आम्ही ‘साधना विद्यालय’ ही शाळा याच विचारानं सुरू केली की, ‘जर प्रश्न आमचे असतील, तर उत्तरंपण आमचीच असली पाहिजेत.’ तिथं आजूबाजूच्या गावांमधलेच शिक्षक शिकवतात. शाळेतली मुलं त्यांना रोज बघतात. त्यामुळे या दोहोंनाही एकमेकांची भाषा अवगत आहे. हे तत्त्वतः ‘मातृभाषेतून शिक्षण’ नसलं, तरी आकलनाची भाषा मातृभाषाच राहिल्यामुळे मुलांचा दोन भाषांमधला वावर सहज होतो. आपलीच भाषा बोलणारा शिक्षक मिळाल्याने त्यांचा भाषेशी होणारा संघर्ष थांबला आहे. त्यामुळे आता काहीही समजून घेताना भाषा त्यांच्या आड येत नाही. म्हणून तू म्हणालीस तसा इथल्या मुलांमध्ये भेदरलेपणा अजिबात नाही. ती मनमोकळी आहेत. या शाळेबद्दल त्यांना आपलेपणा वाटतो. त्यामुळे ती जास्त बोलतात; बदल आत्मसात करतात. चुका करायला घाबरत नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
समीक्षा गोडसे ही हेमकलसा लोक बिरादरी प्रकल्पाच्या शिक्षण विभागाची समन्वयक. तिच्या आगळ्यावेगळ्या प्रयोगांमुळे नेलगुंडाच्या साधना विद्यालयाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या तिच्या कामाबद्दल, तिच्या प्रवासाबद्दल तिच्याशी मारलेल्या या गप्पा...
प्रश्न - समीक्षा, तुझा जन्म मुंबई-बोरिवलीमधला, तू वाढलीस पुण्यात. अर्थशास्त्रात पदवीचं शिक्षण घेतलंस. नंतर 2008मध्ये अनिकेतदादाशी लग्न झालं, तेव्हा तू हेमलकसाला गेलीस. पुणे ते हेमलकसा, हे खूपच मोठं स्थित्यंतर आहे. या तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील?
- आता मागे वळून पाहताना मला असं वाटतं की, पुण्यात असताना आपण किती भाबडे होतो, कशाचंच भान नव्हतं. सगळं जग आपल्याभोवतीच फिरतं आहे, अशी पुण्यातल्या लोकांची समजूत असते. माझंही तसंच होतं. पुण्यात जसं आहे, तसंच सगळीकडे असतं, असं मलाही वाटायचं. तेव्हा महाराष्ट्राबद्दल मला फार काही माहितीही नव्हती. बीड, नागपूर अशा सगळ्या ठिकाणचं जगणं सारखंच आहे, असंच मला वाटायचं. गडचिरोली नावाचा एक जिल्हा आहे, भामरागडसारखा अगदी विलक्षण आणि सुंदर भाग आहे, हे मला लग्न झाल्यावर समजलं. नंतर हळूहळू माझी समज वाढत गेली. मग मी स्वत:ला डेव्हलप करत गेले; आजूबाजूचं भान येत गेलं.
प्रश्न - पुण्यात तू ‘सिटी लाईफ’ पाहिलं होतंस. आपण शहरातून ग्रामीण भागात जातो, तेव्हा थोडंसं अवघड जातं
- अवघड तर आहेच! पुण्यात असताना मला रोज बाहेर खायची सवय होती. पुण्यात संध्याकाळी सात-साडेसातला आपण मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारायला किंवा ‘जस्ट हँगआउट’ करायला घरातून बाहेर पडतो. इकडे मात्र सात-साडेसातला जेवण होऊन दिवस संपलेला असतो. हे सगळं जरा नवखं होतं. पण ‘हे नवखं असलं, तरी छान आहे’ एवढं मात्र नक्की वाटत होतं. तेव्हा या नावीन्याचं आकर्षणही वाटत होतं. ‘आपण इथं काहीतरी करू शकतो’ असंही वाटत होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या. अर्थात द्वंद्वही होतं. पुण्याची आठवणही येत होती. पुण्याच्या तुलनेत इथं बऱ्याचशा उणिवा दिसत होत्या, पण संधीही दिसत होती. त्या वेळेला माझ्या आजूबाजूची माणसं आणि माझ्या घरातले यांनी मला चांगल्या प्रकारे समजून घेतलं. त्यातून माझ्या मनाची घडण बदलत गेली. त्यामुळे या जागेची संधी मला जास्त खुणावत गेली आणि माझ्यासाठी सगळं सोपं होत गेलं.
प्रश्न - मला वाटतं, तू हेमलकशाच्या प्रेमातच पडलीस
- अगदी, नक्कीच.
प्रश्न - हेमलकशामध्ये खूप सारे प्रकल्प आहेत. दवाखाना आहे, वन्यप्राण्यांसाठी काम आहे... शाळा आहे. ते सगळं एक्सप्लोअर कसं केलंस आणि इथं ‘शिक्षण’ या विभागात संधी असल्याचं कसं हेरलंस?
- मघाशी म्हटलं तसं, मी इथं लग्न होऊन आले, तेव्हा सर्वांत धाकटी आणि अननुभवीही होते. त्यामुळे काय करावं समजत नव्हतं. वैद्यकीय क्षेत्र नाही, हे तर ठरलेलंच होतं. कारण मला रक्त, टाके वगैरे सहन होत नाही. मी काही ते करू शकले नसते. दुसरं, कुणी आजारी असेल अन् त्याचं रक्त वगैरे वाहत असेल तर मला चक्कर येते. प्राणीपण नाही, कारण मी शहरात राहिलेली आहे. त्यामुळे मी फक्त कावळा आणि कुत्रा पाहतच वाढले होते. माझं शिक्षण अर्थशास्त्रातलं असल्यानं मी आधी काही सेल्फ हेल्फ गटांबरोबर काम केलं, पण ते काही मला जमलं नाही. मला असं वाटतं की, आपण खरंतर अपयशातूनच घडत असतो. त्यामुळे मला काय जमत नव्हतं, ते मला आधी नीट समजलं. मग मला काय जमू शकतं, हे मी शोधायला सुरुवात केली. नंतर माझ्या लक्षात आलं की, मला लहान मुलांसोबत काम करायला मजा येते. मला मुलं आवडतात. त्यांच्याशी जोडून घेता येतं. तसा माझा शिक्षणक्षेत्राशी काही संबंध नव्हता, पण मुलांबरोबर ओळखी होत गेल्या, त्यांच्याबरोबर वेळ घालवायला लागले. हळूहळू त्यांची सोबत आवडत गेली. आधी मी मुलांना संगणक शिकवायचे, त्यानंतर इंग्लिश, मग गणित शिकवायला लागले. असं करता करता माझ्याकडे पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांची जबाबदारी आली. मग पूर्ण शाळेचीच आली. नंतर हेमलकशातल्या सगळ्या शिक्षणक्षेत्राची जबाबदारी आली. असं हळूहळू वाढत गेलं. मला कुणीही भरीला घातलं नाही की, ‘आता उद्यापासून तू हे कर किंवा ते कर’. एव्हरीबडी वॉज रेडी टू ट्रस्ट इन प्रोसेस. ‘तू जादूची कांडी फिरव आणि काहीतरी करून दाखव’ अशी कुणाचीच माझ्याकडून अपेक्षा नव्हती. त्यामुळे मी इथं राहूही शकले आणि वाढूही शकले.
प्रश्न - आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात पदवी मिळवतो, तेव्हा चौकट बांधून घेतो की, हे शिकलोय म्हणजे हेच करणार. तुझी पदवी वाणिज्य विषयात, पदव्युत्तर पदवी अर्थशास्त्रात आणि प्रत्यक्ष काम तू शिक्षणक्षेत्रात करते आहेस. शहरात शिक्षणाच्या खूप संधी असतात, ग्रामीण भागात मात्र त्या कमी असतात. त्यातही आदिवासी भागात तर एक वेगळाच अनुभव मिळतो. असं म्हणतात की, आदिवासी मुलं शिक्षणात मागे पडतात... तुला काय वाटतं?
- मला असं वाटतं की, सगळ्या प्रकारच्या मुलांनी एकत्र शिकणं खूप गरजेचं आहे. हल्ली समाजकल्याणच्या शाळा वेगळ्या, आदिवासी शाळा वेगळ्या असं आहे. त्यामुळे त्या समाजातली मुलं त्याच समाजात राहतात. पण सगळ्यांच्या आशा-आकांक्षा, आयुष्यातली आव्हानं सारखीच असतात. या वाटणीमुळे काय होतं की, आपल्या वाट्याला आलेलं आयुष्यच खरं, असं वाटत राहतं- जसं माझं झालं होतं. मला वाटायचं, पुणं हेच आयुष्य आहे. आपल्यापलीकडे काही अन्य, अगदी भिन्न प्रकारचे लोक आहेत आणि ते वेगळंच काहीतरी करतात, हे माहीतच नसतं. त्यामुळे अशा विभागलेल्या शिक्षणात मुलांच्या हाती नवं काहीच लागत नाही. म्हणून वेगळा विचारही केला जात नाही. कारण वेगळं काही करता येऊ शकण्याची कल्पनाच अशा विभाजित शिक्षणामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
त्यामुळे मला असं वाटतं की, अशा प्रकारच्या भिंती उभ्या केल्या जाऊ नयेत. आणि जर हे असं राहणारच असेल, तर आदिवासी, दलित, अंध-अपंग यांच्या शाळांबद्दल सहानुभाव असणं आवश्यक आहे, पण तसं होत नाही. मुलांबद्दल अगदी ठाशीव आणि ठरीव कल्पना शिक्षकांच्या असतात. त्यांच्या वर्तनात कर्मठ म्हणाव्यात अशा घट्ट समजुती असतात. त्यामुळे जोवर शिक्षक या कर्मठ समजुतींतून बाहेर येणार नाहीत, तोवर शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांना स्वीकारू शकणार नाहीत. हे जेव्हा घडेल, तेव्हा खऱ्या अर्थानं ‘शिक्षण’ नावाची संकल्पना प्रत्यक्षात यायला सुरुवात होईल, असं मला वाटतं.
प्रश्न - तुझ्या बोलण्यावरून मला दोन गोष्टी आठवल्या. मी शाळा पाहायला एका खेड्यात गेले होते. तिथं वर्गात गेले. मुलांशी खूप संवाद साधायचा प्रयत्न केला, पण ती मुलं खूप घाबरून गेली होती. मी त्यांना हसवू पाहत होते, पण ती प्रतिसादच देत नव्हती. बाहेरच्या जगाशी त्यांचा खूपच मर्यादित संपर्क आल्यामुळे बाहेरचं कुणी आल्यावर ती भेदरून जातात. त्यांचे शिक्षक मला सांगत होते, ‘या आदिवासी मुलांचे कपडे कसेही असतात. ती जेव्हा हॉस्टेलला राहतात, तेव्हा छान राहतात. पण घरी जाऊन येतात, तेव्हा सगळं विसरतात; खराब कपडे घालून येतात.’ तुला काय वाटतं, केवळ त्यांच्या आदिवासी असण्यामुळे काही समस्या निर्माण होतात का? की काही अडसर हे त्यांचे स्वतःचेच आहेत? शिक्षणात भाषेचाही अडसर येतो.
- जरा मजेशीर आहे. आदिवासी मुलं घरी जी भाषा बोलतात, ती वेगळी असते. ती त्यांची बोलीभाषा असते आणि ती शाळेत जी भाषा शिकतात, ती वेगळी म्हणजे प्रमाण भाषा असते. त्यांना ती तर शिकावीच लागते, पण विषयही त्याच भाषेत शिकावे लागतात. त्यामुळे शिकण्यापेक्षा त्यांना भाषेचाच ताण अधिक येतो. ‘मातृभाषेतून शिक्षण’ यावर जगभर अनेक प्रयोग झालेले आहेत. सगळीकडे असंच सांगितलं जातं की, मातृभाषेतून मुलं चांगली शिकू शकतात, पण आपल्याकडे शिक्षकांनाच मुलांची भाषा येत नसते.
आम्ही ‘साधना विद्यालय’ ही शाळा याच विचारानं सुरू केली की, ‘जर प्रश्न आमचे असतील, तर उत्तरंपण आमचीच असली पाहिजेत.’ तिथं आजूबाजूच्या गावांमधलेच शिक्षक शिकवतात. शाळेतली मुलं त्यांना रोज बघतात. त्यामुळे या दोहोंनाही एकमेकांची भाषा अवगत आहे. हे तत्त्वतः ‘मातृभाषेतून शिक्षण’ नसलं, तरी आकलनाची भाषा मातृभाषाच राहिल्यामुळे मुलांचा दोन भाषांमधला वावर सहज होतो. आपलीच भाषा बोलणारा शिक्षक मिळाल्याने त्यांचा भाषेशी होणारा संघर्ष थांबला आहे. त्यामुळे आता काहीही समजून घेताना भाषा त्यांच्या आड येत नाही. म्हणून तू म्हणालीस तसा इथल्या मुलांमध्ये भेदरलेपणा अजिबात नाही. ती मनमोकळी आहेत. या शाळेबद्दल त्यांना आपलेपणा वाटतो. त्यामुळे ती जास्त बोलतात; बदल आत्मसात करतात. मुख्य म्हणजे, चुका करायला घाबरत नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकत असतो, तेव्हा अनेक गमतीजमती, गफलती होतात. त्या बाबतीत आपली शिक्षणव्यवस्था फारच काळा-पांढरा व ठोकळेबाज विचार करणारी आहे. त्यामुळे आपण लगेच लाल शाईनं क्रॉस करतो, शून्य मार्क देतो. तसं न करता जर शिकवत गेलो, तर मुलं त्या गफलतींमधूनही चांगल्या प्रकारे काही शिकू शकतात.
प्रश्न - नेलगुंडा भामरागडपासून बरंच लांब, खूप आतलं गाव आहे. तू ही शाळा 2015मध्ये सुरू केलीस. सुरुवातीला काही अडचणी आल्या असतील. ही शाळा सुरू करताना कुठला विचार होता? गावकऱ्यांशी कसा संवाद साधलास?
- तो संपूर्ण भाग आमच्याशी जोडलेला आहे. कारण माझे सासू-सासरे म्हणजे डॉ. प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’ला आता 50 वर्षं पूर्ण होतील. त्यांचा आजूबाजूच्या गावातल्या लोकांशी खूप चांगला संवाद आहे आणि लोकांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कोणताही नवीन प्रकल्प सुरू करताना तसा काही त्रास होत नाही. नेलगुंडाबाबत सांगायचं, तर तिथं आठवडी बाजार भरतो. हे गाव भामरागडपासून साधारण 28 किलोमीटरवर आहे. म्हणजे खरं तर 30-35 मिनिटांत जाता-येता येण्यासारखं, पण रस्ता चांगला नसल्यामुळे तिथं जायला दीड-दोन तास लागतात; पावसाळ्यात तर जाणं-येणं अशक्यच होतं. नेलगुंडाचा हा शनिवारचा आठवडी बाजार काही कारणांसाठी पोलिसांनी बंद केला होता. पण आजूबाजूला 18-20 गावं आहेत. तिथल्या गावकऱ्यांची नेलगुंडात बाजार भरत असल्यानं वाणसामान-भाजीपाल्याची सहज सोय व्हायची. पण हा बाजार बंद केल्यानं गावकऱ्यांना दहा रुपयांचं मीठ घ्यायचं झालं, तरी 30 किलोमीटर पायपीट करावी लागायची. त्यामुळे पोलिसांशी बोलून नेलगुंडाचा आठवडी बाजार परत सुरू करून द्यावा, ही मागणी घेऊन ते आमच्याकडे आले होते. शिवाय, गावाजवळच्या मोठ्या नाल्यावर पूल बांधून हवा होता. त्यांच्या अजून दोन मागण्या होत्या. त्यांना दवाखाना आणि शाळा हवी होती. नेलगुंडा परिसरात एकही शाळा नव्हती. त्यांच्या या चार मागण्यांपैकी पूल आणि बाजार यांसाठी आम्ही सरकारशी मध्यस्थी करावी, मात्र दवाखाना आणि शाळा लोकबिरादरी प्रकल्पानं सुरू कराव्यात, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी जमीन देण्याचीही त्यांची तयारी होती. एवढंच नाही, तर ‘आम्ही घरोघरी जाऊन सांगू आणि मुलं गोळा करू. तुम्ही त्याची काळजी नका करू. आम्ही करू सगळं’ असंही त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या वेळी खरं तर आणखी शाळा सुरू करण्याचा आमचा काही विचार नव्हता. पण शाळा सुरू करण्याबाबतची त्यांची असोशी आणि त्याबाबतीतला त्यांचा पुढाकार यांनी आम्हालाही विचार करायला भाग पाडलं. त्यांचा उत्साह पाहून मी म्हटलं की, ‘‘मला या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायला आवडेल’’ आणि अशा प्रकारे माझ्या कामाला सुरुवात झाली. करायचं तर गुणवत्तापूर्णच करायचं. ‘मुलं आली, खिचडी खाल्ली, चालली.’ असा प्रकार आम्हाला अजिबातच करायचा नव्हता. त्यामुळे मी तिथले, आजूबाजूचेच शिक्षक निवडले, त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांची बाहेरच्या जगाशी ओळख करून दिली आणि त्यांच्या क्षमता वाढतील असं पाहिलं.
प्रश्न - नेलगुंडाच्या शाळेमध्ये मी आले होते. तिथली छोटी छोटी मुलंही इंग्लिशमध्ये बोलत होती. माझ्यासाठी ते खूप आश्चर्यकारक होतं. तुझ्या भाषेबद्दलच्या प्रयोगाबद्दल बरंच ऐकलंय. त्याबद्दल जरा सांगू शकशील का? तिथली स्थानिक भाषा कुठली आहे आणि तुम्ही इंग्लिश हे माध्यम का निवडलं वगैरे?
- इंग्लिश माध्यमाची निवड गावातल्या लोकांनीच केली. त्यांना याच माध्यमाची शाळा हवी होती. मलाही असं वाटतं की, इंग्लिश का नाही? ते गरीब आहेत म्हणून त्यांनी मराठीतच शिकावं? आणि इथं तर गावकऱ्यांचीच इंग्लिश माध्यमाची मागणी होती. अर्थात याला नक्कीच सामाजिक दबाव कारणीभूत आहे, पण तो दबाव शहरातल्या लोकांनीच तयार केलाय ना? शहरातल्या मुलांनी इंग्लिश माध्यमात शिकायचं आणि आदिवासी मुलांसाठी मात्र मराठी माध्यमाचा आग्रह धरायचा, हे मला तितकंसं पटत नाही.
प्रश्न - या आदिवासी मुलांना इंग्लिश अवघड जाईल, असं तुला वाटलं नाही?
- नाही! आणि मराठीसुद्धा ते शिकतात की! मी मघाशी म्हटलं तसं, एकदा मुलांमध्ये मोकळेपणा आला, त्यांना ती जागा आपली वाटली की, मग त्यांच्यावर शिकण्याचा ताण येत नाही. ‘तू आज अभ्यास केला नाहीस, पण उद्या कर’ असं त्यांना सांगितलं, तर ती करतात.
प्रश्न - या मुलांच्या स्थानिक भाषा कोणत्या आहेत?
- नेलगुंडामध्ये ‘माडिया’ ही एकच भाषा बोलली जाते. कारण आजूबाजूला फक्त तोच समाज आहे. 2019मध्ये याच परिसरात आम्ही अजून एक शाळा सुरू केली. तिथं मात्र पाच स्थानिक भाषा (माडिया, गोंडी, तेलुगु, महारी हलबी) बोलतात आणि सहावी इंग्लिश. आमच्या तिथल्या शिक्षकांना या सगळ्या भाषा येतात; मुलांनाही एकमेकांच्या भाषा येतात. त्यामुळे या शाळेत आमचे शिक्षक अगदी बेमालूमपणे सहाही भाषांत बोलत शिकवतात. त्याचे मी काही छोटे छोटे व्हिडिओज बनवले आहेत, पण त्यांचं शिकवणं खरं तर प्रत्यक्षच पाहण्यासारखं आहे.
प्रश्न - या तुमच्या शाळेत शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापिका असं म्हटलं जात नाही. आणि अजून एक म्हणजे, तुमच्या या शाळेतल्या मुलांना ‘पावसाळी सुट्ट्या’ असतात. तर तो काय प्रकार आहे?
- हो, आम्ही शाळेत अशी पदं वापरत नाही. मी शाळेची मुख्याध्यापिका नाहीये, तर ‘समन्वयक’ आहे. आम्ही ‘शिक्षक-शिक्षिका’ असं न म्हणता ‘ताई-दादा’च म्हणतो. कारण ही शाळा सुरू करताना माझा असाच विचार होता की, हे आमचं विस्तारित कुटुंबच असेल. आपण शाळेत चाललोय म्हणजे भलतीकडेच चाललो आहोत, असं मुलांना वाटता कामा नये. कारण ‘शाळा’ हा शब्द या भागात जरा नकारात्मक छटा असलेला आहे. मास्तर म्हणजे कोण, एक तर जो शाळेत हजर तरी नसतो किंवा असला, तर जो मारतो तो!
सुट्ट्यांचं म्हणशील, तर या भागात खूप पाऊस पडतो. छोट्या नदी-नाल्यांना प्रचंड पूर येतो. याच दिवसांत शेतीचीही खूप कामं असतात. त्यामुळे आई-वडीलही मुलांना सोडायला येऊ शकत नाहीत. पावसात मुलं एकटी कशी येणार? त्यामुळे जुलै-ऑगस्ट महिन्यांत आमच्या शाळांना ‘पावसाळी सुट्टी’ असते. 15 सप्टेंबरपासून शाळा परत सुरू होते. उन्हाळ्यात मात्र सुट्टी नसते, कारण भारतीयांना तशी उन्हाची सवय आहे. उन्हाळी सुट्ट्या ही कल्पनाच परकीय आहे.
प्रश्न - आपले विचार त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना काय सोयीचं आहे, हे पाहणं हे छान आहे
- अगदी! आमच्या शाळेत हिंदू सणांच्याही फार सुट्ट्या नसतात. दिवाळीची सुट्टी फक्त दोनच दिवस असते. कारण त्यांच्याकडे फक्त लक्ष्मीपूजन असतं. त्याऐवजी ‘होळी’ आणि ‘पोळा’ या दोन सणांना मोठ्या सुट्ट्या असतात. हे शेतीशी संबंधित सण असल्याने त्यांत गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्यानंतर मे महिन्यात आठ दिवस ‘बिडीपत्त्याची सुट्टी’ असते. कारण तेव्हा सगळी छोटी मुलं बिडीपत्त्याची पानं तोडायला जातात. थोडक्यात, मुलांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांची रचना केलेली आहे. पतेती, रक्षाबंधन, गणपती याही सुट्ट्या नसतात. हे सण इकडे साजरे केले जात नाहीत. गणपती कुणीच बसवत नाही. त्यामुळे मुलं आणि त्यांचे पालक यांच्या गरजेनुसार आम्ही सुट्ट्यांचं वेळापत्रक ठरवलंय.
प्रश्न - खरंय, असंच असायला पाहिजे. शिक्षणात ‘मुलं’च महत्त्वाचा घटक असतात. त्यामुळे ती केंद्रस्थानी हवीत. मला एक वेगळा प्रश्न विचाराचाय. म्हणजे मला खात्री आहे की, तू पालकत्वाकडेही वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहत असशील. जे रूढीप्रधान पालकत्व आहे, ते तुला पटत नसणार. तुलाही दोन मुलं आहेत. तू कसं पाहतेस पालकत्वाकडे?
- माझी मुलं काय विचार करतात किंवा ती काय होतील, याची मी कल्पनासुद्धा करू शकत नाही. ती आत्ताच माझ्या खूप पुढे आहेत. मी त्यांना वाढवतेय किंवा त्यांच्यावर संस्कार करतेय, असं मला वाटत नाही. काहीही झालं तरी मी त्यांच्यासोबत असणार आहे, एवढाच विश्वास मला त्यांना द्यायचा आहे; जेणेकरून उद्या त्यांनी काही ठरवलं, तर ते ती निश्चयपूर्वक करू शकतील.
दुसरं असं की, आमच्या कुटुंबाच्या नावाचं वलय आणि दबाव या दोन्हींपासून त्यांना शक्य तितकं लांब ठेवण्याचा, ‘आपणही इतर चार मुलांसारखेच आहोत’ असंच त्यांनाही वाटावं, असं वातावरण तयार करण्याचा माझा प्रयत्न असतो. फक्त त्यांनी स्वतःचे मार्ग स्वतः शोधावेत, यासाठी मी त्यांना भरीस घालते आणि त्या दृष्टीनं त्यांच्याशी संवाद साधते.
प्रश्न - बऱ्याच पालकांचा एक खूप कॉमन प्रश्न असतो - मुलं आमचं ऐकत नाहीत, मग त्यांना शिस्त कशी लावायची? यावर तुझ्याकडे काही उत्तर आहे का?
- आपण मुलांकडे थोडं उदारपणाने पाहिलं, त्यांना कळेल अशा पद्धतीनं समजावून सांगितलं, तर मुलं ऐकतात, असं मला वाटतं; आणि प्रत्येकाला स्वत:चं बरं-वाईट कळत असतं. अगदी तान्ह्या बाळालाही कळत असतं. भलेही एकदा चूक केल्यावर समजत असेल, पण समजतंच. मुलं फार गंभीर चुका करत नाहीत, तोपर्यंत आपण फक्त गार्ड (विश्वस्त) म्हणून पाहत राहावं; बाकी त्यांचं त्यांना करू द्यावं. मी माझ्या मुलांची चांगली मैत्रीण होण्याचा प्रयत्न करत असते. आम्ही भरपूर फिरतो. माझ्या मुलीला सध्या क्रोशेनिटिंग खूप आवडायला लागलंय. माझ्या मुलाला स्वयंपाक करायला आवडतो. त्यामुळे आम्ही वेगवेगळे पदार्थ करून पाहतो. याच्या पलीकडे माझ्याकडे त्यांना देण्यासारखं काही आहे, असं मला वाटत नाही. उलट त्यांच्यामुळे आणि शाळेतल्या मुलांमुळे माझं आयुष्य समृद्ध झालंय. शाळेतल्या मुलांमुळे मी एक चांगली पालक झाली आहे आणि माझ्या मुलांमुळे चांगली शिक्षिका, असं मला वाटतं. ही सगळी मुलं आयुष्यात आल्यामुळे एक व्यक्ती म्हणून मी खूप समृद्ध झालेय.
प्रश्न - तुझ्या शाळेतून शिकून बाहेर पडलेली काही मुलं असतील. त्यांच्याशी तुझा काही संवाद होतो का, तू त्यांच्या संपर्कात आहेस का? त्यांचे काही अनुभव?
- तसे भरपूर आहेत. परवाच एका मुलीने फोन केला होता. मुंबईत झालेल्या एका क्रीडास्पर्धेत तिला ब्राँझ पदक मिळालं. ते जाहीर झाल्या झाल्या तिने मला फोन केला. आमच्या शाळेतली ही मुलगी आता पुण्यात, बालेवाडीत शिकतेय. तिची ‘खेलो इंडिया’साठी निवड झालीय.
प्रश्न - खूप छान वाटत असेल ना?
- हो, खूपच छान!
प्रश्न - इतक्या लहान वयात तुला असे अनुभव येताहेत... मला हेवा वाटतोय तुझा.
- लहान वयातच म्हातारी झालेय असं की काय.
प्रश्न - नाही, लहान वयात तू इतकी आयुष्यं घडवते आहेस.
- नाही, नाही, असं काही नसतं. आता या मुलीचंच पाहा. ही अकरावीतली मुलगी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून वर्षाला पाच लाख रुपये कमवते. ती अतिशय साध्या गावातून आलेली, सामान्य परिस्थितीतली मुलगी. पण तिने या वयात जे केलंय, ते आपण नाही करू शकणार. आपण या मुलांपुढे काही नाही, ती फार पुढची आहेत! आपण थोडाफार आधार दिला, तरी त्यांची उडी फार पुढे जाते, जाऊ शकते, एवढंच.
प्रश्न - तू ‘खेलो इंडिया’तल्या मुलीचं उदाहरण दिलंस मी बिजापूरला पाहिलंय की, तिथं क्रीडा अकादमी आहे आणि तिथल्या आदिवासी मुलांनी प्रचंड यश मिळवलंय. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर ते पोहचलेत. म्हणजे त्यांच्यात गुणवत्ता आहे. उलट आपण ती शोधायला कमी पडतो. ही मुलं तुला बाकीच्या मुलांपेक्षा कशी वेगळी वाटतात?
- मला ही ‘नो नॉनसेन्स’ (अजिबात बाष्कळ नसलेली) मुलं वाटतात. आयुष्याकडे ती अतिशय थेट आणि आमना-सामना पद्धतीनं पाहतात. त्यांच्या जगण्याच्या कल्पना अजिबात स्वप्नरंजक नाहीत. म्हणजे शहरातल्या लोकांना कसं नदी, पाणी, पाऊस पडल्यावर गरम चहा, भजी असे ठरीव-ठाशीव पदार्थ आठवतात तर इथं आल्यावर अशा सगळ्या फुग्यांना टाचणी लागते; माझ्याही लागली. म्हणजे एकदा आम्ही लेखन कार्यशाळा घेतली होती. त्यात मुलांना विषय द्यायचे होते आणि गोष्टी लिहायला सांगायच्या होत्या; चित्रं काढायला लावायची होती. तेव्हा मी खूप नाही तरी थोडीशी बावळट होते. त्या वेळी मी मुलांशी आधी थोडी चर्चा केली, म्हणजे पाऊस पडल्यावर काय काय होतं वगैरे. तर एका मुलीनं अशी गोष्ट लिहिली की, ‘एकदा पावसाळ्याच्या दिवसांत एक मुलगी नाला ओलांडून पलीकडे मेंढ्यांना चरण्यासाठी घेऊन गेलेली असते. तेवढ्यात खूप पाऊस पडायला लागतो आणि नाल्याला पूर येतो. त्यामुळे ती मुलगी घाबरते आणि अशा पुरात मेंढ्यांना सांभाळत नाला ओलांडून पलीकडे जाण्याचं संकट तिच्यापुढे उभं ठाकल्याने ती घाबरून जाते. घरचे विचार तिच्या मनात दाटी करायला लागतात.’ पावसाच्या प्रसंगाचा असा विचार मी कधीच करू शकले नसते. माझ्या मनात पावसाचं असं समीकरण कधी जुळलंच नसतं. असा खूप वेगळा दृष्टीकोन देतात ही मुलं! मला नदीवर जायला खूप आवडतं. त्यावरून मुलं माझी खूप टिंगल उडवतात! म्हणजे, ‘ही काम नसताना नदीवर जाते.’ नदीवर जायचं, तर तुला काही कपडे धुवायचेत का? भांडी धुवायचीत का? तुला काही आणायचंय का? पाणवठ्याच्या जवळ खूप रानभाज्या असतात.’ असं काय काय म्हणत-विचारत राहतात. मला असं काहीच करायचं नसतं. मला फक्त नदी बघायची असते. त्यावरून ती मला वेड्यात काढतात. मग मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाते. त्यांच्याबरोबर नदीत पोहते. इथं नदीची खूप मोठी मोठी पात्रं आहेत. त्यामुळे माझाच माझ्या दमसासावर भरवसा नव्हता. तर ती म्हणाली, ‘अगं चल, काही नाही होत, चल!’ त्यांच्यामुळे मी ते करू शकले. त्यांच्यामुळे मी नदी एका दमात पार वगैरे करायला लागलेय. मी तुला म्हटलं तसं, या मुलांसमोर आपण काहीच नाही! आपण फार तर त्यांना साथ देऊ शकतो. मात्र तेव्हा मलाही वाटलं की, मीही यांच्यासाठी हेच केलं पाहिजे ‘चला, करा, करा जमेल तुम्हाला.’ बऱ्याचदा आपल्याला मुलांकडूनच प्रश्नांची उत्तरं सापडतात. कसं वागलं पाहिजे, याची दिशादेखील खूपदा मुलं दाखवतात. आणि ही मुलं तर खरंच विलक्षण आहेत! त्यांच्यासोबत राहिल्यानं माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलंय.
प्रश्न - तुला शाळेतल्या प्रत्येक मुलाचं नाव माहीत असतं. मला स्वत:ला कुणाची नावं तशी लक्षात राहत नाहीत. पण सगळ्या मुलांची नावं तुला इतकी सहज मुखोद्गत असण्यातून मला तुमच्यातले घट्ट बंध जाणवले.
- मला याचं वाईट वाटतं की, मी त्यांना रोज शिकवू शकत नाही. त्यामुळे मी त्यांच्याशी वेगवेगळ्या मार्गांनी सतत जोडलेलं राहण्याचा प्रयत्न करत राहते. मुलांशी संवाद कायम राहण्यासाठी धडपडत राहते. मुलांची नावं मला माहीतच आहेत, पण त्यांचे पालकही माहीत आहेत. कारण व्यक्तिगत पातळीवर जोडून घेतल्याशिवाय असं काम होऊ शकत नाही.
प्रश्न - काही नवी योजना? भविष्यात ‘लोक बिरादरी’च्या शाळा कशा असतील असं तुला वाटतं?
- हेमलकशातल्या शाळेला आम्हाला उच्च शिक्षणासाठी तयारी करून देणारं केंद्र बनवायचं आहे. आपली मुलं आटर्समध्ये खूप छान आहेत. ती अतिशय चांगली चित्रं काढतात. त्यांना जाहिरात वगैरे क्षेत्रात खूप संधी आहेत. त्यामुळे आम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएटचं केंद्र सुरू केलं आहे; फाउंडेशन कोर्सही सुरू केला आहे. त्यामुळे मुलांना फाईन आटर्स, जी.डी. आर्ट वगैरेला प्रवेश घेता येईल. असंच आम्ही खेळांबाबतही करतो आहोत. 12वीपर्यंत जर मुलांना चांगलं खेळता आलं, तर या क्षेत्रात त्यांना पुढे जिथं संधी आहेत, तिथं त्यांना थेट प्रवेश मिळण्यासाठीची पूर्वतयारीही करून घेतो आहोत. म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जी पूर्वतयारी लागते, ती सगळी लोक बिरादारीमार्फत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. ती फक्त हेलमकशातल्या शाळेपुरती मर्यादित नसेल, तर आजूबाजूच्या शाळांनाही यात सामील करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वर्षी आम्ही इतर सात शाळांसोबत काम करतो आहोत.
प्रश्न - आमटे कुटुंबीय महाराष्ट्रासाठी दैवत आहेत - बाबा आमटे, प्रकाश आमटे, मंदाताई आमटे, विकास आमटे, भारतीताई आमटे हे एक आकर्षण केंद्र आहे. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. मी स्वत: प्रकाश आमटे, मंदाताई आमटे यांना जेव्हा भेटले, तेव्हा मला खूप छान, प्रसन्न वाटलं होतं. पण आम्ही त्यांना बाहेरून पाहतो. डॉक्टर म्हणून ते किती सेवाभावी आहेत, ते सर्वांनाच माहीत आहे. पण ते कुटुंबीय म्हणून कसे आहेत, याबद्दल मला उत्सुकता आहे.
- तू म्हणालीस तसेच शांत आणि प्रसन्न! वैयक्तिक आयुष्यात ते खूप संवेदनशील आहेत आणि तीच संवेदनशीलता त्यांच्या कामामध्येही दिसते. बाबा (डॉ.प्रकाश आमटे) नेहमी सांगतात की, ते जेव्हा लहान होते, तेव्हा आनंदवनामध्ये साधनाताईच सगळं काम करायच्या. त्यांना मदतीला तसं कुणी नव्हतं. दूध काढणं, स्वयंपाक इथपासून पेशंटचे कपडे धुणं इथपर्यंत सगळं त्यांनाच करावं लागायचं. पाहुणे आल्यावर तर त्यांच्या अतिरक्त पाहुणचाराचा अजून ताण पडायचा. तेव्हा बाबाने लहानपणीच ठरवलं की, ‘मला सगळ्यांमधलं एक होऊन राहता यायला हवं. माझे कुठले नखरे असता कामा नयेत’. मला वाटतं, इतक्या लहान वयात आईचे कष्ट पाहून असं वाटणं आणि ते वाटण्याची बांधीलकी आयुष्यभर पाळून वास्तवात त्याची अंमलबजावणी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आई-बाबा दोघंही खूप साधे आहेत. आजही ते त्यांची सगळी कामं स्वत: करतात.
प्रश्न - त्यांची सून असण्याचा तुझ्यावर ताण येत असेलच. तू ते कशा पद्धतीनं घेतेस?
- नाही येत. कारण ते देत नाहीत आणि मीही घेत नाही. उलट माझ्या त्या दोघांशी खूप छान तारा जुळतात. ते माझेही आई-बाबाच आहेत. ते मला मुलीसारखंच वागवतात आणि मीही ते माझे आई-बाबा असल्यासारखं त्यांच्याशी वागते.
प्रश्न - मला एक कॉमन प्रश्न विचारायचाय. एकीकडे आदिवासींना मागासलेलं समजलं जातं आणि दुसरीकडे ‘आदिवासी लोकांची संस्कृती खूप भारी आहे, त्यांचं आयुष्य खूपच भारी आहे’ असं उदात्तीकरण केलं जातं. त्यांच्यापर्यंत तुम्ही विकास का पोहोचवताय? विकासाने तुम्ही त्यांच्या संस्कृतीला भ्रष्ट करताय, अशीपण एक विचारधारा आहे. थोडक्यात, त्यांचं उदात्तीकरण करून त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करायचं. या दोन टोकांविषयी तुला काय वाटतं?
- आदिवासींबद्दल अनेकदा खूप सरधोपट विधानं केली जातात, असं मला वाटतं. उदा. ‘आदिवासींचं असंच असतं’, ‘त्यांच्याकडे स्त्री-पुरुष-समानता असते’, ‘त्यांचे प्रश्न वा समस्या ते त्यांच्या-त्यांच्यातच मिटवून टाकतात’, ‘त्यांचं सगळं मस्तच असतं’, ‘ते काय, जंगलामध्ये फिरणारे लोक... जंगलाचे राजे.’ इत्यादी इत्यादी. खरं सांगायचं तर आदिवासींचं जीवन इतकं गुंतागुंतीचं आणि क्लिष्ट आहे की, ते काही वाक्यांमध्ये सांगताच येणार नाही; हजारो वर्षांच्या प्रथा-रूढी-परंपरा आहेत. त्यांवर अनेक बाजूंनी वेगवेगळे प्रभाव पडतात. त्यामुळे त्याबद्दल आपण बोलायला नको. पण एवढं नक्की की, त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे. उदा. खूप संचय न करणं, हे मला त्यांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं. आपण मात्र ‘चाळीशी-पन्नाशीनंतरचं आयुष्य’, ‘निवृत्तीनंतरचं आयुष्य’, ‘आपल्या मुलांचं आयुष्य’ अशा अगम्य भविष्यात अडकत राहतो. त्याबद्दलच्या योजना आखत बसतो. आदिवासी असं करत नाहीत.
दुसरं असं की, ते माणसांमध्ये गुंतवणूक करणं जास्त पसंत करतात - ‘आज मी तुला मदत करतोय, पण जेव्हा मला गरज असेल, तेव्हा तू मला मदत करायची’ हा त्यांचा दृष्टीकोन खूप लहानसहान गोष्टींमध्येही दिसतो. तो मला खूप आवडतो. त्यातून नैसर्गिकरित्या एक प्रकारे समाजस्वास्थ्यही तयार होतं, असं मला वाटतं. त्यामुळे सगळेच एकमेकांशी चांगले वागतात.
तिसरं असं की, आदिवासी हे फार निरुपद्रवी लोक आहेत. कारण नसताना, त्यांना कधी आक्रमक होताना किंवा खूनखराबा करताना मी तरी पाहिलेलं नाही. ते कुणाच्या अध्यात मध्यात नसतात.
प्रश्न - या तुझ्या शाळेत महाराष्ट्रातले बरेच तरुण-तरुणी येऊन आपापल्या परीनं काहीबाही करण्याचा प्रयत्न करतात.
- हो, तरुण मुलंही आजकाल खूप छान काम करतात. काही तरी करण्याची प्रेरणा त्यांच्यात सतत तेवत असते आणि ती त्यांना गप्प बसू देत नाही. ती हेमलकशाच्या शाळेतही येतात आणि दोन्ही साधना विद्यालयामध्ये येतात. त्यांना जितका वेळ जमेल तितका वेळ ती मुलांसाठी देतात.
प्रश्न - म्हणजे कुणाला यायचं असेल, तर ते कधीही येऊ शकतात?
- अगदी, अगदी ऑलवेज वेलकम!
प्रश्न - तुझ्या या शाळेला भेट द्यायची असेल, तर त्याची माहिती कुठे मिळेल?
- www.lokbiradariprakalp.org या आमच्या वेबसाईटवर सगळी माहिती उपलब्ध आहे. उदा. येण्याचा मार्ग, महत्त्वाचे फोन नंबर इत्यादी. येणाऱ्यांचं आम्ही कायमच स्वागत करतो!
(शब्दांकन : राम जगताप)
संवादक : डॉ.ऐश्वर्या रेवडकर
(या मुलाखतीचा ऑडिओ kartavyasadhana.in वर ऐकता येईल)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या