डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मागच्या आठवड्यात सासवडचे कविसंमेलन गाजवलेल्या नारायण सुमंत यांना पुढील आठवड्यात नगरला संजीवनी खोजे पुरस्कार देण्यात येणार आहे. 'सातबारा' हा त्यांचा काव्यसंग्रह ह्यासाठी विचारात घेतला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पिंपळखुटे गावचा हा शेतकरी 'नाणे खणखणीत असले तर ते वाजतेच- दबून रहात नाही', ह्या म्हणण्याचे द्योतकच आहे.

1 ऑगस्ट 2002

राज्यातल्या सात साहित्य संस्थांवर साहित्य संस्कृती मंडळाचा चांगला वचक येणार, असे दिसते आहे. ह्या संस्थांना शासन जे अनुदान देते, त्याच्या खर्चाचे निकष आता हे मंडळ ठरवणार असून त्याप्रमाणे खर्च झाला नाही, तर तेवढ्या रकमेची कपातही हे मंडळ करू शकणार आहे म्हणे- असे या मंडळाचे अध्यक्ष रा.रं.बोराडेच औरंगाबादला म्हणाले. आपापल्या कार्यक्षेत्रातील नवोदित लेखकांचे तीन दिवसांचे शिबीर, उत्कृष्ट साहित्यकृतींना पारितोषिके, बाङ्मयीन चर्चासत्रांचे आयोजन, संदर्भग्रंथांचे प्रकाशन अशावरच हा खर्च अपेक्षित आहे.

4 ऑगस्ट 2002 

विलासदत्त राऊत यांचा घोडा खरोखरच 'चौखूर' उधळत आहे. त्यांच्या या रेसकोर्सवरच्या कादंबरीला आपटे' पारितोषिक मागोमाग आता 'ना.सी.फडके पारितोषिकही मिळाले आहे. ह्याचवेळी डॉ.ह.वि.सरदेसाई ह्यांच्या हस्ते लीला दीक्षित ह्यांनाही कमल फडके पुरस्कार देण्यात आला आहे. 

5 ऑगस्ट 2002 

शरदिनी डहाणूकर आणि चिंतामणी लागू ह्यांचे निधन, डहाणूकरवाई वैद्यक क्षेत्रात पूर्ण बुडाल्या होत्या, तरीही त्यांनी छान लेखन करून वाचकप्रियता मिळविली होती; तर चिंतामणी लागू आपल्या नौदलातील नोकरीतून निवृत्त होऊन लेखनातच पूर्ण मान झाले होते. शंभराहून अधिक कादंबऱ्या लिहिणारे लागू आता मात्र लिहायचे जवळजवळ थांबले होते. पक्षाघाताने त्यांना जेरीस आणले होते-ते पुन्हा पूर्वपदावर आलेच नाहीत.

10 ऑगस्ट 2002

'आम्ही जातो अमुच्या गावा' व 'अच्युतराव पटवर्धन' या हरिभाऊ लिमये यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे ग.प्र.प्रधान ह्यांच्या अध्यक्षतेखाली रा.ग.जाधव ह्यांच्या हस्ते प्रकाशन झाले; तेव्हा त्यांनी 'साने गुरुजींचे समर्पण व अच्युतराव पटवर्धन ह्यांचे जीवनकार्य, यांबद्दलची आणखी माहिती मुख्य प्रवाहात येण्याची गरज असून त्या दृष्टीने मानसिकता तयार होण्यासाठी हरिभाऊ लिमये यांनी लिहिलेली पुस्तके उपयुक्त आहेत-' असे मोजक्या शब्दांत बोलून दाखविले. 

नागपूरला एक वेगळेच साहित्य संमेलन झाले, ते जलसाहित्य संमेलन! ह्या संमेलनात अध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून ना.धो.महानोर आणि डॉ.माधवराव चितळे अशा योग्य व्यक्तीच लाभल्या होत्या. हे 'जल' आपल्या वाङ्मयात कधीपासूनचे आहे. हे डॉक्टरसाहेबांच्याच शब्दांत सांगायचे तर, 'सर्व प्राचीन साहित्यातून पाणी या विषयाचा मोठया प्रमाणात उल्लेख झाला आहे. कालिदासाचे 'मेघदूत' हे पाण्याविषयी माहिती देणारे लालित्यपूर्ण विज्ञानच आहे. भगीरथाची कथा, त्याचे गंगेला पृथ्वीवर आणण्याचे प्रयत्न यांचे संदर्भ विज्ञानाशी जोडले पाहिजेत. अगस्ती मुनीच्या पत्नीने पाण्याच्या उपलब्धीसाठी केलेले प्रयत्न, नदीचे लावलेले व्यवस्थापन, यामुळे त्यानंतर त्या नदीला मुनींच्या पत्नीचे कावेरी असे नाव मिळणे हे सारे महत्त्वाचे आहे.'

13 ऑगस्ट 2002 

आचार्य अत्रे यांचा जन्मदिन. त्यांच्या सासवडला ह्या निमित्ताने संमेलन भरू लागले आहे. यंदा झाले ते असे पाचवे संमेलन. ह्या संमेलनात अरुणा ढेरे, मल्हार अरणकल्ले, सुधीर गाडगीळ अशा नव्या पिढीतील चमत्कार ताऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. येथे नव्यांचेच कविसंमेलन चांगले झाले.

17 ऑगस्ट 2002 

या आठवड्यात पत्रकारांच्या निधनाच्या बातम्या एकामागोमागच आल्या. 11 तारखेस जळगावचे मा.बा.ऊर्फ बापूराव लेले गेले. त्यांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीत झाले होते. लालबहादूर शास्त्रींबरोबर जी मोजकी माणसे ताश्कंदात गेली होती, त्यांत बापूरावही होते. त्यांनी त्याबद्दल लिहिलेही होते. परवा बेळगावचे जुने पत्रकार वामनराव सावंत गेले. 'लोकशक्ती', 'वर्षा', 'चिकित्सक' अशा, आता नावेही माहीत नसलेल्या 'पत्रां'शी त्यांचा संबंध होता. 'डॉन' या इंग्रजी दैनिकाचेही ते काही काळ प्रतिनिधी होते. आज जी बातमी कळली ती मिलिंद रत्नपारखी ह्या नव्या पिढीतील पत्रकाराच्या वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी झालेल्या निधनाची. सध्या त्यांचे 'डोअर- टु-डोअर' पत्रच चालले होते. त्यांचे नाव विशेष लक्षवेधक ठरले ते 'घरदार' मुळे. पत्रकारांचाच एक कार्यक्रम पणजीला झाला. त्यात सीताराम टेंगसे ह्यांना भारतकुमार राऊत यांच्या हस्ते कै.लक्ष्मीदास बोरकर प्रथम स्मृती पुरस्कार देण्यात आला. ह्यावेळच्या राऊत आणि टेंगसे ह्यांच्या बोलण्यातून आता वृत्तपत्रांनी कात टाकण्याची वेळ आलेली आहे; त्यांनीही उत्क्रांतीच्या दिशेने पावले टाकली पाहिजेत, हेच प्रकर्षाने जाणवले.'

18 ऑगस्ट 2002

'इतिहास जपणारे वातावरण नष्ट करण्यास पुस्तकी शिक्षण पद्धती जबाबदार आहे' असे दि.पु.चित्रे अवर बिल्ट हेरिटेज, एक्सप्लोरिंग बिल्डिंग्ज इन पुणे' या शालेय मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकांच्या प्रकाशन समारंभात बोलल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे म्हणणे पुण्यातील जुने संदर्भ आता केवळ त्या काळातील कादंबऱ्यापुरतेच शिल्लक राहिले आहेत. 

माधुरी पुरंदरे ह्यांनीही पुढाकार घेऊन चित्रकलेच्या दृष्टिकोनातून 'नाचू आनंदे' पुस्तके तयार केली आहेत, 'मिळून साऱ्याजणी' नियतकालिकाने आपल्या वर्धापनदिन सोहोळ्यात त्यालाच प्राधान्य देऊन इतरांनाही हे 'वाचू आनंदे' ऐकू दिले.

19 ऑगस्ट 2002 

लोकसभेचे सभापती मनोहर जोशी एका पुस्तक प्रकाशनासाठी मुद्दाम पुण्यात आले होते. 'वरदा'ने प्रकाशित केलेले आणि कॅनडास्थित श्रीपाद पेंडसे यांनी प्रायोजित केलेले हे पुस्तक होते, सविता भावे संपादित 'माझी प्रकाशवाट'. यावेळी ह्या पुस्तकाचे सारे सारच जोशीजींच्या भाषणातून समजले ते असे, 'समाजातील विविध क्षेत्रांतील मोठ्या माणसांचे मनोगत या पुस्तकातील लेखांतून वाचकांसमोर येते. वैद्यकीय व्यवसायातील डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्यापासून बँकिंग क्षेत्रात काम करणारे वसंतराव पटवर्धन, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ माजी सनदी अधिकारी बी.जी.देशमुख, मोहन धारिया, कथक नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार रोहिणी भाटे यांच्यासारख्या समाजात विविध क्षेत्रात वावरणान्यांचे मनोगत म्हणजे तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक. मा.ग.प्र.प्रधान या समारंभाचे अध्यक्ष होते.

22 ऑगस्ट 2002 

पद्मश्री विखेपाटील यांच्या जन्मदिनी प्रवरानगरला विशेष साहित्य पुरस्कार दिले जातात. यंदा हे पुरस्कारप्राप्त साहित्यिक ठरलेत यशवंत मनोहर, (जीवनायन- काव्य) आणि संजय कळमकर (भग्न-कादंबरी), ह्या दोन मुख्य मानकऱ्यांबरोबर मथू सावंत (तिची वाटच वेगळी-कथा), गोविंद पाटील (गावपरिवर्तन-काव्य), निवृत्ती महाराज कुरणकर (अभंगवाणी), मुबारक तांबोळी (मला भावलेले तुकोबा), क्रांती अनभुले (पाझर-काव्य) हेही ह्या दिंडीतील उपमानकरी आहेत.

23 ऑगस्ट 2002

पुण्यात आणखीन एक वेगळे पुस्तक प्रकाशित झाले- 'द जॉय ऑफ कॅन्सर'. हे लेखन करणाऱ्या अनुपकुमार ह्यांचे "जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास कुठल्याही संकटावर आपण आनंदाने मात करू शकतो' असे मत असल्याने त्यांनी हाही अनुभव कसा 'जॉयफुली' घेतला असेल-लिहिला असेल हे लक्षात येते. 'प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रचंड शक्ती असते. फक्त त्या आत्मविश्वासाला जागृत करण्याची गरज आहे. माझ्या पुस्तकातून ही शक्ती जागविण्याचा मी प्रयत्न केला आहे.' असे ते म्हणालेतच. दिल्लीतील एका मोठ्या कंपनीत जनसंपर्क विभागाचे प्रमुख असलेले अनुपकुमार केवळ ह्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते.

24 ऑगस्ट 2002

मागच्या आठवड्यात सासवडचे कविसंमेलन गाजवलेल्या नारायण सुमंत यांना पुढील आठवड्यात नगरला संजीवनी खोजे पुरस्कार देण्यात येणार आहे. 'सातबारा' हा त्यांचा काव्यसंग्रह ह्यासाठी विचारात घेतला गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील पिंपळखुटे गावचा हा शेतकरी 'नाणे खणखणीत असले तर ते वाजतेच- दबून रहात नाही', ह्या म्हणण्याचे द्योतकच आहे.

26 ऑगस्ट 2002

कराडला होणान्या साहित्य संमेलनाचे पडघम आता वाजू लागले आहेत. तेथील श्रीनिवास विनायक कुलकर्णी ('डोह'कार) स्वागताध्यक्षपदी निवडले गेले आहेत. ह्या संमेलनाचे अध्यक्षपद शिवाजी सावंत व सुभाष भेंडे ह्यांच्यापैकी कोणाकडे जाते है ऑक्टोबरमध्ये कळेल. सध्या ते दोघेही ह्या पदासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. मेंडे ह्यांच्या 'काजळल्या दिशा' या कादंबरीला ह्या महिन्यात 'शंकर पाटील पुरस्कार' महाराष्ट्र साहित्य परिषदेत देण्यात आला. तेव्हा त्या कार्यक्रमाला शिवाजीरावही आवर्जून आले होते. कार्यक्रम संपल्यावर त्या दोघांत काही बोलणेही झाले- ते बहुधा मैत्रीपूर्ण लढतीचेच असावे. भेंडे सध्या प्रचारदौऱ्यावरच आहेत; तर शिवाजीरावांनी विनंतिपत्र, 'बायोडाटा' सारे सञ्ज ठेवून काही 'मनसुबे' आखले आहेत.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके