डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ट्रम्प हरतील, पण आता ओबामा नसतील!

बराक ओबामा ही बदलाची अभिव्यक्ती असेल, तर डोनाल्ड ट्रम्प ही बदल्याची अभिव्यक्ती आहे. महिलांच्या संदर्भातील विधानांनी ट्रम्प यांची लायकी ज्यांना समजली; हेच ट्रम्प मुस्लिमांबद्दल बोलत असताना, स्थलांतरितांबद्दल आग ओकत असताना मात्र त्यांना ती समजत नव्हती. देशोदेशीचे ओबामा एकाकी पडत असताना, सगळ्या ठिकाणच्या 56 इंची ट्रम्प्सची मात्र सध्या चलती आहे. ‘वर्तमानानं माझ्यावर अन्याय केला असला, तरी इतिहास मला न्याय देईल’, हेच सगळ्या ओबामांचं समकालीन स्वगत आहे. अमेरिका इतकी नशीबवान की, तिथल्या उघड्या-वागड्या आणि दीर्घ अशा संवादी प्रचार मोहिमांनी ‘ट्रम्प वेळीच पंक्चर’ झाले. सगळेच ट्रम्प एवढे दुर्दैवी (आणि असे बेदरकारही!) नसतात! अशा जगात आपण आहोत, जिथे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हरतील, पण आपल्यासोबत आता ओबामा नसतील!... निमित्त ‘ओबामा ते ट्रम्प’ या प्रवासाचे, मांडणी- भारताच्या विशेष संदर्भासह- बदलत्या जगातील पेचांची!

बराक ओबामांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे सर्वप्रथम स्वीकारली, त्याच वर्षी भारतात डॉ.मनमोहनसिंग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. बराक हुसेन ओबामा हे नाव अमेरिकी अध्यक्षांच्या यादीत वेगळे भासते, तसेच डॉ.मनमोहनसिंग हे नावही भारतीय पंतप्रधानांच्या यादीत अपवादात्मक दिसते! ओबामा यांना प्राथमिक फेरीत सुरुवातीला काही क्षण ज्यांनी घामाघूम केले, त्या हिलरी क्लिंटन आता अमेरिकेच्या अध्यक्ष होऊ पाहत आहेत. इराक युद्धाला पाठिंबा देणाऱ्या, ओबामांच्या पुढे कडव्या वाटलेल्या हिलरी आता सर्वाधिक सौम्य आणि सर्वसमावेशक वाटाव्यात, ओबामांच्या पुढे ‘डिबेट’मध्ये सुमार आणि सवंग वाटणाऱ्या हिलरी आता सर्वाधिक मुद्देसूद व संयत वाटाव्यात, कविमनाच्या मृदू ओबामांपुढे रुक्ष, यांत्रिक वाटणाऱ्या हिलरी आता कमालीच्या नितळ भासाव्यात  अशा वळणावर अमेरिकी निवडणूक येऊन ठेपली आहे.

2008 ची अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीची प्रचार मोहीम सुरू असताना, पालक आपल्या मुला-मुलींना सोबत घेऊन ती डिबेट्‌स बघत असत. जॉन मॅक्केन आणि बराक ओबामा यांची ती डिबेट्‌स कमालीची रंगत.  साधी गोष्ट बघा. ओबामांना विरोध करणारेही त्यांचे वक्तृत्व, त्यांचे मुद्दे, मांडणी याच्या प्रेमात होते. तो काळही वेगळा होता. अमेरिका आर्थिक धक्क्यातून सावरलेली नव्हती. फरीद झकेरियासारखे विचारवंत पत्रकार The Post American World'’ सारखी भूमिका मांडत होते. बदललेले जग आणखी बदलत होते. अमेरिका हादरलेली होती. अशा वेळी ओबामा अमेरिकेचे खरे बळ सांगत होते.

अमेरिकेची लोकसंख्या ती किती? आपल्या उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या एकत्रित लोकसंख्येएवढी. जगाच्या लोकसंख्येत पाच टक्क्यांचा वाटा नाही. पाचशे वर्षांपेक्षा अधिक इतिहास नाही. म्हणजे, आपले ज्ञानदेव ‘आता विश्वात्मके देवे’ म्हणत होते, तेव्हा अमेरिकेचा जन्मही झाला नव्हता. संरक्षण, लष्कर हे अमेरिकेचे बळ आहेच. (किंबहुना, अनेक ‘राष्ट्रवादी’ अमेरिकींना तेच तर एकमेव बळ वाटते!) जगातल्या मोठ्या सात-आठ देशांचा संरक्षणविषयक अर्थसंकल्प एकत्र केला तरीही तो छोटा वाटेल, एवढा प्रचंड खर्च संरक्षणावर करणारी अमेरिका. अध्यक्ष हा या संरक्षण दलांचाही प्रमुख. कमांडर-इन-चीफ.

पण, अमेरिका म्हणून मोठी होत नाही. मागे मी म्हटले होते- अमेरिका मोठी होते, कारण अमेरिकेचे अध्यक्ष (अब्राहम लिंकन) शाळेच्या हेडमास्तरांना पत्र पाठवू शकतात. आपल्या वसंत बापटांनी केलेला त्या पत्राचा मराठी अनुवाद शाळाशाळांच्या (फक्त!) भिंतींवर आजही आहे. (प्रत्यक्षात, लिंकननी असे कोणतेच पत्र पाठवले नव्हते, अशीही एक थिअरी आहे. अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टीला अशा दोन थिअरी असतात. ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ आणि अमेरिका हे एकत्र नांदणारे प्रकरण! पण, ते सोडा. लिंकन असे पत्र लिहू शकतात!) आजही अमेरिकेचा शिक्षणावरील खर्च एकूण महसुलाच्या 14 टक्के आहे.

अमेरिका मोठी आहे. कारण अमेरिकेत मायकेल जॅक्सन आहे, हॉलिवूड आहे, हार्वर्ड आहे. ग्रेग लुगानीस आहे. गुगल आहे. फेसबुक आहे. अमेरिकेत नोम चोम्स्की आहे. धाकटा जॉर्ज बुश नावाचा माणूस थोरला वाह्यातपणा करत असताना, चोम्स्की रोज त्याच्या कानाखाली वाजवत होते. आणि, तरीही चोम्स्कीला कोणी देशद्रोही म्हटले नाही.

जगभर लष्करी तळ निर्माण करणारी, जगाला कायम युद्धाच्या सावटाखाली ठेवणारी, ठिकठिकाणी ‘पाकिस्तान’सारखे बेताल टगे निर्माण करून स्वतःची दादागिरी वाढवणारी अमेरिका- ही या देशाची जगभरातील प्रतिमा. ती खोटी नाही. युद्ध नावाचं ‘रेव्हेन्यू मॉडेल’ उभं करणारी अमेरिका ही बलाढ्य कंपनी. जॉर्ज बुशसारखे अध्यक्ष त्या अमेरिकेला बळ देत होते. युद्धाच्या वणव्यावर स्वतःच्या पोळ्या भाजून घेणाऱ्या अमेरिकेच्या या चेहऱ्याला खरा तडाखा दिला तो ओसामाने. आणि अमेरिकेच्या खऱ्या आशयासह तिला तिचा चेहरा दाखवला तो ओबामांनी. ही अमेरिका नाही, जिचं तुम्हाला कौतुक आहे! अमेरिका ती आहे- जिथे एका गोऱ्या आईच्या, कृष्णवर्णीय बापाच्या पोटी जन्माला आलेला पोरगा त्याच्या कृष्णवर्णीय बायकोसह अध्यक्षपदाचं स्वप्न पाहू शकतो. प्रत्यक्षात उतरवू शकतो. ओसामा आणि ओबामा अशा नावातल्या साधर्म्यानं ज्यांची टिंगल झाली, त्या ओबामांचं राजकीय जीवन ‘ओसामा’ या नावामुळंच संपेल, असं बोललं गेलं. काव्यात्म न्याय असा की, त्याच ओबामांनी ओसामाला संपवलं.

 अमेरिका म्हणजे स्वातंत्र्य. अमेरिका म्हणजे सर्वसमावेशकता. Life, Liberty and the pursuit of Happiness’ ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याची त्रिसूत्री. थॉमस जेफरसननं केलेली ही मांडणी ओबामांनी अमेरिकेपुढं अधोरेखित केली. सजीव केलं मार्टिन ल्यूथर किंगचं ‘ड्रीम’ आणि जागा केला अब्राहम लिंकनचा एल्गारही. वर्तमानात जगू पाहणाऱ्या अमेरिकेचा खरा ‘लौकिक’ ओबामांनी सांगितला. There is not a black America and a white America and latino America and asian America - there's the United States of America. ही अमेरिकेची ओळख सांगत, ‘अभिमान बाळगायचाच तर तो याचा बाळगा’, असं ओबामांनी ठणकावलं. तुम्ही काय खाता, काय पिता, कोणते कपडे घालता, यावर कसलंही नियंत्रण नसलेला हा मुक्त देश आहे, ही या अमेरिकेची खरी ओळख आहे- हे ओबामांनी सांगितलं.

सर्वप्रथम अध्यक्ष झाले, तेव्हा ओबामा होते अवघे  47 वर्षांचे. (आताचे दोन्ही उमेदवार सत्तरीतले!) ते जे सांगत होते, त्याला विलक्षण प्रतिसाद मिळत होता. नापास झालेल्या मुलाला काही सांगितलं तर तो ऐकण्याच्या मनःस्थितीत असतो. नेहमी बोर्डात येणारा मुलगा आकस्मिक खालच्या नंबरवर गेला, मग तर तो नक्कीच गंभीरपणे वगैरे ऐकतो. अमेरिकेची तशी स्थिती होती. अशा वेळी ओबामांची चैतन्यानं ओतप्रोत भरलेली भाषणं लोकांनी ऐकली. ‘बराक ओबामा- बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’ असं माझं पुस्तक आलं ते तेव्हाच, 2008 मध्ये. अमेरिकेला ओबामा हा ‘सक्सेस पासवर्ड’ वाटला. खरं म्हणजे जगालाच. त्यातील आशय किती जणांना गवसला, माहीत नाही. पण हा यशाचा मंत्र आहे, असं वाटूनच बहुतेकांना धीर आला.

सर्वसमावेशकता हे आता केवळ तत्त्वज्ञान नाही, तर तोच व्यावहारिक फायद्याचा मंत्र आहे, असं सांगत ओबामांनी बाजारपेठांनाही आपल्या तालावर ठेका धरायला लावला. अपयशाच्या गर्तेत कोसळलेल्या मार्केटलाही ओबामा नावाच्या चैतन्यानं धीर दिला. ओबामांनी मस्तवाल अमेरिकेला मार्दव शिकवलं. ते शिकवता यावं, यासाठी तो सर्वोत्तम काळ होता. त्यांच्या खास शैलीत Yes, we can!’ ऐकताना, जाहीर सभेतील सामान्य माणूसही उत्तेजित होत असे. समूहाला उत्तेजित करण्याचे असे भाग्य सर्वसमावेशक-संयत विचारधारेला क्वचितच लाभते. तसा अपवादात्मक तो काळ होता आणि नेताही!

‘We are America’ याबद्दलचा अभिमान अमेरिकेला होताच. पण, ‘अभिमान जरा धड कारणांसाठी बाळगा’, असं सांगत ओबामांनी चर्चेचा स्तरच बदलून टाकला. त्यांच्यापुढं मॅक्केन, हिलरी हे सारेच सामान्य भासले. ‘बराक हुसेन ओबामा’ अशा नावाचा माणूस या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात आहे, हीच धक्कादायक गोष्ट तेव्हा होती. मग जॉन मॅक्केन यांनी एक मुद्दा मांडला. प्रचाराच्या एका घणाघाती भाषणात ते म्हणाले, ‘‘काय हे? कोणीही अमेरिकेचे अध्यक्ष होऊ शकते काय?’’ आणि, मग लोक फूत्कारले, फुत्कारले. त्याला उत्तर म्हणून ओबामांची सभा तिथंच झाली. ओबामा म्हणाले, ‘‘होय. कोणीही अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि, हीच तर ‘अमेरिका’ आहे!’’

ओबामांनी कारभाराची सूत्रं हातात घेतली आणि त्यांना शांततेचं नोबेल जाहीर करून त्यांच्यावरील जबाबदारी वाढवली गेली. मी तेव्हा म्हटलं होतं, कट- कारस्थानात रमलेल्या अमेरिकेविरुद्धचा सर्वाधिक अमेरिकावादी (आणि, अर्थातच मानवतावादी!) कट आहे हा! ओबामांची वाट बिकट होती. Campaign in poetry; you govern in prose’, हा अनुभव ओबामांना येत गेला. इराकमधून सैन्य काढून घेणं असेल अथवा क्युबासोबतचा ऐतिहासिक दृष्टिकोन असेल, अफगाणिस्तानातील लोकशाहीला बळ देण्याचा (अशक्त) प्रयत्न असेल अथवा इराणबद्दलची भूमिका असेल; ओबामांनी नव्या दिशेने जाण्याचा रस्ता सूचित केला. पण, या प्रयत्नांनाही सहजपणे यश आले नाही. ‘ओबामाकेअर’ला झालेला विरोध जगाला माहीत आहे. हा तर ‘कम्युनिस्ट’ अध्यक्ष आहे, अशी टीका झेलत ओबामांनी आरोग्याला नवा आयाम दिला. सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात क्रांतिकारी पाऊल उचलले. तसाच प्रयत्न शिक्षणाच्या संदर्भात केला. अर्थात, ‘तरीही ओबामांनी निराश केले’, असे म्हणणाऱ्यांच्या संख्येत वरचेवर वाढ होत गेली.

अपेक्षा खूप होत्या. त्या प्रामुख्याने अर्थकारणाच्या संदर्भातल्या होत्या. अपेक्षाभंग झालेल्यांचे प्रमाण वाढत गेले. एवढे की, ओबामांच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत काँग्रेसच्या आणि सिनेटच्या ज्या दोन निवडणुका झाल्या, त्या दोन्हींत डेमोक्रॅटिक पक्षाने सपाटून मार खाल्ला. ओबामांची एका टप्प्यावरची कमालीची लोकप्रियता हळूहळू घटत गेली. ओसामाचा खात्मा झाला नसता, तर दुसरी टर्म ओबामा जिंकू शकले नसते, असे विश्लेषण अनेक जण करत असतात. आणि ओबामांनंतर डेमोक्रॅटिक उमेदवारही अध्यक्षीय निवडणूक जिंकू शकणार नाही, अशीही खात्री अनेकांना होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे काम बरेचसे सोपे केले. ट्रम्प यांना ज्या पद्धतीने पाठिंबा मिळाला आणि त्यांनी प्राथमिक फेरी जिंकली, यावरून बदलणाऱ्या अमेरिकेची चाहूल लागली. ‘ओबामांनी भ्रमनिरास केला’, असे ज्यांना वाटते त्यांना वाटो बापडे; पण अशा सामूहिक मानसिकतेतील अमेरिकेला ओबामांनी प्रेमाने, उमेदीने हाताळले आणि आपल्यानंतरही साधारणपणे आपल्याच भूमिकेच्या हाती सूत्रे राहतील, यातही यश मिळवले. ओबामांचे हे यश लक्षणीय आहे. पण ट्रम्प यांच्या निमित्ताने अमेरिकेत काय चालले आहे, याचा अंदाज मात्र येतो. आणि, अमेरिकेत काय चालले आहे ते महत्त्वाचे यासाठी असते, कारण अमेरिका हा ‘मेल्टिंग पॉट’ आहे. जगाच्या हालचालींचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे बदललेल्या जगाची चाहूल सर्वप्रथम लागते ती अमेरिकेत.

ज्या अमेरिकेत ओबामांच्या दोन्ही टर्म्समध्ये डिबेट्‌सचा दर्जा उंच होता आणि डिबेट्‌स ऐकणं हा कौटुंबिक सोहळा होता; तिथंच आज मुला-मुलींनी ती ऐकू नयेत, असं पालकांना वाटतंय. एका दहा वर्षांच्या मुलीच्या बापानं ट्रम्पना उद्देशून एक पोस्ट फेसबुकवर टाकलीय. त्या मुलीच्या भावना व्यक्त करणारी ती पोस्ट आहे. महिलांबद्दल असं शारीर, असं विखारी कोणी कसं बोलू शकतं- असा काहीसा त्या पोस्टचा आशय आहे. दुसरीकडं ओबामा, ज्यांनी अमेरिकेला ‘माणूस’ केलं!

या निमित्तानं हेही सांगायला हवं की, ‘व्हाइट हाऊस’वर गेली चोवीस वर्षं राज्य आहे ते लेकींचंच! बिल-हिलरी क्लिंटन यांची कन्या चेल्सी. (क्लिंटन भारतात आले होते आणि रंगपंचमी वगैरे खेळले होते! तेव्हा चेल्सी त्यांच्यासोबत होती. या चेल्सीला पाहून आपली तरुणाई तेव्हा किती नटली होती!) जॉर्ज बुश यांनाही दोन्ही मुलीच. बार्बारा आणि जेना. त्यानंतरच्या बराक ओबामांना दोन्ही मुलीच, मालिया आणि साशा. आता हिलरींचा विजय गृहीत धरायचा, तर आणखी किमान चार वर्षे तरी राज्य लेकींचेच. अमेरिकेला एवढ्या वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अध्यक्ष मिळणार, म्हणून आपण किती पुढारलेले, असे मानणाऱ्यांनी याचीही नोंद करायला हवी. आपला वारसदार मुलगा असला पाहिजे, असला प्रकार अमेरिकेत नाही. मुळात, राजकीय वारसदार नावाची भानगडच तिथं नाही! आपल्याकडंही नेत्यांच्या मुली आहेत. पण, त्यांना राजकीय वारसदार वगैरे व्हायचंच असतं. मग त्या कन्या फक्त नेता नाही, माता वगैरे होतात. पात्रता असो वा नसो, ही मुलं राजकारणात चमकतात. अमेरिकी अध्यक्षांच्या कन्या मात्र  (मुलगेदेखील)- मग ती कन्या समन्वयवादी ओबामांची असो अथवा युद्धखोर बुश यांची- सामान्य नागरिकांप्रमाणं नोकरी वगैरे करत असतात. राजकारणाचा सातबारा कुटुंबाच्या नावानं नसणं हे अमेरिकेचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. असो. (ट्रम्प यांच्याविषयी बोलायला नको. ‘त्यांचंही’ कुटुंब हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)

दोन गोड पोरींचा बाप असलेल्या बराक ओबामांनी एका निबंधात म्हटलं होतं की, ‘मी फेमिनिस्ट आहे. मी माणूस आहे. As we get older, we learn we don't always have control of things-not even a president does. But we do have control over how we respond to the world. We do have control over how we treat one another, असं म्हणणाऱ्या ओबामांनी अमेरिकेला अधिक सुसंस्कृत केलं. बुशसाहेबांची युद्धखोरी, त्यापूर्वी क्लिंटन यांची स्कँडल्स, आता सुरू असलेल्या ‘ट्रम्पलीला’ यामुळं तर ओबामांचं सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व अधिकच उजळून निघतं.

ओबामा हे करत होते, त्याच वेळी वातावरणात विखार वाढत होता. भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असं बहुमत मिळालं, त्याच सुमारास ओबामांच्या विरोधात कडवं कॅम्पेन अमेरिकेत सुरू झालं. ओबामांचा जन्म केनियातला आहे आणि ते मुस्लिम आहेत, असा जोरदार प्रचार सुरू झाला. ओबामांचा राजीनामा मागेपर्यंत मंडळींची मजल गेली. ‘बाहेरच्या लोकांच्या हातात सत्ता जाते कशी’, असा प्रश्न विचारला गेला आणि ‘राष्ट्रवादी’ वातावरण तयार होत गेले. रिपब्लिकन पक्षानं अमेरिकेच्या ‘बिग ब्रदर’ प्रतिमेला देशांतर्गत निवडणुकीत नेहमीच विकलं. त्यामुळं अस्मितेच्या नावानं पुढची निवडणूक लढवली जाईल, हे स्पष्ट होतं.

डोनाल्ड ट्रम्प हा या अस्मितावादाचा चेहरा ठरला. Make America Great Again’ अशी घोषणा देत ट्रम्प या रणधुमाळीत उतरले, तेव्हा अनेक जण उत्तेजित झाले होते. ‘अमेरिकेला अच्छे दिन’ दाखवण्याचे स्वप्न दाखवत राजकारणाच्या रिंगणात आलेले ट्रम्प हे उद्योजक. अमेरिकेला ग्रेट बनवायचं हे खरं, पण त्यातला अडसर काय? ‘बाकीचे’ लोक हाच अडसर! ही ‘आपली’ अमेरिका आहे. ‘ते’ इथे येऊन काय करताहेत, असे प्रश्न या कॅम्पेनच्या मुळाशी होते, जे विचारले गेले नाहीत; पण ते घोषणेत अनुस्यूत होते. त्यामुळे ट्रम्प मुस्लिमांवर अमानुष हल्ला करत असताना, इतर देशांतून येत असलेल्या स्थलांतरितांवर आगपाखड करत असताना, अगदी मेक्सिको आणि अमेरिका यांच्यात भिंत बांधण्याची भाषा करत असतानाही त्यांच्या तालावर नाचणारी एक अमेरिका उभी राहिली.

ट्रम्प हे राजकीय पार्श्वभूमी नसलेले उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना ‘पोलिटिकल करेक्टनेस’सह आपली भूमिका शिताफीने ठेवता आली नाही. मग, त्यांना पाठिंबा देताना त्यांच्या समर्थकांचीही गोची झाली. सगळ्या म्हणजे तिन्ही डिबेट्‌समध्ये ट्रम्प जे काही बरळत होते, त्यात ना अभ्यास होता, ना भूमिका. पण हवी तशी बेताल, अतार्किक वक्तव्ये उत्स्फूर्तपणे करणारा नेता या टप्प्यापर्यंत पोहोचू शकतो, हेच धक्कादायक आहे. ट्रम्प हा अगदीच वाह्यात, आडदांड आणि नागडा-उघडा प्रचारक असल्याने डिबेटसह सर्वच ठिकाणी त्याचा मूर्खपणा उघड झाला. पण, झाकली मूठ असती तर कदाचित याच विखाराच्या जोरावर त्याने ही निवडणूक मारली असती.

ट्रम्पना मोदींचे, भारतीय हिंदूंचे कौतुक बरेच आहे. मोदींवर प्रेम करणाऱ्या आपल्या तिथल्या भारतीयांचेही ट्रम्पवर तसेच प्रेम आहे. भारतातील निवडणुका आणि अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक यांची तुलनाच करायची, तर आपली निवडणूक अधिक स्वायत्त, अधिक थेट आहे. पण, एखादा नेता ‘पंक्चर’ होणे हे अमेरिकी निवडणूक प्रक्रियेत जेवढे सोपे आहे, तसे आपल्याकडे नाही. एक तर ही निवडणूक थेटपणे दोन चेहऱ्यांची होते. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक दीर्घ काळ चालते. शिवाय तिथे असणारी डिबेट्‌स आणि माध्यमांची हस्तक्षेपाची भूमिका यामुळे मूर्खपणा असो अथवा विखार, फार काळ लपून राहत नाही. ज्यांना पत्रकार परिषद घ्यायची भीती वाटते, असे आपले नेते या ‘डिबेट’ नावाच्या प्रकरणाला तर किती घाबरतील? किती उघडे पडतील? ट्रम्प यांची राजकीय समज कमी पडली आणि अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया जिंकली.  

सोईचा, असे आपण मानत आलो आहोत. इथे मात्र उलटे घडले. ‘हिलरी इज गुड फॉर इंडिया, नॉट फॉर यूएस’, असा प्रचार ट्रम्प यांनी केला. भारतीय समुदायाची संख्या वाढत असताना अमेरिकेत निर्माण झालेली असुरक्षितता, भूमिपुत्रांचा संताप ही कारणे त्याच्या मुळाशी आहेत. ‘भूमिपुत्र’ ही संकल्पना अमेरिकेत जन्माला यावी, हे अमेरिकेच्या जन्मकथेच्या आणि मूळ संकल्पनेच्याच विरोधी आहे. ज्या नोम चोम्स्कींचा उल्लेख मागे केला, ते असोत अथवा ‘ॲपल’कार स्टिव्ह जॉब्स, ही दोन्ही निर्वासितांची मुलं. ती वाढली अमेरिकेत आणि त्यांनी अमेरिकेलाही वाढवलं. ही अमेरिकेची कथा असताना, तिथं ‘भूमिपुत्र’ असं प्रकरण जन्माला यावं, हे धक्कादायक. अमेरिकेत असं काही सुरू झालं की जे भारतीय भयभीत होतात आणि गळा काढतात, ते अशाच संकुचिततेला इथं बळ देणाऱ्या विचारधारेचे मात्र ‘फॅन’ असतात.

वडिलांकडून जर्मन व आईकडून स्कॉटलंडचा वारसा असलेले आणि ज्यांचे आजी-आजोबा अमेरिकेबाहेर जन्मले, असे ट्रम्प भूमिपुत्र वगैरे भाषा करतात; तेव्हा हसावे की रडावे, हेच समजत नाही. पण, त्यांचे कोणतेही भाषण ऐकताना असेच वाटते. ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्त्वात तरीही करिश्मा आहे. हिलरी आणि ट्रम्प यांची तुलना करता, ट्रम्प यांच्या 56 इंची रांगड्या व्यक्तिमत्त्वात करिश्मा आहे. याउलट हिलरी तशा मिळमिळीत आणि अशक्त वाटतात. त्यामुळेही ट्रम्प चालतील, असे त्यांच्या ‘उद्योगी’ समर्थकांना वाटले असावे!

नुकतीच झालेली ही गंमत. मी जो ‘आवाज महाराष्ट्राचा’ हा ‘प्राइम टाइम’ शो साम टीव्हीवर करतो, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक युवा नेते आले होते. ते म्हणाले, ‘‘युरोपियन युनियनमधून ब्रिटन ज्यासाठी बाहेर पडले, ती ब्रेक्झिटची भूमिकाच आमची आहे. डोनाल्ड ट्रम्प स्थलांतरितांबद्दल जे बोलत आहेत, तेच आम्ही म्हणत होतो. पण, आमचा मुद्दा समजला नाही!’’ किती भारीय हे! म्हणजे, राज ठाकरे नऊ वर्षांपूर्वी तेच बोलत होते, जे आज ट्रम्प बोलत आहेत! मनसे अमेरिकेच्या पुढे नऊ वर्षे आहे तर! पुढे हे नेते असेही म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींनी भुरळ घातली अवघ्या देशाला. त्यामुळे आमचे मुद्दे मागे पडले.’ थोडक्यात, राज ठाकरेंना मोदींनी ‘रिप्लेस’ केले! म्हणजे राज यांचे ‘एक्स्टेन्शन’ कोणते? आणि, मग ‘नार्सिसिस्ट’ ट्रम्प हे कोणाचे एक्सटेन्शन? असो.

भारतातील जागतिकीकरणाची पंचविशी

योगायोग असा आहे की, याच वर्षी भारताने स्वीकारलेल्या जागतिकीकरणाला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. हे जागतिकीकरण भारत स्वीकारत होता, तेव्हा त्याला विरोध करणारे आज मात्र जागतिकीकरणाचे फक्त कट्टर समर्थकच नाहीत, तर प्रमुख लाभार्थी झाले आहेत, हा भाग वेगळा. बर्लिनची भिंत कोसळली आणि त्यानंतर सोव्हिएत रशियाची शकले झाली. ‘पेरेस्रायका’ आणि ‘ग्लास्तनोस्त’ हे शब्द परवलीचे झाले. जागतिकीकरणाला तेव्हा आपल्याकडच्या उजव्यांचा आणि डाव्यांचा सारखाच विरोध होता. त्या विरोधाला काही लॉजिक नव्हते, असे नाही. पण, सगळेच भांबावलेले होते.

शीत युद्ध संपले. दोन ध्रुवीय जग एकध्रुवीय झाले. अमेरिका नावाच्या देशाने सगळी सूत्रे हातात घेतली. जागतिकीकरणाचे नवे पर्व सुरू झाले. बाजाराच्या खुलेपणात ज्यांचे सौख्य सामावलेले आहे, त्यांनी या नव्या व्यवस्थेवर मांड ठोकली. मात्र, बाजाराच्या खुलेपणासोबत माहिती तंत्रज्ञानही अवतरले आणि ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खुली झाली. ही व्यवस्था येताना ज्या बाजारपेठा खदाखदा हसल्या असतील, त्यांनाही नंतर या प्रवासाने गोंधळात टाकले असेल. तंत्रज्ञानाचा उपयोग तुम्ही कशासाठीही कराल, पण ते आपले काम करतेच. त्यातून मक्तेदारी संपुष्टात येऊ लागल्या. चिरेबंदी वाड्यांना हादरे बसू लागले. अर्थात, या खुलेपणाचा उपयोग करून नव्या मक्तेदारी निर्माण करण्याचे प्रयत्न होत राहिले आणि होत आहेत. तरीही, जगाची फेरमांडणी होत गेली. जागतिकीकरण ही फक्त अर्थकारणाची व्यवस्था उरली नाही. त्याच वेळी ती संस्कृती म्हणूनही उदयाला आली.

फरीद झकेरियांच्या ‘द पोस्ट अमेरिकन वर्ल्ड’ या पुस्तकाचा उल्लेख मी वारंवार करत असतो. ते पुस्तक 2008 मध्ये यावे आणि त्याच वर्षी झालेल्या   निवडणुकीत बराक हुसेन ओबामा विजयी व्हावेत, हा योगायोग नव्हता. सोव्हिएत रशिया कोसळल्यानंतर आता जगाची सगळी सूत्रे अमेरिकेकडे आली आहेत, या प्रमेयाला तडाखा मिळाला. त्या पुस्तकात झकेरिया अशी मांडणी करतात- ‘सध्या सत्तेचे पारंपरिक संबंध बदलत आहेत. सत्तांतर सुरू आहे. देशांतर्गत असो वा जगभर, चित्र असेच आहे.’ आधुनिक जगाने तीन प्रकारचे बदल अनुभवलेले आहेत. पहिला बदल झाला तो साधारणपणे पंधराव्या शतकाच्या सुमारास. या कालावधीत साहित्य, संस्कृती, संगीत, विज्ञान यांची भरभराट झाली. त्या कालखंडाला Renaissance असं म्हटलं जातं. आधुनिकतेला आमंत्रण देणारा हा कालखंड होता. हे सारं घडत होतं पाश्चात्त्य देशांमध्ये. त्यामुळं त्या कालखंडाला म्हणतात- ‘राइज ऑफ द वेस्ट’.

नंतर एकोणिसाव्या शतकात ‘अमेरिकेचे राज्य’ आले! आपल्या भूमीला झळ बसू न देता युद्धे खेळणाऱ्या अमेरिकेने आपली दादागिरी हळूहळू वाढवत नेली. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ज्या पद्धतीने वाढली आणि विस्तारली हे पाहिले की, अमेरिकेच्या बेमुर्वतखोरीचा अंदाज तर येतोच, पण आजच्या दहशतवादाचे मूळही सापडते. हा जो दबदबा अमेरिकेने विज्ञान-तंत्रज्ञान-साहित्यासह सामाजिक-आर्थिक अशा सर्व क्षेत्रांत निर्माण केला, त्या कालखंडाला झकेरिया म्हणतात- ‘राइज ऑफ द स्टेट्‌स’.

आणि, मग ते पुढील मांडणी करतात. आता पुढे काय? अमेरिका हा एक शक्तिमान देश आहेच. पण, तोच एकमेव असणार नाही. मग आता महासत्ता कोण? चीन, भारत, ब्रिक्स की आणखी कोणी? आपल्याकडे आता ‘भारतच महासत्ता’ याचं भलतं अप्रूप असतं. आता ते आणखी वाढलंय! पण, झकेरिया सांगतात आता ‘राइज ऑफ द ईस्ट’ नाही, ‘राइज ऑफ द वेस्ट’ नाही; आता आहे ‘राइज ऑफ द रेस्ट’. याचा अर्थ ज्या समूहांना आजवर आवाज नव्हता, त्यांचा उदय होतो आहे. जागतिक पातळीवर भारताचा वा चीनचा आणि देशांतर्गत पातळीवरही अशा समूहांचा आवाज बुलंद होणे, हा खरा बदल आहे.

बर्लिनची भिंत कोसळावी आणि त्यानंतर भारतात प्रादेशिक पक्षांचे राजकारण मुख्य प्रवाहाचे व्हावे, हा योगायोग नव्हता. मंडल आणि कमंडलूचे राजकारण याच कालावधीत आकाराला आले. सर्वांनाच खुली संधी मिळाल्यानंतर लोकशाहीतील स्पर्धात्मकता आणि ताण  स्वाभाविकपणे वाढतात. भारतासारख्या बहुपेडी देशात तर याला अनेक संदर्भ असतात. शहरीकरण वाढत असताना, खासगीकरणामुळे सरकारी नोकरीची स्पेस कमी होत असताना, वंचित समूहांना आवाज मिळत असताना, बाजारपेठांच्या रेट्यापुढे सार्वजनिक क्षेत्र आक्रसत असताना भारतात विलक्षण वेगाने उलथापालथी होणे स्वाभाविक होते. पिढ्यान्‌पिढ्या दबलेल्या आवाजाला संधी मिळणे ही कल्पना कितीही रम्य असली तरी प्रत्यक्षात तसे घडते, तेव्हा जुनी मांडणीच कोसळते.

 ‘बर्लिन ते ब्रेक्झिट’

जग सध्या गोंधळलेले आहे. एकीकडे जगाचे रूपांतर वैश्विक खेड्यात होत असताना, जुन्या खेड्यातील विखारी देशीवादाने मुख्य प्रवाहाची जागा बळकावलेली आहे. मूलतत्त्ववादाने राजकारणाची-समाजकारणाची मध्यभूमी काबीज केली आहे. ‘बर्लिन ते ब्रेक्झिट’ या प्रवासाला हा संदर्भ आहे. शिवसेनेनं आपली भूमिका बदलली आणि मनसेचा नाहक निर्माण झालेला प्रभाव अकारण संपला! नाही तर, शिवसेना आणि मनसे हे प्रादेशिक काय, जागतिक दर्जाचे पक्ष होऊ शकतील, असा सध्याचा काळ आहे.

जग जवळ आलंय आणि त्याच वेळी नवनव्या भिंती जोरकसपणे उभ्या राहताहेत. जागतिकीकरणाचे फायदे आम्हाला द्या, जगाच्या लोकसंख्येची बाजारपेठ द्या; पण माझ्या ऑफिसात परदेशी माणसाला नोकरी देऊ नका, परराज्यातल्या टॅक्सीवाल्याला परवाना देऊ नका, असं म्हणणाऱ्यांची सध्या चलती आहे. त्याचं विश्लेषण करण्याची ही जागा नाही. तो हेतूही नाही. पण ‘ब्रेक्झिट’ला खरा संदर्भ आहे तो हा. ते युरोपियन, आम्हीही युरोपियन; म्हणून कोणत्याही देशातला माणूस आमच्याकडे राहायला येईल, आमची नोकरी बळकावेल- असं कसं चालेल? परदेशी गुंतवणूक 100 टक्के यावी, पण आमची अस्मिता आणि संस्कृती मात्र अगदी 200 टक्के आमचीच असायला हवी, हे जे जगभर सुरू आहे, त्याचं हे फलित आहे.

जागतिकीकरणासोबतच स्वतंत्र अस्मिता अधिक ज्वालाग्राही होत चालल्या आहेत. अवघ्या जगाचे चलन एक असावे, अशी मांडणी होत असताना ‘युरो’च्या प्रयोगाकडे पाहिले जात होते. पण, असे होणे एवढे सोपे नाही. भारतासारख्या संघराज्यात जिथे राज्याराज्यांतील व्यापाराचे नियम सारखे होऊ शकत नाहीत, तिथे अवघ्या युरोपाच्या बाजारपेठेत एक सूत्र असावे, असा आग्रह आश्चर्यकारकच. तो कोणाचाही नव्हता. युरोपियन युनियनमध्ये कैक दोष आहेत आणि त्यात बदल व्हायला हवेत, हे सगळ्यांनाच मान्य होतं. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीही तीच भूमिका घेतली होती. त्यांना युनियनचे सदस्यत्व हवे असले तरी ‘रिफॉर्म्स’साठी ते आग्रही होतेच. पण, प्रकरण हातघाईवर आले.

ब्रेक्झिटचे सामाजिक-राजकीय संदर्भातील परिणाम अधिक तीव्र आहेत. एक तर त्यातून स्थलांतरितांच्या विरोधी, प्रखर राष्ट्रवादी असा विखारी संदेश जाणार आहे. उजव्यांचा प्रभाव तिकडंही वाढतोय. त्याला यातून बळ मिळेल. जग एक खेडं वगैरे झालेलं असताना, आपल्या गावात मात्र अन्य कोणी येता कामा नये, हा वाढणारा कडवेपणा ही आधुनिक जगासमोरची खरी समस्या आहे. केंद्रबिंदू सरकत असताना आणि ‘राइज ऑफ द रेस्ट’चा उत्सव साजरा होत असताना, त्याच वेळी तीन पेच आपल्यासमोर आहेत. जागतिकीकरणानंतर सर्वांना आवाज मिळालेला असताना आणि सर्वसमावेशकता हे नव्या जगाचे स्वाभाविक मूल्य वाटत असतानाच, संकुचित अस्मिता अधिक टोकदार आणि विखारी पद्धतीने जगभर व्यक्त होत आहेत. ‘बर्लिन ते ब्रेक्झिट’ आणि ओबामा ते ट्रम्प असा हा प्रवास धोकादायक आहे! (हिलरी क्लिंटन आणि लालकृष्ण अडवाणी सौम्य वाटावेत, एवढे आपण सोशिक झालो आहोत!)

दुसरा पेच आहे तो, माध्यमे-तंत्रज्ञान विस्तारत असताना विचार आक्रसत जाण्याचा. एकीकडे व्यक्त होण्याची माध्यमे एवढी विस्तारताहेत आणि त्याच वेळी वेगळा विचार मांडला म्हणून डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.पानसरे, डॉ.कलबुर्गी यांचे खून होतात. तिसरा मुद्दा आहे तो नागरिकांचे रूपांतर ग्राहकांत होत जाण्याचा. अर्थात, केंद्रबिंदू सरकत असताना वाढत्या  स्पर्धात्मकतेसोबत ताणही तीव्र होणे स्वाभाविक आहे. नव्या समूहांना आवाज मिळणे हे कितीही ‘पोएटिक’ वाटले तरी त्यामुळे सत्तासंतुलन बदलते. नातेसंबंध बदलतात. सगळी फेरमांडणी होते. व्यवहारातील स्पर्धेचे रिंगण तेवढेच जीवघेणे होते. शिवाय, या खुलेपणाने सामान्य माणसाचे सशक्तीकरण आपापतः आरंभलेले असताना, या व्यवस्थेवर पुन्हा मांड ठोकण्याचा प्रयत्न बाजारपेठांसह सगळे प्रस्थापित पूर्ण क्षमतेने करणेही साहजिक आहे. नवश्रीमंत आणि नववंचित!

मुझको भी तो लिफ्ट करा दे... आपल्या अदनान सामीचं हे गाणं आलं तेरा वर्षांपूर्वी... जागतिकीकरणाचंच गाणं आहे हे! अदनान सामीच्या वजनालाच साजेलशी आमिषं जागतिकीकरणानं दाखवली होती. नंतर मात्र अदनानच्या वजनाप्रमाणंच त्यातली आमिषं झपाट्यानं कमी झाली आणि, कैसे कैसों को दिया है ऐसे वैसों को दिया है मुझको भी तो लिफ्ट करा दे -एवढाच विखार फक्त उरला. मला मिळत नाही, ‘त्याला मिळतंय’ हा संताप मग आम्हाला मिळत नाही, ‘त्यांना मिळतंय’- अशा वळणावरही गेला. ज्यांना मिळतंय, त्यांना आणखी हवंय. ‘हॅव’ आणि ‘हॅव नॉट’, ज्याला ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असं म्हणत आपल्या समाजवाद्यांनी त्यांचं बिनबुडाचं राजकारण उभं केलं, ते आजही आहे. पण, मजा अशी आहे की, दोन टोकांवर उभे असलेले हे दोन्ही समूह अस्मितेचं राजकारण करत एकाच विखारी विचाराच्या दिशेनं जाताना दिसताहेत. ज्यांच्याकडे काही नाही, त्यांना असलेला न्यूनगंड असेल अथवा ज्यांच्याकडे गमावण्यासारखे आहे, त्यांची चिवट असुरक्षितता असेल; यातून निर्माण होणारं समाजकारण अर्थकारणाच्या उलट बाजूनं जाणारं आहे.

अर्थात, ते उलटच आहे, असंही नाही. परदेशी गुंतवणूक आणून देशाचा विकास करतोय, असं मार्केटिंग करणारे नेते त्याच वेळी गोवंशहत्याबंदी जाहीर करताहेत. ज्यांना नेहमीच मिळत आलं, ते समूह तर अशा नेत्यांसोबत असणं स्वाभाविक आहेच. पण ज्यांना काही मिळत नव्हतं, मात्र दीर्घ पल्ल्याच्या लढ्यानंतर भरीव असं मिळालं आहे, असेही आता या प्रवाहात न कचरता सामील होताहेत. नवश्रीमंतांप्रमाणं नववंचित वर्ग आकाराला आलाय- मग ती गोरी अमेरिका असो वा आपल्याकडचे जाट, पटेल अथवा मराठा! नवश्रीमंत ज्याप्रमाणं स्तिमित करून टाकावं अशा वर्गातनं आलेले, तेच नववंचितांचं आहे. त्यांचं आपलं असं समूहकारण विकसित होत असताना, त्यालाही आपल्याच प्रवाहाकडं वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 ट्रम्पचा उदय कसा होतो?

 विखार हाच मुख्य प्रवाह होत असताना, शहाण्यासमंजस माणसाप्रमाणं बोलणं हा पोलिटिकल इनकरेक्टनेस आहे! भंजाळलेपण ही नव्या जगाची प्रकृती आहे आणि प्रत्येक जण ते वाढवून आपली टीआरपीची, मतांची, बॉक्स ऑफिसवरच्या गल्ल्याची पोळी भाजतो आहे. ओबामा ही बदलाची अभिव्यक्ती असेल, तर ट्रम्प ही बदल्याची अभिव्यक्ती आहे. महिलांच्या संदर्भातील विधानांनी ट्रम्प यांची लायकी ज्यांना समजली; त्यांना हेच ट्रम्प मुस्लिमांबद्दल बोलत असताना, स्थलांतरितांबद्दल आग ओकत असताना मात्र ती समजत नव्हती. देशोदेशीचे ओबामा एकाकी पडत असताना, सगळ्या ठिकाणच्या 56 इंची ट्रम्प्सची मात्र सध्या चलती आहे. ‘वर्तमानानं माझ्यावर अन्याय केला असला, तरी इतिहास मला न्याय देईल’, हेच सगळ्या ओबामांचं समकालीन स्वगत आहे. अमेरिका नशीबवान की तिथल्या उघड्या-वागड्या आणि दीर्घ अशा संवादी प्रचार मोहिमांनी ट्रम्प वेळीच ‘पंक्चर’ झाले. सगळेच ट्रम्प एवढे दुर्दैवी (आणि असे बेदरकारही!) नसतात! अशा जगात आपण आहोत, तिथे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हरतील, पण आपल्यासोबत आता ओबामा नसतील!

Tags: डोनाल्ड ट्रम्प बराक ओबामा संजय आवटे साधना दिवाळी अंक Donald trump barak obama sanjay awate diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय आवटे
sunjaysawate@gmail.com

पत्रकार 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके