डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

संघर्षवाहिनी, भेटीखेडा, यवतमाळ. वार्षिक अहवाल

सालदारांच्या प्रश्नांवर शेतमजुरांच्या सहकार्याने झालेल्या लढ्यातील बऱ्याच उणिवा आम्हांला जाणवत होत्या. त्या आपल्यासमोर मांडणे अत्यावश्यक आहे. वृत्तपत्रांनी या लढ्याला उचलून धरल्याने त्याचा गवगवा बराच झाला. त्यामुळे आम्ही खूप काहीतरी मोठे काम केले आहे असा गैरसमज त्यामुळे झाला असण्याची दाट शक्यता आहे; पण तशी वस्तुस्थिती नाही.

जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा माझ्या एकटेपणाच्या मर्यादा जाणवू लागल्या. माया व जगदीश दुबेलाही त्यांच्या नोकरीमुळे मर्यादा पडत होत्या. त्यामुळे इतरही बाहेरच्या साथींनी यामध्ये लक्ष घालावे असेही मी वारंवार सुचवीत होतो. त्याला प्रतिसाद म्हणून देवकुमार वाचोकवार व प्रकाश बानगिरे या परिसरात जाऊन-येऊन असत.

कालांतराने त्यांचे केवळ जाऊन येऊन असणे पुरेसे नाही हेही जाणवायला लागले. कारण जोपर्यंत कार्यकर्ता तेथील माणसांमध्ये मिसळत नाहीत, त्यांच्याशी एकरूप होत नाही तोपर्यंत तेपील परिस्थितीचे आकलन होण्याला, कायद्याचा शोध घेण्याला मर्यादा पडतात हे प्रकर्षाने जाणवायला लागले. त्यामुळे त्यांनी यावयाचेच असेल तर या परिसरात येऊन राहावे अशी त्यांना मी विनंती केली. त्या विनंतीला प्रतिसाद म्हणून देवकुमार वाचोकवार यांनी या परिसरात राहायला सुरुवात केली. कामाला असताना, आंदोलन सुररू असताना आर्थिक चणचण नेहमीप्रमाणे जाणवायची ती आता तीन स्वरूपात जाणवते. आता या कामाला केवळ आपल्या हार्दिक शुभेच्छा असूनही भागणार नाही, तर आर्थिक सहायतेचा हात देण्याची आवश्यकता आहे.

आम्ही करतो त्या प्रकारची कामे विविध जिल्ह्यांत संघर्षवाहिनीचे कार्यकर्ते करताहेत. सोलापूरला भाग्यवान शिंदे हा तेथील चादर कामगारांमध्ये, सातारा जिल्ह्यात म्हसवड येथे विजय सिन्हा तेथील शेतमजुरांमध्ये, भीमराव म्हस्के धुळे जिल्ह्यात आदिवासींमध्ये, मच्छिंद्र ताडे जायकवाडी प्रकल्पांवर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये- अशा किती माणसांची नावे घ्यावीत? आज त्यांना दोन वेळेच्या सोडा एका वेळेच्या जेवण्याची व्यवस्थादेखील होणे शक्य नसेल तर ही गोष्ट तुम्हांआम्हांला शरमेची बाब आहे असे मला वाटते. केवळ आपण त्यांचे कौतुक करावे, एवढ्यानेच त्यांचा आार्थिक प्रश्न सुटेल का?

यापुढे आम्ही आपल्याकडून मासिक नियमित निधीची अपेक्षा करतो. ही रक्कम दहा रुपयांच्या वर असावी. दर महिन्याला नियमितपणे आपण सामाजिक जबाबदारीचा आर्थिक हिस्सा ठरवून घ्यावा. दर महिन्याला नियमितपणे निश्चित रक्कम देणे शक्य नसेल तर एकदम वार्षिक रक्कम आपण ठरविलेल्या हिश्याची पाठवू शकता. खालील प्रश्नांना आपल्याकडून तत्काळ प्रतिसाद येईल ही अपेक्षा.
1.  वर सुचविलेल्याप्रमाणे आपण काही आर्थिक मदत करू इच्छिता का ?
2. दर महिन्याला किती आधिक मदत आपण द्यायचे ठरविले? 
3. ती नियमितपणे दर महिन्याला आपण पाठवाल किंवा एकदम वर्षाची रक्कम देणे पसंत कराल?
या बाबत आपल्या मनात काही प्रश्न असल्यास किंवा काही योजना आपण सुचवीत असल्यास त्यांचे स्वागत आहे.
अहवाल

छात्र युवा संघर्षवाहिनीच्या राष्ट्रीय समितीच्या धोरणानुसार सघन क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करायचे तर कोणत्या क्षेत्रामध्ये, हा सर्वप्रथम प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. विचारांती यवतमाळ जिल्ह्यातील भेटीखेडा परिसर हे कामाचे क्षेत्र म्हणून निवडले. हा परिसर निवडण्यामागे खालील कारणे प्रामुख्याने होती.
1. इजारदारी अवशेष आजही या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याने जमिनीचे केन्द्रीकरण काही नेमक्या मोजक्या लोकांकडेच झाले आहे.
2. त्यामुळे अपरिहार्यपणे भूमिहीन शेतमजुरांची संख्या विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते. 
3. हा परिसर आदिवासी बहुसंख्य असा आहे. त्यामध्ये कोलाम, गोंड, गवार, समाणी, परधान इ. मागासलेल्या आदिवासी जमातींचा प्रामुख्याने समावेश आहे.

वरील तीन प्रमुख कारणांमुळे व योगायोगाने भेटीखेडा येथील हायस्कूलमध्ये माया कुलकर्णी (पत्नी) हिला नोकरी मिळाल्यामुळे जुलै, 1980 पासून येथे येऊन राहण्यास सुरुवात केली. कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाची किंवा कृतीची आखणी न करता केवळ या भागामध्ये राहावयाचे, डोळसपणे येथील परिस्थितीची पाहणी करायची, येथील समाजात असलेले ताणतणाव, राजकीय-सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक संबंधीची परस्पर अंतविरोधांची जाणीव करून घ्यावी व मुख्यतः येथील लोकांमध्ये आपली ओळख व्हावी एवढाच उद्देश व आपल्याला गरीब वर्गामध्ये वाहून घेऊन त्यांच्याशी जिव्हाळ्याचे सबंध प्रस्थापित करून वर्गीय आधारावर त्यांच्या संघटना बांधावयाच्या आहेत; ही दृष्टी ठेवून येथे कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन न करता राहावयास सुरुवात केली.

ज्या गरीब वर्गामध्ये आपल्याला काम करावयाचे आहे त्यांच्याशी संवाद साधणेच कठीण काम वाटत होते. मी बोलतो ती भाषा व त्यांची संस्कृती यांमध्ये मेळच बसत नव्हता. म्हणून सर्वप्रथम या ‘मूक' संस्कृतीला बोलकी करणे अतिशय महत्त्वाचे पण तेवढेच जिकिरीचे आहे याची जाणीव पदोपदी होत होती. चेतनाशून्य व आकांक्षाहीन माणसामध्ये चेतना व जागृतीचे काम करणे म्हणजे फार मोठे आव्हान आहे याची जाणीव प्रकर्षाने होत होती. विदर्भामध्ये कापसाला 700 रुपये मिळालेच पाहिजेत ही मागणी घेऊन शेतकऱ्यांचे आदोलन तापत होते. 20 नोव्हेंबर 1980 ला शेतकऱ्यांचा अभूतपूर्व असा 'चक्का जाम' झाला. या चक्का जाममध्ये आमच्या येथील जमीनदारांनी हिरीरीने भाग घेतला.

छोट्या कास्तकारांनाही त्यांनी त्यात खेचले. शेतमजुरांनाही शेळ्यामेंढ्यासारखे हाकत नेले. शेतमजुराला 7 रुपये मजुरी मिळालीच पाहिजे, या मागणीचाही त्यात अंतर्भाव होता. त्या आंदोलनाने ग्रामीण भाग ढवळून निघाला. तसेच शेतमजुरांमध्ये काही प्रश्न निर्माण केले. शेतकऱ्यांना ठरवून दिलेला हमीभाव आज परवडत नाही. पण शेतमजुरांना सरकारने ठरवून दिलेली मजुरीही शेतकऱ्यांकडून दिली जात नाही. शेतमजुरांना सात रुपये रोज मिळालाच पाहिजे. पण हा रोज कोण देणार? सरकार का कास्तकार? आणि जर कास्तकार हा रोज देणार असतील तर यासाठी रस्त्यावर येऊन सात रुपये रोज मिळालाच पाहिजे ही बोंब का ? 1॥ ते 2 रुपये बाईची मजुरी आणि माणसाला चार रुपये रोज ह्या महागाईच्या जमान्यात कसा पुरणार? एक नाही असे अनेक प्रश्न शेतमजुरांच्या मनामध्ये या काळात निर्माण झाले. प्रश्न परिस्थितीने निर्माण केले. त्या प्रश्नांना आम्ही वेग दिला. प्रश्न प्रत्येक शेतमजुराच्या मनामध्ये विखुरलेल्या अवस्थेत होता. त्याला आम्ही सामूहिक केले. या प्रश्नाला संघटित केले. या सामूहिकतेतूत आणि संघटित प्रश्नातून या परिसरातील शेतमजूर आंदोलनाने पेट घेतला.

13 डिसेंबर 1980 ला भेटीखेडा येथे शेतमजुरांची जाहीर सभा झाली. शेतमजुरांच्या मजुरीची मागणी या दरम्यान घेऊन लढा उभारणे शक्य नव्हते. कारण शेतीवरील बहुतांश कामे संपलेली होती. त्यामुळे त्या वेळेस सालदारांचा प्रश्न हाती घ्यावा व त्यांना सर्व शेतमजुरांनी साथ द्यावी असे ठरले. खालील मागण्यांसाठी शेतमजुरांचा मोर्चा ग्रामसेवकाच्या घरावर नेण्यात आला.
1. किमान वेतन कायद्यानुसार 1800 रु. साल सालदारांना मिळाले पाहिजेत. 
2. किमान वेतन कायद्यानुसार वर्षांच्या 24 सुट्ट्‌या देण्यात याव्यात.
3. सालदारांच्या कामाचे तास 7 असावेत.
4. रोजगार हमी योजनांतर्गत कामे सुरू करावीत.

वरील निवेदन ग्रामसेवकाला देण्यात आले व त्याच दिवशी प्रत्येक मालकाला शेतमजुर संघटनेच्या वतीने मागच्च्या नोटिसा 
पाठवण्यात आल्या व त्यामध्ये किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, याबद्दल खंत व्यक्त करून त्याची 8 दिवसांच्या आत अंमलबजावणी झाली नाही तर सालदार संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला. 19 डिसेंबरला सालदारांच्या मागण्यांसंबंधी मजूर-मालक यांची संयुक्त बैठक होऊन त्यामध्ये सालदारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. 1800 रुपयाला जी काही तूट निघत असेल ती एक महिन्याच्या आत देण्याचे मान्य झाले.

या घटनेचे लोण आसपासच्या खेड्यांमध्ये पोहोचू लागले. भेटीखेड्यापासून एकदीड मैलावर असलेल्या वालोती या गावीदेखील 
अशाच प्रकारे याच मागण्या घेऊन 28 डिसेंबरला शेतमजुरांची सभा झाली. 10 जानेवारीपर्यंत या मागण्यांच्याबाबत मालकांनी विचार करावा अन्यथा सालदारांना ‘हाय जाम’ करावा लागेल, असा लेखी इशारा स्थानिक शेतमजूर संघटनेच्या वतीने देण्यात आला. पण त्याची कोणत्याही प्रकारे मालकांतर्फे दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे 11 जानेवारीपासून सालदारांचा संप सुरू झाला. 13 जानेवारीपर्यंत हा संप सुरू होता. 13 जानेवारीला किमान वेतन कायदा निरीक्षक यांनी मध्यस्थी केली आणि मालकांनी मागण्या मान्य केल्या, पण त्या गावातील एक जमीनदार नूरअली करमअली गिलानी यांनी त्या मागण्या फेटाळल्या. बऱ्याच अंशी मागण्या मान्य झाल्याने संप मागे घेण्यात आला.

त्यानंतर जिल्हा कामगार अधिकारी यांनी नूरअली गिलानी व त्यांचे सालदार यांच्यामध्ये मध्यस्थी घडवून आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यालाही मालकाने दाद दिली नाही. 24 फेब्रुवारी 81 ला स्थानिक शेतमजूर संघटनेच्या वतीने नूरअली गिलानीच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्याचे ठरविले. नेहमीप्रमाणे पोलिसांनी हा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, आम्हांला आदल्या रात्रीच अटक करण्याचा प्रयत्न झाला; पण त्या दिवशी आम्ही त्यांना सापडलो नाही. याच दरम्यान नूरअली गिलानीने धर्माचा आधार घेण्यास सुरुवात केली. मुस्लीम माणसाच्या प्रतिमेचे का होईना दहन करणे म्हणजे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे, असा कांगावा त्याने सुरू केल्याने आर्थिक लढ्याला धार्मिक स्वरूप येऊ नये म्हणून केवळ पुतळा काढण्यात आला. त्याचे दहन करण्याचा कार्यक्रम मागे घेण्यात आला. पण एकंदरीत कार्यक्रमाचा प्रभाव व परिणाम तेवढाच साधला गेला. हा मोर्चा व सभा मोरटा ह्या गावी झाली होती. त्यामध्ये आसपासच्या दहा ते पंधरा गावांच्या शेतमजुरांनी भाग घेतला. लढा प्रत्यक्षात दोनच गावांत दिला गेला. पण त्याचे पडसाद आसपासच्या15-20 गावांमध्ये उमटले.

लढ्याचे झालेले प्रत्यक्ष परिणाम :
1. भेटीखेडा, पालोती या गावांतील 150 सालदारांना वर्षाला सरासरी 1300-1400 रु. साल पडायचे. ही तूट धरली तर त्या लढ्यामुळे 150 सालदारांना 30 ते 40 हजार रुपये तुटीची रक्कम म्हणून ताबडतोबीने द्यावी लागली.
2. दर गुढीपाडव्याला (आमच्याकडे त्याला मांडवस म्हणतात.) नवीन सालदार ठेवले जातात किंवा जुन्यांमध्ये नवीन करार होतो. लढ्यापूर्वी या परिसरात 500 रु. साल (रोख) व वर्षाची ज्वारी वस्तुरूपात- असे साधारणः साल सालदाराचे असावयाचे. या 

लढ्यानंतर या परिसरातील 20 ते 25 गावांमध्ये सरासरी 1200 रु. रोख व वर्षाची 720 किलो ज्वारी इतके प्रमाण वाढले. म्हणजे रोखीत 700 ते 800 रु. नी वाढ झाली व त्यात ज्वारीची वाढलेली किंमत धरली तर 1000 ते 1500 रु. नी सालदाराच्या सालामध्ये वाढ झाली. खालील परिणाम अप्रत्यक्ष आहेत, पण महत्त्व अनन्यसाधारण आहे.
1. शेतमजुरांमध्ये असलेल्या संघटिन शक्तीचे भान त्यांना झाल्यामुळे एकी केली, संघटना केली तर आपण काही मिळवू, याची जाणीव त्यांना झाली. 
2. त्या परिसरातील जमीनदारांचा शेतमजुरांच्या मनातील दरारा बऱ्याच अंशी कमी झाला. आज खुलेआमपणे त्यांच्याविषयी ते बोलतात.
3. शासन यंत्रणा ही केवळ नाममात्र आहे व वेळ पडल्यास कायदा मजुरांच्या बाजूचा असूनसुद्धा ती यंत्रणा मात्र मालकधार्जिणी आहे, याची जाणीव झाली.
4. किमान वेतन कायद्याचा भंग करणारे जमीनदार उजळ माथ्याने फिरतात, पण त्याची अंमलबजावणी व्हावी असा आग्रह धरणाऱ्यांच्या मागे मात्र पोलीस हात धूवून लागतात याची जाणीवही या लढ्यानंतर झाली. पोलिसांची असलेली भीती पूर्णतः नष्ट झालेली नसली तरीही ही भीती चेपली.
5. ‘आम्ही कोणाच्या बाजूचे, तर गरिबांच्या बाजूचे,’ ही प्रतिमा मालक व मजूर दोघांनाही स्पष्ट झाली.
6. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे गरिबांची ‘मूकसंस्कृती' ही थोडी बोलकी झाली.
7. रोजगार योजनेची कामे आमच्या परिसरात लढ्याच्या वातावरणाच्या रेटपाने सुरू झाली.

कोणत्याही प्रस्थापित हितसंबंधांना धक्का देणारा लढा झाला म्हणजे त्यामध्ये भाग घेणाऱ्यांवर आर्थिक, शारीरिक आघात केले जातात किंवा तसे प्रयत्न होतात. याही बाबतीत हेच घडले. जे सालदार किंवा मजूर पुढाकार घेऊन काही करत असतील त्यांना कामावर घ्यायचे नाही, त्यांना सालदार म्हणून ठेवायचे नाही, लढ्यातील प्रमुख लोकांना या ना त्या पोलीस केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करायचा, हे नित्याचे प्रकार येथेही प्रस्थापितांकडून घडून आले.

सालदारांच्या प्रश्नांवर शेतमजुरांच्या सहकार्याने झालेल्या लढ्यातील बऱ्याच उणिवा आम्हांला जाणवत होत्या. त्या आपल्यासमोर मांडणे अत्यावश्यक आहे. वृत्तपत्रांनी या लढ्याला उचलून धरल्याने त्याचा गवगवा बराच झाला. त्यामुळे आम्ही खूप काहीतरी मोठे काम केले आहे असा गैरसमज त्यामुळे झाला असण्याची दाट शक्यता आहे; पण तशी वस्तुस्थिती नाही.

1. एकतर लढा आम्ही सुरू केला नाही. शेतकरी आंदोलनाने जे प्रश्न निर्माण झाले त्यावर आम्ही केवळ भर दिला. त्यामुळे 
परिस्थितीलाच याचे श्रेय मोठ्या प्रमाणात जाते.

2. या आंदोलनामध्ये आम्ही स्त्रियांना सहभागी करून घेऊ शकलो नाही. स्त्रियांच्या सहभागाचा अभाव ही फार मोठी उणीव या लढ्यामध्ये आम्हांला जाणवत होती. त्यांच्या सहभागाच्या दिशेने आम्ही केलेले प्रयत्न तोकडे पडले.

3. सालदारांचा प्रश्न घेऊन लढताना शेतमजूर संघटना स्थापन केली. तो प्रश्न सुटला आणि शेतमजूर संघटना संपली, असा काहीसा प्रकार घडला. एक तर या संघटनेची रचना कशी असेल किंवा आधार काय असेल, सदस्यांची गुंफण कशी राहील याविषयी आमच्याही मनात प्रश्न असल्याने शेतमजुरांच्या शक्तीला ठोस संघटनेचे स्वरूप देण्यात आम्ही अयशस्वी झालो.

4. सपूर्ण लढ्यामध्ये मी व जगदीश दुबे 'हिरो’ झालो; पण कार्यकर्त्यांची पाहिजे त्या प्रमाणात फळी निर्माण करू शकलो नाही. जी काही कार्यकर्ते मंडळी ह्या लढ्यामधून समोर आलीत त्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा व्यापक सहभाग वाढविण्याच्या दिशेनेही आम्हांला अपयश आले. त्यामुळे टीम अशी निर्माण झाली नाही. या दृष्टीने आम्ही तोकडे पडत आहोत.

5. ग्रामीण परिसरामध्ये सातत्याने चालविल्या जाऊ शकणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेण्याची क्षमता आमच्यामध्ये नाही की काय, असे वाटू लागले आहे. अशा कामांचा, अशा कार्यक्रमांचा शोध आम्हांला आहे की जी कामे हळुवारपणे चालतील, वरकरणी जी निरुपद्रवी वाटतील, पण त्यामधून निर्माण होणारी शक्ती पुढे होणाऱ्या लढ्याच्या उपयोगी येईल व समाजपरिवर्तनाच्या दिशेने लढा पुढे नेता येईल.
 

Tags: कार्यअहवाल जि. यवतमाळ भेटीखेडा ‘संघर्षवाहिनी’ work report dist. yavatmal bhetikheda 'sangharshwahini' weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके