डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हिंदी कथेच्या कुरुक्षेत्रात सातत्याने युद्ध होत राहिले....

तिसरे साधना साहित्य संमेलन 10 ते 12 डिसेंबर 2010 या काळात, कोल्हापूर येथे पार पडले. हे संपूर्ण संमेलन ‘कथा’ या साहित्यप्रकाराला केंद्रस्थानी ठेवून झाले. या संमेलनाचे उद्‌घाटक होते- प्रेमचंद यांनी स्थापन केलेल्या ‘हंस’ या मासिकाचे कार्यकारी संपादक असलेले ज्येष्ठ हिंदी कथाकार संजीव. त्यांनी या संमेलनाचे उद्‌घाटन करताना केलेले भाषण (संक्षिप्त) अनुवाद करून प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक.

 

‘‘कथा सांगणं हे वास्तव बदलण्यासाठी म्हणून मनुष्यतेचं बहुधा प्राथमिक उपकरण आहे.’’ - कार्ल क्रोएवर. अशा प्रकारे कथा ही या जगाच्या समांतर एका प्रतिजगताची सृष्टी ठरते. किस्से आणि गोष्टींच्या या जगात पावलापावलांवर कथा विखुरल्या आहेत. गाव, वस्ती, झाडं, पर्वत, नद्या, समुद्र, पशू, पक्षी, राजा-राणी, देवी-देवता, भूत-प्रेतांपासून ते ग्रह-नक्षत्रांपर्यंत. दिवस बदलत गेले आणि कथेचा पट आणि आकृतिबंध यांत परिवर्तन होत गेलं. हिंदी कथेच्या या लिखित स्वरूपाच्या सव्वाशे वर्षांच्या आयुष्यात अनेक वाटा-वळणं, चढ-उतार येत राहिले. ‘टोकरीभर मिट्टी’ (माधवराव सप्रेम) च्या छोट्याशा जमिनीवर हिंदी कथेचा महावृक्ष बहरलेला दिसतो. समृद्ध वारशाच्या भांडवलावर हिंदी कथेनं नवव्या दशकात पाऊल ठेवलं तेव्हा तिच्याजवळ ऊर्जासुद्धा होती आणि निराशासुद्धा होती. जागतिकीकरण, माहितीचा विस्फोट, बाजारवाद, उदारीकरण आणि खेड्यात रूपांतरित झालेल्या जगाचं मायावी क्षितिज तिच्यासमोर होतं. किस्से आणि गोष्टी ह्या संपूर्ण जागतिक कथांचा वारसा, सामूहिक-निधी आहेत. जागतिक कथेबद्दल आपण नंतर बोलू. आधी आपण आपल्या कथांबद्दल बोलू. त्यातही हिंदी कथांबद्दल.

खरं सांगायचं तर आपलं सगळ्या प्रकारचं साहित्य हे माणसामाणसांमधील आणि माणूस आणि भोवतालच्या जगामधील नातेसंबंधाची पडताळणी करतं, पण सध्या ज्या प्रकारे अराजकता माजली आहे, त्यावरून असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल की जागतिकीकरणामुळंच नातेसंबंधावर विरजण पडलं आहे. नातेसंबंधांमधील ताण-तणाव, अपेक्षाभंग, एकत्र कुटुंब पद्धतीचं विखंडन, व्यक्तिगत अस्मितेचा शोध ह्या काही एका दिवसातील किंवा एका ठराविक काळातील घटना नव्हेत. ‘नई कहानी’ आणि याच्या खूप आधीपासून हे सगळं ध्वनित होत होतं. सगळं काही विखुरण्याच्या त्या काळात आपण पतिपत्नी आणि एक किंवा दोन मुलं अशा न्यूक्लियस कुटुंबापर्यंत आधीच येऊन ठेपलो होतो. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळं यात एवढीच भर पडली की पती (किंवा पत्नी) नाही, मुलं नाही, फक्त मी, मी आणि मी! उत्तर आधुनिकतेचा एकंदर सार हे आहे की मी कशालाही जबाबदार नाही. बाजारवाद ललकारतोय- या उघड्या आकाशाखाली सगळं काही विकलं जातंय. तुम्ही विकत घेऊ शकत नाही, याचा अर्थ तुमची विकत घेण्याची लायकी नाही.

जागतिकीकरणाच्या फिरणाऱ्या ग्लोबमध्ये निरनिराळी तत्त्वज्ञानं येताहेत आणि जाताहेत. उदारीकरण दलालासारखं फूस लावतं आहे की- काय चिंध्या नेसला आहात, जगाकडं पहा- तिथं देवांनाही मिळणार नाहीत अशा उत्पादनांचा खच साठलाय. नवेपणाच्या हव्यासाने आणि नाच-गाण्याने भरलेल्या या मदनोत्सवात सगळं काही पायदळी तुडवून हिंदी कथेला वैष्णवी हसू विचारतंय, ‘‘शोध स्वत:ला. कुठं आहेस तू आणि तुझी संवेदनेची संगीतमयी संजीवनी?’’ माणूस-माणूस आणि माणूस व इतर जगातील तादात्म्य किंवा द्वंद्वात्मकतेचं कथात्मक इतिवृत्त आणि संवाद म्हणजे कथा. पण काही लोक आकृतिबंधालाच कथा मानतात. काहीजण भाषेला कथा मानतात तर काहीजण घटनेला कथा मानतात. किंबहुना आकृतिबंध कथेचा घाट ठरवतो, घटना साचा ठरवते पण तिच्या आत्म्याच्या विणीचं माध्यम तर संवेदनाच आहे. अमृतलाल नागर यांनी एकदा म्हटलं होतं- ‘‘कथेध्ये जास्त कसरत कराल तर कथा बिघडेल.’’ आणि रघुवीर सहाय यांनी लिहिलं होतं की, ‘‘जिथं कला अधिक असते तिथं रचना नसते.’’

कथनाचं दारिद्रय लपवण्यासाठी आकृतिबंध, भाषेचा चमत्कार यांचा आश्रय घेतला जातो. पण या सगळ्या व्याख्या एकांगी आणि अपुऱ्या आहेत. कथेला सगळं काही पाहिजे असतं- कथ्य, आकृतिबंध, कला, घटना सगळं. कोणती गोष्ट किती प्रमाणात पाहिजे. किती वेळ पंचम, किती वेळ सप्तम, किती आलाप, झीला किती, ढील किती, तान किती- हे सर्व साधणं एका कुशल साधकानं प्रावीण्य मिळवण्यासारखं आहे. कबीर, सूरदास, तुलसीदास यांनीसुद्धा आपलं म्हणणं नेमकेपणानं पोहोचवण्यासाठी, प्रभावपूर्ण बनवण्यासाठी आकृतिबंध, रहस्य, गूढ इत्यादींचा आधार घ्यावा लागला होता. नोबेल पुरस्कारप्राप्त लोसा यांचं ताजं उदाहरण आपल्यासमोर आहे, त्यांनी पेरुग्वेच्या मिथांचा वापर केला आहे. कथेला सगळं काही पाहिजे, पण सगळं काही असताना, कोणत्या गोष्टीच्या नसण्यानं कथा निष्प्राण होते? तर ती गोष्ट म्हणजे संवेदना! लाखो कथा असतील पण आजदेखील ‘भेडिए’ (भुवनेश्वर), ‘उसने कहा था’ (चंद्रधर शर्मा गुलेरी), ‘हार की जीत’ (सुदर्शन), ‘बडे भाई साहब’, किंवा ‘कफन’ (प्रेमचंद) इत्यादींसारख्या थोड्याशाच कथा आपल्या स्मृतिकोषात तेवत राहतात, असं का? खूप कथाकार आहेत, खूप कथा आहेत मग त्यांच्यामध्ये ही गोष्ट का आली नाही? याचं उत्तर आहे- प्रचार आणि संवेदना.

दलित संदर्भ, स्त्री संदर्भ यांसारख्या विषयांवर कुणीही कथा लिहावी, पण अट एकच की ती कथा असावी. दलित कथांच्या बाबतीत मला मो.आरिफ, ओमप्रकाश वाल्मीकी, अजय नावरिया यांच्या कथा महत्त्वाच्या वाटतात. स्त्रीला केंद्रात ठेवून तिच्या प्रसवपीडेवर लिहिलेली स्वयंप्रकाश यांची ‘अगले जनम’ (या कथेचा ‘लेबर रूम’ असा मराठी अनुवाद झाला आहे- अनु...) ही कथा सध्या भरपूर प्रमाणात लिहिणाऱ्यांच्या सामान्य कथांपेक्षा निश्चितच उजवी आहे. स्वयंप्रकाश हे युवाही नाहीत आणि स्त्रीही नाहीत. 1990 ते 2010 हा कालखंड अभूतपूर्व संक्रमणाचा काळ आहे. एकाच काळात अनेक घटना घडल्या. अपेक्षाभंग, अघोरी हावरेपणा, एकध्रुवीय निरंकुशता, जागतिकीकरण, उदारीकरण याचबरोबर मंडल आयोग, बाबरी मशीद उद्‌ध्वंस, अमानुष दंगली, आदिवासी, दलित, मागास, स्त्री आणि अल्पसंख्यांक यांच्या अस्मितांचा उदय, आतंकवाद आणि गुन्हेगारी, जातीयवाद आणि व्यक्तिवाद. कथेच्या क्षेत्रात इतक्या घटना-दुर्घटनांना पचवणंसुद्धा अवघड होतं आणि डोळेझाक करणंही अवघड होतं. याचा परिणाम असा झाला- परिपक्व, अपरिपक्व, वरवरच्या, बारीक, खोलात शिरून लिहिलेल्या अशा अनंत कथांचा ढीगच लागला. काही कथांच्या माध्यमातून इथं आपल्याला हिंदी कथांचं विषयवैविध्य पाहता येईल.

जागतिकीकरणावर भाष्य करणारी संजय खाती यांची ‘पिंटी का साबुन’ ही कथा महत्त्वाची आहे. कैलाश वनवासी यांची ‘बाजार में रामधन’ ही कथा बाजारावर जोरदार हल्ला चढवते. मुलासाठी पैशाची व्यवस्था करण्यासाठी रामधनला मनात नसताना बैल विकण्याचा निर्णय घ्यावा लागतो, पण त्याला बैल विकायचे नसतात म्हणून तो बैलांची किंमत चार हजार रुपये सांगतो. इथं कथाकार एक प्रयोग करतो. रामधनचा बैल रामधनला विचारतो की, ‘‘समजा कुणीतरी चार हजार दिले असते तर तुम्ही आम्हांला विकलं असतं का?’’ रामधन म्हणतो, ‘‘नाही.’’ बैल म्हणतो- ‘एक ना एक दिवस विकावंच लागेल, आम्हांला कुठंपर्यंत बचावून ठेवणार?’’ अशा खूप कथा आहेत. मनोज रूपडा यांची ‘साज-नासाज’, एस.आर.हरनोट यांची ‘बिल्लियाँ बनयाती हैं’, देवेंद्र यांची ‘क्षमा करो हे वत्स’, प्रभात रंजन यांची ‘जानकी पूल’ इत्यादी. या सर्व कथांमध्ये जागतिकीकरण, पैशाचं अकारण वाढलेलं महत्त्व, शहरातील विकास आणि गावातील मागास यांच्यातील अंतर्विरोध आणि या सर्वांत कुचंबणा होणारा माणूस हे केंद्रित आहे. कैलाशचंद्र यांची एक कथा आहे. कथेमध्ये एक तरुण थंडीनं कुडकुडणाऱ्या एका माणसाला आपले कपडे देतो आणि अत्यंत सामान्य कपडे घालून मुलाखतीला जातो. त्याला वाटतं ही गोष्ट आपल्यासाठी फायद्याची ठरेल. आपली निवड होईल. कधी काळी प्रेमचंद यांच्या ‘परीक्षा’ कथेमध्ये जानकीनाथ सोबत असं घडतं. पण इथं त्या तरुणाच्या दयेमुळं, करुणेमुळं त्याची निवड होत नाही.

प्रेमचंद यांच्यापासून कैलाशचंद्र यांच्यापर्यंत अर्थात्‌ भांडवलशाहीच्या बालपणापासून कार्पोरेट व्यवस्थेपर्यंत येतायेता सद्‌गुण हा अवगुणात परिवर्तित झाला आहे आणि संवेदनाचं काही महत्त्व उरलं नाही. एका कथेमध्ये मुलगा लाईनमध्ये नोकरीसाठी उभा राहिला आहे आणि त्याच लाईनमध्ये वडीलही उभे आहेत. हा कसला काळ आहे? संवेदना बोथट होत आहेत. मूल्य, नाती आणि परिस्थितीच्या एन्क्रोचमेंटचं प्रतिनिधित्व करणारी कथा म्हणून काशीनाथ सिंह यांच्या ‘पांडे कौन कुमति लेहि लागी’ या कथेचा विशेषत्वाने उल्लेख करता येईल. घरासमोरील शिवालयातून परदेशी महिलेसाठी टॉयलेटची जागा उपलब्ध केली जाते, याचं कारण म्हणजे त्या महिलेकडून दर महिन्याला मोठी रक्कम मिळणार असते. जागतिकीकरणाच्या कथांच्या बाबतीतल्या प्रभावाचं असंही मूल्यांकन केलं जाऊ शकतं की इथं बाह्यरूपांवर जोर दिसतो, कथेच्या आशयसूत्रांवर विशेष जोर दिसत नाही. हेही खरेच आहे की अशा सादरीकरणामुळे भाषा एकांगी होत नाही.

उदय प्रकाशना या गोष्टीचं श्रेय दिलं जातं की त्यांनी विदेशी तत्त्वज्ञानाचं भारतीय रूप प्रस्तुत केलं आहे. अर्चना वर्मा यांच्या मते उदय प्रकाश यांनी ‘तिरिछ’मध्ये स्वप्न, हीरालालला भुतांमध्ये प्रेत, छप्पन तोले की करघन मध्ये ‘विच हंटिंग’ला नवीन वास्तवाचं सारथ्य करायला लावलं. पण कथेचा मूळ विषय काय आहे? वडील नक्कीच नाही. मग काय तर प्रयोग. म्हणून इथं वडील गौण आहेत फक्त एक माध्यम. उदय प्रकाश यांच्यावर मुळातच बोर्हेस आणि मार्खेज यांचा खोल परिणाम झाला आहे. त्यांच्या अनेक कथांमधून हा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. त्यांची एक कथा बोर्हेस यांनी उद्‌धृत केलेल्या चुआँगत्जू  (2400 वर्षांपूर्वी) या तत्त्वज्ञानाच्या एका चमत्कारिक उक्ती किंवा विचारावर आधारलेली दिसते. ‘‘मी स्वप्नात पाहिलं की मी वाऱ्यावर तरंगणारं एक फुलपाखरू आहे की ज्याला चुआँगत्जूबद्दल काहीच माहिती नाही!’’ असंही म्हटलं जातं की ‘‘मी (चुआँगत्जू) स्वप्नात पाहिलं की मी एक फुलपाखरू बनलोय. जागं झाल्यानंतर मी विचार करू लागलो की माझ्या स्वप्नात फुलपाखरू होतं की फुलपाखराच्या स्वप्नात मी होतो?’’ बोर्हेस स्वत: या उक्तीनं प्रभावित होते.

साहित्यासाठी काहीच निषिद्ध नाही. साहित्यात सगळं काही येऊ शकतं. साहित्य म्हणून ते उतरायला हवं आणि त्याला स्पेस हवी. कथेपुरतं म्हणायचं तर असं सांगतात की कथा ही चांगली किंवा वाईट नसतेच, तिची मांडणी चांगल्या पद्धतीनं झालेली नसते एवढंच. एक काळ होता जेव्हा रशियन आणि फ्रेंच कथा, इतकंच काय तर चिनी कथांचेसुद्धा लाखो भक्त असायचे. या कथा इंग्रजीत अनुवादित होऊन वाचकांपर्यंत पोहोचायच्या. मग इंग्रजीच्या हातून लगाम निसटला आणि एका नव्या संवेदनेचा उदय झाला. स्पॅनिश लॅटिन, अमेरिकन आणि ब्लँक लिटरेचर. आधी दोन्ही जादुई वास्तववाद आणि ब्लॅक... काळे निग्रो. लोकांच्या अपमानाच्या विरोधात घुमलेली आरोळी. जागतिक कथेच्या शिलेदारांच्या रूपानं आपल्या समोर अनेक नावं येतात. चेखव, पुश्किन, गोर्की, ओ हेन्री, लू-सून, मोपासां, चार्ल्स डिकन्स, मिलान कुंदेरा, हेमिंग्वे इत्यादी. आपल्या इथले प्रेमचंद, शरच्चंद्र, सतीनाथ, मंटो आणि इतर भाषेतील कथाकार वरील कथाकारांच्या तुलनेनं कमी नव्हते, पण जागतिक कथेत आपलं नाव कुणी घेत नाही. ज्यांच्या कथांचे इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये अनुवाद झाले असेच कथाकार व त्यांच्या कथा समोर येऊ शकल्या. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, वरील जागतिक कथाकाराच्या शिलेदारांच्या कथासंग्रहांची पुढची संस्करणं कुठं आहेत?

इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या उदयानंतर कथेचा स्पेस आणखीनच कमी झाला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा इत्यादी देशांमध्ये कथा आपल्या मूळ रूपापासून खूप दुरावली तिथं कथा मनोरंजनाचं एक माध्यम झाली. ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचरमध्ये कथाही साहित्याच्या सूचीत येत नाही. हिंदी कथेच्या कुरुक्षेत्रात सातत्यानं युद्ध होत राहिलं. प्रारंभिक कथा, प्रेमचंदयुगीन कथा, प्रगतिशील, समांतर, ‘अकहानी’, ‘नई कहानी’, आठवं, नववं, दहावं या दशकांची कथा ‘नई कहानी’मध्ये ‘राकरा’ (राजेंद्र यादव, कमलेश्वर, मोहन राकेश) यांनी इतर कुणालाच कथाकार मानलं नाही, किंवा रेणू, मन्नू भंडारी, निर्मल वर्मा, शेखर जोशी, शैलेश मटियानी, अमरकांत ही नावंही कमी महत्त्वाची नव्हती. ‘राकरा’ यांचीही आपसात तलवारबाजी व्हायची. प्रचाराच्या दृष्टीनं म्हणायचं तर कथा आता सगळ्या ठिकाणांहून बहिष्कृत झाली आहे. वर्तानपत्रांच्या रविवारच्या पुरवण्यांमधूनसुद्धा. हे चित्र आशादायक नाही. मल्याळम्‌ची लोकप्रिय मासिकं ‘मंगलम’ आणि ‘मनोरमा’ यांनीही कथा प्रकाशित करणं बंद केलं आहे. ‘इंडिया टुडे’(हिंदी)मध्येसुद्धा आता कथा येत नाहीत.

जगण्याचं वरवरचं चित्रण करणाऱ्या कथा आता दिवाळी, नवरात्र, यांसारख्या मोक्यांवर प्रकाशित होतात. आता अशा दीर्घ कथा पाहिजेत, ज्यांना धारावाहिकांमध्ये कन्व्हर्ट करता येईल. हिंदीत सध्या ‘हंस’, ‘कथादेश’, ‘परिकथा’, ‘ज्ञानोदय’, ‘तद्‌भव’, ‘वसुधा’ यांसारखी महत्त्वाची मासिकं आहेत. आपल्या देशातील सर्व भाषा आणि बोलींमधून प्रकाशित झालेल्या कथा साहित्याच्या समृद्धीची माहिती उपलब्ध करणं शक्य नाही तरी अनुवादाच्या माध्यमातून माझ्या असं लक्षात आलं आहे की, सगळ्या भाषांमधलं साहित्य स्थानीय परिवर्तन अंकित करत आहे. मला विजयन्‌ यांच्यानंतरचं मल्याळम, उडिया, कन्नड, आसामी, गुजराती भाषांतील कथा साहित्य श्रेष्ठ दर्जाचं वाटतं. मराठी, बंगाली आणि उर्दू पिछाडीवर आहे, सुबोध सरकार आणि मराठीच्या काही विद्वानांचं मत असंच आहे. तमिळ आणि पंजाबी स्थिर आहेत. संथाली भाषेत आता 5000 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, पण काही अपवाद सोडल्यास क्वांटिटीच्या तुलनेनं क्वालिटी नाहीये. स्त्रीवाद स्थिर आहे. दलित साहित्य संदर्भात मला मराठी व गुजरातीची प्रगती उत्साहवर्धक वाटते. या मानानं बंगालीमधील दलित लेखनाची स्थिती शोचनीय आहे. हिंदी दलित लेखन थोडं सुस्तावलेलं, असमान, असंतुलित, घाई- गडबडीचं, अति महत्त्वाकांक्षी असं आहे. विखुरलेलं हे दलित लेखन प्रेमचंद यांनाच खारिज करण्यावर टपून बसलंय.

साहित्यात फक्त तीन अटी आहेत. पहिली- उदात्तता, दुसरी- दृष्टी, तिसरी- परकाया प्रवेश. स्त्रियांनीच स्त्रियांवर लिहावं आणि दलितांनीच दलितांवर लिहावं या मताचा मी नाही. जर तुमच्यात परकाया प्रवेश करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. स्वत:च्या कथेचीसुद्धा ओळख होणार नाही.

0

 बाजार आणि प्रचाराच्या या युगात नोबेल, बुकर या पुरस्कारांचं महत्त्व आहे, पण इथं तुमच्या भाषेच्या श्रेष्ठतेची किंवा गुणवत्तेची नव्हे तर तुमच्या साहित्याच्या सुंदर इंग्रजी अनुवादाची आवश्यकता आहे. त्यांचं साहित्य आपल्यापेक्षा निम्नस्तरीय असूनदेखील पुरस्कृत होतं. इतकंच नव्हे तर इंग्रजी भाषेचा बाजार त्यांना चांगला पैसादेखील मिळवून देतो. आपल्या इथं क्रिकेट खेळाडू, फालतू सिनेस्टार यांच्या तुलनेनं आपण दुय्यम, तिय्यम दर्जाचे नागरिक आहोत. आपण जागतिक लोकसंख्येच्या 1/6 आहोत. चोवीस भाषा आणि पन्नासभर बोलींमधून आलेलं आपलं वाङ्‌मय अनेकांपेक्षा सरस आहे. आपला स्वत:चाच आंतरिक बाजार खूप मोठा आहे. श्रेष्ठ अनुवादांच्या माध्यमातून आपण आपल्या परस्पर भाषांची कपाटं तरी उघडू! साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, एन.बी.टी., बिर्ला फाऊंडेशनसारख्या अजून काही संस्था उभ्या राहोत! आपली उपेक्षा करणाऱ्यांकडं आपण अपेक्षेनं का बघावं? ‘‘खुद ही को कर बुलंद इतना, कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है।’’

अनुवाद : बलवंत जेऊरकर, सांगली

Tags: बलवंत जेऊरकर कथाकार हंस मासिक हिंदी कथा कथा कशी लिहावी संजीव हिंदी कथेच्या कुरुक्षेत्रात सातत्याने युद्ध होत राहिले.... भाषण kathakar huns mashik hindi katha katha kasha lihavi sanjiv hindi kathechya kurushetrat satattyane yudh hot rahile Bhashan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संजीव.

ज्येष्ठ हिंदी कथाकार, प्रेमचंद यांनी स्थापन केलेल्या हंसया मासिकाचे कार्यकारी संपादक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके