डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मै अकेला चला था मंजिल की ओर लोग आते गए, कारवाँ बनता गया

गांधींनी तिला आपली लेक मानले. राजकारणाच्या धबडग्यात तिला वारंवार पत्रं लिहून ख्याली-खुशाली विचारली, तिच्या गोंधळलेल्या मन:स्थितीत मार्गदर्शन केलं. मला नेहमी प्रश्न पडतो की- वास्तविक ह्या विदेशी स्त्रिया नि देशातील इतर मोठमोठे नेते यांच्याशी प्रदीर्घ पत्रव्यवहार केलेल्या त्यांच्या पत्रव्यवहाराचे पन्नास खंड प्रकाशित झाले आहेत. एवढे करण्याइतकी ऊर्जा, वेळ नि आपुलकी गांधीजींत कशी नि का होती? एस्थर फारिंग मेननला दीडशे पत्रं लिहिलीत, जी ‘माय डिअर चाइल्ड’ या पुस्तकात संग्रहित आहेत. तिनेही एखाद्या देवतुल्य माणसाकडे पाहावे अशा दृष्टीने त्यांच्याकडे भारावून पाहिले होते, असे त्या पत्रातून दिसते. ती आणि ॲन मेरी पहिल्यांदा कोचरबच्या आश्रमात येऊन  गेल्यावर 15 जानेवारी 1917 रोजी लिहिलेल्या पत्रात गांधीजी तिला ‘प्रिय एस्थर’ असा मायना लिहितात, त्यानंतर मात्र त्यांच्या पत्रात तिचा उल्लेख ‘प्रिय कन्येला’ असा येऊ लागला.

जगभरात जेव्हा संहार, युद्ध, अन्याय यांनी हाहाकार माजवला होता, तेव्हा भारतात एक ध्येयवेडा माणूस एकाकीपणे सत्य-अहिंसेने प्रश्न सुटतील असं म्हणत होता. गरिबाला भीक नको तर आत्मसन्मानाने जगायचं साधन द्या, आम्हाला राजकीय स्वातंत्र्य द्या... माझा धर्म मला प्रिय आहे, पण त्यातील अस्पृश्यता हा कलंक आहे नि तो भेदाभेद आपणच संपवला पाहिजे... स्त्री-पुरुष यांतील स्त्रीत अधिक शक्ती आहे, तिला फुलायला वाव द्या- असे एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील पुराणमतवादी देशवासीयांना सांगत तो फिरत होता. आश्चर्य म्हणजे, अशिक्षित-दरिद्री लोकांना हे विचार पटत होते. जग पहिल्या जागतिक युद्धात होरपळत होते. वसाहतवादी राज्यकर्ते सामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षांना काडीचीही किंमत देत नव्हते. एकीकडे हिंदुस्थानातील लोकांत अस्वस्थता वाढत होती, तर दुसरीकडे ब्रिटिश सरकार  युरोपातील युद्धाने त्रस्त होत होते. इथे आणखी समस्या उद्‌भवायला नको म्हणून गांधी आणि त्यांचे अनुयायी यांच्यावर सरकारचे कडक लक्ष होते. वास्तविक गांधीचे बोलणे, सांगणे, वागणे हे हिंसेच्या मार्गाने नव्हते, तर शांततेच्या मार्गाने सत्य लोकांना पटवून देणे होते.

त्या काळात डेन्मार्कच्या मिशनरींचे लोकशिक्षण, रुग्णाइतांची सेवा आणि धर्मप्रसाराचे काम दक्षिण हिंदुस्थानात जोरात सुरू होते. त्यांच्यातच एस्थर फारिंग ही स्त्री तिच्या शैक्षणिक पात्रतेमुळे ॲन पॅटरसन ह्या उत्तम प्रशासकीय अनुभव असलेल्या स्त्रीमुळे द.हिंदुस्थानात आली होती. ती आणि ॲन पॅटरसन या दोघी जणी गांधींच्या प्रभावाच्या वर्तुळात आल्या नि त्यांच्या जीवनाची दिशाच बदलली. मुळात डेन्मार्कसारख्या देशात गांधींबद्दल माहिती नि महती कळली तरी कशी? गांधींबद्दल एकोणीसशे एकवीस पावेतो तिथे काहीच माहिती नव्हती.  एका श्रीलंकन मिशनरीने डेन्मार्कमधील वृत्तपत्रात गांधींचे विचार, त्यांची कार्यपद्धत, द.आफ्रिकेतील लढा याबद्दल एक प्रदीर्घ लेख लिहिला आणि हे नाव तिथे पोहोचले.

त्याअगोदर नोबेल पारितोषिकप्राप्त भारतीय साहित्यिक रवींद्रनाथ टागोर याच्याबद्दल त्यांच्या दौऱ्यांमुळे, लेखनाच्या अनुवादांमुळे स्कँडेनेव्हियन देशात पोहोचले होते. ह्या दौऱ्यात त्यांनी गांधींच्या कामाची महती डॅनिश लोकांना सांगितली होती. एस्थर फारिंग ह्या तरुणीने टागोरांवर, त्यांच्या जीवनदृष्टीवर एक लेख लिहिला होता. त्याच सुमारास नोबेल पारितोषिकविजेते फ्रेंच साहित्यिक रोमाँ रोलाँनी लिहिलेले गांधींचे चरित्र, त्यांच्या यंग इंडियातील लेखांची माहिती, त्यांचा शांततापूर्ण मार्गाने चाललेला लढा व सत्यनिष्ठा तेथील लोकांपर्यंत पोहोचली. रोलाँ यांनी आपल्या लेखनातून शांततेच्या मार्गाने वसाहतवादविरोधी जगाच्या समस्या सोडवणे शक्य आहेत, असे प्रतिपादन केले. हा मार्ग गांधींच्या विचारातून जातो, असे म्हटले. शांतिमय उद्याच्या जगाचे चित्र रेखाटले. साहजिकच रिकन्सीलिएशन- समन्वयवादी आणि शांततापूर्ण मार्गाने काम करणाऱ्या संस्थांना या विचाराने आधार मिळाला. या विचार आणि आचाराने भारून कोपनहेगनमध्ये ‘फ्रेंड्‌स ऑफ इंडिया’ संस्थेची स्थापना करून अशा प्रकारच्या लढ्याला कसे बळ देता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले.

इकडे गांधींच्या विचारांच्या विदेशी मिशनरीमधील प्रसारावर सरकारने बंधने आणली होती. एस्थर फारिंगने ॲन मेरी पॅटरसनबरोबर तिच्या मार्गदर्शनाखाली दक्षिणेतील निलगिरी, कोटागिरी येथील मिशनमध्ये काम सुरू केले. तिच्या घरीही सात्त्विक पार्श्वभूमी होती. तिने कोपनहेगनच्या सेमिनरीमधून धार्मिक शिक्षण, शिवाय मिशनरी कामाचे प्रशिक्षण घेतले. ती एक उत्तम शिक्षिका होती. तिला पॅटरसनसोबत इथल्या मुलींच्या शिक्षणाची उत्तम सोय करायची होती. तिला हवामानाशी जुळवून घेताना थोडा त्रास झाला, पण ती इथे रमली. पॅटरसन तिची वरिष्ठ होती. तिने या नवोदित मिशनरी स्त्रीला आपल्याबरोबर भारतातील शिक्षणपद्धत जाणून घेण्यासाठी विविध संस्थांमध्ये न्यायला सुरुवात केली. देश समजायला त्याचा उपयोग झाला. टागोरांची संस्था असो वा गांधींचा आश्रम- इथले शिक्षण हे इथल्या सांस्कृतिक परिवेशाला साजेसे होते. त्या दोघी जणी जेव्हा साबरमतीच्या आश्रमात गेल्या; तेव्हा तेथील साधी राहणी, प्रार्थनेचे महत्त्व, सत्य-अहिंसा यांचे पालन करण्याचे प्रशिक्षण पाहून अचंबित झाल्या.

गांधींच्या विचाराने प्रभावित झालेल्या अनेक विदेशी स्त्रिया होत्या, त्यांच्याविषयी या सदरातून आपण जाणून घेत आहोत. मेरी पोलाक, सोंजाबद्दल आपण वाचले. भारतात आलेल्या आणि त्यांच्या भक्तच झालेल्या विदेशीनींत पहिली स्त्री म्हणून एस्थर फारिंगचा उल्लेख करावा लागेल. गांधी तेव्हा एक जागतिक व्यक्ती झालेले नव्हते. त्यांच्या आश्रमात ती इतकी सहजपणे एकरूप झाली- जसा एखादा पाणपक्षी पाणी दिसताच जलाशयात विहार करू लागतो. पहाटे उठणं, प्रार्थनासभेत उपस्थित होणं, शाकाहार स्वीकारणं, जमिनीवर बसून जेवणं, खादी वापरायची तयारी दर्शवणं- हे तिला सहज साध्य झालं. त्यामुळेच तिला गांधी आपली लेक म्हणू लागले. गांधींना भेटल्यावर तर तिने दृढ निश्चयच केला की- हाच खरा देवापर्यंत जाण्याचा, गरिबांना मदत करायचा, त्यांना बळ द्यायचा आध्यात्मिक मार्ग आहे.   

      

गांधींच्या सहवासाने एस्थर एकूणच इथल्या सांस्कृतिक जगाच्या प्रेमात पडली. तिला वाटे, ‘आपण इथे जन्मलो असतो, तर किती बरं झालं असतं!’ पहिल्या भेटीतच गांधींनी तिला आपली कन्या म्हणून संबोधायला सुरुवात केली. ह्या साबरमतीच्या वास्तव्यानंतर जीवनाच्या ध्येयाबद्दल असलेला तिच्या मनातला संभ्रम समाप्त झाला. तिने गांधींच्याच मार्गाने जायचे ठरवले. पण हे तितकेसे सोपे नव्हते. डॅनिश मिशनकडून तिला सावधगिरीचे फतवे येऊ लागले. गांधींनी तिला समजावले- उतावीळपणा न करता  तुला ज्या कामाने इथे आणले, ज्या संस्थेची बांधिलकी तू पत्करली आहेस, ती पुरी करायला पाहिजेस. तुझी संस्था जोवर तुझ्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येत नाही, तोवर त्यांचे म्हणणे तू ऐकले पाहिजेस. उलट, गांधींशी संपर्क तोडला नाही, तर मिशनने तिला डेन्मार्कला हकालपट्टीचाच मार्ग असल्याचे कळवले. आता काय करायचे? साहजिकच ‘आता मी काय करू?’ हा आर्त सवाल तिने गांधींकडे केला. ते दुसऱ्याची बाजू ऐकून घेण्यात शहाणपण मानत होते. महायुद्धाचे ढग जगाला घेरत होते. डेन्मार्कला ब्रिटनच्या वर्चस्वाची भीती होती. ही मिशनरी तर ब्रिटिश सत्तेविरोधात असलेल्या माणसाच्या संपर्कात होती. त्यामुळे डेन्मार्कच्या मिशनरीजनी ब्रिटनविरोधी काम करणाऱ्या नेत्याशी जवळीक करणे त्यांना परवडणारे नव्हते. ब्रिटन सरकारला ती जर्मन हेर असल्याची शंका होती. जर्मन विचार, क्रांतीचा संदेश ती लोकांत पसरवत तर नाही ना, ह्याकडे ते नजर ठेवून होते. त्यात कुचराई होऊ देत नव्हते. पण तसे काहीही नव्हते.

गांधींना त्यांचा मुद्दा बरोबर वाटला. त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरांना पत्र लिहिले की- एस्थर फारिंग ही कुठल्याही देशविरोधी वा ब्रिटनविरोधी कामात भाग घेणार नाहीये. तिला स्त्रियांचे शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा या गोष्टींतच रस आहे. ती कुठलेही अपकृत्य करणार नाही, याची खात्री मी देतो. त्यांनी चालर्‌स अँड्रूज यांना मद्रासच्या गव्हर्नरला पत्र लिहून, भेटून याबद्दलची शाश्वती द्यायची विनंती केली. इकडे एस्थरला शांत राहून, देवाच्या इच्छेचे पालन करत काम करायला सांगितले. ती साबरमती आश्रमात गेली, हेही मिशनला कळवले पाहिजे; लपवून काही करायचे नाही, मिशनशी संवाद सुरू ठेव- असे सुचवले. देशकार्याच्या धबडग्यात एका सामान्य मिशनरी स्त्रीला पत्र लिहिणे, तिला मानसिक-आध्यात्मिक आधार देणं कसं जमत होतं, तेच जाणे! मद्रास गव्हर्नरने एस्थरला राजकीय कामात भाग न घेण्याच्या अटीवर आश्रमात जायची-राहायची परवानगी दिली. ती आश्रमात आली. तिने हिंदीवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळवलं. पंजाबमधील स्थिती बिघडल्याने गांधीजी तिकडे गेले होते. कस्तुरबांना ह्या विदेशी स्त्रीने आपल्या स्वयंपाकघरात लुडबूड केलेली अजिबात आवडत नसे. एस्थरने आश्रमातील लोकांमध्ये शिस्त आणली. मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या. स्वत: सूत कातणे, खादीची वस्त्रे विणणे इत्यादीत गुंतवून घेतले. तिला गांधींच्या ‘यंग इंडिया’त लिहायचे होते, पण सरकारचा रोष ओढवून घ्यायला नको म्हणून गांधींनी तिला तसे करण्यापासून मनाई केली होती. अशा सुस्वभावी मुलीमुळे आश्रमातील लोकांना कामात दिशा मिळते, असे गांधींना वाटत असे. ह्या सुस्वरूप तरुणीमुळे गांधींच्या मतात किंवा तिने करायच्या कामात काही बदल झाले नाहीत. त्यांनी तिची अडचण समजून घेऊन हिंदू प्रार्थना न म्हणता आपल्या देवाचे स्मरण करावे, असे तिला सुचवले होते.  

याचदरम्यान ती डॉ.कुन्ही मेनन यांच्या प्रेमात पडली. ते दोघे लग्नाचा विचार करत होते. ही गोष्ट इथल्या सनातनींना आणि डेन्मार्कच्या मिशनमधील लोकांना पसंत पडली नाही. त्यांनी असे न करण्याचा सल्ला तिला दिला, मात्र, तिने निश्चय बदलला नाही. पण तिने काही पाऊल उचलायच्या अगोदरच तिला इथून डेन्मार्काला पाठवले गेले. या सर्व काळात गांधीजींच्या चळवळीही जोरावर होत्या. निळीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, अस्पृश्यतेसाठी काम सुरूच होते. त्यांना उसंत कुठे होती? तरी ते आपल्या लेकीच्या हितासाठी धडपड करतच होते. तिला दीडशे पत्रं लिहिलीत. तिचा तिच्या पित्यावर- बापूंवर पूर्ण विश्वास होता. प्रार्थनेचे सामर्थ्य आणि ईश्वरनिष्ठा तिच्या धर्माने तिला शिकवली होतीच. गांधींवर जेव्हा देशद्रोहाचा आरोप होऊन त्यांना सहा वर्षांची कारावासाची शिक्षा झाली, तेव्हा तिची अनेक पत्रं त्यांना दिली जात नसतं. कारण दिले जाई की, गांधींवरील गंभीर आरोपामुळे त्यांचा पत्रव्यवहार खंडित केला गेला आहे. त्यांची पत्रंही तिला पोहोचू दिली जात नसत. गांधींची व्यवस्था पुण्याच्या कारागृहात केलेली होती. यादरम्यान म.गांधीजी आजारी पडले. त्या वेळी एस्थर आणि ॲन मेरी पॅटरसन आठ दिवस त्यांच्या जवळच होत्या. आजारपणामुळे त्यांना सोडण्यात आले.

डेन्मार्कला गेल्यावर तिने मेनन यांच्याशी विवाह केला. ते सरकार त्यांना भारतात येऊ देत नव्हते. पण ते कसेबसे इथे पोहोचले. ॲन पॅटरसनने त्यांना पोर्टो नोव्हो परांगईपेत्ताई तमिळनाडू- न्यू पोर्ट येथे एक हॉस्पिटल सुरू करायला सांगितले. मेनन हॉस्पिटलच्या बांधकामाकडे लक्ष देत व रुग्णांना मदतही करत. ते दोघेही पॅटरसनच्या मदत करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या तुटपुंज्या पगारात आनंदाने रुग्णसेवेत प्रभुसेवा मानत होते. त्या दोघांना गांधींच्या राजकीय व सामाजिक कामात रस होताच, पण त्यांच्या ईश्वरशरण वृत्तीचा त्यांच्यावर आणि इतर युरोपियन पाहुण्यांवर गहिरा प्रभाव पडत होता. त्यांना गांधींचे हे आध्यात्मिक श्रद्धेचे नि त्यानुसार ईश्वराज्ञा प्रमाण मानून काम करायचे व्रत आश्चर्यकारक वाटे. एस्थर, ॲन यांच्याकडे येणारे अनेक पाहुणे तर गांधींना उच्च कोटीचा, अतर्क्य शक्ती असलेला संतपुरुषच मानत होते. त्यांचे अहिंसक मार्गाने चालण्याचे व्रत, सत्यनिष्ठा त्यांना अद्वितीय वाटत होती. केवळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करून दाखवणे, सामान्य संसारी माणसांना राजकीय व सामाजिक कुरापतींची जाणीव करवून देऊन त्याविरुद्ध आवाज उठवण्याची प्रेरणा देणारा हा दुबळा, काटकुळा माणूस अद्वितीयच होता. राज्यकर्ते म्हणून त्यांचा राग गांधींच्या चळवळीबाबत होता, तरी ब्रिटिश लोकांतही त्याच्या विचारांबद्दल आदराची भावना होती.

एस्थर आणि तिचा पती दोघेही साध्या, सच्च्या जीवनशैलीने प्रभावित होते. तिने तर पूर्णपणे भारतीय वस्त्रं, शाकाहार नि गरिबांची सेवा- मग ती आरोग्यसंबंधित असो वा शैक्षणिक- यासाठी स्वत:ला वाहून घेतले होते. तिच्या मुलींची नावेही तिने भारतीयच ठेवली होती. नान(प्रभाव टाकणारी व्यक्ती) नि तंगाई(सरस्वती) अशी तमिळ नावं ठेवली होती. मुलींना तिला भारतीय संस्कृतीच्या वातावरणात वाढवायचे होते. दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर एस्थरला मलेरियामुळे प्रचंड थकवा येऊ लागला नि ती वारंवार आजारी पडू लागली. डॉ. मेननने तिला डेन्मार्कला नेले. ते स्वत: सर्जरीच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. गोलमेज परिषदेला गांधीजी गेले असताना एस्थर नि मेनन त्यांना भेटायला तिथे गेले होते.

गांधींनी तिला आपली लेक मानले. राजकारणाच्या धबडग्यात तिला वारंवार पत्रं लिहून ख्याली-खुशाली विचारली, तिच्या गोंधळलेल्या मन:स्थितीत मार्गदर्शन केलं. मला नेहमी प्रश्न पडतो की- वास्तविक ह्या विदेशी स्त्रिया नि देशातील इतर मोठमोठे नेते यांच्याशी प्रदीर्घ पत्रव्यवहार केेलेल्या त्यांच्या पत्रव्यवहाराचे पन्नास खंड प्रकाशित झाले आहेत. एवढे करण्याइतकी ऊर्जा, वेळ नि आपुलकी गांधीजींत कशी नि का होती? एस्थर फारिंग मेननला दीडशे पत्रं लिहिलीत, जी ‘माय डिअर चाइल्ड’ या पुस्तकात संग्रहित आहेत. तिनेही एखाद्या देवतुल्य माणसाकडे पाहावे अशा दृष्टीने त्यांच्याकडे भारावून पाहिले होते, असे त्या पत्रातून दिसते. ती आणि ॲन मेरी पहिल्यांदा कोचरबच्या आश्रमात येऊन  गेल्यावर 15 जानेवारी 1917 रोजी लिहिलेल्या पत्रात गांधीजी तिला ‘प्रिय एस्थर’ असा मायना लिहितात, त्यानंतर मात्र त्यांच्या पत्रात तिचा उल्लेख ‘प्रिय कन्येला’ असा येऊ लागला. काही पत्रं तर पेन्सिलने लिहिलेली, रेल्वेप्रवासात लिहिलेली आहेत. त्यात सुरुवातीला तिच्याबद्दलची चिंता आणि थोडंफार समाजकारण असे.

पण त्यानंतर मात्र अनेक आध्यात्मिक, धर्मविचार, वागणुकीबद्दल पेच यांची चर्चा असे. चंपारणहून लिहिलेल्या पत्रात ‘सामान्य गरीब मजुरांना माझ्याजवळ बसूनच समाधान वाटते, धीर येतो. हा माणूस आपल्याकरता काही भलं करील याचा भरवसा त्यांना वाटतो. मला आशा आहे की, माझ्या हातून देवाच्या प्रेरणेने चांगलं होईल. प्रार्थनाच माझे साधन आहे. सत्ताधारी- मग ते स्वदेशी असोत वा विदेशी- आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांशी क्रूरतेनेच वागतात...’ वगैरे ते लिहीत असत. त्यांच्या पत्रांचा संग्रह  प्रकाशित करण्यामागे हा माणूस काय होता कसा लोकांच्या हितासाठी विचार-आचार करीत होता, हे पुढच्या पिढ्यांना कळावे म्हणून आपण ते जगाला देत आहोत- अशी एस्थर फारिंग मेननची भावना होती.

प्रिय एस्थर,

तुझे आपुलकीने भरलेले पत्र वाचून खूप बरं वाटलं. मेरीची सर्दी पळाली, हे छान झालं.

तुम्हाला आश्रमात येऊन शांतता लाभली, हे वाचून समाधान वाटलं. तुम्ही दोघी आता पाहुण्या राहिलेल्या नाहीत, आमच्या घरच्या सदस्य झाल्या आहात.जेव्हा मनात येईल, यावंसं वाटेल तेव्हा नि:संकोच या.

मला आता तुझ्या स्वभावाची पुरती माहिती झालीय . आपल्या अभ्यासात प्रयत्नांची पराकाष्ठा कर. लवकरच तू उत्तम तमिळ बोलू शकशील. तुझ्याकडे असलेले आश्रम नियमावलीबद्दलचे पुस्तक तुला हवे तितके दिवस तुझ्याकडे ठेव, त्याची घाई नाही.

तुझा,

एम. के. गांधी

एस्थरचे नि तिच्या मिशनचे संबंध बिघडत गेले. तिने गांधींना कळवले की, आपल्यामुळे मिशनला कमीपणा येत आहे. मला अधिक मानसिक त्रास होऊ नये म्हणून चेअरमनने मिशनच्या कामातून मुक्ती दिली. छान भेटी दिल्या, चारशे रुपये दिले नि प्रेमाने निरोप दिला. माझ्या मार्गातले अडथळे दूर केले. हा त्यांचा एक प्रकारे मोठेपणाच आहे. पण ते मला मिशनच्या कामात गुंतवू शकले नाहीत. माझ्या देशातून काय आदेश येतो, याची मला प्रतीक्षा आहे. ते मला हिंदुस्थान सोडायला सांगतील, ते मला असह्य वाटतेय. मी याच देशाची आहे! जावेच लागले, तर आपल्याला मरणप्राय दु:ख होईल.

इथल्या हवामानामुळे ती डेन्मार्कला परतली नि 1962 मध्ये तिने देह ठेवला.

अशी ही दृढ निश्चयी, सुस्वरूप विदेशी मिशनरी स्त्री गांधींचा विचार आचरणात आणण्याचा यशस्वी प्रयत्न करीत उच्च आध्यात्मिक जीवनाचा एक आदर्श मनाशी जपत राहिली. आपलं कुटुंब, पती, मुली यांनाही तिने याच संस्कारात धन्य केलं. गांधीजींच्या जीवनात, त्यांच्या वैविध्यपूर्ण कामाच्या प्रचंड विस्तारात खरं तर या विदेशी स्त्रियांचे स्थान अगदी नगण्य आहे, पण त्या स्त्रियांचे जीवन मात्र गांधीजींच्या विचारांच्या प्रकाशाने उजळून निघाले. त्यांची पत्रे हा त्या काळाच्या चळवळीचा, विचारप्रवाह-बदलाच्या विचारांचा, सत्य नि सत्त्वनिष्ठेच्या जीवन-विचारांचा आरसा आहेत.

गांधीजींची पत्रे- एस्थर फारिंगच्या नावे

मोतीहारी

30 जून 1917

प्रिय इस्थर,

मी नुकताच अहमदाबादला परतलोय. 28 तारखेला तुझी दोन पत्रं मिळाली. मला मोतीहारीला राहायला खूप आवडले. शहरांपेक्षा गावातलं जीवन मला अधिक उत्साहवर्धक, मोकळढाकळं नि दैवी शांततेचं वाटतं. देवानं आपल्याला शोध घ्यायची, प्रेमाची, कष्ट करायची इत्यादी देणग्या का बरं दिल्या असतील- जर आपण त्यांचा वापरच करणार नसू तर? हा प्रश्न तू जसा मला विचारलायस, तसाच अनेकांनी विचारला होता. मीदेखील स्वत:ला तो विचारतो. देवाने ज्या शक्तीने अनेक प्रलोभनं आपल्या वाटेत उभी केली आहेत, त्याच शक्तीने त्यावर नैतिकतेने मात करायची ताकदही आपल्याला दिली आहे. हे आपल्यावर अवलंबून आहे की, आपण प्रलोभनांना बळी पडतो की त्यावर कल्पकतेने मात करून आपल्या अंतरातील नैतिकता वाढवतो. हिमालयाच्या देणग्यांचा वापर मी फक्त माणसाच्या स्खलनशीलतेसाठी केला, तर मी केवळ उपभोगी वृत्तीच वाढवेन. पण मी जर त्याच्या अस्तित्वाच्या मूळ स्रोतामागचे रहस्य जाणून घेतलं, तर माझ्यातील आनंद वाढवायला व समाजाला ते करून त्याची उपभोगप्रवणता कमी करायला मदत करेन. तूही तुझ्यातील सर्व शक्यतांचा शोध घेऊन त्यांचा वापर अधिकात अधिक स्वत:च्या आंतरिक समृद्धीसाठी कर. हा मार्ग आत्मनिग्रहातून जातो.

कृपया श्री.बिटमन यांना मी त्यांची आठवण केली होती असे सांग आणि तुला सवड असेल तेव्हा आश्रमात जाण्याची परवानगी दिल्याबद्दल माझ्या वतीने त्यांचे आभार मान.  

त्या तरुणाचा तुला आलेला अनुभव अनाकलनीय नाही. असं होतं खूपदा. दिसेल त्याला सुधारण्याच्या फंदात पडू नकोस. भेटलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना बदलण्याचा प्रयत्न उतावळेपणाने करू नकोस. असं केल्याने बऱ्याचदा ते लोक अधिकच बिथरतात. त्याऐवजी स्वत:तच बदल घडवून आण. सर्वांत सरळ मार्ग म्हणजे त्या लोकांना जाऊ दे, त्यांना गरज वाटेल तेव्हा ते पुन्हा येतील. मला कळत नाहीये की, मी तुला नीट समजावलंय की नाही. पण खात्री आहे की, तुझ्याच ते लक्षात येईल. जर ध्यानात आलं नाही, तर पुन्हा विचार.

तुझा- बापू

लाहोर

7-12-1919

माझ्या लाडक्या लेकी,

तुझी दोन्ही पत्रं मिळाली. एक मोठं नि दुसरं त्रोटक. बरं झालं तू लिहिलंस. तू आश्रमात आली आहेस ती ख्रिश्चन धार्मिकता सोडायसाठी नाही, तर तुझं धर्मज्ञान पूर्णत्वास नेण्याकरिता. प्रार्थनेत राम नि कृष्ण ही नावं तुझ्याकरिता ख्रिस्ताचीच प्रतिनिधी- दुसरी नावं आहेत. तुला जर किंचितही संकोच वाटत असेल, तर तू तिथे नाही आलीस तरी चालेल. तू स्वत:च्या कक्षात तुझी प्रार्थना म्हणत जा. प्रार्थना सभा ह्या तुला इथल्या कुठल्याही धार्मिक विचारांना अनुसरण्यासाठी नाहीत, तर स्त्री-पुरुषांना मुक्त करण्यासाठी आहेत. तेथील मुलांनी मात्र यायला हवं. आळसाने जर कुणी मुलं गैरहजर राहत असतील, तर त्यांनी हजर राहायलाच हवं. तुझ्याबाबत गैरसमज व्हायचा प्रश्न नाही. तुला जिथे कुठे बसून प्रार्थनेत शांती मिळत असेल, तिथे तू प्रार्थना करावीस हेच योग्य होय. आश्रमात राहून देवाचे सान्निध्य तुला जाणवेल, तेच करणे योग्य होय. रविवारी जर तुला चर्चमध्ये जाऊन साधना करण्यानं आनंद मिळत असेल, तर तू अवश्य जावंस.

तुझ्या त्या दीर्घ पत्राने मला प्रसन्न वाटलं. तुझ्या अंतर्मनात डोकावयाची संधी मिळाली. तुझं आश्रमात येणं माझ्या आनंदाचा ठेवा आहे. तुला इथं राहून जर शांती, आनंद नि समाधान मिळत असेल तर इतर ख्रिस्तीजनांना हे कळेल की, ख्रिश्चनेतर संस्थेतही परमेश्वराचे सान्निध्य जाणवू शकते. जीझसचे सत्य आणि प्रेम या ठिकाणीही प्राप्त होते. या गोष्टी विशिष्ट धर्माशीच निगडित नाहीत. सर्वच धर्मांत त्या समाविष्ट असतात.

तुझ्याप्रमाणे मलाही वाटते की, तू लगेच मद्रासला जाऊ नयेस. श्रीम.पॅटरसन तुला भेटायला येऊ शकतील का? त्या आल्या तर त्यांना आश्रमातील प्रगतीही कळेल आणि तू आता ठणठणीत बरी आहेस, हेही पाहता येईल. पण तू पूर्ण बरी झाल्याखेरीज आणखी कामं अंगावर घेऊ नकोस. इथल्या रहिवाशांना या हवेची सवय असते. बाहेरच्या हवामानाचा परिणाम त्यांना जाणवत नाही. तू स्वत:ची नीट काळजी घे, उगाचंच कामं न वाढवता स्वत:ला जप.

तुझा- बापू

आश्रम, साबरमती

30-4-1926

माझ्या लाडक्या लेकीस,

तुझं पत्र मिळालं. तुझ्या तब्येतीमुळे मी चिंतित आहे. तू पुन्हा तुझा उत्साही, आरोग्यपूर्ण तजेला मिळवावास यासाठी मी प्रार्थना करतो.

मेरी पॅटरसनच्या शाळेची अवस्था वाचून खंत वाटली. तुला हवं तसं सूत कधी मिळेल याचा मला अंदाज नाही. तू सुचवलेल्या मुलींकडून तर ते मिळालेलं नाही. तुला हवं तसं वापरलेलं खादीचं कापड पुष्कळ मिळू शकेल. तुझ्या बाळाच्या लंगोटासाठी मऊ खद्दरच कापडच हवं. तुला किती वार हवंय ते कळवलंस, तर तशी मी पाठवण्याची व्यवस्था करीन. वापरलेल्या खादीची किंमत ठरवणं अवघड आहे. तुला किती लागेल ते कळव. किमतीबाबत चिंता नको. नि:संकोच कळव.

मला हे वाचून खूप समाधान वाटलं की डॉ.के * गरीब रुग्णांना मदत करतोय. तुम्हा दोघांचं कमीत भागत असेल, तर मग पैसे किती मिळतात, याचा सेवाकामात मग्न असताना विचार करायला नको.

अँड्र्यूज बॉम्बेला उद्या पोहोचतोय.

तुझा- बापू

(*के- डॉ. कुन्ही मेनन- एस्थरचे पती)

Tags: सदर गांधींचे गारुड संजीवनी खेर sadar sadhana series gandhinche garud sanjivani kher weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके