आमची इच्छा ही होती की या माहितीपटाकडं प्रधानसरांचा गौरवग्रंथ म्हणून पाहिलं जाऊ नये, तो एक वैचारिक ऐवज म्हणून जपला जावा. आम्ही चार-पाच ठिकाणी हा माहितीपट दाखवला. ज्यांना सामान्य म्हटलं जातं अशा लोकांना ते विचार फारच भावले, प्रेरणा देणारे वाटले; उत्कटता आणि विचार या दोन्ही पातळ्यांवर. उजव्या विचारांच्या काही मित्रांनी सांगितलं की, आम्हांला पहिल्यांदा ‘समाजवाद’ या विषयावर कुणी काही आपुलकीनं सांगितलं आणि हा विचार काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता वाटते आहे.
2007 च्या सुरुवातीला आम्ही ‘अवकाश निर्मिती’ या माहितीपट बनवणाऱ्या आमच्या संस्थेतर्फे प्रधानसरांची एक मुलाखत घेण्याची तयारी करीत होतो. प्रामुख्याने दोन कारणांमुळे हे करण्याची गरज वाटत होती. एक तर प्रधान सरांना या ना त्या प्रकारे मी लहानपणापासून बघत आल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव माझ्यावर होता. या दुर्मिळ माणसाला कॅमेऱ्यात पकडून ठेवणं आणि त्याच्याबाबतचं काही दस्तावेजीकरण करणं हा एक हेतू होता, पण त्याहीपेक्षा समाजवादासंदर्भातल्या काही गोष्टी जाणून घेणं निकडीचं वाटत होतं. आजच्या भांडवलशाही अवकाशात जगत असताना, समाजवादाची पीछेहाट होत आहे असं सतत ऐकत असताना समतावादी विचारांची जवळीक असलेल्या तरुणांची जी उलघाल होते त्यालाही या मुलाखतीद्वारे वाट फोडण्याची इच्छा होती. शरीर, मन, जीवन, भावना सगळंच अर्थकारणानं व्यापून टाकलंय अशा आजच्या काळात समाजवादी आचरण म्हणजे काय, नोकरदारव्यावसायिक यांनी समाजवादी पद्धतीनं जगायचं म्हणजे काय करायचं, समाजवादी विचारांना धरून असलेल्या सामाजिक व्यवस्था कोणत्या असे आजच्या समाजवादी विचाराच्या एकंदर औचित्याबाबतचे मुद्दे डोळ्यासमोर होते.
भविष्यात या व्यवस्था कोण, कशा प्रत्यक्षात आणणार, असाही भावुक मुद्दा समोर होता. या मुद्द्यांची एकदाची तड लागली पाहिजे आणि ‘निर्णायक’ काही हाती पडलं पाहिजे अशी काहीशी तातडीसुद्धा मनाशी होती. हे सगळं सरांपर्यंत पोचवून त्यांची औपचारिक परवानगी घेण्यासाठी कोल्हापूरहून सुरेशकाका (सुरेश शिपूरकर) आले. सरांशी प्राथमिक बोलणं झालं, होकार मिळाला. माझ्या थोरल्या दिग्दर्शक मित्रानं- (अतुल पेठेनं) नेहमीप्रमाणं त्याचा कॅमेरा व तो स्वत: शूटिंगसाठी उपलब्ध असल्याचं आपणहून जोरकसपणे सांगितलं. अतुलचं कोणतंही काम नेहमीच ‘ड्यूटी अँड बियाँड’ असं असतं. त्यामुळं प्रधान सरांना कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याबाबत मी निर्धास्त झालो. शिल्पा बल्लाळनं दिग्दर्शन व संकलन सहयोगाची जबाबदारी घेतली होती. निर्मितिविषयक अनेक महत्त्वाची कामं करायला अमितराज देशमुख आणि राधिका मूर्ती होते. संगीत श्रीरंग उमराणी यांचं होतं. पुढं कव्हर डिझाईन करताना गणेश विसपुते, अंजली चिपलकट्टी आणि निवेदन करण्यासाठी श्रुती तांबे यांची मदत होतीच. माझी आई शोभना शिपूरकर हिनं दिलेल्या आर्थिक मदतीमुळंच हे काम करणं शक्य झालं, हेही इथं नमूद करणं आवश्यक आहे.
सरांनी आग्रह धरला होता त्या तारखेला म्हणजे 25 ऑगस्ट 2007 रोजी दुपारी एक वाजता मुलाखत सुरू झाली, ती थेट अंधार पडेपर्यंत चालली. सुरुवात करण्याआधी सरांना हातातले प्रश्न दाखवले. त्यांनी ते वाचून परत केले. आता काही प्रश्नोत्तरं, सवालजबाब होतील अशी माझी कल्पना होती, पण थोड्याच वेळात लक्षात आलं की आपली गाठ हाडाच्या प्राध्यापकाशी पडलीय आणि किमान तासभर तरी आपल्याला समोर लक्ष ठेवून फक्त समजावून घेण्याचं काम करावं लागणार आहे. एरवी, मुलाखत घेताना खूप सावध रहावं लागतं. वाक्यं पूर्ण होतायत की नाही, एडिटिंगला कट मिळेल की नाही हे पाहावं लागतं. विनंती करून काही भाग स्पष्टतेसाठी पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो. पण इथं तसे काही प्रश्न नव्हते. एखादं रीळ उलगडत जावं तसे मुद्दे समोर येत होते. नंतर एका टप्प्यावर आम्ही थोडा वेळ थांबलो. रेकॉर्डिंग कसं झालंय हे पाहण्यासाठी थोडं ऐकून पाहिलं आणि एक मोठा घोटाळा लक्षात आला. आत्तापर्यंत केलेल्या पूर्ण रेकॉर्डिंगमध्ये खरखर आली होती. आम्ही बुचकळ्यात पडलो. कारण आधी ऑडिओ टेस्ट केली होती. नंतर लक्षात आलं की मुलाखत सुरू करताना सरांनी त्यांचं कर्णयंत्र लावलं, त्यामुळं खरखरीला सुरुवात झाली होती. प्रश्न मोठाच होता. कारण एडिटिंगमध्ये ही खरखर काढता येणार नव्हती. चाचरत घाबरत सरांना ‘तांत्रिक अडचण’ सांगितली. ‘थोडं रेकॉर्डिंग पुन्हा करू या का असं विचारलं. पण सरांनी ‘हात्तिच्या, एवढंच होय, परत सगळं घेऊ की’ असं म्हणत पुन्हा मुद्दे त्याच तळमळीनं मांडले. थक्क व्हायची वेळ नंतर आली- जेव्हा आधीचे सर्व मुद्दे त्याच क्रमानं, त्याच वजनानं पुन्हा येत गेले. मधे चहासाठी दोनदा थांबणं, प्रकाश कमी झाला म्हणून खोलीतून गच्चीत जाणं असे बदल होऊनही सरांच्या बोलण्यावर त्याचा परिणाम झाला नव्हता.
ग्राफिक मेमरी असल्यासारखे सर बोलत होते. इतर प्रश्नोत्तरं झाली. पूर्ण अंधार झाला. आणखी एका चहानंतर आम्ही पॅकअप केलं. अतुल कॅमेरा आत ठेवत होता. सर अनौपचारिकपणे आमच्याशी बोलत होते. पुन्हा त्यानं चपळाईनं कॅमेरा काढून सुरू केला नसता तर एक ऐतिहासिक क्षण कायमचा हुकला असता. ‘‘उद्या माझा वाढदिवस. आज वानप्रस्थ संपवून मी उद्यापासून संन्यस्त जीवन सुरू करतोय. म्हणून शेवटच्या दिवशी तुमच्यासाठी इतकं काम केलं, बस्स.’’ सरांची मुलाखत चांगलीच सविस्तर झाली होती. वैयक्तिक वाटचालीपासून, सहजीवनापासून, सामाजिक, राजकीय कारकीर्दीपर्यंत अनेक मुद्दे बोलून झाले होते. एडिटिंगला सुरुवात कुठून कशी करावी यासाठी, पुन्हा पुन्हा ती आम्ही बघत होतो. काही गोष्टी फारच चांगल्या आल्या होत्या, तर काही प्रश्न तसेच राहिले होते. एके दिवशी रझिया पटेल आणि श्रीकांत सावंगीकर यांच्याबरोबर संपूर्ण मुलाखत पुन्हा पाहिली. त्यांनी तिच्या अर्थपूर्णतेबाबत आणि चळवळीतल्या नव्या लोकांना ही मुलाखत दिशादर्शक असण्याबाबत दुजोरा दिला. पण मुलाखतीची मांडणी कशी करावी या विचारात बराच काळ गेला. सरांनी स्वत:च्या लहानपणापासून साने गुरुजी रुग्णालयात राहायला येईपर्यंत कशी वाटचाल केली याबातचा एक भाग वेगळा करता येईल असं दिसत होतं. आणि चळवळींसंदर्भात त्यांनी केलेलं चिंतन हासुद्धा वेगळा भाग व्हावा असं वाटलं. दोन्ही गोष्टी एकत्र आल्या असत्या तर लांबी खूपच झाली असती आणि महत्त्वाचे मुद्दे हरवूनही गेले असते. त्यामुळं चरित्रात्मक आणि वैचारिक भाग वेगवेगळे करावे असं ठरलं.
चरित्रात्मक भाग हळूहळू एका उत्कट भावनिक उंचीपर्यंत पोचतो, त्यामुळं तिथं मुद्दाम बाहेरून काही इतर बोलण्याची गरज नव्हती. सरांचं बोलणं इतकं साधं, सरळ, लयबद्ध, प्रामाणिक, आव न आणणारं होतं की तिथं बाहेरून काही निवेदन वगैरे वापरलं तर ते उग्र आणि खोटं वाटण्याचीच जास्त शक्यता होती. त्यामुळं सरांच्या बोलण्यातून चरित्र उलगडत जावं असं एडिटिंग केलं. वैचारिक भागात मात्र थोडे जास्त प्रश्न होते. काही मुद्द्यांना समाधानकारक उत्तरं मिळाली नव्हती. नव्या आर्थिक बदलांना तोंड देणारी व्यवस्था किंवा नव्या तंत्रज्ञानाविषयीची भूमिका याबाबत आपण बोलायला असमर्थ आहोत असं सरांनी मोकळेपणानं सांगून टाकलं. सरांच्या मुलाखतीचा हा भाग एडिट झाल्यानंतर इतर काही मुद्दे जोडण्याचा- प्रयत्न केला, प्रयत्न कुठंकुठं चालू आहेत वगैरे... पण सरांचं एकंदर बोलणं आणि हे आमचं जोडकाम यांचा काही मेळ बसेना. मुळात काही प्रश्नांची ‘तड’ लागली पाहिजे असं वाटणं, हा आमच्याच भावुकतेचा भाग जास्त होता असं लक्षात आलं. समाजवादाच्या एकंदर मांडणीविषयी आणि भविष्याविषयी काही चर्चा व्हावी याचं हे व्यासपीठ नव्हे हेही लक्षात आलं.
सगळे प्रश्न आत्ताच सुटले पाहिजेत ही घाई एकदा नष्ट झाल्यानंतर मुळात जे हातात आलंय तेच पुन्हा नीट दिसायला लागलं. सरांनी जी सलग मांडणी केली होती त्यातून खूपच महत्त्वाचे मुद्दे समोर येत होते. समाजवादी विचारावर विश्वास असूनही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कठोर चिकित्सा केली होती. चळवळीला ताकद यावी यासाठी सरांनी चळवळीतल्या अनेक उणीवा दाखवून उपाय सुचविले होते. शेवटी असं ठरलं की सरांचे विचार हाच मुद्दा महत्त्वाचा ठेवायचा आणि कोणतीही इतर टिप्पणी करायची नाही. दोन मुद्दे जिथं जोडून घ्यावे लागतील तिथंसुद्धा सरांच्या पुस्तकांचाच वापर करायचा. या सगळ्या प्रक्रियेतून ‘प्रधान विचार, प्रधान चरित्र’ हा आकृतिबंध तयार झाला. आमची इच्छा ही होती की या माहितीपटाकडं प्रधानसरांचा गौरवग्रंथ म्हणून पाहिलं जाऊ नये, तो एक वैचारिक ऐवज म्हणून जपला जावा. आम्ही चार-पाच ठिकाणी हा माहितीपट दाखवला. ज्यांना सामान्य म्हटलं जातं अशा लोकांना ते विचार फारच भावले, प्रेरणा देणारे वाटले; उत्कटता आणि विचार या दोन्ही पातळ्यांवर. उजव्या विचारांच्या काही मित्रांनी सांगितलं की, आम्हांला पहिल्यांदा ‘समाजवाद’ या विषयावर कुणी काही आपुलकीनं सांगितलं आणि हा विचार काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता वाटते आहे. ज्याला मध्यमवर्ग म्हणून हिणवलं जातं अशा वर्गातल्या अनेक तरुण मित्रांनी आपण विचारात पडल्याचं नमूद केलं. निस्संशय अस्सल काही बघायला मिळाल्याचं अनेकांनी आवर्जून सांगितलं. तात्त्विकतेच्या पलीकडं उरून राहणारं सरांचं निखळ माणूसपणही अनेकांपर्यंत पोचलं. सामान्य कार्यकर्त्याच्या जडणघडणीसाठी, पहिल्या टप्प्यावरच दृष्टी विशाल होण्यासाठी याचा वापर केला जावा, असंही अनेकांनी सांगितलं.
अनेक मित्र, ज्येष्ठ लोक स्वत:हून हा माहितीपट गावोगावच्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करताहेत. वैचारिक मतभेद असलेले लोकही नव्यानं प्रधान सरांच्या प्रेात पडताहेत. कारण सरांनी केवळ एक स्वत:चा अजेंडा पुरा करायचा आहे म्हणून समाजवादाचा मुद्दा न रेटता मानवी समता, मानवी प्रतिष्ठा हा मूळ गाभ्याचा विषयच लोकांसमोर मांडला. प्रश्न हा उरतो की खुद्द समाजवादी चळवळ या साऱ्याचा वापर करून घेते की नाही? शहरांमधल्या लोकांना वैचारिक अजीर्ण झालं असलं तरी गावोगावच्या तरुण मुलांना यातले अनेक विचार नवे आणि हवेहवेसे वाटतात हे आपल्याला ठाऊक आहेच. बऱ्याच गोष्टींचा आपल्या मनावर अदृश्य पण कायमचा परिणाम कोरला गेलेला असतो. प्रधान सरांच्या अस्तित्वामुळं आणि सहवासामुळं माझ्याही मनात काही गोष्टी पक्क्या ठसल्या आहेत. त्या इतर कुणी विचारवंताने सरांच्या आधी सांगून ठेवल्या आहेत की नाही, हे मला फारसं महत्त्वाचं वाटत नाही.
1. सामाजिक अभिसरण ही अतिशय संथ प्रक्रिया आहे. कोणतंही काम एका पिढीनं दुसऱ्या पिढीकडं विश्वासानं सोपवलं तरच ते पूर्णत्वाकडं जातं. मधल्या काळात प्रत्येक माणसानं इतिहासात आपलं नाव कोरलं जाण्याचा अट्टाहास करणं व्यर्थ आहे.
2. स्थानिकांचे अधिकार काढून घेत जाणाऱ्या आजच्या Welfare capitalismच्या व्यवस्थेचं स्वरूप आपल्याला समजावून घ्यावं लागणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळं समाजाचे तुकडेतुकडे होत आहेत, हे विधान पुन्हा पुन्हा आठवत रहावं लागेल. आजच्या गोंधळाची अवस्था वाढत वाढत पुढं आपल्याला अराजकाला तोंड द्यावं लागेल आणि त्या वेळी पुन्हा मानवी समता आणि प्रतिष्ठा या मुद्द्यांवरच विचार करावा लागेल.
3. काम करताना चळवळी आणि रचनात्मक काम यांचा मिलाफ होणं आवश्यक आहे.
4. एखाद्यानं आपली स्वत:ची वैयक्तिक वैचारिक प्रगतीसुद्धा किती करून घ्यावी याचं भान ठेवलं पाहिजे. समकालीन समाजाला आपल्या ज्ञानाचा लाभ झाला पाहिजे, हा आग्रह स्वत:कडून धरला गेला पाहिजे. इतरांना अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी सरांच्या बोलण्यामधून मिळत राहतील याची मला खात्री आहे.
Tags: अतुल पेठे समीर शिपूरकर ग . प्र. प्रधान प्रधान विचार प्रधान चरित्र. माहितीपट डॉक्युमेंटरी pradhan vichar pradhan charitra documentary atul pethe samir shipurkar g. p. pradhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या