डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जुलैमध्ये मी अस्सल पुस्तकप्रेमी असल्याचे दाखवून दिले- मी लायब्ररीमधून ‘एकूण कविता - 1’ ढापले(!) त्याच्या ब्लर्बवर विंदांनी लिहिलेले ‘एक दिलीप चित्रे हा मराठी भाग्ययोग, पण दहा दिलीप चित्रे ही मात्र महाभयंकर गोष्ट ठरेल’. ऑगस्टमध्ये ‘पुन्हा तुकाराम’ घेतले आणि पूर्ण वाचले! कारण ‘एकूण कविता 1’ आणि ‘एकूण कविता 2’ एका मर्यादेनंतर मला समजतही नव्हती. 9 सप्टेंबर 2009 रोजी ‘एकूण कविता 3’ घेतले. 21 सप्टेंबर 2009 रोजी ‘साहित्य आणि अस्तित्वभान- 1’ घेतले. त्या पुस्तकाला असलेली प्रा.प्रभाकर बागलेंची प्रस्तावना. ते पुस्तक मला फेब्रुवारी 2009 पर्यंत पुरले. परत परत वाचत होतो

नववी, दहावी आणि त्याच्या आसपासची वर्ष जरा वेगळी असतात. मुलांना करिअरची चिंता लागलेली असते. त्याहून जास्त ती पालकांना असते. मुलं बदलत असतात, त्यांचा स्पेक्ट्रम रूंदावत असतो. अशा वातावरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते- मुलं बंडखोर बनायचा प्रयत्न करतात. आपली आयडेंटिटी शोधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रस्थापित बाबींना धिक्कारण्यासाठी काहीही करतात.

माझ्या आजूबाजूचे वातावरण आस्तिक, श्रद्धाळू असल्याने मी बंडखोर(!) बनावे तर नास्तिक असणे स्वाभाविक होते. मग देवळासमोर जाऊन पण आत न जाणं, ‘देव काय कामाचा’ अशां सारख्या सिली पण सो कॉल्ड बंडखोर गोष्टी करायचो. दहावीमध्ये तर जास्तच. मराठी या विषयाची पुस्तकं (अभ्यासक्रमातली) चांगली असू शकतात, हा दहावीत आल्यानंतर बसलेला एक धक्का होता. ते पुस्तक नुसतंच चांगलं नव्हतं तर वाचनीय पण होतं, आणि महत्त्वाचं म्हणजे ‘बोरिंग’ नव्हतं.

‘कोसला’, ‘मधुकर’सारख्या पुस्तकांतून घेतलेले पॅसेज; आरती प्रभू, केशव मेश्राम, मर्ढेकर, इंदिरा संत इत्यादींच्या कविता. पण सर्वांत जास्त आवडलेल्या दोन कविता- ‘देवा, ह्याही देशात पाऊस पाड’ आणि ‘झाड झाड मुके’. कवी अनुक्रमे दि. पु. चित्रे आणि चंद्रकांत पाटील.

‘देवा ह्याही देशात पाऊस पाड’ ही कविता तर भन्नाट. देव न मानणं ही आमची तेव्हाची फॅशन. आणि हा कवी तर देवाकडेच काहीतरी मागतोय. अभ्यासासाठी आणि मोअर दॅन दॅट मार्कांसाठी ती कविता अभ्यासलीच पाहिजे. मग पूर्व व मुख्य परीक्षा, तीन महिन्यांची सुट्टी असं करत करत दहावी सरली. अकरावीचे पहिले तीन महिने पण संपले. डोक्यात वेगळाच गुंता होता. आधीचा खुळेपणा हरवला होता.

मामाकडे एका दुपारी त्यांची पुस्तकांची लिस्ट करताना एकूण कविता- 1, आणि एकूण कविता -2, चतुरंग ही तीन पुस्तके दिसली. बाकीची मजा तर होतीच, पण त्या दुपारी दि. पु. चित्रे नावाची नव्याने ओळख झाली. मग ‘चतुरंग’ तीन वेळा वाचणे इत्यादी बाबी झाल्या. 15 डिसेंबर 2007 रोजी ‘मर्ढेकरांच्या कादंबऱ्या’ घ्यायला गेलो असताना ‘एकूण कविता 3’ दिसले. घेण्यासाठी पैसे तर जवळ नव्हतेच, मनात मात्र होते की हे घ्यायचे आहे.

पुन्हा दोन महिने गेले. 11 फेब्रुवारी 2008 रोजी पुस्तक घ्यायला बाहेर पडलो. वॉल्ट व्हिटमन, निस्सीम एझिकिएल यांच्या साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या कविता घेतल्या. व्हॉट अबाऊट चित्रे? दादरहून आम्ही डोंबिवलीला आलो. तिथे ‘एकूण कविता 2’, ‘मर्ढेकरांची कविता’ घेतले. मी विकत घेतलेले पहिले पुस्तक चित्रेंचे.

मध्यमवर्गाला साधारणत: ऑपरच्युनिस्टीक म्हटले जाते. ते म्हणे इंटेलेक्च्युअल म्हणून ते कोणाचे भक्त असणं हे सहसा घडत नाही. मी मध्यमवर्गीय घरातला असूनही, चित्रेंवर भक्ती करायला लागलो होतो. त्यांचं मिळेल ते वाचण्याचा प्रयत्न होता.

जुलैमध्ये मी अस्सल पुस्तकप्रेमी असल्याचे दाखवून दिले- मी लायब्ररीमधून ‘एकूण कविता - 1’ ढापले(!) त्याच्या ब्लर्बवर विंदांनी लिहिलेले ‘एक दिलीप चित्रे हा मराठी भाग्ययोग, पण दहा दिलीप चित्रे ही मात्र महाभयंकर गोष्ट ठरेल’. ऑगस्टमध्ये ‘पुन्हा तुकाराम’ घेतले आणि पूर्ण वाचले! कारण ‘एकूण कविता 1’ आणि ‘एकूण कविता 2’ एका मर्यादेनंतर मला समजतही नव्हती. 9 सप्टेंबर 2009 रोजी ‘एकूण कविता 3’ घेतले. 21 सप्टेंबर 2009 रोजी ‘साहित्य आणि अस्तित्वभान- 1’ घेतले. त्या पुस्तकाला असलेली प्रा.प्रभाकर बागलेंची प्रस्तावना. ते पुस्तक मला फेब्रुवारी 2009 पर्यंत पुरले. परत परत वाचत होतो.

चित्रेंची पुस्तकं नुसती दिसली तरी ती हातात घेऊन काहीतरी वाचण्याचा मोह व्हायचा. शेवटी बारावीची परीक्षा आहे, या कारणावरून मी ती पुस्तकं एका अनरिचेबल अशा (पण मला माहीत असलेल्या!) जागी ठेवली.

त्यानंतर वाचू या, वाचू या करीत राहिलो. ऑक्टोबर 2008 मध्ये आलेली त्यांची रविवार टाईम्समधील मुलाखत ‘कविता स्वत:तच मोठी किंवा लहान असते’ जपून ठेवली आहे आणि आता बातमी- चित्रे गेले.

प्रचंड ऑल राऊंडर असे हे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांचे टीकाकार, समर्थक, समीक्षक जे काम करतील ते करू देत. आम्ही मनात त्यांची पूजा बांधत होतो. ते गेले. आता त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही. पण साध्या, सरळ कविता समजल्या म्हणून कधी हवेत गेलो तर जमिनीवर आणण्याचे काम चित्रेंच्या कविता करतात. अशा प्रकारची कविता पण असते ही जाणीव निर्माण करण्याचे काम चित्रेंच्या कविता करतात. स्वत:चा क्षूद्रपणा जाणवून देण्याचे काम चित्रेंच्या कविता करतात. मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम चित्रेंच्या कविता करतात.

‘एकूण कविता 3’ या पुस्तकातील पहिलीच कविता आहे ‘मला आस होती नभे धुंडण्याची’. चित्रेच्या कवितातील ‘नभ’ शोधणे हीच आता आम्हाला पण लागलेली आस आहे.

Tags: मराठी कवी लेखकाविषयी आठवणी कवितासंग्रह कवी लेखक साहित्य अस्तित्वभान एकूण कविता दि. पु. चित्रे दिलीप पुरूषोत्तम चित्रे   Marathi Poet All Rounder poet Writer Di. Pu. Chitre D. P. Chitre weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके