डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

शरीराच्या वेळेचे गणित शोधणारा ‘समय’ : समय गोदिका (कर्नाटक)

जगभरातील 12 हजार विद्यार्थ्यांवर मात करत समयने ‘ब्रेकथ्रू ज्युनिअर चॅलेंज 2018’ जिंकले. समयच्या संकल्पनेला दोन कोटी 90 लाखांचे बक्षीस मिळाले. नववी आणि दहावीत त्याला विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांनाही 36 लाख रुपये मिळणार होते, तर शाळेत 72 लाख रुपयांची आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आकाराला येणार होती. आपल्यासह आपल्या शिक्षकांना आणि शाळेलाही बक्षीस मिळाले, याचा समयला अधिक आनंद झाला होता. 

‘तुम्ही शाळेत का जाता?’ असा प्रश्न जर कुणी विचारला, तर बहुतांश मुले काय उत्तर देतील? कुणी म्हणेल, आई-बाबा म्हणतात म्हणून. तर कुणी म्हणेल, खूप शिकून चांगली नोकरी शोधण्यासाठी. काही जण म्हणतील, मोठ्ठा माणूस होऊन खूप पैसे कमावण्यासाठी; तर कुणाला मोठेपणी समाजासाठी काही तरी करायचं आहे म्हणून... 

मात्र शाळेत असताना मुला-मुलींना अभ्यास आणि परीक्षांनीच जीव नकोसा होतो. खेळायलाही पुरेसा वेळ मिळत नाही. आणि म्हणून ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी शाळा संपण्याची व मोठ्ठे होण्याची मुले-मुली वाट पाहत असतात. पण मुलांची स्वप्नं शाळेत असतानाच पूर्ण व्हायला लागली तर? किती आनंद होईल त्यांना आणि त्यांच्या आई-बाबांनाही!

कर्नाटकातील बंगळुरू येथील समय गोदिकाच्या बाबतीत असंच झालं. दहावीत शिकत असतानाच त्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकून बक्षीसही मिळवलं... बक्षीस किती रुपयांचं, तर जवळपास तीन कोटी रुपयांचं...! 

समयला हे बक्षीस काही एका रात्रीत केलेल्या कामामुळे मिळालं नाही. त्याची मेहनत, चिकाटी आणि प्रयत्नांतील सातत्य या गुणांमुळे त्याला हे बक्षीस मिळालं. अगदी लहानपणापासूनच तो विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. शाळेतल्याच स्पर्धा नव्हे, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाही... त्याही विज्ञानाशी संबंधित. त्याला विज्ञानाची प्रचंड आवड. स्वभावही खटपट्या. त्यामुळं विज्ञानाच्या आधारे तो आपल्या शाळेतील प्रयोगशाळेत काही तरी प्रयोग सतत करत राहायचा. कधी खेळणी बनव, कधी रोबोट बनव... 

याच रोबोटशी संबंधित ‘वर्ल्ड रोबोटिक ऑलम्पियाड’ नावाची एक जागतिक स्पर्धा असते. स्वतः बनवलेल्या रोबोकडून या स्पर्धेत वेगवेगळ्या गोष्टी करवून घ्यायच्या असतात. अकरा वर्षांचा असताना समयने या स्पर्धेच्या राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली होती.

आई-वडिलांना आणि शाळेतल्या शिक्षकांना समयच्या आत लपलेला छोटा वैज्ञानिक दिसला असावा. म्हणून तर अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेण्यासाठी ते समयला सतत प्रोत्साहित करत राहायचे. समयही त्यांचा विश्वास सार्थ ठरवायचा आणि दर वेळी नवी मजल मारत राहायचा. शेवटी त्याच्या या खटाटोपांची दखल घेतली गेली.. आणि ती कुणी घ्यावी? तर माहिती आणि तंत्रज्ञानातील संशोधनासाठी जगभर नावलौकिक असलेल्या ‘मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ म्हणजेच एमआयटी या विद्यापीठाने.

विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला विज्ञानाची जोड देत, नवी स्टार्ट-अप किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच सुरू करावी यासाठी दर वर्षी जगभरातून ऐंशी विद्यार्थ्यांची निवड एमआयटी करते. या ऐंशी ‘तरुण उद्योजकां’मध्ये समयची निवड झाली, तेव्हा तो नववीत होता. जगभरातून आलेल्या त्या ऐंशी विद्यार्थ्यांमध्ये समयच्या वयाची केवळ सात मुले होती. 

मग समय एका कंपनीचा सह-संस्थापक झाला. ‘मेमोरेबली’ असं त्या कंपनीचं नाव. त्यातून एक कल्पना राबवली गेली. प्रत्येकच लहान मुलाला आपल्या आजी-आजोबांचा सहवास मिळत नाही. अनेकदा ते दूर गावी वगैरे राहायला असतात. मात्र दूरगावी असले तरी मुलांना आपल्या आजी-आजोबांची आणि आजी-आजोबांना नातवंडांची आठवण यायची थोडीच राहते? यावर समयने आपल्या कंपनीच्या माध्यमातून उपाय शोधला. फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईट्‌सवर अपलोड केलेले आपले फोटो एकत्र करून त्यांचा अल्बम बनवायचा, तोही ऑनलाईनच आणि हा अल्बम थेट आजी-आजोबांना पाठवून द्यायचा. म्हणजे आजी-आजोबा आणि नातवंडांची भेटच घडवून आणायची म्हणा ना...!

विज्ञानाची आवड असली तरी समयला सामाजिक भानही आहे. आपल्या आजूबाजूच्या गरीब आणि गरजू मुला-मुलींसाठी त्याने विविध उपक्रम राबवले. आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून त्याने अशा शेकडो मुलांना शालेय गणवेश आणि बूट वाटले होते.  

समयची निरीक्षणशक्ती अफाट आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे तो बारकाईने निरीक्षण करतो. कुठे काही समस्या दिसल्या की, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने त्या समस्या सोडवता येताहेत का, हे तो शोधू लागतो. 

समयच्या काही नातेवाइकांना मज्जातंतूंशी संबंधित आजार झाला. आपल्या इतर नातेवाइकांना हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल, याविषयी तो वाचू लागला. आणि त्याला एका प्रक्रियेची माहिती मिळाली, तिचं नाव ऑटोफजी. यात ऑटो म्हणजे स्वयंचलित आणि फजी म्हणजे खाणे. म्हणजे काय तर- आपल्या शरीरातील जुन्या किंवा मृतपेशी असतात किंवा इतर घटक असतात. शरीर त्या खाऊन टाकते आणि त्यांचे रूपांतर शक्तीमध्ये करते. यामुळे अल्झायमर किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. समयने या सगळ्या बाबी नोंदवून घेतल्या. या प्रक्रियेची माहिती देणारा आणि ती अधिक चांगल्या प्रकारे कशी होईल याचा अंदाज बांधणारा छोटासा व्हिडिओच त्याने बनवला.

पला हा मजेदार पण माहितीपूर्ण व्हिडिओ त्याने विज्ञानावर आधारित स्पर्धा घेणाऱ्या अमेरिकेतील ‘ब्रेकथ्रू ज्युनिअर चॅलेंज’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय संस्थेकडे पाठवला. ‘ब्रेकथ्रू ज्युनिअर चॅलेंज’ स्पर्धेला विज्ञानातील ऑस्कर म्हटले जाते. जगभरातील आठ हजार मुलांनी या 2017 मध्ये आयोजित स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवले होते. त्यापैकी अंतिम फेरीसाठी तीस उत्कृष्ट व्हिडिओजची निवड झाली. त्यात समयचाही व्हिडिओ होता. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेला तो एकमेव भारतीय होता. या स्पर्धेत तो अंतिम विजेता ठरला नाही, पण त्याच्या व्हिडिओला ‘सर्वांत लोकप्रिय व्हिडिओ’चा पुरस्कार मिळाला. बक्षीस थोडक्यात हुकलं, पण समयने हिम्मत सोडली नाही. 

विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचा उपयोग करून नवनवीन संकल्पना सोप्या आणि मनोरंजक भाषेत सादर करणाऱ्या समयने मग निर्धार केला की, पुढच्या वर्षी याच स्पर्धेत भाग घ्यायचा आणि विजयी व्हायचं. 

जगभरात घडणाऱ्या विज्ञानविषयक घडामोडींवर त्याचं बारीक लक्ष असायचं. दरम्यान 2017 मधल्या जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली होती. विज्ञान, साहित्य, अर्थशास्त्र आणि शांतता या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्या वर्षी शरीरशास्त्रातील सिर्काडियन रिदम म्हणजे ‘जैविक घड्याळ’ संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या संशोधनामागची थोडक्यात कल्पना अशी...
आपण आपली रोजची कामं ठरलेल्या वेळी करतो. म्हणजे सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे करून शाळेत जातो, दुपारच्या सुटीत डबा खातो, संध्याकाळी ठरावीक वेळी शाळा सुटल्यावर घरी येतो, अभ्यास करतो, जेवतो आणि रात्र झाली की झोपतो. हे जसं आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं, तसं आपल्या शरीरातील अवयवांचेही एक वेळापत्रक ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्याचं कार्य ठरलेलं असतं.

ही संकल्पना समजली तेव्हा समयला आठवलं की, त्याला दम्याचा त्रास आहे आणि त्याचा दमा पहाटेच्या वेळी अधिक उफाळून येतो. याचा आपल्या शरीराच्या घड्याळाशी काही संबंध असावा का? शरीरातील इतर घटक आणि अवयव एका विशिष्ट वेळी अधिक कार्यक्षमपणे काम करत असतील का? जशी दमा वाढण्याची वेळ आहे, तशी इतर आजारांचीही  वेळ असेल का? जर असं असेल, तर या रोगांचा सामना करताना या शरीराच्या घड्याळाचा उपयोग करता येईल का? त्याप्रमाणे आपले वेळापत्रक आखले तर आपले जीवन अधिक सुखकर आणि आरोग्यदायी होईल का? असे एक ना अनेक प्रश्न त्याला पडले. 

मग त्याने ठरवलं, गेल्या वर्षी हुकलेलं बक्षीस मिळवायचं असेल तर याच संकल्पनेवर व्हिडिओ बनवू या. त्याने अभ्यास सुरू केला. आपल्या शरीराचं बारकाईने निरीक्षण करू लागला. अधिकची माहिती मिळवण्यासाठी अनेक संशोधनपर लेख त्याने वाचले. या कामी नॅशनल पब्लिक स्कूलच्या शिक्षिका प्रमिला मेनन यांनी त्याला मार्गदर्शन केलं. ते त्याचं दहावीचं वर्ष होतं, तरी हे संशोधन करताना त्याने आपल्या शालेय अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही.

‘ब्रेकथ्रू ज्युनिअर चॅलेंज’ ही स्पर्धा काही साधीसुधी नव्हती. स्वत:च्या जगावेगळ्या वैज्ञानिक संकल्पना केवळ तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगायच्या होत्या. तेरा ते अठरा वर्षे वयोगटातील तब्बल 190 देशांमधील 12 हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा अटीतटीची असली तरी मिळणारे बक्षीसही स्वप्नवत्‌च होते. दोन कोटी 90 लाख रुपयांचे! विशेष म्हणजे, यातली काही रक्कम विजेत्या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शक शिक्षकांना मिळणार होती, तर काही रक्कम शाळेत मोठी विज्ञान प्रयोगशाळा बांधण्यासाठी देण्यात येणार होती. 

झालं. समयने सिर्काडियन रिदमवर तीन मिनिटांचा व्हिडिओ बनवला. आपले शारीरिक, मानसिक आणि प्रत्यक्ष वर्तन यांचे दैनंदिन चक्र ठरलेलं असतं, अशी संकल्पना मांडणारा हा व्हिडिओ होता. हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण सकाळच्या वेळीच जास्त का असते, ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक विक्रम दुपारच्या वेळीच का नोंदवले जातात, दम्याचा त्रास पहाटेच जास्त का होतो- असे प्रश्न विचारत तो व्हिडिओ सुरू होतो आणि मग समय प्रश्न विचारतो- ‘काय आपण वेळेच्या हातचे बाहुले आहोत?’

पुढे अतिशय मजेशीरपणे तो सिर्काडियन रिदमची संकल्पना समजावून सांगतो. प्रत्येक अवयव ठरावीक वेळी अधिक कार्यक्षम असतात आणि वक्तशीरपणे आपले काम करत असतात. आपण उशिरापर्यंत जागे राहिलो किंवा अवेळी जेवलो, तर त्यांचे कार्य बिघडते आणि हळूहळू इतर सर्व अवयवांवर त्याचा ताण येऊन आपण आजारी पडतो, हे तो पटवून देतो. आपल्याला काय प्रकारचे काम करायचे आहे, त्यासाठी कोणत्या अवयवाची सर्वाधिक आवश्यकता आहे आणि तो सर्वाधिक कार्यक्षम कधी असतो, या गोष्टींचा शोध घ्या आणि त्यानुसार आपले काम ठरवा... तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल, असा कानमंत्र देत समय व्हिडिओ संपवतो. 

‘ब्रेकथ्रू ज्युनिअर चॅलेंज’साठी समयने व्हिडिओ पाठवून दिला खरा. पण तेवढ्याने भागणार नव्हते. अधिकाधिक लोकांना त्याचा व्हिडिओ आवडणे गरजेचे होते. त्याचा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून त्याच्या  शाळेने अनेक उपक्रम राबवले. आपल्या देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या व्हिडिओची माहिती दिली. 

समयने मांडलेली ही संकल्पना सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर स्पर्धेच्या निरीक्षकांनाही प्रचंड आवडली. त्यामुळे अंतिम 29 स्पर्धकांमध्ये त्याची निवड झाली. आधीच्या वर्षी त्याचं बक्षीस अगदी थोडक्यात हुकलं होतं, या वेळी तो जास्त तयारीनिशी उतरला होता. परिणामी वर्षभर घेतलेल्या मेहनतीला आणि अभ्यासाला अखेर यश आले. जगभरातील 12 हजार विद्यार्थ्यांवर मात करत त्याने ‘ब्रेकथ्रू ज्युनिअर चॅलेंज 2018’ जिंकले. 

समयच्या संकल्पनेला दोन कोटी 90 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. त्यातून नववी आणि दहावीत त्याला विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांना 36 लाख रुपये मिळणार होते, तर शाळेत 72 लाख रुपयांची आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आकाराला येणार होती. आपल्यासह आपल्या शिक्षकांना आणि शाळेलाही बक्षीस मिळाले, याचा त्याला अधिक आनंद झाला होता. 

त्याला मिळालेले बक्षीस तो आपल्या शिक्षणासाठी वापरणार आहे. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आणि तिथली फी भरण्यासाठी तो हे पैसे वापरणार आहे. त्याचबरोबर आपल्या वैज्ञानिक संकल्पना देशातील शाळांमध्ये- विशेषतः सरकारी शाळांमध्ये घेऊन जाण्यास तो उत्सुक आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा वारसा समयला घरातूनच मिळालाय. त्याचे वडील सलील गोदिका हे गेल्या वीस वर्षांपासून देशा-विदेशांत आयटी तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ‘हॅप्पीएस्ट माइंड’ या संस्थेचे ते सहसंस्थापक आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांत वक्ते आणि पाहुणे म्हणून त्यांना आमंत्रित केलं जातं. ते अमेरिकेतील बोस्टन इथे स्थायिक असतानाच समयचा जन्म झाला होता. त्या वेळी त्यांना कल्पनाही नसेल की, तिथून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध ‘मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाकडून शाळकरी समयला नावाजले जाईल आणि पुढे तो याच महाविद्यालयात प्रवेशही मिळवील. 

हो, याच वर्षी त्याने ‘मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात एमआयटीमध्ये महाविद्यालायीन शिक्षणासाठी प्रवेश मिळवलाय. पुढची चार वर्षे तो तिथे अभ्यास करणार आहे. या विद्यापीठाशी संबंधित असलेल्या तब्बल 96 जणांना आजवर नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी अर्थशास्त्रासाठी नोबेल परितोषिक मिळवणारे अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी इस्थर डूफलो याच विद्यापीठात शिकवतात. 

भविष्यात या विद्यापीठातून अनेक नोबेलविजेते तयार होतीलच, पण त्यापैकी एक नाव कदाचित समय गोदिकाचेही असू शकेल.

Tags: बालकुमार तंत्रज्ञान समीर शेख समय गोदिका शरीराच्या वेळेचे गणित शोधणारा ‘समय’ karnataka samay godika sameer shaikh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

समीर शेख
sameershaikh7989@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके