डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साहित्यप्रेमीची नोंदवही : मार्च 2002

'अभिरुची' ह्या साहित्यप्रेमींच्या दृष्टीने एकेकाळी लक्षवेधक ठरलेल्या नियतकालिकाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम आत्माराम म्हणजेच बाबूराव चित्रे गेले, त्याला आज एक महिना झाला. त्यांचे ‘अभिरुची’ बडोद्यासारख्या दूरवरच्या ठिकाणाहून (तेव्हा महाराष्ट्र-गुजरात एकच होते.) प्रसिद्ध होत होते. तरी त्यांनी मराठी रसिकांच्या मनात चांगलेच स्थान मिळविले होते. पण यथावकाश हे स्थान डळमळले ते डळमळलेच.

1 मार्च :

'मराठी वाङ्मयाच्या ‘मंडलायझेशन’ प्रक्रियेतील भालचंद्र नेमाडे हे एक नमुनेदार ‘ओबीसी टेररिस्ट’ आहेत आणि त्यांनी मांडलेला एतद्देशीय वाद संधिसाधू स्वरूपाचा आहे, अशी टीका गोव्यातील समीक्षक आनंद पाटील यांनी दिल्लीला साहित्य अकादमीतर्फे झालेल्या 'वाङ्मयीन समीक्षेची स्थिती : काल, पाठ आणि मुद्दे' ह्या चर्चासत्रात केल्याची बातमी आली आहे.

मुळात ग्रामीण भागातून, अशिक्षित कुटुंबातून आलेले आनंद पाटील मराठी साहित्य जगतावर नेहमीच परखडपणे क्ष - किरण टाकत असतात. पुण्या-मुंबईत नव्हे तर लंडनलाही शिक्षणानिमित्ताने राहिलेल्या नेमाडे यांचा एतद्देशीय वाद त्यांना दांभिक वाटत आला आहे. त्यांच्या मते “यापुढील काळात संमिश्र अशा पाठांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामध्ये युरोप व अमेरिकेत राहून लिखाण करणारे आणि भारतात राहून या भाषांमध्ये लिखाण करणारे असे दोन ठळक वर्ग निर्माण होतील. परदेशांत राहून लिखाण करणारे विश्वबंधू त्याचा पुरस्कार करतील तर या पाश्चात्त्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय भाषिक लेखकांना संदर्भावर आधारित भूमिका घेत लिखाण करावे लागेल. आगामी वाङ्मयीन संघर्ष याच स्वरूपाचा असेल.”

2 मार्च :

पुण्यात सध्या कुठल्याही रस्त्याने जा ‘चिंटू’ आढळतोच. एका वृत्तसंस्थेकडून दुसऱ्या वृत्तसंस्थेकडे रातोरात जाणे अन् तेच जणू आता ह्या अंकाचे एकमेव ठळक  वैशिष्ट्य आहे असे इतक्या जाहीरपणे भासविणे ह्यात असा कोणता 'विजय' आहे न् त्याने कोणता 'अरुणोदय' झाला आहे, हे त्यांचे त्यांना माहीत!

3 मार्च :

‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष रा. रं. बोराडे औरंगाबादला म्हणालेत म्हणे की, “मंडळ सध्या पुस्तक प्रकाशनावर लक्ष केंद्रित करीत असून वेगवेगळ्या कारणांनी प्रकाशित होऊ न शकलेली पुस्तके आता मार्गी लावणे चालले आहे.”

‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या योजनेअंतर्गत ‘स्वातंत्र्यसेनानी एस. एम. जोशी’ (ग. प्र. प्रधान) आणि 'आचार्य दादा धर्माधिकारी', (तारा धर्माधिकारी) ही दोन पुस्तके मंडळाने हातावेगळी केली असून 'साने गुरुजी', 'क्रांतिसिंह नाना पाटील', 'पद्मश्री विखेपाटील' ही पुस्तके हातावेगळी होण्याच्या मार्गावर आहेत.

र. पु. कुलकर्णी यांचे 'शिल्पप्रकाश' 1992 पासून तर वि. पां. देऊळगावकर संपादित 'स्वामी रामानंद तीर्थ यांची रोजनिशी' 1993 पासून मुद्रणालयात रेंगाळले होते. बा. ह. कल्याणकर ह्यांनी संपादित केलेले 'पंडित जवाहरलाल नेहरू काळ आणि कर्तृत्व' हे पुस्तकही जवळपास गेली दहा वर्षे केवळ त्यातील इंग्रजी उताऱ्यांच्या मुद्रितशोधनासाठी अडकून पडले होते. रा.रं.नी मनावर घेऊन ही पुस्तके मार्गी लावली आहेत पण ‘टिळक स्मारक मंडळा’ने ह्या मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्त केलेल्या ‘शब्दकोशा’तील (चार खंड) दोष आणि उणिवा दूर करायला त्यांनाही अजून कोणी तज्ज्ञ मिळालेले नाहीत. मंडळाच्या गोदामात पडलेल्या पुस्तकांची बोराडे यांनी सांगितलेली सुरस कहाणी म्हणजे 'मंडळाला भेट म्हणून आलेली पुस्तके हजारो आहेत. ती भेट म्हणून आल्याने विकताही येत नाहीत. कोंदट आणि कुबट गोदामात बसून ती मोजणे वगैरेही शक्य नाही. व्ही.टी.जवळच्या गोदामातील ही पुस्तके दादरच्या मंडळाच्या कार्यालयात हालविणे हा त्यावर एक उपाय होता, पण त्यातही वाहतूक खर्चाची अडचण होतीच, मग मी माझ्या गाडीच्या डिकीत बसतील तेवढी पुस्तके हळूहळू हालविली. मग त्यांची मोजदाद केली तर ती साडेसतरा हजार भरली. एक तर ही पुस्तके रद्दीत टाकायची किंवा ती वाचकांपर्यंत पोहोचवायची असे दोन पर्याय आमच्यासमोर होते. आम्ही दुसरा पर्याय निवडला. 'क' व 'ड' वर्गाच्या उत्कृष्ट, वाचनालयांना प्रत्येकी 250 आणि लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या भूकंपग्रस्त भागातील शाळांना प्रत्येकी 200 पुस्तके देण्याचे ठरविले. 'क' व 'ड' वाचनालय यांनी ही पुस्तके स्वखर्चाने मुंबईहून नेली तर भूकंपग्रस्त भागातील शाळांची पुस्तके संबंधित अधिकारी नेण्याची व्यवस्था करणार आहेत... अर्थात हे सारे इतके सरळ घडले नाही. ह्यावरून वादंग झालेच.

वादंग व्हावे अशीच मेख सरकारने मारून ठेवल्यावर वादंग होणार नाही का? सरकारने एक ‘विज्ञान पुस्तक योजना’ प्रकाशकांसाठी जाहीर केली होती. तिच्या निर्णयाची प्रकाशकांना प्रतीक्षा होतीच. सरकारने एकदम आपला निर्णय जाहीर केला आणि अगदी अल्पकाळात ही पुस्तके त्या त्या प्रकाशकांनी महाराष्ट्रातील ठराविक शाळांतून अमुक तारखेस पोहोचवली पाहिजेत अशी अट घातली. म्हणजे योजना चांगली पण अट अडचणीची! कारण सरकारने जो कालावधी दिला होता तो पुस्तकनिर्मितीसही पुरेसा नव्हता; तर जेथे सहजासहजी जाणे अजूनही शक्य नाही, अशा ठिकाणांच्या शाळांतून ती पोहोचविणे अगदीच अशक्य होते. त्यावर वादंग झाले अन् अखेर संबंधित मंत्रीमहोदयांनी 'त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तके पोहोचवा, पुढचे आम्ही बघून घेऊ...' असे सांगून टाकले.’

6 मार्च :

नवी दिल्ली (पीटीआय, यूएनआय) न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने आज एक दिवसाचा प्रतीकात्मक तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. दंड न भरल्यास तीन महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.' ह्या बातमीवर ज्या 'नर्मदा' आंदोलनात रॉय उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या आहेत त्या आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर ह्यांची प्रतिक्रिया आहे, आंदोलकांना व्यावसायिकीकरणाविरुद्ध नव्या उमेदीने लढण्यासाठी आता कारण मिळाले.

काहीही होवो, मेधा पाटकरांनी आपला निर्धार सोडलेला नाही; म्हणून तर त्यांच्याबद्दल त्याचवेळी शैला सायनाकर ह्यांनी केलेल्या कवितेतील काही ओळी अशा आहेत...
‘चढत्या पाण्याला रोखून
पाय रोवून
तू उभी राहतेस खंबीरपणे
नर्मदेच्या प्रवाहात! डोमखेडीत!
प्रत्येक झोपडीत!
तुझ्या निश्चयाने थबकतात
राक्षसी धरणांच्या भिंती
आणि सुखावतात
नर्मदाकाठचे
भाबडे आदिवासी!’

7 मार्च :

कादंबरीकार देवदत्त पाटील ह्यांचे मिरज येथील रुग्णालयात निधन झाले. ते अवघे छपन्न वर्षांचे होते. शिक्षणक्षेत्रातून पाटील यांनी 31 जानेवारीला स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. 20 फेब्रुवारीला त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि आज त्यांचे निधन झाले! कादंबरीकाराच्या कल्पनेतल्याच वाटाव्यात अशा या घटना घडल्यात.

सांगली येथे महाविद्यालयातील शिक्षण घेतल्यावर पाटील बॅ.पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एम.ए. झाले होते. इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर वर्गाना ते 'इंग्रजी' शिकवत. त्यांच्या कादंबऱ्या मात्र अस्सल मराठी होत्या. त्यांच्या 48 कादंबऱ्यांपैकी ‘शर्थ’ ही कादंबरी त्यांनी येडोनिपाणी गावचे स्वातंत्र्यसैनिक पांडु आल्हाट यांच्या जीवनावर लिहिलेली होती, तर त्यांच्या 'गुलाब' ह्या कादंबरीची नायिका होती सुप्रसिद्ध नर्तिका गुलाब कोरगावकर. 'बानू' या त्यांच्या कादंबरीवर 'जख्मी वाघीण' हा चित्रपट निघाला होत्या अन् 'सौभाग्याचं लेणं', 'सडा हळदी-कुंकवाचा' हे चित्रपट लेखनही त्यांचेच!

25 मार्च :

'अभिरुची' ह्या साहित्यप्रेमींच्या दृष्टीने एकेकाळी लक्षवेधक ठरलेल्या नियतकालिकाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम आत्माराम म्हणजेच बाबूराव चित्रे गेले, त्याला आज एक महिना झाला. त्यांचे ‘अभिरुची’ बडोद्यासारख्या दूरवरच्या ठिकाणाहून (तेव्हा महाराष्ट्र-गुजरात एकच होते.) प्रसिद्ध होत होते. तरी त्यांनी मराठी रसिकांच्या मनात चांगलेच स्थान मिळविले होते. पण यथावकाश हे स्थान डळमळले ते डळमळलेच. बाबूरावांच्या ध्यानी-मनी अखेरपर्यंत ‘अभिरुची’च होते, नव्या पिढीचे सहकार्य मिळविण्याचा त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केला पण त्यांचे त्यांच्याशी सूर नाहीच जमू शकले आणि 'पुरुषराज आळूरपांडे' सारखी मजा उडवून देणारे 'अभिरुची' वाचकांपासून दूर राहिले, ते दूरच राहिले. आता बाबूराव गेले!

26 मार्च :

दिल्लीच्या संसदेतील आपल्या राजकारण्यांसाठी तेथे एक 'पार्लमेंट लायब्ररी' आहे. तेथे सध्या कोण काय वाचतो ह्याबद्दल प्रसिद्ध झालेला मजकूर चविष्ट आहे.

आपले पंतप्रधान अटलजी सध्या ‘Ancient History of Ayodhya’ वाचीत आहेत, तर सोनीयाजींनी नुकतेच ‘Atal Bihari Vajpayee : Four Decades in Parliament (Vol. Three)’  वाचायला नेले आहे. उमाजी (भारती)  ‘Rise and Fall of Nepoleon, Adolf Hitler’ वाचनात सध्या मग्न आहेत; तर 5 मार्चला जॉर्ज फर्नाडिस ह्यांच्या नावावर नोंद झालेले पुस्तक आहे 'Communal, Riots in India (Post Independence)'. आडवानीजी सध्या आपला फावला वेळ 'The man who killed Gandhi': वाचण्यात घालवीत आहेत. प्रमोद महाजन यांनी हा वेळ ‘Practice and Procedure of Parliament’ वाचण्यात घालवायचे ठरविले आहे, तर जयपाल रेड्डी यांनी ए. के. मुखर्जी ह्यांचे 'Parliamentary Procedure in India' वाचायचे मनावर घेतले आहे. ह्या साऱ्यावर अधिक भाष्य नकोच!

Tags: मेधा पाटकर अरुंधती रॉय बा.ह. कल्याणकर र.पु. कुलकर्णी ग. प्र. प्रधान एस.एम. जोशी रा रं बोराडे आनंद पाटील भालचंद्र नेमाडे साहित्यप्रेमीची नोंदवही Medha Patkar. Arundhati Roy B.H. Kalyankar R.P. Kulkarni G.P. Pradhan S.M. Joshi R.R. Borade Anand Patil Bhalachandra Nehame Sahityspremichi Nondvahi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके