Diwali_4 सर्जन आणि श्रद्धा यांची सकारात्मक व्यवस्था
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)


सध्याच्या कोरोनाग्रस्त पर्यावरणात मला सुचलेल्या दोन ओळी आणि एक विचार देतो आधी -

ओस देवालये, गच्च इस्पितळे

देव आहे कुठे आज आम्हा कळे ।।

आणि सुचलेला विचार असा :

एक धूसर आशा अशी आहे, की या काळात भौतिक परताव्याचे आश्वासन मागणारी सवंग श्रद्धा अनायासे उघडी पडून लयाला जाईल; आणि खऱ्या अर्थाने मानसिक/अध्यात्मिक उन्नतीची आस धरणारी निष्काम श्रद्धा प्रस्थापित होईल ।।

श्रद्धेचा पूर्ण विलय ही अशक्यप्राय कल्पना आहे आणि ती शक्यता समाजाच्या मानसिक, नैतिक आरोग्यासाठी हितकर आहे असेही नाही, पण सवंग श्रद्धेचा आणि श्रद्धेच्या दलालीचा बाजार उठला तरी वाईटातून चांगले झाले असे म्हणता येईल. खरे तर ‘वाईटातूनही चांगले निघेलच’ ही ‘श्रद्धा’ म्हणजेच सकारात्मकता असेही म्हणता येईल. किती सहज आणि फारसा विचार न करता आपण ‘श्रद्धा’ हा शब्द वापरतो नाही का? या कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींचा मुळातून आणि पार मागे जाऊन विचार करावा लागणार आहे, पण बहुदा हे संकट ओसरताच तो मागे पडेल आणि आपण पुन्हा एकदा त्याच रुटीनमध्ये हरवून जाऊ.

मला या बाबतीत गंभीरपणे विचार करावे असे 3 मुद्दे दिसतात.

1. लादलेली समानता : कोरोनाच काय, कोणताच विषाणू जात-धर्म, पंथ-वर्ग वगैरे काही काही भेद जाणत नाही. हे सगळे भेद माणसाने बहुतेक वेळा काही जणांच्या सोयीसाठी आणि काही वेळा जगणे सुरळीत व्हावे म्हणून निर्माण केले. पण अशी एखादी साथ येते आणि यातला कृत्रिमपणा आणि निरर्थकता ध्यानात येते. अखेर सगळ्यांना कायद्यानेच घरी बसवावे लागले, आणि कायदा तर जात, धर्म जाणत नाही. यापलीकडे जाऊन विचार करायला हवा आहे. अशा वेळी मा. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गेल्या रविवारी बहुतांश जण घरी बसलेच होते. जे लोक कोरोनाविरुद्ध प्रत्यक्ष काम करून लढत आहेत त्यांचे कौतुक म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची जी प्रतीकात्मक कृती सांगितली तिचे मात्र काही ठिकाणी उन्मादात रूपांतर झालेच. त्यावरून एक नवेच, खरे तर नवे नाही तर जुनेच समीकरण नव्याने उमजले, ते असे-

द्रष्टा तो, जो आपण निर्माण केलेल्या प्रतीकांचे उन्मादात रूपांतर होऊ शकेल हे जाणतो,

नेता तो, जो उन्मादाचे रूपांतर सकारात्मक उर्जेत करू शकतो; आणि सकारात्मक उर्जा ती, जी कुणा एकाचे नव्हे तर सर्वांचे भले करते.

सांगायचा मुद्दा लादलेली समानता संकटकाळापुरतीच असते. आणि अशा समानतेचा आभास निर्माण करण्यासाठीच सोप्या प्रतीकांची निर्मिती केली जाते. पण आपल्याला हवी आहे ती सार्वकालीन आणि खरी समानता. त्यासाठी दीर्घकालीन लढाई गरजेची आहे आणि त्यासाठी केवळ प्रतीकांच्या पलीकडे जाणारी वैचारिक उन्नती जरुरीची आहे. अशी वैचारिक उन्नती झालेल्या समाजात कायदा आणि सुरक्षेची बाह्य साधने देखील कमीच लागतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तर अशी वैचारिक उन्नती साधण्यासाठीच कला आणि साहित्य कॅटलिस्टचे काम करत असतात. संकटकाळात आणि समृद्धीच्या काळात अशा दोन्ही वेळी कला आणि साहित्याचे सर्जनशील काम काय, हे या सदराच्या पहिल्याच लेखात अधोरेखित केले होते ते याच हेतूने.

2. श्रद्धेचा पुनर्विचार : सुरवातीलाच दोन ओळीत म्हटल्यानुसार या कोरोनाग्रस्त काळात देवालये बंद करून ठेवावी लागली आणि इस्पितळे झालीत आजची मंदिरे. अहोरात्र कष्ट करणारे डॉक्टर्स नर्सेस आणि इतर जीवनावश्यक सेवा-सुविधा पुरवणारे झालेत देव. मी गमतीने म्हणालो होतो, बघा हे सारे सुरळीत पार पडल्यावर हे सगळे देव बाहेर येऊन म्हणतील, तुम्हीच आम्हाला कोंडून ठेवले नसते तर आम्ही सहजीच या कोरोनासुराचा वध केला असता. म्हणजे आज देवळात कोंडलेल्या देवांच्या वतीने त्यांचे भक्तच असे पसरवतील. याच विषयावर जनजागृती करण्यात डॉक्टर दाभोलकरांनी अवघे आयुष्य वेचले, पण आपला समाज फारसा बदलायचे नाव घेत नाही. या काळातही टाळ्या वाजवल्याने कोरोना विषाणूचा नाश होतो असे पसरवण्यात भल्या भल्यांचा हात आहे. एक समाज म्हणून आपल्याला याचा पुनर्विचार करावाच लागेल.

महान प्रकल्पांची निर्मिती करताना तसेच महासंकटांचा सामना करताना बुद्धी, नियोजन आणि कौशल्य यांच्या बरोबरीने मन:शक्ती लागते हे खरे आहे. श्रद्धेच्या समर्थकांचे नेहमीच असे म्हणणे असते, की या ‘मन:शक्ती’ नावाच्या चौथ्या घटकाला बळ पुरवणारी व्यवस्था म्हणजेच श्रद्धा. पण कोरोनाच्या महासंकटात थाळ्या बडवत कोरोनाच्या नावाने शंख करत मिरवणुका काढणाऱ्या समुहात दिसली ती बुद्धी, नियोजन आणि कौशल्य या पहिल्या तीन घटकांची जागा घेऊ पाहणारी एक वेडसर व्यवस्था. तिला श्रद्धा म्हणण्याची चूक होऊ नये इतकेच. माणसांची दैवते व्हायला वेळ न लागणाऱ्या आपल्या या समाजात तर याचा पुनर्विचार अधिकच अगत्याचा ठरतो. म्हणून सुरवातीला दिलेला तो विचार. भौतिक स्वरूपात परताव्याचे आश्वासन आणि श्रद्धा यांची नाळ तोडणे गरजेचे आहे. हा भौतिक स्वरूपातला परतावा सुखांच्या निर्मितीचा असेल किंवा दु:खाच्या हरणाचा असेल.

3. संकटकालीन सकारात्मकता : कोरोना विषाणू-संसर्गामुळे लादलेल्या एकांताने अनेक नवे प्रश्न गोचर होऊ लागले आहेत. माझ्या मते तर अध्यात्माचे खरे काम इथे आहे. स्वत:ला स्वत:बरोबर अतीव आनंदाने जगण्याची व्यवस्था लावण्यात अध्यात्माने योगदान द्यायला हवे. अचानक लादलेल्या या एकांतात वेळेचे नामके काय करायचे या प्रश्नाने अनेकांना अस्वस्थ वाटते आहे. यातून अनेक मानसिक समस्या निर्माण होणार आहेत. मला वाटते –

स्वत: आणि सृष्टी यातली व्यवस्था भौतिक ज्ञानाने आणि कौशल्याने, स्वत: आणि इतर लोक यातली व्यवस्था सामाजिक रचनेने; आणि स्वत: आणि स्वत: यातली व्यवस्था अध्यात्माने - लावायला हवी. या तीनही व्यवस्थांचे भान आपल्याला देणे हे कला आणि साहित्य यांचे काम होय. त्यालाच मी ‘जग आणि जगण्याचे भान’ म्हणतो. आपल्याला सृष्टीबरोबर राहायचे आहे, इतर माणसांबरोबर राहायचे आहे आणि स्वत:बरोबर राहायचे आहे आणि हे तीनही सुखी, आनंदी आणि समाधानी सहवास व्हावे असे वाटत असेल तर सर्जन आणि श्रद्धा यांची सकारात्मक व्यवस्था अनिवार्य ठरते.

Tags: कोव्हीड 19 कोरोना सृजनाचा श्रावण संजय भास्कर जोशी covid 19 corona sanjay bhaskar joshi srujanacha shravan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजय भास्कर जोशी,  पौड रोड, पुणे
swaraart_swapne@yahoo.com

लेखक, अनुवादक, समीक्षक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात