डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दभिंचे मला सर्वांत भावलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनाचा खुलेपणा आणि स्वत:ला सतत तपासून, बदलत राहायची वृत्ती. म्हणूनच त्यांच्या लेखांची अन्‌ पुस्तकांची नावे देखील पहिल्यांदा रणांगण, तिसऱ्यांदा रणांगण, दुसरी परंपरा, पहिली परंपरा वगैरे असतात. आपणच केलेल्या समीक्षेची देखील ते वारंवार तपासणी करतात आणि नव्याने जाणवलेले अर्थ, अन्वयार्थ आणि अर्थव्यूह नव्याने मांडत राहातात. ‘रणांगण’ या बेडेकरांच्या कादंबरीवर तर त्यांनी इतक्यांदा लिहिले आहे, की अलीकडे ते लेखाच्या शीर्षकात आकडे न टाकता नुसते ‘पुन्हा एकदा..’ किंवा ‘आणखी एकदा’ असे लिहितात.

83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून दभिंची निवड होण्यात एक निराळेच औचित्य साधले गेले आहे. एक तर ही निवडणूक गेल्या काही वर्षांतल्या वादग्रस्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशम खेळीमेळीने आणि सामंजस्याने झाली. एरवी भांडणे आणि वादविवाद यांचे वावडे नसणाऱ्या मराठी माणसाला, या एका बाबतीतली वादग्रस्तता नेहमीच खिन्न करणारी वाटत असते. कारण हे संमेलन कुणी काही म्हटले तरी महत्वाचे असते आणि मराठी माणसाचा मानबिंदू असते. त्यामुळे ही निवडणूक अशा चांगल्या वातावरणात झाली हे बरेच झाले. दुसरे म्हणजे दभि पुण्यात स्थलांतरित झाल्यावर, पुण्यात होणाऱ्या संमेलनात दभिंची निवड होणे, ही गोष्टही बरीच झाली. तिसरे म्हणजे दभिंना यावेळी आणि या बाबतीत यशाने हुलकावणे देऊ नये असे सर्वांनाच वाटत होते. तर दत्तात्रय भिकाजी ऊर्फ दभि कुलकर्णी यांचे यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन.

यंदाच्या साहित्य संमेलनात ‘मुख्य कार्यकारी व्यवस्थापक’पदावर नियुक्ती झाल्याने मला दभिंच्या प्रचारकार्यात अजिबात भाग घेता येत नव्हता, त्यामुळे (आणि तरीही !) दभिंची निवड झाल्याने व्यक्तिश: मला अधिकच आनंद झाला. दभिंचा एक विद्यार्थी म्हणून आणि चाहता म्हणूनही! (आणि तेच मानतात म्हणून, एक मित्र म्हणूनही.)

मध्यंतरी सातारच्या ग्रंथमहोत्सवात उद्‌घाटनाचे भाषण करताना मी म्हणालो होतो, की पुणे हे विद्येचे माहेर आहे. ती विद्या आता सासरी म्हणून सातारला आली आहे की काय असे वाटावे, असे हे ग्रंथसंमेलन आहे. पण नंतर मला उमजले ‘विद्या’ पुण्यातच आहे आणि उलट पुणेकरांनी दभिंच्या रूपात खास नागपूरहून हा विद्येचा सासरा पुण्यातच आणला. सासरा मोठा आखाड सासरा आहे बरे. आखाड अशा अर्थाने, की कधीही औचित्यभंग न करता आडमुठी आणि मनस्वी समीक्षा कशी करावी, हे दभिंची समीक्षा पाहून शिकावे. त्यांनी कधी प्रस्थापितांचा अनाठायी मुलाहिजा ठेवला नाही किंवा नवोदितांना दुर्लक्षित ठेवले नाही. त्यांची ही भूमिका समीक्षक म्हणून साहित्यापुरतीच असते हेही खरेच. अर्थात, दभिंचेही काही खास मर्मबिंदू आहेतच. बेडेकरांचे ‘रणांगण’, मर्ढेकरांचे ‘सौंदर्यशास्त्र’, माऊलींचे ‘अमृतानुभव’, तुकोबाची ‘गाथा’ आणि जीएंची ‘महाकथा’ हे दभिंच्या काळजात प्रवेश मिळवायचे खात्रीशीर महामार्ग आहेत. त्याचबरोबर ममंच्या कविता, जीटींचे साहित्यशास्त्र आणि भाव्यांच्या कथा याही चोरवाटा आहेतच, त्यांच्या मनात आणि मानात शिरायला. दभिंच्या घराबाहेर एक घंटा आहे. म्हणजे आपण डोअरबेल म्हणतो तसे बटन नव्हे, तर खरीखुरी पितळ्याची घंटा. दभिंच्या घरात शिरायला जशी त्या घंटेची किणकिण करावी लागते, तसे दभिंच्या मनाचे दार मर्ढेकर, जीए आणि ज्ञानेश्वर या घंटांच्या आवाजाने क्षणार्धात उघडते.

या माणसाने कळायला लागल्यापासून फक्त पुस्तकांवर प्रेम केले. त्यांच्या पीएचडीचा प्रबंध देखील ‘महाकाव्या’सारखा धीरगंभीर आणि बृहद्‌ होता. आणि त्य़ांचा तो प्रबंधही म्हणे ट्रकमधून पाठवावा लागला इतका मोठा होता. गमतीचा भाग सोडा, पण दभिंचाच काय दभिंच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांचेही प्रबंध असे प्रचंड असतात. पण माणूस पांडित्याचे दर्शन किंवा प्रदर्शन घडवणारा नाही. त्यांनी ग्रंथ आणि प्रबंधांपेक्षा निराळी अशी स्फूट समीक्षेचीच वाट कायम पकडली. कारण त्यांची भूमिकाच मुळी प्रतिभावंत कवीची आहे. कवितेसारखीच त्यांची समीक्षा स्फुरलेली असते.‘पस्तुरी’सारखे पुस्तक वाचताना याची खूण पटते. मुळात ‘मेरसोलचा सूर्य’ सारखा कवितासंग्रह लिहिणारे दभि हे खरे तर कवीच. बऱ्याच जणांना हे माहीत नसेल की, 19 व्या वर्षीच‘न्यूयॉर्क ट्रिब्यून’ने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय कथा स्पर्धेत त्यांना पारितोषिक मिळाले होते. त्यामुळे दभिंची समीक्षा नेहमीच काव्यात्य प्रतिभेने बहरलेली राहिली.

पण तरीही त्यांच्या समीक्षेमागे अभिनव गुप्तापासून ग.त्र्यं.देशपांड्यांपर्यंतच्या साहित्यशास्त्राचा भक्कम आधार असतो. संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून येताच ते म्हणाले, ‘माझे सौंदर्यशास्त्रीय गुरू मर्ढेकर आणि साहित्यशास्त्रीय गुरू ग.त्र्यं.देशपांडे यांना खरे तर हा मान मिळायला हवा होता. ’गुरूपौर्णिमेलाच जन्मलेल्या दभिंचे गुरूप्रेम असे निखळ आणि तीव्र आहे.

दभिंचे मला सर्वांत भावलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मनाचा खुलेपणा आणि स्वत:ला सतत तपासून, बदलत राहायची वृत्ती. म्हणूनच त्यांच्या लेखांची अन्‌ पुस्तकांची नावे देखील पहिल्यांदा रणांगण, तिसऱ्यांदा रणांगण, दुसरी परंपरा,पहिली परंपरा वगैरे असतात. आपणच केलेल्या समीक्षेची देखील ते वारंवार तपासणी करतात आणि नव्याने जाणवलेले अर्थ, अन्वयार्थ आणि अर्थव्यूह नव्याने मांडत राहातात.‘रणांगण’ या बेडेकरांच्या कादंबरीवर तर त्यांनी इतक्यांदा लिहिले आहे, की अलीकडे ते लेखाच्या शीर्षकात आकडे न टाकता नुसते ‘पुन्हा एकदा..’ किंवा ‘आणखी एकदा’ असे लिहितात. त्यांच्या अगदी अलीकडच्या रणांगण-समीक्षेवर मीच खुमखुमीने आणि आक्रमकपणे प्रतिवाद केल्याने, नक्कीच ते पुन्हा एकदा ‘रणांगण’वर लिहितीलच. कारण शिष्यच गुरूमधले सर्वश्रेष्ठ आहे ते बाहेर आणतो, असेही त्यांचे आवडते तत्व आहे. त्यांचे शिष्यत्व लाभणे हा अनेकांप्रमाणेच माझाही मोठाच भाग्ययोग म्हणावा लागेल. त्यांनी त्यांच्या ‘जीएंची महाकथा’ या पुस्तकाची प्रस्तावना मला लिहायला सांगितली, हा तर मला ज्ञानपीठ मिळावे तशा जातीचा, अभिमानाचा प्रसंग वाटला होता. पण या सगळ्या पलीकडे त्यांचे एक माणूस म्हणून असलेले प्रेम मिळणे सर्वांत आनंदाचे आहे. माझ्या अवघड काळात त्यांचा पाठीवर असलेला हात अतिशय आश्वासक वाटतो. (गमतीने म्हणायचे तर, माझ्या आनंदाच्या आणि यशाच्या प्रसंगी मात्र ते, ‘अरे तू यशस्वी होणारच. आपली दोघांचीही रास धनु आहे ना! मग काय आश्चर्य?’ असे म्हणतात! पण ते गमतीने नाही, तर खरेच त्यांचा ज्योतिषशास्त्राचा गेल्या तीस वर्षांचा अभ्यास आहे. चुकलो, त्यांच्या मते ते ज्योतिषशास्त्र नाही, तर ती ज्योतिषविद्या आहे. सरांबरोबर बसून एखाद्या जन्मपत्रिकेचा अर्थ समजावून घेणे मोठे मौजेचे असते. माझा तसा भविष्य-ज्योतिषावर फारसा विश्वास नसला, तरी दभिसर जेव्हा माझ्या मुलाची पत्रिका पाहून म्हणतात, ‘अरे, तुझा मुलगा नचिकेत तुला फार फार मोठे आनंद देणार आहे तुझ्या आयुष्यात.’ तेव्हा मनाला बरे वाटतेच. माझे नेहेमीच द्वंद्वात असलेले मन मनातल्या मनातच म्हणते, असेलही म्हाताऱ्याचा खराच अभ्यास आणि असेलही त्यात तथ्य!)

अत्यंत सकारात्मक खुलेपणाने मतभेद स्वीकारणारा हा समीक्षक आहे. पु.भा. भावे, गाडगीळ किंवा अगदी जीएंच्या ‘कैरी’सारख्या कथेचा अन्वयार्थ, त्यावर त्यांचे आणि माझे टोकाचे मतभेद ते आनंदाने स्वीकारतात आणि वर या आमच्यातल्या सर्जनशील प्रतीतीभेदावर आनंदाने भाष्य करतात. शिवाय, या प्रतीती भेदाचे श्रेय मूळ लेखकांच्या अद्वितीय प्रतिभेला देऊन मोकळे होतात.

योग्य ते श्रेय देण्यात दभि कधी हात आखडता घेत नाहीत हे खरे, पण जे निकृष्ट आहे त्याचे हननही ते तितक्याच आवेशाने करतात. समीक्षेचे कार्यच ते मुळात सुंदर, त्याचे पुनर्दर्शन आणि असुंदराचे हनन असे मानतात. त्यामुळे एका लेखात मी त्यांचे वर्णनच मुळी ‘माणसे जोडण्याच्या आणि तोडण्याच्या कलेत वाकबगार गृहस्थ’ असे केले आहे. पण त्यात पुढे असेही लिहिले की, ‘माणसे जोडण्या आणि तोडण्यात वाकबगार असलेला हा गृहस्थ, पुस्तकांशी जुळलेले नाते मात्र जन्मभराचे मानतो आणि जन्मभर सांभाळतो, निभावतो.’

नुकतेच दभिंच्या पत्नीचे, शिवरंजनी काकूंचे निधन झाले. तो धक्का पेलताना मात्र दभि आतून हादरले. सहा वर्षे विद्यार्थिनी आणि पन्नास वर्षे सखी, सचिव असणाऱ्या काकूंच्या जाण्याने सर खोलवर जखमी झाले. सरांचा हा गौरव पाहायला त्यांच्या पत्नी नाहीत ही व्याकूळ करणारी गोष्ट आहे.

सरांच्या मुलाचे नाव अभिनंदन. संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल परवा सरांचे अभिनंदन करायला घरी गेलो होतो तेव्हा उत्स्फूर्तपणे मी म्हणालो, ‘दभिनंदन सर!’ तेव्हा अभिन म्हणाला, संजय, तुम्ही कधी माझे नाव घेत नाही बरे का. मी गमतीने म्हणालो, अरे माझी दभिरुचीच तशी आहे बाबा. तेव्हा सरांचे दभिनंदन करायचे तर असेच दभिवादन करायला हवे ना!

तर दभि सर, मन:पूर्वक अभिनंदन!

Tags: लेखक मराठी साहित्यिक संभा. दभि संजय भास्कर जोशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष समीक्षक द. भि. कुलकर्णी Writer Author Great critic Ph.d. Dr. D. B. Kulkarni Criticism Chairperson Akhil Bhartiya Marathi sahitya Sammelan Literary Fest Marathi Critic Da. BHi Kulkarni D. B. Kulkarni Sambha Sanjay Bhaskar Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके