डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुळात साक्षर काही विचारच करेनासे, पेटून उठेनासे झाले आहेत. साक्षरतेच्या पोटी एक वेगळीच निरक्षरता वाढू लागली आहे. त्यातच टीव्हीची भर पडली- वाचकच नाही, तर लेखकही टीव्ही स्वाधीन झाले आहेत. त्यांच्या लिखाणाला साहित्याचे निकष लावण्याचा प्रश्नच नाही. ते टीव्हीच्या फूटपट्टीनुसार लिहू लागले आहेत. भाक्रा धरणावर प्रत्यक्ष जाऊन 'आम्ही भगीरथाचे पुत्र’ लिहायचे दिवस आता मागे पडलेत. तसे आता 'नर्मदा’ वर लिहावे असेही कोणाला वाटत नाही. हा मेंदूचा एड्सच आहे. सांस्कृतिक गॅँगरीनच्या विळख्यात साहित्य अडकून पडले आहे.

1 फेब्रुवारी 2002

पुण्यातलं साहित्य संमेलन होऊन आता आठ-दहा दिवस झाले असले, तरी त्याचा धुराळा अजून उडतोच आहे. संमेलन झाल्यानंतरच्या रविवारी आदल्या दिवशी 26 जानेवारीची सुट्टी आल्याने वृत्तपत्रे बंद होती, त्यामुळे ह्या संमेलनावरचे लेख अजून येताहेत आणि मुळातच ह्या संमेलनात धूळ कमी, धुराळाच अधिक होता. संमेलन सुरू होण्याआधी त्यावर जे कोरडे ओढले जात होते ते कमी वाटावेत इतके ते कोरडे झाले. स्मृती मनात रेंगाळत राहाव्यात असे त्यात काही झालेच नाही. नाही म्हणायला संमेलनाचे अध्यक्षमहाराज वर्गात धडा शिकवावा तसे मास्तरांसारखे व्यासपीठावरून हात आपटत जे काही बोलत होते ते गमतीचे होते.

उलट ह्या संमेलनाच्या पंधरवडाभर आधी 'महाराष्ट्र फाऊंडेशन'चा जो कार्यक्रम झाला तो किती शानदार होता! ते एक संमेलनच होते. त्या संमेलनात शोभावे असेच ह्या फाऊंडेशनचा पुरस्कार स्वीकारताना भालचंद्र नेमाडे बोलले होते. ह्या कार्यक्रमाइतकीच देखणी आणि वाचनीय स्मरणिकाही फाऊंडेशनने प्रसिद्ध केली होती आणि ती सर्व उपस्थितांना सन्मानाने दिली होती.

ह्या आहीधी आठ-दहा दिवसांपूर्वी, 'दिलीपराज' प्रकाशनाच्या एक हजाराव्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने दोन दिवसांचा जो कार्यक्रम झाला तोही एका संमेलनासारखाच होता. त्याहीवेळी एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली होती न् ती सहज उपलब्ध होत होती. तीतून सारे 'दिलीपराज' दिसत होते.

‘अमृत महोत्सवी' संमेलनातही एक 'अमृतसंचय' स्मरणिका प्रकाशित झाली म्हणे! पण ते 'अमृतकुंभ’ संमेलनात कोठे दिसतच नव्हते.

5 फेब्रुवारी 2002

नाशिकची बातमी आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'मराठी भाषेबरोबरच सामाजिक, राजकीय व सहकार या विषयांचे संवर्धन, संशोधन व्हावे म्हणून अभ्यासू जनांसाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने स्वतंत्र अध्ययन न्यास स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुसुमाग्रज न्यासाद्वारे विशेषतः मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा; तसेच संशोधनाच्या दृष्टीने या भाषेला महत्त्व प्राप्त व्हावे म्हणून त्याच्या अभ्यासकांना सर्वतोपरी मदत केली जाईल.' मराठी भाषेची कशी लक्तरे झाली आहेत हे सांगणाऱ्या कुसुमाग्रजांच्या नावे असे काही उचितच. कविवर्यांचा अखेरचा काव्यगुच्छ 'थांब सहेली' नावाने 'पॉप्युलर’ ने नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्याच्या मलपृष्ठावरील कुसुमाग्रजांची कविता आहे

"जगात जगाचे रहिवासी कोणीच नाहीत, असले तर फार थोडे. सर्वजण आपल्या देशाचे, प्रांताचे, जिल्ह्याचे आणि गावाचे रहिवासी आहेत. सर्व माणसं सरहद्दीत राहत आहेत. " "सरहद्दी अपरिहार्य नाहीत का?"

'अपरिहार्य असतील. पण आवश्यक नाहीत, आणि इष्टही नाहीत. अवाजवी खाण्यानं अजीर्णाचा आजार होतो. तो अपरिहार्य, पण आवश्यक वा इष्ट नाही."
"पण सरहद्दी नष्ट करण्याचे कार्य धर्मानं, राजकीय, सामाजिक तत्त्यज्ञानोंनी केलं आहे."

"त्यांनी काही सरहद्दी नष्ट केल्या, पण अधिक मोठ्या, अधिक कर्मठ अशा सरहद्दी निर्माण केल्या. कोणतीही सरहद्द- मग ती धर्माची असो वा देशाची असो- माणसांची विचारशक्ती मारते."

10 फेब्रुवारी 2002

गोंदिया जिल्ह्यातील बोरकन्हार येथे नववे 'झाडी बोली संमेलन' झाले. ही 'झाड़ी बोली' गोंदिया-भंडारा-चंद्रपूर-गडचिरोली या चार जिल्ह्यांतच विशेषत्वाने जाणवते. या भागाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे तिला हे नाव पडले. जंगलाने वेढलेल्या परिसरातल्या माणसांची बोली म्हणजे 'झाडी बोली' असेच म्हणता येईल. ह्या परिसरातील माणसे 'झाडपे' म्हणूनच ओखळली जातात. मराठी संमेलनात जसा मराठीबद्दलचा ठराव झाला तसेच याही संमेलनात ठामपणे सांगितले गेले आहे की, 'आमच्या बोलीचे नाव बदलू नका, ते 'झाड़ी'च राहू द्या.’

पुण्यात अमृतमहोत्सवी संमेलन चालू होते तेव्हाच अमरावतीला एक ‘विद्रोही' संमेलन भरले होते. आताही एक विद्रोही संमेलन सातारा येथे चालू आहे. दोन्ही संमेलने चौथी? ह्यांतले खरे ‘विद्रोही' संमेलन कोणते व कितवे? अशा रीतीनेच हीही संमेलने होत गेली न् ती अमृतमहोत्सवापर्यंत पोहोचलीच तर त्यांचीही स्थिती-गती अशीच होईल? शक्यता तशीच.

तर सातारा येथील आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलीभाषेचे महत्त्व अगदी सहउदाहरण पटवून देत बाबा आढाव म्हणाले, “आणीबाणीतील तुरुंगवास संपवून आम्ही बाहेर आलो, तेव्हा एका सभेत भगिनी म्हणाल्या, 'चिरगुटात बांधून ठिवलेल्या मटकीला मोड आल्यावानी झालंय!'- मराठीच्या बोलीभाषेतील वाङ्मय खरोखरच अक्षरबद्ध करायला हवं-हे काम बहुजन लेखकांनी केलं पाहिजे!”

ह्या भाषणातील त्यांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता, विद्रोही चळवळीचा चक्रधर, बुद्धापासून फुले, आंबेडकर, शाहू छत्रपतीपर्यंतचा इतिहास येथे मांडला जातो. आता त्या इतिहासाचे केवळ पोवाडे गाऊन भागणार नाही. नव्याने मोर्चेबांधणी करावी लागेल. अशा मोर्चाचे नेतृत्व कष्टकरी स्त्री-समर्थपणे करील, असा माझा कयास आहे.

17 फेब्रुवारी 2002

‘साहित्य संवाद' नावाचे आज आणखी एक साहित्यमंडळ पुण्यात अस्तित्वात आले. भिरदेव गायकवाड, मधुसूदन घाणेकर, मनोहर सोनवणे, वगैरेंनी त्याच्या रीतसर उद्घाटनासाठी कुमार केतकरांना बोलाविले होते. दीपप्रज्वलन करून ह्या पाहुण्याने निश्चित काही बोलावे म्हणून केतकरांसाठी 'बदलत्या परिस्थितीत साहित्यिकांकडून अपेक्षा' असा विषयही निश्चित करण्यात आला असला, तरी बदलती परिस्थिती म्हणजे निश्चित कोणतीन् केव्हाची- कालची? आठवडाभरातील? महिन्यातील? वर्षातील का दशकातील, हा प्रश्न होताच. म्हणून कुमार केतकरांनी गेल्या तीसेक वर्षातील परिस्थितीवर प्रथम एक धावता कटाक्ष टाकला. 'सत्यकथा’ सारखे साहित्यिक मासिक आता नाही, असे जरी केतकरांचे म्हणणे असले तरी 'सत्यकथे’ ने जाणीवपूर्वक आपले असे स्थान निर्माण करून घेतले होते. पटवर्धन स्वामी हे त्याचे मठाधीपती होते अन् भलेभले त्यांच्या भजनी लागले होते असेही ते म्हणाले, 'सत्यकथा’त जे छापणे अशक्य असायचे पण जे छापण्याजोगे (स्वामींच्या मते) असायचे ते ‘महाराष्ट्र टाइम्स'च्या रविवार पुरवणीत यायचे. तेथेही एक गोविंदस्वामी होतेच, स्वामींचा सुळसुळाट येथूनच झाला आहे, असेही ते म्हणाले.

ब्राह्मणांनी साहित्य लिहायचे न् मराठ्यांनी राजकारण करायचे असे तेव्हा सरळ विभाजन होते. यशवंतराव चव्हाणांनी मोठ्या खुबीने आपल्या गोटात ब्राह्मणांना सामील करून घेतले होते. 'दलित पँथर’ ने विशेषतः राजा ढाले, नामदेव ढसाळ ह्यांनी ह्या साऱ्याविरुद्ध पहिल्यांदा खरा आवाज उठविला. पण तेव्हाही लक्ष्मण माने, ना. धों. महानोर इत्यादींना यशवंतरावांनी चुचकारून घेतलेच. पुढे 'मंडळ' आले, साक्षरता वाढू लागली तेव्हाच नेमके 'सत्यकथा' बंद पडले. समांतर साहित्य संमेलनामुळे साहित्यिकांतही उघड उघड दोन तट पडलेत पण या राजकारणावरून, सरकारी साहाय्यावरून हे झाले ते कारण तसेच राहिले. तेव्हाचा 'वंदे मातरम् ट्रस्ट' कधी बारगळला कळलेही नाही. (आताच्या कोशाचे तरी काय?) साहित्य संमेलनातील ठरावाला काही किंमत होती- (आता त्याला कोणी विचारतही नाही). साक्षर मंडळींना आपले विचार व्यक्त करायला आता काही साधनच उरले नाही. (अंतर्नाद, नवभारत वगैरे आहे पण त्याला खूप मर्यादा आहेत.)

मुळात साक्षर काही विचारच करेनासे, पेटून उठेनासे झाले आहेत. साक्षरतेच्या पोटी एक वेगळीच निरक्षरता वाढू लागली आहे. त्यातच टीव्हीची भर पडली- वाचकच नाही, तर लेखकही टीव्ही स्वाधीन झाले आहेत. त्यांच्या लिखाणाला साहित्याचे निकष लावण्याचा प्रश्नच नाही. ते टीव्हीच्या फूटपट्टीनुसार लिहू लागले आहेत. भाक्रा धरणावर प्रत्यक्ष जाऊन 'आम्ही भगीरथाचे पुत्र’ लिहायचे दिवस आता मागे पडलेत. तसे आता 'नर्मदा’ वर लिहावे असेही कोणाला वाटत नाही. हा मेंदूचा एड्सच आहे. सांस्कृतिक गॅँगरीनच्या विळख्यात साहित्य अडकून पडले आहे. परस्परांत संवादच राहिला नाही. असा संवाद हीच ‘साहित्य संवाद'सारख्यांकडून अपेक्षा आहे- असे आपल्या जेमतेम तासाभराच्या व्याख्यानात कुमार केतकर ह्यांनी बैठक मारून प्रभावीपणे ऐकविले.

18 फेब्रुवारी 2002

'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. जोगळेकर यांचा राजीनामा?' अशी प्रश्नार्थक बातमी परवा आली होती न् आज बातमी आली परिषदेचे प्रमुख कार्यवाह ह. ल. निपुणगे ह्यांचा आपल्या पदाचा राजीनामा- खरे तर त्या प्रश्नार्थक बातमीतच हे काही खरे नाही, हे स्पष्ट होत होते. ज्या डॉक्टर महाशयांनी गेल्या काही वर्षांत परिषदेचे सर्वेसर्वा ज्येष्ठ स्वामी होण्यात धन्यता मानली आहे आणि हा मठ आता पाच वर्षे आपल्याच हातात राहावा ह्याची नियोजनबद्ध व्यूहरचना केली होती-ते असे सहजासहजी राजीनामा देणे शक्यच नव्हते.. त्यांनी निपुणगेंना बरोब्बर आपल्या जाळ्यात ओढले न् गतवर्षीच्या निवडणुकीपासूनच त्यांना नको असलेल्या हलंना त्यांनी अचूक टिपले! अविश्वासाच्या ठरावाला तोंड देण्यापेक्षा प्रकृतीचे कारण सांगून निपुणगे राजीनामा देऊन मोकळे झाले असले, तरी त्यांनी कार्याध्यक्षांच्या दिशेने तोफ डागली आहेच- खरे तर 'रूपी’ बँकेप्रमाणे ही परिषदही प्रशासकांनी हातात घ्यायला हवी आहे.

Tags: जोगळेकर महाराष्ट्र साहित्य परिषद कुमार केतकर सदर साहित्यप्रेमी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके