डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गांधीजींच्या प्रभावाने प्रेमा कंटकांचे जीवन आमूलाग्र बदलले. गांधीजी राजकारणात (आजच्या अर्थाने नव्हे) होते, त्यामागे सन्मार्गी समाज घडवणे हाच हेतू होता. त्यांचे खरं प्रेम समाजपरिवर्तन हेच होते. राजकारण हे माध्यम होते. म्हणूनच गरिबी निर्मूलन, स्वदेशी, ग्रामोद्धार, अहिंसा, अस्पृश्यता निवारण हे त्यांचे परम ध्येय होते. तेच प्रेमाजींनी अंगीकारले. महाराष्ट्रात कस्तुरबा ट्रस्टचे काम पाहणे हे त्यातील प्रमुख होते. काँग्रेस संमेलनात प्रतिनिधित्व करणे, स्त्रियांना आत्मनिर्भर करणे यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. ही झुंजार वृत्तीची स्त्री 1985 पर्यंत कार्यरत होती. प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी- हे त्यांच्याबाबत तंतोतंत खरे आहे.

गांधींच्या कामाने भारलेली, परंतु त्यांच्या सहवासाची आस न धरता त्यांच्याहून दूर राहून सतत कार्यमग्न असलेली प्रेमा कंटक. गांधीजींना तिच्या कामाचं महत्त्व केवळ जाणवतच होतं असं, नव्हे, तर कौतुक होतं. वैयक्तिक पातळीवर इतरांना लिहीत तशी ते तिलाही पत्रं लिहीत, पण त्यात एक वेगळेपण जाणवे. म्हणजे, इतर साऱ्या अनुयायी स्त्रिया गांधीजींच्या पत्राची आतुरतेने वाट पाहत असत, तर तितक्याच आतुरतेने गांधीप्रेमाच्या पत्राची वाट पाहत असत. त्यांना तिच्या पत्राचा आधार वाटत असावा, असे वाटते. ही मराठी मुलगी स्पष्टवक्ती होती. कामात झोकून देणारी होती. कार्यकर्ती, लेखिका नि गांधीभक्त होती. इतर भक्तांप्रमाणे केवळ त्यांच्या सहवासात राहूनच आपली भक्ती प्रकट करता येते, असे तिचे मत नव्हते. 

मुंबई कॉर्पोरेशनने त्यांना मानपत्र दिले त्या समारंभात तिने पहिल्यांदा गांधीजींना पाहिले (1923). त्यांच्या पाय मुडपून बसायच्या पद्धतीने तिला त्यांच्या पायाला स्पर्श करता आला नाही. साहजिक तिने गुढघ्यांना स्पर्श करून नमस्कार केला. असंच अनेकांना करावं लागे. त्यांनी हसून आशीर्वाद दिला. ‘अजि मी ब्रह्म पाहिले’ असं प्रेमाने म्हटले. आपल्याकडील एक आणा बापूंच्या फंडाला दिला. आपण कुणा तरी संत-महात्म्याला भेटलो आहोत, असे तिला वाटले. मन अगदी भरून आले होते. 1924 मध्ये बार्डोलीच्या सत्याग्रहानंतर मात्र तिने निश्चित केलं की, शिक्षण पुरं झालं की आपण ह्या कामात सामील व्हायचे. त्यासाठी ती तिथे गेली. साबरमतीला जाऊन बापूंना भेटून तिने आपली मनीषा प्रकट केली. पण गांधीजींनी फारसे उत्तेजन दिले नाही. मुळात तिला वीरवृत्तीचे आकर्षण होते. मराठी समाजसुधारक, झुंजार राजकीय नेते, विवेकानंद यांसारखे तत्त्वज्ञ यांच्याबद्दल तीव्र जिज्ञासा नि आपला धर्म आणि संस्कृती यांच्या महत्तेची ओढ होती. गांधींकडे पाहून, त्यांना भेटून मात्र ही विभूती वीरवृत्ती आणि आध्यात्मिक शक्ती असलेली आहे, याची तिला खात्री वाटू लागली. क्रांतिकारकाची मानसिकता नि भगवद्‌प्रेम यांचे अनोखे मिश्रण बापूंत तिला आढळले.     

तिच्या बालपणीच आई वारली, त्यामुळे सावत्र आईने सांभाळ  केला. वडिलांशी त्यांचे फारसे पटत नव्हते, पण त्यांनी लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी नीट पार पाडली. पदवी मिळाल्यावर पुढचा अभ्यास न करता त्या थेट  साबरमतीलाच गेल्या. या वेळी मात्र चार वर्षे त्या तेथे राहिल्या. अगदी बालवर्गाला चित्रकला, लेखन शिकवण्यापासून ते खादी विणण्यापर्यंतची कामं शिकून इतरांनाही मदत करत असे. स्वत: गुजराती नि उर्दू भाषेत प्रावीण्य मिळवले. मुळातच सामाजिक कामाची आवड असल्याने त्या युवा काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या.  आता हवं होतं ठोस काही तरी करायला मिळावं. आयुष्य झोकून देऊन काम करावं, म्हणून मग साबरमतीत स्त्रियांना शिकवणे, ग्रामोद्धाराचे काम करणे अशी कामं केली. कराचीला 1931 मध्ये सभा होऊन स्वातंत्र्यसंग्रामाला आरंभ झाला. दोन्ही वेळा त्या बापूंबरोबरच होत्या. आश्रमाच्या छात्रालयाचे काम त्यांनी निष्ठेने सांभाळले होते. गांधींची वैयक्तिक कामं करायला मिळावीत यासाठी आश्रमात चढाओढ असे. रात्री पाय चेपून देणे, काही हवं-नको पाहणे हे प्रेमाजी आदराने करीत. दर राखी पौर्णिमेला बापूंना राखी बांधत. एकदा बापू रात्री पाय धुवायला गेले नि चक्कर येऊन पडले. दुसरं कुणी जागं नव्हतं, तर प्रेमातार्इंनी चक्क त्यांना लहान मुलासारखे उचलून आत नेऊन झोपवलं होतं. त्या 1933 पर्यंत साबरमतीलाच राहिल्या. तोवर गांधींनी सार्वत्रिक सत्याग्रहाऐवजी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता. या संग्रामात उडी घ्यायची त्यांची तीव्र इच्छा होती. गांधींसमवेत स्वातंत्र्यमंदिरात (तुरुंगात) जायची प्रेमा कंटक यांना इच्छा होती. सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल 1934 मध्ये त्यांना सहा महिने तुरुंगात राहावे लागले. त्यानंतरही दोन-तीनदा जेलयात्रा करावी लागली. त्याचा त्यांना अभिमान वाटत असे.

आश्रमातल्या अनेक आठवणी  लिहिताना त्या बापूंच्या स्वभावाचे अनेक पैलू सहजपणे उलगडतात. बापू हे पावसाळा सोडता हृदयकुंज ह्या कुटीच्या अंगणातच झोपत असत. प्रेमाबहनदेखील बाहेरच खाट टाकून झोपत असत. रात्री नऊची बेल वाजल्यानंतर सर्वांनी शांतपणे झोपायचे, बोलायचे नाही असा नियम होता. एकदा बेल झाल्यावरही प्रेमाची शेजारीण मोठ्या आवाजात बोलत होती, तर त्यांनी तिला फटकारले नि नियमाची आठवण करून दिली. त्यानंतर मीराबेन गांधींचा निरोप घेण्यासाठी आल्या तेव्हा गांधी मोठ्याने बोलत होते. त्यांना कोण रोकणार? सारे गप्प होते. ह्यांचे बोलणे चालूच अखर प्रेमाबहन म्हणाल्या, ‘‘बापू, नऊची घंटा वाजली नि तुम्ही बोलतच बसला आहात.’’ सारे स्तब्ध होते. गांधी हसून म्हणाले, ‘‘असे होय? माझे लक्षच नव्हते. असं कधी होऊन मी शिस्त मोडली, तर माझे कान पकडून त्याची जाणीव करून द्या.’’

आश्रमात देवीची साथ पसरली. गांधी लसीकरणाच्या विरुद्ध होते. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना लस टोचली नाही. गांधी अत्यंत काटेकोरपणे आरोग्याची, स्वच्छतेची काळजी घ्यायला लावत होते. पण एका मागून एक मुलं रोगाला बळी पडत होती. असं झालं की अपरात्री उठून ते काही तरी लिहीत बसत. प्रेमाबेन म्हणाल्या, ‘‘असं रात्री काय करत बसता? पुढे कामासाठी दिवस आहे. विश्रांतीही आवश्यक आहे.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘काय करू झोप येत नाही. माझं काही चुकतंय का? काय करू? ही लहान मुलं देवाघरी जात आहेत.’’ प्रेमाबेन म्हणाल्या, ‘‘तुम्हाला जे पटलं ते तुम्ही करत आहात. डॉक्टरांचे नियम पाळत आहात. मग अशा मृत्यूंकरता शोक का कारता? तुम्हीच त्या भयावर मात करायला सांगता ना?’’

दुसऱ्या दिवशी त्यांनी आश्रमवासीयांना सांगितले की- कदाचित माझ्या चुकीच्या माहितीमुळे मुलांवर संकट ओढवत असेल असे वाटतंय तर, ज्या पालकांना आपल्या लस टोचून घ्यायची असेल त्यांनी नि:संकोच तसे करावे. पण तसे कुणी केले नाही. पण एक मात्र झालं की, त्यानंतर देवीची एकही घटना आश्रमात झाली नाही.
कुटीसमोर प्राजक्ताचं झाड होतं. मोसमात फुलांचा सडा खाली पडत असे. एकदा प्रेमाबेनने त्या नाजूक फुलांचा हार केला नि गांधीजींना म्हणाली, ‘‘तुमच्या गळ्यात घालायचाय. घालू?’’ ते म्हणाले, ‘‘आज काय विशेष आहे?’’ ‘‘नाही, पण फुलं पाहून मला वाटलं, एवढंच.’’
‘‘मग घाल. त्यानंतर असं कर की, तो काढून घेऊन त्याचे दोन भाग कर नि आश्रमात जे आजारी आहेत ना त्यांना नेऊन दे. त्यांना सुगंधाने खूप प्रसन्न वाटेल.’’

काही काळानंतर साबरमती आश्रम गुंडाळला गेला नि  वर्ध्याला आश्रम बनला. प्रेमाजींनादेखील ग्रामसेवा करावीशी वाटू लागली नि त्या महाराष्ट्रात पुण्याजवळ  सासवडला गांधींचे काम पुढे नेण्यासाठी शंकरराव देवांना मदत करू लागल्या. तेव्हा इथेही सामाजिक नि राजकीय स्वातंत्र्यऊर्मीने वातावरण उचंबळत होते. यादरम्यान बापूंशी पत्रव्यवहार, सल्ला घेणं सुरूच होतं. एकदा एका विचित्र स्वप्नाबद्दल त्यांनी बापूंना विचारले. स्वप्नात प्रेमाजी एक लहान बाळ बनून गांधीजींच्या मांडीवर निजल्या होत्या नि गांधीच्या छातीतून दुधाची धार लागली होती, त्या ते दूध पीत होत्या. बापू तिच्या माथ्यावर थोपटत ‘पोटभर पी’ असं म्हणत होते. ह्या स्वप्नाचा अर्थ तिला उमगतच नव्हता. त्यावर बापू म्हणाले, ‘‘किती पवित्र स्वप्न आहे! त्याबद्दल मनात खात्री बाळग.’’ ह्या दोघांमधला पत्रव्यवहार अनेक वर्षे सुरू होता. त्यांना लिहिलेली बापूंची 248 पत्रे संग्रहित आहेत. 

गांधींच्या ब्रह्मचर्याबाबत प्रेमा कंटकांना संदेह होता. तो त्या बोलून दाखवत. तसं त्यांच्या ‘काम नि कामिनी’ या  नायिकेच्या वागण्यातूनही या वैवाहिक जीवनातील ब्रह्मचर्याबाबतचा विरोध स्पष्ट होतो. नायिका वृंदाचे मुकंदाशी लग्न होते, पण हा गांधीवादी ब्रह्मचर्यपालनाबाबत आग्रही असतो. वृंदा मात्र त्याचा विरोध करते नि या नैसर्गिक भावनेला वासना म्हणू नको, असं समजावते. पण जेव्हा तो ऐकत नाही, तेव्हा एका मित्राबरोबर संग करून मुलाला जन्म देते. त्याला स्वत:चे अपत्य म्हणून वाढवते. त्यांच्या अग्नियानसारख्या लेखनात स्वतंत्र बाण्याची मराठी स्त्री समोर येते. त्यात तीन मैत्रिणी आपापले विचार मांडतात. त्या काळच्या या स्त्रिया घरातून समाजकार्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. प्रभातफेऱ्या, पिकेटिंग, सत्याग्रह तुरुंगात जाणे, राजकीय-सामाजिक चळवळीत जीव तोडून काम करताहेत. जगातील इतर राजकीय विचारही त्यांनी समजून घेतले आहेत. त्यानुसार गांधींच्या विचारांशी असलेले दुमतही मांडतात. पण त्यातील प्रत्येक स्त्री स्वदेशी, ग्रामोद्धार, स्त्रीशिक्षण आणि इतर प्रागतिक विचार आचरताना दिसते. त्यातील पुरुषही इतर पक्षात काही काळ जाऊन भ्रमनिरास होऊन पुन्हा गांधींकडेच वळतात. ‘सत्याग्रही महाराष्ट्र’ या पुस्तकात (1940) प्रेमा कंटक यांनी त्या काळातील आपल्याकडील अत्यंत ज्वलनशील राजकीय परिस्थिती, सामाजिक बदल यांचे व्यक्ती-संस्थाकेंद्रित सखल अभ्यास करून चित्रण केले आहे. तो काळ नि स्त्रियांचे स्थान पाहता, हे पुस्तक त्यांच्या विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते. यात टिळकांच्या मृत्यूपासून ते फैजपूरच्या काँग्रेसपर्यंतचा इतिहास आला आहे. त्यांचे हे लेखन- खास करून व्यक्तींबाबत लिहिलेले प्रसंग- कादंबरीसारखे रंजक झाले आहेत, असे तत्त्वचिंतक जावडेकरांनी नमूद केले आहे. शंकरराव देवांबद्दल प्रेमाजींच्या मनात नितांत आदर होता. त्यांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी तेव्हा स्त्रिया अशा विषयावर सहसा लिहीत नसत, पण त्यांचाही दृष्टिकोन समाजासमोर यावा म्हणून त्यांनी तसे सुचवले. प्रत्यक्षात हे वेगळे नि महत्त्वाचे पुस्तक लिहिले गेले. 

गांधींना स्त्रियांच्या सामाजिक स्थितीबद्दल करुणा होती. तेच म्हणत की- माझ्यात एक स्त्री दडलेली आहे, जी काळजी करते, काळजी घेते. ते त्यांच्या कामामुळे त्यांच्याकडे आलेल्या स्त्रियांना फार जवळ येऊ देत नसत, तसेच फार दूरही जाऊ देत नसत. त्यांना कधी हळुवार, कधी कठोर बोलून मार्गदर्शन करत. त्यांच्या जीवनातल्या, प्रकृतीच्या वा इतर अडचणी अगदी हळुवार हाताने सोडवायचा प्रयत्न करत. स्वत:च्या प्रभावातून बाहेर जाऊ देत नसत. स्त्रियांच्या आपुलकीचा त्यांना आधार असे. प्रेमा कंटकांना लिहिलेल्या पत्रातून हेच जाणवते.
 
नवी दिल्ली, 23 एप्रिल 1946

प्रिय चि. प्रेमा,

तू सुशीलाला (सुशीला पै) पाठवलेले मूर्खपणाचे पत्र मला वाचून दाखवण्यात आले आणि त्याचा अनुवादही करून सांगितला. माणसाने आपल्या उद्दिष्टाबद्दल स्पष्ट राहणे, ही चांगली गोष्ट आहे. तुझ्या उद्दिष्टाची जी व्यक्ती प्रतीक झाली होती, तिला विसर. परंतु अडचण ही आहे की, व्यक्तीच तुझे उद्दिष्ट झाली आहे. असे अनेकांचे होते आणि त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीलाच आपण आपले उद्दिष्ट करतो, तेव्हा त्याची कृती आणि शब्द आपल्या अपेक्षेप्रमाणे असले तर आनंद होतो, तसे नसेल तर अपण चिडतो. त्यामुळे माणसाने आपले उद्दिष्ट स्वतंत्र ठेवले पाहिजे. जोपर्यंत तू असे करू शकणार नाहीस तोपर्यंत तुला त्रास होईल आणि तुझ्या कामावरही परिणाम होईल. तू शिकलेली आहेस, पण शहाणपणा शिकलेली नाहीस!! आता तो शीक. तू तो शिकली नसशील, तर माझ्याकडून शीक. मग तुझे उद्दिष्ट आणि तुझ्या उद्दिष्टाचे प्रतीक यांच्यात कधीही संघर्ष होणार नाही. कारण शहाणपणा शिकणे म्हणजे व्यावहारिक ज्ञान मिळवणे, परंतु व्यवहार हा खरेपणानेही करता येतो नि खोटेपणानेही. तेव्हा जागी हो. आशीर्वाद.

- बापू

1934 मधील एका पत्रात ते, आपण कसे रात्री पावणेदोन वाजता उठून पत्रं लिहीत बसतो, त्याविषयी लिहितात. मी बहुधा दिवसभरात छोटीशी डुलकी काढतो. ती मला पुरेशी असते. बऱ्याचदा पत्र न सुधारता तशीच पाठवतो. तेव्हा मी लिहून जातो ‘आज मी मेलो’. मला लिहायचं असतं ‘आज मी अजमेरला-’ वाचणारा समजतो किंवा पुन्हा विचारतो. त्या निमित्ताने पत्रव्यवहार सुरू राहतो. आपल्या निर्धारित ध्येयासंबंधी आपली खात्री हवी, इतर कुणी काही म्हणो. तुला कोलंबसाची हकिगत माहीत असेल. त्याचे सहकारी प्रदीर्घ शोधायात्रेला कंटाळलेले होते. त्याचा कायमचा काटा काढायचा त्यांचा इरादा होता. तो लक्षात येऊन कोलंबसाने म्हटले, ‘‘जरा वेळ द्या मला. मला किनारा दिसतोय.’’ आणि खरंच त्याने जहाज किनाऱ्याला नेले. अशी निष्ठा हवी. रामनामावर माझी असीम श्रद्धा आहे. त्याच्या इच्छेखेरीज इथले पानही हलू शकत नाही. तरी माणसांच्या प्रयत्नांना खूप अर्थ आहे. तेही आपल्याकडून व्हायला हवे.

गांधीजींच्या प्रभावाने प्रेमा कंटकांचे जीवन आमूलाग्र बदलले. गांधीजी राजकारणात (आजच्या अर्थाने नव्हे) होते, त्यामागे सन्मार्गी समाज घडवणे हाच हेतू होता. त्यांचे खरं प्रेम समाजपरिवर्तन हेच होते. राजकारण हे माध्यम होते. म्हणूनच गरिबी निर्मूलन, स्वदेशी, ग्रामोद्धार, अहिंसा, अस्पृश्यता निवारण हे त्यांचे परम ध्येय होते. तेच प्रेमाजींनी अंगीकारले. महाराष्ट्रात कस्तुरबा ट्रस्टचे काम पाहणे हे त्यातील प्रमुख होते. काँग्रेस संमेलनात प्रतिनिधित्व करणे, स्त्रियांना आत्मनिर्भर करणे यात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. ही झुंजार वृत्तीची स्त्री 1985 पर्यंत कार्यरत होती. प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी- हे त्यांच्याबाबत तंतोतंत खरे आहे.

तिने लिहिलेल्या कादंबऱ्यातील नायिका त्या काळातील स्त्रियांप्रमाणे फक्त पतिपरायण, गृहिणी, मुलं नि घरच्यांचे निगुतीने करण्यात धन्यता मानणाऱ्यांपैकी नव्हत्या; तर आजही बोल्ड वाटतील असे निर्णय घेणाऱ्या होत्या.

Tags: गांधींचे गारूड बापू सरोजिनी खेर प्रेमा कंटक महात्मा गांधी गांधी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके