डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘अनुवाद’ या प्रक्रियेविषयी जनमानसात जागृती व्हावी आणि आवड वाढावी या हेतूने पुढील महिन्यापासून एक सदर सुरू करीत आहोत. या सदरात दहा मान्यवर प्रत्येकी दोन लेख लिहितील. ‘मला भावलेला अनुवाद’ आणि ‘मी केलेला अनुवाद’ असे ते दोन लेख असतील. या सदराच्या समन्वयाचे काम संजय भास्कर जोशी करणार आहेत, म्हणून या सदराची पार्श्वभूमी तयार करणारा हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. पुढील तीन महिन्यांत अनुक्रमे संजय भास्कर जोशी, गणेश विसपुते व मिलिंद चंपानेरकर या सदरात लिहिणार आहेत- संपादक  

प्रास्ताविक अनुवाद हे शास्त्र आहे की कला, अनुवादाची नेमकी व्याख्या आणि स्वरूप किंवा श्रेष्ठ अनुवादाची लक्षणे वगैरे ॲकॅडेमिक बाबींचा विचार करण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करणे अगत्याचे वाटते. ती म्हणजे, अनुवाद ही एक अतिशय महत्त्वाची वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक घटना असते. मागच्या शतकाच्या मध्यावर मर्ढेकरांनी ‘आपले साहित्य परपुष्ट आहे, पण पुरेसे परपुष्ट नाही’ असे म्हटले होते; त्या ‘परपुष्ट’तेला (म्हणजे स्वतंत्र सर्जनशील साहित्याला) त्वरणात्मक आयाम किंवा सोप्या भाषेत वाढती गती आणि बळ देण्यासाठी ‘परभाषांतील उत्तमोत्तम साहित्यकृतींचे उत्तमोत्तम अनुवाद’ होणे गरजेचे असते. 

यात दोनदा वापरलेला ‘उत्तमोत्तम’ हा शब्द दोन्ही ठिकाणी सारखाच महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. केवळ लोकप्रिय आहेत आणि उत्तम व्यवसाय करतील म्हणून परभाषांतील दुय्यम साहित्याचा उत्कृष्ट अनुवाद करत राहिल्याने ती सकारात्मक परपुष्टता येणार नाही आणि केवळ जे परभाषिक साहित्य श्रेष्ठ आहे त्याचा कमकुवत व अतिसामान्य अनुवाद करूनही ती बलदंड परपुष्टता येणार नाही. 

मुद्दा अर्थातच केवळ परपुष्टतेचा नाही; तर एकूणच उत्तम अनुवाद संस्कृतीमुळे वाचक, लेखक आणि एकूण साहित्यक्षेत्राला होणाऱ्या लाभांचा आहे. ‘उत्तम अनुवाद संस्कृती’ हा शब्दप्रयोग मला इथे महत्त्वाचा वाटतो. एक मौलिक वाङ्‌मयीन कार्य या भावनेने अनेकविध भाषांतील सर्व प्रकारच्या आणि दर्जाच्या उत्तमोत्तम साहित्यकृतींचे प्रतिभावंत, सर्जनशील व सक्षम लेखकांनी केलेले उत्कृष्ट अनुवाद मोठ्या प्रमाणावर आणि सातत्याने येत राहणे याला मी ‘उत्तम अनुवादसंस्कृती’ असे म्हणेन. 

पण नाही, यात आणखी काही घटक जोडायला हवेत. असे अनुवाद मोठ्या प्रमाणावर वाचले जाणे, विकले जाणे, चर्चेत राहणे आणि त्यांची उत्तम समीक्षा होणे हेही ‘उत्तम अनुवादसंस्कृती’साठी अगत्याचे आहे. एकूणातच अनुवाद करताना अनुवादकापुढे ‘शब्दश: अनुवाद’ आणि ‘आशयानुवर्ती अनुवाद’ हे दोन पर्याय असून बहुतेक जाणकार आणि मीमांसक शब्दश: अनुवादापेक्षा ‘आशयानुवर्ती’ अनुवादाचे महत्त्व सांगतात, असे दिसते. 

याबाबत श्री.म.माटे यांचे उद्‌गार मननीय आहेत. माटे म्हणतात, ‘एका कुपीतील अत्तर दुसऱ्या कुपीत आले आहे की नाही, एवढेच भाषांतराच्या कामी पाहावे. दोन्ही बाटल्यांची काच सारख्याच वाणाची आणि आकाराची असली पहिजे, असा आग्रह धरण्यात काही मतलब नाही.’ बऱ्याच वेळा उत्तम अनुवादासाठी दोन उपमा दिल्या जातात. एक आहे स्वच्छ काचेची आणि दुसरी रंगभूमीवरील अभिनेत्याची. काचेवर काही धूळ, घाण वगैरे असेल तरच काचेचे अस्तित्व दिसते; तसेच अनुवादकाचे अस्तित्व त्यातल्या उणिवांमुळेच दिसावे, अन्यथा अनुवादक अदृश्य असावा असे म्हटले जाते. 

त्याचप्रमाणे अनुवादक हा रंगभूमीवरील अभिनेत्यासारखा असतो, असेही म्हटले जाते. तो जे सांगतो, ते दुसऱ्या कुणी लिहिलेले असते; पण ते त्याचेच आहे, मूळचेच आहे असे त्याला भासवायचे असते. म्हणजे अनुवादामध्ये अदृश्यत्वाचे मोल दुहेरी असते. एकीकडे अनुवादक त्याच्या आशय आणि शैलीबाबत स्वत: अदृश्य असायला हवा; म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची आणि शैलीची सावली अनुवादावर मुळीच पडता कामा नये. त्याचबरोबर अनुवाद इतका अस्सल हवा की, मूळ लेखक कुणी वेगळा आहे, हे समजूच नये. तोच अदृश्य व्हावा. 

अनुवादाबाबत काही महत्त्वाचे मुद्दे इथे मांडत आहे : 
१. गाभ्याचा आशय पोचवणे : मूळ साहित्यकृतीचा आशय अचूकपणे पोचवणे, हे अर्थातच कोणत्याही अनुवादात सर्वप्रथम आणि सर्वाधिक महत्त्वाचे असते. त्यासाठी अनुवादकाचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व तर हवेच, पण त्याचे वाङ्‌मयीन आकलन उत्तम हवे. मूळ पुस्तकाला अभिप्रेत असलेली आशयसूत्रे आणि मूळ पुस्तकाचे गाभ्याचे प्रतिपादन अनुवादकाला अचूकपणे समजायला हवे. अन्यथा, मूळ पुस्तकातील शब्दाशब्दाचे अचूक भाषांतर करूनही आशय मात्र हरवून जाऊ शकतो. 

२. संस्कृती आणि पर्यावरणाचे भान : मूळ आशयानंतर किंवा गाभ्याच्या प्रतिपादनानंतर अनुवादकाने मूळ साहित्यकृतीतील पर्यावरणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- एकोणिसाव्या शतकातल्या फ्रान्सची पार्श्वभूमी असलेल्या कादंबरीचे भाषांतर करताना त्या काळातले फ्रान्समधले लोकजीवन, चालीरीती, मानसिकता यांची जाण अनुवादकाला असायला हवी. उत्तम अनुवाद ही अतिशय अवघड आणि दुर्मिळ गोष्ट आहे ती याचकरता. उदाहरणार्थ- एखाद्या फ्रेंच स्त्रीचे आत्मचरित्र अनुवादित करताना त्यात ‘म्हटलंच आहे ना, अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, तसे झाले माझ्या जीवनाचे’ यांसारखे वाक्य प्रभावी वाटले तरी ते मूळ पुस्तकावर अन्याय करणारे ठरेल. किंवा एखाद्या अमेरिकन कादंबरीतल्या "D$ay and night at war' अशा नावाच्या प्रकरणाला मराठी अनुवादात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असे काव्यात्म नाव दिले तर तेदेखील अनावश्यक संदर्भ देऊन हानिकारक ठरेल. 

३. मूळ भाषेचे ज्ञान आणि अनुवादाचा अनुवाद : अनुवाद मूळ साहित्यकृतीचे (म्हणजे ती मुळात ज्या भाषेत लिहिली गेली त्याच भाषेत) वाचन करून करणे, हा अर्थातच सर्वोत्तम मार्ग. कारण मूळ साहित्यकृतीचा दुसऱ्या एखाद्या भाषेत केलेला अनुवाद वाचून त्याचा अनुवाद केला असता, त्या पहिल्या अनुवादकाच्या चुका किंवा त्याची छाप अशा अनुवादात येणे शक्य असते. 

४. अनुवादाचे संक्षिप्तीकरण : मूळ भाषेतल्या पुस्तकावरून अनुवाद करताना काही वेळा अनुवाद संक्षिप्त करण्याच्या प्रयत्नात आशयाची ओढाताण होऊ शकते. त्यामुळे हा प्रकार टाळलेलाच बरा. कोणता भाग घ्यावा आणि कोणता गाळावा याचा निर्णय मूळ लेखकालाच (कदाचित) घेता येऊ शकेल, तेव्हा असे संक्षिप्त अनुवाद करण्यापेक्षा कथानकाचा किंवा आशयाचा सारांश देणारे पुस्तक तशा उल्लेखासह करावे, हे बरे. 

५. अतिरेकी मराठीकरण : अनुवाद करताना काही परभाषिक शब्द जर मराठीत रोजच्या वापरात प्रचलित आणि मराठी साहित्यात रूढ असतील, तर ते तसेच राहू देणे आवश्यक असते. म्हणजे काही शब्दांचे ओढाताण करून शोधलेले/वापरलेले मराठी प्रतिशब्द अनुवादाचा ओघ बिघडवतात. यासाठी मुळातूनच मराठीत लिहिलेल्या पुस्तकात जर हे परभाषीय शब्द सर्रास वापरले जात असतील, तर मराठी अनुवादात ते आल्यास हरकत नसावी. टेबल, हॉटेल, सिनेमा, शर्ट, पेन, फोन यांसारखे शब्द मूळ मराठी लिहितानादेखील परके वाटत नाहीत. विशेषत: संवादांचा अनुवाद करताना मराठीत बोलताना आपण ‘मी तुला भ्रमणदूरध्वनी करेन’ किंवा ‘तुझी लेखणी मला देतोस का?’ असे बोलत नाही. अशा वेळी अनुवादात मराठीचा अट्टहास वाचकाला त्रासदायक ठरू शकतो. 

६. अनुवादित पुस्तकाचे शीर्षक : पुस्तकाचे नाव हा पुस्तकाचा एक महत्त्वाचा भाग असतो. शक्यतो मूळ नावच शीर्षकस्थानी कायम ठेवणे श्रेयस्कर, कारण शीर्षकामध्ये अनेक अर्थव्यूह आणि अर्थवलये गर्भित असतात. मूळ लेखकाने आपल्या साहित्यकृतीचा सर्वांगीण विचार करून ज्या पद्धतीने वाचकाने पुस्तकाला सामोरे जावे असे वाटते, त्यानुसार शीर्षक योजले असते. त्या सगळ्याचे यथार्थ भाषांतर होणे कठीण असते. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अँड द सी’चा अनुवाद पु.ल.देशपांडे यांनी ‘एका कोळियाने’ या नावाने केला, त्या शीर्षकात भिंतीवरच्या कोळ्याची अर्थच्छटा मिसळली गेल्याने नको ते संदर्भ चिकटले. 

७. ओळींच्या मधल्या आशयाचा अनुवाद : साहित्यशास्त्रात ‘ध्वनी’ संकल्पनेला खूप अर्थ आहे. ध्वनित होणारा अर्थ किंवा ध्वन्यर्थ साहित्यकृतीला निराळीच उंची देतो. कित्येक वेळा अशा दोन ओळींच्या मध्ये सुचवलेला आशय (suggested between the lines)  अनुवादित कसा करावा, हा मोठाच प्रश्न असतो. त्यासाठी पदरची वाक्ये टाकली, तर त्यातल्या सूचकतेचा (subtlity) बळी जातो आणि केवळ लिहिलेल्या शब्दांचे भाषांतर केले, तर तो सुचवलेला आशयच हरपून जायची भीती असते. अशा वेळी अनुवादक कोणता मार्ग वापरतो, ते तपासणे महत्त्वाचे असते. 

८. भाषेवरचे प्रभुत्व : मूळ साहित्यकृतीचा आशय पोचवणे हे जरी अनुवादाचे मुख्य काम असले, तरी अनुवादात मराठीचा डौल आणि सौंदर्य यांचा बळी देऊन ते साधणे उत्तम अनुवादाला मारक ठरते. मराठी भाषेला मोठी परंपरा असून काही शब्द, वाक्प्रचार, वाक्यरचना भाषेचे सौंदर्य वाढवतात; तर काही शब्दरचना साधेपणाने आशय पोचवतात. 

९. रूपांतर, स्वैर अनुवाद आणि वाड्‌मयचौर्य : मूळ पुस्तकातले पर्यावरण, संस्कृती व जीवनशैली आणि लोकजीवनातले संदर्भ मराठी वाचकाला फारच परके वाटल्याने महत्त्वाचा वाटलेला गाभ्याचा आशयच जर पोचणार नसेल; तर काही अनुवादक रूपांतराचा मार्ग स्वीकारतात. म्हणजे जेव्हा पर्यावरण, घटनास्थळे, पात्रांची नावे आणि एकूण पर्यावरण बदलून मूळ साहित्यकृतीचा अनुवाद केला असतो; तेव्हा त्याला रूपांतर म्हणायचे. इथे दोन प्रश्न उद्‌भवतात. पहिले म्हणजे, स्वैर अनुवाद आणि रूपांतर यांत फक्त स्थळे व पात्रांची नावे बदलण्यापुरत्याच भेद असतो का? आणि दुसरे म्हणजे, रूपांतरात मूळ साहित्यकृतीपासून नेमका किती बदल अभिप्रेत असतो? यात केवळ तांत्रिक मुद्दा नाही; तर तात्त्विक, आर्थिक आणि नैतिक मुद्दादेखील गुंतलेला आहे. 

रूपांतर करताना जर केवळ पात्रांची आणि स्थळांची नावे बदलली, पण बाकी घटना-संवाद-वर्णने जशीच्या तशी अनुवादित केली; तर त्याला अनुवाद म्हणावे का रूपांतर, हा केवळ वर्गीकरणाचा प्रश्न नाही. अनुवाद केल्यावर मूळ लेखकाची परवानगी तर लागतेच, पण मूळ लेखकाला रॉयल्टी द्यावी लागते. मग अशा वेळी पात्रांची नावे आणि काही जुजबी बदल करून अमुक पुस्तकाचे रूपांतर असे म्हणून छापले तर रॉयल्टी चुकवता येते काय, हा कळीचा प्रश्न आहे. अनुवादक आणि प्रकाशकाची नैतिकता या संदर्भात मोलाची ठरते. 

१०. अनुवादाची समीक्षा : मराठीत अनुवादाची संकल्पनात्मक किंवा उपयोजित समीक्षा फारशी झाल्याचे दिसत नाही. जी काही वर्तमानपत्री/मासिकांतील समीक्षा येते, तीदेखील अनुवादावर अन्याय करणारीच असते. कारण बहुसंख्य वेळा ही समीक्षा मूळ पुस्तकातील आशय (खरे तर बहुतेक वेळा कथानकच) देऊन शेवटी अनुवादाविषयी ‘...यांनी ओघवत्या भाषेत अनुवाद केला आहे’ असे एखादेच वाक्य देऊन संपते. हा त्या अनुवादावर आणि अनुवादकावर मोठाच अन्याय असतो. वास्तवात अनुवादित पुस्तकाची समीक्षा करताना अनुवादाची शैली, अनुवादकाने आशय पूर्ण पोचवला आहे का, अनुवादातल्या समस्या वगैरे बाबींवर फोकस ठेवला पाहिजे. समीक्षकाने शक्यतो मूळ पुस्तक वाचून काही भागाची प्रत्यक्ष तुलना करून अनुवादाविषयी लिहिले पाहिजे.

मराठीतले अनुवाद : एक दृष्टिक्षेप
अनुवाद हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य आहे. अधिकाधिक अनुवाद होणे हे त्या भाषेची, समाजाची आणि संस्कृतीची उन्नती होण्यासाठी महत्त्वाची घटना आहे. जी. ए. कुलकर्णी, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या अव्वल दर्जाच्या अनेक सर्जनशील लेखकांनी अनेक पुस्तकांचे अनुवाद आवर्जून केले, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनुवादकार्याचे महत्त्व अधोरेखित करताना ‘फाउस्ट’च्या अनुवादाच्या प्रस्तावनेत विंदा करंदीकर म्हणतात, ‘हा बिकट ग्रंथ मराठीत आणण्याचे साहस मी ज्या श्रद्धेच्या जोरावर केले, त्या श्रद्धेचा उच्चार या ठिकाणी केला तर ते अप्रस्तुत ठरणार नाही : मराठीतील प्रत्येक सुशिक्षित लेखकाने जागतिक वाङ्‌मयातील निदान दोन ग्रंथ तरी आपल्या भाषेत आणणे हे त्याचे कर्तव्य आहे, असे मी मानीत आलो आहे.’ 

विंदांनी व्यक्त केलेले हे विचार महत्त्वाचे आहेत. मराठीत झालेल्या अनुवादांच्या आढाव्याबाबत थोडे सविस्तर सांगायला हवे. सन १९९८ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. वीणा मुळे यांनी संपादित केलेला ‘मराठी अनुवाद ग्रंथसूची’ हा बृहद्‌ ग्रंथ प्रकाशित केला. डॉ. वीणा मुळे यांनी केलेले हे काम अचाट आहे. त्यांनी केलेली ही सूची हे संशोधनाची शिस्त आणि विश्लेषणातले सर्जन यांचे उत्तम उदाहरण आहे. या बृहद्‌ ग्रंथात ललित आणि ललितेतर साहित्याच्या अनुवादांचा अगदी विस्तृत आढावा घेतला आहे. 

जिज्ञासू वाचकांनी आणि अभ्यासकांनी अगदी आवर्जून वाचावा  असा तो डबल डेमी आकाराचा ८६२ पानी ग्रंथ आहे. वीणा मुळे यांच्या या सूचीचा संख्याशास्त्रीय अभ्यास केला असता, मागच्या शतकात झालेल्या भाषांतराबाबत खालील निरीक्षणे आढळतात : 
१. सर्वाधिक भाषांतरे कादंबऱ्यांची झाली आहेत, तर त्याखालोखाल कथांची भाषांतरे झालेली दिसतात. (अनुक्रमे ३८ टक्के आणि १५ टक्के)

२. इंग्रजी, संस्कृत आणि अमेरिकन पुस्तकांची सर्वाधिक भाषांतरे झाली आहेत. (अनुक्रमे २३ टक्के, ११ टक्के आणि ९ टक्के). 

३. एकेका भारतीय भाषेपेक्षा किती तरी अधिक पटींनी इंग्रजी आणि अमेरिकन पुस्तकांची भाषांतरे झाली आहेत. भारतीय भाषांपैकी संस्कृत, बंगाली, हिंदी, गुजराती आणि कन्नड याच पाच भाषांतून सर्वाधिक भाषांतरे झाली आहेत. (पाचही मिळून एकूणात ३२ टक्के). 

४. दाक्षिणात्य भाषांचा विचार केला असता, एकट्या कन्नडमधून १२५ पुस्तके मराठीत आली; पण उरलेल्या तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या तीन भाषांतून मिळून केवळ ३७ पुस्तके मराठीत आली आहेत. (याचे कारण उमा कुलकर्णी यांच्यासारखी समर्थ आणि ऊर्जावान अनुवादक असेल काय?) पण त्यातही बारकाईने पाहिले तर दिसते की, १२५ कन्नड पुस्तकांपैकी ७७ चरित्रे- आत्मचरित्रे आहेत. तमिळ आणि तेलुगूतून मात्र प्रत्येकी एकेकच चरित्र अनुवादित झाले आहे. मराठीत अनुवाद करणाऱ्या अनुवादकांकडे दृष्टिक्षेप टाकला; तर कुमुदिनी रांगणेकर, भा.रा.भागवत आणि भा.वि.वरेरकर यांनी सर्वाधिक अनुवाद केले आहेत, असे दिसते. कुमुदिनी रांगणेकर यांनी १०३ अनुवाद केले, तर भा.रा.भागवत यांनी ६६ आणि वरेरकरांनी ५६ अनुवाद केले. 

त्या खालोखाल ह.अ.भावे यांनी ५५, तर भाऊ धर्माधिकारी यांनी ४४ अनुवाद केले. याचबरोबर विजय तेंडुलकर २५, मंगेश पाडगावकर १५, पु.ल.देशपांडे १२, उमाकांत ठोंबरे १४, शांता शेळके १४, अनंत काणेकर १३, ना.सी.फडके १२, ह.ना.आपटे ८, चंद्रकांत काकोडकर ८, वि.वा.शिरवाडकर ७; याशिवाय स्वतंत्र आणि सर्जनशील लेखन करणाऱ्या लेखकांनीही आवर्जून अनुवाद केले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘मायमराठी’ या अनुवादाला वाहिलेल्या मासिकाचे २००८ पासूनचे अंक मिळाले. त्यांत २००४ ते २०१२ या काळात प्रकाशित झालेल्या एकूण ९४३ पुस्तकांची यादी दिली आहे. त्या यादीचे संगणकावर केलेल्या विश्लेषणाच्या आधारे असे दिसते की, मागच्या शतकात कादंबरी आणि कथा (अनुक्रमे ३८ टक्के आणि १५ टक्के) यांचे अनुवाद एकूण अनुवादाच्या निम्मे होते, ते आता ३६ टक्के झाले आहेत; 

तर इतर (म्हणजे विज्ञान, माहिती आणि प्रेरणादायी) पुस्तके मागच्या शतकात फक्त ७ टक्के होती, ती आता ३६ टक्के इतकी झाली आहेत. ही आकडेवारी कल दाखवायला पुरेशी आहे, असे मला वाटते. वाचकांना आता अधिकाधिक ‘उपयुक्ततावादी’ पुस्तकेच आवडतात, असे या आकडेवारीवरून दिसते. (अर्थात ही यादी सर्वसमावेशक नाही, हे इथे गृहीत धरले आहे.) या ९४३ पुस्तकांच्या यादीतील जवळजवळ सव्वातीनशे म्हणजे एक-तृतीयांश अनुवाद एकट्या मेहता प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत, तर साकेत व पद्मगंधा प्रकाशनाने प्रत्येकी ४०-५०, तर पॉप्युलर आणि रोहन प्रकाशनाने तीसेक अनुवाद प्रकाशित केले आहेत.

अनुवादांचे गुणात्मक संख्याशास्त्रीय विश्लेषण
आता या संख्यात्मक विश्लेषणानंतर गुणवत्तेचे संख्यात्मक विश्लेषण करायचा प्रयत्न करू या. म्हणजे, जे अनुवाद झाले, त्या मूळ पुस्तकांची गुणवत्ता काय होती त्याचा तपास करू या. त्यासाठी नमुना म्हणून मागच्या शतकातील कादंबरी हा साहित्यप्रकार घेऊ या. एकूण १४९७ कादंबऱ्यांचे भाषावार विश्लेषण असे आहे : 

१. आजवर एकूण सुमारे ११० लेखकांना साहित्यासाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च मानला गेलेला नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांत सर्वाधिक १२ वेळा हा पुरस्कार फ्रेंच साहित्यिकाला तर अमेरिकेला ९ वेळा, इंग्रजीला ९ वेळा, स्वीडन व जर्मनीला प्रत्येकी ८ वेळा आणि इटलीला ६ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. वास्तवात या नोबेल पारितोषिकविजेत्या साहित्यिकांची बहुसंख्य पुस्तके अनुवादित व्हायला हवी होती. परंतु लोकप्रिय आणि रेसी थ्रिलर लिहिणाऱ्या लेखकांची पुस्तके मोठ्या प्रमाणावर अनुवादित झाली आहेत, पण या नोबेलविजेत्या लेखकांची मात्र अगदीच कमी पुस्तके अनुवादित झालेली दिसतात. उदाहरणार्थ- फ्रेंच साहित्यिकांना १४ वेळा हा पुरस्कार मिळाला म्हणजे त्या लेखकांची किमान दीडशे पुस्तके असतील, पण मराठीत मात्र केवळ सात अनुवाद झाले आहेत. (फक्त काम्यु,  बेकेट आणि अनातोल फ्रान्स याच तीन लेखकांची) तसेच चित्र इतर भाषांबाबत दिसते. 

२. भारतीय भाषांतल्या साहित्याच्या अनुवादात मात्र अनेक भाषांतील साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या पुस्तकांची संख्या लक्षणीय आहे. (ते काम अर्थातच स्वत: साहित्य अकादमीने पुढाकार घेऊन केले आहे, हे त्याचे कारण असावे) अर्थात त्यातही पंजाबी, हिंदी, गुजराती, कन्नड अशा निवडक भारतीय भाषांतीलच साहित्य अकादमी पुरस्कारविजेती पुस्तके अनुवादित झालेली आहेत. 

३. बरे, नोबेल पुरस्कारविजेते लेखक बाजूला ठेवून क्लासिक समजले गेलेले साहित्यिक बघितले तरी फारसे आशादायक चित्र दिसत नाही. ऑस्कर वाइल्ड, सॉमरसेट मॉम, जॉर्ज ऑर्वेल, आर्थर कोस्लर, डी.एच.लॉरेन्स, थॉमस हार्डी यासारख्या श्रेष्ठ लेखकांचीही प्रत्येकी एक- दोन, फार तर एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच पुस्तके अनुवादित झाली आहेत. याउलट जेम्स हॅडले चेस ४१, ॲगाथा ख्रिस्ती १३, आर्थर कॉनन डॉयल २०, इयान फ्लेमिंग ९, रेनॉल्ड्‌स २९, ज्यूल व्हर्न २७, जोनाथन स्विफ्ट १५, यासारख्या लोकप्रिय लेखकांची पुस्तके मोठ्या प्रमाणावर अनुवादित झाली आहेत. 

एकूणात डॉ.वीणा मुळे यांच्या सूचीच्या आधारे मागच्या शतकापर्यंतच्या अनुवादित पुस्तकांच्या गुणवत्तेचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले असता असे दिसते की, मराठीत मुख्यत: खपतील अशा पुस्तकांचा अनुवाद करण्याकडेच जास्त कल आहे. मराठी साहित्यविश्व जगातल्या श्रेष्ठ साहित्याने समृद्ध करावे, असे प्रयत्न तुलनेने फारच कमी आहेत. आता असेच विश्लेषण एकविसाव्या शतकातील २००४ ते २०१२ या काळातील अनुवादांचे करू या. इथे कथात्म साहित्यापेक्षा माहितीपर साहित्याचे अनुवाद जास्त झाले आहेत, असे प्रथमदर्शनीच दिसून येते. कथात्म साहित्यात कादंबऱ्यांचे प्रमाण जास्त असले तरी एकूण ललित साहित्याचेच प्रमाण ओसरले आहे. 

विशेष म्हणजे, कविता आणि नाटकांचे प्रमाण अत्यल्प झालेले दिसते. याच काळात पद्मगंधा प्रकाशनाने ॲगाथा ख्रिस्ती या विख्यात रहस्यकथा लेखिकेच्या कादंबऱ्यांचे अनुवाद मधुकर तोरडमल यांच्याकडून करवून घेतले. तसेच रोहन प्रकाशनाने सत्यजित राय यांच्या फेलुदा या नायकाच्या रहस्यकथांचे आणि शरदिंदू बंदोपाध्याय यांच्या ‘फेलुदा’ या नायकाच्या कादंबऱ्यांचे अनुवाद करून घेतले. रोहन प्रकाशनाने आर.के.नारायण यांच्या इंग्रजी कादंबऱ्यांचे अनुवाददेखील अशोक जैन, सरोज देशपांडे या ज्येष्ठ लेखकांकडून करवून घेतले. 

साकेत प्रकाशनाने याच काळात अनेक नोबेल, बुकर, अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले. त्यांत ब्लाइन्डनेस (ज्युसे सारामागु), स्नो (ओऱ्हान पामुक), किम (रुदयार्ड किपलिंग), कॅचर इन द राय (जे.डी. सॅलिंजर), डिसग्रेस (कोएर्त्झी) वगैरे अनेक श्रेष्ठ पुस्तकांचा समावेश आहे. पद्मगंधा प्रकाशननेही ॲगाथा ख्रिस्ती या लोकप्रिय कादंबरीकाराच्या कादंबऱ्यांबरोबरच अनेक श्रेष्ठ पुस्तकांचे अनुवाद केल्याचे दिसते.

अनुवादाचा दर्जा
अनुवादाची फारशी गंभीर समीक्षा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे झाली नसली तरी स्फुट स्वरूपात काही लेखन झालेले आढळते. उदाहरणार्थ- ‘मायमावशी’च्या २००८ च्या दिवाळी अंकात ‘थोर लेखक अनुवादकाच्या भूमिकेत’ या विभागात ना.सी.फडके, रा.भि.जोशी आणि वि.वा.शिरवाडकर यांनी केलेल्या अनुवादाची चिकित्सा प्रल्हाद वडेर, राम पंडित आणि एकनाथ पगार यांनी केली आहे. विलास सारंग, भालचंद्र नेमाडे यांसारख्या ज्येष्ठ समीक्षकांनीही अनुवादाची चिकित्सक तपासणी केली आहे. ना.सी.फडके यांच्या अनुवादांची प्रल्हाद वडेर यांनी केलेली चिकित्सा एकूण मराठी अनुवादांची प्रातिनिधिक वाटावी इतकी नेमकी आहे. प्रल्हाद वडेर यांनी फडक्यांच्या अनुवादाबाबत खालील निरीक्षणे नोंदवली आहेत : 

१. जी.ए.कुलकर्णी जसे अनुवादात आपलीच शैली वापरतात तसेच ना.सी.फडकेही बहुतेक वेळा आपलीच शैली अनुवादात वापरतात. 

२. बहुतेक वेळा फडके आपल्याला सोईची नसलेली वाक्ये, परिच्छेद- इतकेच काय, प्रकरणेच्या प्रकरणे गाळून अनुवाद आपल्या पद्धतीने ‘बांधेसूद’ करतात. 

३. अनेक वेळा फडके मूळ पर्यावरणात नसलेले आणि रसविघ्नकारक मराठी शब्द घुसडून अनुवाद विद्रूप करतात. उदाहरणार्थ : मोपासाच्या ‘नेकलेस’मध्ये फडके यांनी ‘आह! आमटी काय छान झाली आहे’ असं  मराठीकरण केले आहे, किंवा सारोयानच्या कादंबरीचा अनुवाद करताना भारतीय धर्म-अध्यात्म यातल्या सत्त्वगुण, तमोगुण, मोक्ष वगैरे संकल्पना त्यांनी अनुवादात आणून मूळ आशयाला बाधा आणली आहे. 

४. एकूणात, फडके यांनी केलेल्या अनुवादाने मराठीत काही उत्कृष्ट साहित्यकृतींची भर पडली, असे म्हणता येणार नाही. (अशी परखड मते मांडून प्रा.वडेर यांनी सहानुभूतीने शेवटी ‘अर्थात त्यांनी केलेले कार्यही कमी महत्त्वाचे नाही’ असे एक ‘उत्तेजनार्थ पारितोषिका’सारखे वाक्य टाकले आहे. असो.) प्रल्हाद वडेर यांचा हा अभिप्राय मुद्दाम विस्ताराने दिला, कारण तो बऱ्याच अंशी एकंदर मराठी अनुवादांना लागू पडतो. (अर्थातच काही सन्माननीय अपवाद ठळकपणे उठून दिसतात, याची नोंद घ्यायलाच हवी.) विख्यात लेखक पु.ल.देशपांडे यांनी केलेल्या हेमिंग्वेच्या ‘द ओल्ड मॅन अँड द सी’च्या ‘एका कोळियाने’ या अनुवादाची चिकित्सा करताना विलास सारंग यांनीही अशाच प्रकारची चिकित्सक निरीक्षणे नोंदवली आहेत. 

विलास सारंग यांचे अनुवादविषयक विचार या दृष्टीने मोलाचे आहेत. या लेखात सारंग यांनी मूळ पुस्तकातील ‘ही थॉट’ हे पुनरुक्त होणारे शब्द, उद्‌गारचिन्हांचा व डॅशचा वापर आणि ‘अँड’ या अव्ययाचा वापर अशा वरवर गौण वाटणाऱ्या गोष्टींच्या चुकीच्या वापरामुळे संपूर्ण अनुवादात मूळ पुस्तकाचे गांभीर्य कसे नष्ट होते आणि अनुवाद विद्रूप होत मूळ लेखकावर कसा अन्याय करतो, हे सोदाहरण दाखवून दिले आहे. अनुवाद जर मूळ पुस्तकावरून केला नसेल, मूळ पुस्तकाच्या दुसऱ्या भाषेतील अनुवादावरून केला असेल, तर मूळ आशयाला कशी हानी पोचते त्याचे सोदाहरण विवेचन विलास सारंग यांनी गटेच्या ‘फाउस्ट’ या विख्यात नाटकाचा विंदा करंदीकरांनी केलेल्या अनुवादाच्या उदाहरणाने विशद केले आहे. (अक्षरांचा श्रम केला) अतिरेकी मराठीकरणामुळेदेखील अनुवाद बिघडल्याची अनेक उदाहरणे देता येतील. याचे एक गमतीशीर उदाहरण टोनी मॉरिसन यांच्या ‘बिलव्हेड’ या गाजलेल्या कादंबरीच्या अनुवादात आढळते. त्यात एका पात्राचे नाव डळुे (सिक्सो) असे आहे. 

अनुवादिकेने त्याचाही अनुवाद ‘सहावा’ असा केला आहे. म्हणजे ‘सहावा म्हणाला.... सहाव्याने असे केले..’ खरे तर विशेषनामे तशीच ठेवणे गरजेचे असते. असो. उत्तम अनुवादसंस्कृती नॉर्वेमधल्या बुक क्लबने जगातल्या ५४ देशांतून १०० विख्यात लेखकांना सर्वाधिक महत्त्वाची वाटलेली १० पुस्तके कळवा, अशी मागणी केली होती आणि त्यांतून जगातल्या १०० सर्वश्रेष्ठ पुस्तकांची यादी तयार केली होती. आता या यादीतल्या किती पुस्तकांचा अनुवाद झाला आहे, हे पाहणे आवश्यक आहे. या यादीत २९ इंग्रजी, ११ फ्रेंच, १० जर्मन, ९ रशियन, ६ स्पॅनिश, ५ इटालियन, ५ ग्रीक पुस्तके आहेत. यांतल्या काहींची मराठीत भाषांतरे, तर काही पुस्तकांची संक्षिप्त किंवा स्वैर रूपांतरे झालेली आहेत. 

ही जर जगातली श्रेष्ठ पुस्तके मानली जात असतील, तर किमान या पुस्तकांचा मुळाबरहुकूम उत्तम अनुवाद मराठीत होणे ही प्राथमिक गरज नाही का? तेव्हा मराठीत ‘उत्तम अनुवादसंस्कृती’ निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम अशा श्रेष्ठ पुस्तकांचे उत्तम अनुवाद होणे गरजेचे आहे. या प्रयत्नांना काहीएक दिशा देणे अगत्याचे आहे आणि सर्वांच्या प्रयत्नांत सुसूत्रता आणून अनुवादाचे काम व्हायला हवे. आधी म्हणल्याप्रमाणे ‘उत्तम अनुवादसंस्कृती’ म्हणजे ‘जगातल्या उत्तमोत्तम पुस्तकांचे उत्तमोत्तम अनुवाद मराठीत होणे, ते मोठ्या प्रमाणावर विकले व वाचले जाणे; आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर चिकित्सा होणे’ असे अभिप्रेत आहे. 

एकूण अनुवादसंस्कृती वाढवायची तर प्रकाशक, लेखक, जाणकार आणि विविध संस्थांनी एकत्र येऊन काम करायला हवे. ते अशक्य आहे, असे नाही. उत्तमोत्तम अनुवाद मराठीत येणे हे वाचक, लेखक,प्रकाशक या सर्वांनाच लाभदायक आहे, हे समजून काम करायला हवे. त्यात एकवाक्यता आणि सुसूत्रता आणून उत्तम अनुवादसंस्कृती निर्माण करणे अगत्याचे आहे. ‘साधना’तर्फे अनुवादाविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता, चर्चा आणि काम सुरू व्हावे याच हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत.

Tags: अनुवाद संजय जोशी संजय भास्कर जोशी मराठीतले अनुवाद : एक लेखाजोखा Marathitale anuvad: ek lekhajokha Anuvad Sanjay Joshi Sanjay Bhaskar Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके