डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अध्यक्षांनी गिळंकृत केलेल्या पैशांतून ठाणे परिसरात शंभराहून जास्त एकर जमीन खरेदी केली होती. तिथे हौसिंग सोसायटी बांधली होती. त्याचा भरपूर पैसा अध्यक्षांच्या हातात खेळत होता. आता ते समाजात मोठ्या मानाने जगत होते. समाजसुधारणेत आपल्याला जास्त रस आहे असे दाखवीत होते. शाळातील मुलांना वह्या-पुस्तकाचे वाटप करीत होते, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होते. आणि माझ्या मुलीने विचारले, 'कोण आहेत ते?'

माझी मुलगी या वर्षी दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाली. एस.एस.सी. बोर्डाने दोन वर्षापासून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बंद केले, अन्यथा तिचे नाव गुणवत्ता यादीतही आले असते, तरी झाडून सगळ्या वर्तमानपत्रांतून शाळेच्या निकालाबरोबर तिचे नाव झळकले... सगळीकडे चर्चा झाली. तिचे अभिनंदन करण्यासाठी अनेकजण येऊन गेले.

निकालानंतर दोन दिवसांनी एक मोठी व्यक्ती तिचे अभिनंदन करण्यासाठी आली. तशी त्या व्यक्तीची आणि माझी फक्त ओळख होती, दाट परिचय किंवा घरगुती संबंध म्हणावेत एवढे आमचे घनदाट नाते नव्हते. हातात मोठासा फुलांचा गुच्छ आणि पेढ्याचा पुडा घेऊन त्यांनी आमच्या घरी आगमन केलं. नमस्कार वगैरे घालून झाल्यावर त्यांनी कन्येला बोलावलं. आमची कन्या त्यांच्यापुढे आली, त्यांनी तिचे अभिनंदन करीत फुलांचा गुच्छ आणि पेढ्याचा पुडा तिच्या हाती दिला. पुन्हा एकदा तिचे अभिनंदन केले. पुढे काय करणार वगैरे विचारले. इतर मुले जे उत्तर देतात तेच तिने दिले. तिला इंजिनियर वगैरे व्हायचं आहे. 

कन्या त्यांच्या पायावर डोकं ठेवून आत गेली. चहा-पान झाल्यावर ते गृहस्थही निघून गेले. जाताना आपण तिच्या भावी शिक्षणासाठी मदत करू असं म्हणाले. स्वत:ही दहा हजार रुपयांची मदत देण्याचे कबूल केले.

सर्वसाधारणपणे हुशार मुलांच्या बाबतीत घडतो तोच प्रसंग माझ्या घरात माझ्या मुलीच्या बाबतीत घडला, पण खऱ्या अर्थाने मला नंतर अवघडल्यागत वाटू लागलं. ते गृहस्थ गेल्यावर कन्येने मला विचारलं, "कोण होते ते?"

नेहमीसारखाच तिचा साधा प्रश्न, पण त्या प्रश्नाचे उत्तर देताना मला काय बोलावं ते कळेना. माझी परिस्थिती खूपच अवघडल्यागत झाली. येऊन गेलेले गृहस्थ समाजातले मोठे पुढारी वगैरे नव्हते, ते एका पतसंस्थेचे अध्यक्ष होते. गेली दहा वर्षे त्यांची पतसंस्था समाजात नावाजली होती, पण मागील वर्षी त्या पतसंस्थेत अध्यक्षांनी आणि तिच्या संचालकांनी मोठा भ्रष्टाचार केला होता. अनेक सभासदांचे पैसे त्यांनी पळवले होते. ठेवीदारांच्या ठेवी गिळंकृत केल्या होत्या. गोरगरिबांच्या घामाचे पैसे लंपास केले होते, पुढे पोलिसकेस वगैरे झाली. अध्यक्षांना अटक झाली. त्यातून ते सहीसलामत सुटलेही.

अध्यक्षांनी गिळंकृत केलेल्या पैशांतून ठाणे परिसरात शंभराहून जास्त एकर जमीन खरेदी केली होती. तिथे हौसिंग सोसायटी बांधली होती. त्याचा भरपूर पैसा अध्यक्षांच्या हातात खेळत होता. आता ते समाजात मोठ्या मानाने जगत होते. समाजसुधारणेत आपल्याला जास्त रस आहे असे दाखवीत होते. शाळातील मुलांना वह्या-पुस्तकाचे वाटप करीत होते, हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होते. आणि माझ्या मुलीने विचारले, 'कोण आहेत ते?'

तिला या सद्गृहस्थाची ओळख काय म्हणून करून देऊ? जीवनाच्या एका नवीन वळणावर उभ्या असलेल्या तिच्यासारख्या बुद्धिमान मुलीला एका भ्रष्टाचारी माणसाची ओळख सांगू? शिक्षणाशी ज्याला काही देणंघेणं नव्हतं, जो स्वत: दहावी नापास झाला होता. आयुष्यात जगण्यासाठी जी लबाडी लागते त्या लबाडीत मेरीटने पास होऊन कोट्यवधी रुपये ज्याने जमविले होते, त्याच्या कर्तृत्वाची ओळख तिला कशी करून देऊ?

जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याने जो मार्ग निवडला होता, त्या मार्गाची ओळख माझ्या मुलीला झाली तर तिचा शिक्षणावर विश्वास बसेल का? आतापर्यंत फक्त शिक्षणानेच माणसाचा विकास होतो हे तत्त्वज्ञान आम्ही उभयतांनी मुलांच्या मनावर बिंबवले होते, त्याला तडा जाण्याची वेळ आली होती. बरं खोटं बोलण्याचा आपला स्वभाव नाही. मुलांसमोर तर नाहीच नाही. अशावेळी काहीतरी तडजोडीचं बोलणं भाग पडतं, म्हणून मी तिला म्हणालो,

"समाजात यशस्वी होणारी माणसं दोन प्रकारची असतात, एक शिक्षण घेऊन यशस्वी होणारी आणि दुसरी न शिकता यशस्वी होणारी. तो माणूस दुसऱ्या प्रकारातला आहे. फरक एवढाच की शिक्षण घेऊन यशस्वी होणारी माणसं समाजातल्या चांगल्या मूल्यांच्या आधाराने यशस्वी होतात. शिक्षण न घेतलेली माणसं कोणत्याही मार्गाने यशस्वी होतात, पण त्यांना जेव्हा मूल्यांच्या मार्गावरून शिक्षण घेत जाणाऱ्या हुशार माणसांचं महत्त्व पटत तेव्हा ते त्यांचा गौरव करण्यासाठी पुढे येतात. सध्याच्या घडीला त्यांच्यात एवढा जरी बदल दिसला तरी खूप झालं. त्यांच्या हातून सत्कार स्वीकारून आपण अशाही माणसात बदल घडवण्याचा प्रयत्न करू या. " 

माझ्या मुलीला काय कळलं कोण जाणे, तिने तो विषय तेथेच थांबवला. 

Tags: ठेवीदार भ्रष्टाचार पतसंस्था शिक्षण depositors मूल्य corruption credit union education value weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके