डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संपूर्ण क्रांतीचा नारा देत लोकनायक जयप्रकाशजींनी देशातील तरुणाईच्या जीवनात नवचैतन्य ओतले. स्वातंत्र्यपूर्व काळातील मंतरलेले क्षण आमच्या पिढीच्या वाट्याला येण्याचे भाग्य दिले. गुरुजींच्या जन्मशताब्दी प्रारंभाच्या दिवशीच 24 डिसेंबरला जयप्रकाशजींना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. त्या निमित्ताने 15 ऑगस्ट 1948 साली साधनेच्या पहिल्याच अंकात साने गुरुजींनी लिहिलेला 'जयप्रकाश तुमचा जयजयकार असो' हा लेख पुनर्मुद्रित करीत आहोत. - संपादक

मध्यरात्रीची वेळ होती. बाहेर थंडी होती. त्या एका मोठ्या दिवाणखान्यात आम्ही दोघे होतो. मधु देशपांडे आणि मी. या जागेत दोन चार दिवस रहा म्हणून आम्हांस सांगण्यात आले होते. एका बाजूला ती जागा होती. मोठीशी चांगली वस्ती नव्हती. खालच्या मजल्यावर नेहमी भांडणे चालत. जुगारी, दारुडे, नाना प्रकारचे लोक तेथे जात-येत. 

“मधु, कोठल्या जागेत आपण आलो?” 

“हा स्वातंत्र्याचा लढा आहे. कुठेही राहावे लागले तर राहिले पाहिजे. खाली भांडेनात का? आपण येथे वर आहोत. येथे कोणी येणार नाही. जयप्रकाश मुंबईत आले आहेत." हजारीबाग तुरुंगातून निसटून आले. शाबास त्यांची, मी त्यांना अजून पाहिले नाही. केव्हा त्यांना पाहीन नि प्रणाम करीन असे मला झाले आहे".

“परंतु त्यांना गुप्त राहिले पाहिजे. मिनु मसानींनी कोठे तरी त्यांची सोय केली आहे असे ऐकतो.“त्यांचे वडील तर युद्धसहकार्याचे मोठे पुरस्कर्ते आहेत”. 

“परंतु मिनू समाजवादी आहेत. त्यांचा समाजवाद जरा भिन्न असला तरी जयप्रकाश, अच्युत वगैरेंचे ते मित्र आहेत. मिनूने फारच मोठे धाडस केले आहे. जयप्रकाश जर त्यांच्याकडे सापडले तर?  मिनू सर्व गोष्टींसाठी तयारच असतील".

“झोप तर येत नाही. असे अंधारात कुजत पडण्यापेक्षा मधु, कोठे गोळीबारात मरावे असे वाटते". 

“आपण हुकमाचे बंदे. शिस्त पाळावी म्हणून तुम्हीच ना म्हणता?” 

“आम्ही दोघे मित्र हळूहळू बोलत होतो. खोलीत, दिवाणखान्यात अंधार होता. बारा वाजून गेले असतील. आणि दारावर टकटक आवाज झाला. आमचे बोलणे थांबले. आपल्या जागेचा सुगावा तर नाही ना लागला असे मनात आले. पुन्हा टकटक. आम्ही दाराजवळ आंत दोघे उभे होतो. बाहेरून शेवटी जोराने थाप मारण्यात आली. “मधु, कोणीही असो, दार उघड.” मी हळूच म्हटले, आम्ही दार उघडले. दोन माणसे झटकन् आत आली. 

“पटकन् दार का नाही उघडलेत?" प्रताप संतापून म्हणाला. “तुम्ही रात्री येथे येणार आम्हांला काय माहीत?"

“प्रताप, जाऊ दे. सब ठीक है." ती उंच व्यक्ती म्हणाली. “प्रताप, हे कोण?" “हे जयप्रकाश! तुम्ही किती वेळ लावलात दार उघडायला. केवढी जबाबदारी आपण घेतली आहे." मधु व मी यांनी जयप्रकाशांना भक्तिभावाने प्रणाम केला. त्यांचे अंथरूण तयार करण्यात आले "तुम्हाला पांघरायला काय?" जयप्रकाशानी आम्हांला विचारले. “मला लागत नाही." मी म्हटले. “मलाही नको”. मधु म्हणाला.“यह अच्छा नही. सबको सब होना, जहांतक हो सकता है”. जयप्रकाशजींनी आम्हां दोघांचीही सोय पाहिली. प्रताप अंधारात पुन्हा निघून गेला आम्ही अंधरुणावर होतो. आम्हाला झोप येत नव्हती. जयप्रकाश झोपले. त्यांचा चेहरा निराळा होता. मोठाल्या मिशा होत्या. त्या थोड्या पिकल्या होत्या, ते थकलेले दिसत होते. देवळीच्या उपवासात ते खंगले होते. आणि निसटून आल्यावरच्या अनेक मुसीबती. जंगलांतून पडून राहणे. महापुरुष तुरुंगात तडफडत होता. बाहेर 9 ऑगस्टचा आगडोंब पेटला होता. जयप्रकाश आत होते. बाहेरचा लढा त्यांना हाक मारीत होता.

बिहारमधील जनतेने बहार केली होती. सरकार बंद पाडले होते. 20 हजार बंदुका जनतेने हल्ला करून लांबविल्या. परंतु नदीत फेकून दिल्या. जयप्रकाश तुरुंगात हात चोळीत बसले. जनतेने यातून स्वतंत्र सरकार स्थापायला हवे होते. सर्वत्र सेना उभारायला हवी होती. आणि लढा मंदावला. तो पुन्हा संघटित करून पेटवायला शेवटी ते बाहेर आले. प्रांतोप्रांती हिंडू लागले. ते हे जयप्रकाश! 

भारतीय स्वातंत्र्याचे मूर्त स्वरूप! मी मनात त्यांना प्रणाम करीत होतो. सकाळ झाली. मधु बाहेर पडला. त्याने कॉफी आणली. जयप्रकाशांनी घेतली. आम्ही त्यांच्याजवळ काय बोलणार? त्यांच्याकडे बघत होतो. मुखावर भक्तिप्रेम उमटत होते. दहा वाजता तीन चार लोक आले. ते बिहारमधील त्यांचे सहकारी होते. बराच वेळ ते बोलत होते आम्ही सर्वांसाठी काही तरी खायला आणले. फळे आणली. एका बिहारी वीराचा मी मित्र बनलो. तो भूमिगत होता. बिहारमधून जयप्रकाशांना भेटायला आला होता. मी बशी स्वच्छ धुतली होती. तरीही काही तरी तिला करवडलेले राहिले होते. 

“प्लेट अच्छी नहीं है; साफ नही किया?" मी ती पुन्हा धुवून आणली. मला लाजेने मेल्यासारखे झाले. जयप्रकाश अमेरिकेत होते. तेथे त्यांनी स्वयंपाक करणे. वाढणे सारी कामे केलेली. स्वच्छतेचे ते भोक्ते, त्यांना घाण सहन नाही होत. याचा अर्थ ते मिजासी होते असा नव्हे स्वच्छ असणे म्हणजे अहंकार नव्हे. गलिच्छ असणे म्हणजे साधुता नव्हे. स्वच्छता म्हणजे प्रभूचे रूप. परंतु दोन दिवसही जयप्रकाश तेथे राहू शकले नाहीत. रेशनिंगसाठी नावे घ्यायला सरकारी माणसे आली. आमची उत्तरे त्यांना असमाधानकारक वाटली, "उद्या, आमचा अधिकारी घेऊन येतो." ते लोक म्हणाले आम्ही तेथून पोबारा केला, जयप्रकाशांना कोठे तरी नेण्यात आले.

महात्माजींचा उपवास सुरू झाला. बातमी आली की प्रकृती अत्यवस्थ आहे. आमच्या तोंडचे पाणी पळाले. गांधीजींचे, त्या राष्ट्रपित्याचे जर बरेवाईट झाले तर देशाला तीन दिवसांपर्यंत काहीही कळू द्यायचे नाही असे सरकारचे निर्धारित होते. सरकारी डॉक्टरांनी गांधीजींना आम्ही सक्तीने अन्न देणार नाही असे सरकारला कळविले  होते असे म्हणतात. महापुरुषाची विटंबना करायला ते तयार नव्हते. लिनलिथगोने चंदनी लाकूड तयार ठेवा असे सांगितले. मोक्याच्या ठिकाणी मिलिटरी वाढवण्यात आली. काय होणार पुढे? महात्माजींची नाडी सापडत नाही अशी वार्ता आली. ते पहा अच्युत, जयप्रकाश वगैरे बसले आहेत. “जयप्रकाश, तुम्ही पत्रक तयार करून ठेवा, वेळ आलीच तर आपणास तत्काळ लाखो पत्रके काढून ही वार्ता देशाला द्यावीच लागेल, उठा.”

जयप्रकाश उठले, किती करुण प्रसंग ! महात्माजी देवाघरी गेले असे समजून पत्रक लिहिणे! जयप्रकाशांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. एक ओळही त्यांना लिहवेना. महात्माजींवर त्यांची किती भक्ती, किती प्रेम! त्यांची पत्नी प्रभावती, ती गांधीजींना मुलीसारखी. देवळी तुरुंगात उपवासात जयप्रकाश मरणशय्येवर असता महात्माजींनीच व्हाइसरॉयांना लिहिले की जर परिस्थिती बदलली नाही तर मला काही तरी करावे लागेल. तेव्हा कोठे सरकार नमले. जयप्रकाश भेटीत जे पत्र पत्नीजवळ देत होते ते पकडून सरकारने प्रसिद्ध केले. सरकारने त्यांतील स्वतःला हवा होता तेवढा भाग प्रसिद्ध केला. सरकारला वाटले गांधीजी जयप्रकाशांचा निषेध करतील. परंतु राष्ट्रपुरुषाने लिहिले, 'हिंसेवर ज्यांचे साम्राज्य चालले आहे त्यांनी जयप्रकाशांना कशाला नावे ठेवावी ? देशासाठी खून केले तरी त्याचा गौरव युरोपात केला जातो. जयप्रकाशांना मी एवढेच सांगतो की त्यांनी आणखी विचार करावा. हिंसेपेक्षा अहिंसेचा मार्गच श्रेष्ठ असे त्यांना शेवटी पटेल.

जयप्रकाशांवर गांधीजीचे फार प्रेम. रामगड काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळेस जयप्रकाशांनी स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट करणारा एक ठराव तयार केला होता. तो येऊ शकला नाही. परंतु संस्थानिकांसंबंधीच्या प्रश्नावर मतभेद दाखवून गांधीजींनी जप्रकाशांच्या त्या ठरावाला, तो ठराव हरिजनमध्ये देऊन, पसंती दिली होती. जयप्रकाशांना शतस्मृति आल्या. चलेजाव मंत्र देऊन गांधीजींनीच राष्ट्र उभे केले, केवढी शक्ती, केवढी सेवा, स्वातंत्र्यासाठी केवढा ध्यास! आणि ती महान् मूर्ती आगाखान राजवाड्यात उपवासाने मरावी? किती आम्ही दुबळे ! आम्हांला लढून, बलिदान करून त्यांना मुक्त करता आले नाही. अरेरे. परंतु जयप्रकाशांनी अश्रू पुसले. त्यांनी स्फुंदत स्फुंदत पत्रक लिहिले. आणि अच्युतराव ते घेऊन माझ्याकडे आले व म्हणाले, "याचा अनुवाद करून ठेवा, " मीही सदगदित होऊन एकेक वाक्य लिहिले. परंतु एक चमत्कार झाला! महात्माजी वाचले. जयप्रकाश अशाप्रकारे सर्वत्र संचरत होते, चर्चा करीत होते. संघटना पुनः बांधीत होते. त्यांच्यासाठी सरकारने बक्षिसे लावली. ते नेपाळात गेले परंतु सरकारला पत्ता लागला. नेपाळी पोलिसांनी पकडले. परंतु एका तरुणाबरोबर जयप्रकाशांनी संदेश दिला. तो तरुण रातोरात गेला. आझाद-दस्ते तयार होतेच, त्यांनी लॉकपवर हल्ला केला. जयप्रकाश , लोहिया निसटले, एक नेपाळी शिपाई कामी आला, कोणाला मारण्याची इच्छा नव्हती. जयप्रकाशांनी नेपाळ नरेशांना पत्र लिहिले. एक शिपाई मेला म्हणून त्यांनी दुःख प्रदर्शित केले. आम्हांला तुम्हांला अडचणीत आणण्याची इच्छा नव्हती. वगैरे लिहिले, मृत शिपायांच्या घरी त्यांनी मदत पाठविली. 

नेपाळातून जयप्रकाश निसटले अशी बातमी जेलमध्ये आम्हांला मिळाली. परंतु थोड्याच दिवसात कोणाच्या तरी फितुरीने पंजाबात जात असताना जयप्रकाश पडकले गेले, त्यांच्या डब्यात शीख, युरोपियन लोक चढले, गाडी सुरू होताच त्यांच्यावर पिस्तुले रोखण्यात आली. स्वातंत्र्याच्या लढ्याचा प्राण बद्ध झाला. लाहोरच्या किल्ल्यात त्यांना ठेवण्यात आले. साऱ्या हिंदुस्थानातील बडे सी.आय.डी. अंमलदार तेथे गोळा झाले. हजारो प्रश्न त्यांना विचारण्यात येऊ लागते. त्यांना झोप घेऊ देत नसत. हातापायांत जड शृंखला होत्या. थोडा वेळ फिरायला बाहेर काडीत तर दोहो बाजूस पिस्तुलवाले असत. महापुरुषांचे हाल झाले. बॅरिस्टर पारडीवाला त्यांच्यासाठी पंजाबात गेले. तर त्यांनाच अटक झाली. परंतु पुढे वातावरण जरा निवळले. थोडेफार वाचायला मिळू लागले. महात्माजींनी एकदा लिहिले होते. “समाजवादी तत्त्वज्ञानातील प्रत्येक पैलू जयप्रकाशांना अवगत आहे. जयप्रकाश साधे सुंदर लिहितात. साधे सुंदर बोलतात. ते व्याख्यानात सारे सोपे करून सांगतात. दोन दोन तास ते बोलतात. शांत गंगेचा प्रवाह, आदळ आपट नाही, हातवारे नाहीत, तोच शांत आवाज." धुळे शहरात प्रचंड सभा झाली. हजारो शेतकरी आले होते. ते जाताना म्हणत होते. “हाऊ बोलस ते कळस, समजस. खरं शे भाऊना बोलणं." (हा बोले ते समजते, खरे आहे याचे म्हणणे)

Tags: चळवळ महात्मा गांधी स्वातंत्र्य जयप्रकाश साने गुरुजी Movement Mahatma Gandhi Freedom Jayprakash Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके