डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ.सुशीला नायर यांनी सेवाग्राम इथे एक लहानशी डिस्पेन्सरी 1944 मध्ये सुरू केली. काही दिवसांतच तिचे रूपांतर एका हॉस्पिटलमध्ये झाले. फक्त आश्रमातीलच नव्हे, तर संपूर्ण गावातील लोक त्याचा वापर करू लागले. कस्तुरबा हेल्थ सोसायटी म्हणून त्याचे काम 1964  मध्ये अधिक जोमाने सुरू झाले. गांधींच्या हत्येनंतर डॉ. सुशीला नायर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात गेल्या. फरिदाबाद इथे क्षयरोग सॅनिटोरियम 1950  मध्ये सुरू केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. दिल्ली सरकारात 1952  ते 54  मध्ये त्या आरोग्यमंत्री बनल्या. दिल्ली विधानसभेत सदस्य आणि नंतर स्पीकर म्हणून काम पाहिले. केंद्रीय सरकारात 1962-67  पर्यंत त्या आरोग्यमंत्री होत्या. आरोग्यमंत्री असताना प्राथमिक सेवा केंद्रं काढण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची किती कमतरता आहे,  याची कल्पना आली. तिथल्या केंद्रासाठी डॉक्टरांचा तुटवडा होता. लालबहादूर शास्त्रींनी त्यांना ग्रामीण भागात वैद्यकीय कॉलेज काढायला उत्तेजन दिले.

सुशीला तशी तर गांधीजींच्या मांडीवर खेळली होती. एक वडिलधारं माणूस म्हणून ती त्यांच्याकडे पाहत होती. तिचे बंधू प्यारेलाल हे गांधीजींचे सचिव होते. घरात साधेपणाचे संस्कार होतेच; पण एखादी होतकरू बुध्दिवान तरुणी ह्या वयस्काच्या प्रभावाने सारं आयुष्य देशातील रुग्णसेवेत झोकून देईल, याची शक्यता किती होती?  वास्तविक तेव्हाही आकर्षक, सुखी, वैभवशाली, आनंदी जीवन जगण्याच्या भरपूर संधी होत्या. देखण्या, हुशार सुशीलेचा जन्म तेव्हाच्या पाकिस्तानातल्या कुंझ गावातला. दिल्लीच्या लेडी हार्डिंग कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. गांधी आणि कस्तुरबा यांच्या निकट सहवासात ती असे. त्यांची डॉक्टर म्हणूनच ती ओळखली जाई. वास्तविक ती काही फक्त गांधींचीच डॉक्टर नव्हती, तर संपूर्ण आश्रमाची डॉक्टर होती.

अगदी आईच्या कडेवरून ती गांधीजींना भेटायला गेल्याचे तिला स्वच्छ आठवत असे. कराचीला ते गेले असता, आईने तिला बरोबर नेले होते. तिला खरं तर गांधीजींना विनंती करायची होती की- त्यांनी प्यारेलालला घरी जायला सांगावे, विधवा आई नि भावंडांची काळजी घ्यावी. पण त्यांच्याशी बोलताना झाले भलतेच- तिने आपणहून त्यांच्या कामात सहभागी व्हायचे कबूल केले! बायकांनी अशा सभांना, कुणाला भेटायला जाणे घरच्यांना मुळीच पसंत नव्हते. गांधीजींनी छोट्या सुशीलाला उचलून मांडीवर घेतले आणि ते तिच्याशी खेळू लागले. तिला आठवत राहिले ते त्यांचे मायेने भरलेले डोळे. घर श्रीमंत नव्हते, पण अभावग्रस्तही नव्हते. मग सुखासीन आयुष्याचा ध्यास सोडून, उच्चशिक्षित असून साधेपणाने गरिबांच्या सेवेचा मार्ग तिने का निवडला?  पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तिने आरोग्यमंत्री म्हणून आपल्याकडील अनेक समाजोपयोगी कामे- जसे क्षयनिवारण, लसीकरण, खेडापाड्यांत आरोग्यसेवा- पोहोचवण्यासाठीचे अनेक प्रकल्प राबवले. वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली.

हे सारे येते कुठून? अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे पटले, ते सर्व जीवन व्यापणारे ठरले. आजच्या पिढीला हे सांगूनही पटणे असंभव! पण हे घडले, असंख्यांच्या बाबतीत घडले. त्यांना या निर्णयाचा कधी पश्चात्ताप झाला नाही, की निर्धार बदलावासा वाटला नाही. ही किमया होती गांधी नावाच्या जादूगाराची! त्या विचाराने तरुणांनी लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला; पण मार्ग सोडला नाही. यशापयशाचा विचारही मनाला शिवला नाही.

फ्रेड ब्लूम ह्या पत्रकार-लेखकाला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत सुशीला नायर यांनी अनेक वादग्रस्त गोष्टींविषयी मोकळेपणाने निवेदन केले आहे. प्यारेलाल यांनी गांधींविषयक आठवणींचे खंड लिहिले आहेत. मला वाटते, गांधींच्या प्रत्येक क्षणाचे दस्तऐवजीकरण झालेले आहे ते अशा सहकाऱ्यांमुळे. या कामात सुशीला भावाला मदत करी. त्याच्या मृत्यूनंतर (1982) तिने ते काम पुढे नेले. ‘कस्तुरबा ए पर्सनल रेमिनेसेन्सेस’, ‘महात्मा गांधीज लास्ट इंप्रीझन्मेंट - द इनसाइड स्टोरी’ अशी पुस्तकं लिहिली. सारे जीवन अविवाहित राहून गांधीजींचे विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. फाळणीच्या काळात लोकांमध्ये सलोखा निर्माण करण्याच्या प्रयत्नात पुढाकार घेतला.

1942 मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनावेळी कस्तुरबांनी सभेला संबोधित करावे, असे ठरले होते. त्यांची प्रकृतीही फारशी ठीक नव्हती. म्हणून सुशीला नायर त्यांच्या डॉक्टर असल्याने त्यांना सोबतीला घेतले होते.

गांधीजींच्या उपवासाच्या काळात ती त्यांच्याबरोबर होती- खासकरून त्यांच्या अखेरच्या 21 दिवसांच्या उपवासात. तिने स्वत:ही पाच दिवसांचा उपवास एकदा केला होता. त्या अनुभवाबद्दल तिने म्हटलंय की, प्रथम दोन-तीन दिवस नॉशिया येतो, नंतर अशक्तपणा जाणवू लागतो आणि एक प्रकारचा संथपणा येत जातो. गांधीजी पाणी पीत नसत. पाण्याखेरीज माणूस फार दिवस तग धरू शकत नाही. पाण्यात थोडा लिंबाचा रस, चिमूटभर साखर वा मध वा फळांचा रस घेत असत. नुसते पाणी त्यांना जातच नसे. त्यामुळे दहाव्या-अकराव्या दिवशी त्यांची प्रकृती खूपच खालावली. तोल जाऊ लागला. सुशीलाने त्यांना त्यांच्या प्रकृतीची गंभीर अवस्था समजावली. सरकारचे लक्ष अन्याय्य वागणुकीकडे,  दारूबंदीऐवजी दारू पिणाऱ्यांना संरक्षण देणे,  देशातले दंगे न थांबवणे याकडे जाण्यासाठी उपवास होता; मरणाच्या वाटेवर जाण्यासाठी नव्हता. अखेर पाण्यात लिंबाचा रस नि साखर द्यायला सुरुवात केली अन्‌ त्यांची तब्येत सुधारली. या त्यांच्या उपवासाचा कस्तुरबांच्या मनावर खू्‌प ताण होता.

महादेवभाई नुकतेच वारले होते. तो धक्काही होताच. कस्तुरबांची तब्येत खराब झाली. सुशीला नायर आगाखान पॅलेसमध्ये सोबतीला होत्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीवेळी त्यांच्या शरीरात खूप पाणी झाल्याने वेळ लागत होता. तेव्हा लोकांनी गांधीजींना विश्रांतीसाठी आत यायला सांगितलं, तर ते म्हणाले, ‘‘आमची 60 हून अधिक वर्षांची साथ आहे. आता एवढ्यात तिला एकटी कशी सोडू?’’ ऐकणाऱ्याला हळवा करणारा हा क्षण होता. देशाच्या फाळणीनंतर ते फारच व्यथित झाले होते. तेव्हाही खरं काय, हे जाणून घेण्यासाठी ते हिंदू नि मुस्लिमांना विनवत होते. दोन्हीकडचे लोक घटनांचे अतिरंजित वर्णन देत होते. हल्ले-खून सुरू होतेच. रक्ताचे पाट वाहत होते. या वेळी गांधीजींचा उपवास अधिकच गंभीर होत होता. ते अशक्त झाले,  हेलपाटत होते. शांत राहण्याचा, समजून घेण्याचा मार्ग कुणालाच पटत नव्हता. ‘मरू दे गांधींना!’ असे ऐकू येऊ लागले होते. पण चौथ्या दिवशी जेव्हा स्थिती फार गंभीर झाली; तेव्हा हिंदू, शीख व मुस्लिम लोक एकत्र आले. इतर नेत्यांनी लोकांमध्ये समझोता करायचा प्रयत्न केला. उपवासाचा 6-7 वा दिवस होता. गांधींनी सुचवले की- शस्त्रं खाली ठेवा, मुस्लिमाने एखाद्या अनाथ हिंदू मुलाला वा मुलीला आपल्या घरी न्यावे,  त्याला चांगल्या हिंदूप्रमाणे वाढवावे; तसेच हिंदूने वा शिखाने दुसऱ्या धर्माच्या अनाथ मुलांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवावे. मग लोक शांत झाले. या साऱ्या मनस्तापात गांधींचा जीव पणाला लागला होता.

त्याआधी 1944 मध्येही नथुरामने त्यांच्यावर चाकूने हल्ला करायचा प्रयत्न केला होता. त्या आरोपाची सुशीला नायर साक्षीदार होती. फाळणीनंतर सगळीकडे विव्देषाचे वातावरण तापले होते. त्या वेळी भवालपूरच्या नबाबांनी गांधीजींना पत्र लिहिले, ‘हिंदू, मुस्लिम प्रजाजन हे माझे दोन डोळे आहेत. हिंदू हा प्रदेश सोडून जाऊ इच्छित आहेत. तुम्ही त्यांना तसे न करण्याविषयी समजवा.’ पण त्याच वेळी शिखांनी कळवळून लिहिलं होतं की, ‘तिथे तसे सुरक्षित वातावरण मुळीच नाहीये. आम्ही इस्लाम कबूल केला तरच तिथे राहू शकतोय.’ त्यांनी त्यांच्या हलाखीचे अत्यंत भीतिदायक वर्णन केले होते. आता खरं काय? गांधीजी सुशीला नायरला म्हणाले, ‘‘यामागे सत्य काय, हे तू तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहून येऊन मला सांग.’’

ती आणि लेस्ली क्रॉस या क्वेकरपंथाच्या अध्यक्षांबरोबर मुलतानजवळच्या भवालपूरला गेले. जायला, राहायला नि परतायला एकेक दिवस- असा तीन दिवसांचा कार्यक्रम ठरला होता. तिथे गेले तर महाराज कराचीला गेले होते, ते दुसऱ्या दिवशी येणार होते. त्यांनी वाट पाहिली, पण तिसऱ्या दिवशीही त्यांचा पत्ता नव्हता, म्हणून परतायचा निर्णय घेतला. ते चहा घेत असताना डे.कमिशनरची पत्नी धावत येऊन, गांधींना गोळ्या घातल्याची बातमी सांगू लागली. सुशीलाला चैन पडेना. ‘ते बरे राहोत’ अशी प्रार्थना ती करू लागली. रात्रीच्या वेळी एक खास गाडी करून तिला कमिशनरने दिल्लीला गुपचूप रवाना केले. सारे वातावरण प्रचंड तणावाचे नि धोकादायक होते. रेडिओवर तिने जवाहरलालांचे भाषण ऐकले नि तिच्या मनाचा बांध फुटला. अखेर अहिंसक गांधींची हत्या गोळ्या घालून केली गेली. याअगोदरही अनेकदा प्रयत्न झाले होते, पण या वेळी ते यशस्वी झाले.

गांधीजींच्या नैतिक धैर्याची आणि तत्त्वनिष्ठेची परीक्षा फाळणीनंतरच्या काळात सतत होत होती. गांधींना आपल्याकडील अस्पृश्यतेच्या वागणुकीचे अत्यंत दु:ख होते. ते लोकांना सांगत की, ब्रिटिशांनी आपल्याशी न्यायाने वागावे असे का वाटते? आपण स्वत: आपल्याकडील लोकांना किती अमानुषपणे वागवतो. हे योग्य नाही. ते आंबेडकरांना म्हणाले होते की, तुम्हाला परंपरेने अस्पृश्य केले आहे. मी वेषभूषेने अस्पृश्यासारखा राहतो. त्या काळी अस्पृश्यांना कमरेच्या वर आणि गुढघ्याच्या खाली वस्त्रं नेसायची परवानगी नव्हती, म्हणूनच मी अल्पवस्त्र घालतो! पण लोकांना गांधींचे अस्पृश्यतेबाबतचे विचार अजिबात पटत नव्हते. ते संतापलेले होते. कुठे गांधी दिसले तर त्यांना ठोकू, असे बोलत असत. त्यांच्या ट्रेनचा डबा उडवून द्यायची योजना आखली गेली होती. त्यांच्या गाडीवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला गेला.

एकदा क्रोधाने धगधगणारा गर्दीचा लोंढा त्यांच्या मोटारीसमोर येऊन उभा राहिला. काचांवर धक्के मारत राहिला. ‘बाहेर या, म्हणजे दाखवतो!’ गाडीचा चालक घाबरला होता, तो जोराने गाडी चालवू लागला. मागच्या सीटवर सुशीला नायर होत्या. गांधींनी गाडीवानाला थांबायला सांगितले. ते शांतपणे बाहेर पडले. दंगेखोरांना शांत राहायला सांगितले. ‘‘मी तुमचे ऐकून घेणार आहे. सांगा- काय झालंय?’’ गांधीजींच्या शब्दांतली सच्चाई, प्रेम बोलण्यातून निथळत होतं. ते दंगेखोरांपर्यंत पोहोचलं. त्यांच्या उगारलेल्या लाठ्या खाली गेल्या. ‘‘आपण आपल्याच समाजातील लोकांना असे क्रूरपणे वागवतो, हे माणूस म्हणून तुम्हाला योग्य वाटतं का?’’ अगदी प्रेमळपणे ते बोलत होते. त्या समजावणीच्या स्वरांनी तो क्रुद्ध जमाव आश्चर्यकारकतेने शांत झाला. ज्यांनी काठ्या उगारल्या होत्या, त्यांनीच काठ्या आडव्या धरून जणू संरक्षक कवच तयार केलं.

अशीच घटना. फाळणीनंतर दिल्लीत आलेल्या मुस्लिमांनी गांधींकडे निवेदन केले की, त्यांचे खूप हाल होत आहेत. तुम्ही एकदा येऊन पाहा. तेव्हा ही मंडळी पुराना किला नि जुन्या किल्ल्याच्या भागात आश्रयाला राहत होती. त्यांना पाहायला गांधी जाणार म्हटल्यावर इतर लोक चिडले. त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गांधीजी शांतपणे बाहेर आले. उभे राहिलेल्यांचाच आधाराने गाडीतून बाहेर पडले. आपुलकीने त्यांच्याशी बोलू लागले. ‘‘त्यांच्याऐवजी आमच्याशी बोला, आमची स्थिती चिंताजनक आहे.’’ असे कानांवर आले. ‘‘सर्वांचीच विचारपूस करतो’’ म्हणत ते जाऊ लागले. गाडीऐवजी पायीच लोकांत फिरायचा निश्चय त्यांनी केला.

सर्वच निर्वासित वस्त्यांची स्थिती करुणाजनक होती. बायका रस्त्यावरच बाळंत होत होत्या. जखमींवर इलाज होत नव्हते. अन्न, औषधं, निवारा- साऱ्याचीच कमतरता होती. गांधीजी सुशीलाकडे वळून तिला विचारले, ‘‘तू करशील या लोकांना मदत?’’ सर्व जण म्हणाले, ‘‘नको, फार वाईट लोक आहेत. तरुण मुलीला एकटं पाठवू नका.’’ सुशीलाला मुळीच भीती वाटत नव्हती. तिने आपली वैद्यकीय साधनं घेऊन तिथे जाऊन मदतकार्य सुरू केले. जे विरोध करती, तेच तिचे संरक्षक बनले. जखमींना, नवजात बाळांना वाचवणे ही एक तारेवरची कसरत होती. ती वाचली, तरच लोकांचा विश्वास बसला असता. पण देवानेही मदत केली. तिच्या हातांना यश येत गेलं.

गांधी प्रत्येकाला वेगवेगळ्या पातळीवरून हाताळत. नेहरूंशी बोलताना वेगळी भाषा, इतर सामान्य शेतकऱ्याशी वेगळ्या भाषेत बोलत. त्यांच्या मनातील निर्मळ भाव समोरच्यापर्यंत सहज पोहोचत असे. नौखालीतही सुशीलाने हाच अनुभव घेतला. अत्यंत धोकादायक, भीतिमय वातावरणातही तिने माणुसकीने केलेले काम समजून घरातल्या पोरीबाळीसारखे लोकांनी तिचे रक्षण केले, तिला मदत केली. हा गांधीजींनी दिलेल्या निर्भय वागण्याचा परिणाम होता. आध्यात्मिक प्रभावही म्हणता येईल, जो अगदी पारदर्शकपणे थेट लोकांपर्यंत जात होता. ते इतरांनाही उच्च पातळीवर सहज घेऊन जात नि निर्मळतेने वागायला लावत. कुठलेही दडपण न आणता लोकांना सहज साध्य होईल अशी कामं पाहता-पाहता जगड्‌व्याळ होत. हाच त्यांचा करिष्मा होता. 

सुशीलाने नोंदवलंय, ‘गांधीजी हे तरुणांसाठी आदर्श वडिलधारे होते. ते आमच्याशी वाद घालत, आम्हाला गप्प करीत नसत. हिटलरपेक्षा ब्रिटिश बरे, असे त्यांचे मत होते. त्यांच्याविरुध्द आपण लढत असलो तरी, ते विचार समजावून घ्यायला तयार असतात. ते ढोंगी नाहीत, लोकशाहीवर त्यांचा विश्वास आहे; जो हिटलरचा नव्हता. त्यांच्याशी बोलून तरुणांचे विश्व विस्तारत असे.’ सुशीला नायर यांच्या मते, गांधीजींनी स्त्रियांसाठी वेगळे असे काही केले नाही. ह्या संस्कृतीतीलच विचार त्यांनी मांडले, फक्त समानतेच्या पातळीवर नव्हे, तर त्यांच्या मते स्त्रिया या उच्च पातळीवर आहेत हे पटवून देऊन. त्या समर्थ आहेत नि राजकारणात तत्त्वनिष्ठा, त्याग, समर्पण आणू शकतात, हे दाखवून दिले. आपल्या माणसांसाठी त्रास सहन करायची अहिंसक ताकद स्त्रियांत असते, असे त्यांचे मत होते नि स्त्रीमधील ही ताकद जाणून मी अधिकाधिक स्त्री होतो, असे ते म्हणत. स्वत:ला त्रास करून घेऊन इतरांना सत्याची बाजू समजावून द्यायची शक्ती स्त्रियांत असते. माया, ममता, संगोपन, सेवा हे गुण स्वाभाविकपणे त्यांच्यात असतात. त्या गोष्टींनी त्यांचे शोषण होऊ न देता त्यासाठी ठामपणे उभे राहण्याची शक्ती जागी झाल्यानेच त्यांनी राष्ट्रकार्यात आपले योगदान दिले. हक्काच्या अगोदर त्यांनी कर्तव्य केले नि आपले वेगळेपण सिध्द केले.

पुरुषाने हे जाणून स्त्रियांशी बरोबरीच्या नात्याने वर्तन केले;  स्वच्छ-निरामय-वासनारहित व्यवहार केला, तर तो त्यांच्यातील उत्तम गुणांना बाहेर काढू शकेल. त्यांच्या ब्रह्मचर्याच्या कल्पनेमागे हीच दृष्टी होती. स्त्रियांवरील अनेक बंधनांविरुध्द त्यांनी अनेकदा आवाज उठवला होता. खास करून बालविवाह, विधवांची स्थिती इत्यादी सामाजिक-वैयक्तिक गोष्टींबाबत त्यांचे विचार क्रांतिकारक होते. सकारात्मक विचार, नैतिकतेचा विचार, सत्याची कास या गोष्टींनी माणसाचे आध्यात्मिक उन्नयन करण्यावर त्यांचा भर होता. माणसातले हीनत्व त्यामुळे गळून जात असे. तुमच्यातील सद्‌विचारांचे, आचरणाचे पडसाद तुमच्या भोवतीच्या कार्यक्षेत्रावरही पडतात. कर्तव्यनिष्ठ माणूस घरदार, राजकारणच नव्हे तर सर्वत्र तसाच वागतो. राजकारण हे बदमाषांचे क्षेत्र समजले जाई, तर गांधींनी ते सर्वहिताचे केले. पुढे ते बदलत गेल्याने त्यांनी ‘पक्षच बरखास्त करावा’ असे सुचवले होते.

सुशीला नायर यांनी गांधीजींचे बोलणे, वागणे जवळून पाहिले होते. त्यांच्याशी विज्ञानाबाबतही वाद घातले होते. कस्तुरबांचा लाघवी सहवासही त्यांना लाभला होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी नव्या सरकारात महत्त्वाची पदे भूषवली. नव्याने स्थापित लोकशाहीत मंत्रिपदी जाऊन लोकहिताची  अनेक कामे केली. वैद्यकीय संस्था स्थापन केल्या, सामान्य लोकांना वैद्यकीय सेवा योग्य प्रकारे मिळाव्यात यासाठी शासनात रचनात्मक पाया घातला.

वास्तविक 1944 मध्ये डॉ.सुशीला नायर यांनी सेवाग्राम इथे एक लहानशी डिस्पेन्सरी सुरू केली. काही दिवसांतच तिचे रूपांतर एका हॉस्पिटलमध्ये झाले. फक्त आश्रमातीलच नव्हे. तर संपूर्ण गावातील लोक त्याचा वापर करू लागले. कस्तुरबा हेल्थ सोसायटी म्हणून त्याचे काम 1964 मध्ये अधिक जोमाने सुरू झाले. गांधींच्या हत्येनंतर डॉ.सुशीला नायर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठात गेल्या. फरिदाबाद इथे क्षयरोग सॅनिटोरियम 1950 मध्ये सुरू केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. दिल्ली सरकारात 1952 ते 54 मध्ये त्या आरोग्यमंत्री बनल्या. दिल्ली विधानसभेत सदस्य आणि नंतर स्पीकर म्हणून काम पाहिले. त्या केंद्र सरकारात 1962-67 पर्यंत आरोग्यमंत्री होत्या.

आरोग्यमंत्री असताना प्राथमिक सेवा केंद्रं काढण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची किती कमतरता आहे, याची कल्पना त्यांना आली. तिथल्या केंद्रांसाठी डॉक्टरांचा तुटवडा होता. लालबहादूर शास्त्रींनी त्यांना ग्रामीण भागात वैद्यकीय कॉलेज काढायला उत्तेजन दिले. ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय आणि प्रांतीय पातळीवर त्यांनी प्रयत्न केले. कुष्ठरोग नि क्षयरोग यासारख्या आजारांवर उपचारांसाठी सेवाग्राममध्ये विभाग सुरू केले. गांधीजींच्या विचाराला पूरक असेच काम त्यांनी उभारले.

Tags: नथुराम गोडसे सुशीला नायर कस्तुरबा महात्मा गांधी अहिंसक सेवा संगोपन ममता माया nathuram godase sushila nayar kasturba mahatma Gandhi ahinsak sewa sangopan mamta maya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके