डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिल्ली असो की तेहरान, मुंबई असो की न्यूयॉर्क. स्त्रीची किंमत पुरुषी व्यवस्थेत दुय्यमच. या व्यवस्थेविरुद्ध ठामपणे उभे राहणाऱ्या स्त्रीची अद्‌भुत कहाणी- अब्बास कियारोस्तामीचा चित्रपट : ‘टेन!’
संजय भास्कर जोशी यांचे श्रेष्ठ जागतिक सिनेमाची महिन्यातून एकदा ओळख करून देणारे नवे सदर : पडद्यावरचे विश्वभान.

मनिया अकबरी - 1974 साली जन्मलेल्या मनिया अकबरी या प्रतिभावंत स्त्रीनं वयाच्या सतराव्या वर्षी चित्रकार म्हणून करियर सुरू केलं आणि मग सिनेमॅटोग्राफीकडून ती शेवटी लेखन आणि दिग्दर्शनात आली. वयाच्या तिसाव्या वर्षी तिनं ‘ट्वेंटी फिंगर्स’ हा चित्रपट बनवला आणि त्याला मानाच्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट डिजिटल फिल्मचं बक्षीस मिळालं आणि नंतर देखील जगभर चाळीस चित्रपट महोत्सवांत तो दाखवला गेला आणि त्याला सर्वत्र पुरस्कार मिळाले.’

अब्बास कियारोस्तामी - इथे दोन गमतीशीर उल्लेख केले पाहिजेत. पहिले म्हणजे स्वत: कियारोस्तामीचे विचार मात्र काहीसे वेगळेच आहेत. व्हॉइस ऑफ अमेरिकाला दिलेल्या एका वादग्रस्त मुलाखतीत तो म्हणतो, "No effort for understanding women could be conclusive. The final solution, in my opinion, is to love without understanding.' आणि याच मुलाखतीत पुढे त्याने पुरुषाने नोकरी, कामधंदा करावा आणि स्त्रीने घर सांभाळावे यातच उभयतांचे सौख्य आहे असा विचार मांडला. त्याचे हे विचार ‘टेन’ या चित्रपटाला तर छेद देतातच, पण त्याला स्वत:लाही ते लोकांच्या रोषाला कारणीभूत होणार हे समजते. तो शेवटी म्हणतो, "Marriage is essential for all women. I don't care if women are becoming my enemy after saying this. It doesn't matter, I am getting old." दुसरा उल्लेख महत्त्वाचा आहे. श्रेष्ठ जपानी दिग्दर्शक अकिरो कुरोसावा म्हणाले होते, ‘सत्यजित राय वारले तेव्हा मी फार उदास झालो, खिन्न झालो. पण कियारोस्तामींचे चित्रपट पाहिल्यावर मला वाटले, देवाने सत्यजित राय यांची जागा घ्यायला अगदी योग्य माणूस दिलाय आम्हांला.

माधुरी दीक्षित किंवा कटरिना कैफचं अप्रतिम सौंदर्य, शबाना आझमी किंवा स्मिता  पाटीलसारखा उत्कृष्ट परिपक्व अभिनय आणि अपर्णा सेन किंवा दीपा मेहतासारखं लेखक- दिग्दर्शक म्हणून कर्तृत्व हे तीनही एकत्र असलेल्या ‘मनिया अकबरी’ या इराणी अभिनेत्रीचं खानदानी सौंदर्य आणि सुरेख अभिनय पाहायचा, तर अब्बास कियारोस्तामी या आघाडीच्या इराणी दिग्दर्शकाचा ‘टेन’ हा चित्रपट बघावा. अलीकडे इराणकडून अनेक उत्तमोत्तम चित्रपट येताना दिसतात आणि त्यात अब्बास कियारोस्तामी हा इराणमधला आघाडीचा लेखक-दिग्दर्शक आहे. मोहसीन मखमलबफ, मजिद मजिदी, तहमिने मिलानी यांसारख्या प्रतिभावंत इराणी दिग्दर्शकांनी इराणी सिनेमा वेगळ्याच उंचीवर नेलाय. सुरुवातीला उल्लेख केला ती मनिया अकबरी देखील एक उत्तम लेखक-दिग्दर्शक आहे. कियारोस्तामीच्या ‘टेन’ या चित्रपटात मनियाच्या आयुष्यातलेच प्रसंग तिने आपल्या मुलासमवेत कॅमेऱ्यासमोर सादर केले आहेत. खरे सांगायचे तर ‘टेन’ ज्या पद्धतीचा चित्रपट आहे त्याची कल्पनाच आपल्याकडच्या प्रेक्षकांना करता येणार नाही. का? सांगतो.

एक तर हा संपूर्ण चित्रपट फक्त एका कारमध्ये घडतो. कारमध्ये ड्रायव्हिंग करणारी एक सुंदर, स्मार्ट आणि बुद्धिमान स्त्री आणि तिच्याबरोबर शेजारी बसणारे विविध जण यांचे चेहरे  दिसतील असे फक्त दोन साधे डिजिटल कॅमेरे कारच्या बॉनेटवर फिक्स करून संपूर्ण चित्रपट चित्रित केलाय. तेहरानमधल्या विविध रस्त्यांवरून ही कार हिंडते आणि मनिया अकबरीनं भूमिका केलीय ती कार चालवणारी सुंदर, बुद्धिमान स्त्री आणि दुसरं कुणीतरी यांच्यात जे दहा संवाद होतात ते दहा भाग म्हणजे हा चित्रपट. म्हणून टेन.

सुरुवातीला पडद्यावर दहा हा आकडा दिसतो आणि मग यांतला पहिला जवळजवळ अठरा मिनिटांचा सलग भाग सुरू होतो. या भागात पडद्यावर फक्त तिचा मुलगा अमीन महेरच दिसतो. या दहा-बारा वर्षांच्या पोरानं हा सोळा मिनिटे आणि चाळीस सेकंदाचा हा जो प्रदीर्घ शॉट दिलाय त्याला तोड नाही. या सतरा मिनिटांत मनिया मधूनमधून बोलते पण तिचा चेहरा दिसत नाही. म्हणजे पहिली सतरा मिनिटे हा पोरगा आपल्या खांद्यावर चित्रपट पेलून नेतो. त्याचे बोलणे, हावभाव, चिडणे, वैतागणे सगळे सगळे केवळ अप्रतिम अभिनयाचा नमुना आहे. विश्वास ठेवा, हा लांबलचक शॉट बघितल्यावर तुचाच विश्वास बसणार नाही, आपण हे काय बघितले त्यावर. कारण सोळा मिनिटे हा पोरगा चिडचिड करत, वैतागत आईवर ओरडत राहतो त्याचा आपल्याला क्षणभर देखील कंटाळा येत तर नाहीच, उलट आपण अवाक होऊन जे घडतंय ते बघत राहातो. आणि सतराव्या मिनिटाला हा पोरगा चिडून गाडीतून उतरून जातो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला मनिया अकबरीचा चेहरा दिसतो. सुरुवातीला अर्थातच तिच्या खानदानी सौंदर्यानं आपण प्रभावित होतो आणि मग तिच्या अप्रतिम अभिनयानं.

यानंतरचे, म्हणजे नऊ क्रमांकाचे दृष्य म्हणजे रोया अरबशाही या अभिनेत्रीशी म्हणजे चित्रपटातल्या कार ड्रायव्हर स्त्रीच्या बहिणीशी झालेला संवाद आहे. पहिल्या दृश्यातला अमीन हा लहान मुलगा आणि दुसऱ्या दृष्यातली रोया, हे मनिया अकबरीचे प्रत्यक्षातले मुलगा आणि बहीण आहेत. आणि खरे तर चित्रपटातली ही दृष्ये वास्तवावर आधारित आहेत. काय घडतंय यांच्यामध्ये? तर ड्रायव्हर स्त्रीचा अमीन हा मुलगा आईवर प्रचंड चिडलाय कारण तिनं अमीनच्या वडिलांशी घटस्फोट घेतलाय आणि त्या सर्व प्रकरणात आपली आईच दोषी आहे हे त्याचं घट्ट मत आहे. पहिल्या दीर्घ दृष्यानंतर प्रेक्षक म्हणून आपलीही पूर्ण सहानुभूती मुलाकडे जाते आणि आपल्याला ती स्त्री एक चुकीची बाई आणि नालायक आई आहे असेच वाटते. 

चित्रपटाचा प्रवास संपतो तेव्हा आपले मत पूर्णपणे उलटे झालेले असते, ही लेखक दिग्दर्शक म्हणून कियारोस्तामी आणि मनिया अकबरीच्या अभिनयाची अचाट कामगिरी आहे. चित्रपट संपतो तेव्हा तीन गोष्टी घडलेल्या असतात. एक म्हणजे आपण हे काय पाहिले यावर आपलाच विश्वास बसत नसतो. दुसरे म्हणजे जगभर पुरुषाची अरेरावी आणि मगरूरी सारखीच असते हे आपल्याला कळते, आणि तिसरे म्हणजे इराण काय, भारत काय आणि अमेरिका काय, स्त्रीची दयनीय अवस्था सारखीच आहे, पण एखादी स्त्री आपले व्यक्तिमत्त्व कसे समजून घेते आणि त्या समजुतीतून इतर स्त्रियांनाही आत्मभान देऊ शकते हे पाहून आपण विलक्षण प्रभावित झालेलो असतो. हा अनुभव घ्यायलाच हवा. खरोखर MUST कॅटेगरीतला हा सिनेमा आहे.

कायम बंद गळ्याचा, कोपऱ्यांपर्यंत बाह्यांचा टॉप, डोक्याला रुमाल आणि डोळ्यावर गॉगल घालणारी, लिपस्टिक लावणारी, आत्मविश्वासाने कार चालवणारी मनिया अकबरी हे लग्नाच्या अनुभवात पोळलेल्या, पण स्वत:चं व्यक्तिमत्त्व प्राणपणाने सांभाळू पाहणाऱ्या स्त्रीचं प्रातिनिधिक रूप आहे. प्रवास करणे, फोटोग्राफी करणे हे तिचे छंदवजा व्यवसाय आहेत. आणि त्यात ती कर्तबगार आहे. मग त्याला वेळ देता यावा म्हणून घरकामाला बाई ठेवण्यात काय बिघडले हा तिचा साधा सवाल आहे. पण अमीन, आणि पर्यायाने त्याचा बाप यांचा नेका त्यालाच विरोध आहे. साध्या साध्या प्रसंगातून अमीनचा तिच्यावर संशय घेण्याचा आणि क्षणाक्षणाचा हिशेब मागण्याचा स्वभाव दिसत राहतो. या दोघांतले संवाद म्हणजे संवाद लेखन आणि अप्रतिम अभिनय यांचा अद्वितीय अनुभव आहे.

अमीन आणि ती स्त्री (चित्रपटात तिला नाव नाही, हेही एक प्रकारे सिंबॉलिक आहे.) यांतल्या या चार महत्त्वाच्या संवादांखेरीज मनियाचे तिची बहीण रोया, एक म्हातारी स्त्री, एक वेश्या, एक मैत्रीण आणि एक अनोळखी तरुणी यांच्याबरोबरचे संवाद या चित्रपटात आहेत. बहुतेक वेळा मोठ्या मनाने ही ड्रायव्हिंग करणारी स्त्री विविध स्त्रियांना कारमधून लिफ्ट देते आणि प्रवासात गप्पा मारते. त्या गप्पांधून मनियाची कहाणी उलगडते आणि त्याचबरोबर एकूण स्त्रीजातीची व्यथा उलगडते. पण नुसती व्यथा नाही तर त्याचबरोबर स्त्रीच्या अस्मितेचा आणि स्वत्वाचा ठळक उद्‌गार इथे आहे. ड्रायव्हर स्त्रीच्या कहाणीच्या निमित्ताने कियारोस्तामी खरे तर इराणमधल्या समाजाच्या मानसिकतेवरच भाष्य करतात. (कळत नकळत ते वैश्विक होत जाते.) जिचे ठरलेले लग्न आयत्या वेळी नियोजित वराने नकार दिल्याने रद्द होते अशा एका तरुण मुलीशी संवादाचे दोन प्रसंग यात आहेत. पहिल्या प्रसंगात ती आपल्या लग्नाविषयी स्वप्ने रंगवते तर दुसऱ्या प्रसंगात लग्न रद्द झाल्यानंतरची मन:स्थिती. या वेळी तिने डोक्यावरचे सगळे केस काढले आहेत, आणि पुन्हा पुन्हा ड्रायव्हर स्त्री (मनिया) तिला पटवून देते, की कसे तिला हे नवे रूप फारच खुलून दिसते आहे. 

या तरुणीला काय किंवा इतर स्त्रियांना काय, मनिया अकबरी अतिशय पोटतिडिकीने आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगण्याचा, खरे तर स्त्री असण्याचा सार्थ उत्सव करण्याचा सल्ला देत राहते. फक्त तिला धक्का देते योगायोगाने तिच्या कारमध्ये बसलेली एक वेश्या. बोलता बोलता ही वेश्या मनियाला ऐकवते, तुम्ही विवाहित स्त्रिया म्हणजे होलसेलर्स आहात तर आम्ही रिटेलर्स. म्हणजे तुम्ही या शरीर अन मनाच्या व्यापाराच्या घाऊक विक्रेत्या तर आम्ही किरकोळ विक्रेत्या इतकाच फरक, बाकी आपल्यात काय फरक? तो सवाल अंगावर काटा आणतो. शिवाय आपल्याबरोबर झोपणारे पुरुष कसे त्याच वेळी बायकोला फोन करून आपले तिच्यावर किती प्रेम आहे हे ऐकवतात हे ती वेश्या हसत हसत मनियाला ऐकवते तेव्हा पुरुषी मानसिकतेवर विदारक प्रकाशझोत टाकल्यासारखे वाटते.विविध स्त्रियांशी बोलताना श्रद्धा, विवाह संस्था, प्रेम, सेक्स आणि एकूणच समाजजीवनावर कियारोस्तामी क्ष किरण टाकून डोळे दिपतील अशा पद्धतीने वास्तव आपल्यासमोर ठेवतो.

‘टेन’मध्ये मनिया अकबरी, आमीन महेर आणि रोया अरबशाही यांच्याप्रमाणेच कमरान, अमीना, मन्दाना आणि कटातौन यांचा अभिनय प्रभावी आहे. खरे तर या कुणी सराईत अभिनेत्री देखील नाहीत. पण कियारोस्तामीने एकूण चित्रपटच इतका अप्रतिम घेतलाय की मनिया अकबरी जेव्हा केक आणायला दोन मिनिटे कारमधून उतरून बाहेर जाते तेव्हा वाट पाहणाऱ्या रोयाच्या चेहऱ्यावर पूर्ण वेळ कॅमेरा आहे आणि तिचं वाट पाहणं इतकं नैसर्गिक वाटतं की थक्क व्हावं. संवादांतले विरामदेखील विलक्षण जिवंत होतात. याचं लेखन, दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी अर्थातच स्वत: अब्बास कियारोस्तामीची आहे. चित्रपटात कुठेही उसन्या संगीताचा वापर नाही, कारण संपूर्ण वेळ एक तर कारमध्ये चालणारे संवाद ऐकू येतात किंवा बाजूने जाणाऱ्या वाहनांचे आणि हॉर्नचे आवाज.

विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण टेन पाहताना मेकअप, संगीत, उत्तम लोकेशन्स, नेपथ्य या कशाकशाची आठवण देखीलयेत नाही. त्यामुळे श्रेयनामावलीत संगीत, आर्ट डायरेक्शन वगैरे दिसतच नाहीत. लाँग शॉट वगैरेचीही भानगड नाही. आहे तो दोनच अँगलमधला क्लोजअप. तरीही टेन पाहून थक्क व्हायला होते. दणकट आशय आणि अप्रतिम अभिनय या दोनच गोष्टी ‘टेन’मध्ये एक अद्‌भुत अनुभव देतात. अगदी आवर्जून घ्यावा असा हा अनुभव आहे.

टेन : (भाषा- इराणी/पर्शियन)
लेखक-दिग्दर्शक : अब्बास कियारोस्तामी.
कलाकार : मनिया अकबरी, अमीन महेर, रोया अरबशाही, कमरान, अमीन, मन्दाना, कयातौन.
सिनेमॅटोग्राफी : अब्बास कियारोस्तामी

Tags: रोया अरबशाही आमीन महेर तेहरान मनिया अकबरी संजय भास्कर जोशी टेन स्त्री इराण सिनेमा चित्रपट अब्बास कियारोस्तामी Maher Amin Mania Akbari Tehran Joshi Sanjay Bhaskar Woman Iran Ten Cinema Movie Abbas Kiarostami weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके