डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

‘आउटलुक’मध्ये चांगल्या वाचकांना वाचायला आवडेल असा वैचारिक कंटेंट आकर्षक पद्धतीने मांडल्यामुळे आणि ‘फ्रंटलाईन’ इतकी एकारलेपणाची भूमिका न घेतल्यामुळे त्यातील लेखन गांभीर्याने घेतले गेले. त्यामुळे रामचंद्र गुहा, जे.एन.दीक्षित, सुनील खिलनानी, मार्क टुली, पंकज मिश्रा वगैरे लेखकांनी ‘आउटलुक’मध्ये सातत्याने लिहिलेले आहे.

पत्रकारितेत थेट प्रवेशच ‘संपादक’ म्हणून होण्याचे भाग्य फार कमी जणांच्या वाट्याला येते, अशा फार थोड्या लोकांपैकी एक असलेले ‘विनोद मेहता’ वयाच्या ७३ व्या वर्षी ८ मार्च २०१५ रोजी हे जग सोडून गेले. विनोद मेहतांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या पत्रकारितेत सहा नियतकालिकांचे संपादन केले आणि सहा पुस्तके (त्यामध्ये संजय गांधी आणि मीनाकुमारी यांची चरित्रे) लिहिली. पण त्यांचे खरे कर्तृत्व हे नव्हे. त्यांची खरी कर्तबगारी सहाही नियतकालिके मुळापासून उभी करण्यात आणि (त्यापैकी तीन) यशस्वी होताच त्यापासून स्वतःला दूर करून नवे आव्हान शोधण्यात होते.

मेहतांचा जन्म जरी रावळपिंडी येथील असला तरी फाळणीमुळे त्यांचे कुटुंब लखनौमध्ये स्थायिक झाले. त्यामुळेच त्यांनी आपल्या आत्मचरित्राचे नाव ‘लखनौ बॉय’ असे ठेवले होते. पत्रकार-संपादकांची आत्मचरित्रे कधीही बेस्टसेलर होत नाहीत, पण मेहतांचे पुस्तक त्याला अपवाद होते. तसे मेहताही आपल्या नजरेसमोर येतात त्या संपादकांच्या इमेजपेक्षा भिन्न प्रकृतीचे होते. आपल्या माहितीतले यशस्वी संपादक हे उत्तम वाचक, चांगले लेखक आणि एका व्यापक संदर्भात समाजशिक्षक होते. त्यांचा राज्यकर्त्यांवर दरारा होता आणि त्यांच्या मताला (लेखणीला) किंमत होती उदा. फ्रँक मोरेस, शामलाल किंवा गोविंद तळवलकर. पण मेहता ना असे उत्तम वाचक होते, ना पारंपारिक अर्थाने चांगले लेखक होते.

त्यांचा संपादक म्हणून थोडाफार प्रभाव राज्यकर्त्यांवर असला तर तो त्यांच्या मतांमुळे नाही, त्यांच्या नियतकालिकांमुळे होता. पण तरीही ते (अंकाचा खप आणि लोकप्रियता या दृष्टीने) एक यशस्वी संपादक म्हणून ओळखले जात होते. मेहतांचा पत्रकारितेतील खरा काळ हा १९७४ ते २०१२ पर्यंतचा. त्यापैकी पहिली सोळा वर्षे ते मुंबईमध्ये तर शेवटची बावीस वर्षे दिल्लीत कार्यरत होते. त्यांच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी ‘डेबोनेअर’ या मासिकाचे (सहा वर्षे), ‘संडे ऑब्झर्वर’ या भारतातील पहिल्या साप्ताहिक वृत्तमासिकाचे  आणि ‘इंडियन पोस्ट’ व टाईम्स समूहाच्या ‘दी इंडीपेंडेंट’ या वृत्तपत्रांचे संपादन केले. तर दुसऱ्या टप्प्यात ‘पायोनिअर’ या दैनिकाचे दीड-दोन वर्षे आणि ‘आउटलुक’ या साप्ताहिकाचे सतरा वर्षे संपादन केले.

त्यांनी संपादित केलेल्या सहापैकी ‘डेबोनेअर’, ‘संडे ऑब्झर्वर’ आणि ‘आउटलुक’ ही तीन नियतकालिके विशेष यशस्वी ठरली. या तीनपैकी ‘डेबोनेअर’ तर चावट मजकुराचे मासिक होते. मात्र इतर दोनही यशस्वी नियतकालिके ‘विचारपत्रे’ म्हणून ओळखली जात नाहीत. आकर्षक मांडणी, चटपटीत मजकूर आणि (कदाचित) कोणत्याही विचाराचा ओव्हरडोस नसणे, यामुळे ही नियतकालिके यशस्वी झाली असावी असे मानायला जागा आहे. मेहता यांच्या ‘आउटलुक’मधील योगदानाची विशेष दखल इथे घ्यायला हवी.

‘आउटलुक’च्या पूर्वी भारतीय बाजारपेठेत ‘इंडिया टुडे’ या पाक्षिकाचे निर्विवाद वर्चस्व होते. मात्र १९९५ मध्ये सुरू झालेल्या आउटलुकने त्यांची मक्तेदारी मोडीत काढली. विनोद मेहतांनी काढलेला आउटलुकचा पहिलाच अंक तडाखेबंद हिट झाला. त्या अंकात त्यांनी तेव्हाच्या अशांत काश्मीरविषयी एका सर्व्हेचे वादग्रस्त निकाल छापले होते. त्या लेखामुळे त्या अंकाची शिवसेनेने होळी केली आणि ‘आउटलुक’ला देशभरात प्रसिद्धी मिळाली. त्याच अंकात मेहतांनी तेव्हाचे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या ‘आउटसायडर’ या येऊ घातलेल्या आत्मचरित्रात्मक कादंबरीतले काही शृंगारिक वर्णनपर उतारे छापले होते. त्यामुळेही तो अंक खूप गाजला.

अशी सुरुवात झाल्यावर मग मेहतांनी मागे वळून बघितलेच नाही. ‘आउटलुक’चे यश इतके लक्षणीय होते की पाक्षिक असणारे ‘इंडिया टुडे’ दीडच वर्षांत (जून १९९७ मध्ये) साप्ताहिक झाले. ‘आउटलुक’च्या समोर वर्तमानपत्रांच्या पुरवण्या, २४ तास टीव्ही वाहिन्या, ‘इंडिया टुडे’ आणि ‘फ्रंटलाईन’ यांचे आव्हान होते. तरीही त्या सर्वांना पुरून उरत ‘आउटलुक’ने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. याचे श्रेय विनोद मेहतांना द्यायला हवे. त्यांनी ‘आउटलुक’ला अति गंभीर ‘फ्रंटलाईन’ आणि सवंगपणाकडे झुकत चाललेल्या ‘इंडिया टुडे’ यांच्यामध्ये ‘प्लेस’ केले.

‘आउटलुक’मध्ये चांगल्या वाचकांना वाचायला आवडेल असा वैचारिक  कंटेंट आकर्षक पद्धतीने मांडल्यामुळे आणि ‘फ्रंटलाईन’ इतकी एकारलेपणाची भूमिका न घेतल्यामुळे त्यातील लेखन गांभीर्याने घेतले गेले. त्यामुळे रामचंद्र गुहा, जे.एन.दीक्षित, सुनील खिलनानी, मार्क टुली, पंकज मिश्रा वगैरे लेखकांनी ‘आउटलुक’मध्ये सातत्याने लिहिलेले आहे. एका मर्यादित अर्थाने १९७० च्या दशकातला ‘इलस्ट्रेटेड विकली’, १९८० च्या दशकातले ‘इंडिया टुडे’ आणि १९९० च्या दशकातले ‘आउटलुक’ यांची तुलना करून पाहण्यासारखी आहे.

मेहतांनी त्यांच्या आत्मचरित्रात नोंदवल्याप्रमाणे ‘आउटलुक’सारख्या साप्ताहिकांच्या निर्मितीचा एक फॉर्म्युला ‘टाईम’ आणि ‘न्यूजवीक’ या अमेरिकी साप्ताहिकांनी ठरवून टाकलेला आहे (लंडनचे ‘दी इकॉनॉमिस्ट’ त्यांच्या नजरेसमोर नाही!). त्यात फार बदल करण्याची गरज नाही. त्यानुसार आठवडाभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे कव्हरेज आणि एक चांगली कव्हरस्टोरी असायला हवी. याव्यतिरिक्त चांगली पुस्तक परीक्षणे, विश्लेषण करणारी सदरे, लक्षवेधी विशेषांक (थहरीं खष सारखे) वगैरे छापून ‘आउटलुक’ने स्वतःचे वेगळेपण जपले आहे. त्यांच्या कव्हरस्टोरीज केवळ चांगल्या होत्या असे नसून, त्यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे उघडकीस आणली.

१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात उघडकीस आलेले क्रिकेट मॅच फिक्सिंग प्रकरण असो, की २०१० मधील दूरसंचार घोटाळा (राडिया टेप्स) असो, ‘आउटलुक’ने परिणामांची पर्वा न करता या बातम्या फोडल्या. राडिया टेप्समध्ये रतन टाटांचेही नाव असल्याने ‘आउटलुक’ला टाटा ग्रुपकडून मिळणाऱ्या जाहिरातींचा ओघ नंतर आटला, त्यामुळे आर्थिक नुकसान पण खूप झाले. संपादक विनोद मेहता हे जरी काही विशेष वैचारिक लेखनासाठी किंवा भूमिकेसाठी प्रसिद्ध नसले, तरी त्यांनी आणि ‘आउटलुक’ने भाजपला आणि मोदींना वेळोवेळी उघड विरोध केला आहे. मेहतांच्या मते, त्यांनी स्वतःसाठी सेक्युलॅरिझमची लक्ष्मणरेषा आखली होती. ती त्यांनी कधीही ओलांडली नाही.

काँग्रेसकडे अनेक आयकॉन्स आहेत, मात्र भाजपकडे तसा एकजणही नाही. त्यामुळे बॅलन्स व्हावा यासाठी तरी वाजपेयींना भारतरत्न द्यायला हवे अशी मांडणी करणारा लेख त्यांनी गेल्या वर्षी लिहिला होता. वादग्रस्त वाटतील असे नक्षलवाद्यांच्या समर्थनार्थ लिहिलेले लेखही त्यांनी छापले आहेत. तसेच ‘आऊटलुक’च्या वाचकांची संपादकावर आणि संपादकीय धोरणावर टीका करणारी पत्रेही विशेष प्राधान्याने छापली आहेत. अशा या मेहतांचे पत्रकारितेतील आदर्श म्हणजे खुशवंतसिंग आणि निखिल चक्रवर्ती. बाकी कोणालाही ते आदर्श मानत नव्हते.

संपादक कधीही चूक करीत नाही असे त्याने मानू नये, चूक झाली तर तिचे समर्थन न करता उलट ती स्वच्छपणे कबूल करावी; त्यामुळे वाचकांचा आपल्यावर विेशास बसतो, असे मेहतांचे मत होते. संपादकाने चिडून आपला अधिकार व्यक्त करण्यापेक्षा शांत राहून टीमचे नेतृत्व करावे असे त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यांच्या आतमध्ये संपादक इतका मुरला होता की, त्यांना अतिशय आवडलेल्या कुत्र्यामध्ये आज्ञा न पाळणे, हट्टीपणा, हेकेखोर स्वभाव आणि स्वतःला जगातले सगळे समजते असा दृष्टिकोन इत्यादी गुण दिसताच त्यांनी त्याचे नामकरण ‘एडिटर’ असे केले होते!

Tags: विनोद मेहता संकल्प गुर्जर संपादक विनोद मेहता आदरांजली vinod mehata sankalpa gurjar sampadak vinod mehata adaranjali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके