डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सरोजिनींना अनेक भाषा अवगत होत्या. इंग्रजी, बंगाली, तेलुगू, गुजराती, हिंदी भाषेतून त्या अस्खलितपणे भाषणं करू शकत. आपल्या प्रभावी बोलण्यातून त्या स्त्री-पुरुषांना राष्ट्रकार्यासाठी उद्युक्त करीत. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे व्यासपीठ उपयुक्त ठरले. जवाहरलाल नेहरूंशी त्यांचे चांगले सूत जमले होते. दोघांचे विचार जुळत असत. दोघेही एकमेकांशी सल्लामसलत केल्याखेरीज राष्ट्रीय महत्वाचे निर्णय घेत नसत. काँग्रेसच्या अधिवेशनात आणि स्त्रियांच्या मेळाव्यात त्या आपल्या बिनतोड वक्तव्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत. इतिहासातील, साहित्यातील दाखले देत, नव्या कृति-शीलतेला प्रवृत्त करणारे विचार लोकांपर्यंत पोहोचवत असत.

एका अभिजन वातावरणात, समाजातील प्रसिद्धिच्या झोतात असलेले, साहित्यिक, संगीतकार, कलाकार, उदयोन्मुख राजकारणी ह्यांच्या मैफली सरोजिनींच्या घरी सदोदित चालत असत. त्यांच्यात  अर्थपूर्ण चर्चा  झडत असत. तिचे स्वत:चे बंगाली नि तिच्या पतीचे तेलुगू बुद्धिवादी अभिजन हे तिच्या घरी मेजवानीसाठी जमत असत. खाण्या-पिण्याची धमाल चाले. तिला स्वत:ला नाना प्रकारचे पदार्थ करायला आवडत. तिचं व्यक्तिमत्त्व, बोलणं  असं होतं की, येणारेही मंत्रमुग्ध होऊन गप्पांत सहभागी होत असत. जवाहरलाल नेहरू, महमद अली जीना, सुभाषचंद्र बोस यांसारखे  तरुण राजकारणी, बंगालमधील कवी, नाटककार, गायक अशी त्या वेळची  नामांकित मंडळी त्यांच्या घरच्या मैफलीत हजेरी लावत. सार्वजनिक ठिकाणी ती स्त्रियांच्या वा साहित्याच्या कुठल्या प्रश्नाविषयी बोलायला उभी राहिली की, ती सभा आपल्या कवेत क्षणार्धात  घेत असे. तिचे बोलणे मुद्देसूद नि तेजस्वी असे.काव्य हा तिचा हातखंडा विषय होता. त्यातून अत्यंत मधुर आवाजाची देणगी तिला लाभली होती.   

दि. 13 फेब्रु. 1879 रोजी  अघोरनाथ आणि वरदासुंदरी चट्टोपाध्यायच्या घरी  तिचा जन्म झाला. तिचे वडील हे हैदराबादमधील प्रथितयश व्यक्ती होते. अत्यंत विद्वान नि समाजाभिमुख काम करणारे म्हणून ते ओळखले जात. हे लोक मूळचे बंगालचे, पण हैदराबादच्या नबाबांच्या सांगण्यावरून तिथे कॉलेजच्या स्थापनेसाठी जाऊन स्थायिक झाले. त्यांच्या सहा अपत्यांपैकी ही अत्यंत कुशाग्र बुद्धिची कन्या.  हरींद्रनाथ हा तिचा एक भाऊ  देखील कवी, लेखक, अभिनेता म्हणून प्रसिद्ध होता. वयाच्या 12 व्या वर्षी सरोजिनी 12वीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. निजामांनी तिला 13 व्या वर्षी उच्च शिक्षणाकरिता इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. अगदी पौगंडावस्थेत असतानाच तिचा पहिला ‘गोल्डन थ्रेशहोल्ड’ हा कवितासंग्रह लंडनमध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर तिच्या ‘बर्ड ऑफ टाइम’ आणि ‘ब्रोकन विंग्ज’ या कवितासंग्रहांनी तिला काव्यप्रांतात सुप्रतिष्ठित केले. त्यांनी डॉ. गोविंदराज नायडू यांच्याशी 1898 मध्ये विवाह केला. हा जातिबाह्य विवाह तेव्हा समाजमान्य नव्हता, पण ब्राह्मो चट्टोपाध्यायांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर त्या चार मुलांच्या माता बनल्या. उत्तम गृहिणी आणि श्रेष्ठ स्वातंत्र्य-सेनानी अशा दोन्ही भूमिका त्यांनी अंगभूत चातुर्याने आणि निष्ठेने निभावल्या.

संवेदनशील व्यक्ती जर राजकीय नि सामाजिक स्थितीबद्दल जागरूक नसेल तर समाजात बदल करणे अशक्य असते. त्यांची गांधीजींशी भेट ते दोघे इंग्लंडला गोलमेज परिषदेला गेले असताना झाली आणि सरोजिनींचा जीवनाचा दृष्टिकोन बदलला. गांधींशी ही पहिली भेट मजेशीर होती. गांधीजी किंग्जले हॉलमध्ये होते. त्या भेटायला गेल्या, तेव्हा ते जमिनीवर बसून काही तरी खात होते. त्यांच्या थाळीतले कुस्करलेले बटाटे, दाण्याचा कूट, केळी नि कसलेसे फुळकावणी सूप पाहून सरोजिनीने नाक मुरडले.‘ ‘‘हे कसले खाणे?’’ त्यांचे वक्तव्य ऐकून गांधीजी म्हणाले. ‘‘ही उध्दट बाई सरोजिनीच असणार।’’ ती त्यांना ‘मिकी माऊस’ म्हणत असे, तर ते तिला कोकिळ म्हणत. त्या दोघांत एक निर्मळ-खेळकर नातं होतं, चेष्टा-मस्करी चालत असे. पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये  कैदेत असताना त्या कस्तुरबांना, गांधींना आणि इतरांना तऱ्हेतऱ्हेची सूप्स नि चविष्ट पदार्थ खिलवत असत.

आपले सारे आय़ुष्य देशासाठी समर्पित करायचा निर्णय  सरोजिनींनी घेतला. ह्या कामाची दीक्षा त्यांना गांधीजींच्या गुरूंनी-गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी- अगदी रोमँटिक पद्धतीने दिली होती, तीही लंडनमध्येच. तेव्हा गोपाळ कृष्ण गोखले इंग्लंडला आपल्या दोन कन्यांसह राहत होते. आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आहे तो पुणेरी पगडी, बंदगळा कोट घातलेले देखणे व्यक्तिमत्त्व म्हणून. पण इंग्लंडला ते साहजिकच ह्या वेषात राहत नव्हते. शर्ट-पँटमध्ये अगदी ब्रिटिशर दिसत. पत्नी नसल्याने उदास असत. सरोजिनी त्यांना भेटायला गेल्या की, अगदी प्रसन्न होत असत. त्या दिवसांत त्यांची प्रकृतीही साथ देत नव्हती. सरोजिनींचे उत्फुल्ल व्यक्तिमत्त्व, विनोदी हलके-फुलके बोलणे ऐकून त्यांचा मूड तत्काळ बदलत असे. म्हणत, ‘‘तुझ्यामुळे माझ्या दिवसात तजेला येतो, जगण्याची उमेद शतपट वाढते.’’ एकदा त्यांनी तिला त्यांच्या घराच्या गच्चीवर नेले आणि तारकांनी भरलेले आकाश दाखवत म्हणाले, ‘‘बघ, किती लोभस दृश्य आहे, ह्या दृश्याला साक्षी ठेवून तू तुझे आयुष्य देशाला अर्पण करायची शपथ घे.’’ ते दृश्य आणि ते शब्द सरोजिनी नायडू कधीही विसरल्या नाहीत. पुढे गांधीजींच्या विचारांनी त्या पछाडल्या गेल्या नि जन्मभर त्याच वाटेवर मार्गक्रमण करीत राहिल्या. पुढे सत्याग्रह, असहकार आंदोलनाचे आयोजन, सभेसाठी वक्ते ठरवण्यापर्यंतच्या गोष्टी त्या सहजतेने करू लागल्या. 

त्या काळात-लंडनमध्ये असताना- एक लहानशी घटना घडली. परिषदेच्या सभासद म्हणून सरोजिनी एका मोठ्या हॉटेलात राहत होत्या नि गांधी त्यांची शिष्या म्युरल लेस्टरच्या किंग्जले हॉलमध्ये. सरोजिनींना भेटायला गांधी हॉटेलवर गेले. दरवानाने त्यांना लिफ्टजवळ हटकले. त्यांनी भेटायचे कारण सांगितले, तरी तो त्यांना लिफ्टने जाऊ देईना. पण ऐकतील तर ते गांधी कसले़! त्याच्याशी वाद घालू लागले. त्यावर तो म्हणाला, ‘‘काय रे तू कोण? स्वत:ला काय गांधी समजतोस काय?’’ हसून गांधी मागे सरले, नि थेट जिन्याची वाट धरली. सरळ सरोजिनींच्या खोलीपाशी पोहोचले.

सरोजिनींना अनेक भाषा अवगत होत्या. इंग्रजी, बंगाली, तेलुगू, गुजराती, हिंदी भाषेतून त्या अस्खलितपणे भाषणं करू शकत. आपल्या प्रभावी बोलण्यातून त्या स्त्री-पुरुषांना राष्ट्रकार्यासाठी उद्युक्त करीत. त्यासाठी त्यांना काँग्रेसचे व्यासपीठ उपयुक्त ठरले. जवाहरलाल नेहरूंशी त्यांचे चांगले सूत जमले होते. दोघांचे विचार जुळत असत. दोघेही एकमेकांशी सल्लामसलत केल्याखेरीज राष्ट्रीय महत्वाचे निर्णय घेत नसत. काँग्रेसच्या अधिवेशनात आणि स्त्रियांच्या मेळाव्यात त्या आपल्या बिनतोड वक्तव्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत. इतिहासातील, साहित्यातील दाखले देत, नव्या कृति-शीलतेला प्रवृत्त करणारे विचार लोकांपर्यंत पोहोचवत असत. एकच उदाहरण देते. असे अनेक प्रसंग नि मुद्दे होते, ज्यात त्यांनी पुढाकार घेतला. जवाहरलाल नि त्यांचे कुटुंबीय यांच्याशी त्यांचे घट्ट स्नेहबंध होते. सतत चर्चा, बरोबर राहणं, योजना आखणं, एकमेकांच्या सहवासाने प्रेरणा घेत गांधीविचारांना कसे लोकांपर्यंत पोहोचवायचे ह्याची खलबतं करणं. 

ह्या मंडळींना 1919 मध्ये सर रौलट यांनी जारी केलेल्या नव्या दमनकारी कायद्याने हादरवून टाकले होते. त्या कायद्याने ब्रिटिश सरकारला अपरिमित अधिकार प्राप्त झाले होते. त्यांच्या अखत्यारीत सरकारच्या कथित विरोधातील घटनेतील व्यक्तींना विनाचौकशी कैद नि शिक्षा करूशकत होते. समाजातील कोणत्याही समुदायाला देशद्रोही ठरवून त्यांना प्रतिबंध करणे, त्यांच्यावर नजर ठेवणे, विनाकारण त्रास देणे, सुलभ झाले होते. सरकारच्या मते त्यामुळे देशात विघातक प्रवृत्तींना खतपाणी घालणारे घटक कार्यरत आहेत, त्यांना नेस्तनाबूत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. सरोजिनींनी सर्वसामान्य जनतेला हे सारे समजावून सांगितले. गांधीजींच्या भारतातल्या कार्याला ह्या वातावरणात चालना मिळाली.

या स्वत:हून दारिद्र्य स्वीकारलेल्या माणसाचे सत्ताधीशांशी लढण्याचे हातखंडे जगावेगळे होते. क्रांति-कारकांप्रमाणे शस्त्रांचा स्वीकार वा अंगीकार त्याने केला नव्हता. अन्यायाचा सामना असहकाराने करणे, हे आजवर कधी झाले नव्हते. वाटते तेवढे हे कार्य सोपेही नव्हते. लोकांनी ह्या परंपरेतील तेज स्वीकारून कायद्याला विरोध करणे गरजेचे होते. कुणी म्हटले, ह्याचा पायंडा भविष्यात  धोकादायक ठरेल. पण सरोजिनीबार्इंनी हे जनतेला पटवून दिलं की न्याय, स्वत्व, स्वराज्य ह्यासाठी ह्या भूमीतील प्रजेने नेहमीच आपापल्या पद्धतीने विरोध करून राज्यं उलथवली आहेत. आपल्यासारख्या परंपराप्रिय लोकांनी जुन्या रूढींच्या साखळ्या गांधींच्या प्रभावाने तोडल्यात. जातिभेद, स्त्रियांना पुरुषी वर्चस्वातून बाहेर काढून व्यासपीठापर्यंत आणण्यापावेतो आपण मजल मारली आहे. बालविवाह चुकीचा आहे. हे पटून बंगालने क्रांतिकारक पावलं उचललीत. हे सारं त्या ह्यासाठी सांगत असत की, लोकांना आपल्या इतिहासाचा अभिमान जाणवावा त्याच- बरोबर आपल्यात आधुनिक जगाची नवी मूल्यंही यावीत. आपल्यातील अनिष्ट बाबींविषयी निग्रहाने लढा देणारी नव्या मनूतील स्त्री सरोजिनींनी जागवली होती.

रौलट ॲक्टच्या विरोधात असहकाराची  हाक काँग्रेसच्या व्यासपीठावरून दिली गेली. त्याच वेळी सरकारने पंजाबमध्ये क्रांतिकारी विचार फोफावतात म्हणून तेथील जनतेला धाक बसवायला, बैसाखीच्या सणानिमित्ताने एकत्र आलेल्या सामान्य नागरिकांवर गोळीबार करून  अत्याचाराचा कळस केला.  ह्या घटनेचा निषेध म्हणून महमंद अली जीनांनी कॉन्स्टिट्यूट असेंब्लीचा राजीनामा दिला. देशात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. सत्याग्रहाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. शांततेने, निग्रहाने लोक सरकारविरोधात एकजूट झाले.  ज्या कृश, साध्या दिसणाऱ्या माणसाने सामान्यांतील तेज जागे केले, त्या अहिंसक माणसाची हत्या व्हावी ह्यासारखा दैवदुर्विलास नाही. ह्या घटनेनंतर सरोजिनींनी आकाशवाणीवर जे भाषण दिले, ते गांधीजींबद्दलच्या त्यांच्या भावनेचे प्रतीक होते. ‘‘पित्या तू विसावू नकोस’’ जसा ख्रिस्त क्रुसावरून तिसऱ्या दिवशी आपल्या अनुयायांच्या आसवांनी भारावून परत आला त्यांना मार्ग दाखवायला, सांत्वन करायला, प्रेमानं आपलस करायला; तसाच हे प्रिय पित्या, तू जाऊच कसा शकतोस? तू जन्मभर त्याग केलास लोकांसाठी, देशासाठी. अल्पवस्त्र ल्यायलास गरिबांची आठवण राहण्यासाठी. तू मर्त्य माणसांतील आत्मिक शक्ती जागवलीस. आत्म्याची शक्ती ही जगातील समर्थ लष्कराहून, अधिक असते. तू किती साधा होतास. सुईच्या अग्राएवढ्या जमिनीचाही तू मालक नव्हतास, पण लोकांच्या मनांचा स्वामी होतास! तुझ्या कृश देहाने फक्त सत्याचाच रस्ता निवडला. कुणाला पसंत पडो ना पडो, तू त्यावरूनच चालत राहिलास. अमानवीय अशा हिंसेच्या समोरही तू शांतपणे उभा राहिलास. ह्या देशाने प्रचंड हिंसा पाहिली, लोकांची हाव पाहिली, लाखोंची आहुती त्यात पडली. तरीही तू आपल्या मार्गावरून ढळला नाहीस. एकतेचा संदेश दगड झालेल्या ह्रदयांपर्यंत पोहोचवत राहिलास. मला आठवतंय,  तुझा पहिला 1924 चा उपवास हिंदू-मुस्लिम एकतेसाठी होता आणि सारे देशवासीय तुझ्याबरोबर होते. तुझा 1947 चा उपवासही ह्याच एकतेसाठी होता; पण लोक तुझ्याबरोबर नव्हते. द्वेष, राग, सूड यांनी त्यांना ग्रासले होते. तरीही तू अटल होतास. 

‘‘आता तू नसताना आम्ही तुझे आत्मिक सामर्थ्याचे वारसदार म्हणवणारे अनुयायी आहोत, तो वारसा आम्ही पुढे नेऊ. तुझे आदर्श, तुझे अनेकविध क्षेत्रांतले भव्य  काम करीत राहू. जे तू एकट्याने केलेस, ते आता आम्ही वाढवू, पूर्णत्वाला नेऊ. आम्ही तुझी जितीजागती स्मृती आहोत, तुझे सैनिक आहोत, आम्ही अहिंसक युद्धाची ध्वजा फडकत ठेवू. आमची तलवार म्हणजे आत्म्याची शक्ती असेल. तुझ्या लखलखत्या तेजाचे अंश आम्हाला मिळाले आहेत. 

सत्शील चारित्र्याचे एक महाकाव्य आम्ही तुझ्या हाताखाली वाचले आहे. त्या अमर आत्म्याच्या साक्षीने आम्ही देशासाठी कार्य करायला वचनबद्ध आहोत. अखेर मृत्यू म्हणजे तरी काय? हे नश्वर जग सोडून अमर जगात प्रवेश करणं. तुम्ही ज्या सत्याकरिता काम करीत होतात हत्याऱ्याने त्या जगात, नेले आहे. आम्ही तुझ्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा करतो. हे महान सत्यार्थी पित्या, तू निवांत नको होऊस नि आम्हालाही स्वस्थ बसू देऊ नकोस. आम्हाला ते सारे विचार आपल्या नवजात देशात प्रत्यक्षात आणण्यासाठी सामर्थ्य दे. तुझ्या मार्गदर्शनात तयार झालेले तुझे वारसदार आम्ही, तुझ्या संकल्पना सत्यात आणू. तू आज मर्त्य जगातून आपले कार्य करताना हुताम्यांच्या जगात जाऊन अमर झाला आहेस.’’ सरोजिनी नायडूंचे हे शब्द त्या पिढीवर गांधींचा काय प्रभाव झाला होता, हे स्पष्ट करतात. स्वतंत्र भारतात त्या उत्तर प्रदेशाच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून कार्यरत राहिल्या. देशविदेशात फिरून त्यांनी गांधींचे काम नि महत्त्व लोकांच्या मनावर आपल्या काव्यमय भाषेत ठसवलं.
 

Tags: संजीवनी खेर सरोजिनी नायडू गांधीजींचे गारुड sanjivani kher sanjeevani kher sarojini naidu gandhijinche garud weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके