढे जायला लागले. त्याचा चौथा आणि शेवटचा खर्डा गेल्या महिन्यात पूर्ण झाला. त्याचे नाव आहे ‘प्रेम आणि खूप खूप नंतर’. याचे खर्डे होत असताना चंद्रकांत पाटील आठवड्यात एखादा दिवस चार-पाच तासांसाठी माझ्याकडे यायचा, तेव्हा अधून-मधून वाचन व्हायचे. शेवटचा खर्डा पूर्ण झाल्यावर चंद्रकांत पाटीलने पूर्ण वाचन केले. माझे प्रकाशक रामदास भटकळ यांनी एक अशी पद्धत पाडली की, माझ्या फिक्शनचा फायनल खर्डा झाला की मी आणि भटकळांनी एकत्र वाचायचा. त्यासाठी ते पुण्यात यायचे. आत्ता त्यांच्या आजारपणामुळे पुण्यात येणे शक्य नव्हते, म्हणून मी मुंबईला त्यांच्या घरी गेलो आणि रामदास भटकळ, अस्मिता मोहिते, लैला भटकळ, चित्रा ह्यांच्यासमवेत रोज पाच तास असे कादंबरीचे वाचन दोन दिवस केले अन्‌ कादंबरी प्रकाशनासाठी सोपवली. आता केव्हा छापतात, ते बघू.  

मुलाखत: सुनील तांबे

Tags: मुलाखत शंभर मी कळ शीतयुद्ध सदानंद हे पुरुषोत्तमराव हे ईश्वरराव खूप लोक आहेत सुनील तांबे श्याम मनोहर साहित्य जीवनगौरव महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat shambhar mi kal shityuddh sadanand he purushottamrao he ishvarrao khup lok ahet sunil tambe shyam manohar sahitya jivangaurav Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

श्याम मनोहर

साहित्यिक, 'उत्सुकतेने मी झोपलो' या कादंबरीसाठी इ.स. २००८चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके