डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘ललित’ या वाङ्‌मयीन मासिकाला पन्नास वर्षे पूर्ण झाली, त्याप्रीत्यर्थ 2013 या वर्षांतील ललितचे सर्व 10 अंक वेगवेगळ्या विषयांवरील विशेषांक असणार आहेत. (वाचन संस्कृती, कविता, ललितगद्य, समीक्षा, वाङ्‌मयीन नियतकालिके, चरित्रे-आत्मचरित्रे, कथा, दृश्यकला, नाटक, कादंबरी). प्रत्येक अंकासाठी वेगळे अतिथी संपादक नेमले आहेत. त्यातला पहिला म्हणजे जानेवारीचा अंक ‘वाचनसंस्कृती’ या विषयावर आहे. या अंकाचे अतिथी संपादक संजय भास्कर जोशी यांचे हे मनोगत. 

‘ललित’सारख्या निखळ वाङ्‌मयीन नियतकालिकाला पन्नास वर्षे पूर्ण होणे हा केवळ ‘ललित’च्याच नव्हे तर समग्र मराठी वाचकांच्या आणि साहित्यविश्वाच्या अभिमानाचा भाग आहे. डोळ्यासमोर एकेक नियतकालिक बंद होत असताना कोणत्याही बाजारू क्लृप्त्यांचा वापर न करता केवळ वाङ्‌मयीन विषयाला वाहिलेले मासिक चालवणे हे मोठेच आव्हान म्हणावे लागेल. त्यात पन्नास वर्षे हा इतका मोठा कालखंड आहे, की साहजिकच त्यात नेतृत्वबदलही झाला. केशवराव कोठावळे यांचा दैदीप्यमान वारसा हे तर मोठेच आव्हान होते, पण नव्या नेतृत्वाने तेही यशस्वीपणे स्वीकारून ललित वृद्धिंगत केला. कथा, कविता, व्यंगचित्रे यांचा आधार नसताना आणि पुस्तके सोडली तर इतर उत्पादनांच्या जाहिराती वगैरे साधने हाताशी नसताना एखादे निखळ साहित्यिक मासिक इतक्या दीर्घकाळ यशस्वीपणे चालवणे याला, मी स्वत: केवळ ‘चमत्कार’ या शब्दावर विश्वास ठेवत नसल्यानेच, चमत्कार म्हणत नाही. कारण एकदा एखाद्या गोष्टीला ‘चमत्कार’ म्हणून टाकले की त्यामागच्या मानवी परिश्रमाचे मोल दृष्टीआड होते. संपादक, साहाय्यक-संपादक ही तर अंकात दिसणारी नावे, पण त्याचबरोबर असंख्य लेखक, हितचिंतक, कर्मचारी आणि वाचकांनी हा चमत्कारसदृश इतिहास घडवला आहे. 

या ऐतिहासिक घटनेच्या मौलिकतेला साजेसा उत्सव करणे अगत्याचे आहे आणि त्याचसाठी ललितचे संपादक अशोक कोठावळे यांनी मधु मंगेश कर्णिक आणि वसंत सरवटे यांच्यासारख्या ललितच्या जन्माचे साक्षीदार असणाऱ्या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली. या ललित सुवर्णहोत्सव समितीत मला सहभागी करून घेतले हा माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा भाग आहे. या समितीने ‘ललित’च्या सुवर्णहोत्सवानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे आणि त्यांतला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे यंदाचे ललितचे सर्व अंक साहित्यक्षेत्रातल्या वेगवेगळ्या तज्ज्ञ व्यक्तींच्या संपादनाखाली विशेषांक म्हणून काढायचे आहेत. ‘वाचनसंस्कृती’ हा माझ्या जिव्हाळ्याचा आणि सततच्या चिंतनाचा विषय असल्याने याच विषयाला वाहिलेल्या या पहिल्याच अंकासाठी काम करायची संधी मला मिळाली, हा विशेष आनंदाचा भाग आहे. या अंकाचे काम पाहताना मिळालेले मधुभार्इंचे मार्गदर्शन, अशोक कोठावळे यांनी दिलेले पूर्ण स्वातंत्र्य आणि शुभांगी पांगे यांचे सहकार्य यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. 

वाचनसंस्कृती हा अनेकांच्या दृष्टीने उसासे टाकत गळे काढण्याचा विषय असला तरी माझ्या दृष्टीने कायमच उमेद, उत्साह आणि ऊर्जेने भिडण्याचा विषय राहिला आहे. वाचनसंस्कृतीवरचे टीव्ही आणि इतर गोष्टींचे आक्रमण हा गळे काढणाऱ्यांच्या तक्रारीचा हक्काचा आणि आवडता मुद्दा असतो. पण बिरबलाच्या गोष्टीचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, की दुसरी रेषा लहान करायची तर त्या रेषेशी छेडछाड करण्यापेक्षा आपली रेषा मोठी करणे गरजेचे असते. वाचनसंस्कृतीच्या बाबतीत नव्या पिढीला आकर्षित करेल असे अत्याधुनिक आणि प्रोफेशनल मार्ग स्वीकारूनच आपली रेषा मोठी करता येईल. 

या अंकाचे नियोजन करताना आम्ही नेमका हाच दृष्टिकोन ठेवला होता. वाचनसंस्कृती कमी होते आहे हे वास्तव दृष्टीआड न करता, पण त्याला अवास्तव महत्त्वही न देता या बाबतीत नेमके काय करता येईल त्याचा सकारात्मक आणि कृतिशील विचार व्हावा अशी योजना आम्ही केली. त्यासाठी साहित्य व्यवहारातले लेखक, प्रकाशक, संपादक, विक्रेते, वाचक हे सर्वच घटक या अंकात सहभागी करून घेतले आहेत. 

या अंकाची विभागणी आम्ही चार विभागांत केली आहे. पहिला भाग वाचकांविषयी आहे- ‘काय वाचतात वाचक?’ वाचन संस्कृतीच्या केंद्रस्थानी असलेल्या वाचकाच्या म्हणण्याला सर्वाधिक महत्त्व आहे. तर काय म्हणतो हा वाचक? काय वाचतात वाचक? आपण जे देतोय ते त्यांना आवडतंय? नेमकं काय हवं असतं वाचकांना? आणि कसे वाचक वाचनाने समृद्ध होत असतात. तर या विभागात अभिराम भडकमकरसारखा लोकप्रिय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, उमा पत्की यांच्यासारखी उच्चशिक्षित ग्रंथप्रेमी चार्टर्ड अकाऊंटंट महिला, प्रीती छत्रे, वासंती देशपांडे यांच्यासारख्या स्वत: लेखन करणाऱ्या ग्रंथप्रेमी गृहिणी यांचे लेख घेतले आहेत. शिवाय विश्वास देशपांडे यांच्यासारखा सच्चा पुस्तकप्रेमी ग्रंथपाल आपल्या ग्रंथालयाविषयी काय म्हणतो तेही या विभागात वाचता येईल. त्यांच्याच ग्रंथालयातील सुमारे 1200 वाचकांनी गेल्या सात वर्षांत वाचलेल्या 5,82,399 पुस्तकांचे संख्याशास्त्रीय विश्लेषणही आम्ही दिले आहे. ते मनोरंजक आणि उद्‌बोधक वाटेल. 

वाचकांच्या प्रतिसादाने लेखकाला मिळणाऱ्या ऊर्जेसंबंधी, प्रोत्साहनासंबंधी रंगनाथ पठारे, भारत सासणे, ह.मो.मराठे, सुबोध जावडेकर आणि मोनिका गजेंद्रगडकर या लोकप्रिय लेखकांचे लेख अंकाच्या दुसऱ्या विभागात आहेत. वाचकांचा उत्स्फूर्त आणि भरभरून मिळालेला प्रतिसाद ही लेखकाची खरी प्रेरणा आणि ऊर्जास्रोत. काय वाटते लेखकांना या प्रतिसादाविषयी? आणि कसा मिळतो हा वाचकांचा प्रतिसाद... या विषयावरचे हे लेख आहेत. शिवाय याच विभागात रा.ग.जाधव आणि शंकर सारडा यांचे स्मरणरंजनात्मक लेख, गेल्या शतकाच्या मध्यावर आणि उत्तरार्धात वाचनसंस्कृती कशी होती त्यासंबंधी आहेत. 

प्रत्यक्ष वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करता येईल यासंबंधी अंकाचा तिसरा विभाग आहे- वाचन संस्कृतीच्या नव्या वाटा. वाचन संस्कृतीला खऱ्या अर्थाने नवचैतन्य द्यायचे तर आपणही बदलत्या काळाबरोबर आपले मार्ग आणि तंत्र बदलायला हवे. काय घडतंय या बाबतीत? त्यात डॉ.सुहास भास्कर जोशी यांचा ‘पुस्तकाचे मार्केटिंग’ हा लेख विशेष आहे. त्याचप्रमाणे प्रसाद शिरगावकर आणि प्रीती छत्रे यांचे ब्लॉगविश्व आणि इंटरनेटवरच्या साहित्यावरचे लेख आहेत. प्रल्हाद जाधव यांचा वाचन संस्कृतीबाबत शासनाची भूमिका काय आहे, त्या संदर्भात लेख आहे आणि केशव परांजपे आणि संजय भास्कर जोशी यांचे वाचनसंस्कृती वाढवण्याबाबतचे लेख आहेत. याच विभागात ‘साधना’चे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांचा ‘साधना बालकुमार अंक’ या दिवाळी अंकाने गेल्या पाच वर्षांत केलेली विक्रमी विक्री याबद्दलचा एक महत्त्वाचा लेख आहे आणि मागच्या वर्षी ‘अनुभव’ मासिकाने वाचनसंस्कृतीची अनेक अंगांनी झाडाझडती घेतली त्याचा आढावा घेणारा महेंद्र मुंजाळ यांचा लेखही आहे. 

अंकाचा चौथा विभाग प्रकाशक, संपादक आणि विक्रेते यांच्या भूमिकेची तपासणी करणारा आहे. लेखकाची प्रतिभानिर्मिती आणि वाचकांचा सर्जनशील आस्वाद यांतला सर्जक पूल म्हणजे प्रकाशक, संपादक आणि विक्रेते. या आघाडीवर काय परिस्थिती आहे? काय अनुभव आहेत प्रकाशक, संपादक आणि विक्रेत्यांचे? अरुण जाखडे, अरुण पारगावकर या कमी खपणाऱ्या पण अभिजात आणि दर्जेदार पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांचे मनोगत उद्‌बोधक ठरेल. तर प्रवीण दशरथ बांदेकर या संपादकाचे ‘नवाक्षर दर्शन’ या अनियतकालिकाबाबतचे अनुभव मौलिक आहेत. राजन खान हे आवर्जून नवोदितांची पुस्तके प्रकाशित करणारे प्रकाशक. त्यांचेही मनोगत या विभागात आहे आणि या जोडीला अक्षरधारा या संस्थेतर्फे वर्षाचे 365 दिवस पुस्तक प्रदर्शन भरवणाऱ्या रमेश राठिवडेकर यांचा लेख आशादायक वाटेल. 

अंक तयार करताना संपादक या नात्याने मला दोन समस्यांचा सामना करावा लागला. महत्त्वाकांक्षी योजना करून आम्ही अंकात अनेक विषय अंतर्भूत करून खूप जणांना लेख द्यायची विनंती अडीच-तीन महिने आधीच केली, पण सुरुवातीला लेखकांचा प्रतिसाद इतका काही संथगतीने होता, की एकेकाच्या मागे लागताना दमछाक झाली, पण नंतर सर्वांनीच अगदी मनापासून लेख दिल्याने अंकाची पाने इतकी वाढली की मला अशोक कोठावळे यांना खास विनंती करून अंकाचा वाढलेला आकार मंजूर करून घ्यावा लागला. नियोजित लेखांपैकी एकच लेख वेळ आणि जागेअभावी पूर्णपणे घेता आला नाही. ‘युनिक फीचर्स’ या नामांकित संस्थेने ‘अनुभव’ मासिकात मागच्या वर्षभर ‘वाचनसंस्कृतीची झाडाझडती’ ही एक महत्त्वाची लेखमाला चालवली होती. ‘अनुभव’चे सहसंपादक महेंद्र मुंजाळ यांनी त्या संदर्भात एक महत्त्वाचा लेख दिला पण तो अंकात समाविष्ट करता आला नाही याचा खेद वाटतो. तरीही त्यांच्या लेखाचा सारांश मांडणारे एक टिपण आम्ही आवर्जून छापले आहे. शिवाय या अंकात येत्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांच्यावरचे विद्यागौरी टिळक आणि डॉ.विलास खोले यांचे दोन महत्त्वाचे लेखही आहेत. 

वाचनसंस्कृती या विषयावरचा हा ‘ललित’च्या सुवर्णहोत्सवी वर्षातला पहिलाच अंक 164 पानी असा भरगच्च झालाय. अनेक वाचकांना तो संग्राह्य वाटेल असे वाटते. या अंकाद्वारे आम्हांला एक सकारात्मक संदेश द्यायचाय, तो असा की बरेच काही विझतेय, संपतेय, विसकटतेय पण तरी ‘सारेच दीप कसे मंदावलेत आता’ असे काही चित्र नाहीये. कोपऱ्या-कोपऱ्यात माणसे उत्साहाने काम करत आहेत. ते सर्व प्रयत्न एकजीव होऊन एका दिशेने वळवले तर चित्र पुन्हा पालटू शकेल. पुस्तके, एकूण वाचन आणि त्यातून मिळणारा अनुपमेय आनंद यावर हजारांनी सुभाषिते सहज मिळतील. पण सुभाषिते मखरात जाऊन बसतात. खरी गरज आहे ती साहित्य- व्यवहारातील सर्व घटकांनी एकत्र येऊन एकदिलाने कंबर कसून प्रयत्न करायची.

Tags: रा.ग.जाधव अनुभव मासिक महेंद्र मुंजाळ नागनाथ कोत्तापल्ले भारत सासणे विनोद शिरसाठ वाचनसंस्कृती विशेषांक ललित सुवर्णमहोत्सव संजय भास्कर जोशी R.G.Jadhav Anubhav Masik Mahendr Munjal Nagnath Kotapalle Bharat Sasane Vinod Shirsath Vachansanskruti Visheshank Lalit Suvarnmahotsav Sanjay Bhaskar Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके