डिजिटल अर्काईव्ह

काळानेही न पुसलेले वज्रलेख

उपोषणापूर्वी आणि उपोषणकाळातही गुरुजींना उपोषण सोडावे म्हणून आग्रह करणारी त्यांच्या चाहत्यांची अनेक पत्रे येत होती. त्यांची प्रेम, आस्था गुरुजी जाणून होते व त्याबद्दल कृतज्ञही होते पण त्यांना बाई ट वाटे आणि राग येई तो याचा की हे राष्ट्र एवढे नेभळे कसे? ते म्हणत : "सारे उपास सोडा म्हणत आहेत. संकल्पासाठी मरा नि कृतार्थ हा असे म्हणण्याचे धाडस का महाराष्ट्रात नाही? सारे का मिळमिळीत जीवनाचे उपासक झाले? शरीराचे पूजक झाले? आत्मा अमर आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारे हरिजनांना खुली व्हावीत म्हणून प्रायोपवेशन करण्याचा साने गुरुजींचा निर्णय आयत्या वेळचा नव्हता. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर मोठाच कलंक आहे आणि तो दूर करण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे असे विचार त्यांच्या मनात अनेक वर्षे घोळत असावेत. उपवास सुरू करण्याच्या कितीतरी आधी गुरुजींनी या विषयावरील आपले विचार एका पत्रामध्ये नमूद केले आहेत.

''हिंदूंत ही अस्पृश्यता कशी आली, देव जाणे! अस्पृश्य हे येथील मूळचे रहिवासी असावेत, नाग जातीचे ते असावेत असे कोणी म्हणतात. परंतु अस्पृश्यांच्या तोंडावळ्यातून ते आर्य असावेत असेही कोणी म्हणतात. या मूळच्या नाग लोकांस आर्यांनी जिंकले. आर्य व नाग ह्या दोहोंचे रक्त अस्पृश्यांत असेल असे वाटते. लोक जितांविषयी कसा अस्पृश्यभाव दाखवतात हे सर्वत्र दिसते. प्रत्येक समाजात, प्रत्येक संस्कृतीत असे लाजिरवाणे प्रकार आहेत. ग्रीक लोकांची संस्कृती कळसास पोहोचली होती. परंतु त्यांनी गुलामांचा एक वर्ग राखला होता. या गुलामांना कलांची उपासना करता येत नसे. त्यांना ज्ञानाचे दरवाजे बंद होते. त्यांनी सदैव वरच्यांची सेवा करावी. आपल्याकडेही तोच प्रकार. त्रैवार्गिकांची सदैव सेवा करणे हेच अस्पृश्यांचे काम राहिले…''

---

अस्पृश्यता निवारणाची गुरुजींची तळमळ त्यांनी विनोबाजींना या संबंधात वारंवार जी पत्रे लिहिली त्यांतून वेळोवेळी व्यक्त झाली आहे. अशाच एका पत्राला उत्तर देताना विनोबाजी म्हणतात-

'‘हल्ली माझी बोलण्याची सवय पूर्वीपेक्षाही कमी झालेली आहे. ऐकतो पुष्कळ. तुमचेही रोज थोडे थोडे सावकाश ऐकून घेईन. विचारविनिमयाची गरज तर आहेच. पण शारीरिक प्रकृतीचाही प्रयोग करू. मंदिर-प्रवेशाबाबत काम करण्याचे मी सीतारामभाऊंना सुचवले आहे. ते कैलासाला जाऊन परत आले. मी म्हणालो : तुमचा पुनर्जन्म झाला आहे. आता स्वतःची जीवनशुद्धी करा. गीताईचे मनन, चिंतन करा आणि त्याबरोबर समाजशुद्धीचे कार्य हाती घ्या. काम तीव्रतेने करा. पण शांती सोडू नका. इतकेच नव्हे पण दिवसेंदिवस शांती वाढवा. त्यांच्याचबरोबर हे पत्र रवाना करीत आहे. अस्पृश्यता निवारणासाठी, जातीय ऐक्यासाठी, खादी इत्यादी कार्यासाठी सतत तळमळ चाललेली असते. परंतु आतून इतकी विलक्षण शांती अनुभवतो की तितकी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती. 

कारण असा विश्वास वाटतो की, हे सर्व घडून येणारच आहे. याविरुद्ध सर्व गळून पडणार आहे. कारण ईश्वराला ते हवे आहे. पण त्याची कार्ये सर्व शांतीने होत असतात. तो आमच्या हृदयाची खळबळ पाहून संतुष्ट होणार नाही. तो खोली पाहून संतुष्ट होणारा आहे. त्यासाठी तो आमची कसोटी करून राहिला आहे."

---

याच विषयावर आणखी एका प्रदीर्घ पत्रात अस्पृश्यता निवारण हे सामाजशुद्धीचे साधन व्हावयाचे असेल तर त्यासाठी संशोधन प्रक्रिया कशी असावी याचे मार्गदर्शन करताना विनोबाजी गुरुजींना लिहितात -

"गुरुजी, हरिजनांसंबंधी तुम्ही प्रचार करीत आहात ते मला प्रिय आहे. निरंतर प्रचार करीत राहणे हेही एक महत्त्वाचे कार्य आहे. हरिजन बोर्डिंगची जबाबदारी उचलता तेही योग्यच आहे; यद्यपि माझ्या मनाचा कल जातीय बोर्डिंगांकडे वळत नाही. 

वस्तुतः छात्रालय सर्वांचेच हवे. पण चालू परिस्थितीत जे आहे ते चालवणे ठीकच आहे. या वेळच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे हरिजन उमेदवार निवडून आल्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, हे उघडच आहे. अस्पृश्यता नाहीशी होऊन आमच्या समाजाची शुद्धी लवकरात लवकर होणे अगत्याचे आहे. तथापि अशा बाबतीतही- म्हणजे इतकी निकड असतानाही-आमरण अनशनादी प्रयोगांबद्दल मला अनुकूल भाव नाही. किंबहुना पुष्कळ वेळा अशा प्रयोगांचा माझ्यावर उलटाच परिणाम होऊ पाहतो. नैतिक दाबाचीही एक मर्यादा आहे. त्या मर्यादेपलीकडे तो दाब नेल्यास तो नैतिक न राहता अनैतिक होतो, असा माझा अभिप्राय आहे. आमरण अनशनाचे एक शास्त्र आहे. अहिंसेच्या शस्त्रागारात त्याला स्थान आहे. 

अस्पृश्यता निवारणासारख्या कार्यात विशिष्ट परिस्थितीत तो समर्थनीय होण्याची शक्यता आहे. इतके सर्व गृहीत धरून हिंदू जनतेच्या चालू परिस्थितीत माझे हे मत झालेले आहे. हे मी तुम्हांला सावधान करण्यासाठी लिहीत नाही. मलाही सावधान करण्यासाठी लिहीत आहे. कारण या पत्रासंबंधी अशीच काही विलक्षण तीव्रता मला वाटते. "पण तीव्रता कितीही वाटली तरी वस्तुस्वरूप विचारानेच ठरवावे लागते. ते तीव्रतेने अथवा अतीव्रतेने ठरत नाही. हिंदू धर्माच्या हिंदू आणि हिंदी समाजाच्या चित्ताचा विकास आदिपासून अंतापर्यंत कसा होत गेला याचे मला चांगले ज्ञान आहे, असे मी मानतो. कारण तदविषयक अध्ययन, चिंतन आणि निरीक्षण तीस-पस्तीस वर्षे सतत करत आलो आहे. हिंदु धर्माचा विकास सखोल चिंतन आणि निष्काम तपश्चर्या या दोन साधनांनी झालेला आहे. 

आत्म्याचे जितके सूक्ष्म चिंतन आमच्या भूमीत झाले आहे तितके अन्यत्र झाल्याचे तटस्थ बुद्धीने पाहता दिसत नाही. आत्म्याची अकर्तृता हा एक शिरोमणी सिद्धान्त हिंदू धर्माने शोधला आहे. त्यावर प्रयोग करण्यात म्हणजे तपश्चर्येने त्याची अनुभूती करून घेण्यात हिंदू धर्माची शक्ती इतिहासभर खर्च झालेली आहे. त्यातूनच अहिंसा, अनाक्रमणशीलता, सार्वभौम अविरोध ही प्रमेये निघाली आहेत. प्राण्याची हिंसा टाळण्यासाठी यज्ञ, यज्ञातील हिंसा टाळण्यासाठी यज्ञ-निषेध, यज्ञाचा उच्चतर अर्थ, सर्व यज्ञांतील संन्यास-वृत्ती इत्यादी अनेक महान संशोधने सुदीर्घ कालपर्यंत केली गेली आहेत. 

‘अस्पृश्यतानिवारण’ हे जर असेच शुद्धीचे साधन व्हायचे असेल तर ते अशाच संशोधन-प्रक्रियेने होईल. "चित्तशुद्धिकारक अस्पृश्यतानिवारण करण्याचा, हिंदुधर्माच्या स्वभावाला साजेसा उपाय- आम्ही हरिजन बनणे हा एकच आहे! असे बनण्यात जे क्लेष होतील, जी तपश्चर्या होईल, ती आम्हांस हवी आहे. तशा प्रक्रियेत अनशनाचाही प्रसंग कल्पिता येतो. पण माझी अशी श्रद्धा आहे की, त्या प्रक्रियेने संशोधन होत असताना अनशनाबी गरज निर्माण होण्याची परिस्थिती उभी न होण्याइतका हिंदू समाज विवेकी आहे. हिंदू समाजात बुद्ध, शंकर, ज्ञानदेव, मीरा इत्यादी सत्पुरुषांचा भरपूर छळ झाला आहे, तथापि हिंदुधर्माने एकाही संताला ख्रिस्त किंवा सॉक्रेटीस होऊ दिले नाही!

---

गुरुजींची आंतरिक तळमळ जसजशी वाढत होती तसतसा त्यांचा उपोषणाचा विचार दृढ होत होता. पंढरपूरला त्यांचे एक स्नेही सीतारामभाऊ हे कार्तिकीवारीसाठी गेले असताना विनोबांच्या सांगण्यानुसार मंदिर प्रवेशाच्या खटपटीला लागले. परंतु पंढरपूरला न जाता आपण आहोत तेथेच कार्तिकी एकादशीपासून उपोषण करावे असे गुरुजींनी ठरवले आणि खालील निवेदन वृत्तपत्रांना दिले.

“महात्माजींनी 32 साली हरिजनांसाठी उपवास केला त्यावेळेस देशभर एक प्रचंड लाट आली. महात्माजींनी हिंदुस्थानभर दौरा काढला. काही मंदिरे उघडली. कोठे विहिरी मोकळ्या झाल्या. अखिल भारतीय हरिजन सेवक संघ स्थापन झाला. ठायी ठायी हरिजन छात्रालये सुरू झाली. प्रचारही हरिजन सेवक संघामार्फत सुरू झाले. त्या गोष्टीला आता 14 वर्षे झाली. 

थोड्या महिन्यांपूर्वी पू. विनोबाजी भावे यांनी 'किती मंदिरे उघडली, किती विहिरी मोकळ्या झाल्या, हरिजनांना किती जवळ घेतले, ‘याचा हिशोब द्या' असे सांगितले मी त्यांना त्यावेळेस लिहिले, 'हिशोब काय देणार? आम्ही सांगतो त्याचा कितीसा परिणाम होणार? आमच्यासारख्यांनी बलिदाने केली पाहिजेत. अमळनेरचे सखाराम महाराजमंदिर किंवा पंढरपूरचे पांडुरंगाचे मंदिर उघडावे म्हणून मला उपवास करायला परवानगी द्या. त्यांनी लिहिले. 'हिंदु धर्म उदार आहे. तो हुतात्मे होऊ देणार नाही. मी शांत राहिलो; परंतु मी अशांत होतो. मी त्या सात-आठ महिन्यांत जो जो प्रचार केला त्यात अस्पृश्यतेविषयीच सांगत असे. मुंबई सरकार आता कायदाही करीत आहे. परंतु मनोबुद्धीतच जी क्रांती झाली पाहिजे ती अद्याप झाली नाही. 

आम्ही हरिजनांना जवळ घेणार नाही, जवळ जेवायला बसणार नाही, हृदयाशी धरणार नाही, आमचे डोळे कधी उघडणार, हरी जाणे!. "आज कार्तिकी एकादशी, प्लेग असला तरी पंढरपूरची यात्रा जमेल. पंढरपूरच्या वारकऱ्यांत वऱ्हाड-खानदेशकडील किती तरी हरिजन वारकरी आहेत. त्यांच्या मुलांची नावे तुळशी, एकादशी अशी असतात, परंतु या वारकऱ्यांना पांडुरंगाच्या त्या समचरणांवर डोई ठेवता येत नाही, 'समचरण' असे विठ्ठलाच्या चरणांचे संतांनी वर्णन केले ते चरण भेदभाव नाही करीत. ते सर्वांभूती सम आहेत. परंतु त्या चरणांवर सर्वांना का बरे डोके ठेवता येऊ नये? "पंढरपूरचे मंदिर हरिजनांना मोकळे व्हावे. पांडुरंगाच्या पायांवर त्यांना डोके ठेवता यावे, यासाठी आज एकादशीपासून मी उपवास करीत आहे. 

पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करीत राहीन. ‘महाराष्ट्रातील हजारो गावांतील सर्व बंधु-भगिनींना तसेच शहरातील बंधु-भगिनींना माझी प्रार्थना की, तुम्ही भराभरा पुढे येऊन ही अस्पृश्यता समूळ नष्ट करा. प्रचंड लाट सर्व महाराष्ट्रभर उसळू दे आणि हे पाप धुवून जाऊ दे."

---

गुरुजीच्या उपोषणाच्या वार्तेने महाराष्ट्रात बरीच खळबळ निर्माण झाली. अनुकूल, प्रतिकूल मते व्यक्त होऊ लागली. सनातनी आणि रूढिप्रिय कडवट टीका करू लागले, तर नवमतवादी पुरोगामी गुरुजीच्या पाठीमागे उभे राहिले. हरिजन सेवकसंघाचे श्री. काकासाहेब बर्वे यांनी अप्पासाहेब पटवर्धन यांना मनःपूर्वक पाठिंबा दिला. अप्पासाहेबांनी या संबंधांत काढलेल्या पत्रकात स्पष्ट म्हटले.

''...हा प्रश्न इतका जिव्हाळ्याचा आणि पवित्र आहे की सुबुद्ध महाराष्ट्राची शक्ती मंदिर प्रवेशाच्या मुद्यावर एकवटण्याच्या मार्गात चालचलाऊ राजकारणातील पक्षभेदाची आडकाठी येऊ नये : व मला आशा आहे की, येणारही नाही. हा साराच प्रश्न धर्माधर्म विवेकाच्या पारमार्थिक भूमिकेवरून हाताळला जावा. तो सोडविण्याचे श्रेय मला, माझ्या संस्थेला, पंथाला किंवा पक्षाला मिळावे अशी कोणीच अपेक्षा करू नये. किंबहुना श्रेय मिळत असले तरी ते स्वीकारूसुद्धा नये...''

---

विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले करण्याच्या मागणीवर बडवे मंडळींनी लोकमताचा कौल मागितला. व डॉ. एम.आर.जयकर सांगतील ती पद्धत अथवा निर्णय मान्य करू असेही त्यांनी सांगितले.. वरकरणी घेतलेला हा संभावितपणाचा पवित्रा बडव्यांच्या डावपेचांचा एक भागच होता हे पुढे उघड झाले. गुरुजींनी मात्र त्यावर तात्काळ आपले मत नोंदविले.

''या विश्वस्तांना मंदिर खुले करा असे म्हटले तेव्हा आज लोकमताची आठवण झाली. मंदिर उघडायला लोकमत तर मग मंदिराच्या सर्व उत्पन्नाचा विनियोग कसा करावा यासाठी लोकमताचीच योजना नको का?... आणि लोकमत कोणाचे? केवळ वारकरी जनतेचे की सर्व हिंदुस्थानचे? पांडुरंगाचे मंदिर वारकरी संप्रदाय अस्तित्वात येण्यापूर्वीपासून आहे. ते अतिप्राचीन आहे. आद्य  शंकराचार्यांनी तेथे येऊन 'पांडुरंगाष्टक’ नावाचे स्त्रोत्रही केले.. म्हणजे श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पूर्वी जवळजवळ पाचशे वर्षे पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आद्य शंकराचार्यांना इच्छा व्हावी इतके ते मंदिर प्रसिद्ध होते. पुढे भक्तिमार्ग आला. 

वारकरी संप्रदाय निर्माण झाला... तेव्हा मत जनतेचे घ्यायचे; व मत घेण्याची दुसरी एखादी पद्धत जोवर नाही तोपर्यंत आज जे असेंब्ली मतदार आहेत त्यांचे मत घेणे योग्य आहे. त्यांनी शंभर टक्के राष्ट्रीय सभेला निवडून दिले आहे. आणि राष्ट्रीय सभेचे या बाबतीतील मत मतदारांना माहीत आहे. प्रचारात हरिजन उमेदवार आमच्याबरोबर असत. तेव्हा जनतेचे मत यावरून आजमावता येईल. हिंदू सभेला मते मिळाली तरी हिंदुसभाही मंदिर प्रवेशाला अनुकूलच आहे... तेव्हा पुन्हा लोकमताचा मुद्दा मांडण्यात अर्थ नाही.''

---

"उपोषणासंबंधीचे गुरुजींचे पत्रक वाचून सेनापती बापट, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, शिरुभाऊ लिमये आदीनी गुरुजींच्या उपोषणाला पाठिंबा दिला, पण उपोषणाच्या आधी साऱ्या महाराष्ट्राचे या प्रश्नावर जनमत तयार करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करावा आणि मग जरूर पडलीच तर उपोषणाला सुरुवात करावी असे सुचविले. यावर बराच खल झाला पण गुरुजी आपले पाऊल मागे घेण्यास तयार नव्हते. अखेर सेनापतींनीही आपणही गुरुजींबरोबर उपोषणाला बसणार असे जाहीर केल्यावर मात्र गुरुजीनी या सर्वांचे म्हणणे मान्य केले आणि आपले उपोषण सहा महिने-वैशाख शुद्ध एकादशीपर्यंत स्थगित केले. महाराष्ट्रभर काढलेल्या या दौऱ्यात गुरुजींनी अनेक तळमळीची ओजस्वी भाषणे केली आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या संकल्पाबद्दल ते सांगायचे- "पंढरपूरचे मंदिर हरिजनांना मोकळे व्हावे म्हणून मी मरायला उभा राहिलो. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचे हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल असे मनात आले. पंढरपूर म्हणजे दक्षिणची काशी... असे हे प्राचीन पवित्र मंदिरच देवाच्या सर्व लेकरांना मोकळे व्हावे म्हणून मी उपवास सुरू केला होता.

वारकरी पंथ सुरू होण्यापूर्वी हे मंदिर प्रसिद्ध होते. पुढे संतांनी आणखी महिमा वाढवला. नामदेव, ज्ञानदेव उत्तरेची यात्रा करून आले. इस्लामी धर्म येत होता. मलबार किनाऱ्यावर तो कधीपासून आलेला होता. इस्लामी धर्मातील समतेचा परिणाम संतांच्या मनावर झाल्याशिवाय राहिला नाही. हिंदु धर्म उदार न होईल तर टिकणार नाही, असे त्यांना वाटले असावे. मशिदीत सारे समान. हिंदु मंदिरात असे केव्हा होईल असे विचार त्यांच्या डोक्यात आले असतील. तेव्हा पंढरपूरच्या वाळवंटात तरी भेदभाव, शिवाशिव नको असे त्यांनी ठरविले असावे. साऱ्या महाराष्ट्रातून विठ्ठलनामाचा गजर करीत येते या. या वाळवंटात एकत्व अनुभवा, येथे परस्परांस भेटा, क्षेमालिंगने द्या. 

आणि नवीन प्रथा सुरू झाली, वाळवंट दणाणले, गजबजले...! संत बंडखोर होते. संस्कृतातील ज्ञान त्यांनी मराठीत आणले. संत कारुण्यसागर होते. झोपडीझोपडीत त्यांना ज्ञान न्यायचे होते, खरा धर्म न्यायचा होता. त्यांचा छळ झाला.... संत मेल्यावर त्यांच्या पालख्या आपण उचलतो-ते जिवंत असताना त्यांचे आपण छळच केले. परंतु ते डगमगले नाहीत. वाळवंटात तरी त्यांनी भेदभाव नष्ट केला. "त्याच्या पुढचे पाऊल आपण नको का टाकायला? समाज पुढे जात असतो. नदी थबकली की संपली. समुद्राला मिळेपर्यंत ती पुढे जाणार. आपणही अवधाची संसार सुखाचा होईपर्यंत पुढे गेले पाहिजे. परंतु आपण पुढे गेलो नाही. आपण सहाशे वर्षात दुसरे पाऊल टाकले नाही. संतांनी वाळवंटात सर्वांना जवळ घेतले ; आपण मंदिरात सर्वांना घेऊ या..

---

याच सुमारास काँग्रेसने आपले शासन मंदिर प्रवेश बिल विधिमंडळात आणणार असे जाहीर केले होते, त्या संदर्भात विनोबाजींनी गुरुजींना उपवासाची व्यर्थता पटविण्याचा प्रयत्न करणारे पुढील पत्र लिहिले. "सहा महिन्यांपूर्वी तुम्ही उपवासाचा संकल्प केला त्याहून आज फार वेगळी परिस्थिती आहे. जनमत मंदिर-प्रवेशाला अनुकूल झाले आहे; त्याचे श्रेय पुष्कळसे तुम्हालाच आहे. त्यामुळे मंदिर प्रवेश बिल शक्य झाले आहे. हे बिल त्यापूर्वीच का नाही आणले, असे कोणी विचारतात. कारण, लोकमताचा कयास लागला नव्हता. आता तो लागला आहे, त्याचे फलित हे बिल" लोकमतानुसार कायदा अहिंसेत येतो. असा कायदा हे केवळ लोकमताचे प्रकाशत मात्र असते. सती कायद्यानेच गेली. पण तो कायदा लोकमतानुसार होता. तीच स्थिती मंदिर-प्रवेशाची आज आहे. म्हणून कायद्याने मंदिर उघडण्यात गोडी नाही असे अशा कायद्याबाबत म्हणता येत नाही.

"कायदा झाला तरी अंमलात येतो की नाही हा सवाल अशा कायद्याबाबत उठू शकत नाही. तो अंमलात येणारच आहे. आपणच तो अंमलात आणणार आहोत. लोकमत बोलून चुकले आहे. "मग हा उपवास कोणासाठी? बडव्यांसाठी? बडव्यांचे आणि आमचे काही विचारांचे नातेगोते असते तर गोष्ट वेगळी. मग काय दोन-चार महिन्यानंतर होणारी गोष्ट आताच व्हावी म्हणून? अशी घाई सुधारकाला आणि सत्याग्रहीला न जमणारी आहे.

---

उपोषणापूर्वी आणि उपोषणकाळातही गुरुजींना उपोषण सोडावे म्हणून आग्रह करणारी त्यांच्या चाहत्यांची अनेक पत्रे येत होती. त्यांची प्रेम, आस्था गुरुजी जाणून होते व त्याबद्दल कृतज्ञही होते पण त्यांना बाई ट वाटे आणि राग येई तो याचा की हे राष्ट्र एवढे नेभळे कसे? ते म्हणत : "सारे उपास सोडा म्हणत आहेत. संकल्पासाठी मरा नि कृतार्थ हा असे म्हणण्याचे धाडस का महाराष्ट्रात नाही? सारे का मिळमिळीत जीवनाचे उपासक झाले? शरीराचे पूजक झाले? आत्मा अमर आहे. 

देह नाशवंत आहे, स्वधर्म अबाध्य आहे- असे गीता सांगते ते का उगीच?"

---

पण गुरुजी खरे व्यथित झाले ते गांधीजींकडून आलेल्या तारेमुळे. अनेक हितसंबंधी व्यक्तींनी गांधीजींना भेटून गुरुजींच्या उपोषणाचा हेतू विपर्यास करून सांगितला होता. त्याचा परिणाम म्हणून गांधीजींनी गुरुजींना उपोषण सोडावे म्हणून तार केली. गुरुजींचे गांधीजी हे श्रद्धास्थान, ते  अतिशय दुखावले गेले. तगमगीने त्यांनी गांधीजींना उत्तर लिहिले -

"पूज्य बापू,

माझ्या निश्चयातील सत्य आणि पावित्र प्रायोपवेशनाच्या कसोटीस उतरलेच पाहिजे. आपला सल्ला मला पाळता येत नाही. क्षमा करा. आता मी स्वतःला सर्वस्वी परमेश्वराच्या हाती सोपवले आहे. ‘जोपर्यंत दुसऱ्यांचे युक्तिवाद या निर्णय मला, माझ्या मनोदेवतेला पटत नाहीत, तोपर्यंत माझ्याशी मी सत्यनिष्ठ राहिलेच पाहिजे. 

दुसऱ्यानी मला चुकीचे म्हटले तरी चालेल, थोर मोठे चूक म्हणाले तर मला दुःख होईल, परंतु माझ्या मनाने मला चुक म्हणणे हे सर्वांत वाईट. थोरा-मोठयांचे ऐकून माझ्या मनाचे समाधान मी कायमचे गमावून बसणार असेन, नेहमी मनाला रुखरुख लागणार असेल तर त्यात काय अर्थ? "बापू. तुमच्याजवळ अनंत दया आहे. तुमच्या दृष्टीने तुमचे लेकर चुकत असले तरी ते स्वतःची वंचना करू इच्छित नाही, म्हणून तुम्हीही पाठ थोपटा, हेच तुमच्या प्रिय पूज्य चरणांजवळ मी मागत आहे.

तुमचा नम्र, 
साने."

---

गुरुजींचे पत्र घेऊन हरिभाऊ फाटक व अण्णासाहेब सहस्रबुद्धे गांधीजींना वस्तुस्थिती सांगण्यासाठी दिल्लीला रवाना झाले. याच सुमारास जयप्रकाश नारायण यांनीही एक पत्रक काढून महात्मा गांधी व मुंबई सरकार यांनी मंदिराच्या बडव्यांना याबद्दल एक शब्दही न सांगता गुरुजींना उपोषण सोडण्यास सांगावे याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी म्हटले होते. "मुंबई सरकारच्या मनात जो कायदा करायचा आहे, त्यामुळे तर ट्रस्टींपुढे कायद्यामुळे जे करतील ते त्यांनी अगोदर करावे म्हणून त्यांच्यावर नैतिक दडपण आणणे सोपे झाले आहे... साने गुरुजींनी अत्यंत विचारपूर्वक उपवास सुरू केला, व आगामी कायदा हा साने गुरुजींनी उपोषण सोडावे म्हणून दडपण आणण्यास उपयोगात आणू नये."

---

याच सुमारास मध्यवर्ती कायदेमंडळाचे सभापती श्री. दादासाहेब मावळंकर हे पंढपुरास आले होते. बडवे मंडळींनी त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले होते पण त्यांनी ते साफ नाकारले आणि गुरुजींच्या उपोषणाबाबत चिंता व्यक्त केली. अखेर 1938 सालच्या कायद्याचा आधार घेऊन वाटाघाटी झाल्या. बडव्यांवर दडपण आले आणि त्यांनी मंदिर प्रवेशाची मागणी मान्य केली. त्यानंतर मावळकरांनी गांधीजींना पुढील तार केली.

'‘महात्मा गांधी,

उद्यापासून सुरू होणाऱ्या कस्तुरबा ट्रस्टच्या बैठकीसाठी पुण्याला आलो आणि काल येथे पोचलो. मुंबई मंदिर-पूजा अधिनियम 1938 च्या अनुसार जर मंदिराच्या ट्रस्टींनी जिल्हा कोर्टात आपल्या अनुमतीसह अर्ज दिला तर कदाचित साने गुरुजींना उपवास सोडण्यासाठी प्रेरित करणे शक्य होईल, परंतु मंदिराच्या ट्रस्टींना व साने गुरुजींना आपण जो सल्ला दिला आहे, त्याचा अर्थ हे ट्रस्ट नवीन कायदा होणारच आहे. तेव्हा मंदिर खुले करण्यासाठी काही करण्याची आवश्यकताच नाही' असा लावताना दिसत आहेत. नवीन कायद्याची प्रतीक्षा करावी अशी आपली इच्छा नसेल अशी माझी कल्पना आहे.

उलट साने गुरुजींच्या उपवासाशिवायही जर मंदिर खुले करण्याची काही तत्काळ कारबाई  झाली तर आपण तिचे स्वागतच कराल. आपण जर पंढरपूर मंदिराच्या ट्रस्टींना ताबडतोब  तार करून, साने गुरुजींच्या उपोषणाशिवायही संमतिपत्रावर सह्या करून तो अर्ज जिल्हा मंजिस्ट्रेटकडे द्यावा असा निश्चित सल्ला दिलात तर आजची स्थिती स्पष्ट होईल, आणि उपवासाचा प्रश्न सोडवायलाही मदत होईल. आपण जर मंदिराच्या ट्रस्टींना एखादी तार पाठवलीत तर कृपा करून तिची एक प्रत काकासाहेब बर्वे पंढरपूर यांच्याकडेही पाठवावी.

मावळंकर."

(मंदिर प्रवेशासाठी आवश्यक ती कारबाई  पूर्ण झाल्यानंतर गुरुजींनी 10 मे 1947 रोजी उपोषणारधी समाप्ती केली.)

Tags: दादासाहेब मावळंकर मुंबई सरकार काकासाहेब बर्वे विठ्ठल मंदिर पंढरपूर जयप्रकाश नारायण गांधी साने गुरुजी Dadasaheb Mawalkar Mumbai Govrenment kakasaheb Barve Vitthal temple Pandhapur Jayprakash Narayan Gandhi Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी