डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘गांधींजींच्या सहवासात अपूर्व आनंद मिळतोय आणि मी माय-बापूची लाडकी लेक आहे.’ असं मनूने लिहून ठेवलंय. सन 1944 मध्ये 42 च्या चळवळीत बा, बापू दोघेही आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध असताना मनूला खास बांची सेवा करायला आणले गेले. बांची तब्येत फारशी चांगली राहत नव्हती. त्यांची वेणीफणी करणे, डोक्याला तेल लावून मालिश करणे, स्नान घालणे, पाय चेपून देणे, त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे काही तयार करणे- अशी कामे मनू आनंदाने नि तत्परतेने करत असे. बांची तब्येत बिघडतच गेली आणि त्या गेल्या. त्यानंतर मनूही भावनगरच्या तिच्या गावी निघून गेली. त्यानंतरच्या काळात देशात हलकल्लोळ माजला. नौखालीत भीषण स्थिती निर्माण झाली होती. गांधींनी जयसुखलालना ‘मनूची जागा आता माझ्याजवळ आहे, तिला पाठव’ असे कळवले. मनूच्या आयुष्यात नवे वादळ येऊ पाहत होते.

गांधींची 14 वर्षांची नात मनू (मृदुला) कस्तुरबांना सोबत आणि सेवा करायला आश्रमात दाखल झाली, पण येताच गांधीजींना पुण्याला स्थानबद्ध केले गेले. कोवळ्या वयातली ही पोर तशी अल्पशिक्षितच होती. थोडंफार गुजराती लिहिता-वाचता येत होतं. पण तिच्यात प्रचंड ऊर्जा होती. आश्रमातल्या काहीशा कंटाळवाण्या दिनक्रमात तिला कोंडल्यासारखं होत असणार. तिला काय ठाऊक की, नियतीने तिच्यासमोर काय वाढून ठेवलंय- चांगलं की वाईट? कुठल्या ऐतिहासिक घटनांची ती साक्षीदार होणार आहे? गांधीजींच्या सांगण्यावरूनच त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत ती सावलीगत त्यांची सोबत करणार आहे. गांधीजी तिच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणार आहेत. प्रचंड खळबळजनक, त्रासदायक पर्वात एकट्या पडलेल्या गांधीजींना मनूचा आधार वाटत होता! देशाला रक्तरंजित, वेदनादायक स्वातंत्र्य मिळालं. हिंसाचाराला ऊत आला होता. हिंदू-मुस्लिम द्वेषाने कहर चालवला होता. गांधीजी अत्यंत दु:खी होते. या दोन संप्रदायांत सौहार्द निर्माण व्हावं म्हणून 78 वर्षांच्या जन्मभराच्या कठोर जीवनक्रमाने, उपवास-प्रवास नि संवाद यांनी त्यांची कुडी थकली होती. पैलतीर दिसू लागला होता. निराशा ग्रासत होती. अशा वेळी मनू त्यांना आपुलकीचे मलम हळुवारपणे लावत होती. आई वा आजीसारखी त्यांची समजूत काढत होती. 

रत्नाकर मतकरींच्या ‘गांधी - अंतिम पर्व’ या नाटकात मनूचे पात्र अत्यंत प्रौढपणे गांधींच्या सर्वांत अवघड काळात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेते. त्यांची समजूत काढताना दिसते. तिची तब्येत दगदगीने आणि थंडीने थोडी नरम-गरम असते. गांधी रामनामाचा जप करतात. डॉक्टर ऑपरेशनचा सल्ला देतात, तेव्हा आपल्या रामनामाचे सामर्थ्य कमी पडले म्हणून स्वत:लाच दोष देतात. ती बरी व्हावी म्हणून म्हणतात, ‘देवा, माझे उरलेले आयुष्य मनूला दे.’ नेहमीच्या लेखाहून हा लेख वेगळ्या पद्धतीनं लिहितेय, कारण हे नातेच वेगळ्या दिशेने गेलेलं आहे. मनूने गांधींबरोबर जो काळ व्यतीत केला, त्या काळातील अक्षरश: प्रत्येक क्षणाची नोंद तिने केली आहे. मूळ गुजरातीतील हे लेखन दोन पुस्तकांत प्रसिद्ध झाले आहे- ‘डायरी ऑफ मनू गांधी.’  

गांधीजींना आपली आई असे मनू म्हणत असे. आईसारखी माया ते तिच्यावर करीत असत. ती कस्तुरबांना मदत करायला तिच्या आईच्या मृत्यूनंतर आश्रमात आली. त्यानंतरच्या काळात बापूंनी तिची काळजी आपल्या लेकीसारखी घेतली. तिची प्रकृती, अभ्यास, तिचे डाएट... प्रत्येक गोष्टीवर त्यांचे लक्ष असे. त्यांनी तिला इंग्लिश, भूमिती शिकवली. अनेक विषयांचे धार्मिक ग्रंथांचे- विशेषत: रामायण आणि गीता यांचे- पठण करायला लावले. काही काळ ती रामायणाचा पाठ कस्तुरबांकरता नियमितपणे करायची. त्यांची अकरा व्रते ती निश्चयाने आचरत असे. सत्य, अहिंसा या तत्त्वांसाठी पूर्णता यावी याकरता गांधींचे मन सतत झगडत असे. आपण अगदी विशुद्ध होऊन जावे, ही त्यांची अखेरच्या काळात आस होती. आपण पवित्र नि शुद्ध झालो, तर आपल्याला परमेश्वराचे दर्शन होईल, ह्याची त्यांना खात्री होती. 

ते मनूला बोलले होते, ‘‘मी अंथरुणावर पडून खितपत राहत मेलो; तर तू समज नि सर्वांना सांग की, हा माणूस ढोंगी होता, खोटा होता. तसे तू केले नाहीस, तर मी जिथे असेन तिथे खूप दु:खी होईन... पण जर मी शहीद झालो तर मात्र मला देवाने आपले मानले, असे समज. तू त्या क्षणांची साक्षीदार असशील.’’ एखाद्याला पूर्वसूचना यावी नि साक्षात्कारी बोलावे, तसे हे झाले. त्या अस्वस्थ काळाचा प्रत्येक क्षण मनूने डायरीत टिपून ठेवला आहे. गांधीजींच्या आणि देशाच्या दृष्टीने 1943 ते 1948 हा काळ कसोटीचा, दु:खाने-वेदनेने भरलेला होता. प्रत्येक दिवसाची, त्यातील घटनांची बारकाईने, मिनिटा-मिनिटाची नोंद मनूने केली आहे. नौखालीसारख्या ठिकाणी रक्तपाताने हिंदू-मुस्लिमांत जबरदस्त द्वेष नि तेढ निर्माण झाली होती. खून, बलात्कार, लुटालूट यांनी सामान्यांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले होते. गांधींसाठी हा काळ त्यांच्या तत्त्वांची परीक्षा घेणारा होता. 

मनूला ते सांगत होते, ‘‘मनू, माझ्या सत्याच्या शोधाचा कस लागतोय. ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा ह्यात सामर्थ्य आहे. मी सध्या अतिबिकट संकटांनी घेरलेलो आहे. असत्य नि मानवी गुणांच्या विध्वंसाचा हा काळ आहे. माझ्या सर्व जीवननिष्ठा आता पणाला लागल्या आहेत. निदिध्यासाने मी सत्याच्या मागे लागूनदेखील सत्य काय नि कुठेय याचा थांग मला लागत नाहीये. पण एवढं निश्चित की, सत्य नि परमेश्वर यांच्या निकट पोहोचलो आहे. ब्रह्मचर्याचा यज्ञ मी चालवला आहे. त्याचा परिणाम म्हणून मला शुचिता आणि सत्याचे दर्शन नक्की झाले आहे. माझ्या मनाच्या शुद्धतेप्रमाणे तुझ्या चित्ताची शुद्धताही या साऱ्याला कारणीभूत आहे.’’ 

आपल्या देशात ब्रह्मचर्य हे फार मोठे तत्त्व मानले जाते. मोठमोठे संत नि योगी यांनी याबाबत अनुभव लिहिलेत. रामकृष्ण परमहंस, राजचंदभाई आणि इतरांनी याचे महत्त्व मांडले आहे. आपल्या परंपरेत योगी आणि ब्रह्मचर्य यांचे साहचर्य ठसवले गेले आहे. त्यात या काम-मोहापासून दूर राहणारे काही जण स्त्रीपासून दूर राहत, तर काही स्त्रीचा द्वेष करीत, तिचे दर्शनही निषिद्ध मानत. पण गांधीजी मात्र स्त्रीचे योगिक आणि चारित्र्यविषयक सामर्थ्य जाणून, तिचा सन्मान करून तिला ह्या योगिक वाटेवरची सहयात्री समजत. म्हणूनच आपले सत्त्व ते पडताळून पाहत असत. त्यांना खात्री होती की, त्यांचे पावित्र्य आणि मनूचे पावित्र्य यांचा परिणाम इतरांची पापे धुवायला, शमायला कारणीभूत होणार आहे. गीतेतील आत्मदर्शनाने हे मोह, लोभ, काम, क्रोध जाऊन इंद्रिये ताब्यात येतात, हा मंत्र त्यांना पटला होता. गांधींच्या विचारातला हा भाग समजून घ्यायला अवघड आहे, अशक्य नाही. 

याबरोबरच त्यांचा रामनामावर असलेला भरवसाही पचायला तितकाच कठीण आहे. याबाबत तुम्ही इतरांशी चर्चा का करत नाही, असे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी विचारले असता ते म्हणत असत, ‘‘जर माझ्या प्रयोगांबद्दल मी इतरांशी सल्लामसलत करत बसलो, तर कुठलेच प्रयोग करता येणार नाहीत.’’ तसे त्यांचे एक बरे होते की, एखादी गोष्ट बरोबर नाही, अशी शंका येताच ते तसे कबूल करून ती मागेही घेत असत. मनूच्या अपेंडिसायटिसच्या ऑपरेशनबद्दलही झाले. रामनामाने ते टळत नाही, हे ध्यानी आल्यावर स्वत:च्याच चित्तात पूर्णत: रामनाम एकजीव झालेले नाही, असे त्यांना जाणवले. मनूच्या मनाच्या पावित्र्याची त्यांना खात्री होती. ऑपरेशनच्या संपूर्ण काळात ते मास्क लावून तिच्या उशाशी उभे होते. घरी आल्यावर तिच्या वडलांना- जयसुखलाल (गांधींचे चुलत पुतणे) यांना त्यांनी लिहिले की, आता माझा अहं मंदावला आहे. देव माणसाला त्याच्या अहंपासून असा दूर करतो. मला कळत नाही की, तो मला काय नवा धडा देणार आहे? आपली तपश्चर्या अपुरी आहे, याची जाणीव त्यांना होत होती. 

‘गांधींजींच्या सहवासात अपूर्व आनंद मिळतोय आणि मी माय-बापूची लाडकी लेक आहे.’ असं मनूने लिहून ठेवलंय. सन 1944 मध्ये 42 च्या चळवळीत बा, बापू दोघेही आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध असताना मनूला खास बांची सेवा करायला आणले गेले. बांची तब्येत फारशी चांगली राहत नव्हती. त्यांची वेणीफणी करणे, डोक्याला तेल लावून मालिश करणे, स्नान घालणे, पाय चेपून देणे, त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे काही तयार करणे- अशी कामे मनू आनंदाने नि तत्परतेने करत असे. बांची तब्येत बिघडतच गेली आणि त्या गेल्या. त्यानंतर मनूही भावनगरच्या तिच्या गावी निघून गेली. 

त्यानंतरच्या काळात देशात हलकल्लोळ माजला. नौखालीत भीषण स्थिती निर्माण झाली होती. गांधींनी जयसुखलालना ‘मनूची जागा आता माझ्याजवळ आहे, तिला पाठव’ असे कळवले. मनूच्या आयुष्यात नवे वादळ येऊ पाहत होते. जी व्यक्ती साऱ्या देशाच्या केंद्रस्थानी होती, अहिंसेच्या-असहकाराच्या मार्गाने ब्रिटिशांना नामोहरम करणारी होती- अशा शक्तिशाली व्यक्तीच्या सहवासात ती स्वातंत्र्याची पहाट पाहणार होती. ती धास्तावून गेली असेल. वय होतं अवघं 18-19. सार्वजनिक जीवनात भाग घ्यायचा अनुभव शून्य. जे काही सभोवती घडताना दिसत होते ते डोळे दिपवणारे, क्वचित मन थिजवणारे नि थक्क होऊन पाहत राहावे असे होते. ती त्यांच्याबरोबर बिहार, त्रिपुरात फिरली. दिल्लीला गेली. कानांवर येणाऱ्या बातम्यांनी हा वृद्ध, निश्चयाचा महामेरू गहिवरताना दिसत होता अन्‌ ह्या पोरीसमोर आपलं दु:ख मांडत होता. ती त्यांना धीर देत होती. या दृष्याची आपण कल्पना करू शकत नाही. 

देशाच्या इतर दिग्गज नेत्यांनी गांधींना दिल्लीला बोलावलं. भंगी कॉलनीत बापू उतरले. लोकांची रीघ लागली. मनू डोळे विस्फारून राजेंद्रप्रसाद, पटेल, नेहरू यांसह अनेकांना बापूंसमोर नतमस्तक होताना पाहत होती. काँग्रेसची बैठक 30 मे रोजी भंगी कॉलनीत फाळणीच्या विषयावर चर्चा करायला भरली होती. बॅ.जीना आपल्या मागणीवर ठाम होते. राष्ट्रीय नेते संभ्रमात होते. या फाळणीने आपल्या जन्मभराच्या विचाराचे हनन होताना पाहून बापू खिन्न झाले होते. ब्रिटिशांना आपला देश तोडायचा हक्क नाही, आपण एक होऊन याचा निषेध केला पाहिजे... कुठल्याही स्थितीत हे होऊ देता कामा नये, असे त्यांनी पोटतिडीकीने सांगितले. पण नियतीचे फासे उलटेच पडत होते. सगळं रान पेटलं असताना हा आवाज कुणाला ऐकू जाणार होता? 

त्या दिवशीच्या डायरीत मनू लिहिते- ‘राजेंद्रप्रसाद बोलले. गांधीजी आपल्या मतावर ठाम होते. जसजसे दिवस जात होते तसं हे ध्यानी येत होतं की, गांधींचे काम अवघड  होत जाणार आहे. ते एकाकी पडत चालले आहेत, असं दिसतंय. कार्यकारिणीला वाटतंय की, फाळणी झाली की सारं काही शमेल नि सुरळीत होईल. बापूंना वाटतंय की रक्तपात होईल, पाकिस्तानातील हिंदूंच्या जीविताला धोका पोहोचेल. ते सारे इथे येतील, मग इथल्या शांततेला इजा पोहोचेल.’ मनूच्या दोन डायऱ्यातील एक आहे 1942-44 ची नि दुसरी त्यानंतरची 1948 पर्यंतची. 

तिच्या डायरीतील काही पानं बापूंच्या अश्रूंनी ओली झालेली आहेत. एके दिवशी नेहमीपेक्षा लवकरच उठून बापू अंथरुणात बसतात. मनूलाही उठवतात. ‘‘मनू, स्वातंत्र्याची पावलं उलटी पडताहेत, असं वाटतंय. परिणामांचे गांभीर्य आज कदाचित आपल्या लक्षात येत नाहीय; पण स्वतंत्र भारताचे भविष्य चांगलं आहे, असं मला वाटत नाही. हे सगळं पाहण्यासाठी मला जिवंत ठेवू नकोस, अशी प्रार्थना मी देवाकडे करतोय. खानसाहेबांचे (खान अब्दुल गफारखान) हाल माझ्याच्याने पाहवत नाहीत. काय भयानक आहे त्यांची मानसिक स्थिती आहे... किती दु:खी झालेत ते! मी काय त्यांच्यासमोर बसून रडू? असं रडणं म्हणजे भेकडपणा झाला. पठाण असूनसुद्धा खानसाहेब मनाने इतके हळवे झाले आहेत की (माझे अश्रू पाहून), ते मोडून जातील. कधी कधी असं वाटतं की, ह्या सगळ्यांचं बरोबर असेल अन्‌ माझंच कदाचित चुकत असेल. हिंदुस्थानच्या फाळणीला माझीही साथ होती, असे येणाऱ्या पिढ्यांनी म्हणू नये. स्वराज्यासाठी सगळेच अधीर झाले आहेत, त्याला काय करणार? म्हणतात ना- लग्नाचे लाडू खाल्ले तरी पस्तवाल आणि न खाल्ले तरी पस्तवाल- अशी स्थिती आहे.’’ 

या घटनेनंतर दोनच दिवसांनी मनूशी ह्याच विषयावर बापू बोलले, ‘‘माझ्या विचारांना घेऊन मी एकटाच उभा आहे. फाळणीमुळे देशाचं पुढे नुकसान होणार आहे. असंख्य वर्षांच्या गुलामीनंतर आपली सुटका होतेय, हे खरं; पण आजची स्थिती पाहता, हे स्वातंत्र्य दीडशे वर्षे टिकेल असे वाटत नाही.’’ त्यानंतरही ते सारखं म्हणत, ‘आता फार काळ जगेन, असे मला वाटत नाही.’ मनू लिहिते की- बापूंना इतके दु:खी, हताश मी कधी पाहिले नव्हते. फाळणीच्या वेळच्या रक्तपाताने नि दंगलीने ते खिन्न झाले होते. आपले कुणी ऐकत नाही, आपणच कमी पडलो- अशी हताशा ते बोलून दाखवत. आपलं नेतृत्व कमी पडलं, असे त्यांना वाटे. ते अत्यंत कृश आणि थकलेले दिसू लागले होते. तरी लोकांसमोर गेल्यावर ते बोलत असत. 

मनूने नोंदवलंय- ‘आपल्या लोकांना अहिंसेचे शिवधनुष्य पेलवले नाही, ही आपल्या नेतृत्वातील कमतरता होती. ब्रिटिशांच्या विरोधात टिकून राहिलो अहिंसेमुळेच, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजच्या दंग्याच्या काळातही अहिंसाच आम्हाला उपयोगी पडणार आहे; परंतु हे लोकांच्या गळी कसं उतरवायचं, तेच समजत नाही. ब्रिटिशांशी सशस्त्र लढायची आपली ताकद नव्हती म्हणून लोकांनी मला साथ दिली; असं असेल तर ती दुर्बलाची अहिंसा होती, आज वीरोचित अहिंसा हवीय.’ 

एकदा फाळणीचा हाहाकार संपला नि गांधी पुन्हा जोमाने कामाला लागले. मनू लिहिते, ‘त्यांनी लोकांशी पत्रव्यवहार करून त्यांना स्पष्ट कळवलं- स्वातंत्र्याची किंमत सतत देत राहावी लागते. स्वतंत्र ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला नीटसा ठाऊक नाही. स्वतंत्र झाल्याबरोबरच आपण स्वछंद होत चाललो आहोत. एकसारखा संप करायचा, शिक्षकांचा अपमान करायचा, वाटलं तर शिकायचं- नाही तर नाही... असंच चाललंय ना? आत्मसंयमाशिवाय स्वातंत्र्य टिकवणं कठीण आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी मारामाऱ्या सुरू आहेत, हे आपलं केवढं दुर्दैव!’ 

हे सारं मनू गांधीमुळे आपल्यापर्यंत आलं आहे. तिच्या या नितळ पुस्तकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिने गुजरातीतून लिहिलेल्या डायऱ्या डॉ.त्रिदीप सुहृद यांनी शब्दश: अनुवादित केल्या आहेत. त्यातून ह्या तरुण स्त्रीचे कौशल्य नि गांधींच्या जीवनातलं अभिन्न स्थान लक्षात येतं. ती त्यांना कसा आधार देत असेल! तिच्याबद्दलचा स्नेह त्यांच्या वागण्यातून आपण समजू शकतो. 

गांधीजींच्या जाण्यानंतर तिचं अस्तित्व कुठेच नोंदलं गेलेलं नाही. इतकंच कळतं की, ती आपल्या लहानशा गावी परत गेली नि तिथे गेल्यावर स्त्रियांना शिकवणे, अस्पृश्यतेबद्दल सजगता निर्माण करणे, स्त्रियांना स्वयंपूर्ण कसं करता येईल याबद्दल काम करणे- अशी कामं करत राजकारण, दिखाऊ समाजकारण यांपासून दूर राहत एक शांत जीवन जगून वयाच्या 48 व्या वर्षी निधन पावली. सारं आयुष्य म्हणजे पायतळी अंगार असंच व्यतीत झालं, पण संपूर्ण समाधानाची ती धनी होती... बापूंची लाडकी मनुडी!! 

Tags: महात्मा गांधी मनू गांधी संजीवनी खेर मनुज् डायरी Manu Gandhi sanjivani kher Mahatma Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके