डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आपण प्रवासवर्णनकार आहोत का समीक्षक, कथाकार आहोत का कवी, चरित्रकार आहोत का कादंबरीकार हे सारे सारे गौण समजायला शिकायला हवे. तुम्हापासून काम लपवायचे? आम्ही औद्योगिक क्षेत्रातून आलो. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंटपदावरून आलो. जे पिकते ते विकावे यापेक्षा जे विकते ते पिकवावे यावर आमची अंमळ अधिकच श्रद्धा. तेव्हा सध्या काम विकत आहे त्याचा शोध घेऊन आम्ही तेच पिकवले तर आम्हास आपण दोष द्याल का? आम्हांस सद्‌बुद्धी म्हणा किंवा दुर्बुद्धी झाली म्हणा, आम्ही लक्षावधी रुपये देणारी नोकरी सोडून या साहित्य क्षेत्रात आलो. परंतु आता आम्हास हे क्षेत्र तर अधिकच मौजेचे वाटत आहे. येथले एकेक धुरंदर जर आमच्या औद्योगिक क्षेत्रात असते तर मोठेच मानमरातब मिळवून दांडगे दांडगे सरदार झाले असते. असो. (टीप: दांडगे म्हणजे मातब्बर हो! इथे त्या दा.दा. दत्ता दंडग्यांचा काही संबंध नाही, बरे का. अजून ते ‘सोऽहय कोऽहय’ करत असल्याने त्यांचा ‘अहम’ जागा व्हायचा आहे, तेव्हा तूर्तास त्यांच्याकडून विशेष धोका नसावा !)

मराठी साहित्य विश्वाचा एकूण नूर आणि सूर पाहता, एक ना एक दिवस आम्हाला कोणी ना कोणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी उभे राहायचा आग्रह करणार हे अगत्याचं, मोलाचं आणि उचितच होतं. खरं तर अपेक्षितच होतं. अखेर आमच्याच सुपुत्रानं तो विषय काढला. सकाळी चहा पितापिता पित्याला (म्हणजे आम्हाला) तो म्हणाला, ‘बाबा, तुम्ही का हो नाही उभे राहात या इलेक्शनला? तुम्ही पण रायटर ना, बाबा?’ (त्याचं वाचन चांगलं आहे. वाङ्‌मयाची जाणही सखोल आहे त्याला.) आमच्या पत्नीनेही त्याच्या सुरात सूर मिसळला आणि आम्ही खरे सांगायचे तर, गहिवरून आलो /गहिवरलो. (जो शब्दप्रयोग योग्य असेल तो खोडा, आय मीन ठेवा. उरलेला खोडा. सॉरी फॉर द स्लीप ऑफ द टंग्ज.)

अमेरिकेच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पान तावणे हे तर ठरलेलेच आहे आणि महाबळेश्वरच्या संमेलनात ऑल रेडी रा.रा. यादव आणि सा.सा.सारडा उभे आहेत त्यामुळे तो प्रश्नच मिटला. (रा.रा. म्हणजे राजमान्य राजश्री तसेच पुनरुक्ती टाळण्यासाठी ‘सा सा’ म्हणजे साक्षेपी साहित्यिक.’ तो केवळ प्रास साधामचा, प्रयास नव्हे. आणि ‘सा’ म्हणजे सार्वजानिक नव्हे हे लक्षात घ्यावे.) त्या रारा आणि सासांच्या झोंबीत आपण कशाला पडा? तेव्हा पुढच्या वर्षीचे ‘विश्व मराठी संमेलन’ कुठे होईल, याचा अंदाज बांधायला आम्ही सुरुवात केली. यंदाच्या खर्चाचा अंदाज घेता, ते जवळपास कुठेतरी म्हणजे आमच्यामते ते बँकॉक किंवा पटाया येथे होईल. तेव्हा त्यासाठी मोर्चेबांधणी करायचे आम्ही ठरवले. बँकॉक ही तर थायलंडची राजधानी आणि पटाया ही पर्यटकांची राजधानी. दोन्ही ठिकाणी ‘मसाज’ हा मुख्य व्यवसाय ! मराठी साहित्यिकांना आवडेल असेच हे पर्यावरण. (संपादक, प्रकाशक, विक्रेते, वाचक...कुणाकुणाचा करू सांगा - मसाज!) कुणा नवख्या कादंबरीकारानं तर म्हणे ‘मसाज’ नावाची कादंबरी लिहिल्याचेही ऐकिवात आहे. (अर्थात कादंबरीच्या क्षेत्रात तेव्हा नवखे असलेले हे सद्‌गृहस्थ नाट्यक्षेत्रात मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दिग्गज होते. असो.)

अध्यक्षपदासाठी उभे राहायचे म्हणल्यावर सर्वप्रथम आम्ही आमचे स्पर्धक कोण असतील याची चाचपणी सुरू केली. पहिले म्हणजे अर्थातच आमचे परममित्र राजन खान असणारच. यंदा विश्रांती घेऊन ते पुढच्या वर्षी नव्या जोमाने येणार ही शमता आहे. पण त्यांना संमेलनाध्यक्षपद किंवा नोबेल, यातले कोणतेही एक चालणार असल्याने आम्ही त्यांच्याबाबत वेगळीच रणनीती आखत आहोत. शिवाय ते आमचे परममित्र आणि निर्मळ मनाचे असल्याने त्यांचा कात्रज करणे सोपे जाईल. दुसरे म्हणजे रारा यादव किंवा सा सा सारडा यांतले यंदा पडतील ते आमचे स्पर्धक असणार. एक बरे आहे, सासणे, मतकरी, नेमाडे, श्याम मनोहर, पठारे, सारंग वगैरे चांगले चांगले, दर्जेदार दर्जेदार, थोर्थोर श्रेष्ठ श्रेष्ठ लेखक या निवडणुका-फिवडणुकांच्या भानगडीत मुळातच पडत नसल्याने त्यांच्याकडून काहीच धोका किंवा दगाफटका संभवत नाही. बघा आमचा चाणाक्षपणा ! स्पर्धेच्या दृष्टीने सर्वाधिक धोकादायक अशा या लेखकांना थोर म्हणून टाकून त्यांच्याकडून स्पर्धा होणार नाही अशी सोय आम्ही किती सहजगत्या करून टाकली ! विचार करकरून अशा थोर लेखकांच्या या यादीत अजून खूप नावे टाकायला हवी. तेवढीच स्पर्धा कमी. त्यासाठी आमचे दुसरे परममित्र आणि थोर लेखकांचा कोष असे मा.मा. हरिश्चंद्र थोरात यांचा सल्ला घ्यावा. (मा.मा. म्हणजे माननीय मातब्बर होय, त्यांच्या रूपावरून वाटतात तसे ‘मार्सवादी’ नव्हे हो !) बरे त्यांचाच सल्ला घेतल्याने तेही आपोआप बाद होतील! थोर समीक्षक रारा रा. ग. जाधव आणि हा.हा. हातकणंगलेकरांमुळे ही समीक्षक सुद्धा या भानगडीत पडतात तेव्हा ती काळजी घ्यायला हवी. (‘हा.हा. म्हणजे ‘हायली हार्टी’ अर्थात अत्यंतिक सहृदय होय.) यंदा पडले तर सासा सारडांकडून तो धोका आहेच आम्हाला. बरे आजवरच्या जा.जा. जाधव, भा.भा. भेंडे वगैरे अध्यक्षांच्या चालीवर रारा यादव किंवा सासा सारडा यातले जे जिंकतील ते संमेलनानंतर मात्र अध्यक्ष पदात कसा काही अर्थ नाही असा लेख ‘अंतर्नाद’मधे लिहीतीलच. त्यामुळे अजून चार पाच नावे गारद होतील असाही अंदाज आम्ही बांधला. (आता दर वेळी आम्ही ‘जा.जा.’ म्हणजे काम अन ‘भा.भा.’ म्हणजे काम वगैरे सांगत बसणार नाही. जाणकारांनी आपापल्या कुवतीप्रमाणे त्याचे अर्थ लावावेत. पण ती सर्वच लेखक आणि विशेषणे थोर आहेत हे ध्यानात ठेवले म्हणजे झाले.) एकूणातआमचा मार्ग आमच्या मनातल्या मनात सुकर होत चालला.

म्हणजे खरा धोका दुय्मम किंवा तिय्मम लेखकांकडूनच आहे. (कोणरे ते तिकडून आम्हाला म्हणाले, ‘म्हणजे तुमच्याचसारख्या तुमच्या गटवाल्यांकडून’ असे? ) अशा दुय्मम - तिय्मम (पण दाबून पैसे मिळवणाऱ्या) लोकांच्या लेखनाचा सखोल अभ्यास करण्याचे व्रतसध्या रेखा इनामदार-साने यांनी घेतले असल्याने त्यांना गाठणे आवश्यक आहे. खरे तर सिनेमा नाटकातच अशी बर्वे-इनामदार, कुलकर्णी-देव वगैरे डब्बल आडनावे लावायची पद्धत असताना या थोर साहित्यिक, अभ्यासक बार्इंनी आपले ‘अस्तित्व’ डब्बल दाखवायला असे डब्बल नाव का लावावे, याचा ही एकदा शोध घ्यायला हवा. मुदलात बार्इंचे पतीदेव त्यांनाही (म्हणजे बाईंना, पतीदेवांना नव्हे) न कळणारी गीतेवरची श्रेष्ठ पुस्तके लिहीत असताना बार्इंनी असल्या आम जनतेला आवडणाऱ्या पुस्तकांवर अभ्यास का करावा? अस्तित्ववाद वगैरेभलभलत्या (त्या चाही आम्ही एकदा अभ्यास  करणारच आहोत) विषमांवर लिहिताना एक नाव आणि बाबा कदम, सुहास शिरवळकर वगैरेंवर लिहिताना दुसरे नाव असे लावणे जास्त सयुक्तिक नसते का ठरले? म्हणजे अस्तित्ववादावर लिहिणाऱ्या त्या रेखाबाई साने आणि पॉप्युलेशन लिटरेचरवर लिहिणाऱ्या त्या रेखाताई इनामदार असे समजून लोकांची सोय नसती का झाली? (वरील वायात पॉप्युलिस्ट, पॉप्युलर,पॉप्युलेशन... यापैकी चुकीचा शब्द आढळल्यास तो मुद्रणदोष समजावा.) असो.

या बाबतीत (म्हणजे साहित्य संमेलनाच्या बाबतीत, रेखाताईंच्या नव्हे. त्याबाबतीत केवळ त्याच! असो. ) हमखास उपमुक्त (हा ‘उपयुक्त’ शब्द आम्हाला नेहमी आयुक्त, उपायुक्त सारखाच वाटतो, तेव्हा अक्षरजुळणी करणाऱ्याने काळजी घ्यावी, म्हणजे नसते गैरसमज नको. कारण‘उपायुक्त’ हा ‘उपयुक्त’ असतोच असे नव्हे. असो.) हमखास उपयुक्त ठरतील असे मूळचे नगरवासी आणि आता पुणेकर झालेले थोर प्रकाशक, संपादक,  सदरकार,  लेखक,  कादंबरीकार (अशीच अजून चार पाच जबरदस्त विशेषणे लावून यांना ही स्पर्धेतून गारद करावे हे बरे. हो! कोणाचा काय भरोसा.) आणि आमचे परममित्र जा.जा. श्री. अरुणभाऊ जाखडे यांचा सल्ला घ्यावा असे आम्ही ठरवले. (टीप: रा.ग. जाधवांच्या वेळचे ‘जाजा’ आणि जाखडयांच्या वेळचे ‘जाजा’ निराळे बरे का. – संबंधितांनी नोंद घ्यावी.) अरुणभाऊंचा सल्ला म्हणजे पुराणात जशी ती सत्यभामेची पारिजातकाची फुले फेमस झाली तसा प्रकार. त्याचं काम आहे, की अरुणभाऊंचा सल्ला त्यांच्या गटातले लोक आणि त्यांच्या विरोधी गटातले लोक सारख्याच हक्काने आणि विश्वासाने घेत असतात. गंमत म्हणजे अरुणभाऊंचा सल्ला दोन्ही बाबतीत सारखाच प्रामाणिक, सारखाच उपयोगी, सारखाच निरुपयोगी आणि सारखाच निरुपद्रवी असतो. उगीच नाही दिवसामसापमध्ये तावातावाने विश्व मराठी संमेलनावर बोलणाऱ्या अरुणभाऊंना संध्या काळी थेट अमेरिकेतून देवकुळेंचा आयएसडी फोन येतो – सल्ला मागायला ! (सल्ला बहुतेक विश्व साहित्य संमेलनाचं बजेट कसं सांभाळावं यावर असेल !) त्यामुळे कँपेन मॅनेजमेंटबाबत अरुणभाऊंचा सल्ला घ्यायचं आम्ही नक्की केलं आहे.

अर्थात तत्पूर्वी आम्ही वा.वा. वि.भा. देशपांडे यांना सदिच्छा भेट द्यायला जाणारच आहोत. ‘सांप्रतचे भरतमुनी’ असाच त्यांचा उल्लेख आम्ही खाजगीत करतो हे या प्रसंगी जाहीर करायला हरकत नाही. साहित्यिकमानाची, वाड्‌मयीन प्रगतीची आणि टिळक रोडची सुरुवात यांच्याच कार्यालयाने होते. तेव्हा प्रथम तुला वंदितो.

देव करो (नुसता देव बरे, देवकुळे नव्हे !) पण अध्यक्षीय निवडणुकीबाबतकाही तांत्रिक, कायद्याच्या भानगडी उपटल्याच तर आदरणीय विश्वनागरिक मी.मी.मीनाताई प्रभू (म्हणजे पुन्हा प्रभू म्हणजे देव आलाच) यांचा सल्ला घ्यायचे आम्ही ठरवले आहे. मी ना, मी ना म्हणत मीच, मीच म्हणायचा सराव असलेला बरा. शिवाय बँकॉक-पटायामधेही आदरणीम, वंदनीय मीनातार्इंचा एखादा प्रासाद असणारच. अध्यक्षपदाचे भाषण करून घाम पुसायला जागा तर हवीच ना! एक मात्र आहे, प्रवासवर्णने पॉप्युलेशन लिटरेचर मधे येतात का ते एकदा रेखाताई इनामदारांना विचारायला हवे. लग्नानंतर आमच्या हिच्या आग्रहाने एकदा श्रीक्षेत्रनाशिक जवळच्या वणीला गेलो होतो त्याबद्दल एक पत्र आम्ही मेहुणीला लिहिले होते. त्यातला काही (म्हणजे सुमारे 87% व्यक्तिगत) मजकूर वगळता ते एक प्रवासवर्णनच आहे. उगाच अध्यक्षपदाच्या एलिजिबीलिटीबाबत हयगय नको इतकेच हो!

याबाबत एक मात्र नक्की. आपण प्रवासवर्णनकार आहोत का समीक्षक, कथाकार आहोत का कवी, चरित्रकार आहोत का कादंबरीकार हे सारे सारे गौण समजायला शिकायला हवे. तुम्हापासून काम लपवायचे? आम्ही औद्योगिक क्षेत्रातून आलो. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंटपदावरून आलो. जे पिकते ते विकावे यापेक्षा जे विकते ते पिकवावे यावर आमची अंमळ अधिकच श्रद्धा. तेव्हा सध्या काम विकत आहे त्याचा शोध घेऊन आम्ही तेच पिकवले तर आम्हास आपण दोष द्याल का? आम्हांस सद्‌बुद्धी म्हणा किंवा दुर्बुद्धी झाली म्हणा, आम्ही लक्षावधी रुपये देणारी नोकरी सोडून या साहित्य क्षेत्रात आलो. परंतु आता आम्हास हे क्षेत्र तर अधिकच मौजेचे वाटत आहे. येथले एकेक धुरंदर जर आमच्या औद्योगिक क्षेत्रात असते तर मोठेच मानमरातब मिळवून दांडगे दांडगे सरदार झाले असते. असो. (टीप: दांडगे म्हणजे मातब्बर हो! इथे त्या दा.दा. दत्ता दंडग्यांचा काही संबंध नाही, बरे का. अजून ते ‘सोऽहय कोऽहय’ करत असल्याने त्यांचा ‘अहम’ जागा व्हायचा आहे, तेव्हा तूर्तास त्यांच्याकडून विशेष धोका नसावा !)

हा साराच प्रकार तुफान विनोदी आहे असे म्हणताच आमचे परममित्र मुकुंदराव टाकसाळे, किंवा हा साराच प्रकार मानवी मेंदूचा अनाकलनीय भंपकपणा दाखवतो असे म्हणताच आमचे सन्मित्र सुबोधराव जावडेकर, किंवा ही धुळवड म्हणजे साखर कारखान्याच्या निवडणुकीसारखीच आहे असे म्हणताच आमचे आदरणीय स्नेही रवींद्रजी शोभणे असे अनेकजण आमचे तोंड चुकवून चालते झाले याचा अर्थ काय? – या प्रश्नात आम्ही सध्या गुंग आहोत. आमचे नेणीवेतले मन म्हणते, की हे तथाकथित सन्मित्र याबाबतीत आमचे प्रतिस्पर्धीआहेत. तेव्हा सावध असावे हे बरे. सन्मित्र, परममित्र म्हणताना आम्ही बेसावध नाही याचीही  संबंधित मित्रवर्गाने नोंद घेतलेली बरी. (हो! या‘प्रतिस्पर्धी’ शब्दावरून आठवले, त्या का.का. किरण नगरकराला एकदा श्रेष्ठ साहित्यिक ठरवून स्पर्धेतून बाद करायला हवे. कोणाचा काय भरोसा? लेकाचा ऐनवेळी बाजी मारावयाचा ! उगाच रिस्क नको.)

संजय उवाच : खुळी माणसे खुळेपणा करतील. शहाणी माणसे शहाणपणा करतील. पण संमेलने हवीतच. त्या निमित्ताने घुसळण झाली तर बरेच. आमचे परममित्र रमेश इंगळे किंवा मंगेश काळे आमच्यावर टीका करोत भले, पण घुसळण हवीच. मिसळण हवीच. मामा थोरात आणि आदरणीय रेखाताई इनामदार यांनी आपापले अनुक्रमे थोर्थोर आणि पॉप्युलिष्ट घोडे ओळीने उभे करावेत अन्‌ दंगा माजवून द्यावा. (आम्ही नुसतेच घोडे, इकडेही नाही अन्‌ तिकडेही नाही. मामा थोरात आम्हांस थोर समजत नाहीत आणि आम्हाला दाबून पैसा मिळत नसल्याने रेखाताई आम्हाला पॉप्युलिष्ट मानायला तयार नाहीत.) असो. या निमित्याने थोर्थोर म्हणणारे जमिनीवर यावेत हे बरे अन्‌ भंपकांचे भंपकपण दिसेल तर तेही बरेच. आपापल्या गावात, गल्लीत अन्‌ मोह्ल्य्यात, घरात अन्‌ माज घरात बाजी मारणारे बहुत जाले. आम्हास काम, मौज आली की बरे. संमेलन असो की जत्रा, कुस्त्या हव्या, सर्कस हवी, शर्यती हव्या, शेव-गुडदाणी हवी. मौज हवी. (आम्ही सामान्य, मौज म्हणजे मज्जा, येथे दुसरा कोणता श्लेष नाही हो!!)

तळटीप : शीर्षकातले ‘‘आ.आ. आम्ही’’ म्हणजे ‘आजन्य आपलेच’ होय!

(अरे कोण रे तिकडून म्हणाला, ‘‘या उवाचवाल्याचं ‘आआ’ म्हणजे ‘आचरट आचार्य’-‘’ असे?) असो. आम्हांस आता असल्या आगळिकीकडे दुर्लक्ष करायला शिकायला हवे.

Tags: साहित्य संमेलन आस्वाद स्पंदनांचे उत्सव संजय भास्कर जोशी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके