डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

चित्रपटाचे सारे कथानक आणि शेवट सांगण्यात अर्थ नाही; पण रूटिनच्या चक्रात अडकलेल्या प्रत्येकाने आजचा दिवस कसा जगावा, हे हसत-खेळत सांगणारा हा चित्रपट एक विलक्षण अनुभूती देतो. पण त्यात काही आवर्जून शिकवायचा बोधवादी अट्टहास मात्र नाही. लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांचे कौशल्य असे की, निखळ फँटसी असूनही हे सारे पाहताना कशाची विश्वासार्हता उणावल्यासारखे वाटत नाही. सुरवातीला फिलला मुळीच न आवडणारे पंक्सुटवानी हे गाव व तिथली सगळी माणसे यांच्याच प्रेमात पडलेला आणि शेवटी त्यांचा लाडका झालेला फिलदेखील बिल मरेने उत्कृष्ट रंगवला आहे. आत्मकेंद्रिततेकडून मुक्त होऊन बाहेरच्या जगाकडे सहृदय नजरेने बघायला शिकणारा फिल कॉनर्स त्याने जिवंत केला आहे. 

उंदीरच खरं तर. थोडा थोराड आणि सशाएवढा. कबऱ्या रंगाचा. त्याला म्हणतात ग्राउंडहॉग. पेन्सिल्व्हेनिया प्रांतातली परंपरा अशी की, दर 2 फेब्रुवारीला या ग्राउंडहॉगला म्हणजे फिल नावाच्या या उंदराला पिंजऱ्यातून बाहेर काढायचं आणि हे महाराज त्या वर्षीच्या हवामानाचा अंदाज वर्तवतात. म्हणजे स्वच्छ सुरेख वसंत ऋतूचं आगमन होणार, का अजून चारेक आठवडे सर्वत्र बर्फाची चादर पसरून वैतागदायक हिवाळाच राहणार- त्याचं निदान करतात. दर वर्षी 2 फेब्रुवारीला त्या निमित्तानं तिथं एक उत्सवच साजरा होतो. लोक थंडगार बर्फाच्छादित वातावरणात रात्रभर शेकोट्या करून गात, नाचत राहतात आणि सक्काळी सक्काळी हा भविष्यकथनाचा सोहळा पार पडतो. तर, असा हा ‘ग्राउंडहॉग डे’- 2 फेब्रुवारी. उद्याचं, म्हणजे 3 फेब्रुवारीचं भविष्य वर्तवणारा. पण ...पण समजा- हा 3 फेब्रुवारी उगवलाच नाही तर? या चक्रम वाटणाऱ्या अफलातून शक्यतेचाच हा जबरदस्त धमाल पण तत्त्वज्ञानात्मक चित्रपट आहे : ग्राउंडहॉग डे. 

फिल कॉनर्स (बिल मरे) हा पिट्‌सबर्ग इथल्या एका दूरचित्रवाणीचा हवामानविषयक वार्ताहर. (त्याचंही नाव ‘फिल’ हा एक गमतीदार पण सूचक योगायोग) तर, हा फिल कॉनर्स भलताच आत्मकेंद्रित आणि गर्विष्ठ. आपण हवामानाची माहिती देतो, का स्वत:च हवामान घडवतो-बदलवतो या शक्यतात रमणारा. साहजिकच दर वर्षीप्रमाणे याही वर्षी ग्राउंडहॉग डेला तिथे प्रत्यक्ष हाऊन वार्तांकन करायची जबाबदारी त्याच्यावर येते. अर्थातच त्याला ही कामगिरी प्रचंड वैतागाची वाटते. त्यात पुन्हा या कामासाठी पेन्सिल्व्हेनियातल्या पंक्सुटवानी या गचाळ आडगावात जाऊन एक रात्र काढायची, याचाही त्याला वैताग वाटतो. शिवाय या वेळी रिटा (अँडी मॅकडोवेल) ही नवीच प्रोड्युसर बरोबर असते आणि बरोबर सहायक लॅरी (ख्रिस इलियट). एकूणात, त्याला या कामगिरीचा मनोमन वैताग असतो. त्यातल्या त्यात निषेध म्हणून तो मुद्दामच रिटा आणि लॅरी ज्या हॉटेलात उतरतात तिथे राहायला नकार देतो आणि वेगळ्याच हॉटेलात उतरतो. सकाळी बरोब्बर सहाला जागा होतो. रेडिओवर ‘आय गॉट यू बेबी’ हे गाणे लागते आणि नंतर काही तरी गमतीचे संवाद. निरुत्साहानं फिल हॉटेलबाहेर पडतो आणि उत्सवाच्या जागी जाऊन व्यावसायिक सफाईने आपलं काम उरकतो. 

नेमका तो फिल नावाचा ग्राउंडहॉगदेखील आणखी चार आठवडे बर्फाच्छादित हिवाळाच टिकणार असल्याचं दुर्दैवी भविष्य वर्तवतो. त्याच संध्याकाळी पिट्‌सबर्गला परत जायला तिघे व्हॅनमध्ये बसतात, पण नेमकं बर्फाचं वादळ घोंघावत येतं आणि तिघे अडकून पडतात. ती रात्र त्याच पंक्सुटवानी गावात राहावं लागतं. पुन्हा त्याच हॉटेलात येऊन फिल झोपतो. सकाळी बरोबर सहाच्या गजराला जाग येते आणि रेडिओवर तेच ‘आय गॉट यू बेबी’ गाणं लागतं. फिल वैतागून हॉटेलाबाहेर येतो, तर सगळे लोक उत्साहानं ग्राउंडहॉग डेच्या उत्सवाला निघालेले. फिल चक्रावतोच. कालच तर झाला ना वाजतगाजत तो ग्राउंडहॉग डे! तो उत्सवाच्या ठिकाणी येतो, तर सगळं पुन्हा तेच घडतं. पुन्हा ते भविष्यकथन. पुन्हा परतायला निघतात, तर पुन्हा वादळ. पुन्हा हॉटेलात परत. म्हणजे आधीचं होतं ते झोपेतलं स्वप्न होतं की काय? चक्रावलेला फिल परत हॉटेलवर येऊन झोपतो. पुन्हा सकाळचे सहा वाजतात, गजर होतो आणि रेडिओवर तेच गाणं... 

इथे मात्र आपल्याला हे प्रकरण काहीतरी वेगळं असल्याचं कळायला लागतं. कारण तिसऱ्यांदा पुन्हा 2 फेब्रुवारीच उगवलेला असतो. आणि मग चित्रपटभर हा 2 फेब्रुवारी पुन:पुन्हा, शेकडो वेळा अगदी नेमानं रोज उगवत राहतो. तेच ते आणि पुन्हा तेच ते. काळाच्या कचाट्यात सापडलेल्या फिलची भूमिका बिल मरेनं अप्रतिम केली आहे. आधी अविश्वास, आश्चर्य, मग हताशा, संताप आणि त्यानंतर आलेला परिस्थितीचा असहाय स्वीकार आणि मग शेवटी केलेला सकारात्मक स्वीकार- या अवस्था या गुणी अभिनेत्यानं उत्तम साकारल्या आहेत. ‘देजाव्ह्यू’ (पुन:पुन्हा त्याचा जागी/त्याच काळात प्रवेश करणे) या संकल्पनेवर डेंझिल वॉशिन्ग्टनच्या त्याच नावाच्या चित्रपटासकट अनेक चित्रपट आले आहेत. ‘ग्राउंडहॉग डे’ चं वैशिष्ट्य म्हणजे तो सुरवातीला त्या संकल्पनेच्या अद्भुततेत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गमती-जमतीत रमतो तरी वास्तवाच्या व काळाच्या अर्थपूर्णतेच्या तत्त्वज्ञानात हळूहळू शिरतो. 

एका परीने ‘रूटीन’ म्हणजेच ‘तेच ते आणि पुन्हा तेच ते’ असं स्वरूप प्राप्त झालेल्या आपल्या ‘मोनोटोनस’ जगण्यावर भाष्य करतो. हाच दिवस पुन्हा जगायला मिळाला- किंबहुना, पुन:पुन्हा जगायला मिळाला तर काय काय करता येईल, याचा सकारात्मक शोध घेतो. हे खरे या चित्रपटाचे बलस्थान. फिल कॉनर्सला जेव्हा आपण काळाच्या पेचात (टाइम लूप) अडकून पडलो आहोत हे सर्वप्रथम कळते, तेव्हा आधी तो नुसताच विस्मयचकित होऊन भांबावून जातो. चिडचिड करतो. सुरुवातीला तर विश्वासच ठेवायला तयार होत नाही. पण हे अटळ आहे, हे कळल्यावर मानवी स्वभावानुसार यातून काय स्वार्थ उपटता येईल याचा विचार सुरू करतो. रिटाचं प्रेम मिळवायला तो रोजचे अनुभव वापरून तिच्या अधिकाधिक जवळ जायचा प्रयास करतो. ते प्रकरण भन्नाट आहे. रोज वेगवेगळे अनुभव घेऊन तिच्या आवडी-निवडी, सवयी, भूतकाळ यांविषयी इतके काही जाणून घेतो की, तिच्या कल्पनेतला आदर्श प्रियकर-सहचर बनायच्या मागे लागतो. त्यात बहुतांशी यशस्वीदेखील होतो. कारण केलेल्या चुका सुधारायची संधी त्याला मिळते. अगदी रोजच्या रोज मिळते. कारण रोजच त्याला तो दिवस पुन्हा पहिल्यापासून सुरू करायची संधी उपलब्ध असते, आणि तीही कालच्या त्याच दिवसाच्या अनुभवासकट. म्हणजे आज तिने मागितलेले ड्रिंक तो उद्या पुन्हा त्याच प्रसंगात स्वत:च तिला देऊन तिचं मन जिंकू शकतो. बाकी कुणालाच अर्थात यातले काहीच माहीत नसते. 

इथे विशेष उल्लेख करायला हवा तो पटकथा आणि संकलनाचा. कारण एकदा काय चालले आहे हे कळल्यावर नुसत्याच पुनरावृत्तीने प्रेक्षकाला कंटाळा यायची शक्यता असते. पण ज्याची मूळ कथा आहे तो डॅनी रुबीन आणि दिग्दर्शक हेरॉल्ड रॅमिस या दोघांनी विलक्षण चतुराईने पटकथा गुंफली आहे. पेंब्रोक हेरिंगने उत्तम संकलन करून चित्रपट वेगवान तर ठेवला आहेच, पण ठरावीक वळणावर अपेक्षित आणि ठरावीक वळणावर अनपेक्षित प्रसंग येतील अशी योजना राबवली आहे. हे कसब वाखाणण्याजोगे आहे. फिलला जेव्हा कळते की, हा दिवस कधीच संपणार नाही; तेव्हा एका वळणावर तो इतका बेदरकार होतो, की बेफाम कार चालवणे, अपघात करणे- इतकेच नव्हे, तर वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आत्महत्या करण्यापर्यंत त्याची मजल जाते. एकदा तर तो हवामानाचं भविष्य वर्तवणाऱ्या ग्राउंडहॉगलाच पळवून नेतो आणि त्या उंदरासह कड्यावरून गाडी खोल दरीत झोकून देतो. कारचा चक्काचूर होतो, स्फोट होतो आणि फिल आणि तो उंदीर मरतात, पण... दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गजर होतो, फिल जागा होतो आणि रेडिओवर पुन्हा तेच गाणे सुरू होते! अत्यंत हताश करणारी ही भावना आहे. 

रस्त्यावर ठरावीक ठिकाणी अनेक वर्षांनंतर भेटणारा खूप जुना मित्र नेड रायर्सन किंवा हॉटेलातून रोज बाहेर पडताना विचारपूस करणारी वेटर स्त्री, हॉटेलात भेटणारे इतर ग्राहक वगैरे अनेक मजेदार पात्रांच्या माध्यमातून दिग्दर्शकाने चित्रपटाचा मूड हसरा आणि खेळकर ठेवला आहे. बिल मरेच्या उत्तम अभिनयामुळे त्यात भर पडते. रिटाच्या भूमिकेत अँडी मॅकडोवेल या सुंदर अभिनेत्रीने अनोखे रंग भरले आहेत. शेकडो वेळा येणाऱ्या 2 फेब्रुवारीत तिने वेगवेगळे मूड उत्तम साकारले आहेत. आधी त्याच्यावर वैतागलेली, मग त्याच्या प्रेमात पडलेली, कधी नुसतीच चकित झालेली, तर कधी संतापलेली- अशी विविध रूपे अँडीने सुरेख साकारली आहेत. फिल कॉनर्स हा 2 फेब्रुवारी इतक्या वेळा जगतो की, तो बर्फातली शिल्पकला, पियानो-वादन अशा अनेक कलांत निपुण होतो. आणि शेवटी-शेवटी याने एका दिवसात इतके कसब कसे मिळवले याचेच सगळ्यांना अप्रूप वाटते. चित्रपटाचे हे सकारात्मक वळण अतिशय लोभस आहे. 

चित्रपटाचे सारे कथानक आणि शेवट सांगण्यात अर्थ नाही, पण रुटीनच्या चक्रात अडकलेल्या प्रत्येकाने आजचा दिवस कसा जगावा, हे हसत-खेळत सांगणारा हा चित्रपट एक विलक्षण अनुभूती देतो. पण त्यात काही आवर्जून शिकवायचा बोधवादी अट्टहास मात्र नाही. लेखक, दिग्दर्शक आणि कलावंतांचे कौशल्य असे की, निखळ फँटसी असूनही हे सारे पाहताना कशाची विश्वासार्हता उणावल्यासारखे वाटत नाही. सुरुवातीला फिलला मुळीच न आवडणारे पंक्सुटवानी हे गाव व तिथली सगळी माणसे यांच्याच प्रेमात पडलेला आणि शेवटी त्यांचा लाडका झालेला फिलदेखील बिल मरेने उत्कृष्ट रंगवला आहे. आत्मकेंद्रिततेकडून मुक्त होऊन बाहेरच्या जगाकडे सहृदय नजरेने बघायला शिकणारा फिल कॉनर्स त्याने जिवंत केला आहे.

आत्मावलोकनातून आत्मोन्नती हा या चित्रपटाचा गाभा आहे. स्वत:मध्ये सतत सुधारणा करत आयुष्याला अर्थ द्यायचा प्रयत्न केला, तर जगणे आपोआप सुंदर व्हायला लागते. फिल कॉनर्सचा हा प्रवास हेरॉल्ड रॅमिसने मस्त खेळकर अंगाने फुलवल्याने हा चित्रपट पाहणे एक सुरेख मजेदार अनुभव ठरतो. अगदी आवर्जून घ्यायलाच हवा, असा. 

ग्राउंडहॉग डे 
लेखक : कथा - डॅनी रुबिन    
पटकथा - डॅनी रुबिन / हेरॉल्ड रॅमिस    
दिग्दर्शक : हेरॉल्ड रॅमिस 
संगीत : जॉर्ज फेन्टॉन    
छायाचित्रण : जॉन बेली         
कलावंत : बिल मरे, अँडी मॅकडोवेल, ख्रिस इलियट

Tags: रुटीन देजाव्ह्यू रिटा फिल कॉनर्स पेन्सिल्व्हेनिया चित्रपट ख्रिस इलियट अँडी मॅकडोवेल बिल मरे जॉन बेली जॉर्ज फेन्टॉन हेरॉल्ड रॅमिस डॅनी रुबिन संजय भास्कर जोशी ग्राउंडहॉग डे पडद्यावरचे विश्वभान Routine Déjà vu Rita Phill Connors Pennsylvania Cinema Chris Elliott Andie MacDowell Bill Murray John Belly George Fenton Harold Ramis Danny Rubin Sanjay Bhaskar Joshi Groundhog Day Padadyavrche Vishwabhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके