डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माणसांमध्ये काम करत गेलो, तसे बदलत गेलो...

समाजकार्य जीवनगौरव : पुष्पा भावे

रुईया कॉलेजात पहिल्यांदा बघितलं, तेव्हाच भावलं- बार्इंचं बाणेदार व्यक्तिमत्त्व, त्यांच्या मंद रंगा’च्या सुती साड्या, केसांचा घट्ट आंबाडा. त्या वर्गात शिकवायला लागल्या की जाणवे त्यांची धारदार वाणी, सुस्पष्ट मांडणी. त्यांनी समजावलेला चक्रधरांपासून मर्ढेकरांपर्यंतचा महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास, देवलांच्या ‘संगीत शारदा’ नाटकासोबत समजावलेलं स्त्रीसमस्यांचं ऐतिहासिक परिप्रेक्ष्य, शिकवण्याच्या ओघात केलेलं वाङ्‌मय-समाज संबंधांवरचं भाष्य. शिकवण्याचा ओघ वेगवान, प्रवाही असायचा. कविवर्य वसंत बापट यांनीही आम्हाला शिकवलं होतं. तेही मंत्रमुग्ध करून टाकायचे. पुष्पाबार्इंनी त्यापलीकडे नेलं. विचार करायला शिकवलं. परंपरेचं भान देताना नवता आणि विद्रोह यांचंही मोल सांगितलं. अध्यापनाखेरीज नाटक, सिनेमा, समीक्षा, समाजकारण, राजकारण या साऱ्यांशी जोडलेल्या होत्या बाई.

प्रश्न : बाई, प्रत्येक व्यक्ती ही त्या-त्या काळाची निर्मिती असते, असं म्हणतात. आणि तुमच्यासारख्या व्यक्ती काळप्रभाव झुगारूनही वेगळ्या दिशेने जातात. तर, तुमचा तरुणपणाचा काळ, त्याचा प्रभाव याबद्दल काही सांगा.

 - आमच्या काळावर आधीच्या पिढीच्या ब्रिटिश कलोनियल, पारशी संस्कृतीचा प्रभाव होता. तरुणपणी कसं राहायचं, याच्याविषयी त्या काळात काही खास कल्पना होत्या. उदाहरण द्यायचं तर- फिका गुलाबी, पाणेरी हिरवा म्हणजे पिस्ता, असे रंग सुसंस्कृत मानले जायचे. फॅशनसाठी वापरण्याचा motif ज्याला नेमका मराठी प्रतिशब्द सापडत नाही- प्रतिमान वा रूपचिन्ह म्हणू शकतो. तर, आमच्या पिढीच्या काळात त्या मोटिफमध्ये हत्तीचा, मोराचा मोटिफ असे इंडियन मोटिफ यायला लागले. आम्ही ‘इंडियननेस’कडे या अर्थाने वळलो. आमच्या तरुणपणी ‘फेमिना’ वाचून घराचं इंटेरिअर करणं, या प्रकारच्या आकांक्षा होत्या.

माझी भाची म्हणाली होती की, तुम्हीसुद्धा कलोनियलच (वासाहतिक) आहात. कलोनियल संस्कृतीमधल्या काही वैशिष्ट्यांबद्दल आस्था असण्यात काहीच गैर नाही. उदाहरणार्थ- गुणवत्ता, सर्वोत्कृष्टतेसाठीचा व्यासंग. पण कलोनियल असण्याविषयी श्रेठत्वाची भावना किंवा त्यातच रमून जाण्याची माझी वृत्ती नव्हती. मला स्वभावतःच मुळी वर्ग-वर्णवर्चस्व, हा माणूस लहान- हा मोठा, असं कधीच वाटत नसे. पण कलोनियल प्रभावात वाढल्यामुळे काही गोष्टी आपसूक येतात. त्या हळूहळू मी त्यागत गेले. काळप्रभावापासून स्वतंत्र होण्याचा तो भाग होता. पण त्याच वेळेला असेही लोक होतेच की; जे सगळंच काही आमच्या देशात, परंपरेत, धर्मात आहे वगैरे म्हणत असत. ज्याला आता आपण ‘देशीवाद’ म्हणतो, त्या विचारप्रक्रियेतले नव्हते ते लोक. असं म्हणणाऱ्यांशी माझं नाही जुळलं कधी. नेमाडेंनी मांडलेला आताचा ‘देशीवाद’ नव्हता तो.

इतक्या वर्षांनी देश स्वतंत्र झालेला होता. आपल्या समाजाचे इतक्या आधीचे प्रश्न सोडवायचे होते. जी माणसं थोडी सजग होती, त्यांना यातून परिश्रमपूर्वक वाट काढावी लागली. त्यामुळे आम्हीही माणसांमध्ये काम करत गेलो, तसे बदलत गेलो. मला कधी वाईट वाटत नाही की, आधी आम्ही जे म्हणत होतो त्याहून निराळं नंतर म्हणू लागलो याचं! खरं तर हा आदर्श गांधीजींनीच घालून दिलेला!

प्रश्न : आधी जे म्हणत होता, त्याहून निराळं नंतर म्हणू लागलात- अनुभवांती मतं बदलली, याची काही उदाहरणं देऊ शकाल?

- आता नाटकाचंच उदाहरण घे. आम्ही तरुण होतो. आधी संस्कृत नाटकाचं तितकं कौतुक नव्हतं. पण नंतर ‘आपलं’ नाटक म्हणून संस्कृत नाटकाकडे नव्याने वळलो. स्वातंत्र्यानंतरची पिढी अशा स्वतःच्या, आपल्या गोष्टी शोधणारच. त्याचबरोबर कलोनियलला उत्तर म्हणून किंवा पोस्ट-कलोनियल म्हणून मी माझ्या क्षेत्रात शोधत गेले. ब्रिटिशांच्या पलीकडे इतर देशही आहेत, ही जाणीव झाली. मी किती तरी भाषांतरित फ्रेंच, दक्षिण अमेरिकन साहित्य वाचत गेले. साहित्य शिकत होते आणि पुढे शिकवणार होते, हेही मला माहीत होतं. आधी ग.दि.माडगूळकर हे कवी नसून गीतकार आहेत, असं म्हटलं जायचं आणि पुढे मंगेश पाडगावकर गीतं लिहायला लागल्यानंतर कवीला गीतरचनेचं कौशल्य आहे, असं आपण म्हणायला लागलो. एकदा मी शंकर वैद्य यांना विचारलं होतं की, केशवसुतांपासून आत्मनिष्ठ कविता सुरू झाली असं आपण म्हणतो; पण  तुकारामाच्या आध्यात्मिक आत्मचरित्राचं, त्यातल्या आत्मनिष्ठेचं काय करायचं? तर, असे प्रश्न पडत होते. पुढे शिकवायला लागल्यावर डोक्यात सतत विचार सुरू असे की, हे विधान आपण बरोबर करतो आहोत ना?

प्रश्न : तुमची मूळ आवड नाटक होती. तुम्ही स्वतः कॉलेजात शिकत होता तेव्हापासूनची. नाटकापासून सामाजिकतेकडे तुमचा प्रवास कसा झाला?

- सामाजिकतेबद्दल मी थोडी उशिरा विचार करायला लागले. कसून विचार करायला लागले 1967-68 च्या दरम्यान. त्या काळातल्या विद्यार्थी चळवळींनी स्वातंत्र्यपूर्व काळातलं भान परत जागं केलं. मराठवाडा, नंदुरबार वगैरेंशी आमचा संबंध आला. सामाजिक भान वाढायला त्याचीही मदत झाली. नाटकांसाठी मी औरंगाबादला म्हणजे मराठवाड्यात जायला लागले. विद्यापीठात नाटक विभाग सुरू करण्यासाठी मी आग्रह धरला. कमलाकर सोनटक्के याने ती जबाबदारी घ्यावी, असं ठरत होतं. हा विभाग शहरकेंद्री नसावा; त्याचं काम सगळीकडं पसरावं, असं मनात होतं. मराठवाड्यातलं प्रासंगिक वास्तव्य, तिथला प्रवास यांतून सामाजिक प्रश्नांची धग जाणवू लागली.

प्रश्न : म्हणजे नाटकातून तुम्ही सामाजिकतेकडे वळलात, असं म्हणायचं?

 - हो. असं म्हणायला हरकत नाही. आता कोणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, मी निर्मलाबाई पुरंदरे यांच्याबरोबर ‘विद्यार्थी सहायक समिती’चं काम करत असे. निर्मलाबार्इंना काही खास राजकीय दृष्टिकोन नव्हता. पण त्या करत असलेले प्रयत्न मला पटत होते. गावातल्या मुलींना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करायला कोणी अवसर देत नसे, इतकं त्या मुलींवर नियंत्रण असायचं. आम्ही सुट्टीत मुलींचे कँप घ्यायचो. साध्या-साध्या गोष्टी त्यांना शिकवायचो. त्यांच्याबरोबर काही वाचायचो. सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी विनोबा, गांधी वाचून त्यावर त्यांना चर्चा करायला लावायचो. किंवा समोरच्या घरात जा आणि त्यांना आपल्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्या, असं सांगायचं. मुलींमध्ये अशी कौशल्यं विकसित करण्याचे हे प्रयत्न.

त्या सगळ्या मुली अशा वातावरणातून आल्या होत्या की, मुलगी चार रात्री गावाबाहेर राहिली तर ती का आणि कुठे गेली होती ते पालकांना आणि अख्ख्या गावालासुद्धा पटवायला लागायचं! तर, अशा वातावरणातल्या मुलींसाठीचं हे काम.

प्रश्न : तुमच्यावर सामाजिक विचारांचा पगडा कोणाचा? व्यक्ती, तत्त्वज्ञान, राजकीय विचारधारा?

- माझ्या विचारांत सामाजिकता नैसर्गिकपणेच आली, असं मला वाटतं. माझ्यावर गांधीवादाचा संस्कार होता, पण मी तशी सांप्रदायिक गांधीवाद्यामध्ये कधीही नव्हते. सर्वोदय चळवळ वगैरेमध्येही मी नव्हते, पण गांधीवादाचा संस्कार होताच. म्हणून ठरवून वगैरे नाही, तर अगदी सहजपणे मी आणि अनंता खादीकडे वळलो. पण वेळ आली तेव्हा मी अगदी ‘मणिभवन’ला जाऊनही माझं मत मांडलेलं आहे की, गांधीवाद्यांनी कर्मसिद्धांतावर परत विचार करावा.

मी माझे विचार नेहमीच मांडत राहिले. माझ्या दृष्टीने समाजवादीही काही फार आदर्श वगैरे होते, असं नाही. त्यांच्या हातूनही चुका झाल्या, तेही भाबडे होते. मी सेवादलात एक दिवसही गेलेले नाही. तरीही माझा परिचय करून देताना सर्व जण, ‘मी सेवादलात होते’ असा उल्लेख करतात. गेलेच असेन, तर मी लोकसेनेत काही दिवस गेले. कारण आमच्या शाळेत थोड्या छान नेतृत्वगुण असणाऱ्या मुली डाव्या विचारसरणीच्या होत्या. त्यांच्या प्रभावामुळे मी ‘लोकसेने’त गेले. ‘लाल निशाण पक्षा’ने सुरू केलेली ही ‘लोकसेना’. आम्ही अमर शेख यांची गाणी म्हणत असू. फार काही कळत नव्हतं त्या वेळेला!

माझ्याहून वयाने लहान असणाऱ्यांकडूनच मी जास्त शिकले, असं म्हणायला हरकत नाही. त्यांपैकी एक नरेंद्र (दाभोलकर). तोही जे वाटतं, ते स्वच्छपणे सांगणारा होता. खरं तर, माझ्याहून तो वयाने किती तरी लहान! पण त्याच्याकडून मी बरंच शिकले. नरेंद्रचा आणि माझा संबंध देवदासींच्या प्रश्नावरच्या कामानिमित्ताने आला. मला नेहमीच वाटत राहिलं की, हे अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे नरेंद्रच्या कुवतीच्या मानाने छोटं काम होतं. अर्थात त्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचा अन्वय, पसारा खूपच वाढवला. त्याची व्याप्ती ‘विवेकाचा जागर’ इथपर्यंत नेली. पण तरी मला वाटत होतं की- साधना, ‘अंनिस’ (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)पेक्षाही नरेंद्र खूप काही करू शकला असता. गेल्या अनेक वर्षांच्या चळवळी पाहिल्या, तर लक्षात येतं की- नरेंद्रने चळवळीत अनेक तरुण मुलं आणली आणि अनेक मुलं त्याच्या आकर्षणाने चळवळीत आली, असं दोन्ही प्रकारे झालं. एवढे नवे चेहरे कोणाच्याही चळवळीत दिसत नसत.

माझा ‘युक्रांद’शी (युवक क्रांती दल) थेट संबंध कधीच नव्हता. मे.पुं.रेगे सरांकडे युक्रांदच्या बैठका होत. मी त्या बैठकींना कधी तरी गेले असेन, इतकंच. मी त्या वेळी गं.बा.सरदार किंवा नलिनी पंडित यांची मतं विचारात घ्यायचे.

प्रश्न : नलिनी पंडित, गंबांविषयी काही सांगा ना! गंबा तुम्हाला नेहमी लिही-लिही असं सांगत असत ना?

 - गंबांना 1980 च्या बार्शी इथे झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्ष बिनविरोध करायचं, हे आमच्याच घरात ठरलं. माझ्या घरीच केशव मेश्राम, अर्जुन डांगळे वगैरेंनी येऊन चर्चा केली आणि निर्णय घेतला. तरीही निवडणुकीची एक लुटुपुटीची लढाई झाली आणि निवडून आले सरदार! त्या वेळी मी फारसं लेखन करत नसे. चर्चा, सभा, शिबिरं यांत बोलत मात्र असे. तर गंबा म्हणायचे की, ‘लिहायला पाहिजेस तू. तुझी मांडणी चांगली आहे.’ नंतर बार्शीचं संमेलन संपल्यावर संमेलनासाठी म्हणून गोळा केलेले पैसे उरले, तर ‘पंडित सभा’ म्हणून दोन दिवसांची एक चर्चा त्यांनी घेतली होती. त्याच्यामध्ये मी रामदासांविषयी काही विश्लेषण केलं होतं. त्यांच्या-माझ्यातला दुवा होता नलिनी पंडित. पंडितबाई आणि मी काही वर्षं पार्ल्याला एका कॉलेजात होतो. नलिनी पंडित आणि गं.बा.सरदार यांची फार चांगली मैत्री होती. त्या मैत्रीमुळं महाराष्ट्राला लाभ झाला. गं.बां.बरोबरच्या चर्चेतून एक वेगळा दृष्टिकोन घेऊन पंडितबार्इंनी गांधीजींवर पुस्तक लिहिलं. अनेक साम्यवाद्यांनी ते वाचलं आणि आपला दृष्टिकोन बदलला. एक मोठं ऐतिहासिक कार्य झालं ते!

प्रश्न : संतवाङ्‌मयाची सामाजिक अंगाने मांडणी करणारे गंबा हे पहिलेच ना? त्यापूर्वी अशी मांडणी कोणी केली होती?

 - हो. त्यापूर्वी थोडी श्री.म.माटेंनी केली होती. म्हणजे दलितत्व आणि स्त्रीत्व असं जनाबाईचं दुःख दुहेरी आहे, हे विधान माटेंनी केलं होतं. तसे माटे हिंदुत्ववादी होते, पण त्यांनी दलितांसाठी खूप काम केलं होतं. म्हणजे इतकं की, पुण्यात त्यांना ‘महार माटे’ म्हणत असत. माटे तसे कळायला कठीण; पण मोठा माणूस होता. त्यांच्या काही भूमिका परखड आणि छान वाटतात. त्यांनी गांधीजींना पत्र लिहिलं होतं. गांधीजींविषयी आदर होता. पण त्यांच्या उपोषणतंत्राविषयी माटेंनी प्रश्न उपस्थित केले. गांधीजींनी उपोषण केलं, म्हणून एखादा मुद्दा मान्य ‘केला’; याचा अर्थ तो मुद्दा आम्हाला मान्य ‘झाला’ असं नाही, असं माटेंनी लिहिलं होतं. साने गुरुजींनी पंढरपूर विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं. तेव्हा त्याच गांधीजींनी ‘उपोषण तूर्त सोडा, दलितांच्या प्रवेशाचं आपण नंतर करून घेऊ’, असं साने गुरुजींना सांगितलं. त्या वेळी साने गुरुजींनी गांधीजींना उत्तर दिलं होतं की- तुमच्याविषयी आदर आहे, पण उपोषण नाही सोडणार! महाराष्ट्रातले माटे अणि साने गुरुजी या दोघांनी त्या वेळी गांधीजींना प्रश्न विचारण्याचं धैर्य दाखवलं होतं.

पंडितबाई तशा स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. त्या व्रत घेतल्यासारख्या गावोगाव जाऊन व्याख्यानं देत असत. त्या आणि मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला बरोबर असायचो. आमची चर्चा होत असे. नलिनी पंडित यांची तीन पुस्तकं- ‘गांधी’, ‘आंबेडकर’ हे आंबेडकरांचं चरित्र आणि तिसरं ‘राष्ट्रवादाचा विकास.’ ‘राष्ट्रवादाचा विकास’ हे त्यांचं महत्त्वाचं काम. पण आताच्या मुलांना ते पुस्तक वाचा म्हटलं तर त्यातलं मराठी त्यांना कठीण वाटतं. अर्थशास्त्राच्या अभ्यासक असल्याने जातिविश्लेषणात त्या कमी पडतात, असं मला वाटतं.

प्रश्न : असं कशामुळे?

- त्या व्याख्यानं द्यायला फिरत वगैरे असतील, पण प्रत्यक्षात त्यांचा जनसंपर्कही कमीच होता आणि आपल्याला जाणवणारं जातवास्तव त्यांना जाणवलं नाही, असं असू शकतं. त्या छान बोलत असत. इचलकरंजीची प्रबोधिनी संस्था, शांताराम गरुडांची शिबिरं इथे त्या व्याख्यानं देत. सुरुवातीला त्यांना आणि मला दलित-वर्गातून खूप मागणी आणि बोलावणं असे. पुढे-पुढे दलितांनी आमच्या दोघींची नावं बाद करून टाकली. त्यांना आमच्या आडनावांचा त्रास व्हायला लागला.

प्रश्न : दलित चळवळीला काही आडनावांचा त्रास होणं, असं कधीपासून सुरू झालं?

 - ‘विषमता निर्मूलन समिती’ जोपर्यंत चालू होती तोपर्यंत सर्व विषय एका व्यासपीठावर येत असत. तिथे दलित, आदिवासी असे आम्ही सगळे एकत्र होतो. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपासून हे बदललं. मग वहारू सोनावणेसारख्यांचं निराळं व्यासपीठ झालं, ज्यावर पुष्पा भावे चालत नसत. अगदी पहिल्या विद्रोही संमेलनातही (1998) तो एक विषय होताच. मला त्यात काही वैषम्य वाटत नाही, कारण समतेसाठीची चळवळ होती ती. तेव्हा चळवळीच्या एका टप्प्यानंतर त्या-त्या समाजाने चळवळीचं नेतृत्व करणं, हे अगदी योग्यच आहे. त्याबाबत दुमत असण्याचं कारणच नाही. पण काही माणसांच्या बाबतीत आडनावांचा प्रश्न उपस्थित होऊ नये, असं मला वाटतं. उदाहरणार्थ- य.दि.फडके. यामुळे चळवळीने तिचा विस्तार, व्यापकपणा गमावला. हे नुकसान झालं. कारण विषमता-निर्मूलन चळवळीत आम्ही एकत्र होतो, म्हणून नामांतर चळवळीतही एकत्र होतो. असं एकत्र असण्याचं पाठबळ मिळत जातं. त्या वेळेला असे आक्षेप घेतले ते चुकलं- असं काही दलित, आदिवासी कार्यकर्त्यांना आता वाटतंय आणि तसं ते बोलूनही दाखवतात.

प्रश्न : आणि ‘मराठवाडा’चे संपादक अनंतराव भालेराव यांच्याबरोबर तुमचा संवाद?

- त्यांची आणि माझी छान मैत्री होती. त्यांनाही अण्णाच म्हणत असू आम्ही. मराठवाडा नामांतराच्या प्रश्नाबाबत मी नामांतराच्या बाजूने होते. अनंतराव विरोधात होते. तरीही त्यांची-माझी मैत्री टिकून राहिली, हे विशेष!

नामांतर व्हावं यासाठी झालेल्या सत्याग्रहाला आम्ही मुंबईहून बरेच लोक गेलो होतो. त्या वेळी त्यांची-माझी झालेली भेट, विरोधी भूमिका असूनही आम्ही मारलेल्या गप्पा- ही आठवण परवा निखिल (वागळे)ने सत्कार कार्यक्रमात सांगितली. अशा प्रकारची नाती होती त्या वेळी! पोलिसांना कळू नये, म्हणून आम्ही एका अपरिचित ठिकाणी उतरलो होतो. मला निरोप आला की, तुम्हाला कोणी तरी खाली भेटायला आलंय. मला वाटलं ‘पीआयबी’चा माणूस आहे. मी खाली आले. बघते तर काय- अण्णा उभे होते खाली! म्हणाले, आपण विरुद्ध बाजूचे; म्हणून तू माझ्या घरी न उतरता हॉटेलमध्ये उतरलीस, हे बरोबर केलं नाहीस. वेगळाच माणूस होता अनंतराव! खरंच मोठा माणूस होता.

अनंतराव भालेरावांनी ‘मराठवाडा’तून दलित साहित्याचा प्रसार केला. त्यामुळेच दलित साहित्य क्षितिजावर आलं. पण काय होतं की, आपल्याकडे लोकांना वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक जीवन हे वेगळं नाही ठेवता येत. काही दलित मुलं वाईट वागली अण्णांशी, म्हणून ते दुखावले गेले होते. मी त्यांना विचारलं- अण्णा, दलित वगैरे सोडून द्या; आपल्याशी आयुष्यात कोणी-कोणी वाईट वागतंच ना? त्याचा दलित असण्याशी काय संबंध? आता आम्हा स्त्रियांची चळवळ करणाऱ्यांना लोक असं म्हणतात की, अमुक सून वाईट वागली. अशा एखाददुसऱ्या घटना घडतातच. पण त्यांचा स्त्री-मुक्ती चळवळीवर परिणाम होऊ द्यायचा का? मी त्यांना असंही म्हटलं की, आपण सामाजिक न्यायाबद्दल बोलतो; मग आपणच नामांतराला विरोध कसा करायचा?

ही सगळी मराठवाडा मुक्तिसंग्राम चळवळीतील माणसं. अर्थात पुढे त्यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असं नाव मान्य केलं. पण त्यांच्या लक्षात नाही आलं की, त्यांच्या विरोधामुळे खूप नुकसान झालं. मराठवाड्यात शिवसेनेला प्रवेश मिळाला. मुळात मला नामांतर वगैरे कशातही फार स्वारस्य नव्हतं. मी नामांतराच्या बाजूने आहे म्हटल्यावर अनंतालाही आश्चर्य वाटलं होतं. पण वाईट हे होतं की, साधं विद्यापीठाला नाव द्यायचं, तर ‘त्यांचं’ (बाबासाहेब आंबेडकरांचं) नाव पदवीच्या सर्टिफिकेटवर येणार, ते आम्हाला नको- असा विषारी प्रचार सुरू केला होता नामांतरविरोधी लोकांनी. जे तुम्ही विद्यापीठाच्या विधिसभेत मान्य केलं, राज्याच्या विधानसभेत मान्य केलं; त्याच्यापासून तुम्ही माघार कशी घेता?

माझा प्रतीकात्मक गोष्टींना पाठिंबा नाहीये, पण नामांतर प्रतीकात्मकतेपुरतं राहिलं नव्हतं! मी आणि माधव साठे त्या दंग्यात फिरलो होतो. काय प्रकारच्या गोष्टी नामांतरविरोधकांनी केल्या होत्या, हे पाहिलंय! आता काळ इतका पुढे गेलाय की, सगळ्याच गोष्टींची सारखीच नामांतरं करतात लोक. ते होऊ नये.

मुलाखत: मेधा कुळकर्णी

Tags: मुलाखत नोबेल शांतता पुरस्कार मेधा कुळकर्णी पुष्पा भावे समाजकार्य जीवनगौरव महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat nobel shantata purskar medha kulkarni pushpa bhave samajkarya jivangaurav Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

पुष्पा भावे

समाजवादी नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका. 
माजी प्राध्यापक, सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई.   दयानंद कॉलेज, म.ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि शेवटी रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या.


Comments

 1. Kundlik chindhu pardh- 03 Oct 2020

  साधनाचे अंक छान असून, अभ्यास पूर्ण मांडणी केलेले लेख वाचायला मिळतात. डिजिटल स्वरूपात सध्या माहिती मिळते आहे ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल.

  save

 1. Kundlik chindhu pardh- 03 Oct 2020

  साधनाचे अंक छान असून, अभ्यास पूर्ण मांडणी केलेले लेख वाचायला मिळतात. डिजिटल स्वरूपात सध्या माहिती मिळते आहे ही एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल.

  save

 1. Dattaram Vikram Jadhav- 04 Oct 2020

  पुष्पा बाईनी केलेल्या कार्याची आणि व्यासंगाची माहिती मिळाली.अभ्यासाने परखडपणा येतो हेही उमगले. साप्ताहिक साधनातील लेख वाचनीय आणि आचरण करण्यास मदत करतात.

  save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके