डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मेरी बार ही मनाने, निश्चयाने पक्की होती. तिला गांधींचे विचार पटलेले होते. लाखोंना कवेत घेणाऱ्या या विचारांनी तीही भारावली होती. त्या काळात गांधींना त्यांच्या सामाजिक कामात झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज होती. मेरी बार हिला गांधींच्या खेड्यातील कामाचे आकर्षण वाटत होते. ते आपण करू शकू याची तिला खात्री होती. पण त्याआधी तिने इथली भाषा, लोकांची राहणी, त्यांच्या प्रश्नांची नीट माहिती करून घ्यावी, असे गांधींनी सुचवले. फिरायला जाताना त्यांनी अस्पृश्यांच्या वस्तीत जावे, त्यांची भाषा शिकून घ्यावी, त्यांच्याशी जवळीक साधावी, केवळ वरवरचे काम नको किंवा ‘आपण त्यांचे भले करायला आलोत’ असा आविर्भावही नसावा. हे सारे जमण्यासाठी तिने काही काळ साबरमती आश्रमात वस्ती केली.  

मिशनरी कामानिमित्ताने मेरी बार ही महिला 10 वर्षांहून अधिक काळ भारतात राहत होती. हैदराबादहूनही दूर करीमगंज इथे डोंगराळ भागात ती शांतपणे आपले निहित काम करीत होती. वर्तमानपत्रं तसंही तिच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. ब्रिटिश साम्राज्यात सारं आलबेल आहे, अशा दृढ समजुतीत एक प्रकारे निरागस आयुष्य ती जगत होती. जगभर ज्या नावाची चर्चा सुरू होती, त्याबद्दल कधीमधी तिच्या कानी येई. एक वाट चुकलेला माणूस- असाच तिचा त्याच्याबद्दल समज होता. ब्रिटिशांच्या न्यायी राज्यकारभाराविरुद्ध बंड करणारा नि लोकांना भडकवणारा माणूस असंच चित्र तिच्या डोळ्यांसमोर होतं. त्याला फारसं महत्त्व द्यावं, असं तिला वाटत नव्हतं. पण असं म्हणतात की, योगायोग माणसाचं जीवन बदलून टाकतात, तसेच काहीसे झाले. गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेहून ज्या बोटीने परत भारतात येत होते, त्याच बोटीवर मेरी बार होती. 

तिसऱ्या वर्गातील प्रवाशांची उस्तवार करण्यात बोटीच्या कप्तानाला मोठेपण का वाटत होतं, कुणास ठाऊक! त्याने त्या सर्वांची जेवणाची व्यवस्था डेकवर न करता प्रशस्त हॉलमध्ये केली. इतर प्रवाशांना गैरसोईचं न ठरता हे होऊ शकलं होतं. पण त्या लोकांच्या नेत्याने हे नाकारले. ‘‘आम्ही तिसऱ्या वर्गाचे प्रवासी आहोत, आम्ही डेकवरच भोजन करू,’’ हे त्याचे बोलणे ऐकून तिला कुतूहल वाटलं. तिने डोकावून पाहिलं, तर डेकवरच्या प्रवाशांत सतत हास्यविनोद चाललेला असे. हे अधिकच विस्मयकारक होतं. गंभीर विषयावर चर्चा चाललेली असेल, असे तिला वाटले होते. 

हा काळ सन 1931 चा होता. मुंबईत तिच्या अपेक्षेप्रमाणे तिचे कुणी तिला घ्यायला आले नव्हते. तिची अडचण पाहून गांधी जिथे उतरणार होते, तिथे यायला तिला सुचवले गेले. साऱ्या प्रवासाचा शीण विसरून गांधींचे लक्ष या अनोळखी पाहुणीकडे गेले नि तिची सर्व काळजी घेण्याचं त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं. इतकी वर्षे भारतात राहूनही ती कधी जमिनीवर मांडी घालून बसून जेवली नव्हती, तो अनुभव तिने मणिभवनमध्ये घेतला. तिथले दाट झाडीचे घर, साधे वातावरण तिला खूप मन:शांती देणारे वाटले. मुळात सात्त्विक विचारांचे आकर्षण असलेली मेरी बार मग गांधींच्या विचारांनी प्रभावित झाली. कामावर रुजू व्हायला जरा वेळ होता म्हणून साबरमतीला जायचे ठरवले. तिथले जीवन आणि विचाराप्रति असलेली निष्ठा तिला तिथे परत यायला साद घालू लागली. 

पण... ती हैदराबादला पोहोचली आणि मिशनकडून तिला तंबी देणारा मेसेज मिळाला. ‘खबरदार, भारतातल्या कुण्या राजकीय कार्यकर्त्याशी काही संबंध ठेवलेस तर! तुझी रवानगी तातडीने इंग्लंडला केली जाईल.’ तिने गांधींशी पत्रव्यवहार करायचं थांबवलं. तिच्या जागी कुणी नवी व्यक्ती यायला दोन-तीन महिने तरी सहज लागले असते. गांधींनी आपल्या विदेशी सहकाऱ्यांना ब्रिटिश सत्ताधाऱ्यांकडून त्रास होऊ नये, म्हणून सुरुवातीपासूनच त्यांना राजकीय चळवळी वा तत्संबंधी सभा-संमेलने यांपासून दूर ठेवले होते. ती ज्या काळात भारतात होती, त्याच सुमारास निल्ला नागिनी, मार्गारेट स्पीगल, ॲन मेरी पीटरसन, मी राबेन अशा अनेक स्त्रिया गांधीजींच्या कामाने भारावून जाऊन इथे येऊन दाखल झाल्या होत्या. त्यातील काहींना फक्त गांधींच्या सहवासाची भूक होती, त्या जागतिक महत्त्वाच्या व्यक्तीच्या निकट असण्याचे सुख हवे होते. पण गांधी मात्र आपले विचार नि आचारांबाबत पक्के होते. त्या स्त्रियांचे इथे येणे कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांवर दडपण येऊ शकत होतं. जगाच्या व्यासपीठावर त्यांच्या अनोख्या प्रयोगाची माहिती जात होती, जगाचं लक्ष वेधत होती. या विदेशी स्त्रियांना कामाला लावणे नि दूर ठेवणे हे कुशलतेचेच काम होते. त्यांचा हिरमोड न करता त्यांना विधायक कामाला जुंपणे, ही तारेवरची कसरत होती. 

मेरी बार ही मनाने, निश्चयाने पक्की होती. तिला गांधींचे विचार पटलेले होते. लाखोंना कवेत घेणाऱ्या या विचारांनी तीही भारावली होती. त्या काळात गांधींना त्यांच्या सामाजिक कामात झोकून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज होती. मेरी बार हिला गांधींच्या खेड्यातील कामाचे आकर्षण वाटत होते. ते आपण करू शकू याची तिला खात्री होती. पण त्याआधी तिने इथली भाषा, लोकांची राहणी, त्यांच्या प्रश्नांची नीट माहिती करून घ्यावी, असे गांधींनी सुचवले. फिरायला जाताना त्यांनी अस्पृश्यांच्या वस्तीत जावे, त्यांची भाषा शिकून घ्यावी, त्यांच्याशी जवळीक साधावी, केवळ वरवरचे काम नको किंवा ‘आपण त्यांचे भले करायला आलोत’ असा आविर्भावही नसावा. हे सारे जमण्यासाठी तिने काही काळ साबरमती आश्रमात वस्ती केली. आजूबाजूचे जनजीवन पाहिले. गांधींशी पत्रव्यवहार करणे अवघडच होते. तेव्हा ते येरवडा जेलमध्ये होते. तिथे त्यांना भेटायला गेली, तेव्हा ती त्यांना प्रणाम करायला खाली वाकली; तर गांधींनी तिच्या खांद्यावर चापट मारली, तर तिनेही तितक्याच खेळकरपणे त्यांच्याही गुढघ्यावर चापट मारली! तिच्या ह्या सहज वागण्यानंतर ते दोघेही खळखळून हसले. गांधींनी तिला आपली कन्या म्हणून आपल्या विशाल परिवारात सामील करून घेतले. 

एकदा कन्या म्हटल्यावर त्यांनी तिला स्वत:च्या तब्येतीची नीट काळजी घेण्यास बजावले. तिच्या नाजूक पोटाला इथले पाणी न उकळता पिणे हानिकारक ठरत होते, हे जाणले. तिच्या आहाराची, पौष्टिक भोजनाची व्यवस्था कशी होईल, हे समजावले. काही लागलं तर त्यांनी काही डॉक्टरांची नावं सुचवली. तुम्ही म्हणाल, यात विशेष काय? पण एकदा आपलं म्हटल्यावर कामाच्या इतक्या प्रचंड व्यापातही एका विदेशी स्त्रीची इतकी काळजी घ्यायची, ही काही सोपी गोष्ट नाही. मेरीची मेरीबेन झाली, पण तिच्या बरोबरीच्या युरोपियन स्त्रियांना तिने असं ‘देशी’ होणं मुळीच पसंत नव्हतं. तिने वर्ध्याजवळच्या खेड्यात जाऊन काम करायचा निर्णय घेतला, पण तिला खेड्यात राहायला जागा मिळणं दुरापास्त झालं. ही ‘गांधीवाली गोरी’ इथं येऊन राहिली तर सरकारची मर्जी खप्पा होईल, म्हणून कुणी तिला थारा देत नव्हते. अखेर एका कुटुंबाने त्यांच्या घराच्या गोठ्याच्या वऱ्हांड्यात तिला आसरा दिला. नाही तरी यांना साधे राहायचे असते ना! 

तिची राहायची जागा पावसाळ्यामुळे खूपच ओलसर होती. डासांचे साम्राज्य सर्वत्र होते. बैतुलनजीकच्या खेडी सावलीघरमध्ये तिने राहायचे ठरवले. गांधींचे काम करायचे म्हणजे विनात्रासाचे कसे असेल? ही आपली परीक्षाच आहे. गांधींच्या निकट राहायचे ते त्यांचे मार्गदर्शन मिळावे, प्रेरणा मिळावी यासाठी. त्याच सुमारास गांधींची कैदेतून सुटका झालेली होती. ते वर्ध्याला आले होते. त्यांना भेटायला ती गेली, पण तिथे जाताच तिला ताप भरला. तिची सेवा करायला स्वत: गांधीजी पुढे आले. तिचा ताप हटत नव्हता. सर्वांचा कयास होता की, तिला टायफॉईड झाला आहे. पण डॉक्टरांच्या परीक्षणानंतर लक्षात आले की, मलेरिया आहे. गांधींनी तिला आहाराबद्दल नि पाण्याबद्दल अधिक काळजी घ्यायला सुचवलं. डंकन नामक मेरीच्या मैत्रिणीवर तिच्या शुश्रूषेची जबाबदारी टाकली. बरी होताच तिने खेडी या गावी अस्पृश्यता-निवारणाचं काम हाती घ्यायचा निश्चय केला. त्या आधी ती हैदराबादला जाऊन आपल्या तेथील सहकाऱ्यांशी बोलली. त्या वेळी गांधी आपल्या अस्पृश्यता-निवारण प्रयत्नाचा भाग म्हणून देशभर यात्रा करीत असताना हैदराबादेला आले. तेथील काही मिशनरीही हेच काम करीत होते नि अनेक अस्पृश्य ख्रिस्ती झाले होते. 

मिशनरींनी गांधींना या प्रश्नावरचा उपाय काय नि कसा अमलात आणायचा याबद्दल विचारता, गांधी म्हणाले, ‘‘आपण कुणी श्रेष्ठ, उच्चासनाधीश आहोत, हा भाव सोडून द्यावा लागेल. त्यांच्याबरोबर राहून त्यांचे रोजचे जगणे अनुभवावे लागेल. हे काम व्यासपीठावरून बोलण्याइतके साधे-सोपे नाही. हरिजनांचे दु:ख-अवहेलना समजल्या- खेरीज त्यांच्यासह, त्यांच्यासाठी काम करता येणार नाही.’’ असेच काम तिला करायचे होते, म्हणून मग तिने वयाच्या 40 व्या वर्षी खेडीला मुक्काम करून काम करायचे ठरवले. आठ वर्षे ती सतत तिथेच होती. वडिलांची शुश्रूषा करायला गेली असेल, तेवढंच काय ते. 

सन 1934 काळात तिने खेडीत काम सुरू केले, तेव्हा हैदराबादच्या बोर्डिंग शाळेतील आठ वर्षांची अनाथ मुलगी दत्तक घेतली होती. खेडीत राहताना तिने विणकामाचे एक केंद्र सुरू केले, ज्यामुळे तेथील लोकांना चार पैसे कमावता येऊ लागले. काही काळातच हे केंद्र चांगलेच यशस्वी झाले. त्याच वर्षी गांधीजींना भेटायला ते इंडियन काँग्रेसच्या सभेसाठी मुंबईला होते, तिथे ती गेली. त्या वेळी तिला खेडीगावाच्या लगत असलेल्या घनदाट जंगलातील गोंड लोकांनी मदतीसाठी बोलावले होते, म्हणून गांधींचा सल्ला विचारायला गेली. गांधी गमतीत म्हणाले, ‘‘एक दिवस गोंडांनी तुला पकडून तुझी खांडोळी केलेली माझ्या कानांवर येईल हं! जा, पण सांभाळून राहा. लोकांच्या चांगुलपणावर विश्वास ठेव.’’ अनेकांनी तिला तिथे न जाण्याचा सल्ला दिला होता. 

खेडीला परतल्यावर एक अनपेक्षित पाहुणी तिची वाट पाहत होती. कॅनडातील क्वॅकर पंथाची अत्यंत उच्च शिक्षित, स्कॉलर स्त्री मेरी चेल्सी तिच्याबरोबर काम करायचं म्हणून आपलं समृद्ध आयुष्य सोडून खेडीसारख्या भागात आली होती. पहिल्या महायुद्धात होरपळलेल्या लोकांसाठी तिने काम केले होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची सुवर्ण मेडलप्राप्त ही विदुषी. एका प्रथितयश जजची मुलगी. कमीत कमी पैशांत जगू पाहणारी, गरिबांचा कळवळा असणारी ही तडफदार स्त्री एका मैत्रिणीकडे भारतात आली होती. अल्पावधीतच इथल्या स्थितीचा अंदाज तिला येत गेला. इथे गरीब वस्तीत काही काम करावे, असा विचार तिने केला. गांधींबरोबर काम करावं, म्हणून मेरी बार गांधींच्या सांगण्यावरून दिल्लीत हरिजन प्रशिक्षण केंद्रात गेली. तिथे काम करणे नि खेडीला काम करणे, यात खूप फरक होता. गांधींच्या सहवासात राहून त्यांच्या प्रेरणेने काम करावे, अशी तिची मनीषा होती. पण लवकरच तिच्या लक्षात आले की, खेडीला काम करून जे समाधान मिळेल, ते इथे मिळणार नाही. गांधींनी न बोलता तिला हीच प्रेरणा दिली होती. मेरी चेल्सीलाही त्यांनी आधी देश, येथील हवा, वर्तमान स्थिती समजून घ्यायला सांगितले; पण तिला खात्री होती की, आपण कुठल्याही स्थितीशी सामना करू शकू. पण तो तिचा भ्रम होता. ती खूप आजारी पडली. सावरली, पण... 

तिला वाटत होते की, ते खेड्यातील लोक जशी घरं आपली आपणच बांधतात तसंच आपणही मेरी बारसाठी नि स्वत:साठी घर-झोपडं बांधू. मेरीला हे पटत नव्हतं. एखादा मजूर ठेवून हे काम सहज होण्यासारखं होतं. पण चेल्सी हट्टाला पेटली होती. मातीची घमेली अगोदर खड्डा करून तिथून वाहून आणायचं काम सोपं नव्हतं, तरी तिने वऱ्हांड्याचे काम तसेच पूर्ण केले. गांधींना ह्या शारीरिक श्रमाचे कोण कौतुक! त्यांनी या दोघींचे आपल्या वृत्तपत्रातून खूप कौतुक केले. त्यांना खेडुतांच्या चालूगिरीची कल्पना दिली. ‘तुम्ही कुणालाही फुकटात औषधं वगैरे देऊ नका, ते त्याचा गैरफायदा घेतील. अगदीच गरीब असतील, तर काही काम द्या वा घरगुती औषधं घ्यायला सांगा. साध्या सहज मिळणाऱ्या गोष्टींनी तब्येत सुधारायची माहिती द्या, सल्ला द्या. यादरम्यान आणखीन एक मेरी खेडीला येऊन दाखल झाली- मेरी इंगम. तिने शांताबेन हे नाव घेतलं. तिलाही भारतातील खेड्यात काम करायचे होते. मेरीकडून फारसं काम शिकायच्या अगोदरच मेरी बार आजारी पडली. खूप अशक्तही झाली. गांधींनी तिला मिरजेच्या इस्पितळात जायचा सल्ला दिला. तिथे डॉक्टरांनी दूध, फळं नि अंडी घ्यायला सांगितलं. आता प्रश्न होता. ती इथं आल्यापासून शाकाहारी झाली होती! आता तो नियम तिला मोडायचा नव्हता. गांधी काय म्हणतात हे पाहावं, म्हणून सल्ला घेतला. तर, डॉक्टरांनी जे सांगितलंय तेच करायचे. प्रकृती पूर्ववत्‌ होणं अत्यावश्यक होतं. अंड्याला पर्याय नाही का? उत्तर आलं अंड्याला पर्याय अंडंच आहे. (वडिलांच्या सेवेला मेरी गेली तेव्हा वडील मांसाहारी, ती शाकाहारी- हा भेद त्यांना डाचत होता. म्हणून मांसाहार करावा, असे तिला वाटले. गांधींनी तिला बिनशर्त परवानगी दिली. त्यामुळे जर बाप-लेकीतील अंतर मिटत असेल तर योग्यच आहे, असे त्यांचे म्हणणे होते.) 

मेरी चेल्सी(ताराबेन)ला पूर्णत: भारतीय विचार-आचार समजून घ्यायचे होते. म्हणून ती काही आश्रमवासीयांसह हिमालयात गेली. अर्धा रस्ता तर ठीक होती. नंतर तिला ते झेपेना, पण परतायला तयार नव्हती. आजाराने तिला गाठलं नि तिथेच ती वारली. आपली सारी इस्टेट तिने गांधींच्या कामाला देऊन टाकली. तिची कामावरची निष्ठा, श्रम करायची तयारी, गरिबांचा मनापासून कळवळा नि त्यांच्यासाठी जीवन वेचायची तयारी लक्षणीय होती. गांधीजींनीच मेरी बारला सारे कळवले नि आपल्या ‘हरिजन’मध्ये मेरी चेल्सीविषयी भरभरून लिहिले. 

आपल्याला आश्चर्य वाटेल की, मेरी बारच्या कामाने प्रेरित होऊन त्या काळात अनेक जणी खेडीला आल्या. त्यात पर्ल मेडन, मार्गारेट जोन्स अशा सुशिक्षित स्त्रियाही होत्या. काहींना मिशनरी पार्श्वभूमी होती. गरिबांची सेवा, त्यांचे जीवन सुखी होण्यासाठी-परिवर्तनासाठी चाललेले गांधीजींचे काम हे ख्रिस्ताचेच काम वाटत होते. मेरीला घरच्या ओढीने जेव्हा त्रस्त केले नि वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे जावंसं वाटलं, तेव्हा पर्ल मेडनने खेडीचा सारा भार सांभाळाला नि मेरी परतली, तेव्हा तिला खेडीचे काम अधिक शिस्तशीर नि फायदेशीर झालेले दिसले. मेरी आपल्या आई-वडिलांकडे गेली. तिथे तिने भारतातल्या कामासाठी पैसे गोळा करायला सुरुवात केली. त्यावर गांधीजींची सूचना होती की- तिने कामासाठी आवश्यक तेवढेच पैसे जमवावेत, त्यातून स्वत:चा उदरनिर्वाह होईल अशी तजवीज करू नये. स्वत: कमीत कमी गरजांतच काम करावे. परतल्यावर रवींद्रनाथ टागोरांना तेथील मुलींच्या वसतिगृहासाठी कुणी व्यवस्थापक हवी होती. गांधीजींनी तिला तिथे जायला सांगितले. तिथे काही काळ काम केले, पण घरच्या जबाबदाऱ्या तिला खचवत राहिल्या. 

वडिलांच्या मृत्यूनंतर मेरी बार भारतात परतली. आता गांधीजी नव्हते. तिने क्वेकर पंथ स्वीकारला होता. गांधीजींच्या अहिंसक राजकीय लढ्याचा वापर तिने द.आफ्रिकेत ती गेली असताना तेथील अन्यायाविरुद्ध कामात भाग घेताना केला. त्यात तुरुंगवासही भोगला. गांधीविचार तिच्या जन्मभराचा साथीदार राहिला. इतर अनेक स्त्री अनुयायांसारखी ती गांधीजींच्या अवतीभवती घोटाळण्यात स्वारस्य असणारी नव्हती. त्यांच्या अफाट कामाची तिला कल्पना होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या मोहजालापासून ती दूर राहूनच प्रेरणा मिळवत होती नि त्यांच्या कार्यालाच देव मानून पूजत होती. 

Tags: रवींद्रनाथ टागोर अहिंसा संजीवनी खेर मेरी बार गांधींचे गारुड गांधी kasturba gandhi and ladies sanjivani kher gandhi and merry bar gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके