डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आनंदीबाई, रमाबाई ते कमलाबाई (हॅरिस)

स्त्रीशिक्षणाची लाट आणि स्त्रीमुक्तीची चळवळ याच्याच एक प्रतिनिधी होत्या श्यामला गोपालन. सावित्रीबाई फुल्यांपासून पंडिता रमाबाईंपर्यंत चाललेल्या या अविरत चळवळीनंतरही श्यामलांना 1958 मध्ये अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जाताना निकटवर्तीयांचा व समाजाचा रोष पत्करावा लागलाच. परंतु आज अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेली त्यांची कन्या कमलाबाई हे याच चळवळीचे संचित आहे. कमलाबाई हॅरिस ही आज सर्वार्थाने अमेरिकन नागरिक आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन बायडन व त्यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाची सभासद आहे. तेव्हा भारताविषयीचे अमेरिकेचे आर्थिक धोरण त्यांच्या राजकीय धोरणावर अवलंबून असेल. परंतु सामाजिक संदर्भातून अमेरिका व भारताचे हे नवे नाते खात्रीने ऐतिहासिक महत्त्वाचे आहे, हे आपणही नाकाराल असे वाटत नाही. एका अर्थाने पंडिता रमाबाईंनी अमेरिकेकडून घेतलेल्या कर्जाची थोडीबहुत परतफेड आपण कमलाबाई हॅरिसच्या रूपे केली आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरेल काय?

नोव्हेंबरमध्ये झालेली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष पदांची निवडणूक ही आणखीन एक ऐतिहासिक निवडणूक होती, बारा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतरची. पहिल्यांदाच 2008 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर पहिला-वहिला आफ्रिकन वंशाचा कृष्णवर्णीय विराजमान झाला होता- बराक हुसेन ओबामा. आता अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला उप-राष्ट्राध्यक्ष झालेली आहे, तीही भारतीय व आफ्रिकन वंशाची- कमलाबाई हॅरिस. 

लोकशाही म्हटले की हे होणारच, त्यात ऐतिहासिक वगैरे ते काय, असा प्रश्न कोणीही विचारेल. आपल्या भारतात तर या गोष्टी सर्रास होत असतात; मग अमेरिकेने असा काय इतिहास निर्माण केला? अर्थात जगाच्या दृष्टीने नव्हे, परंतु अमेरिकेच्या दृष्टीने खात्रीने. शिवाय जगातील सर्वांत बलाढ्य देश (सुपरपॉवर) व सर्वांत जुनी लोकशाही व्यवस्था असल्याने या घटनेला जागतिक परिमाणही आहेच. तसेच भारतीय व आफ्रिकन वंशाची महिला उप-राष्ट्राध्यक्ष होणे यालाही एक रोमांचकारी इतिहास आहे.

या भूतलावर लोकशाहीवादी व्यवस्था सर्वप्रथम अस्तित्वात आली ती अमेरिकेत, असे मानतात. अठराव्या शतकात (यावर थोडाबहुत वाद असला तरीसुद्धा). अमेरिकेचे संविधान 1788 मध्ये अस्तित्वात आले. त्यातील प्रास्ताविकेची (प्रिएम्बल) पहिलीच ओळ आहे, वुई द पीपल. म्हणजे आम्ही लोक. आपल्या भारत देशाच्या संविधानानेही हीच ओळ घेतलेली आहे, परंतु दोन्हींमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. कोण होते हे लोक, ज्यांना अमेरिकन लोकशाहीत नागरिक म्हणून मतदानाचे आणि राज्यकारभाराचे अधिकार होते? केवळ श्वेतवर्णीय पुरुष! म्हणजेच श्वेतवर्णीय सोडून इतर कोणताही माणूस आणि त्याचबरोबर श्वेतवर्णीय महिलेलासुद्धा मतदानाचा अधिकार नव्हता, निवडणूक लढवण्याची वगैरे बातच सोडा. श्वेतवर्णीय सोडून इतर लोकांमध्ये नागरिक बनण्याची लायकीच नाही आणि श्वेतवर्णीय महिलांमध्येसुद्धा नागरिक बनण्याची क्षमता नाही, या धारणेवर अमेरिकन लोकशाहीची स्थापना झाली होती. 

त्या काळात श्वेतवर्णीय सोडून अमेरिकेत दुसरी जमात बहुसंख्येने होती ती कृष्णवर्णीय (ब्लॅक) आफ्रिकन गुलामांची. अमेरिकन लोकशाही त्यांना नागरिक म्हणून सोडाच, परंतु माणूस म्हणूनसुद्धा मानत नव्हती. ती होती केवळ मानवरूपी यंत्रे. श्वास बंद होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस चाल(व)णारी. या आफ्रिकन गुलामांची अमेरिकेचे नागरिक म्हणून आपला जन्मसिद्ध हक्क प्राप्त करणारी चळवळ हा खरे तर स्वतःला श्वेतवर्णीय म्हणविणाऱ्या अमानवी वृत्तीचा काळाकुट्ट इतिहास आहे. युरोप, आफ्रिका ते भारतापर्यंत सर्वत्र फोफावलेल्या शोषणविरोधी चळवळींनी याच अमेरिकेतील चळवळीतून प्रेरणा घेतलेली आहे. तरीही आजसुद्धा प्रागतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या  अमेरिकेत श्वेतवर्णीयांची ही उच्चवर्णीय हीन वृत्ती डोनाल्ड ट्रम्पसारख्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून देत आहे आणि त्यानंतर जॉर्ज फ्लॉयडसारख्या  कृष्णवर्णीयांना भर दिवसा रस्त्यात मान मुरगाळून ठार मारते आहे. त्यात गैर ते काय- इतक्या सहज वृत्तीने!

ब्लॅक गुलाम आणि निवासी इंडियन्स

याच चळवळीमुळे अमेरिकेन श्वेतवर्णीयांच्या काँग्रेसला 1865 मध्ये संविधानात तेरावी दुरुस्ती करून गुलामगिरी बेकायदा ठरवावी लागली आणि 1868 मध्ये चौदाव्या दुरुस्तीतून कृष्णवर्णीयांंना नागरिकत्वाचा अधिकार द्यावा लागला. तरीही मतदानापासून त्यांना दूर ठेवण्याचे प्रकार चालूच राहिले. शेवटी दोन वर्षांत पंधरावी दुरुस्ती आणून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. परंतु परत फक्त कागदोपत्री. त्यावर ‘उपाय’ म्हणून मतदारास भरमसाट पोल टॅक्स भरण्याची व साक्षरता चाचणी करण्याची सक्ती करून कृष्णवर्णीयांना मतदानापासून दूर ठेवण्याचे प्रकार चालूच राहिले. काही राज्यांनी तर ‘आजोबा कलम’ लावले. म्हणजे ज्याच्या आजोबांनी मतदान केलेय, त्यालाच मतदानाचा अधिकार असेल. त्यामुळे या आफ्रिकन अमेरिकन नागरिकांची भावी पिढीसुद्धा मतदान करू शकणार नाही, अशी धूर्त व्यवस्था करण्यात आली. आजचा नागरिक उद्या आजोबा झाला तरी त्यांनीच मतदान केले नाही, तर तिसऱ्या पिढीतली नातवंडे कशी मतदान करणार? शेवटी 1915 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे कलमच रद्दबातल ठरविले. तरीसुद्धा भरमसाट पोल टॅक्सची सक्ती रद्द करण्यासाठी मार्टिन ल्यूथर किंगच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन उभारावे लागले. तेव्हा 1964 मध्ये संविधानात चोविसावी दुरुस्ती करून पोल टॅक्स कायमचा रद्द करण्यात आला. 

बराक ओबामा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणे, ही ऐतिहासिक घटना शंभर वर्षे चाललेल्या या अविरत चळवळीचा परिपाक होता. त्यानंतर उप-राष्ट्राध्यक्ष बनलेली भारतीय व आफ्रिकन वंशाची कमलाबाई हॅरिस ही दुसरी ब्लॅक अमेरिकन. ओबामांचा विजय हा अलौकिकच होता आणि म्हणूनच तो आपण सर्वांनीच जगभर उत्सफूर्तपणे साजराही केला; परंतु कमला हॅरिसच्या विजयाचा आनंद दुप्पटच नव्हे, तर तिप्पट आहे- आफ्रिकन म्हणून, भारतीय म्हणून आणि महिला म्हणून. एक त्रिवेणी संगम.

कारण अमेरिका हा मुळात आज सत्तेवर असलेल्या कुणाचाच देश नव्हे. सर्वच जण परदेशी. अ कण्ट्री ऑफ इमिग्रण्ट्‌स. पाश्चात्त्य देशांसाठी ही अमेरिका शोधून काढली ख्रिस्तोफर कोलंबसने 1492 मध्ये. स्पेनमधून तो निघाला होता भारत शोधायला आणि तिथले सोने, मोती व मसाले लुटून आणायला, परंतु पोचला अमेरिकेतील एका बेटावर. त्याला वाटले, हेच इंडियन्स आहेत. तेव्हापासून आजतागायत त्यांना अमेरिकन इंडियन्स म्हणूनच ओळखतात. निवासी इंडियन्सही म्हणतात. अन्यथा रॅड इंडियन्स म्हणून हिणवतात. 

अमेरिकन नागरिकाला वर्णाचा निकष लावून मतदानाचा हक्क नाकारता येणार नाही, अशी पंधरावी दुरुस्ती संविधानात करण्यात आली तरी श्वेतवर्णीयांप्रमाणेच निवासी इंडियन्सनाही मतदानाचा हक्क नाकारण्यासाठी पोल टॅक्स वा साक्षरता चाचणीसारख्या नियमांचा गैरवापर चालूच राहिला. एका बाजूने ही लढाई रस्त्यावर व न्यायालयात चालू असताना त्यांच्याच देशातून निवासी अमेरिकनांना हाकलून लावण्यासाठी 1930 मध्ये अमेरिकन सरकारने इंडियन रिमूव्हल ॲक्ट आणला. या कायद्याविरुद्ध न्यायालयाची लढाई जिंकल्यावरसुद्धा श्वेतवर्णीय अमेरिकनांनी केलेल्या त्यांच्या कत्तलींना सामोरे जात त्यांना स्थलांतरित व्हावे लागले. शेवटी कायदेशीर लढाया जिंकत निवासी इंडियन्सना मतदानाचा हक्क पूर्णपणे प्राप्त व्हायला वर्ष 1982 उजाडावे लागले. 

ज्यांना आपल्याच भूमीत मतदानाचासुद्धा हक्क नाकारून हाकलून लावले गेले होते, ते होते ‘अमेरिकन इंडियन्स’. आज त्याच अमेरिकेची एक ‘इंडियन अमेरिकन’ उप-राष्ट्राध्यक्ष झालेली आहे. (मात्र ते निवासी अमेरिकन इंडियन्स आणि कमला हॅरिससारखे अमेरिकेत स्थायिक झालेले इंडियन अमेरिकन्स यांचे काहीही नाते नाही.)

शंभर वर्षांनी बनली मतदार महिला उप-राष्ट्राध्यक्ष

परंतु कमलाबाई हॅरिसच्या उप-राष्ट्राध्यक्षपदाला मात्र परत शंभर वर्षांचा इतिहास आहे. कारण अमेरिकन महिलांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला 1920 मध्ये. बरोब्बर शंभर वर्षांनी 2020 मध्ये एक महिला उप-राष्ट्राध्यक्ष बनली. हा इतिहासही दोन शतकांचा आहे आणि तेवढाच रोमांचकही आहे. लंडनमध्ये गुलामगिरीच्या विरोधात 1840 मध्ये अधिवेशन भरले होते. त्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या लुसेरिता मोट आणि एलिझाबेथ कॅडी या दोन्ही महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. गुलामांच्या मुक्तीसाठी जागतिक अधिवेशन होते, परंतु महिलांना गुलामांचेसुद्धा स्थान नव्हते. या अपमानित घटनेतूनच अमेरिकेत महिलांच्या हक्कांची चळवळ या दोन्ही महिलांनी सुरू केली. सन 1848 मध्ये आयोजित केलेल्या पहिल्याच महिला मुक्तिअधिवेशनात महिलांना मतदानाच्या अधिकाराची मागणी करण्यात आली.  

त्यानंतर ही चळवळ संपूर्ण देशभर फोफावली. परंतु त्याचा काडीमात्र परिणाम अमेरिकन श्वेतवर्णीय पुरुषांवर झाला नाही. गुलामगिरी 1865 मध्ये बेकायदा ठरविण्यात आल्यानंतर गुलाम महिला ‘माणूस’ बनल्या खऱ्या, परंतु नागरिकत्वाचा अधिकार नसलेल्या श्वेतवर्णीय महिलांच्याच रांगेत जाऊन बसल्या. अमेरिकन संविधानात 1868 आणि 1870 मध्ये चौदावी व पंधरावी दुरुस्ती करण्यात आली. पण दोन्ही दुरुस्त्यांमध्ये एका शब्दाचा उल्लेख आवर्जून केला गेला- पुरुष. अमेरिकेत स्थायिक झालेल्या कोणत्याही पुरुषाला वर्णाचा निकष लावून अमेरिकन नागरिक बनण्याचा व मतदानाचा हक्क नाकारण्यात येणार नाही. म्हणजेच, महिलांना हे दोन्ही हक्क नाहीत, हे कायदेशीररीत्या अधोरेखित केले गेले. 

अर्थातच, महिला अधिकारांची चळवळ आणखीनच प्रखर बनली. व्योमिंग, उटाह, इदाहो, कोलोराडो आणि वॉशिंग्टनमध्ये महिलांना मतदानाचा हक्क 1890 पर्यंत प्राप्त झालाही. काही छोट्या राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातही या मागणीचा समावेश झाला. परंतु प्रत्यक्षात लिंगाचा निकष लावून नागरिकत्व वा मतदानाचा हक्क नाकारता येणार नाही, ही एकोणिसावी दुरुस्ती होण्यास वर्ष 1920 उजाडावे लागले. जॉर्जियामधून अमेरिकन सिनेटवर 1922 मध्ये निवडून आलेली रेबेका फॅल्टॉन ही पहिली महिला ठरली. त्यानंतर सिनेट व काँग्रेसमध्ये महिलांचा सहभाग वाढतच गेला आणि निवडून आलेल्या महिलांनी कित्येक चळवळीतून जगात नवे पायंडेही पाडले. खास करून नागरी हक्कांची चळवळ, व्हिएतनाम युद्धविरोधी आंदोलन, महिला मुक्ती चळवळ आणि सेक्शुअल रिव्होल्यूशन. याच सर्व चळवळींतून पुढे आलेली कमलाबाई हॅरिस आज शंभर वर्षांनी अमेेरिकेची पहिली महिला उप-राष्ट्राध्यक्ष बनलेली आहे. आता पहिली महिला राष्ट्राध्यक्ष कधी बनवायची, तेवढेच काय ते अमेरिकन मतदारांनी ठरवायचे बाकी राहिले आहे.

कमला हॅरिसची तमिळी प्रेरणा 

होय, कमलाबाई हॅरिस ही नुसती राजकारणातून वा राजकीय वारसाहक्कातून या पदावर पोचलेली स्त्री नाही. तीही चळवळीतूनच पुढे आलेली आहे. त्यासाठी तिचे प्रेरणास्थान आहे तमिळनाडूच्या चेन्नई शहरात स्थायिक झालेले तिचे आजोबा पी.व्ही.गोपालन. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले प्रागतिक विचारांचे पुरस्कर्ते. लोकशाहीविषयीचे आणि स्त्रीमुक्तीविषयीचे त्यांचे प्रागतिक विचार ही आपली प्रेरणा आहे, हे कमलाहाई हॅरिस मोठ्या अभिमानाने सांगते. कमला ही केवळ अमेरिकेच्या मुक्त वातावरणातून पुढे आलेली मुलगी नाही. भारतातील कर्मठ परंपरांविरुद्ध बंड केलेली तिची आई डॉ.श्यामला गोपालन आणि ब्रिटिश राजवटीखालील जमैकातून अमेरिकेत आलेले व अर्थशास्त्रज्ञ असलेले तिचे वडील प्रा.डोनाल्ड हॅरिस यांच्या बंडखोर पार्श्वभूमीचा वारसा घेऊन ती राजकारणात चमकली आहे. 

सन 1958 चा काळ. तमिळी ब्राह्मण कुटुंबातील मुली शिकत, परंतु त्यांची लग्नं बहुतांश ठरवून व्हायची. अविवाहित मुलीनं परदेशात जाऊन शिकणं, हा तर तेव्हाही सामाजिक व्यभिचार होता. लग्न झाल्यानंतर सुशिक्षित मुलींच्या वाट्यालासुद्धा मूल आणि चूलच होती. परंतु ब्रिटिशांच्या आमदानीत प्रशासकीय अधिकारी म्हणून झांबियामध्येही नोकरी करून आलेले पी.व्ही.गोपालन यांची विचारसरणी वेगळी होती. त्यामुळेच दिल्लीच्या लेडी इरविन कॉलेजमधून होम सायन्सची पदवी प्राप्त केलेल्या 19 वर्षांच्या श्यामलाने जेव्हा बर्कले शहराच्या एका विश्वविद्यालयात पीएच.डी. करण्यासाठी परस्पर प्रवेश मिळविला, तेव्हा तिच्या आई-वडिलांनी नातेवाइकांचा रोष पत्करून तिला  अमेरिकेला पाठवलं. तिथं तिनं पीएच.डी. तर केलीच, शिवाय प्रेजेस्टेरोन रिसेप्टरवर केलेल्या संशोधनामुळे स्तनाच्या कॅन्सरवरील उपचारामध्ये आणखीन प्रगती झाली. अमेरिकेत तेव्हा चालू असलेल्या कृष्णवर्णीयांच्या नागरी हक्काच्या चळवळीतही ती सक्रिय झाली. तिथेच ती जमैकातून आलेल्या डोनाल्ड हॅरिसच्या प्रेमात पडली. 1963 मध्ये लग्न झाल्यानंतर त्यांना कमला व माया या मुलीही झाल्या. परंतु त्यांचा संसार सात-आठ वर्षेच टिकला. श्यामलाने शेवटपर्यंत दुसरं लग्न केलं नाही आणि मुलींचे वडिलांशी संबंधही तोडले नाहीत. वयाच्या 70 व्या वर्षी कोलोन कॅन्सरमुळे, मृत्यू पावली.

श्यामलानं ज्या काळात आपला संसार अमेरिकेत थाटला, तो काळ स्त्रीमुक्ती चळवळीचाही होता. अमेरिकन स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला होता, परंतु समान वागणूक मिळत नसे. भारतात आजसुद्धा घराघरांतून जे चित्र दिसते, ते अमेरिकेत होते. त्यातूनच अमेरिकेत कित्येक आंदोलने झाली. त्यांचे पडसाद भारतासहित जगभर उमटले. खास करून महिलांना समान हक्क, गर्भपाताचा हक्क, समलिंगी बायकांचे हक्क- अशी कित्येक आंदोलने. एका बाजूने ब्लॅक म्हणून उपेक्षा आणि दुसऱ्या बाजूने समान हक्कांतील चळवळीतील आईचा सहभाग हे सर्व पहातच कमला मोठी झाली. वकीलही झाली. तिथून राजकारणात पोचली तीसुद्धा या सर्व चळवळींतील कार्यकर्ता म्हणून. स्वतंत्र विचारांसाठी संघर्ष करणारी एक आंदोलक म्हणून.

आनंदीबाई आणि रमाबाईंची वंशज

कर्मठ समाजातील भारतीय महिला आणि अमेरिका यांचं नातं इथून सुरू होत नाही. तिचा पाया घातला होता आनंदीबाई जोशी या 18 वर्षांच्या बालविवाहित मुलीनं 1883 मध्ये. तिचे पती गोपाळ जोशी यांनी सामाजिक परंपरा धुडकावून कशा प्रकारे आनंदीबाईंना एकटीच अमेरिकेला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी पाठवलं आणि खडतर परिस्थितीशी व आजाराशी सामना करीत त्या कशा डॉक्टर झाल्या याचा इतिहास आपण सगळेच जाणतो. त्यावरची ‘आनंदी-गोपाळ’ ही गाजलेली कादंबरी, हल्लीच लोकप्रिय झालेली ‘आनंदी-गोपाळ’ ही टीव्ही सिरियल; एवढेच नव्हे तर कित्येक समाजशास्त्रज्ञांनी तिच्या जीवनकार्यावर संशोधनसुद्धा केलेले आहे. आनंदीबाईची निग्रही चर्या व भेदक डोळे पाहिले तर कोणालाही जाणवेल की, ही बाई केवळ नवऱ्याच्या हट्टासाठी अमेरिकेत जाणे शक्यच नाही. योग्य वेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्यांचं मूल वारलं आणि त्यातूनच परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन परत येणं हा निग्रह दोघांनीही केला होता, हे आता संशोधनातून सिद्ध झालेले आहे. 

त्या वेळी 37 वर्षांचे असलेले गोपाळ जोशी हे जेवढे हट्टी तेवढेच शीघ्रकोपी होते, हे आपणाला ठाऊकच आहे. अभ्यास करायचा सोडून स्वयंपाकघरात सासूंना मदत करताना बघून ते आनंदीबाईंवर कसे संतापले होते तेही आपण वाचले वा सिरियलमध्ये बघितले आहे. परंतु  डॉ.मीरा दामोदर कोसंबी यांनी आपल्या एका संशोधनपर लेखात उद्‌धृत केलेले आनंदीबाईंनी अमेरिकेहून नवऱ्याला लिहिलेले पत्र आनंदीबाई काय चीज होती ते सिद्ध करते. (मूळ संदर्भ- आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे. लेखक- काशीबाई कानिटकर). या पत्रात ती सांगते-

हे पत्र लिहून आपसातील संबंधांमध्ये वितुष्ट आणण्याचा माझा हेतू नाही. तुम्ही मला जी वागणूक दिली ती बरोबर की चूक असे विचारल्यास मी म्हणेन, दोन्हीही. कदाचित आपणा दोघांच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने ते बरोबर असेलही, परंतु सर्वंकष विचार केल्यास आपणाला मान्य करावेच लागेल की, ती वागणूक पूर्णतया चुकीची होती. खास करून माझ्या बालवयावर तिचा काय परिणाम होईल, याचा विचार केल्यास. केवळ दहा वर्षांची असताना लाकडाच्या तुकड्याने मारणे, 12 वर्षांची असताना माझ्यावर खुर्च्या व पुस्तके फेकून मारणे आणि मला सोडूून जाण्याच्या धमक्या देणे वा मलाच घर सोडून जाण्यास वारंवार सांगणे. नवऱ्यांच्या वा सासूंच्या या अशा जाचाला कंटाळूनच कित्येक विवाहित मुलींनी घर सोडले. आपल्या परंपरेनुसार एक स्त्री आपल्या नवऱ्याविरुद्ध ब्र काढू शकत नाही. मी हे सगळे सहन केले. मला वाटते, सगळ्या नवऱ्यांनी आपल्या बायकांकडून ही सहनशक्ती शिकून घ्यावी. (आज मी जी काही आहे, ती केवळ तुमच्यामुळे याबाबत संदेह नाही. त्यासाठी मी तुमची मनःपूर्वक आभारीही आहे. परंतु माझ्या सहनशीलतेमुळेच हे सर्व शक्य झाले, हे कुणीच नाकारू शकत नाही.) हे सर्व सहन करण्यासाठीच कदाचित माझा जन्म झाला असेल. पण आता मी पूर्णपणे शांत आहे.

आनंदीबाईंचे हे वस्तुनिष्ठ विचार आकाशातून पडले नव्हते. एकोणिसाव्या शतकात सुरू झालेल्या सामाजिक चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे विचार पक्के झाले होते. त्या काळात त्यांनी लिहिलेली पत्रे काशीबाई कानिटकरांनी पुस्तकरूपात प्रसिद्ध केलेली आहेत, तीच त्याची ग्वाही देतात. परंतु आनंदीबाई केवळ एकट्याच नव्हत्या. ‘अ हिंदू लेडी’ या टोपणनावाने त्यांच्याच वयाच्या रखमाबाई टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्रातून बालविवाह, पुनर्विवाह, विधवांचे शारीरिक व मानसिक शोषण, स्त्रियांचा छळ आणि खास करून स्त्रीशिक्षणावर सातत्याने लिहीत होत्या. मला तो माणूस आवडत नाही आणि त्याने विवाहावेळी मान्य करूनसुद्धा शिक्षण पूर्ण केलेले नाही, तेव्हा मी त्याच्याकडे नांदायला जाणार नाही- अशी कणखर भूमिका बालविवाह झालेल्या रखमाबाईंनी आपला नवरा दादाजीविषयी घेतली. प्रकरण कोर्टात गेले आणि 1888 मध्ये त्या खटला जिंकल्याही. लगेच दुसऱ्या वर्षी त्याही डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या.

एकोणिसाव्या शतकाचा हा उत्तरार्ध फारच प्रेरणादायक आहे. देशातील मुलींची पहिली शाळा 1848 मध्ये सुरू करणारे महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, महिलांवरील अत्याचाराविरुद्ध रोखठोक भूमिका घेणारे लोकहितवादी, स्त्रियांच्या प्रश्नांवर पुरोगामी भूमिका घेणारा ब्राह्मो समाज, आर्य नारी समाज, वंग महिला समाज, थिऑसॉफिकल सोसायटी, सखी समाज अशा संस्था बंगालपासून महाराष्ट्रापर्यंत स्थापन होत होत्या. खास करून 1880 नंतरच्या काळात ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्री-पुरुष तुलना’ व पंडिता रमाबाईंचे ‘स्त्री धर्म नीती’ या दोन पुस्तकांनी हिंदू समाजात खळबळ माजविली होती. पुरुषजातीचा नैतिकतेतील दांभिकपणा आणि स्त्रियांविषयी असलेला आकस व त्यातून केला जाणारा मानसिक व शारीरिक छळ यांवर ताराबाई तुटून पडल्या होत्या; तर पंडिता रमाबाईंनी स्त्रियांनी स्वावलंबन, आत्मनिर्भरता व शिक्षणावर कसा भर दिला पाहिजे यावर लिहिले होते. शैक्षणिक धोरणासाठी भारतातील ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या हंटर कमिशनसमोरही आपली मते मांडताना पंडिता रमाबाईंनी स्त्रियांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याची का गरज आहे, शाळांतून महिला शिक्षक व इन्स्पेक्टरही नेमण्याची का गरज आहे याची शास्त्रशुद्ध कारणमीमांसा केली होती. 

पंडिता रमाबाई या एक वादळच बनून तेव्हा उभ्या झाल्या होत्या. बालविवाहाची प्रथा धुडकावून लहानपणापासून वडील अनंतशास्त्री डोंगरे यांनी तिला संस्कृतसहित इतर विषयांमध्ये सुविद्य बनवले. 16 वर्षांची असताना आई लक्ष्मीबाई व वडील वारल्यावर भावाला घेऊन ते दोघेही भारतभर प्रवचने देत फिरू लागले. रमाबाईंच्या विद्वत्तेने थक्क होऊन कलकत्ता विद्यापीठ यासारख्या संस्थांनी त्यांना सरस्वती व पंडिता हे किताब देऊन त्यांना गौरविले. गरिबी व दुष्काळाशी सामना करताना त्यांचा भाऊही वारला. त्यानंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून पदवीधर झालेल्या बिपीन बिहारी मेधावी या वकिलाशी विवाह केला. परंतु मनोरमा ही मुलगी होईपर्यंत त्यांचेही निधन झाले. तेव्हा 1882 मध्ये परत पुण्याला येऊन त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी भारतातील पहिल्या स्त्रीमुक्ती संघटनेची- आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि स्त्रीशिक्षणाचा प्रसार सुरू केला. त्यांच्या या चळवळीला अर्थातच कर्मठ हिंदू समाजाकडून प्रखर विरोध झाला. कित्येकदा मानहानी सहन करावी लागली. लोकमान्य टिळकांनीसुद्धा ‘केसरी’तून त्यांच्याविरुद्ध लिहिलेल्या अग्रलेखांची भाषा काय होती, ते मीरा कोसंबीनी आपल्या पुस्तकात या अग्रलेखांचे उतारेच देऊन दाखवून दिलेले आहे. 

परंतु दुसऱ्या बाजूने प्रागतिक चळवळीचे कित्येक रथी-महारथी पंडिता रमाबाईंच्या बाजूने उभे राहिले. खास करून लोकहितावादींपासून गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, रेव्हरंड नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक, मलबारी शेठजी अशा बंडखोर आणि विद्वान असामी. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांची पहिली शाळा 1848 मध्ये सुरू केली होती आणि नंतर 1875 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना. मात्र 1880 पासून तेही स्त्रियांच्या गुलामगिरीविरोधात आवाज उठवायला लागले. ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाईंनी लिहिलेली पुस्तके व रमाबाईंची चळवळ यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता, असे डॉ.मंगला आठलेकरांचे मत आहे. आपल्या पत्नीच्या निधनानंतर विधवेशी पुनर्विवाह करणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्व्यांनी स्त्रीशिक्षणासाठी शाळा सुरू केली तीही पंडिता रमाबाईंच्या प्रेरणेतूनच. 

या देशातील नव्याण्णव टक्के लोक स्त्रीशिक्षणाच्या विरोधात आहेत, अशी ठाम भूमिका मांडणाऱ्या पंडिता रमाबाईंना अर्थातच आपली समाजविघातक मानली जाणारी चळवळ पुढे नेण्यासाठी आर्थिक साह्य मिळत नव्हते. तेव्हा 1883 मध्ये त्या आपल्या मुलीस घेऊन इंग्लंडला गेल्या. तिथे प्रभावित होऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्या इंग्लंडमध्ये पोचल्या, त्याच वेळी आनंदीबाई जोशी अमेरिकेत पोचल्या होत्या. दोघीही नातेवाईक आणि एकमेकांशी पत्रव्यवहार करून संपर्कात होत्या. मार्च 1886 मध्ये आनंदीबाई डॉक्टर झाल्या, तेव्हा त्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी रमाबाई अक्षरशः वादळाशी सामना करीत अमेरिकेस पोचल्या आणि तिथंच त्यांनी भारतातील स्त्रीशिक्षणाची नवी मुहूर्तमेढ रोवली.

भारतातील स्त्रियांची परिस्थिती कथन करणारे पहिले व्याख्यान रमाबाईंनी दिले दि.2 मार्च 1886 रोजी फिलाडेल्फियातील वायएमसीए सभागृहात. त्या कथनाने हादरलेल्या अमेरिकेतील महिला संघटनांनी, विद्यापीठांनी आणि इतर संस्थांनी त्यांच्या व्याख्यानांचा सपाटाच लावला. त्यातूनच अमेरिकेत 13 डिसेंबर 1887 रोजी ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना झाली. नंतर असोसिएशनच्या शाखाही ठिकठिकाणी स्थापन झाल्या. त्यातून तब्बल दहा वर्षे स्त्रीमुक्ती चळवळ व महिलांच्या शाळा चालाव्यात हे उद्दिष्ट ठेवून निधी उभारला गेला. भारतातील कर्मठ पुरुषप्रधान समाजाला आव्हान देऊन सर्व प्रकारचे अत्याचार व शोषणातून महिलांना मुक्त करण्यासाठी  व सुशिक्षित करण्यासाठी अमेरिकन महिलांनी पुढाकार घेतला. काही महिला तर त्यांच्या चळवळीत सहकार्य करण्यासाठी रमाबाईंसोबत भारतातही आल्या. मार्च 1889 मध्ये ‘शारदा सदन’ची पहिली शाळा उघडली गेली. पंडिता रमाबाईंची मुक्ती चळवळ नंतर भारतभर पसरत गेली. त्यांच्या या कार्यासाठी ब्रिटिश सरकारने कैसर-ए-हिंद हा सर्वोच्च किताब देऊन त्यांच्या गौरव केला. स्वातंत्र्योत्तर भारतात रमाबाईंचा स्टॅम्प काढून भारत सरकारनेही त्यांना मानवंदना दिली. 

यातून फोफावत गेलेली स्त्रीशिक्षणाची लाट आणि स्त्रीमुक्तीची चळवळ याच्याच एक प्रतिनिधी होत्या श्यामला गोपालन. सावित्रीबाई फुल्यांपासून पंडिता रमाबाईंपर्यंत चाललेल्या या अविरत चळवळीनंतरही श्यामलांना 1958 मध्ये अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जाताना निकटवर्तीयांचा व समाजाचा रोष पत्करावा लागलाच; परंतु आज अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेली त्यांची कन्या कमलाबाई हे याच चळवळीचे संचित आहे. कमलाबाई हॅरिस ही आज सर्वार्थाने अमेरिकन नागरिक आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन बायडन व त्यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाची सभासद आहे. तेव्हा भारताविषयीचे अमेरिकेचे आर्थिक धोरण त्यांच्या राजकीय धोरणावर अवलंबून असेल. परंतु सामाजिक संदर्भातून अमेरिका व भारताचे हे नवे नाते खात्रीने ऐतिहासिक महत्त्वाचे आहे, हे आपणही नाकाराल असे वाटत नाही. एका अर्थाने पंडिता रमाबाईंनी अमेरिकेकडून घेतलेल्या कर्जाची थोडीबहुत परतफेड आपण कमलाबाई हॅरिसच्या रूपे केली आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरेल काय?


संदर्भ :
1.    Columbus reaches the new world (history.com)
2.    Voting Rights for African Americans (Library of Congress)
3.    Removing Native Americans from their Land (Library of Congress)
4.    Voting Rights for Native Americans (Library of Congress)
5.    Voting Rights for Women (Library of Congress)
6.    The 14th and 15th Amendments (womenshistory.org)
7.    Women in Congress (history.house.org)
8.    The progressive Indian grandfather who inspired Kamala Harris (Los Angeles Times)
9.     Kamala Harris (Wikipedia)
10.    Anandibai Joshee : Retrieving a Fragmented Feminist Image (Meera Kosambi)
11.    Pandita Ramabai's Contribution to Women's Cause (Meera Kosambi)
12.    महापुरुषांच्या नजरेतून स्त्री (डॉ. मंगला आठलेकर)
13.    Pandita Ramabai Saraswati (Clementina Butler, Chairman, American Ramabai Association, 1922)

Tags: संदेश प्रभुदेसाय बराक ओबामा जो बायडन अध्यक्षीय निवडणूक अमेरिकन निवडणूक अमेरिका कमला हॅरिस आनंदीबाई कमलाबाई रमाबाई weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संदेश प्रभुदेसाय,  गोवा

शोधपत्रकार व ‘गोवा न्यूज डॉट.कॉम’ या कोकणी भाषेतील नियतकालिकाचे संपादक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके