डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भूतकाळाने आम्हांस घडविले आहे, वर्तमानाने मार्गदर्शन केले आहे आणि भविष्य आमची वाट पाहात आहे, यावर आवाबार्इंचा दृढ विश्वास होता. त्यांच्यातील नेतृत्वगुण, त्यांचे कर्तृत्व, जनसामान्यांच्या मनात आपल्या कार्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचे कौशल्य तसेच त्यांची स्मरणशक्ती हे सर्व थक्क करणारे आहे. त्यांच्या स्वभावातील अकृत्रिमतेुळे स्वत:ला त्यांनी सहजतेने स्वीकारले. त्यामुळे पाच तपे त्यांनी स्वत:ला झोकून देऊन स्वयंसेवी वृत्तीने कार्य केले. The Light is ours या आत्मकथनपर ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडला आहे.   

  

कुटुंबनियोजन आणि स्त्री-आरोग्य या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आवाबाई वाडिया यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कुटुंब छोटे ठेवण्यासाठी कुटुंबनियोजन आवश्यक आहे ही संकल्पना जनमानसात रुजविण्याचे आणि तिचे संवर्धन करण्याचे कार्य हे आवाबार्इंनी आपले जीवनकार्य मानले.

‘आवाबाई’ ह्या श्री.ज.शं.आपटे यांनी लिहिलेल्या छोटेखानी चरित्रात आवाबार्इंचे जीवन आणि त्यांचे कार्य यांचा परिचय होतो. लेखक स्वत: या क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या या चरित्राचा अभ्यासकांना खूप उपयोग होण्यासारखा आहे.

छोटे कुटुंब या संकल्पनेसाठी आपले अवघे जीवन वाहून टाकणे ही एक प्रकारची सामाजिक क्रांतीच म्हटली पाहिजे. आवाबार्इंनी केलेले कार्य इतके मोठे होते, की त्यांची ख्याती देशाच्या सीमा ओलांडून जगभर पसरली. लोकसंख्या नियंत्रित ठेवायची असेल तर कुटुंबनियोजन केले पाहिजे, या संकल्पनेचे प्रणेते होते थोर समाजसुधारक र.धों.कर्वे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देत आपल्या स्वीकृत कार्यापासून यत्किंचितही न ढळलेल्या र.धों.कर्व्यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन अनेक संस्थांनी आणि स्वयंसेवी वृत्तीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अनुसरले. शकुंतला परांजपे आणि आवाबाई वाडिया ही त्यांतील महत्त्वाची नावे.

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 1913 मध्ये जन्मलेल्या आवाबार्इंना समाजकार्याचा, सहृदय वृत्तीचा वारसा माहेराहून मिळाला. आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांच्यावर थिऑसॉफिकल सोसायटीची छाप पडली. म्हणूनच त्या सोसायटीतर्फे यूथ लॉजची स्थापना झाल्यावर आवाबार्इंनी सचिवपदाची जबाबदारी घेतली. तेथे केलेले कार्य ही त्यांच्या सार्वजनिक कार्याची पूर्वतयारी होती.

1928 मध्ये त्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या. सर्व शिक्षण प्रथम वर्गामध्ये पूर्ण करून त्यांनी कायद्याची ‘बार ॲट लॉ’ ही पदवी विशेष प्रावीण्यासह मिळवली. त्यानंतर तेथील ख्यातनाम सॉलिसिटर पोलक यांच्याबरोबर कामाचा अनुभव घेत असतानाच इंग्लंडमधील वास्तव्यात स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ब्रिटिश संघटनांतही त्या सहभागी झाल्या.

फेब्रुवारी 1935 मध्ये केलेल्या एका भाषणात आवाबार्इंनी संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचे समर्थन केले. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वुइमेन इन सिलोन’च्या त्या संस्थापक सदस्य होत्या. 1941 मध्ये आवाबाई कायमच्या वास्तव्यासाठी मुंबईत आल्या. मुंबईत आल्यानंतर त्यांचे मित्रवर्तुळ अधिकच विस्तारले.

या दरम्यान त्यांच्या भावाचे मित्र असलेल्या डॉ.बोमी वाडियांशी परिचय झाला. दोघांच्या समान आवडी, वाडियांचे चौफेर वाचन, त्यांची राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांची विशेष समज यामुळे त्यांची मैत्री घनिष्ट झाली. 1946 मध्ये आवाबाई मेहता आवाबाई वाडिया झाल्या. मुंबईमध्ये आवाबार्इंनी समाजकार्यामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्या महाराष्ट्र महिला समितीच्या सदस्य आणि नंतर संसदीय समितीच्या सभासदही झाल्या.

स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भातील विधेयकासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. 1952 मध्ये इटलीमध्ये झालेल्या परिषदेत ‘इंडियन फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी वुईमेन’चे प्रतिनिधित्व आवाबार्इंनी केले, पण त्यांना विशेष रस होता ‘अखिल भारतीय महिला परिषदेच्या कार्यात. अखिल भारतीय महिला परिषदेतर्फे कोणत्याही आरक्षणाशिवाय प्रौढ मतदान हक्क मिळावा अशी मागणी करण्यात आली. बेगम शरीफा हमीद अली, लेडी अब्दुल कादिर, कुलसुम सयानी, हिराबाई दास, मिथान लाम, राजकुमारी अमृत कौर, अच्चम्मा मथाई अशा विविध धर्मांच्या स्त्रियांच्या समवेत काम करताना आपण सर्व एक आहोत ही मुक्त, मोकळी आणि समृद्ध भावना त्यांच्या मनात होती.

परिषदेमध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वासोबत काम करण्याची संधी आवाबार्इंना मिळाली. त्यामुळे आवाबार्इंच्या जीवनाला कलाटणी मिळाली. इंग्लंडमध्ये घेतलेले शिक्षण, जनसंपर्क आणि तेथील महिला चळवळीतील कार्यकर्त्यांबरोबरचा परिचय या साऱ्यांचा उपयोग त्यांना संस्थेचे काम करताना झाला. महिला हक्कांसंबंधीची सनद तयार करताना सर्व नागरिकांना समानता, स्त्री-पुरुषांना समान मताधिकार आणि प्रतिनिधित्व यांचा समावेश त्यात करण्यात आला.

परिषदेतर्फे देशभर, विशेषत: ग्रामीण भागात आरोग्यप्रकल्प राबवण्यात आले. त्यामध्ये आवाबार्इंचे महत्त्वाचे योगदान होते. परिषदेच्या कामाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक, सामाजिक समितीत त्यांस सल्लागारपदाचा दर्जा देण्यात आला. फाळणीनंतर देशभर उसळलेल्या दंगलींत परिषदेने आपद्‌ग्रस्त स्त्रीपुरुषांना साहाय्य केले. सन 1949 मध्ये ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना झाली आणि संस्थेचे मानद सचिवपद आवाबार्इंना मिळाले. त्या काळामध्ये, जेव्हा समाजात कुटुंबनियोजन केले पाहिजे या कल्पनेचा प्रसार झाला नव्हता तेव्हा या नाजुक पण महत्त्वाच्या विषयासंबंधी काम करणे ही साधी गोष्ट नव्हती.

मुंबई महापालिकेने या महत्त्वाच्या सेवेची आवश्यकता मान्य केली आणि प्रारंभी दादर आणि गिरगाव येथे दोन संततिनिययमन केंद्रे सुरू केली. बहुसंख्य महिलांना, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संततिनियमन आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी वृत्तपत्रांतून लेख, भाषणे या माध्यमांची नितांत आवश्यकता होती. आवाबार्इंनी आपल्या सहकाऱ्यांसह या कामाला वाहून घेतले. भारताप्रमाणेच जपान, अमेरिका, इंग्लंड, स्कँडिनेव्हिया अशा अनेक देशांमध्ये कुटुंबनियोजनासंबंधीच्या अनेक परिषदांना आवाबाई हजर राहिल्या. तेथील कार्यकर्त्यांचे अनुभव आणि आपले अनुभव यांची देवाणघेवाण केली.

या प्रश्नाच्या संदर्भात आवाबार्इंनी विपुल लिखाण केले. काही काळ रूसी करंजियांच्या Blitz मध्येही महिला प्रश्न आणि कल्याणकारी कार्य या विषयावर त्यांनी स्तंभलेखन केले. दिल्लीतील आशियाई संबंध परिषदेसाठी मोठा लेख लिहिण्याचा ऐतिहासिक बहुमान आवाबार्इंना मिळाला. कुटुंबनियोजन आणि स्त्रीचे आरोग्य, तिला मिळणारे समान हक्क, मताधिकार या प्रश्नांसंदर्भात आवाबार्इंनी केलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय होते. या कार्याबद्दल त्यांना अनेक सन्मान, अनेक पुरस्कार मिळाले. त्यांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा लोकसंख्या पुरस्कार, Third World Foundation चे पारितोषिक, रोटरी इंटरनॅशनलचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार, मुंबईच्या रोटरीने दिलेले मानपत्र, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार, पॉप्युलेशन इन्स्टिट्यूट या अमेरिकास्थित संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार ह्यांचा समावेश आहे.

इंटरनॅशनल प्लॅन्ड पेरेंटहूड फेडरेशनचे अध्यक्षपद आवाबार्इंनी सहा वर्षे सांभाळले. शिवाय फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या त्या 14/15 वर्षे सचिव आणि 1963 ते 1998 पर्यंत अध्यक्षही होत्या. आवाबार्इंना दीर्घायुष्य लाभले. त्यातला दीर्घ काळ, सुमारे 60 वर्षे त्यांनी आपल्या स्वीकृत कार्यासाठी जिवाचे रान केले. विश्व बँकेने आयोजित केलेले चर्चासत्र, 1990च्या दशकात कोपनहेगन, कैरो, बीजिंग येथील जागतिक परिषदांत सहभाग, 1993 च्या अखेरीस माल्टा येथे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ‘कुटुंब’ या विषयावर झालेल्या परिषदेत सहभाग, त्याचप्रमाणे वाराणसी विद्यापीठ, कर्नाटक, मालूर इत्यादी ठिकाणच्या ग्रामीण भागांत प्रकल्प, प्रजनन आणि कुटुंबनियोजन या कामात समूह-सहभागाद्वारे जनसामान्यांचा पुढाकार असे अनेकविध प्रकारचे कार्य त्यांनी केले.

भूतकाळाने आम्हांस घडविले आहे, वर्तमानाने मार्गदर्शन केले आहे आणि भविष्य आमची वाट पाहात आहे, यावर आवाबार्इंचा दृढ विश्वास होता. त्यांच्यातील नेतृत्वगुण, त्यांचे कर्तृत्व, जनसामान्यांच्या मनात आपल्या कार्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचे कौशल्य तसेच त्यांची स्मरणशक्ती हे सर्व थक्क करणारे आहे.

त्यांच्या स्वभावातील अकृत्रिमतेुळे स्वत:ला त्यांनी सहजतेने स्वीकारले. त्यामुळे पाच तपे त्यांनी स्वत:ला झोकून देऊन स्वयंसेवी वृत्तीने कार्य केले. The Light is ours या आत्मकथनपर ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या आयुष्याचा लेखाजोखा मांडला आहे. ‘बार ॲट लॉ’ ही कायद्याची उच्च पदवी प्राप्त केलेल्या आवाबार्इंना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून भरपूर पैसा मिळविणे आणि सुखासीन आयुष्य जगणे सहज शक्य होते. पण तसा विचारही मनात न आणता त्यांनी आपले आयुष्य स्त्रियांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि मुख्य म्हणजे आरोग्यासाठी वेचले.

आवाबार्इंनी आपल्या इच्छापत्रात फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे कार्य पुढे सुरू रहावे म्हणून मोठ्या रकमेची तरतूद करून ठेवली. त्यातून आवाबाई वाडिया आरोग्य केंद्र आजही कार्यरत आहे. आवाबार्इंच्या पश्चात्‌ त्यांचे कार्य सुरू राहणे हेच त्यांचे योग्य स्मारक म्हटले पाहिजे.

‘आवाबाई’

लेखक : ज.शं.आपटे

Ph.: 020-25541564

अक्षर प्रकाशन, मुंबई Mob: 9322391720

किंमत : 125/- रुपये  

Tags: कुटुंबनियोजन प्रजनन आरोग्य केंद्र फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन आवाबाई वाडिया Family Planning Reproduction Health Center Family Planning Association Awabai Wadia weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके