डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पण तेथील परिस्थिती पाहता, फ्रेडरिकला आपल्याऐवजी आपल्या खर्चाने दुसरा प्राध्यापक महाविद्यालयात ठेवूनच निघावे लागणार होते. शिवाय ऑफ सीझन तिकिटाचे दरही खूप कमी होते. त्यानुसार त्यांनी बुकिंग केले. इकडे बिर्ला आणि बजाज या गांधींच्या मित्रांनी फ्रेडरिक्सना पैसे पाठवले. त्याच सुमारास राजेंद्र प्रसाद युरोपच्या दौऱ्यावर होते. तिथे युद्धोत्तर शांतता विषयावर ते भाषणं करणार होते. तिथे हे जोडपं त्यांना भेटले, आपल्या घरी पाहुणचाराला घेऊन गेले. पण त्या भाषणाच्या वेळी काही राष्ट्रवादी लोकांनी गोंधळ घातला. प्रसादांना नि स्टंडंथ जोडप्याला मारहाण झाली. जखमा झाल्या. डॉ.फ्रेडरिकने सर्वांची मलमपट्टी केली. त्या दांपत्याने हिंदुस्थानात 1928 मध्ये जायचे नक्की केले.

गांधीजींच्या सात्त्विक आकर्षणाला काळ, देश, वंश, लिंग, वय याची सीमा नव्हती. जो माणूस ‘साधं राहा, शाकाहारी व्हा, कष्टाखेरीज अन्न-धन अर्थहीन आहे’ असं सांगत होता; त्या व्यक्तीबद्दल जगातील सर्व स्तरांतील लोकांना का आकर्षण वाटत होते, याचा अभ्यास तज्ज्ञ करीत राहोत. तेव्हाचं जग वेगळं होतं म्हणून पळवाट निघेलही; पण तेव्हाचं जग काय कमी भौतिकाच्या मागे होतं? कमी व्यसनी, दुष्ट, क्रूर होतं? त्याच काळात दोन महायुद्धं झाली, देशांच्या फाळण्या झाल्या, लाखोंनी जीव गमावले. औद्योगिक क्रांतीने माणसांचा, संपत्तीचा हव्यास वाढला. हे सारे सभोवती वेगाने सुरू असताना एक अल्पवस्त्रांकित माणूस आपल्या संकल्पना जगासमोर मांडतो, तसेच जीवन जगतो, त्यासाठी जीव घ्यायला नव्हे तर द्यायला तत्पर असतो- त्याच्याबद्दल ओढ नि त्यासारखं जीवन जगायची असोशी कशी काय वाटू शकते, हे गूढच आहे. व्यसनाची, चैनी जीवनशैलीची, सुंदर वस्त्रप्रावरणांची, दागदागिन्यांची, सुखासीनतेची स्वप्नं सर्वांना पडतात. त्यामागे सारे धावतात. पण दरिद्रनारायणाची सेवा करायला, झिजायला लोक कसे तयार होतात? आज खरं वाटत नाही, उद्या लोकांना हे एक मिथक आहे असे वाटलं तर नवल नाही. 

या सदरात मी त्यांच्या स्त्री अनुयायांबद्दल लिहिलं. असं म्हटलं जातं की- स्त्रीला (मग ती भारतीय असो वा पाश्चात्त्य) घर सोडणं, समाजाकरता सर्वस्व ओतून काम करणं अशक्य असतं. घराच्या चार भिंती त्यांचा तुरुंग बनतात. प्रेमळ कुटुंबीय रूढी-परंपरांचे रखवालदार बनतात. आपल्याकडे तर त्या शतकात बायका निरक्षरच होत्या. घराचा उंबरठा ओलांडणं पाप होतं. घुंघट, पडदा या गोष्टी आणि शालीनता, मर्यादा, मोठ्यांचा मान-सन्मान याच्या दडपणाखाली ती घरातच असे. अचानक एक माणूस येतो काय नि त्यांना देशाला स्वतंत्र करायच्या स्वप्नपूर्तीसाठी हाक देतो काय नि हजारो-लाखो स्त्रिया (घरच्यांनीही उत्तेजन दिल्याने) थेट राजकीय व्यासपीठावर कशा काय दिसू लागल्या? मधल्या साऱ्या पायऱ्या- जसं शिक्षण, रूढींचे उल्लंघन, धीटपणा, पुरुषांसमवेत बरोबरीने वावरणं या गोष्टी- जादू झाल्यागत कशा नाहीशा झाल्या?

या माणसाने फक्त राजकीय स्वातंत्र्य हा एक विषय घेतला असता तरी जन्म पुरला असता, पण हा म्हणजे शंभर गोष्टी करू पाहत होता. अहिंसा, सत्य, अस्पृश्यतानिवारण, शाकाहार, सर्वधर्म समभाव, स्त्री-समानता, साक्षरता, स्वदेशी आणि इतर अनेक बाबतींत तो आग्रही होता. त्यासाठी सत्याग्रह करत होता. मूठभर मीठ काय उचललं... सारा देश भारला गेला! श्रीमंत-गरीब, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती सारे त्याच्याभोवती जमू लागले. त्याच्या वचनातील जे झेपेल ते जीवनभर करत राहिले. सारं वर्ष हे गूढ उकलण्यात गेलं. देशी-विदेशी स्त्रिया इथे येऊन त्या जादूचा अनुभव घेत होत्या. रोमाँ रोलाँच्या एका पुस्तकाचा प्रभाव इतका होता की- त्यात वर्णिलेला माणूस कसं काम करतो ते अनुभवायला ब्रिटिश, अमेरिकन, फ्रेंच आणि इतर स्त्रिया इथे आल्या. एका भेटीतच अनेकींचे जीवन बदलले.

तोच अनुभव घेत भारतातील मराठी, बंगाली, पारशी, गुजराती, पंजाबी स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीत, खादीच्या, साक्षरतेच्या कामात आयुष्य वेचले. त्यांचे जीवन कसे होते, हे जाणून घ्यायचा प्रयत्न या मालिकेतून केला गेला. कोरोना काळ हा याबाबतही कसोटीचा ठरला. वाचनालये बंद, त्यामुळे माहिती मिळणे अवघड होत चालले होते. या स्त्रियांबद्दल अधिक रोचक माहिती मिळणे शक्य होते, पण... असो त्यातूनही  ही व्यक्तिचित्रे मी रंगवली. तरुण लोकांना ती आवडली, हे विशेष. नाही तर या विषयाबाबत गैरसमजच अधिक! पण मला वाटलं, आपण प्रयत्न करावा. क्वालिफिकेशन काय होतं माझं? फक्त स्त्री असणं, वाचन आणि संशोधनाची ओढ असणं, जाणून घेण्याचा कंटाळा नसणं. पण एवढ्या सामग्रीवर मी महात्मा गांधींच्या असंख्य अनुयायी स्त्रियांपैकी काहींबद्दल लिहायचा घाट घातला. नि आश्चर्य म्हणजे, साधनाच्या संपादकांनी ती कल्पना उचलून धरली. परिणाम? या वर्षीची ही लेखमाला.

आजच्या लेखात आहे फ्रेंच महिला. अँटोनिया मिरबेल ही गांधींच्या विचारांनी भारावली होती. एकामागून एक पत्रं लिहीत सुटली होती. ‘मला तुमची सहकारी म्हणून काम करायचंय, मला तिथं यायचंय- मला परवानगी द्या. नाही म्हणू नका. मी कदाचित तुमची अनुयायी व्हायच्या योग्यतेची नसेनही, पण मला संधी द्या. कुठलीही कठीण परीक्षा द्यायची माझी तयारी आहे. मला आणि माझ्या बरोबरीच्यांना तुमचे आध्यात्मिक मार्गदर्शन हवे आहे.’

रोमॉ रोलाँनी लिहिलेले गांधींचे चरित्र वाचले होते. त्यांच्या संयमाची, शाकाहाराची, अहिंसेची, सत्याग्रहाची संकल्पना आवडली होती. आपल्या पत्रांना उत्तरच नाही, हे पाहून ती निराश झाली होती. तिने धीर सोडला नाही. एक दीर्घ पत्र तिने गांधीजींना लिहिले. त्यात तिने आपल्या कुंडलीत महान माणसाच्या मार्गदर्शनाचा योग असल्याचे नमूद करून आपली पार्श्वभूमी ही कर्मठ कॅथॉलिक संस्काराची असून आपण बालपणापासूनच आध्यात्मिक विषयात रस घेत आहोत; पण चर्च व प्रचारक यांच्या कठोरपणाचा आणि प्रश्नांना नीट उत्तरे न देण्याच्या वृत्तीने आपण नाऊमेद होऊन अश्रद्ध  बनलो आहोत... असे लिहिले. यादरम्यान ती थिऑसॉफीच्या विचाराने प्रभावित होऊन त्यातील गुरूचे स्थान तिला अत्यावश्यक वाटू लागले. गांधींनी आपले आध्यात्मिक गुरू व्हावे, अशी गळ पत्रातून ती त्यांना घालत होती.

ती एका मध्यमवर्गातील होती. तिचा पती इंजिनिअर होता, पण त्याचा पगार तुटपुंजा होता. तिला स्वतंत्र कमाईचे साधन उपलब्ध नव्हते. ‘तुम्ही नकार दिलात, तर माझा आत्मा तग धरू शकणार नाही. तुम्ही हो म्हणा म्हणजे मी तिथे येऊ शकेन. मी शाकाहार, अल्पसंतुष्टता अवलंबून वाइनचा त्याग केला आहे. वैवाहिक ब्रह्मचर्य आम्हा दोघांनाही योग्य वाटतंय. मी वासनांवर नियंत्रण करीत आहे. हे करुणाकर गुरुवर्या, मला शिष्य म्हणून स्वीकारा. तुमच्या भेटीसाठी मी आतुर आहे, त्यामुळे माझ्या आत्म्याचा मृत्यू होणार नाही. हे सन्माननीय गुरुवर्या, मला बोलावून घ्या. आतुरतेने वाट पाहत आहे.’

गांधींपर्यंत हे पत्र पोहोचायला वेळ लागला. पण त्यानंतर त्यांनी तिच्या पत्रावर जरा दूरस्थागतच प्रतिक्रिया दिली. ‘प्रिय मित्र, तुमच्या पत्राने मला अत्यंत आनंद झाला, पण फक्त माझ्या भेटीकरता अनेक दिवसांचा प्रवास आणि खर्च करून येण्याची तसदी घेऊ नका. कारण तशी आवश्यकताही नाही. तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मला भेटायची गरज नाही. देवाची सेवा ही पीडितांच्या सेवेतून साध्य होऊ शकेल, तेच तुम्ही करावे.’

पण तिचे तुणतुणे सुरूच राहिले. ‘माझी सत्कर्मे मला साथ देतील. माझा पती जो माझ्यावर बहिणीवत्‌ प्रेम करतो, त्याने मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चंग बांधला आहे. मी तुमचे लेखन वाचत असते नि मला जाणवते की, माझे विचार तुमच्या विचारांशी खूपच जुळतात. माझ्यावर कृपेचा वर्षाव करा. माझ्या इच्छेखातर तो आम्हा दोघांचा विरहही सोसायला तयार आहे. मला प्लीज मार्गदर्शन करा.’ या हळुवार पत्राचा गांधींवर अनुकूल प्रभाव पडला. त्यांनी तिला लिहिलं, ‘तुम्ही इथं या. पण माझ्या सान्निध्यात राहूनच तुमच्या आत्म्याला संतोष वाटेल असे नाही. कारण तुम्हाला शांत वाटेल, ते तुमची जी अपरिमित श्रद्धा तुमच्या विचारांवर आहे त्यामुळे; मी कुणी महान साधू, संत आहे म्हणून नव्हे.’  हे पत्र वाचून तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले. तिने म्हटले, ‘माझे बौद्धिक, नैतिक कर्म दुर्लक्षून मला त्यांच्या समक्ष उभं राहता येणार याचे अप्रूप आहे. त्याखेरीज माझ्या मनात दुसरा विचारच नाही. एका महामानवाला मी याचि देही याचि डोळा पाहणार!’ 

मिरबेल बोटीतून मुंबईला उतरली. इथं तिला अहमदाबादला न्यायला कुणी येणार होतं, ते येऊ शकलं नाही. तिची भाषा लोकांना कळत नव्हती, त्यांचे बोलणे तिला उमगत नव्हते. साऱ्या अडचणी पार करत ती आश्रमात पोहोचली. तिथेही तेच हाल- भाषाच अडसर! मीरा बहेन मिरबेलनंतर काही दिवसांनी आली. मग सारे सोपे झाले. गांधी, मिरबेल आणि इतर आश्रमजन यांच्यातील ती दुवा ठरली. रोमाँ रोलाँनी लिहिले होते की, ‘मिरबेल ही काही फार उच्च कुळातील वा अत्यंत हुशार स्त्री नाहीय. फार काही करू शकेल अशी ताकद तिच्यात नाही, पण ती अत्यंत तरल विचारांची सच्ची स्त्री आहे.’ 

मिरबेलचे आश्रमीय जीवन तीन महिन्यांचं होतं. मीराबेन भाषेबाबत तिला मदत करीत होतीच. तिला जे आतून अस्वस्थ वाटत होते, ते गांधीजींच्या सहवासाने शांत होत गेले. त्यांनी तिला फारसा उपदेश वा सल्ला दिला नाही. पण तिला मानसिक, आध्यात्मिक आधार दिला. त्यांचे आश्रमात  वावरणे, विविध विषयांबाबतचे नैतिक विचार आचरणात आणणे, सर्वभूतेषु प्रेम असणे- या गोष्टींचा तिच्या जखमी आत्म्यावर मलमासारखा परिणाम झाला. गांधींनी म्हटले की, या बदलाला त्यांचा नव्हे तर तिच्या शक्तीचा उदय कारणीभूत आहे. मिरबेलच्या मनाला बरं वाटलं. तिने मानवकल्याणाच्या कामात स्वदेशात काम करायचं ठरवलं. तिचा नि गांधीजींचा पत्रव्यवहार सुरूच राहिला. खरं तर या व्यक्तीत लिहिण्यासारखे काय होते? मला वाटलं- असेही जखमी आत्मे गांधीजींच्या सहवासात बरे होऊन गेले, हे वाचकाच्या मनात ठसावे म्हणूनच मी हे लिहिले.

दुसरे एक फ्रेंच जोडपे गांधीजींचे विचार नीट समजावेत म्हणून इंग्रजी भाषा शिकले आणि साहित्य वाचून पार बदलून गेले. हे सगळं अविश्वसनीय वाटावं असंच आहे. शब्दांची शक्ती अफाट असते, हे खरं; पण असा चिरंतन परिणाम हजारों देशी-विदेशी लोकांवर होऊ शकतो, यावर आज विश्वासच बसत नाही. एक पत्र 1925 च्या ऑगस्टचे आहे. फ्रेडरिक  स्टँडन्थ या फिजिशियनने गांधींचे निसर्गो-पचाराबद्दलचे विचार वाचले नि तो व त्याची पत्नी दोघे भारावून गेले. त्याला पाश्चात्त्य विज्ञानाने गोंधळात टाकले होते, ज्यात मन आणि शरीर आरोग्य याचा मेळच बसत नव्हता. त्याने जादू वा तत्सम गोष्टींचा आणि थिऑसॉफीचाही आधार घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याची पत्नी फ्रान्सिस्का हिने अतिरेकी विचारांपासून दूरच राहण्याचा सल्ला दिला. ते दोघेही हिंदू विचारांचाही अभ्यास करत होते. गांधीजींच्या विचारात जो निसर्गाचा विचार होता, नैतिकतेचा आग्रह होता, त्यामुळे प्रभावित झाले होते. हे दोघे पती-पत्नी गांधींचा आरोग्य आणि आजार यासंबंधीचा जो विचार होता, त्याचे अनुसरण करायचा प्रयत्न करीत होते.

फ्रेडरिक नमूद करतो की, ब्रह्मचर्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे अवघड आहे, पण आम्ही आचरणात आणली आहे. सुरुवातीला मला ते अशक्य वाटे. पण नंतर माझ्या पत्नीच्या- तिलाही ते कठीण गेले, पण तिच्या- मदतीने आम्ही संपूर्णपणे बंधू-भगिनीसारखे राहू लागलो. आमचे आप्तेष्ट आम्हाला वेडेच समजतात. आता मानसिक स्तरावरही आम्ही एका पवित्र भावनेने राहत आहोत. खरंच जगातून किती तरी अन्याय नि दु:खं या मार्गाने कमी होतील!

फ्रान्सिस्काचे आयुष्य वेगळ्याच स्तरावरचे होते. आर्थिक संपन्नता होती. परंतु बाहेरच्या जगापासून ती अगदी तुटलेली होती. बालपणीच वडील गेले. आईने दुसरा विवाह केला. सावत्रवडिलांनी तिचे लवकरच लग्न लावून दिले. त्या व्यक्तीशी तिचं मानसिक नि शारीरिक स्तरावर कधी जुळूच शकलं नाही. तिला तो अनुभव आठवला तरी नैराश्य येई. त्या घराचे वातावरण असे होते की, ती शिक्षणासाठीही बाहेर जाऊ शकत नव्हती. त्यामुळे तिला मैत्रिणीही नव्हत्या. बाहेरच्या जगाबद्दल ती अनभिज्ञ होती. तिने त्याच्याशी घटस्फोट  घेतला.  फ्रेडरिकशी विवाह केला. शिकण्याच्या ओढीने तिने संस्थेत नाव घातले, पण तेवढ्यात युद्ध सुरू झाले नि पतीला नौदलात भरती व्हावे लागले. तिचे शिकणे थांबले. युद्धानंतर तो परत आला नि ग्रिज़ येथे त्याने कॉलेज सुरू केले. पैशाची चणचण भासू लागली. तिने मुलांच्या गाण्याच्या शिकवण्या करायला सुरुवात केली. दोघांचा ओढा आध्यात्मिक गोष्टींकडे होता. पाश्चात्त्य जगातील भौतिकतेची ओढ त्यांना वीट आणत होती. दारू, भौतिकेतेची अनावर इच्छा, तसेच वागणे, निसर्गाची हानी, प्राण्यांशी क्रूर व्यवहार आणि दुसरीकडे चर्चमध्ये जाऊन आठवड्यातून एक दिवस धार्मिकता दाखवायची, हे त्यांना खटकत होते. घरी ते दोघे भगवद्‌गीता वाचत असत.

गांधींचे ‘गाइड टू हेल्थ’ हे पुस्तक वाचल्यापासून त्या दोघांनी शाकाहार घेऊन चहा-कॉफी-मसाल्यांचा वापर बंद केला. क्वचित तेथील औषधंही घेणं बंद केलं. खरं तर ते धोकादायक ठरू शकलं असतं. पण त्यांना हेच सिद्ध करायचं  होतं की, पाश्चात्त्य जगात राहूनही असा  जीवनक्रम शक्य आहे. बऱ्याचदा ही पत्रं एकतर्फी असत. गांधी जिथे असत तिथं ती पोहोचायला वेळ लागे. तरी त्या दोघांपैकी कुणी तरी पत्रं लिहून आपण काय करीत आहोत, हे कळवत असे. खूपदा त्यांना गांधींची पत्रे व यंग इंडियाचे अंक उघडून मिळत, उशिरा मिळत. त्यावर गांधींनी लिहिले, ‘तुम्ही तुमच्याकडील अधिकारी व्यक्तींना भेटून त्या अंकांबद्दल नि पत्रांबद्दल स्पष्टपणे सांगा, त्यांचा संशय आणि गैरसमज दूर करा.’

काही दिवसांनी फ्रेडरिकने आपला खादी वापराबद्दलचा मनोदय लिहिला. चरखा आणि विणकाम यांची माहिती कळवण्याची विनंती केली. चरखा मागवून घेतला व हिंदुस्थानात यायची इच्छा व्यक्त केली. ‘याचि देहि याचि डोळा तुमच्यासारख्या महामानवाला भेटायचे आहे’ असे लिहिले. त्यावर गांधींचे उत्तर आले, ‘भरमसाट खर्च करून इथे यायची तसदी कशाला घेता? जेव्हा पैशाची सवड होईल, तेव्हा जरूर या. पण केवळ मला भेटायला नव्हे- तर जे जे तुम्ही वाचत आहात ते काम प्रत्यक्षात कसे चालते, हे पाहण्यासाठी या. तुमच्या कल्पनेतले खरंच इथे आहे ना, हे जाणणे महत्त्वाचे ठरेल. दूर राहून काम मोठे आहे असे समजणे नि ते खरंच कसे आहे ते पाहिल्याने तुम्हाला सत्याची जाण येईल. आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही हे ध्यानात घेऊन, तुम्ही मदत घेत असाल तर तुमच्या येण्या-जाण्याचा खर्च किती आहे, ते कळवावे. इथे उन्हाळा तीव्र असतो, तेव्हा उन्हाळ्यानंतर या.’       
                               
पण तेथील परिस्थिती पाहता, फ्रेडरिकला आपल्याऐवजी आपल्या खर्चाने दुसरा प्राध्यापक महाविद्यालयात ठेवूनच निघावे लागणार होते. शिवाय ऑफ सीझन तिकिटाचे दरही खूप कमी होते. त्यानुसार त्यांनी बुकिंग केले. इकडे बिर्ला आणि बजाज या गांधींच्या मित्रांनी फ्रेडरिक्सना पैसे पाठवले. त्याच सुमारास राजेंद्र प्रसाद युरोपच्या दौऱ्यावर होते. तिथे युद्धोत्तर शांतता विषयावर ते भाषणं करणार होते. तिथे हे जोडपं त्यांना भेटले, आपल्या घरी पाहुणचाराला घेऊन गेले. पण त्या भाषणाच्या वेळी काही राष्ट्रवादी लोकांनी गोंधळ घातला. प्रसादांना नि स्टंडंथ जोडप्याला मारहाण झाली. जखमा झाल्या. डॉ.फ्रेडरिकने सर्वांची मलमपट्टी केली. त्या दांपत्याने हिंदुस्थानात 1928 मध्ये जायचे नक्की केले. गांधींना पत्र पाठवण्याची विनंती केली. त्या पत्रामुळेच ऑस्ट्रियातून त्यांना निघता आले. 
इथे आल्यावर त्यांना इंग्रजीत बोलता येऊ लागल्याचा फायदा झाला. ते साबरमतीला जाऊन आश्रमात राहू लागले. त्यांना उत्सुकता होती त्यांच्या चरख्यावरील सुताचे आणि विणण्याचे गांधी कसे स्वागत करतात, याची. गांधीजी कामात व्यग्र असत. त्यातच त्यांचा 59 वा वाढदिवस होता. त्या वेळी फ्रान्सिस्का खादीची साडी नेसली. त्यांना आपण विणलेले वस्त्र दिले. आपल्याला भारतीय नाव देण्याचा आग्रह केला. तिचे नाव उच्चारणं आश्रमवासीयांना अवघड जात होते. त्या दोघांचे परस्परांवरील प्रेम नि श्रद्धा पाहून गांधींनी त्यांना सत्यवान- सावित्री हे नाव दिले. त्यामागची कथा सांगितली. सत्यवानाच्या वासनांवरील विजयाला मदत करून त्याला अध्यात्माच्या मार्गावर नेणारी ही सावित्रीबेन तिथे तीन महिने राहिली. 

यादरम्यान तिने ‘मूठभर मिठामुळे’ हे पुस्तक आपल्या आश्रमातील आठवणींसह लिहून पुरे केले. गांधींनी तिला आपल्या इतर पुस्तकांचे अनुवाद करायची परवानगी दिली. युरोपात गेल्यावर तिने अविश्रांत मेहनत करून गांधींच्या विचारांचा प्रसार करायचे काम केले. लोकांना हे काही आवडत-पटत नसल्याचे तिच्या ध्यानात आले की- तिला नैराश्य येई. त्यावर गांधी तिला पत्रातून समजावत की, तुझे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. तू आत्ताच निर्णय घेऊ नकोस. ज्या पतीने ती आश्रम नियम पाळायला लागल्यानंतर ‘तू अधिक सुंदर दिसू लागली आहेस’ असे म्हटले होते, तो आता निराश होऊ लागला होता. त्याला स्वत:वर ताबा मिळवणे असह्य होत होते. गांधीजींच्या मते, ‘तो खरा मनावर संयम आणतोय. तुला (म्हणजे फ्रान्सिस्काला) ती इच्छाच नाहीय, त्यामुळे तिचा झगडाच नाहीय.’ असो. पण ब्रह्मचर्य त्यांच्या सहजीवनात भेग पाडत होतं, असं दिसत होतं. पुढे तो आजारी पडून वारला. ती एकटीच काम करीत राहिली. तिची हिंदुस्थानात येणारी पत्रंही हळहळू बंद झाली.

यांसारख्या अनेक व्यक्ती त्या काळी स्वत:वर प्रयोग करीत होत्या. परिस्थितीच्या वणव्यात (युद्ध, जवळच्यांचा विरह, देशांची पुनर्रचना, वैयक्तिक जीवन उद्‌ध्वस्त होणं) होरपळत होत्या. गांधींच्या रूपाने त्यांना दिलासा मिळत होता. त्यातील काही निवडक स्त्रियांवर मी लिहायचे धाडस केले. त्यांचा संघर्ष सोपा नव्हता. आजही हे विचार आचरणात आणणे अशक्य वाटत असले, तरी दूरस्थ ताऱ्यासारखे आश्वस्त करीत आहेत. हेच विचार जगाला तारतील, असा विश्वास मनात आहे.

(लेखमाला समाप्त)

Tags: गांधींचे गारूड अँटोनिया मिरबेल मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी संजीवनी खेर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके