महात्मा गांधी म्हणजे ‘मिथ’
चर्चिल म्हणजे ‘फिक्शन’
असं आज सांगणारी उगवती पिढी उद्या कदाचित म्हणेल
‘बाबा आमटे, ए नेम गिव्हन टू द इंडियन सायक्लोन
विच क्रिएटेड ए न्यू सिव्हिलायझेशन!’
या उत्तराला परीक्षेत मार्क शून्य मिळतील;
पण खरं उत्तर तेच असेल.
हरिकेन कॅटरिना, रिटा, जोन्स...
वादळांना आणि चक्रीवादळांनाही
हल्ली म्हणे नावं दिली जातात!
क्षणार्धात तिन्ही लोक व्यापणाऱ्या
अन् होत्याचं नव्हतं करून टाकणाऱ्या
प्रलयंकर चक्रीवादळाचे नामकरण करतात
000
एक वादळ असंच भारतात आलं होतं
पण ते नव्हत्याचं आहे करणारं शुभंकर वादळ होतं
नापीक जमिनीला स्वप्नांचा गर्भ देणारं आणि
निद्रिस्त प्रेतांना नवा प्राण देणारं वादळ होतं ते
या वादळानं दिला असा जोरदार तडाखा
की मुळापासून उखडली गेली शक्तिशाली सिंहासनं
उन्मळून पडल्या जगण्याच्या जुनाट धारणा
नि स्वप्नांची मशागत करू लागली निर्जीव मनं
क्षण-प्रहर गेले, वर्षे-दशके लोटली
तरी हा झंझावात मात्र थांबला नाही
अंधाराच्या मस्तवाल सैनिकांना उद्ध्वस्त करत
काळोखातील रातकिड्यांना पायदळी कुस्करत
या वादळानं ध्वस्त केल्या निराशेच्या गर्ता
बकाल भुईनं पोटात घेतलेला हरेक झाला कर्ता
दिमाखात उभे ठाकलेले चिरेबंदी वाडे कोसळले
काजव्यांनी प्रथमच मग शक्तिप्रदर्शन केले
मिणमिणणाऱ्या पणत्यांची तेव्हा मशाल झाली
रात्रीच्या गर्भातील पहाट अशी जन्मा आली!
000
अचेतनावर सचेतनाचा आरोप करणाऱ्या
या चेतनगुणोक्तीनं साजरे केले सृजनाचे सोहळे
त्याच्या एका स्पर्शासरशी फुलले आनंदाचे मळे
पांगळ्यांना हात द्याया सरसावले बलदंड बाहू
निर्मितीच्या मुक्त गंगा लागल्या मातीत वाहू
बदलवून टाकला अवघा इतिहास या वादळानं
आणि फेरमांडणी करून नवा भूगोल जन्माला घातला
या वादळी हल्ल्याने भिंतींना पडले तडे
आणि नवे सेतू राहिले उभे
कोंडलेल्या वादळाच्या अनिवार लाटांमधून निघाल्या
नव्या वाटा... नव्या विटा
000
अशी वादळं जन्माला येतात; पण
ती नाहीशी कधीच होत नसतात
कारण ती देतात जन्म नवनव्या वादळांना
ती देतात प्राण मनाच्या वस्तीतील स्वप्नांना
असं एक वादळ माणसाळलं अन्
भारतीयांनी त्याला नाव दिलं
बाबा आमटे!
महात्मा गांधी म्हणजे ‘मिथ’
चर्चिल म्हणजे ‘फिक्शन’
असं आज सांगणारी उगवती पिढी उद्या कदाचित म्हणेल
‘बाबा आमटे, ए नेम गिव्हन टू द इंडियन सायक्लोन
विच क्रिएटेड ए न्यू सिव्हिलायझेशन!’
या उत्तराला परीक्षेत मार्क शून्य मिळतील;
पण खरं उत्तर तेच असेल.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या