डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

तिन्ही लोक आनंदाने भरुन गाउ दे

ललित संगीताच्या विश्वामधले थोर कलाकार, चित्रपट संगीत आणि भावगीत गायन या दोन्ही क्षेत्रातले अभिक्रमशील संगीतकार सुधीर फडके - रसिकांचे आवडते बाबूजी - आपल्या आयुष्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना आणि त्यांच्या शब्दप्रधान संगीताला प्रदीर्घ आयुष्य लाभो. त्यांच्या यंदाच्या जन्मदिनी, 25 जुलैला समस्त गानवेड्या महाराष्ट्राबरोबर साधना त्यांना अभिवादन करीत आहे.

सुधीर फडके! सहा अक्षरे असलेले छोटेसे नाव आणि त्याला साजेशीच छोटीशी शरीरयष्टी. पण वरवर दिसते तशी ही बटूमूर्ती साधी नाही. याचा प्रत्यय त्या मूर्तीच्या कंठातून निघालेले स्वर आपल्याला गेली जवळजवळ पन्नास वर्षे आनंद देत आले आहेत. या नावाची आणि ते धारण करणाऱ्या बाबुजींची मोहिनी अवघ्या महाराष्ट्राच्या जनमानसावरून अद्यापही कमी झालेली नाही. मराठी चित्रपटसृष्टी आणि भावगीतसृष्टी समृद्ध करण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. एक गायक म्हणून आणि संगीतकार म्हणूनही महाराष्ट्रातील रसिकांनी त्यांच्यावर अमाप प्रेम केले. बाबूजींना पैसा, प्रतिष्ठा, समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. पण हे व स्थान अर्थातच एका रात्रीत मिळाले नाही. त्यामागे निरलसपणे केलेले अथक परिश्रम, संगीताचा ध्यास आणि अफाट जिद्द या सर्व गुणांचे पाठबळ उभे आहे.

कोल्हापूर-पुणे-मुंबई असे स्थलांतर त्यांना करावे लागले ते उदरभरणासाठी, हे तर खरेच पण भारतीय संगीताच्या क्षेत्रात काही तरी वेगळे करून दाखवण्याचा ध्यासही त्याला कारणीभूत होता. 1946 मध्ये प्रभात फिल्म कंपनीत खऱ्या अर्थाने त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली. पुण्यातले हे त्यांचे वास्तव्य एका दृष्टीने त्यांना फलदायी ठरले. या काळात त्यांनी संगीतबद्ध केली कितीतरी गाणी खूप लोकप्रिय झाली. 'मनोरथा चल त्या नगरीला’, ’अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी‘, `चांदण्यात चालू दे मंद नाव नाविका’, 'नखानखांवर रंग भरा' अशा काही गाण्यांचा वानगीदाखल उल्लेख केला तरी तो पुरेसा आहे. त्यानंतर मग आली त्यांची मुंबईतील कारकीर्द. सरोवरातून एखादा मासा समुद्रात यावा तसे सुधीर फडके पुण्याहून मुंबईला आले. गंमत म्हणजे त्यांच्या आयुष्याचे एक महत्वाचे पर्व ते मुंबईला आल्यानंतर पुण्यात घडले. 1952 मध्ये पुण्याचे आकाशवाणी केंद्र सुरु झाले होते. सीताकांत लाड यांच्यासारखे अतिशय गुणग्राहक अधिकारी तेथे होते आणि एक वर्षभर चालेल अशा एका कथेवरच्या संगीतमय कार्यक्रमाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी राम सीता यांची रसिक-भाविक मनांना सदैव आवडणारी कथा गुंफावी असे निश्चित झाले.

ग. दि. माडगूळकरांसारखा भाषाप्रभु कवि, संगीतकार सुधीर फडके आणि ती गाणी गाण्यासाठी नामवंत गायकगायिका असा संयोग घडून आला आणि 1955 सालच्या रामनवमीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक नूतन पर्व अवतरते. गीतरामायण या चिरतरुण काव्यामुळे माडगुळकर-फडके अशी जोडी जमली. तिने मराठी सांगितात संगीतात इतिहास घडविला. गीतरामायण म्हणजे माडगूळकर आणि फडके हे समीकरण मराठी रसिक मनावर कायमचे कोरले गेले. सुधीर फडके यांची सांगीतिक वाटचाल प्रामुख्याने गायक आणि संगीतकार या त्यांच्या दोन रुपांनी सिद्ध झालेली आहे. संगीतकार म्हणून सुधीर फडके अधिक श्रेष्ठ आहेत की गायक म्हणून, अशी तुलना करणे म्हणजे त्यांच्यातल्या सर्जनशील कलाकारावर अन्याय करणे ठरेल. रसिकांच्या दृष्टीने या तुलनेला काहीही महत्त्व नाही. कारण त्यांना मतलब आहे तो बाबूजींनी स्वतः गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या अचीट गोडीच्या गाण्यांशी. त्यांच्या संगीत नियोजनाखाली अनेक नामवंतांनी गायन केले आहे. त्या सर्वानाच बाबूजींची गाणे शिकवण्याची, गाण्यातले शब्दोच्चार आणि भावना यांना न्याय देण्यासाठी त्यांना वाटत असलेल्या तळमळीची आणि आपल्या मनातले गाणे सहीसही उतरावे यासाठी मेहनत घेण्याची त्यांची वृत्ती अतिशय आवडलेली आहे.

आपल्या गायनावर बाबूजींच्या शिकवण्याचे चांगले संस्कार झाल्यामुळे ती गाणी अधिक उत्तम होऊ शकली अशी त्यांची श्रद्धा आहे. रूढ अर्थाने सुधीर फडक्यांनी आपला शिष्यवर्ग वगैरे तयार केला नसला तरी आपल्या गायकांना त्यांनी जे दिले त्याचे मोल अधिक आहे. संगीतकार म्हणून आपल्या गायिकांनी आपल्या कल्पनेतले गाणेच सहीसही उतरवले पाहिजे हा जसा त्यांचा आग्रह असतो, त्याचप्रमाणे ते जेव्हा गायक म्हणून इतर संगीतकारांची गाणी गातात तेव्हा त्या त्या संगीतकाराला हवे तसे गाणे आपण दिले पाहिजे याबद्दलही ते अतिशय दक्ष असतात.

जीवनाच्या वाटचालीतल्या 75 व्या मैलापाशी गायक, संगीतकार सुधीर फडके आता पोचले आहेत. त्यांच्या पली, एकवेळच्या प्रसिद्ध गायिका ललित (देऊळकर) फडके, त्यांचा वारसा लाभलेला कर्तृत्ववान पुत्र श्रीधर या दोघांचाही या वाटचालीत महत्त्वाचा सहभाग आहे. पण सुधीर फडके म्हणजे फक्त गायकच नाही - सुधीर फडके म्हणजे कट्टर हिंदुत्वनिष्ठ, सावरकरांवर अलोट भक्ति करणारा उपासक; सुधीर फडके म्हणजे स्वतःच्या मुलाइतकीच दत्तक मुलावरही माया करणारा प्रेमळ पिता आणि सुधीर फडके म्हणजे नीती, मूल्ये जपणारा, भ्रष्टाचाराची चीड असणारा गृहस्थ, दादर- नगरहवेलीच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतलेला देशप्रेमी सैनिक, जिवाला जीव देणारा मित्र. आपल्या आवाजाची मोहिनी जनमानसावर पसरवणारा अव्वल दर्जाचा गायक, अनेक गाण्यांसाठी आठवणीत राहणारा संगीतकार ही त्यांची रसिकांना खरी देणगी आहे.

75 च्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देताना आज मला आठवते आहे ते त्यांचे शिवाजीपार्कचे घर, समोर राहणारे त्यांचे मित्र संगीतकार यशवंत देव यांच्याशी गॅलरीतून झालेल्या त्यांच्या गप्पा आणि पहाटे पहाटे त्यांच्या घरातून येणारे त्यांच्या रियाजाचे सूर. बाबूजी, अमृतमहोत्सवी वर्षामध्ये तुमचे सारे संकल्प पुरे व्हावेत अशा शुभकामना आम्ही, तुमचे रसिक देतो, त्यांचा स्वीकार करा.

Tags: ग. दि. माडगुळकर गीतरामायण संगीतकार सुधीर फडके बाबूजी Sudhir fadke weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके