डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधींनी तिच्यासाठी काय काय केलं? तिच्या अस्थिर मनाला सावरायला त्यांनी उपोषण केलं. जेव्हा सगळे जण सांगत होते की, असं करू नका, तरी ‘तिच्यावर चांगला परिणाम होईल म्हणून मी माझ्या उपवासाने तिचे हृदय-परिवर्तन करीन. अर्थात तेच एक कारण नाहीय माझ्या उपवासाचे. तरुणांना हे कळलं पाहिजे की, हरिजनांसाठी काम करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. नीला सुधारली तर तरुणांना मोठा धडा मिळेल की, सार्वजनिक क्षेत्रात काम करताना स्वत:चे चारित्र्य स्वच्छ असायला हवं. नीला हे करून दाखवेल. तिला अधिक आत्मसामर्थ्य मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे.’ तिच्या पत्रातून हे लख्ख कळत होते की, तिचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता. ठरवे एक नि हातून घडे वेगळेच. गांधीजींच्या हे लक्षात आले होते, तरी ते तिला समजावण्याचा प्रयत्न करीत राहिले. तिच्या वागण्याचा दोष तिला न देता तिला सुधारायची संधी दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

कसल्या, कुठल्या-कुठल्या स्त्रिया गांधीजींच्या कामाकडे आकर्षित होऊन हिंदुस्थानात येत असत. त्यांची कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आपल्याहून संपूर्णत: भिन्न असूनही त्या इथे का येत? गांधींच्या कामाशी, व्यक्तिमत्त्वाशी नाते जोडत, हाल-अपेष्टा सोसत इथे का राहत असत- हे एक रहस्यच आहे. अमेरिकेत एका स्वछंद वातावरणात, कलावंत-साहित्यिक- नाट्य-व्यवसायी घरात वाढलेली, ग्रीकनाट्यात रमलेली निल्ला क्रॅम कुक इथे येते काय, विविध धार्मिक संस्थांत घुसून गूढ गुरूंच्या नादाला लागते काय! पोटच्या पोराकडे लक्ष द्यायला तिला वेळ नसे, पण प्रेमप्रकरणात रमत असे. स्वत:चीच परीक्षा घेत इथल्या गूढवादी मठांच्या संपर्कात राहून भलती धाडसं करीत असे. थोडक्यात, ही त्या शतकातली हिप्पी होती. मनात येईल ते करायचे, राहायचे, खायचे, भटकायचे- कशालाच ताळतंत्र नाही. गुलछबू, खुशालचेंडू व्यक्तिमत्त्व.

असे असून एक होतं की, ती प्रचंड ऊर्जावान होती. नाटक, साहित्य, (अनेक नाटकं तिने बसवली, त्यात कामं केली, जगभरातील वृत्तपत्रांत तिचे कौतुक छापून आले- एक प्रकारे ती सेलिब्रेटी होती) पत्रकारिता, ग्रीकनाट्य यात तिला रस नि गती होती. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात तिने दुसऱ्या महायुध्दाच्या काळात धैर्याने बातमीदारी केली. स्वत:चे निर्णय स्वत:च्या हिमतीवर घेत होती. कुणावर अवलंबून राहणं तिला पसंत नसे. अशी ही निल्ला इथे आली, तेव्हा विशीत असलेली तरुणी होती. गांधींच्या कडक शिस्तीच्या आश्रमव्यवस्थेत ती कशी काय बसणार होती? नि तिथे किती टिकणार होती?

अशा या एक प्रकारच्या अतरंगी तरुणीलाही गांधींचा स्नेह लाभतो, ते आपल्या प्रचंड कामाच्या व्यापात तिला मानसिक-आध्यात्मिक आधार देतात, तिची काळजी करतात, तिच्या स्वैर वागण्याने चिंतित होतात, तिला मार्गावर आणण्यासाठी धडपडतात... का? विदेशी आहे म्हणून? छे! एकदा कुणालाही आपलं म्हटलं की, बापूंच्या मनात आप-पर भाव राहत नसे. ती मुलगी आपली जबाबदारी आहे, या कल्पनेने ते तिच्याशी वागत. ह्या हिप्पी मुलीने त्यांना अनेकदा संकटात टाकलं. कुठे तरी अचानक निघून जाणं, कुणाबरोबरही राहणं ह्याला काही धरबंधच नव्हता. आपलं स्रैण वागणं ती लगेच कबूल करी, त्यात लपवाछपवी नसे. सुधारण्याचा निश्चय करी, पण तो फार टिकत नसे. इथले अनेक गूढ संप्रदाय तिला प्रचंड आकर्षित करीत. इथली देवळं, गुरू यांच्या प्रभावाखाली ती वाहावत जात असताना बापूंना दिसत होती; तर ते स्वस्थ कसे बसू शकणार होते?

तर अशी ही निल्ला-नागिनी कुक. तिने 1932-33 मध्ये  गांधीजींना पत्र लिहिलं. तेव्हा ती बंगलोरमध्ये राहत होती. तिथे तिच्या प्रेमळ (?) स्वभावानुसार ती म्हैसूरच्या महाराजाच्या प्रेमात आकंठ बुडाली. तोही तिच्या सौंदर्यावर भाळला होता. तेव्हाच रामस्वामी नावाच्या तिच्याहून तरुण असलेल्या तरुणाशी तिची मैत्री जुळली. तिथे अस्पृस्यांना मंदिरप्रवेश द्यावा, यासाठी चळवळ सुरू झाली होती. ती त्यात सामील झाली. तिच्या देखण्या रूपावर नि ह्या कामावर अनेक जण लुब्ध झाले होते. रस्ते झाड, संडास साफ कर, चळवळ कर- ह्यात तिला वेगळं काही करायची झिंग अनुभवायला येत होती.

ह्या कामाबद्दल तिने गांधीजींना लिहिले. त्यानंतर तिने आश्रमात यायची इच्छा व्यक्त केली. त्याअगोदर स्वत:ला शुद्ध करायचं ठरवलं. म्हणजे काय तर- ‘खरं बोलायचं.’ आता तिच्या स्वच्छंदी, वैषयिक जीवनाबद्दल लिहिणं हे गांधीजींच्या अशरीरी प्रेमाहून सर्वथा भिन्न होतं. पण तिने ‘आपण केवळ महाराजांच्या पैशांवर डोळा ठेवून प्रेम करत होतो,’ राजघराण्यात प्रवेश मिळावा म्हणून सारं करत होतो. हे कबूल केलं! म्हणजे, ती हे सारं सोडून देणार होती? तिच्या मनात तिथलं तत्त्वज्ञान, ग्रीक साहित्यातील नायक-नायिका, हिंदू मिथकं यांचा प्रचंड गोंधळ होता. स्वत:ला ती गोपी समजत होती. कृष्णाच्या शोधात होती.

गांधींना अशा पतितांबद्दल खास आस्था होती. त्यांना आपण योग्य मार्गावर आणू शकू, असं वाटत होतं. तिच्या पत्रात तिने गांधींना आपला मुलगा म्हटले. ह्या संबोधनाने ते चक्रावले. तिच्याबद्दल महादेवभाई देसाई, वल्लभभाई पटेल यांच्याकडून सावधानतेचा इशारा आला होता. बापूंच्या नावाचा ती गैरवापर करतेय, असा त्यांचा दावा होता. सर्वांनीच तिचा स्वैराचार, पैशाचा गैरव्यवहार, आपल्या मुलाविषयीचा निष्काळजीपणा या सर्वांविषयी लिहिले होते. म्हैसूरच्या दिवाणानेही ही मुलगी फार विश्वास ठेवण्यायोग्य नसल्याचे आणि जरी ती ‘खरं बोलते’, असे सांगत असली तरी फार चंचल आहे नि बेभरवशाची असल्याचे नमूद केले. त्यामुळे गांधीजीदेखील आपण तिला कितपत मार्गावर आणू शकू, याबद्दल साशंक झाले.

एक विदेशी तरुणी अस्पृश्यतेच्या कामात स्वत:ला झोकून देऊ इच्छितेय, ही एकच बाब त्यांना महत्त्वाची वाटत होती. आपला हिस्टेरिया, बेबंधपणा, बेदरकारपणा त्यागून जर ती वठणीवर आली, तर इतर तरुणांसाठी एक उदाहरण होईलसे वाटत होते. म्हणतेय तशी सर्वस्वाने हरिजन वस्तीत जाऊन राहिली, अगदी कमीत कमी पैशांत राहू लागली. ‘जरूर तर भीक मागून राहीन, पण हरिजनांसाठी काम करीन’ असं म्हणत ती काम तर करत होतीच; प्रश्न होता तिच्या चारित्र्याचा! त्याची कुणीच हमी देत नव्हते, अगदी ती स्वत:ही. गांधीजींनी तिला लिहिलं की, ते तिला आपली मुलगी मानायला तयार आहेत, जर ती बदलायला तयार असेल तर. पण दरम्यान ती ‘आध्यात्मिक पती’ची भाषा करू लागली. गांधीजींच्या शब्दकोशात ह्या शब्दाला काही अर्थ नव्हता. स्वत:च्या स्खलनशीलतेवर तिचा ताबा नव्हता. सतत कुणाच्या तरी प्रेमात ती गुरफटत असे. दुसरीकडे तिला हे जाणवत असे की, जे करतेय ते बरोबर नाही. आपल्याला एका उच्च दर्जाच्या, संतपदाला गेलेल्या व्यक्तीकडून मार्गदशन हवंय; एक सत्त्वशील आयुष्य जगायचं आहे.

म्हणूनच तर तिने आपल्या आईकडे  वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदुस्थानात जाण्याचा हट्ट केला होता. हिंदू धर्मातले विचार वाचून इथले मंत्र-तंत्र, पुनर्जन्म, आध्यात्मिक अनुभव यांबद्दल तिला प्रचंड आकर्षण निर्माण झाले होते. एका बाजूला ती तीव्र अशा भावनिक तुफानात राहायची, दुसरीकडे तिची खुशालचेंडू वृत्ती उसळ्या मारायची. एक प्रकारे तिचा कल जबाबदारीरहित जीवनाकडे होता. भाषा, नाट्य, खासकरून ग्रीक नाट्यात तिला गम्य होते. तिचे युरोपियन नि पौर्वात्य भाषांवर प्रेम होते. त्या भाषा तिला येत होत्या, काहींमध्ये ती वाकबगार होती. ग्रीसला जाऊन शिष्यवृत्ती मिळवून त्यात करिअर करायचा विचार होता. खरं तर तेच तिचे क्षेत्र होतं.

दरम्यान, तिनं वयाच्या 16 व्या वर्षी एका ग्रीक नाटककाराशी लग्न केलं, एक मुलगा झाला. पण अशा अस्थिर मनाच्या मुलीला हे लग्न फार काळ निभावता आले नाही. या साऱ्या वैचारिक गोंधळाचं कारण तिचे ‘जीन्स’ होते. वडिलांनाही कलांत रस नि निपुणता होती. धरसोड वृत्तीही त्यांच्याकडूनच तिच्यात आली. अमेरिकेत त्यांनी नाट्यक्षेत्रात खूप नाव कमावले. नाटक कंपन्या काढल्या, वृत्तपत्रातून लेखन केलं. सौंदर्यासक्ती होतीच, त्यामुळे ते अनेक ठिकाणी हिंडले. ती स्वछंदी, थोडी बेदरकारवृत्ती निल्लात आली होती. या देशाची माती चुंबून तिने इथे आल्यावरच ‘आपण आयुष्य सर्वार्थाने जगू’ अशी समजूत करून घेतली. 

तिने हिंदुस्थानात आल्यावर आपलं नाव ‘नीला’ केलं. नीला नागिनीदेवी हा तिचा (निळ्या नागदेवतेचा) हिंदुस्थानी अवतार. एका संभ्रमित नि भारलेल्या अवस्थेतच ही देखणी विदेशी तरुणी अनेक तरुणांना स्वत:भोवती गुंगवत होती. एकीकडे इथल्या पवित्र ग्रंथांचा अभ्यास तिने केला. साधी राहू लागली, शाकाहारी झाली, सूत कातू लागली. पुनर्जन्मातही असेच काही घडले असावे, असे तिला वाटत होते. ह्याच विचारसरणीतून आपला जन्म सार्थकी लागेल, याची तिला खात्री होती. इथे आल्यावर वृंदावनात जाऊन ती हाती जपमाळ घेऊन कृष्णाच्या शोधात फिरत राहिली. अनेक नियम स्वत:साठी करत राहिली. आपल्याला अनेक गूढ साक्षात्कार होतात, संदेश मिळतात, असे तिला वाटत होते. स्वामीजींना भेटत, मंदिरात जात राहिली. ह्या साऱ्यांत तिला पटलेले किती नि एक चूस म्हणून करायच्या बाबी किती, हे सांगणं कठीण होतं. हा काळ 1935-39 चा आहे.

हे सगळं वाचल्यावर वाचकाला वाटेल की, अशा स्त्रीबद्दल कशाला लिहिताय? गांधीजींनी तरी तिला का थारा दिला? त्यांनी तिला सुधारायची संधी दिली, तिच्यासाठी चिंतित राहिले. तिचे वागणे चंचल आहे, वाहावत जाते; पण मनाने ती निर्मळ आहे, अशी त्यांची भावना होती. ह्या तरुणीला तिच्या वागण्याच्या तऱ्हा माहिती असूनही आश्रमात प्रेमा कंटकच्या छत्राखाली ठेवायचा प्रयत्न का केला? तिला गांधीजींबरोबर काम करायचे होते. त्यांचे विचार तिला लोभावत होते. त्यांची पत्रे वाचली की लक्षात येते की, जीव ओतून ती अस्पृश्य वस्तीत काम करत होती. ह्या लोकांनी जीवनात वर यावं, त्यांना समाजाने सामावून घ्यावं, याकरता धडपडत होती. इतरांना ह्या कामात गुंतवून घेत होती. पण तिचे चित्त स्थिर नव्हते.

गांधींनी सांगितलेले मौन, साधे खाणे, सर्वांसह साबरमती वा वर्ध्यात राहणे हे काही काळ तर तिने केले. प्रेमा कंटक तिच्यावर नजर ठेवून होत्या. तिला हे सारे झेपत नाहीय, गुदमर होतेय असे वाटले, तर तिला तिथून मोकळं करावं, असंही गांधीजींनी सांगून ठेवलं होतं. तिला बालपणी न मिळालेले प्रेम, आपुलकी, आस्था सर्वार्थाने तिला तिथे मिळत होती.    

पण तिथेही तिचे मन गांधींकडे येणाऱ्या डॉक्टरांकडे आकर्षित होत होतं. आश्रमात ती आपणहून खाण्याचे प्रयोग करीत होती. जसे- फक्त द्राक्षं खाऊन राहायचे, इत्यादी. त्यात तिची प्रकृती ढासळली. मलेरियाने ग्रासले. औषधं घेतली नाहीत. गांधीजी तुरुंगात होते. सुटून आल्यावर आपली कामं आटोपून तिची चौकशी नि शुश्रूषा करायला येत असत. अचानक काहीही कारण नसताना गांधींनी चित्तशुध्दिसाठी उपोषण करायचा निर्णय घेतला. सर्वांनाच काळजी वाटू लागली. ह्यामागे नीला आणि आणखी काहींचे वागणे असावे, अशी शंका होती. ती गांधींनी नाकारली नाही, पण तेवढे एकच कारण नाही, असेही ते म्हणाले.

आश्रमात राहताना नीला तक्रार करे की- प्रार्थनेला जाताना दारं बंद करणं, फाटकाला कुलूप घालणं हे चुकीचं आहे. कुणाकडे काही अधिकच्या वस्तू नाहीत, तर मग चोरी कशाची होणार? कुणी पांघरूण वा उबदार कपडे चोरले तर त्याला त्याची गरज अधिक आहे, असे समजायला हवे. नाही तर गीता वाचून उपयोग काय? खरं तर तिथली शिस्त तिला आवडत नव्हती.   

तिच्या मनात सतत चलबिचल होत असे. स्वत:चे मन शांत होत नाही, असे ती कबूलही करीत असे; पण त्यावरचा उपाय तिला जमत नसे वा उन्मादी अवस्थेत ती काहीही करीत असे. ती म्हणजे आश्रमवासीयांवर बोजा तर टाकत नाहीये ना, असे विचार गांधीजींच्या मनात येऊ लागले. तिच्या कामासाठी बंगलोरला गेली, तरी तिचे कुणाशी पटनासे झाले होते. तिथे जाऊन ती तब्येत खराब करूनच येत असे. तिला कामात रस होता, पण ते नेटाने करण्याची तिची वृत्ती नव्हती. गांधीजींनी तिला अनेक पत्रं लिहून समजावले होते. ते जणू तिचे मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर झाले होते. तिने वेडेवाकडे वागू नये, कामावर लक्ष केंद्रित करावे,  असा सल्ला ते तिला देत असत. तिने आपले डोक्यावरील केस काढून टाकले होते, त्यामुळे ती एखाद्या साधूसारखी दिसे. कपडेही जाडेभरडे घाली. इथे तर घरातही कपडे घालावे लागतात, अशी तिची तक्रार असे!!

तिने आपली सैरभैर अवस्था, उतावीळपणा, भावनिक संतुलन गमावण्याची शक्यताही बोलून दाखवली होती. बंगलोरमधील तिच्या स्वैर वागण्यातून तिला दिवस गेले असल्याची शक्यता तिने गांधींना बोलून दाखवली होती. हिला सरळ-साध्या मुलीसारखे वागायला लावणे किती अशक्य आहे, याची जाणीव त्यांना होत होती. कधी तरी ती भूतकाळ विसरून, स्वच्छ मनाने चारित्र्यसंपन्न जीवन जगेल, याची आशा मावळली होती. तरीही गांधींनी प्रयत्न सोडले नाहीत.

तिच्या मुलाचीही काळजी घेतली, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था लावली. पण एक दिवस वर्ध्याच्या आश्रमातून अचानक ती नाहीशी झाली. सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही. ती आणि तिचा मुलगा सिरिओस दोघेही वृंदावनात होते. तिथे तिच्या पायात विषारी काटा गेल्याने तिला मिशनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. पण मग ब्रिटिश सरकारने त्या दोघांना (एक गोरी तरुणी सर्व गोऱ्या स्त्रियांबद्दल वाईट मत पसरवू शकते म्हणून) अमेरिकेत न्यूयॉर्कला पाठवले. गांधींच्या मते, तिला मनोरुग्णालयात ठेवायला हवे होते.

तिने बोटीवर एका आजारी तरुणाला बरं वाटावं म्हणून ‘मी तुझ्याशी लग्न करीन’ असे म्हटले आणि त्याच्याशी लग्न केले (सत्यवचन प्रेम!). हे असे भावनेच्या भरात घेतलेले निर्णय टिकणार कसे? काही काळातच तिने घटस्फोट घेतला. ती 1939 मध्ये युरोपात गेली. तिथे लिबर्टी या साहित्यिक मासिकासाठी वार्ताहार म्हणून काम केले. ग्रीसमध्ये जेव्हा दुसरे महायुध्द भडकले, तेव्हा अल्बानियाच्या आघाडीवरून तिने अमेरिकन नि ग्रीक वृत्तपत्रांसाठी वार्तांकन केले. ग्रीसहून ती तुर्कस्तानला गेली. सांस्कृतिक सहायक म्हणून काम केलं. याच काळात तिने डायरेक्टर जनरल- कला, म्हणून इराणी मंत्रालयाच्या सांस्कृतिक विभागात काम केले. नाट्य नि संगीताच्या पुनरुज्जीवनाचे काम केले. अखेर ती अमेरिकेला परत गेली.

तिथे तिने अनेक ग्रीक नाटकांतून कामं केली. नंतर तिचा मुलगा सिरिओस आणि त्याची पत्नी व तीन नातवंडांसह ती व्हिएन्नात राहत होती.  तिने कुराणाचा इंग्रजीत अनुवाद केला. ‘माय रोड टू इंडिया’ हे पुस्तक लिहिलं. अमेरिकेतूनही तिने गांधींना ‘मी परत येऊ का? कारण सत्य मला फक्त तुमच्या सहवासातच सापडले होते’ असे पत्र पाठवले होते. त्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘कधीही ये.’

गांधींनी तिच्यासाठी काय काय केलं? तिच्या अस्थिर मनाला सावरायला त्यांनी उपोषण केलं; जेव्हा सगळे सांगत होते की, असं करू नका. तरी ‘तिच्यावर चांगला परिणाम होईल म्हणून मी माझ्या उपवासाने तिचे हृदयपरिवर्तन करीन. अर्थात तेच एक कारण नाहीय माझ्या उपवासाचे. तरुणांना हे कळलं पाहिजे की, हरिजनांसाठी काम करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. नीला सुधारली तर तरुणांना मोठा धडा मिळेल की, सार्वजनिक क्षेत्रात काम करताना स्वत:चे चारित्र्य स्वच्छ असायला हवं. नीला हे करून दाखवेल. तिला अधिक आत्मसामर्थ्य मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे.’ तिच्या पत्रातून हे लख्ख कळत होते की, तिचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला होता. ठरवे एक नि हातून घडे वेगळेच. गांधीजींच्या हे लक्षात आले होते, तरी ते तिला समजावण्याचा प्रयत्न करीत राहिले. तिच्या वागण्याचा दोष न देता तिला सुधारायची संधी दिली पाहिजे, असे त्यांचे मत होते.

अशी ही म्हटलं तर विचित्र, म्हटलं तर मानसिकरीत्या असंतुलित तरुणी इथे जणू एक वैद्यकीय उपचार म्हणून गांधींच्या वर्तुळात येते... वेगळ्याच जगातली ही कलावंत, हळुवार मनाची तरुणी गांधींच्या विचाराने भारावते... काम करते; पण जो संयम तिच्या रक्तातच नव्हता, तो पाळताना पाय घसरत जातो. मात्र, अखेर तिला तिच्या कलेतच सत्य सापडले असावे.

Tags: धार्मिक निल्ला क्रॅम कुक ग्रीकनाट्टा कलावंत-साहित्यिक स्वछंद अमेरिका काम गांधी सांस्कृतिक सामाजिक कौटुंबिक dharmik nilla cram coock grinkatta sahityik kalawant swachhand amerika Gandhi sanskrutik kaotunbik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात