डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वसंतकाका आणि प्रधानसर, दोघेही आपापल्या क्षेत्रांत फार मोठे होते. समाजात त्यांना त्यांची अशी खास ओळख होती. त्यांचा मित्रपरिवार आणि लोकसंग्रहही प्रचंड होता. पण त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या मोठेपणाचं दडपण आम्हा कोणावरही कधी आलं नाही. साधनाचं प्रत्येक काम हे सर्वांचं आहे आणि सर्वांनी मिळून ते अचूक आणि उत्तमपणे पार पाडायचं यावर कटाक्ष मात्र असे.

 

1988 च्या मध्यावर आम्ही सोलापूरहून पुण्यात आलो. मुंबईत दीर्घकाळ राहिलेली मी, नवऱ्याच्या नोकरीमुळे महाराष्ट्रातील अगदी बारा नाही तरी पाच-सात गावांचं पाणी चाखलं होतं. आता मला पुण्यातल्या वातावरणाशी, पुणेरी संस्कृतीशी जुळवून घ्यायचं होतं. पुण्यात, सदाशिव पेठेत चांगलं घर मिळालं, आजूबाजूला बऱ्यापैकी ओळखी झाल्या. स्थिरस्थावर झाल्यावर ठरवलं की, आता कुठे तरी काम शोधायला हवं. कॉलेजमध्ये शिकवण्याचा पर्याय होता, पण आता मला काही तरी वेगळं, मनाला समाधान देईल असं काम करायचं होतं. विचार करताना आठवलं, सोलापूरला आमच्याकडे आले असताना वसंतकाकांनी सांगितलं होतं, ‘पुण्यात येशील तेव्हा साधनात माझ्याबरोबर काम करायला ये.’

मी मूलत: त्यांची विद्यार्थिनी असले तरी कलापथकांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचा बराच सहवास घडला होता. त्यांचा स्वभाव, त्यांची कामं करण्याची पद्धत यांची व्यवस्थित ओळख झाली होती. ओळखीच्या ठिकाणी काम करणं केव्हाही अधिक चांगलं, असा विचार करून मी साधनात त्यांना भेटायला गेले. साधनाला उत्तमोत्तम संपादकांची परंपरा होती आणि आता संपादक होते वसंत बापट आणि ग.प्र.प्रधान. मी मुंबईकर असल्यामुळे प्रधानसरांशी जरी ओळख नव्हती तरी त्यांच्याविषयी खूप ऐकलं होतं, वाचलंही होती. त्यामुळे त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून काम करण्याची मोठी संधी होती. सोलापुरात असताना दैनिक केसरीमध्ये काम केले होतं. त्याचा थोडाफार अनुभव गाठीशी होता. साधनात नवीन काही शिकायला मिळेल याची खात्री होती, त्यामुळे उत्साहाने मी साधनाच्या संपादकीय विभागात काम करायला होकार दिला.

एका दैनिकात काम करण्यापेक्षा साप्ताहिकामध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा होता. दर सोमवार, मंगळवार अंक तयार होऊन छापायला जात असे. दर गुरुवारी अंक पोस्टात पडला पाहिजे अशा बेताने सर्व काम पूर्ण करावे लागे. प्रत्येक आठवड्याला नवीन लेख, त्यांचं डीटीपी, प्रुफं वाचणं, मुखपृष्ठ अशा अनेक गोष्टी सांभाळाव्या लागत. बहुतेक वेळा वसंतकाकांकडून अग्रलेखाचं डिक्टेशन घ्यावं लागे. नवनवे अनुभव मिळत, नव्या लोकांशी ओळखी होती. हे सगळं खूप छान होतं.

साधनाच्या प्रकाशनाची कामंही बरोबरीने चालत. नवी पुस्तके, वेगळे लेखक, संपादकीय संस्कार, त्यातील मजकुराचं संगणकीकरण झालं की प्रुफं वाचणं, इतकंच नव्हे तर पुस्तकांच्या मजकुरासाठी कोणता फाँट वापरायचा, कोणत्या प्रकारचा कागद निवडायचा, मुखपृष्ठाची छपाई कशी, बाइंडिंगसाठी किती वेळ द्यायचा... पुस्तकाच्या निर्मितीची तपशीलवार प्रक्रिया जवळून अनुभवता आली.

साधनाचे दिवाळी अंकही नेहमीच खास बात राहिलेली आहे. जुलैपासूनच अंकाचं नियोजन सुरू व्हायचं. बापट आणि प्रधानसर संपादक होते त्या काळात दिवाळी अंकातील मजकूर कथा, कविता, कलाविषयक लेख किंवा कलाकारांच्या नाही तर समाजामधील खास व्यक्तींचे लेख वा मुलाखती अशा अनेकानेक विषयांनी सजलेला असायचा. अंक अधिकाधिक सुंदर मनोरंजनपर, तसंच खूप विषयांना स्पर्श करणारा असावा असा वसंतकाकांचा आणि प्रधानसरांचाही आग्रह असे. अंकाच्या जाहिरातीही मिळवाव्या लागत. या कामात सदानंद वर्दे, आप्पासाहेब सा. रे. पाटील यांच्या बरोबरीने सर्व सहकारीही भरघोस योगदान देत. हा सर्वच काळ उत्साहाने भारलेला असे. भरपूर काम करून मधेच कंटाळा आला तर त्यावर औषध म्हणून चटपटीत खाणं आणि गप्पाही असत. एखादं घरचं कार्य सर्वांनी मेहनत घेऊन पार पाडावं तशी लगबग या संपूर्ण काळात असे. या काळातील सर्व दिवाळी अंकांमध्ये संपादकांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि दृष्टिकोनाचं प्रतिबिंब पडलेलं असायचं.

वसंतकाका आणि प्रधानसर, दोघेही आपापल्या क्षेत्रांत फार मोठे होते. समाजात त्यांना त्यांची अशी खास ओळख होती. त्यांचा मित्रपरिवार आणि लोकसंग्रहही प्रचंड होता. पण त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या मोठेपणाचं दडपण आम्हा कोणावरही कधी आलं नाही. साधनाचं प्रत्येक काम हे सर्वांचं आहे आणि सर्वांनी मिळून ते अचूक आणि उत्तमपणे पार पाडायचं यावर कटाक्ष मात्र असे. म्हणूनच पडेल ते काम करताना खूप उत्साह वाटायचा. कामाच्या वेळी झडझडून काम केलं की, मग इतर वेळी टिवल्याबावल्या, चेष्टा-मस्करी करायची मुभा होती. साधनाचं आम्हा आम्हा सर्वांचं मिळून एक कुटुंब होतं. आणि आमचे कुटुंबप्रमुख होते प्रधानसर आणि वसंतकाका.

जवळजवळ दहा वर्षे मी या दोघांबरोबर त्यांची सहकारी म्हणून काम केलं. हा सगळा काळ आनंदाचा तर होताच, पण खूप काही शिकवणारा होता. त्यामुळेच तिथून निवृत्त झाल्यानंतरही, साधनाशी असलेले ऋणानुबंध आजही तसेच आहेत.

Tags: sangita bapat vasant bapat विशेषांक वसंत बापट संगीता बापट weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके