डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वंचिताच्या ऊर्जा जागृतीचा ध्यास

13 डिसेंबर रोजी माझे वडील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ताभाऊ सावळे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी पंढरपूर येथे निधन झाले. भारतातील विविध कृतिगट आणि जन आंदोलनांशी ऊर्जा जागृतीचे, शिकण्या- शिकवण्याचे नाते निभावणाऱ्या भाऊंच्या कार्य-विचारांचा परिचय करून देणारा हा लेख. 

रचनात्मक काम आणि पुनरुत्थानाच्या बंडखोर चळवळी यांच्यात दुही आहेही आणि नाहीही. समाज परिवर्तनासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना, कृतिगट जन आंदोलनांशी घनिष्टपणे जोडले गेलेले दिसतात. एनजीओ आणि जनआंदोलने यापेक्षा अलग, कमजोरांचे संघटन करणारे कृतिगट देखील आढळून येतात. अशा भारतातील विविध कृतिगटांबरोबर गेली पन्नासेक वर्षे भाऊ काम करत होते. या प्रयोगशील अनुभवांचे संचित कार्यकर्त्यांना देत होते तसेच कार्यकर्ते आणि वंचित समुदाय यांच्याकडून सतत शिकत होते. कार्यकर्ते आणि कमजोर, वंचित समुदाय यांच्यातील ऊर्जा जागवणे बंडखोर जन आंदोलनांएवढेच महत्वाचे कार्य आहे असे भाऊ मानत. 

वंचित समुदायांच्या कमजोरीतून ऊर्जा, सामर्थ्य कसे जागवायचे या बाबत भाऊंची भूमिका डाव्या विचाराच्या जवळ जाणारी होती. भाऊ म्हणत, ‘‘शोषित माणसे ज्या वास्तवात जगत असतात ते वास्तव त्यांना समजू नये अशी सामाजिक व्यवस्था शोषकांनी केलेली असते. प्रत्येकाला वेगवेगळे, अलग-अलग ठेवण्याची न जाणवणारी खेळीही ते खेळत असतात. शोषणाची ही साधने निकामी करणे, व्यवस्था, शोषक व त्यांचे डावपेच समजावून घेणे, संघटित होऊन त्याचा प्रतिकार करण्याची क्षमता जागवणे यातून ऊर्जा, सामर्थ्य जागवले जाते.’’ वंचित समुदायांनी ही क्षमता मिळवावी यासाठी वातावरण निर्माण करणे हे कार्यकर्त्याचे काम असते. त्यासाठी कसा अभ्यास करायचा, व्यवस्थांना कसे समजावून घ्यायचे आणि समजावून द्यायचे, सुटेपणा सोडवून समग्र प्रश्नांवरील संघटन कसे साधायचे, शोषकांच्या कमजोरी आणि वंचित समुदायांची ताकद कशी ओळखायची या बाबत भाऊ विविध कृतिगटांना, तेथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत. हेच त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र होते. 

भाऊंचा बंडखोरीचा पिंड त्यांच्या दोन मामांनी घडवला. धनंजय मामा स्वातंत्र्य चळवळीत शहीद झाला. दुसरे वामन मामा (वामनराव कुलकर्णी) रॉयवादी कार्यकर्ते होते. समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता, संघटक म्हणून भाऊंचे सामाजिक कार्य सुरू झाले. 1953ला विद्यार्थी असतानाच सांगलीत पक्षाचे व तेथील चर्मकारांच्या संघटनेचे काम सुरू होते. शिक्षकी पेशा स्वीकारत, पक्षीय राजकारणातील मर्यादा ओळखून संघटना बांधणी, जनआंदोलने हा पर्याय स्वीकारला. मार्क्सवादी- फुलेवादी बैठक आणि प्रथम भाई राऊळ व नंतर शंकर गुहा नियोगी यांचे संघटन कौशल्य त्या मागे होते. 1972 च्या सुमारास पंढरपुरात तनपुरे महाराजांचा महायज्ञ होणार होता. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अन्न, तूप वाया जाणार म्हणून तसेच वारकरी परंपरेला यज्ञ विसंगत आहे या भूमिकेतून भाऊंनी यज्ञविरोधी आंदोलन छेडले. समाजवादी साथी डॉ.बाबा आढाव, पन्नालालजी सुराणा, अरुण लिमये व युक्रांदचे कार्यकर्ते, दलित कार्यकर्ते सामील होते. डॉ.बाबा आढाव यांचे ‘एक गाव एक पाणवठा’ समता आंदोलन, आणीबाणी विरोधी आंदोलन यामध्ये भाऊंनी सहभाग घेतला. 

या कालखंडात पाउलो फ्रिअरे या ब्राझिलिअन शिक्षणतज्ज्ञाच्या 'the pedegogi of the oppressed’ या पुस्तकाने प्रभावित केले. वंचितांच्या शिक्षणासाठी भारतीय संदर्भात प्रयोग करावे या ऊर्मीतून 1975मध्ये पंढरपुरातील गौतम विद्यालय सोडले. भूमिसेना आणि आबा करमरकर यांच्या बरोबरीने पालघर, दामखिंड, मनोर, नानिवली या भागात वारली आदिवासींचे संघटन, विकास व शिक्षण या संदर्भात ऊर्जा जागृतीचे प्रयोग सुरू झाले. भाऊ म्हणत, या प्रयोगातून उमगले की अशी ऊर्जा, जाणीव जागृती शाश्वत, रचनात्मक कार्य उभे करू शकते. या प्रयोगांवर भाऊंनी ‘जाणिवेने आम्हा ऐसे चेतविले’ या साधना प्रकाशित पुस्तकात सविस्तर लिहिले आहे. तेथील लोकशाळांध्ये, भूमिसेनेच्या शिबिरांत, अभ्यासमंडळे, बैठकांध्ये कार्यकर्ते व आदिवासी यांच्याबरोबर आपलेपणाचे नाते, विश्वास, संवाद निर्माण केला. सिद्धांतातून वास्तविक दुखा:कडे न जाता जे भोगले जाते त्यातून सिद्धांताकडे जाण्याचे सूत्र विकसित केले. 

येथे भाऊंनी साक्षरता, औपचारिक शिक्षण यांचा विचार केला नाही. अक्षरातून जीवनअनुभवांना शब्दबद्ध करणे, त्यातून आजूबाजूचे वास्तव, शोषण व्यवस्था समजावून घेणे, त्यावर मार्ग शोधणे यावर भर दिला. ऊर्जा जाणिवांचे हे सूत्र अनेक ठिकाणी उपयुक्त ठरले. (National institute of Bank Management), मुंबईधून ग्रामीण बँकिंगच्या संदर्भात काम केले. त्यातील काही लोकांबरोबर दिल्ली येथे (People’s Institute of Development and Training) हा गट तयार केला. अभ्यास, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, यावर विशेष भर होता. पुढे फ्री लान्सर कार्यकर्ता, प्रशिक्षक, सल्लागार, संशोधक असे काम सुरू झाले. शोषितांचा विकास, पर्यायी विकास, या संदर्भात भारतातील विविध दलित, आदिवासी आंदोलने, कृतिगट यांच्याशी नाते जमले. किस्लम (दिल्ली), श्रुती (दिल्ली), चेतना आंदोलन (उत्तरांचल), जुडाव (मधुपूर, झारखंड), मेंढा लेखा (गडचिरोली), ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ (कुरखेडा), श्रमिक सहयोग (चिपळूण), केरळ शास्त्र परिषद, भुवनेश्वर, भोपाल, उधमपुर, पाबुरिया (ओरिसा), साथीन (राजस्थान), सखी (बांदा) अशा अनेक स्वयंसेवी संस्था, कृतिगटांबरोबर भाऊंची ऊर्जात्मक देवाण-घेवाण अनेक वर्षे राहिली. कार्यकर्त्यांचे शिक्षक, मार्गदर्शक ही भूमिका अत्यंत आवडीने त्यांनी पार पाडली. पंढरपूर परिसरात त्यांनी ‘दलित पँथर’च्या एका गटाबरोबर महार वतनाच्या जमिनींवर सामूहिक शेतीचे प्रयोग केले. भटक्या विमुक्तांवर बाळकृष्ण रेणके यांच्यासह काम केले. 

जनआंदोलने व सामाजिक कार्य या क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेर घडणाऱ्या नव्या गोष्टी, वेगळेपण अभ्यासणे, नवे शिकणे, नंतर ते वाटून घेणे हा त्यांच्या ध्यासाचा भाग होता. याच हेतूने उत्तरांचल, मणिपूर, फिलिपाईन्स, बांगलादेश, बँकॉक असे दौरे झाले. जर्मनीतील ‘ग्रीन्स पार्टीचा’ अभ्यास, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क येथील फोक स्कूल्सचा अभ्यास, महिला चळवळी अभ्यासण्यासाठी निखत खान, कमला भसीनबरोबर केलेला पाकिस्तानचा दौरा हे सर्वच लक्षणीय होते. त्यावर त्यांनी थोडेफार लिखाण केले, पण अगदी कमी, लेख स्वरूपात. भाऊंचे दासगुप्ता नावाचे मित्र त्यांना म्हणायचे, ‘सावळे तुम्ही खूप सकस चारा खाता पण दूधच देत नाही. तुमचे समृद्ध अनुभव, त्यांचे विश्लेषण शब्दबद्ध करत नाही. लिहायचा कंटाळा करता.’ हे खरे होते. 40 एक लेख, तीन पुस्तके हे लिखाण खूपच अपुरे झाले. Training of Tribals हे कमला भसीनबरोबरचे पुस्तक तर चंपारण्याचा लढा: गांधीजींचे तंत्र आणि मंत्र ही पुस्तिका, दोन्ही शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेले. फुले, आंबेडकर, गांधी, मार्क्स, पाऊलो फ्रिअरे, शिक्षण अशा अनेक विषयांवर भाऊ अगदी वेगळेपणाने बोलायचे. शेकडो नोट्‌स शिस्तीने काढलेल्या आहेत. निरीक्षणातून नेमक्या प्रश्नाची जाण त्यांना होत असे. त्यावरील त्यांचे मार्गही प्रयोगशील असत. 

शिक्षण, ऊर्जा जागृतीच्या प्रयोगात रमून गेलेले भाऊ प्रसिद्धी, संस्थाकरणापासून दूर राहिले. ओरिसा, राजस्थान, दामखिंड, बावरिया येथील आदिवासी, वंचित समूहांबरोबर काम करतानाच ऊर्जा जागृतीचे, समूह शक्तीचे सूत्र मिळाले असे ते सांगत. कमजोरीतून जनशक्ती तयार करणे व ती पुढील कृतिकार्यक्रमासाठी वापरणे हे तंत्र कळाले. या पद्धती, जाणिवा यांना विकसित करता आले. प्रसारित करता आले. 

घरात भाऊ फार नसायचे. 1980 मध्ये आई गेली. तिच्यासाठी वेळ देऊ शकलो नाही ही खंत होती. खचले पण जाणवू दिले नाही. पण मुले, नातवंडे यांत रमायचेही. आमच्या घरात हवे ते शिकण्याचे, चुकण्याचे स्वातंत्र्य आम्हांला त्यांच्यामुळे मिळाले. संगीत, नाटक, साहित्य यांध्ये रस होता. विविध विषयांवरील हजारो पुस्तकांचा संग्रह गोळा केला आहे. हा माहोल आम्हांला मिळाला. गेली सहा वर्षे ते पार्किंन्सन्स या दुर्धर रोगाने ग्रस्त होते. कार्य, कार्यकर्ते व भटकंती हे आवडीचे कार्यक्षेत्र या रोगाने गमवावे लागले हे त्यांना खूपच सलत होते. कार्यकर्त्यांचा हा ‘यायावर सहयात्री’ घरातच अडकला. वाढता आजार, विस्मृती, शारीरिक दुबळेपण यांच्याशी झगडत भाऊंचे निधन झाले. शेवटचे काही दिवस कार्यकर्ते जवळ आहेत असे समजून ते बोलत असत. कार्यकर्त्यांना फोनवरून कळवत होतो. भाऊ गेले. एक कार्यकर्ता बरोबर म्हणाला, ‘जातील कसे? ते आमच्याबरोबर आहेत. आमच्या कार्यात आहेत, असतील.’ 

Tags: बाळकृष्ण रेणके एक गाव एक पाणवठा कमला भसीन बाबा आढाव दत्ता सावळे डॉ.संजय सावळे Balkrushn Renake Ek Gaon Ek Panvatha Kamla Bhasin Baba Adhav Datta Savle Dr. Sanjay Savle weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके