डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पूर्वीचे आणि आताचे

अलिगढ विद्यापीठातील मुस्लिम तरुणांची नवी पिढी स्वतःला धार्मिक चौकटीत मर्यादित करू इच्छित नाही. इतिहासाबद्दल ते अनभिज्ञ जरी नसले, तरी त्या इतिहासाचे जोखड वाहण्यास नव्या पिढीने साफ नकार दिला आहे. धार्मिक उदारमतवाद या नवीन पिढीने जाणीवपूर्वक जपला आहे. बाकी विद्यापीठांप्रमाणेच इथेही वेगवेगळे धार्मिक, सामाजिक विचारप्रवाह असले तरी येथील विद्यार्थ्यांची संवैधानिक मूल्यांशी बांधिलकी कायम आहे. नुकत्याच जीना यांच्या चित्रावरून झालेल्या वादात अलिगढच्या विद्यार्थ्यांनी अतिशय संयमितपणे व सांविधानिक मार्गाने आपला निषेध नोंदवला. या तरुण-तरुणींना जीना यांच्या विचारांचे आकर्षण आता राहिलेले नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर एके काळी अलिगढच्या गळ्यातील ताईत असलेल्या जीना यांची जयंती वा पुण्यतिथीही अलिगढमध्ये साजरी केली जात नाही. सध्या सुरू असलेल्या आंदोलनात अलिगढच्या ३६००० विद्यार्थ्यांपैकी एकानेही जीना यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलेली नाही. इतिहासाच्या अभ्यासातातून व परिशीलनातून आलेले हे शहाणपण नक्कीच आश्वासक म्हणता येईल असे आहे.  

२ मे २०१८ रोजी भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघातर्फे आजीवन सभासदत्व देण्यात येणार होते. या कार्यक्रमासाठी अलिगढ विद्यापीठात अन्सारी आले असतानाच काही हिंदुत्ववादी संघटनांनी विद्यापीठ आवारात हिंसक आंदोलन केले. अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या सभागृहात असलेले मोहम्मदअली जीना यांचे चित्र काढून टाकावे, अशी मागणी करत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांवर हल्ला केला. जीना यांना १९३८ मध्ये अलिगढ विद्यार्थी संघाचे आजीवन सभासदत्व देण्यात आले होते, त्या वेळी हे चित्र सभागृहात लावण्यात आले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी हिंसक आंदोलनासाठी निवडलेल्या वेळेवर खुद्द हमीद अन्सारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हिंदुत्ववाद्यांना थोपवण्यात पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक दिरंगाई केली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या घटनेनंतर पोलीस प्रशासन व हिंदुत्ववादी संघटना यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ अलिगढचे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

 ‘आम्हा विद्यार्थ्यांना जीना किंवा त्यांच्या विचारधारेशी अजिबात सहानुभूती नाही. गेल्या दोन-तीन वर्षांपासून विद्यापीठांना लक्ष्य करण्यात येत आहे. जीना, पाकिस्तान यांचा उल्लेख करून अलिगढ विद्यापीठ व त्यात शिकणाऱ्या ३६००० विद्यार्थ्यांच्या देशभक्तीवर शंका उपस्थित करण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत.’ अशी प्रतिक्रिया अलिगढचे विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थ्यांनी दिली. अलिगढ विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात उपोषण सुरू केले. विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला करण्याचे आदेश देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, हिंसक आंदोलन करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि अलिगढच्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागण्या त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या. प्रशासनाने मागण्या अंशतः मान्य केल्यामुळे व रमजानचा महिना सुरू होत असल्यामुळे, हे उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा १६ मे रोजी अलिगढ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष अलिगढ विद्यापीठ मक्सुर अहमद उस्मानी याने केली. ‘आंदोलन संपले असले तरी हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या शक्तींविरुद्धची अलिगढ चळवळ सुरूच राहील’, असा इशारा त्याने या वेळी दिला.

आपल्या निर्मितीपासूनच अलिगढ विद्यापीठ चर्चा, वाद-विवाद, चळवळी यांचे केंद्र राहिले आहे. अलिगढ विद्यापीठाबद्दल अनेक समज-गैरसमज समाजात रूढ आहेत. काहींच्या मते, द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताची बीजे अलिगढमध्ये रोवली गेली आहेत; तर काहींच्या मते, स्वातंत्र्यचळवळीत अलिगढने मोठे योगदान दिले असून ते मुस्लिम समाजाच्या ज्ञानसाधनेचे महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. एकूणच अलिगढ विद्यापीठाबाबत दोन टोकाची मते दिसून येतात. जीना यांच्या चित्रावरून उठलेल्या वादाच्या पोर्शभूमीवर अलिगढ विद्यापीठ, अलिगढ चळवळ यांच्या इतिहासाचा धांडोळा घेण्याबरोबरच वर्तमानाचे विश्लेषण करणेही गरजेचे आहे, असे वाटते.

अलिगढ विद्यापीठ स्थापन करण्यामागची भूमिका

१८१६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने कलकत्तामध्ये संस्कृत विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी राजा राममोहन रॉय यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात बंगालमधील विचारवंत, संस्कृत पंडित उपस्थित होते. ‘संस्कृत आम्ही स्वतःच शिकू. कंपनी सरकारने आमच्यासाठी इंग्रजी विद्यापीठाची स्थापना करावी.’ अशी मागणी या विचारवंतानी केली आणि तेथे इंग्रजीचे शिक्षण देणारे हिंदू कॉलेज सुरू झाले. त्याचेच पुढे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये रूपांतर झाले. अशा प्रकारे हिंदू समाजात इंग्रजी शिक्षण घेण्याची सुरुवात मुस्लिमांच्या साठ वर्षे आधी सुरू झाली. त्यांच्या दोन पिढ्या इंग्रजी शिकून सरकारी सेवेत दाखल झाल्या होत्या. मुस्लिम समाज मात्र इंग्रज आणि इंग्रजी या दोहोंपासून अंतर राखून होता. किंबहुना त्यांच्याविषयी द्वेषच बाळगून होता.

सर सय्यद अहमद खान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८१७ रोजी दिल्ली येथे झाला. वडील सय्यद मुहम्मद मुत्तकी हे मुगल दरबारात नोकरीला होते. वडिलांच्या मृत्यूमुळे एकविसाव्या वर्षीच सय्यद ईस्ट इंडिया कंपनीमध्ये लिपिक म्हणून रुजू झाले. सन १८५७ च्या उठावाच्या वेळी बिजनौर येथे राजस्व अधिकारी म्हणून कार्यरत होते. तिथे झालेल्या उठावावेळी त्यांनी अनेक  इंग्रज अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्राण वाचवले. या अनुभवांवर आधारित ‘बिजनौर उठावाचा इतिहास’ या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले. उठावानंतर इंग्रजांचा मुस्लिम समाजाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेला आमूलाग्र बदल त्यांनी टिपला. ते स्वतःला इंग्रज सरकारचे विेशासू म्हणवून घेत असत. १८५७ च्या उठावाची कारणमीमांसा करणारी ‘१८५७ च्या उठावाची कारणे’ही त्यांनी लिहिली.

शेवटचा मुघल सम्राट बहादूरशाह जफरच्या नेतृत्वाखाली झालेल्या १८५७ च्या उठावानंतर इंग्रजांची मुस्लिम समाजावर वक्रदृष्टी पडली होती. इंग्रजांच्या मते, मुसलमान आक्रमक वृत्तीचे होते. देशावर राज्य केल्याच्या त्यांच्या आठवणीही ताज्या होत्या. आधुनिक शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या मुस्लिम स्वीकारत नव्हते, ज्यामुळे इंग्रजांचा मुस्लिमांवरील संशय आणखी वाढला. याउलट, हिंदू समाजाने इंग्रजी व आधुनिक शिक्षण सहजपणे आत्मसात केले. सरकारी नोकऱ्या मिळवल्या. त्यामुळे इंग्रजांना हिंदू समाज धोकादायक वाटेनासा झाला, मग त्यांनी सारे लक्ष मुस्लिमांकडे वळवले. इंग्रजी समजणारा मध्यमवर्ग मुस्लिमांमध्ये १८५७ पर्यंत तयारच होऊ शकला नाही आणि जो वर्ग मध्यमवर्ग म्हणून उदयास येऊ शकत होता, तो इंग्रजांशी वैर राखून होता.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर सय्यद यांनी इंग्रज आणि मुस्लिम यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी १८६९ मध्ये लंडनला भेट दिली. एके काळी उत्तर भारतात असलेली, मात्र १८५७ च्या उठावानंतर युरोपात नेण्यात आलेली ऐतिहासिक कागदपत्रे व हस्तलिखिते यांचा शोध घेऊन ती पुन्हा भारतात आणणे आणि ब्रिटिश इतिहासकारांद्वारे इस्लामी इतिहासावर होत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणे, हा त्यांच्या लंडन भेटीचा मुख्य उद्देश होता. या वेळी त्यांनी ऑक्सफर्ड व केम्ब्रिज विद्यापीठांना भेटी दिल्या. भारतातही इंग्रजी शिक्षणपद्धतीवर आधारित विद्यापीठ स्थापन करण्याचा संकल्प त्यांनी केला. आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मुस्लीमांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजी शिक्षण घ्यावे व सरकारी नोकरीत रुजू होऊन इंग्रज प्रशासनाचा विश्वास संपादन करावा ही त्यांची भूमिका होती. या कल्पनेतूनच १८७५ मध्ये त्यांनी ‘मदरसतुल उलुम मुसलमानान ए हिंद’ या नावाची संस्था काढली. पुढे तिचेच रूपांतर ‘द मुहम्मद अँग्लो ओरिएन्टल  कॉलेज’मध्ये झाले.

मुस्लिमांना आधुनिक शिक्षण देऊन ब्रिटिश सरकारच्या नजरेत त्यांचा प्रभाव वाढविणे व मुस्लिमांचे राजकीय हित जपणे हा संघटना सुरू करण्यामागचा प्रमुख उद्देश होता. (The raison d’etre of the college was to make Muslims ‘worthy and useful subjects of the Crown’). याशिवाय मुस्लिमांनी आधुनिक शिक्षण घेऊन हे आधुनिक विचार समाजात रुजवावेत, हा त्यांचा मानस होता. आपल्या या भूमिकेविषयी ते म्हणतात, ‘मुस्लिम समाजाच्या अधोगतीबद्दल आत्मचिंतन केल्यानंतर मला असे वाटते की, आधुनिक शिक्षण हाच त्यांच्या रोगावर रामबाण उपाय आहे. इंग्रजी साहित्याचा आणि विज्ञानाचा अभ्यास धर्मविरोधी असून, त्या अभ्यासाने व्यक्ती अधर्मी होते, ही खुळचट कल्पना त्यांच्या मेंदूतून काढून टाकण्यासाठी मी रणनीती आखली आहे.’ मात्र त्यांची ही भूमिका तत्कालीन उलेमांना पटण्यासारखी नव्हती. मौलाना हाली यांनी सर सय्यद यांच्या चरित्रात तत्कालीन मौलवी आणि धर्मसंस्था यांनी सर सय्यद यांना दिलेल्या फतव्यांचा उल्लेख केला आहे. मक्केतील इमामाकडून आणण्यात आलेल्या फतव्यात म्हटले होते की- ही व्यक्ती आपली कृत्ये आणि कारवायांमुळे इस्लाममधून बेदखल झाली असून, त्याने प्रायश्चित्त घ्यावे व माफी मागावी. असे करण्यास असमर्थता दर्शविल्यास धर्मरक्षणासाठी त्याला मृत्युदंड देण्यात यावा.

‘इंग्रज सरकारच्या मनात संशय उत्पन्न होईल, अशा कुठल्याच गोष्टी समाजाने करू नयेत’, याकडे सर सय्यद यांचा कटाक्ष होता. ‘हिंदू समाजाने सुरू केलेल्या उठावात मुस्लिमांनी जीव ओतला. गंगा नदीतून डुबकी मारल्यावर पापमुक्त होतात तसे बंड मोडल्यावर हिंदू अलगद सुटले. मुस्लिमांना मात्र सरकारचा रोष झेलावा लागला’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्यामुळे मुस्लिमांनी वेळीच शहाणे व्हावे आणि सरकारविरुद्ध बंडासाठी प्रवृत्त करणाऱ्या काँग्रेससारख्या चळवळीच्या सावलीलाही थांबू नये, असा इशारा त्यांनी वारंवार दिला. या काळातील सर सय्यद यांची काँग्रेसविरोधी भाषणे व लेख याच भावनेचा परिपाक होते. १८८६ च्या कलकत्ता अधिवेशनात काँग्रेसच्या एकूण ४३१ निमंत्रितांपैकी फक्त ३३ मुस्लिम सहभागी होते आणि त्यांपैकी कुणीच प्रभावशाली नव्हते. १८८७ च्या तिसऱ्या काँग्रेस अधिवेशनासाठी बद्रुद्दीन तय्यबजी यांना अध्यक्ष करण्यात आले होते. या अधिवेशनाला सर सय्यद यांच्या कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हजर राहणार होते. या पार्श्वभूमीवर सर सय्यद यांनी १० मे १८८६ रोजी अलिगढमध्ये जाहीर सभेत भाषण केले. त्यात त्यांनी काँग्रेसच्या चळवळीत सहभाग घेणे किंवा त्यांना पाठिंबा देणे हे मुस्लिमांसाठी आत्मघातकी ठरणार असल्याचा इशारा दिला. सप्टेंबर १८८७ मध्ये लखनौ येथे दिलेल्या भाषणांमध्ये त्यांनी काँग्रेसवर प्रखर टीका केली. मुस्लिमांनी सरकारशी प्रामाणिक राहून आपली सेवा द्यावी व चांगले संबंध प्रस्थापित करावेत, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर १८८८ मध्ये ‘पायोनिअर’ या वृत्तपत्रात तय्यबजी आणि सर सय्यद यांच्यात ‘भारतीय मुस्लिम आणि काँग्रेस’ यावर जाहीर वाद-विवाद झाला.

सर सय्यद यांनी मुस्लिम समाजाचा शैक्षणिक व राजकीय प्रभाव वाढावा, यासाठी तहहयात प्रयत्न केले. १८७२ मध्ये लिहिलेल्या लेखात सर सय्यद म्हणतात की, इंग्लडमधील केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डच्या धर्तीवर मला भारतात विद्यापीठ सुरू करायचे आहे. हे अनेकांना कदाचित शेख चिल्लीचे दिवास्वप्न वाटत असले तरी मला विश्वास आहे की, ही संस्था भविष्यात समाजाला दिशा देण्याचे कार्य करेल.’ त्यांनी सुरू केलेल्या ‘द मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’चे १९२० मध्ये ‘अलिगढ मुस्लिम विद्यापीठ’मध्ये रूपांतर झाले. ‘इंग्रज सरकारची पाळेमुळे भारतात घट्ट रुजली आहेत. त्यांच्याशी जितके जुळवून घेता येईल, तितके घेऊन समाजाने स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा’ या भूमिकेवर ते शेवटपर्यंत ठाम होते. १८९८ मध्ये अलिगढ येथे सर सय्यद यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू होण्यापूर्वीच अलिगढ चळवळ मूळ धरू लागली होती. सर सय्यद यांच्या विचारांनी भारावलेली पहिली पिढी तयार झाली होती.

मुस्लिम लीग आणि अलिगढ

सन १९०० मध्ये संयुक्त प्रांतातील गव्हर्नर मॅकडोनल्ड याने पर्शियनऐवजी हिंदी भाषा व नस्तलिक (उर्दू, पर्शियन लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी)ऐवजी देवनागरी लिपीला सरकारी भाषा व लिपी म्हणून मान्यता दिली. मुस्लिम समाजामध्ये याविषयी रोष उत्पन्न झाला. दि.१ ऑक्टोबर १९०६ रोजी मुस्लिम समाजातील विचारवंत, उमराव, कायदेपंडित सिमला येथे एकत्र आले. यातील बहुतांश लोक अलिगढ चळवळीशी संबंधित होते. सर सय्यद यांचे सहकारी आगाखान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लॉर्ड मिंटो यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर काही मागण्या मांडल्या. मुस्लिमांना त्यांच्या प्रमाणानुसार सरकारी नोकऱ्या, उच्च न्यायालयांमध्ये मुस्लिम न्यायाधीशांची नेमणूक करण्यात यावी, व्हाईसरॉय कौन्सिलमध्ये मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळावे, या त्यातील काही प्रमुख मागण्या होत्या. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात या शिष्टमंडळाला अपयश आले असले, तरी या घडमोडींनी मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये उत्प्रेरकाची भूमिका बजावली.

खिलाफत चळवळ भारतात जोर धरू लागली होती. महात्मा गांधींनी या चळवळीचे नेतृत्व स्वीकारले. जीना मात्र खिलाफत चळवळीपासून अंतर राखून होते. खिलाफतीमुळे भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक भावना वाढीस लागतील अशी भीती त्यांना होती. ‘खिलाफतला पाठिंबा देऊन तुम्ही भारतीय राजकारणात धार्मिक शक्तींना बस्तान बसवू दिले,’ असेही जीना गांधींना म्हणाले होते. अलिगढमधून खिलाफत चळवळीसाठी ६००० रुपयांचा निधी जमा करण्यात आला व तो सेन्ट्रल खिलाफत  कमिटीला १९२० मध्ये पाठवण्यात आला. अलिगढचे चार विद्यार्थी कॉन्स्टॅन्टिनोपलला गेले, तर अलिगढ ओल्ड बॉय असोसिएशनचे महेंद्र प्रताप यांनी काबुल येथे जाऊन हंगामी सरकारचे नेतृत्व केले. दि.११ ऑक्टोबर १९२० रोजी आझाद व इतर मंडळींसह अलिगढमध्ये महात्मा गांधी आले. विद्यापीठाने असहकार चळवळीला पाठिंबा द्यावा, सरकारकडून मिळणाऱ्या सवलती स्वीकारू नयेत व नुकत्याच मिळालेल्या मुस्लिम विद्यापीठ चार्टरचा त्याग करावा- अशा काही मागण्या गांधी यांनी अलिगढच्या विेशस्तांना केल्या. मात्र गांधीजींच्या मागण्या विद्यापीठ प्रशासनाकडून नाकारण्यात आल्या.

आझाद व इतर मंडळींनी अलिगढमध्ये ठिय्या मांडून तरुणांच्या सभा घेतल्या. आझाद यांच्या व्यक्तिमत्त्वाने व भाषणाने तरुण भारावून गेले. राष्ट्रीय चळवळीला पूरक असे वातावरण तयार होईल असे चित्र निर्माण झाले. तुफैल अहमद मेंगलोरी हे अलिगढमधून शिक्षण घेतलेले प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी मुस्लिमांसाठी वेगळ्या मतदारसंघाच्या मागणीला कडाडून विरोध केला. अशा मागण्यांमुळे धर्माच्या आधारावर समाजात अंतर निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. याच काळात चौधरी खलकुझ्झमान, शुएब कुरेशी, शेरवानी, ख्वाजा हे नेहरू यांचे सहकारी अलिगढ विद्यापीठातूनच आले होते आणि उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये प्रभाव राखून होते.

प्रांतीय सरकारची स्थापना १९३७ मध्ये झाली. या निवडणुकीत लीगला मोठा धक्का बसला असला, तरी १९३८ पासून अलिगढमधील वारे मुस्लिम लीगच्या बाजूने झपाट्याने वाहू लागले. ग्रंथालयातील बुद्धिवादावरची, धर्मावर टीका करणारी पुस्तके काढून टाकण्यात येऊ लागली. मुस्लिम लीगच्या जातिवादी भूमिकेची चिकित्सा करणारे लेख विद्यापीठाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यास नकार देण्यात येऊ लागला. याच काळात मोहम्मद अली जीना यांचे प्रस्थ राष्ट्रीय राजकारणात वाढत होते. मुस्लिम नेतृत्व म्हणून त्यांचा उदय झाला होता. याच काळात त्यांना अलिगढ विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे आजीव सदस्यत्व देण्यात आले. अलिगढचे प्रती उपकुलपती हलीम यांनी अलिगढ इन्स्टिट्यूट गॅझेटमध्ये लेख लिहून, भारतातील मुस्लिम समुदाय धार्मिक कर्तव्याचा भाग म्हणून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात समर्थन करत असल्याचे सांगितले. एके काळी स्त्रीमुक्तीचा लढा उभारणाऱ्या संस्थेत स्त्रियांसाठी पडदापद्धती पुन्हा सुरू करण्यात आली.

मुस्लिम लीगच्या १९४० मध्ये लाहोर येथे झालेल्या अधिवेशनात पाकिस्तानची मागणी करण्यात आली. अलिगढ मॅगझिनमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ संपादकीय लेखांची मालिका प्रसिद्ध होऊ लागली. हिंदूराजचे धोके वाचकांना पटवून देण्यात येऊ लागले. जीना १९४० पासून दर वर्षी अलिगढमध्ये येऊ लागले. आपल्या विशेष मुस्लिम ओळखीमुळे जीना यांना आपले विचार पसरवण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी अलिगढ विद्यापीठाच्या रूपाने मिळाली. जीना यांचा संदेश पसरविण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी गावोगावी फिरू लागले. जीना अलिगढमध्ये सभा घेऊ लागले. विद्यार्थिनीही पडदा करून या सभांना उपस्थितीत राहत. अनेक स्त्रियांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ लेख व कविता लिहिल्या. याच अलिगढमध्ये केलेल्या एका भाषणात जीना म्हणाले, ‘‘पाकिस्तान हा खजिना आहे आणि अलिगढकडे त्याची चावी आहे. त्यांनी ही चावी वापरून खजिना उघडावा असे आवाहन मी करतो.’’

जीना व लियाकतअली यांच्या भाषणांनी अलिगढचे वातावरण पाकिस्तानमय झाले होते. मुस्लिम लीगने १९४० च्या लाहोर अधिवेशनात मांडलेल्या पाकिस्तानच्या मागणीच्या ठरावाला अलिगढ विद्यार्थी संघाने अधिकृतपणे पाठिंबा दिला. पाकिस्तानच्या कल्पनेला मूर्तस्वरूप देण्याचे काम अलिगढने केले असून भारतीय मुस्लिमांच्या भावनांचे प्रतिनिधित्वच अलिगढने केले असल्याचे गौरवोद्गार अलिगढ विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काढले. ‘डॉन’ या मोहम्मदअली जीना यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रात अलिगढमधील बातम्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू लागली. त्याचे प्रमाण इतके वाढले की, पुढे ‘डॉन’ हे वृत्तपत्र अलिगढ विद्यापीठाचे मुखपत्रच बनले. तिथे होणाऱ्या बैठका, कार्यक्रम यांच्यासाठी ‘अलिगढ न्यूज’ नावाने विशेष स्तंभ रोज प्रसिद्ध होत असे. अलिगढ विद्यापीठाच्या महत्त्वाच्या पदांवर लीगला सहानभूती असणाऱ्या व्यक्ती काम करत होत्या. साहजिकच लीगला याचा मोठा फायदा झाला. अलिगढचे विद्यार्थी लीगसाठी footsoldiers  म्हणून काम करू लागले. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असणार होता. अलिगढमुळे लीगला  आपले विचार सर्वसामान्य मुस्लिमांपर्यंत पोचवणाऱ्या प्रशिक्षित प्रचारकांची मोठी कुमक मिळाली, ज्याला जीना यांनी शस्त्रागार (arsenal) संबोधले होते.

प्रांतिक निवडणुकांमध्ये विद्यापीठातील विद्यार्थी व शिक्षक आपापल्या गावी व आजूबाजूच्या परिसरात जाऊन लीगचा प्रचार करू लागले. यामुळे लीग गावोगावी पोहोचली. उच्चभ्रूंपुरत्या मर्यादित असलेल्या लीगला अलिगढमुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आले. या निवडणुकांमध्ये लीगला मिळालेल्या यशामध्ये अलिगढचा आणि तेथील विद्यार्थी, शिक्षकांचा मोठा वाटा होता. कलीम सिद्दिकी यांनी आपल्या पुस्तकात यासंबंधी सांगितलेली आठवण महत्त्वाची आहे. ते म्हणतात, ‘अलिगढ विद्यापीठात शिकत असलेले तीन तरुण आमच्या उत्तर भारतातील गावी चंद्रकोर असलेला मुस्लिम लीगचा हिरवाभडक झेंडा घेऊन आले. गावाच्या मध्यभागी त्यांनी तो झेंडा उभारला. लोक त्या झेंड्याभोवती हळूहळू जमू लागले. तासाभरापूर्वी शांत असलेले ते भारतीय गाव पाकिस्तानमय झाले. लोकांना घरांमध्ये सापडलेल्या हिरव्या कापडांचे तुकडे आता लीगचे ध्वज झाले. काही महिन्यांनंतर संपूर्ण गावाने चार मैल लांब असलेल्या मतदान केंद्रावर जाऊन लीगला मतदान केले. अनेक गावांमध्ये हेच चित्र होते. अलिगढच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली.

’ एके काळी जीना आणि त्यांचा विचार नाकारणाऱ्या अलिगढने जीना यांचे नेतृत्व आता पूर्णपणे स्वीकारले आणि ‘अलिगढ हे मुस्लिम भारताचे शस्त्रागार व पाकिस्ताननिर्मितीचा भावनिक आधार’ बनले.

स्वातंत्र्योत्तर काळातील अलिगढ विद्यापीठ

मुस्लिम भारताचे शस्त्रागार म्हणून जीना यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या अलिगढ विद्यापीठाची विश्वसनीयता विभाजनानंतर ढासळणे नैसर्गिक होते. तिथे एक प्रकारचा अपराधीभाव निर्माण झाला होता. अलिगढला भारतीयांच्या रोषाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले. विद्यापीठावर लोकांनी हल्ला करू नये, म्हणून कुमाऊ बटालियनची एक तुकडी अलिगढ विद्यापीठ परिसरात वर्षभर तैनात करण्यात आली होती. विद्यापीठाचा अपराधभाव निघून जावा, म्हणून पंडित नेहरूंनी या वेळी मोठी भूमिका पार पाडली. त्यांच्या सरकारने विद्यापीठाच्या खर्चाचा सर्व भार उचलला. नेहरूंनी या काळात अलिगढ विद्यापीठाला अनेक वेळा भेटी दिल्या. जानेवारी १९४८ मध्ये अलिगढ विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्यांनी केलेले संपूर्ण भाषण त्यांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे. या भाषणात त्यांनी इतिहासात घडलेल्या चुकांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. त्या का घडल्या याचे विश्लेषण केले व अशा चुका पुन्हा घडू नयेत, यासाठी त्यांच्यावर काय जबाबदारी आहे याची जाणीवही करून दिली. या वेळी ते म्हणाले की, गेले सहा महिने कुठल्याही संवेदनशील भारतीयासाठी वेदना देणारे होते. आपण व आपल्या पूर्वजांनी पाहिलेल्या स्वप्नाला दुभंगताना पाहणे अतिशय त्रासदायक होते. या कठीणसमयी आपण मनाने एकमेकांपासून लांब गेलो असलो, तरी भारताच्या उज्ज्वल भविष्यावर माझा भरोसा आहे. ही भारतीय संस्कृती, येथील समृद्ध इतिहास याला मी आपला मानतो व मला त्यांचा अभिमान आहे. माझ्यासमोर बसलेल्या आपणा सर्वांनाही हा वारसा तितकाच प्रिय आणि आपला वाटतो का, याचा विचार आपण केला पाहिजे.

यशवंतराव चव्हाण मुंबई राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना अलिगढ विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. दि. २२ डिसेंबर १९५९ रोजी अलिगढच्या विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा समारोप करताना यशवंतरावांनी विल्फ्रेड स्मिथ यांच्या पुस्तकातील उतारा उद्‌धृत करत म्हटले होते की, भारतातील मुस्लिमांचे भवितव्य हे जगातील इतर मुस्लिमांच्या- किंबहुना सर्वच जनसमूहांच्या भवितव्याप्रमाणे त्यांच्या आत्मिक बळावर, श्रद्धेवर व सर्जनशीलतेवर आणि अन्य बांधवांबरोबरच्या त्यांच्या संबंधावर अवलंबून आहे. शिक्षणाच्या बाबतीत मागे असणाऱ्या मुस्लिम समाजाला पुढे आणण्याची धडपड करणारे सर सय्यद अहमद खान यांची गौरवास्पद भाषेत यशवंतरावांनी स्तुती केली. या विद्यापीठात शिकलेले व पुढे देशाचे राष्ट्रपती झालेले डॉ.झाकीर हुसेन यांच्या मूलोद्योग शिक्षण संकल्पनेचे महत्त्व त्यांनी या वेळी विशद केले होते. मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे साधन असल्याचे मतही त्यांनी नोंदवले होते.

ऐंशीच्या दशकात अलिगढला दिलेला अल्पसंख्याक दर्जा काढून घ्यावा, अशी शिफारस काही मंडळींनी केली.  त्यात अलिगढचे विद्यार्थी व जागतिक कीर्तीचे इतिहासकार इरफान हबीबही होते. यामुळे अलिगढ पुन्हा चर्चेत आले. हमीद दलवाई, न्यायमूर्ती मोहम्मद करीम छगला यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मुस्लिम हा शब्द काढून टाकण्यात यावा, अशी मागणी केली. (सोबत बनारस हिंदू विद्यापीठातील हिंदू हा शब्दही वगळण्यात यावा, अशी ती मागणी होती). स्वातंत्र्योत्तर काळात अलिगढने आपली जुनी प्रतिमा बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले व त्यात त्यांना मोठे यश मिळाले. अलिगढने जागतिक कीर्तीचे विद्वान, इतिहासकार, राजकारणी, पत्रकार देशाला दिले. सरहद्द गांधी, डॉ.झाकीर हुसेन, मेजर ध्यानचंद, शेख अब्दुल्ला, इरफान हबीब, जावेद अख्तर ही त्यांपैकी काही प्रातिनिधिक नावे. ‘इन्कलाब झिंदाबाद’ या घोषणेचे निर्माते व पूर्ण स्वराज्याची मागणी काँग्रेसच्या व्यासपीठावरून पहिल्यांदा करणारे मौलाना हसरत मोहानी अलिगढ विद्यापीठातूनच शिकलेले होते.

अनेक नामवंत व्यक्तींच्या आर्थिक सहयोगातून २४ मे १८७५ रोजी ‘मदरसतुल उलुम मुसलमानान ए हिंद’ या नावाने सुरू झालेली ही संस्था पुढे ‘अलिगढ विद्यापीठ’ म्हणून नावारूपाला आली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनीही संस्थेच्या उभारणीसाठी भरीव आर्थिक मदत केली होती. ४७० हेक्टर परिसरात पसरलेल्या अलिगढ विद्यापीठामध्ये सध्या ३६००० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यासाठी २००० प्राध्यापक आहेत. येथे ९५ विविध विभाग असून, त्याद्वारे ३२५ कोर्सेस चालवले जातात. विद्यार्थ्यांसाठी येथे ७३ वसतिगृहे आहेत. मुस्लिम बोहरा समाजातील सर्वोच्च धर्मगुरू सय्य्दना मुफद्दल सैफुद्दीन हे सध्या अलिगढ विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

जीना आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय मुसलमान

 जीना यांच्याबद्दल अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भावना भारतीय मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करते, असे म्हणायला मोठा वाव आहे. भारतीय मुस्लिमांमध्ये अनेक विचारप्रवाह आहेत. जीना यांना आदर्श मानण्याचे एकही कारण त्यांपैकी कुणाकडेही नाही. जीना यांचा द्वेष करण्याचे प्रत्येकाचे कारण वेगवेगळे आहे. मुस्लिम म्हणवता येईल असे त्यांच्यात काहीच नव्हते. ना पोशाख, ना भाषा आणि ना खानपान. ते नेहमी पाश्चिमात्य शैलीतले कपडे परिधान करत असत. इस्लामने निषिद्ध मानलेल्या गोष्टींचे सेवन ते सर्रास करत असत. लग्नही त्यांनी एका पारशी स्त्रीशी केले होते. म्हणून मूलतत्त्ववादी मुस्लिम जीना यांचा द्वेष करतात. इस्लामला भौगोलिक सीमांची मर्यादा नसूनही देशाच्या आधारावर केलेल्या विभाजनामुळे मुस्लिम विभागले गेले. त्यामुळे उपखंडातील त्यांचे राजकीय-सामाजिक महत्त्व कमी झाले. Pan Islamism ची संकल्पना अजूनही मानणाऱ्या काही मुस्लिमांचा जीना यांच्यावर यामुळे राग आहे. हे दोन्ही प्रवाह जीना यांचा द्वेष धार्मिक दृष्टिकोनातून करतात. (विशेष म्हणजे पाकिस्ताननिर्मितीच्या पूर्वीही जीना यांची जीवनशैली व गुणवैशिष्ट्ये हीच होती, तरी जीना मुस्लिमांचे नेतृत्व म्हणून उदयास आले. हा विरोधाभास इस्लामी विचार आणि मुस्लिम आचरण यातील द्वंद्वाचाच परिपाक होता.) पण यापेक्षा तिसरा एक विचारप्रवाह मुस्लिमांमध्ये आहे, जो नव्या पिढीचे नेतृत्व करतो. जीनाद्वेषाचे यांचे कारण धार्मिक नसून ते राजकीय-सामाजिक अनुभव व आत्मपरीक्षणातून आलेले आहे आणि ते जास्त महत्त्वाचे वाटते. जीना यांच्या पाकिस्तानामुळे सगळ्यात मोठी हानी या घटकाची झाली आहे. विभाजनानंतर बहुसंख्याक समाजाच्या अपेक्षाभंगातून आलेली निराशा, अविेशास, द्वेष यांना या नव्या पिढीला स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही तोंड द्यावे लागत आहे. स्वतःच्याच देशात त्यांना आपल्या देशभक्तीची प्रमाणपत्रे वारंवार सादर करावी लागतात. साहजिकच जीनाबद्दल असलाच तर पराकोटीचा द्वेष मुस्लिमांमधील या नव्या प्रवाहामध्ये आहे. 

भारतीय विचारवंतांचे भाबडे जीनाप्रेम

एकीकडे अलिगढ तर दुसरीकडे सर्वसामान्य मुस्लिम लोक जीना आणि त्यांच्या विभाजनवादी प्रवृत्तीला नाकारत असले, तरी दुसरीकडे हिंदू उदारमतवाद्यांमधला मोठा गट जीना कसे पुरोगामी होते, त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी कसे आपले आयुष्य वेचले याचे दाखले देत असतात. खरे जीना भारतीयांना समजावून सांगण्याचे पुण्यकर्म(?) हे विचारवंत गेली अनेक दशके करत आहेत. जीनाप्रेमातून अडवाणी, जसवंत सिंह यांसारखे उजव्या विचारांचे राजकारणीही स्वतःला वाचवू शकले नाहीत. सध्या सुरू असलेल्या विवादातही अनेक विचारवंतांचे जीनाप्रेम जागे झाले. करण थापर, आकार  पटेल आदी अनेक मंडळींनी ‘जीना यांच्या अप्रकाशित पैलूं’वर प्रकाश टाकणारे लेख लिहिले. (हमीद दलवाई यांनी १९७३ मध्ये ‘जीना- मुस्लिम नेतृत्वाचा अभ्यास’ हा लेख लिहून या विचारवंतांच्या संकल्पना किती भाबड्या आहेत, हे सप्रमाण सिद्ध केले होते.) साहजिकच यामुळे उजव्या विचारधारेच्या मंडळींना आयतेच कोलीत मिळते. मुस्लिमांचे लांगूल-चालन करण्यासाठीच हे विचारवंत जीना यांचे महिमामंडन करतात, अशी बहुसंख्याकांची समजूत होते. हिंदू उदारमतवादी विचारवंतांच्या या भाबडेपणाचा फटका मात्र या घटनेशी दूरान्वयेही संबंध नसलेल्या सर्वसामान्य मुस्लिमांना बसतो.

अलिगढची नवी पिढी

नव्या भारताचे आणि येथील आधुनिक विचारांचे अलिगढ हे केंद्र बनले आहे. अलिगढ विद्यापीठातील मुस्लिम तरुणांची नवी पिढी स्वतःला धार्मिक चौकटीत मर्यादित करू इच्छित नाही. इतिहासाबद्दल ते अनभिज्ञ जरी नसले, तरी त्या इतिहासाचे जोखड वाहण्यास नव्या पिढीने साफ नकार दिला आहे. धार्मिक उदारमतवाद या नवीन पिढीने जाणीवपूर्वक जपला आहे. बाकी विद्यापीठांप्रमाणेच इथेही वेगवेगळे धार्मिक, सामाजिक विचारप्रवाह असले तरी येथील विद्यार्थ्यांची संवैधानिक मूल्यांशी बांधिलकी कायम आहे. नुकत्याच जीना यांच्या चित्रावरून झालेल्या वादात अलिगढच्या विद्यार्थ्यांनी अतिशय संयमितपणे व सांविधानिक मार्गाने आपला निषेध नोंदवला. या तरुण-तरुणींना जीना यांच्या विचारांचे आकर्षण राहिलेले नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर एके काळी अलिगढच्या गळ्यातील ताईत असलेल्या जीना यांची जयंती वा पुण्यतिथीही तिथे साजरी केली जात नाही. सध्या सुरू असलेल्या आंदोलनात अलिगढच्या ३६००० विद्यार्थ्यांपैकी एकानेही जीना यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिलेली नाही. इतिहासाच्या अभ्यासातातून व परिशीलनातून आलेले हे शहाणपण नक्कीच आश्वासक म्हणता येईल असे आहे. या आत्मपरीक्षणातूनच आधुनिक पुरोगामी मुस्लिम नेतृत्व उदयाला येईल, अशी आशा करायला हरकत नाही. मजाज या प्रसिद्ध उर्दू कवीने अलिगढसाठी विद्यापीठगीत लिहिले. त्या गीताच्या शेवटानेच लेखाचा आश्वासक  शेवट करतो.

जो अब्र यहाँ से उठ्ठेगा वो सारे जहाँ पर बरसेगा

हर जू ए रवाँ पर बरसेगा, हर कोह ए गराँ पर बरसेगा

हर सर्द ओ समन पर बरसेगा, हर दश्त ओ दमन पर बरसेगा

खुद अपने चमन पर बरसेगा, गैरों के चमन पर बरसेगा

हर शहर ए तरब पर बरसेगा, हर कसर ए तरब पर बरसेगा

(अब्र- मेघ, जहाँ- जग, जू ए रवाँ- झरा, कोह ए गराँ- विशाल पर्वत, सर्द ओ समन- उघड्यावर, दश्त ओ दमन- बंदिस्त जागांवर, चमन-बाग, शहर ए तरब- संगीतमयी शहरांवर, कसर ए तरब- आनंदी आसऱ्यांवर)

संदर्भ :

Hali, Maulana Altaf Husai. Hayat-e-Javed- life and works of renowned educationist, scholar and social reformer ‘Sir Sayed Ahmed Khan’ (1817- 1898 ) of the 19th century Khan, Syed Ahmad, Asbabe Baghavate Hind (1858), Urdu Lelyveld , D: Aligarh’s First generation: Muslim Solidarity and English Educationin North India ( Princeton , 1978)

The Present State of Indian Politics: Consisting of speeches and Letters Reprinted from the Pioneer ( Allahabad : The Pioneer Press , 1888, pp 54-62

Wolpert Stanley. Jinnah of Pakistan ( New York, 1984 )

Singh, Jaswant Jinnah : India Partition, Independence  ( Oxford University Press, 2010 )

Hasan, Mushirul Afzal Husain Qadri, Mohd. Nationalist and separatist trends in Alligarh , 1915-47 Indian economic and social History Review .. 22, 1-33 ( 1985)

The Collected Works of Mahatma Gandhi ( Delhi )  18 P. 369

Siddiqui Kalim, Conflict, Crisis and war in Pakistan ( London 1m), pp. 551

Jawaharlal Neheru’s Speeches Vol 1 ( Publication Division) , freeing the spirit of the man p. 334)

Tags: Oxford University Cambridge University Majaj Hamid Dalwai Dr. Zakhir Hussain Dr. Jhakir Hussain Madarsutal Ulum Musalman-a- Hind LiyakatAli Governor Macdonald Bijanaur East India Company Muhammad Sayyad Muttaki Rammohan Roy Mohhamad Ali Jinah Mohhamad Ali Jinaa Hamid Ansari Muslim Aligarh University Aligadh University ऑक्सफर्ड विद्यापीठ केम्ब्रिज विद्यापीठ हमीद दलवाई डॉ.झाकीर हुसेन मजाज मदरसतुल उलुम मुसलमानान ए हिंद लियाकतअली गव्हर्नर मॅकडोनल्ड बिजनौर ईस्ट इंडिया कंपनी अलिगढ सय्यद मुहम्मद मुत्तकी राममोहन रॉय मोहम्मद अली जीना हमीद अन्सारी मुस्लिम अलिगढ विद्यापीठ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

समीर शेख
sameershaikh7989@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके