डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधी, संडास व साधेपणा.... आंधळ्या भक्तीप्रमाणे टिंगलसुद्धा अज्ञानातूनच

गांधींच्या संपूर्ण आयुष्यात स्वच्छता, अनुशासन वक्तशीरपणा यांना कमालीचे महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या आदर्श गावाच्या कल्पनेत महत्त्वाचे स्थान आरोग्य, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्था यांना आहे. त्यांनी तसे लिहिले आहे व त्याचे अखंड प्रयोग केले आहेत. भंगीमुक्तीचा त्यांचा प्रयत्न याचाच भाग होता. त्यांच्या गाव-स्वराज्याची रूपरेषा आजच्या गरजांच्या दृष्टीनेही साह्यभूत होऊ शकते.

13 ऑगस्टच्या ‘साधना' अंकात निळू दामले यांच्या लेखामधून गांधींच्या बाबतीत अनेक विधाने केली आहेत. त्यासंबंधी काही खुलासा करणे मी माझे दायित्व मानतो. गांधींविषयी लिहिताना दामले म्हणतात, "गांधीजीनी खेडं केंद्र मानून. चरखा, स्वतःचं अन्न स्वतः पिकवायचं, संडास नको, ड्रेनेज नको, विष्ठेवर माती सरकवली की, काम भागलं... गरजा कमी, साधं जीवन, उद्योग, रेल्वे, विमान, टीव्ही, रस्ते भानगडीच नाहीत, सैन्य नाही, पोलीस नाहीत वगैरे.." गांधींचे किंवा सर्वोदयाचे म्हणणे व प्रत्यक्ष काम काय, याबद्दल नव्या पिढीपर्यंत खोटी माहिती व भूमिका जायला नको, म्हणून हे टिपण.

सर्वप्रथम गांधींच्या लेखी ग्रामस्वराज्य व पंचायतराज हे आपल्या सामान्य माणसाचे आजचे जीवन अधिक सुयोग्य व नियोजित बनविण्यासाठी आवश्यक होते. अशा स्वराज्यात गाव स्वराज्य हा मूळ पाया असेल, मात्र तो पुढे प्रदेश, देश व जगाच्या सतत विस्तारत्या व परस्परावलंबी वर्तुळातील केंद्रबिंदू आहे. यात कोणतीही उतरंड, वर्चस्व नसेल, प्रत्येक वर्तुळ स्वतंत्र असेल. सर्वांत व्यापक वर्तुळ सर्वांत लहान वर्तुळाला गिळून टाकण्याऐवजी सुदृढ बनवेल, अशी त्यांच्या ओशियानिक सर्कलची संकल्पना होती. त्यामध्ये पंचायतराजची कल्पना म्हणजे संकुचित किंवा जुनी, विषमतेवर आधारित असणे शक्य नव्हते, गांधींनी अनेक वेळा स्पष्टपणे हे सांगितले की, "ही पंचायतराजची संकल्पना व व्यवहार पारंपरिक पंचायत राज व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. सत्य व अहिंसा यांवर आधारलेल्या नव्या पंचायतराज्यात समानता व शोषणदडपशाहीपासून मुक्ती ही प्रमुख लक्षणे असतील. त्यात अन्य गावांबरोबर, घटकांबरोबर व जगाबरोबर संबंध व मदत गृहीतच आहे. ही व्यवस्था व्यक्तीचे स्वातंत्र्य व लोकशाहीवर आधारित आहे. तळागाळातील स्वतंत्रता. त्यात सर्वजण शुद्ध, जाणते व समान मानून जात, धर्म, समूह या बाबतींत किंवा शरीरश्रम व बुद्धिमत्ता याबाबत भेद केला जाणार नाही." (हरिजन 18/1/1948)

त्यांच्या विकेंद्रित उद्योगांच्या संकल्पनेत रोजगार व ग्राहकांच्या पसंतीची वेगवेगळी उत्पादने यांना वाव आहे. जातिव्यवस्थेतील उत्पादक जातींची कौशल्ये इतर जातींनीही शिकावीत व ती कौशल्ये गावात टिकवावीत, नव्या मूल्यांनुसार त्यांना हाताळावे लागेल. त्यांच्यात विज्ञान व आधुनिक दृष्टी यावी, असे ते म्हणतात. 'नई तालीम'मधून शिक्षणाच्या रूपाने असे कितीतरी व्यवसाय उन्नत स्वरूपात विकसित करता येतील, त्यात पशुपालन, दुग्धोत्पादन, तेलाच्या घाणीतून खाण्याच्या तेलाची निर्मिती, हातसडीचे धान्य (तांदूळ इत्यादी) गूळ, खांडसरी, इत्यादींचे उत्पादन मधमाशी पालन, कातडे कमावणे, साबण, हातकागद, नवी गाव औषधे, संगीतवाद्ये, खेळ, शेणखते, ग्रामीण प्रसूतीगृह, नई तालीम. अशा अगणित उद्योगांच्या व सेवांच्या शक्यता आहेत. असे त्यांच्या कितीतरी कृती व लिखाणातून दिसते.

यंत्रांबाबत गांधी व सर्वोदयाच्या भूमिका व कृतीबद्दल ज्येष्ठ पत्रकारांमध्येही प्रगाढ अज्ञान आहे व सांगोवांगीच्या गोष्टींना ते खरे धरून चालले आहेत. यंत्रांच्या बाबतीत गांधी म्हणतात,

“यंत्रांना त्यांचे स्थान आहे. ते जाणार नाही, माझ्या घरेलू उद्योगांना यंत्रांची मदत होईल, अशी सर्व सुधारणा मला हवी आहे. मात्र लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या रोजगाराचे दुसरे साधन नसेल, तर त्या यंत्रातून मानवी श्रमाचे उच्चाटन होणे मला मंजूर नाही. मी सर्व यंत्रांच्या विरोधात नाही, तर त्याच्या बेसुमार व अविचारी वाढीच्या विरोधात आहे. यंत्रांच्या चमकधमकीमुळे (ग्लिटर) मी स्तंभित होणार नाही. सर्व प्रकारच्या विनाशकारक यंत्रांच्या विरोधात मी आहे. मात्र लाखो लहान माणसांचा बोजा कमी करणाऱ्या साध्या व कुणालाही चालवता येणाऱ्या यंत्रांचे मी स्वागत करतो. (यंग इंडिया, 17/1/ 1926) श्रमाची बचत करण्याच्या नावावर लाखो लोकांचा रोजगार काढून देणारे तंत्रज्ञान शेवटी काही थोड्यांच्या हातात संपत्ती केंद्रित करते. ही संपत्ती सर्वांच्या हातात असली पाहिजे. विज्ञानाने फक्त अधिक लोभासाठी व लाभासाठी यंत्रे बनवण्याऐवजी कामगारांचे अतिश्रम कमी करण्यावर भर दिला तर त्याचा उपयोग होईल. अनेक सर्वोदयी महाराष्ट्रातील गावांत काम, नव्या लोकांच्या गरजांनुसार वाजवी, सहज चालवता येणाऱ्या व आपल्या पर्यावरणाला अनुकूल अशा समुचित तंत्रज्ञानाचा विकास करीत असल्याचे माझ्यासकट अनेकांनी पाहिले, अनुभवले असेल.

गांधीनंतर विनोबांचे राज्य संस्थासरकार, विज्ञान, याविषयींचे विचार एका नव्या आधुनिक युगात कशा तऱ्हेने विचारआचार असावा, त्याचे व्यावहारिक व सैद्धांतिक दर्शन आहे. विज्ञानाकडे तर ते मोठ्या आशेने पाहत होते. ते म्हणतात,

"हिंसेचे दिवस समाप्त झाले आहेत. विज्ञान येत आहे आणि त्याची प्रगती कोणी थांबवू शकत नाही, थांबविण्याची आवश्यकताही नाही. मात्र विज्ञानाची योग्य प्रगती व्हायची असेल, तर त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे आणि ते मार्गदर्शन आत्मज्ञानच देऊ शकेल. विज्ञान व आत्मज्ञान यांचा मेळ झाला, तर पृथ्वीवर स्वर्ग आणला जाऊ शकतो. अन्यथा विज्ञान हिंसेशी जोडलेले राहिले, तर दोघे मिळून विश्वाचा संहार करतील." (आत्मज्ञान आणि विज्ञान). त्यांनी त्या वेळेपर्यंत लागलेल्या अणुशक्ती व अंतरिक्ष शक्तीचाही गौरव केला.

"अणुशक्तीनेही कित्येक प्रकारचे कारखाने चालू होतील, विकेंद्रित उद्योगही गावागावांतून चालू होऊ शकतील. विज्ञान आणखी वाढेल आणि वाढले पाहिजे. त्यामुळे मानवी जीवनात सौदर्य येईल. ते सृष्टीच्या शक्तीचा उपयोग करु शकेल. त्याच्याबरोबर अहिंसेलाही जोडीने बसविले तरच जगाचे कल्याण आहे. हिंसा कायम ठेवायची असेल, तर विज्ञान वाढता कामा नये. विज्ञान आणि हिंसा यांची जोडी जमली, तर जगाचे वाटोळे होईल," असे ते म्हणतात, त्यात काय चूक आहे? साधे जीवन व विज्ञान यांची संगती विनोबांनी दाखविली, ती श्री. दामले सारख्यांनाही मान्य व्हावी. ते म्हणतात,

“जीवन वैज्ञानिक (सायंटिफिक) बनले तर ते साधे होते. (त्यामुळे मनुष्य आकाशाचे महत्त्व समजू लागेल. आज मनुष्य रात्रंदिवस कपड़े घालून राहतो, शरीराच्या काही भागाला तर सूर्यकिरणांचा स्पर्शही होत नाही. प्राणशक्तीविहीन होते. ही गोष्ट विज्ञान समजावेल तेव्हा मनुष्य वस्त्रांचा उपयोग कमी करू लागेल. उत्तमोत्तम औषधे, गरज पडेल तर मिळतील, परंतु त्याला गिऱ्हाईक लाभणार नाही, कारण सारे आरोग्यवान असतील. विमाने तर असतीलच, पण मनुष्य मात्र पायी जाणे पसंत करील, विज्ञानाच्या जमान्यात लोक तारकांच्या छायेखाली निजतील, विज्ञानाचा उपयोग श्रम कमी करण्याकडे नाही तर भार हलका करण्याकडे व आरोग्य वाढविण्याकडे होईल. आज विज्ञान वाढले, पण वैज्ञानिक वृत्ती निर्माण झाली नाही." यात टिंगल करण्यासारखे काय आहे? 

स्वदेशीबद्दलदेखील गांधींची स्वच्छ भूमिका होती. त्यांनी वारंवार म्हटले आहे की, स्वदेशी म्हणजे आपल्यापासून अधिक दूर असणाऱ्यांऐवजी जवळच्या परिसरातील माणसे, उत्पादने, संस्था व मुद्दयांना प्राधान्य देणे होय. त्यात काही कमतरता असतील, त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे. त्यातून गरिबी, स्वच्छता, कारभार (गव्हर्नन्स) व सामाजिक विषमता यांसंबंधी मुद्दे धसाला लागतील. स्वदेशी म्हणजे सूडबुद्धीने सुरू केलेली बहिष्काराची चळवळ नाही, स्वदेशी म्हणजे तुमच्या लोकांशी असलेले प्रेम व त्यांच्याशी बांधिलकी. तुमच्या गरजा शेजारी कोण पुरवणारा आहे, हे पाहून उत्पादक व उपभोक्त्यांमधील थेट संबंध. माझी देशभक्ती सर्वांना सामावून घेणारी आहे, माझ्या मातृभूमीची सेवा ही कुणाशी स्पर्धा किंवा विरोध नाही. स्वदेशी म्हणजे द्वेषाचा संप्रदाय नव्हे, ते निःस्वार्थी सेवेचे व अहिंसेचे जे सर्वांत शुद्ध रूप, प्रेम त्याचा आविष्कार होय. स्वदेशीचे कट्टरवादात रूपांतर झाले, तर इतर चांगल्या गोष्टींप्रमाणे तिचाही ऱ्हास सुरू होतो. (येरवडा मंदिर 1957). 
 
आता श्री. दामले यांचे संडास, विष्ठा व गांधी यांच्याविषयीचे विधान. गांधींच्या संपूर्ण आयुष्यात स्वच्छता, अनुशासन, वक्तशीरपणा यांना कमालीचे महत्त्वाचे स्थान होते. त्यांच्या आदर्श गावाच्या कल्पनेत महत्त्वाचे स्थान, आरोग्य, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्था यांना आहे. त्यांनी तसे लिहिले आहे व त्याचे अखंड प्रयोग केले आहेत. भंगीमुक्तीचा त्यांचा प्रयत्न याचाच भाग होता. त्यांच्या गावस्वराज्याची रूपरेषा आजच्या गरजांच्या दृष्टीनेही साह्यभूत होऊ शकते.

वैशिष्ट्ये अशी: 1. मनुष्याची सर्वोच्चता व संपूर्ण रोजगार, 2. शरीरश्रम, 3. समानता, 4. धर्मनिरपेक्षता व जातिप्रथा, अस्पृश्यता यांचे निर्मूलन, 5. विकेंद्रीकरण, 6. स्वदेशी, 7. आत्मनिर्भरता, 8. सहकार, 9. सत्याग्रह व असहकार, 10 सर्व धर्मांची समानता, 11. पंचायती राज, 12. नई तालीम, शिक्षणातील नवे प्रयोग, 13. सांडपाणी व आरोग्य (निसर्गोपचार), 14. आहार व स्वच्छता, 15. विश्वस्त वृत्ती, (ग्राम, स्वराज्य, नवजीवन 1962, संपा.)

 गांधींची गावाची कल्पना श्री. दामले यांच्या कल्पनेपेक्षा फार वेगळी होती.

 "The villages must be self-sufficient in food, cotton/clothes, useful money crops, waterworks, village theatre, schools, from primary to final education, public hall, houses with perfect sanitation, sufficient light, ventilation and built from the material available near the village, voluntary village guards. Equal rights to all persons and no castes and untouchability. It should be a perfect democracy based on individual freedom and the individual is an architect of his own government."

अनेक सर्वोदयी संस्था व कार्यकर्ते संडास, विष्ठा व्यवस्थापन यावर संशोधन व कार्य करतात. सुलभ संडासांची तशी प्रारूपे त्यांनी विकसित केली, अनेक ठिकाणी त्याचा वापर सुरू आहे. नाशिकचे निर्मलग्रामचे श्रीकांत नावरेकर मैलाव्यवस्थापनाची प्रणाली विकसित करताहेत. वर्ध्याला ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात अशा वाजवी, सुलभ कमोडची निर्मिती होते. त्यामुळे संडास व विष्ठा यांचा गांधी व गांधीवाद्यांचा संबंध आहे, पण तो स्वच्छता व आरोग्याच्या नव्या तंत्राच्या दृष्टीतून, रोजच्या जगण्यातील इतक्या आवश्यक बाबींवर त्यांच्याशिवाय क्वचितच कुणी काम करीत असेल.

सवाल गांधी व सर्वोदयाचे समर्थन करण्याचा नाही, तर काही वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे आपली भूमिका ठरवायचा आहे. गांधीविषयी महाराष्ट्रात फार पूर्वीपासून संघ परिवारातील मंडळींनी संडास, भंगी यावरून टवाळ विनोद पसरविले आहेत. “मजबुरी का नाम महात्मा गांधी” ही म्हणही सर्रास कुणीही वापरतो. गांधींचे मूल्यमापन करताना भोळसट भक्तिभाव तर नसावाच, पण अडाणीपणातून येणारा, गावगप्पांवर आधारित टिंगलभावही नसावा. शेवटी भक्तिभावाप्रमाणेच टिंगलसुद्धा व्यक्तीबद्दलच्या विरोध भक्तीतून, पछाडलेपणातून येत असते! श्री. दामले लोकप्रिय व ज्येष्ठ लेखक आहेत. त्यांनी तरी पत्रकाराच्या ‘नामूलं लिख्यते किंचित्' (निराधार काहीही लिहू नये) अशा जबाबदारीने लिहिण्याची आम्हांला सवय लावावी.

Tags: संजय संगवई sanjay sangvai #Weekly sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके