डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्टेजच्या मागे असणाऱ्या पांढऱ्या पडद्यावर डाव्या बाजूस पाकिस्तान आणि उजव्या बाजूस भारताचा ध्वज सेफ्टी पिनने लावला जाणार होता. आम्ही राहतो तो सगळा दूतावासांचा एरिया आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, रशिया, पाकिस्तान यांचे दूतावास शब्दश: पाच मिनिटं चालण्याच्या अंतरावर आहेत. आमची पाकिस्तानी पब्लिक 14 ऑगस्टला सकाळी पाक हायकमिशनमध्ये गेली होती. पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम त्यांनी अटेंड केला आणि येताना पाकिस्तानी फ्लॅग घेऊन आले. त्यांच्याच मापाचा तिरंगा शोधताना आमची मात्र दमछाक झाली. कार्यक्रमाच्या धावपळीत झोप आणि जेवण अनियमित तर होणारच होतं. ज्यांना शक्य असेल त्यांनी कुर्ता घालायचा असं ठरलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी वजिराला व्यासपीठावर जायचं होतं तेव्हा मी त्याला माझा कुर्ता दिला आणि त्याचा टी-शर्ट मी घातला.बहुतांशी पब्लिक कॅज्युअल कपड्यांतच कार्यक्रमाला आली होती.

साऊथ एशियन युनिव्हर्सिटीच्या सध्याच्या कॅम्पसमध्ये म्हणजे चाणक्यपुरीतील अकबर भवनच्या सहाव्या मजल्यावरील लॉबीत मी, हेरॉक, झैमम अब्बास आणि अनिकेत बसलो होतो. हेरॉक आसामचा. झैमम पाकिस्तानचा. साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये पन्नास टक्के विद्यार्थी भारतीय आहेत आणि ऊर्वरित पन्नास टक्के अ-भारतीय, पण ‘सार्क’ संघटनेचे सदस्य राष्ट्रांतील विद्यार्थी. त्यामुळे आमच्या आजूबाजूस श्रीलंका, मालदीव, भूतान, बांगला देश, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे विद्यार्थी सतत असतात.

त्या राष्ट्रांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे, पण पाकिस्तानी विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. व्हिसा, मानसिकता, सुरक्षितता इत्यादींशी संबंधित कारणे यामागे आहेत. जे फार कमी पाकिस्तानी इथे आहेत. त्यापैकी झैमम अब्बास एक.युनिव्हर्सिटीमध्ये आपण भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काहीतरी करायला हवं अशी चर्चा आमची चालू होती. दिवस होता, शुक्रवार (11 ऑगस्ट) आणि वेळ, रात्रीचे अडीच. मागच्या वर्षी युनिव्हर्सिटीमधील मुलं रहायला सेंटॉर हॉटेलमध्ये होती. ते फाईव्ह स्टॉर हॉटेल आहे. 1982च्या दिल्ली एशियन गेम्ससाठी ते बांधलं गेलं होतं.

आमची युनिव्हर्सिटी नवीनच आहे. 2010 पासून लेक्चर्स सुरू झाली आहेत. स्वत:चा कॅम्पस नसल्याने मुलांना तात्पुरतं सेंटॉरमध्ये ठेवलं होतं. तिथे त्यांनी मागच्या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम केला होता. पण तो अक्षरश: अर्ध्या दिवसाच्या तयारीवर साकारला होता. त्या कार्यक्रमात पहिला पाऊण तास म्हणजे 14-15 ऑगस्टच्या रात्री 11.15 ते 12. पाकिस्तानी कार्यक्रम होते आणि 12 ते 12.45 भारतीय कार्यक्रम होते. त्या कार्यक्रमात जीना आणि नेहरूंची 1947 सालची भाषणं वाचून दाखवण्यात आली होती. इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम आणि थोडेफार फोटो आणि स्नॅक्स. बस्स कार्यक्रम संपला.

या वर्षी आपण जरा चांगली तयारी करू शकतो याचा धीर यायला कारणीभूत ठरली 12 ऑगस्ट शनिवारी रात्री डिनरनंतरची कँटीनमधली मीटिंग. कँटीनमधल्या जेवणाचा दर्जा भिकार असला तरी एसीमुळे तिथे बसणं सुखकारक असतं. त्या मीटिंगला पंधरा-वीस जण होते. इतर युनिव्हर्सिटीसाठी पंधरा-वीस ही संख्या कमी असेल पण ज्या युनिव्हर्सिटीत सध्या अंदाजे 300 मुलं शिकतात आणि जिथे देशाच्या, साऊथ एशियाच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या मुलांना एकमेकांना भेटून पंधरा दिवस पण झाले नाहीयेत अशा कन्टेक्स्टमध्ये या संख्येला महत्त्व प्राप्त होतं.

अजून तर इथे ‘जोड्या’ पण बनल्या नाहीयेत. कदाचित त्या बनण्याचा मार्ग अशा कार्यक्रमांतूनच जातो. भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चा! कार्यक्रमाचं गांभीर्य आणि महत्त्व सर्वांनाच पटलेलं होतं. त्यामुळे कोणतीही वादग्रस्त कृती होता कामा नये याची दक्षता घेतली जाणार होती.

आमच्या अकबर भवनमध्ये आठव्या आणि नवव्या मजल्यावर परराष्ट्र मंत्रालयाची आणि अनिवासी भारतीय कार्य मंत्रालयाची ऑफिसेस आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम बाहेर सुरस चर्चेचे विषय बनू शकतात याची पक्की जाण असल्याने मीडियाला प्रवेश द्यायचा नाही हा अलिखित संकेत सर्वांनाच मान्य होता.

त्याच मीटिंगमध्ये कामाची विभागणी करून त्यानुसार तीन समित्या बनल्या. मॅनेजर, स्टेज आणि कल्चरल. प्रत्येक समितीचे दोन को-ऑर्डिनेटर. एक भारतीय आणि एक पाकिस्तानी. ॲकॅडेमिक वर्ष नुकतंच सुरू झालेलं असल्याने अजून मुलं दिल्लीत आणि युनिव्हर्सिटीत पुरेशी रुळलेली नाहीत. अजून तर फ्रेशर्स पार्टी पण झालेली नाहीये. अशा नव्या वातावरणात असला कार्यक्रम करणं म्हटलं तर सोपं म्हटलं तर कठीण. सीनियर्स बरेच होते, कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये. पण तरीही असा कार्यक्रम उभा करणं हे एक इंटरेस्टिंग काम होतं. मी अर्थातच मॅनेजमेंट कमिटीत होतो. आर्थिक, रिफ्रेशमेंट आणि प्रसिद्धीविषयक जबाबदाऱ्या आमच्याकडे होत्या.

रविवारी रात्री आम्ही उपाहारासाठी काय आणणार आहोत, अंदाजे उपलब्ध होणारी रक्कम आणि मुलांची संख्या याबाबत आमच्याकडे स्पष्टता होती. पाकिस्तानी कल्चरल कार्यक्रम तर शनिवारी रात्रीच ठरले होते. संख्या अत्यंत मर्यादित असल्यामुळे त्यांना कार्यक्रमांसाठी कोणाला घ्यावं/नको असा प्रश्नच नव्हता. जवळपास सगळ्यांनाच सहभागी व्हावं लागणार होतं. याउलट स्थिती होती भारताची. गाणी कोणती निवडावी, डान्स असावा की नको, कोणाला घ्यावं असे मतभेदाचे अनेक मुद्दे होते. ग्रुप साँगसाठी पुरुष गायक मिळत नव्हते. अँकरिंग कोणी करावं असा प्रश्न होता.

कार्यक्रमासाठीचे पैसे फक्त भारतीय आणि पाकिस्तानी मुलांकडूनच जमा करायचे असं ठरलं होतं. त्यासाठीच्या नोटिसा हातानेच तयार करून लावाव्या लागल्या, कारण तो दिवस रविवारचा होता. काही लोकांनी 100 रुपये प्रत्येकी या रकमेला आक्षेप घेतला. मग आम्ही त्यांना नोटिसवरील व्हॉलंटरी(ऐच्छिक) हा शब्द दाखवला.

काही अ-भारतीय आम्हांला पैसे देण्यास प्रचंड उत्सुक होते- खरं तर काही (बऱ्याच) भारतीयांपेक्षा जास्त. मग त्यांना न दुखावता आम्हांला नकार द्यावा लागला. ज्या मुलांचे/मुलींचे गर्लफ्रेंडस्‌/बॉयफ्रेंडस्‌, भारतीय/पाकिस्तानी आहेत, त्यांनी पैसे द्यायला हरकत नाही अशीही कल्पना एकाने मांडली होती. अशा भन्नाट कल्पना कदाचित अजून मोठ्या प्रमाणावर येऊ शकल्या असत्या. परंतु तितका वेळच मिळाला नाही.

सोमवारी सकाळी विद्यापीठ प्रशासनाला आणि कुलगुरूंना (सार्क विद्यापीठाच्या पदावलीनुसार प्रेसिडेंट) कार्यक्रमाची कुणकुण लागली. प्रेसिडेंट डॉ.चढ्ढा सरांनी अनिकेत आणि संदीपला (तो आंध्र प्रदेशचा आहे) बोलावून घेतलं. कार्यक्रमाचा रूपरेषा स्पष्ट होताच त्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला. स्वत: येण्याचं आश्वासन दिलं. नाही म्हटलं तरी ते थोडंसं अनपेक्षित होतं.

विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी, उपलब्ध होऊ शकणारी साधनं, आमच्या गरजा याबाबतच्या वाटाघाटी मंगळवारी संध्याकाळपर्यंत चालू होत्या. कार्यक्रमाचा सीरियसनेस आणि सेन्सिटिव्हिटी लक्षात घेता या कीस काढणाऱ्या वाटाघाटी आवश्यकदेखील होत्या. कोणत्याही वादग्रस्त गोष्टीची जबाबदारी युनिव्हर्सिटीवर आली असती- जे आम्हांला आणि युनिव्हर्सिटीला पण टाळायचं होतं.

मेस कमिटी आणि इतर पराक्रमांमुळे विख्यात राहुल श्रीवास्तवला आमच्यात यायचं होतं, पण त्याचा एकूण स्वभाव लक्षात घेता तो प्रचंड त्रासदायक ठरणार होता. तसंच युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांना पण राहुल चालला नसता हे आम्हांला माहीत होतं. या राहुलसाहेबांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या.दलबीर भंडारी यांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालय, हेग येथील नेमणुकीला आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती याचिका स्वीकारलीच गेली नाही हा भाग वेगळा.

राहुलला मॅनेजमेंट कमिटीत यायचं होतं, पण ते धोकादायक होतं, त्यामुळे अनिकेतने मुत्सद्देगिरीने त्याची निरुपद्रवी, तुलनेने कमी महत्त्वाच्या अशा, स्टेज कमिटीत वर्णी लावली. त्याने पैसेही जमा केले होते, पण अनिकेतने त्याला तपशिलासह पैसे देण्यास सांगितल्यावर त्याने शाब्दिक होकार दिला. कार्यक्रमासाठी पैसे कमी पडले असते तर स्वत:च्या खिशातून ते भरण्याची आमची तयारी होती, इन फॅक्ट, आमच्या सोशल सायन्सेस विभागाचे श्रीलंकन विभागप्रमुख, सोशल अँथ्रॉपॉलॉजिस्ट ससांका परेरा यांनी फॅकल्टीकडून पैसे जमा करण्याची सूचना केली होती.

पैसे मागण्याच्याबाबत भिडस्त असणारा मी या कार्यक्रमासाठी आमच्या फर्स्ट इयरवाल्यांकडून दीड हजार जमा करू शकलो. काही जणांनी नेहमीप्रमाणेच शाब्दिक आश्वासन दिलं. जी मुलं पैसे देणार नाहीत असं वाटत होतं त्यांनीही पैसे दिले.

या पैसे मिळवण्याच्या मोहिमेतच मला काश्मीरचा वासीक भेटला. तो पुण्यात डीईएस लॉ कॉलेजचा पासआऊट. म्हणजे आम्ही एकाच कँपमसमध्ये वावरलेलो. त्याच्याशी पुण्याच्या आठवणी निघाल्या. ई-स्क्वेअर, एफ.सी.रोड, एम.जी.रोड, दुर्गा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गुडलक.

14-15 ऑगस्ट जरी पाकिस्तान-भारतासाठी आनंदाचे दिवस असले तरी बांगला देशासाठी तो काळा दिवस असतो. त्याच दिवशी 15 ऑगस्ट 1975 रोजी लष्करी उठावानंतर बांगला देशचे राष्ट्रपिता शेखर मुजिबूर रेहमान यांची हत्या करण्यात आली होती.

आम्ही सर्व फॅकल्टीज्‌साठी तसंच विद्यापीठीय प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी आमंत्रणपत्रिका तयार केल्या होत्या. डिपार्टमेंट वाईज त्या मुलांना देऊन त्यांच्याद्वारे फॅकल्टीपर्यंत पोहोचवाव्या असा आमचा प्लॅन होता.

बायोटेकच्या तीन बांगलादेशी मुलांनी त्या पत्रिका नेण्यास नकार दिला. कारण काळा दिवस. हा प्रसंग पाहणाऱ्या माझ्याच वर्गातल्या बांगलादेशच्या ‘ओपु’ने त्याच्या माहितीतल्या एका बायोटेकच्या मुलीला त्या पत्रिका त्यांच्या फॅकल्टीपर्यंत पोहोचविण्यास सांगितलं. तिने ते मान्य केलं. ती पण बांगलादेशी! कार्यक्रम जरी भारत-पाकचा असला तरी त्याचं आमंत्रण सर्वांनाच होतं आणि तसंच असायलाही हवं होतं.

मंगळवारी कार्यक्रमाच्या तयारीची धांदल उडाली असताना तळमजल्यावरील फॉरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये नेपाळवर लेक्चर/डिस्कशन होतं. जनरल अशोक मेहता, के.एम.चिनॉय अशी डॉन मंडळी डिस्कशन पॅनेलमध्ये होती.

अनिकेत त्या आघाडीवर पण लढत होता. तो कार्यक्रम संपायला उशीर होऊ लागला तसे स्टेजवाले अस्वस्थ होऊ लागले. त्या हॉलसमोरच स्टेज तयार करायचं होतं. पण कार्यक्रम संपल्याशिवाय स्टेज उभारता येणार नव्हतं. स्टेजचं सामान घेऊन येणारी माणसं त्यांना सिक्युरिटी क्लिअरन्ससाठी खोळंबावं लागल्यामुळे आधीच वैतागली होती. त्यात हा विलंब.

स्टेजच्या मागे असणाऱ्या पांढऱ्या पडद्यावर डाव्या बाजूस पाकिस्तान आणि उजव्या बाजूस भारताचा ध्वज सेफ्टी पिनने लावला जाणार होता. आम्ही राहतो तो सगळा दूतावासांचा एरिया आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, रशिया, पाकिस्तान यांचे दूतावास शब्दश: पाच मिनिटं चालण्याच्या अंतरावर आहेत.

आमची पाकिस्तानी पब्लिक 14 ऑगस्टला सकाळी पाक हायकमिशनमध्ये गेली होती. पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम त्यांनी अटेंड केला आणि येताना पाकिस्तानी फ्लॅग घेऊन आले. त्यांच्याच मापाचा तिरंगा शोधताना आमची मात्र दमछाक झाली.

कार्यक्रमाच्या धावपळीत झोप आणि जेवण अनियमित तर होणारच होतं. ज्यांना शक्य असेल त्यांनी कुर्ता घालायचा असं ठरलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी वजिराला व्यासपीठावर जायचं होतं तेव्हा मी त्याला माझा कुर्ता दिला आणि त्याचा टी-शर्ट मी घातला. बहुतांशी पब्लिक कॅज्युअल कपड्यांतच कार्यक्रमाला आली होती.

शार्प अकराला प्रेसिडेंट चढ्ढा सर अकबर भवनमध्ये आले आणि आम्हांला दुहेरी धक्का बसला. ते रात्री अकराला खास आले याचा पहिला आणि आमची अजून तयारी पूर्ण नाही याचा दुसरा. सव्वाअकरा ते बारा पाकिस्तानकडे सूत्रं होती. त्यांनी दोन गाणी-दोन भाषणं, एक डॉक्युमेंटरी सादर केली. त्या डॉक्युमेंटरीमधून पाकिस्तानी कला, संस्कृती, खेळविषयक ‘चांगल्या’ गोष्टी दाखवण्यात आल्या.

पाकिस्तानी संसदेत महिलांचं प्रमाण कसं जास्त आहे आणि पाकने कसा 1992 चा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला वगैरे... ते बघताना मला सलमान तसीरची हत्या आठवत होती. तिथे असणारी विजेची टंचाई, पाकवरील आर्थिक आणि मूलतत्त्ववादी संकट समोर दिसत होतं. त्यांच्या ‘दिल दिल पाकिस्तान’ गाण्याला नेपाळचा सौरभ गिटार वाजवत साथ देत होता.

पाक ग्रुपमधील एकमेव मुलगी, सुंदर नसलेली, पण आकर्षक असणारी, सुम्बल खान-चौधरी हिच्यासाठी तो लेक्चर्स बुडवून गाण्याचा सराव करीत होता अशी चर्चा वातावरणात होती. पाक ग्रुपमधील सगळ्यांनी पांढरे कुर्ते आणि हिरवे स्कार्फस गळ्यात घातले होते. पाकिस्तानला जगात सर्वत्र दहशतवाद्यांचं समर्थक राष्ट्र- व्हिलन- अशी वागणूक दिली जात आहे. कुठेतरी मला असा संशय आला की, या मुलांचा, आपला देश चांगला आहे, नॉर्मल आहे हे, सांगण्याचा तर प्रयत्न चालू नाही ना!

कळत-नकळत असं घडू शकतं. त्यांना ते करण्याचा पूर्ण अधिकारसुद्धा आहे. मुद्दा आहे- आपण दिसतंय ते केवळ त्याच्या फेसव्हॅल्यूवर स्वीकारतो की त्यापलीकडे जातो. बारा ते एक सूत्रं भारताकडे होती. भारतीयांनी ‘सारे जहांसे अच्छा’ आणि ‘छोडे कलकी बाते’ ही ग्रुपसाँग्स, दोन सोलो गाणी सादर केली. इराम खान नावाच्या मुलीने इंग्रजी तर एका मुलाने हिंदी भाषण केलं. नफिसने एक कविता सादर केली. एक स्लाइड शोही होता. नोंदवण्यासारखी गोष्ट अशी की, दोन्ही बाजूंच्या कार्यक्रमाचा आशय साधारणत: सारखाच असला तरी भारतीयांच्या भाषणामध्ये आत्मटीकेचा सूर लागला होता.

भारताच्या प्रगतीबाबत अभिमान व्यक्त करतानाच इथल्या गरिबांच्या प्रचंड संख्येबाबत विषण्णताही बाहेर आली. भारतीयांपेक्षा पाकिस्तानी परफॉर्मन्सेस तुलनेने अधिक सफाईदार होते. ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं चालू असताना एकजण दुसऱ्याला सांगत होता की, अरे इतकं स्वातंत्र्य तर भारतातच मिळू शकतं. निदान या कारणासाठी तरी मला भारताचा अभिमान आहे.

कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेता व्हिडिओ आणि फोटोग्राफी बॅन करण्यात आली होती. एकच अधिकृत कॅमेरामन ठेवण्यात आला होता. भारतीय परफॉर्मन्सेसनंतर श्रीलंकेचा वजिरा, अफगाणिस्तानचा नासेर आणि नेपाळचा सुजित यांनी त्यांची मनोगतं व्यक्त केली. त्यांचा आशय एकूण प्रशंसेचा असला तरी ती केवळ भिडेखातर केलेली प्रशंसा नसावी असा माझा अंदाज आहे.

तिथे कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष सादरीकरणापेक्षा त्यामागील भावनेला महत्त्व होतं. आपलं शेड्युल ॲडजस्ट करून आलेल्या चढ्ढा सरांच्या उपस्थितीबाबत व्यक्त होणारं समाधान होतं. आपल्या विद्यापीठाचे प्रेसिडेंट अशा कार्यक्रमाण येणं ही निश्चितच मनोधैर्य वाढवणारी गोष्ट असते.

त्यांच्यानंतर चढ्ढा सर बोलले. त्यांच्या भाषणातील हम ही हम है तो क्या हम है, तुम्ही तु हो क्या तु हो हा शेर चांगलाच लक्षात राहिला. कार्यक्रमानंतर आम्ही रिफे्रशमेंटची व्यवस्था केली होती. दहा किलो मिल्क केक्स, फरसाण आणि 25 बाटल्या (दोन लिटरच्या) कोल्ड्रिंक्स असा बेत होता. मॅनेजमेंट टीमच्यामुळे सर्वांना खायला आणि प्यायला मिळू शकलं. फक्त मॅनेजमेंट टीमचे काही लोक स्वत: खायला मात्र विसरले.

त्यानंतर मग नाच, गाणी, गप्पा करीत पब्लिक अडीचपर्यंत रेंगाळली. पब्लिकला नाचताना पाहून मी कधीच नाचत नाही, पण मला इतरांना नाचताना पाहायला आवडतं. मुकुंद टाकसाळेंच्या शब्दांत मी लतावादी आहे, पण मला आशावादी लोकं आवडतात. रात्री झोपताना तर असंही एकदा वाटलं की, हा कार्यक्रम केवळ डान्समुळे लोकांच्या लक्षात राहतोय की काय? खरंच पब्लिक बेभान आणि बेहोष होऊन नाचली होती.

मग आमचे पोस्ट- कार्यक्रम काम सुरू झाले. खुर्च्या, कचरा, स्टेजची आवराआवरी. ते उरकण्यास पावणेचार वाजले. मग कँटीन. सध्या रमजानचा महिना चालू असल्याने मुस्लिम मुलांसाठीचं पहाटेचं जेवण ‘सेहरी’ सर्व्ह होत होती. आम्ही एसीत रेंगाळलो. खुर्चीत घरंगळलो. रिलॅक्स झालो. सतत धावपळ करावी लागल्यामुळे मला, संदीपला आणि अनिकेतला कार्यक्रमाचा आस्वाद घेताच आला नव्हता. पण तो नीट पार पाडला या समाधानातच पहाटे साडेपाचला झोपलो.

आमच्या कार्यक्रमामुळे भारत-पाकिस्तानमधील प्रश्न सोडवण्यास आपण हातभार लावत आहोत असली भाबडी समजूत आमची कोणाचीच नव्हती, निदान भारतीय बाजूने तर नाहीच नाही.

या कार्यक्रमाच्या काळातच आसाममध्ये हिंसाचार, मुंबईतील ‘घटना’ घडत होत्या. पाकिस्तानी बाजूने सत्तर टक्के हिंदू तर भारतीय बाजूने वीस टक्के मुस्लिम परफॉर्मर्स होते. कोणीच कोणाच्या निष्ठांविषयी शंका व्यक्त केल्या नाहीत. तशा त्या व्यक्त करणं योग्यही नसतं.

भारत-पाकिस्तानमध्ये असणारे तणावपूर्ण संबंध हा दक्षिण आशियाचं युरोपच्या धर्तीवर प्रादेशिक एकीकरण होण्यास असणारा मोठा अडथळा आहे अशी भावना त्यांच्या शेजारी राष्ट्रांत वसते आहे. त्यामुळेच कदाचित सुजित, नासिर, वजिरा यांना ‘असे’ कार्यक्रम स्वागतार्ह वाटत असावेत. हेरॉकने कॉम्पिअरिंग करताना सर्वांना ‘हॅलो, साऊथ एशियन्स’ असं संबोधण्यास म्हणूनच वेगळं महत्त्व प्राप्त होत असतं.

गेल्या वीस वर्षांत जवळ आलेल्या जगात आयडेंटिटीचे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे बनताना दिसत आहेत. एकाच वेळी जुन्या आयडेंटिटीज मागे पडत आहेत आणि घट्टही होत आहेत.मी महाराष्ट्राचा, भारताचा, हिंदू, पुरुष अशा आयडेंटिटी संवाद साधण्यास, व्यक्तिमत्त्व विकासास पूरक ठरणं आणि मारक असणं यांतील डिव्हायडिंग लाइन बरीच थिन आहे. सहानुभूतीने इतरांचे दृष्टिकोन समजावून घेणं, त्यांना आपल्यात शक्य तेवढे सामावून घेणं हा ग्लोबल नागरिक बनण्यातला छोटाच पण महत्त्वाचा टप्पा आहे. साऊथ इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये होणारा असा कार्यक्रम कदाचित हेच सांगत असतो.

Tags: नेपाळ बांगलादेश भूतान मालदीव श्रीलंका Nepal Bangladesh Bhutan Maldives Sri Lanka weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके