डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उघड्या डोळ्यांनी तो समाजाकडे बघतो

राजकुमार आणि त्यांच्यासोबत काम करणारे आम्ही सगळे- याला अतुल पेठे सरांनी ‘रंगमळा’ असे नाव दिले आहे. ‘रंगमळा’ ही एका ध्येयाने पे्ररित होऊन एकत्रित काम करणारी संघटना आहे. यात कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सदस्य असे काही नाही. ‘रंगमळा’ म्हणजे चार भिंती नाहीत, मालमत्ता नाही, खुर्ची नाही, सिंहासन नाही. चटई, सतरंजी, गादी, तंबू, खंबा, मैलाचा दगड यातील काही नाही. आम्ही माणसांमध्ये जातो, माणसांसोबत काम करतो. आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीत आमची झालेली माणसं... यात नंदू माधव, अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, मकरंद साठे, गीतांजली कुलकर्णी, संभाजी भगत, कैलास वाघमारे, इंद्रजित खांबे, डॉ.चव्हाण, विनोद जैतमहल, तृप्ती चव्हाण, राजा शिरगुप्पे, वीणा जामकर, समीर शिपुरकर, गजानन परांजपे, गौरी कोगे, सोनाली नवांगुळ, प्रा.दिलीप घारे, उदय पंडित, प्रा.बऱ्हाणपूरकर, चंद्रशेखर शिखरे, रा.रं.बोराडे, लक्ष्मणराव वडले, शाम दंडवते, श्रीमंत कोकाटे, संदीप मेहता, युवराज मोहिते, राहुल भंडारे... आणि न संपणारी माणसांची यादी. म्हटलं तर याला आम्ही ‘रंगमळा’ म्हणतो.

आम्ही राहतो त्या गावाला चारशे वर्षांचा जुना इतिहास आहे. गावात छोटी-मोठी मिळून आठ मंदिरे आहेत. गेल्या चारशे वर्षांत गावातल्या चार-दोन व्यक्ती सोडल्या तर इतर कोणालाही कायिक-वाचिक, मानसिक, शारीरिक अलौकिक सुखशांती, समृद्धी, लाभ, ऋद्धी-सिद्धी, आरोग्य, मोक्ष इत्यादी काहीही 100 टक्के खात्रीशीर मिळालेले नाही. निसर्ग-नियमाने मानव जन्माला आला. दारिद्य्रामुळे केलेल्या आत्महत्या सोडून बाकी निसर्गाच्या नियमाने मृत्युपंथास गेला. मात्र 1956 मध्ये गावात सरकारी शाळा आली, ती आली तशी आली आणि चालली तशी चालली; तरीही मागील 56 वर्षे या प्राचीन शाळेत शिकून 15 प्राथमिक शिक्षक, चार प्राध्यापक, पाच शिपाई, तीन एम.बी.बी.एस., एक पशुवैद्यकीय अधिकारी, एक पी.एस.आय., दोन इंजिनिअर, फक्त दहा ते पंधरा प्रगतशील शेतकरी, पाच-सहा छोटे व्यावसायिक आणि एक लेखक तयार झाले.

हा लेखक म्हणजे राजकुमार लक्ष्मणराव तांगडे. गावचा राजा- आपल्या सगळ्यांचा राजकुमार तो दहावीला नापास झाला आणि अकरावीच्या वर्गात माझी-त्याची गाठ पडली. परतूर (प्रल्हादपूर) या तालुक्याच्या गावी मी आणि तो रूम-पार्टनर होतो. आम्ही स्वत:च्या हाताने भाकरी करून खायचो. दर महिन्याला घरून न चुकता पैसे यायचे. आम्ही त्या वर्षी भरपूर सिनेमे पाहिले, अभ्यास केला नाही; परिणामी, बारावीला दोघे नापास झालो. तो अकरावीत असताना कविता लिहायचा, त्यांतली मला आवडते ती एक चारोळी....

        ‘सिटी बस सिटी बस फिरते दारोदारी 
             खेड्यात मात्र गाडी करते पंढरीची वारी।।’

मी दुसऱ्याचे काही वाचले नव्हते, म्हणून मला तो मोठा कवी वाटायला लागला. मी त्याला मोठा म्हणू लागलो. तोही प्रोत्साहन मिळाल्याने मोठा-मोठा होत गेला. म्हणजे त्याच्या लेखक होण्याला मी आणि मीच कारण आहे, असं माझं म्हणणं नाही. अशी गंमत! मी त्याच्या लिखाणाच्या प्रवासातला साक्षीदार आहे, भागीदार अजिबात नाही.

सुरुवातीच्या काळात त्यानं लिहिलेल्या कविता असोत, की ‘माळावरचं फूल’ नावाची कादंबरी. त्याच्या लिखाणातला खरेपणा मला जाणवला. त्याच्या लिखाणातले प्रगत टप्पे मी जवळून पाहिले आहेत. हुंडाबळीच्या समस्येवरील ‘बहीण माझी प्रीतीची’ हे पहिल्यांदा रंगमंचावर आलेले नाटक, ऊस-उत्पादकाची व्यथा मांडणारे- ‘काय दिलं स्वातंत्र्यानं?’, वीज-समस्येवरील ‘आकडा’ ही एकांकिका, ग्रामीण राजकारण व महिलांच्या तिसऱ्या अपत्याच्या समस्येवर भाष्य करणारे ‘हितशत्रू’, प्राथमिक शिक्षणातील दुरवस्था मांडणारा ‘पिन्टी’, शेतकऱ्यांच्या आंदोलानावरील ‘चक्काजाम’, मानवी स्वभावावर भाष्य करणारे ‘स्वर्गारोहण’, मकरंद साठे आणि अतुल पेठे सरांसोबत नाट्यरूपांतर केलेले ‘दलपतसिंग येती गावा’ आणि लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेवर आधारित ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ इथपर्यंतच्या राजकुमारच्या लिखाणात मला वरचेवर प्रगती होताना दिसते.

चांगला माणूस होण्यासाठी जसे वागावे लागते, तसा तो वागतो. उघड्या डोळ्यांनी समाजाकडे बघतो. निर्भीडपणे बोलतो, लिहितो. तो नि:स्वार्थी आहे. तो म्हणण्यापेक्षा आमच्यासोबत काम करणारी जी मुले आहेत, ती सगळीच नि:स्वार्थ भावनेने आजपर्यंत सोबत आहेत. आचरणात सच्चेपणा असेल तर विचारात तो येतो, यावर आमचा विश्वास आहे. म्हणून इतर ठिकाणी खरेपणा नाही, असा आपमतलबीपणा आमच्या म्हणण्यात नाही. विज्ञानवादाचा आम्ही पुरस्कार करतो.

राजकुमार आणि त्यांच्यासोबत काम करणारे आम्ही सगळे- याला अतुल पेठे सरांनी ‘रंगमळा’ असे नाव दिले आहे. ‘रंगमळा’ ही एका ध्येयाने पे्ररित होऊन एकत्रित काम करणारी संघटना आहे. यात कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सदस्य असे काही नाही. ‘रंगमळा’ म्हणजे चार भिंती नाहीत, मालमत्ता नाही, खुर्ची नाही, सिंहासन नाही. चटई, सतरंजी, गादी, तंबू, खंबा, मैलाचा दगड यातील काही नाही.आम्ही माणसांमध्ये जातो, माणसांसोबत काम करतो. आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीत आमची झालेली माणसं... यात नंदू माधव, अतुल पेठे, अनिरुद्ध खुटवड, मकरंद साठे, गीतांजली कुलकर्णी, संभाजी भगत, कैलास वाघमारे, इंद्रजित खांबे, डॉ.चव्हाण, विनोद जैतमहल, तृप्ती चव्हाण, राजा शिरगुप्पे, वीणा जामकर, समीर शिपुरकर, गजानन परांजपे, गौरी कोगे, सोनाली नवांगुळ, प्रा.दिलीप घारे, उदय पंडित, प्रा.बऱ्हाणपूरकर, चंद्रशेखर शिखरे, रा.रं.बोराडे, लक्ष्मणराव वडले, शाम दंडवते, श्रीमंत कोकाटे, संदीप मेहता, युवराज मोहिते, राहुल भंडारे... आणि न संपणारी माणसांची यादी. म्हटलं तर याला आम्ही ‘रंगमळा’ म्हणतो.
मागे एकदा एक मित्र म्हणाला, ‘‘तां ग डे असं नाव कुठं असतं का? तुमच्या आडनावाला ओळख नाही. नाव कसं असतं- भोसले, देशमुख, कुलकर्णी, गायकवाड, पठाण, पवार, पंडित, कदम, नेमाडे, राणे, ठाकरे... कोणते तरी ...कर, वाघ इत्यादी...’’ मित्राचं म्हणणं खरं होतं. आमच्या आडनावाच्या एकाही माणसाला प्रसिद्ध होण्याची संधी मिळाली नाही, मिळू दिली नाही. मिळू नये, अशी व्यवस्था निर्माण केली. मिळवली नाही. इत्यादी कारणांनी बिचारे मागे राहिले. आम्हाला असं वाटतं- आपल्या देशात इंग्रज आले नसते तर? 

‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांतील ‘नाही रे’चे सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक शोषण होते. या ‘नाही रे’ची बाजू मांडण्याचे काम ‘रंगमळा’ करते. आता ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांना जात, धर्म, लिंग, पंथ, वंश इत्यादी... काही नसतं, असं आम्ही मानतो.

आम्हाला वाटते- सरंजामदार, भांडवलदार, हुकूमशहा, सनातनी यांचीच जगावर सत्ता आहे. आपल्या देशात लोक आम्हाला अनुदान द्या, सवलती द्या, सबसिडी द्या... सतत म्हणतात. स्वस्त भाजी, फुकट पाणी, स्वस्त वीज, मोफत कर्ज, एकावर एक फ्री इत्यादी... सगळा देश दरिद्री करण्यात ते यशस्वी झालेत. दोष मागणाराचा नाही. ज्याच्याकडे आहे त्याला दुसऱ्याच्या हक्काचे द्यायचे नाही आणि हिसकावून घेण्याची परवानगी देत नाही. प्रत्येक शहरात झोपडपट्टी असते. ती नसेल तर रस्ते कोण साफ करणार, गटारे कोण काढणार, घरी कमी पगारात स्वंयपाक कोण करून देणार, पाळीव कुत्रा अन्‌ गाड्या कोण धुणार, कारखान्यात कमी पगारात काम कोण करणार... इत्यादी. शहराला जशी झोपडपट्टी लागते तसा जगाला आपल्या देशासारखा अविकसित देश लागतो. आम्हाला वाटते, आपला देश ही जगाची झोपडपट्टी आहे.‘रंगमळा’मध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्यांचा ‘मी’ या शब्दाला आक्षेप आहे. म्हणून महाराष्ट्र फाउंडेशनने राजकुमारला दिलेला पुरस्कार हा आमच्या ‘रंगमळा’चा- म्हणजे आमच्या सगळ्यांचा आहे, असे आम्ही मानतो.

Tags: शेतकरी संघटना आकडा शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला कैलास वाघमारे शिवाजी महाराज संभाजी भगत नाटक राजकुमार तांगडे Shetkri Sanghatana Akada Shivaji Underground In Bhimnagar Mohalla Kailas Waghmare Shivaji Maharaj Sambhaji Bhagat Natak Rajkumar Tangade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके