डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपण हे पुस्तक मुलांसाठी तयार करत आहे याचे लेखकाने सतत भान ठेवले आहे. म्हणूनच पुस्तक अधिकाधिक रंजक करण्याकडे लेखकाचा कल आहे. लेखकाबरोबर रचनाकाराने, मांडणीकाराने, फोटोग्राफरने एकूण सगळ्याच टीमने मन:पूर्वक कष्ट घेतले आहेत. विषयाला अनुसरून थोर व्यक्तींची वचने जागोजागी दिली आहेत. प्रसिद्ध कवींच्या काव्यपंक्ती वापरल्या आहेत. जागोजागी थोडक्यात पण महत्त्वाचे उतारे दिले आहेत, प्रत्येक पानाच्या पार्श्वभागी सुंदर समुद्रकिनारा, किे, धार्मिक स्थळांची चित्रे दिली आहेत. राष्ट्रगीत दिले आहे, तसेच पसायदानही आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा दिली आहे. पंढरीच्या वारीचे चित्रही आहेच. प्रभात सिनेमाची मुद्रा छापली आहे, तशीच वारली चित्रकलाही घेतली आहे.

लहान मुलांना महाराष्ट्राची ओळख करून द्यायचीय? मग त्यांच्या हाती ‘मुलांचा चित्रमय महाराष्ट्र’ हे पुस्तक द्या. आणि तोंड बंद करून गप्प बसा. मुलांनी पुस्तक पाहून झाल्यावर महाराष्ट्राच्या प्राकृतिक आणि भौगोलिक भागावर हवे तेवढे प्रश्न विचारा. हवी तेवढी प्रात्यक्षिके करून घ्या. मुले तुम्हाला महाराष्ट्राबद्दल इत्यंभूत माहिती देतात की नाही बघा...

अगदी मुखपृष्ठापासूनच मुले पुस्तकाकडे आकर्षित होतील. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर फळांनी लदबदलेला महाराष्ट्र दिसेल. फळे पण कोणती? मुलांना हवीहवीशी, कल्पक चित्रकाराने काढलेले रंगीत मुखपृष्ठच मुलांना पुस्तकाकडे खेचून घेईल. सुमारे 50 पृष्ठांतून मुलांना अख्खा महाराष्ट्र आपलासा वाटू लागेल.

या पुस्तकात काय नाही? मुखपृष्ठाच्या आतल्या पानावर गोविंदाग्रजांचे महाराष्ट्रगीत आहे. लखोट्यात छापलेल्या या गीताच्या दोन्ही बाजूला दोन तुतारी वादक आहेत. खाली मंदपणे तेवणारी पाच ज्योतीची समई आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाते सांगणारी ही सजावट मुलांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबरोबर सांस्कृतिक परंपरेचीही ओळख करून देते.

पुढील पन्नास पानांमध्ये पन्नास विषय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांची माहिती देतात. सुरुवातीला महाराष्ट्राचे स्थान दर्शविणारे आकर्षक रंगीत पृष्ठ आहे. जगाच्या पांढऱ्या नकाशात आशिया खंड पिवळ्या रंगाने दाखवले आहे. त्यात गुलाबी रंगात भारत दाखविला आहे आणि लाल-केशरी रंगात महाराष्ट्र... अगदी अक्षांश-रेखांशासह आहे की नाही आकर्षक मांडणी?

पुस्तकातील प्रत्येक पान गुळगुळीत आर्ट पेपरचे आहे. दीड फूट लांब आणि एक फूट रुंद अशा विस्तीर्ण आकाराचे हे पान मुलांसाठी बिलकुल ओझे वाटत नाही. व्यापक आशय समृद्धीसाठी आणि मांडणीसाठी पानाचा असला आकार गरजेचा आहे. पानाच्या एका बाजूला महाराष्ट्राचा नकाशा आहे, तर शेजारीच नकाशातील चित्रांची मुद्देसूद माहिती आहे. प्रत्येक माहितीच्या सुरुवातीला विषयाला अनुसरून प्रसिद्ध कवींच्या काव्यपंक्ती आहेत, तर तळाला त्या माहितीत भर घालणारे तीन-चार रंगीत फोटो आहेत. एकाच पानात त्या विषयांची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना होईल अशी सुबक मांडणी केली आहे.

‘मुलांचा चित्रमय महाराष्ट्र’ या पुस्तकातील विषयसुद्धा किती छान आहेत? आणि किती माहितीपूर्ण? प्रत्येक पान म्हणजे महाराष्ट्राच्या विविध माहितीचा खजिनाच.

राजकीय महाराष्ट्र, प्रशासकीय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, मोगलकालीन महाराष्ट्र,मराठ्यांच्या विस्तीर्ण साम्राज्याचा आणि ब्रिटिश अंमलाचा महाराष्ट्र, मुंबई इलाखा, मुंबई प्रांत, मुंबई राज्य, द्विभाषिक विशाल राज्य आणि सध्याचा महाराष्ट्र अशा विविध नकाशांतून थोडक्यात पण सचित्र आढावा घेतला आहे.

महाराष्ट्राचा उंच-सखलपणा, नद्या, पर्वत, पर्जन्य, वनस्पती, खडक, खनिजे, खाणी, मुद्रा, जलसिंचन, ऊर्जानिर्मिती, भाताचे क्षेत्र, तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू, ऊस, कापूस, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, लहानमोठे उद्योग या सगळ्यांसाठी प्रत्येकी एकेक रंगीत नकाशा वापरला आहे. त्यात स्थळांची चित्रे, त्या त्या विभागांची चित्रे आणि सोबत मोजक्या शब्दांतून माहिती दिली आहे. सोबतीला समर्पक फोटो आहेतच.

उदा. महाराष्ट्रातील रस्त्यांचा नकाशा दाखवताना चौपदरी रस्त्यांचा फोटो, नव्या बोगद्यांचा फोटो, फुलांचे फोटो किंवा प्रत्येक विभागाची माहिती देताना त्या त्या विभागातील ऐतिहासिक वास्तू प्रकल्प यांचे फोटो दिले आहेत. (त्यासाठी एवढे मोठे विस्तीर्ण पान हवेच नाही का?)

पुस्तकात रस्ते, लोहमार्ग, पर्यटन, धार्मिक स्थळे, सांस्कृतिक महाराष्ट्र, आदिवासी जीवन यांचे स्वतंत्र चित्रमय नकाशे आहेतच, पण भटक्यांचे जीवनही नकाशातून दाखवले आहे. लहान-मोठी शहरे, फळांची गावे, नदीकाठची गावे यांचे रंगीत नकाशे आहेतच. शिवाय मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि कोकण रेल्वे या विभागांची स्वतंत्रपणे मुलांना ओळख करून दिली आहे.

रंगीत नकाशे आणि परिपूर्ण माहिती वाचल्यावर मुलांना स्वतंत्रपणे माहिती लक्षात ठेवावी लागत नाही, पण गुळगुळीत पाने रंगीत नकाशे आणि आकर्षक फोटो यामुळेच हे पुस्तक मला आवडले नाही.  मला हे पुस्तक आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे या महाराष्ट्राच्या पुस्तकात मुलांच्या कृतीवर आणि व्यवसायावर दिलेला भर. हे पुस्तक मुलांना माहिती रंजनाबरोबर विचार करायला आणि कृतीला प्राधान्य देते, त्यातून ज्ञानात भर घालते. मनोरंजन करता करता मुलांच्या हाताला कृती करायला लावण्याची लेखकाची कल्पना खूपच छान आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर पुस्तकाच्या शेवटी महाराष्ट्राच्या नकाशात एक भौगोलिक शब्दकोडे दिले आहे. संपूर्ण पुस्तक अभ्यासल्यावर मुले सहजतेने हे शब्दकोडे सोडवू शकतात. शिवाय काही पानांवर मुलांना सोडवण्यासाठी प्रश्न दिले आहेत. ठिपके जोडून शहरे एकमेकांना जोडायला सांगितली आहेत. शहरांची नावे लिहायला सांगितली आहेत. नकाशात नद्या दिल्या आहेत, त्या नद्याकाठच्या गावांची नावे लिहायला सांगितली आहेत, आकृती वाचनही दिले आहे.

आपण हे पुस्तक मुलांसाठी तयार करतयम याचे लेखकाने सतत भान ठेवले आहे. म्हणूनच पुस्तक अधिकाधिक रंजक करण्याकडे लेखकाचा कल आहे. लेखकाबरोबर रचनाकाराने, मांडणीकाराने, फोटोग्राफरने एकूण सगळ्याच टीमने मन:पूर्वक कष्ट घेतले आहेत. विषयाला अनुसरून थोर व्यक्तींची वचने जागोजागी दिली आहेत. प्रसिद्ध कवींच्या काव्यपंक्ती वापरल्या आहेत. जागोजागी थोडक्यात पण महत्त्वाचे उतारे दिले आहेत, प्रत्येक पानाच्या पार्श्वभागी सुंदर समुद्रकिनारा, किे, धार्मिक स्थळांची चित्रे दिली आहेत. राष्ट्रगीत दिले आहे, तसेच पसायदानही आहे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा दिली आहे. पंढरीच्या वारीचे चित्रही आहेच. प्रभात सिनेमाची मुद्रा छापली आहे, तशीच वारली चित्रकलाही घेतली आहे.

एकूण संपूर्ण महाराष्ट्राची भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, औद्योगिक अशी माहिती अवघ्या पन्नास पानांतून मुलांपुढे मांडली आहे. इतके दर्जेदार पुस्तक तयार करणारी व्यक्ती अर्थातच साधीसुधी नसणार हे वाचकांनी ओळखले असणारच. लहान मुलांची जडणघडण व्हावी या विचाराने प्रेरित झालेल्या व्यक्तीनेच हे पुस्तक तयार केले आहे. ती व्यक्ती म्हणजे कोसबाडच्या टेकडीवरून प्रकाशित होणाऱ्या आणि 77 वर्षांची परंपरा लाभलेल्या शिक्षणपत्रिकेचे संपादक प्रा.विद्याधर अमृते.

पुस्तक तयार करताना त्यांनी खरोखरच खूप विचार आणि कष्ट घेतले असणार, हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे यांची जाणीव मनात ठेवूनच पुस्तक तयार केले असणार. दर्जात कोठेही तडजोड नाही, माहितीत अपूर्णता नाही, चित्र आणि फोटोच्या मांडणीतील नीटनेटकेपणा, समर्पकपणा, बोलकेपणा यात घेतलेली दक्षता या सगळ्याच बाजूने पुस्तक परिपूर्ण झाले आहे.

प्रत्येक विचारशील पालकाने आपल्या लहान मुलांना माहिती देण्यासाठी विचारप्रवृत्त आणि कार्यप्रवण करण्यासाठी, हे पुस्तक घरी आणावेच असे लेखकाचे आवाहन आहे.

मुलांचा चित्रमय महाराष्ट्र

लेखक : प्रा. विद्याधर अमृते

मनन प्रकाशन, विलेपार्ले (पू.), मुंबई 57.

फोन : 022-26170908

Tags: चित्रमय महाराष्ट्राची सफर. उत्तम मांडणी चौफेर माहिती ज्ञान माहिती छायाचित्रे कृतीअभ्यास चित्रमय माहिती ऐतिहासिक सांस्कृतिक राजकीय महाराष्ट्राची सखोल माहिती मुलांचा चित्रमय महाराष्ट्र साईनाथ पाचारणे sainath pacharane cultural historical political Knowledge of Maharashtra puzzles Creativity Information Photo Mulancha chitramay Maharashtra Picturial Maharashtra Book Review Informative Book kids book weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके