डिजिटल अर्काईव्ह

नासिक कारागृहात साने गुरुजी

"...त्या काळी रोच नावाचा एक नादान अँग्लो-इंडियन नासिक तुरुंगात जेलर होता. सत्याग्रहींना नमविण्याचे वेड त्याच्या डोक्यात होते. शेवटी बिचारा त्या वेडाच्यापायी स्वतःच जेलमध्ये अडकला." 

नासिकच्या कारागृहात स्वामी आनंद हे देखील होते. स्वामीजी गांधीजींच्या परिवारामधले निकटचे. गांधीजींनी स्वामी आनंदांच्या आग्रहावरूनच 'सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा' हे आपले आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले. स्वामींनी नाशिक जेलमधली त्या वेळची आठवण ‘भावनामूर्ती' नामक एका लेखात लिहिली आहे. ते लिहितात : "...त्या काळी रोच नावाचा एक नादान अँग्लो-इंडियन नासिक तुरुंगात जेलर होता. सत्याग्रहींना नमविण्याचे वेड त्याच्या डोक्यात होते. शेवटी बिचारा त्या वेडाच्यापायी स्वतःच जेलमध्ये अडकला." 

त्याचा जुलमी अंमल चालत होता तेव्हाची गोष्ट. एक दिवस सकाळी अंमलदाराची फेरी पुरी झाली होती. इतक्यात दोन वॉर्डर एका कैद्याला घेऊन वॉर्डमध्ये आले. दंडाबेडी ठोकलेला तो कैदी नुसत्या बेइयांच्या घर्षणाने  सोलल्या गेलेल्या घोट्यावर आणखी त्रास होऊ नये म्हणून दोन्ही हातांनी बेड्या वर सावरण्याचा प्रयत्न करीत होता. जड पावलांनी तो मोठ्या कष्टाने चालत होता. माझ्यासमोर येताच आपल्या त्या सर्व साजशृंगारासह त्याने माझ्यापुढे  साष्टांग नमस्कार घातला.

मला संकोचल्यासारखे झाले. मी त्याचे बाहू धरून त्याला उठवले. म्हणालो, ''हे असे काय? या. फार छान झाले तुम्ही आलात. येथे कोणी नाही. सगळे कसे शांत आहे, आणि मी तर तुमचा मित्र आहे.''

माझी नजर इतका वेळ दंडाबेडीमुळे सोलल्या गेलेल्या त्याच्या घोट्यावर खिळली होती. मी त्याच्याकडे कुतहलाने पाहिले. 30-32 वर्षांचे वय. ठेंगणा मराठी बांधा. केविलवाणा चेहरा. त्यावर वैष्णव स्त्रियांची विव्हलता. पण डोळे मात्र तेजाचे दोन पुंज. वेधक बुद्धिमत्ता डोळ्यांत जणू मावत नव्हती. मी त्यांच्याकडे पाहातच राहिलो. डोळ्यांत नि चेहऱ्यात एवढा फरक! मनात आले हा असामान्य कोटीतला पुरुष असावा. त्या प्राण्याचे नाव साने गुरुजी!

मी ऐकले होते की, धुळ्याहून आलेल्या सत्याग्रहीत माझे जुने मित्र श्री. दास्ताने आणि खानदेशच्या विद्यार्थ्यांचे ही गुरू साने मास्तर आहेत.

थोड्या वेळाने मला सारी हकीकत समजली... मी त्यांना दिलासा दिला. त्यांना थोडे बरे वाटलेसे दिसले. त्यांच्या  घोट्यावर बांधण्यासाठी चिंध्या मिळवण्याचा मी त्या दिवशी दुपारी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खूप प्रयत्न केला. दंडाबेडीवाल्या कैद्यांना चिंध्या मागण्याचा हक्क असतो. परंतु त्यांना चिंध्या दिल्या नाहीत. जेलरने उत्तर पाठवले, 'झाडाची पाने बांधा.' त्याला ठाऊक होते की आमच्या साऱ्या वॉर्डमध्ये नावालाही झाड नव्हते. 

यानंतर थोड्याच दिवसांनी त्या शिशुपालाची शंभर पापे भरली. बार्डोलीच्या एका युवकाला मरेमरेतो त्याने मारल्याची बातमी बाहेर पोचली, त्याच्यावर खटला चालला आणि त्याला सजा झाली. त्यानंतर नासिक जेलचे वातावरण बदलले. अंमलदारांची धुंदी उतरली आणि सत्याग्रहींना सुख-शांती लाभली. 

त्यानंतर किती तरी महिने आम्ही (साने गुरुजी व मी) एकत्र काढले. नंतर आणखीही तरुण आमच्या वॉर्डात आले. त्यांत बरेच विद्यार्थीही होते. गुरुजींना शिष्य मिळाले. ते प्रसन्न राहू लागले. सारा दिवस त्या विद्यार्थ्यांत असत. त्यांना शिकवीत. त्यांना गोष्टी सांगून रिझवत. मुलेही सारी भुंग्यासारखी सदैव त्यांच्याभोवती असावची. गोष्टी सांगताना गुरुजी अगदी तल्लीन होऊन जात. त्यांना आपले बालपण आठवे. कोकणातल्या किती आठवणी येत! काजू, फणस आणि आंब्याची सृष्टी समोर उभी राही. त्यांच्या शब्दा-शब्दांतून हापूसच्या आंब्याचा सुवास दरवळे. जीवनातील या स्मृतिचित्रांनी आणि वातावरणाने त्यांचे सर्व साहित्य भरपूर भरलेले आहे."

('साने गुरुजींची जीवनगाथा' मधून)

Tags: सत्याग्रही स्वामी आनंद कारागृह नासिक साने गुरुजी Satyagrahi Swami Anand Jail Nashik Sane Guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

साने गुरुजी ( 119 लेख )

(जन्म : 24 डिसेंबर 1899 - 11 जून 1950)

एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी