डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुलींना शिक्षण न देण्याची इच्छा व त्याची अपरिहार्यता यांच्या कात्रीत ते सापडलेले आहेत. लंडनला जाणाऱ्या हसीबने बायको निवडताना मात्र ती कमी शिकलेली असावी याची दक्षता घेतली! सुदाबासारख्या मुलींना अफगाणिस्तानात नवरे मिळणार नाहीत असे अनेकांनी मला सांगितले आहे आणि गंमत अशी की, या पब्लिकलाच तिच्यावर लाइन मारण्याची प्रचंड ओढ आहे. बदलते जग आणि प्रतिगामी रूढी यांचा मेळ घालण्याची कसरत त्यांना करावी लागते. त्यांना अमेरिका व ओसामा दोन्ही नकोय. स्वातंत्र्य हवंय पण ते टिकवण्याची जबाबदारी नकोय. ब्रँडेड कपडे व बुरखा दोन्हींचा हव्यास त्यांना आहे. भारतीय मुलींच्या आधुनिक कपड्यांचा त्यांना तिटकारा आहे, पण याच मुलींच्या सौंदर्याला पाहण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

प्रिय, 

9/11 ला दहा वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने बराच मजकूर वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिकांतून येऊन गेला आहे. 9/11 घडण्यामागील कारणे, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण, इस्लामी धर्मवादाचा असलेला धोका, तेलाचे एकूण राजकारण इत्यादी विषयांवर बरेच विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी काहीही मी तुला इथे सांगणार नाहीये. मात्र बऱ्याच अफगाण मित्रांशी या विषयावर गप्पा मारलेल्या असल्याने त्या चर्चेत येणारे काही मुद्दे तुला मी सांगणार आहे. 

2002 नंतर अफगाणिस्तानात पुन्हा उभारणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ अफगाणिस्तानकडे सुरू झाला. अमेरिका-युरोप, चीन-रशिया यांनी मदत देताना स्वत:ची सामरिक उद्दिष्टे पण साध्य व्हावीत असे प्रयत्न सुरू केले. भारताची भूमिका मात्र या सर्वांपेक्षा वेगळी आहे. आपलीदेखील सामरिक उद्दिष्टे आहेत, पण अफगाण जनतेचे खरोखर काही भले व्हावे असा प्रयत्न तेथे आपण करीत आहोत. (अफगाणांनीच याचा सतत उल्लेख केला आहे.) 

सांस्कृतिक-आर्थिक-शैक्षणिक- कृषिविषयक सहकार्य दोन्ही देशांत चालू आहे. उत्तम दर्जाची आरोग्यसेवा, रस्ते उभारणी, पाणीपुरवठा, वीजप्रकल्प, बोगदे, पुलांची निर्मिती, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, अफगाण वस्तूंना भारतीय बाजारपेठेत प्रवेश इत्यादी विविध स्वरूपांत भारतीय मदत अफगाणिस्तानात पोहोचते. अफगाण पार्लमेंटची इमारत आपण बांधत आहोत. (अफगाण लष्कर व पोलिस दलाच्या प्रशिक्षणात आपला वाटा असावा या दृष्टीने बोलणी चालू आहेत.) तालिबानी राजवट संपल्याचा मुख्य फायदा असा झाला की, अफगाणांना मोकळेपणे श्वास घेता येऊ लागला. केस कापणे, गाणी ऐकणे, आधुनिक शिक्षण घेणे वगैरेंवरील बंधने (तत्त्वत: तरी) संपली. 

विविध देशांनी दिलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्त्यांमुळे अफगाणांना आधुनिक शिक्षणाची संधी उपलब्ध होऊ लागली आहे. 1979 नंतर सलग दोन दशकांहून अधिक काळ आधुनिक शिक्षण व अफगाण जनता यांच्यात दुरावा येत गेला होता. गेल्या दहा वर्षांत मात्र चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे. कुराण तोंडपाठ येणे याशिवाय इतर काहीही न येणारा अमीन इंग्रजी व संगणक शिकून डॉलर्समध्ये कमवण्याची स्वप्ने बघतो. 

बामियानच्या एका खेड्यातला झबी उच्च शिक्षणासाठी टर्की-युरोप-अमेरिकेला जाण्याच्या गोष्टी करतो. उत्तम ड्रायव्हिंग येणारा अलीम एम.ए.साठी मलेशियाला जातो. एखादा हसीब दिलावर काही वर्षे लंडनमध्ये राहून (शिक्षण व व्यवसाय) मग देशात परत येऊ असे ठरवतो. फक्रुद्दीनसारखा सत्तावीस वर्षे वयाचा ‘काका’ मराठी मुलीच्या प्रेमात पडतो. फ्रेंचांना लाजवेल अशा ॲक्सेंटध्ये फ्रेंच बोलणारा हुमायून सामरिकशास्त्रात मास्टर्स करतो. 

कंबोडियाचा बौद्ध भिक्खू सीना व ‘कॉरी’ अमीनच्या गप्पांना अलीम ‘दोघेही भोंदू आहेत’ म्हणून हसण्यावारी नेतो. चित्र इतके बदलत आहे की, अफगाण मुली पण थोड्याफार प्रमाणात शिकायला परदेशी जातात. अगदी मनगटापर्यंत हातांचा ड्रेस घालणाऱ्या त्या मुली लेक्चर्स प्रचंड सिन्सिअरली अटेंड करतात. यापैकी बहुतांश मुली या ‘ॲरिस्टोक्रॅटिक’ घरातील आहेत.  सुदाबा पर्नियन सारखी एखादी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना (15 ऑगस्टला) भेटते आणि असे बरेच जण... यापैकी काही अपवाद वगळता जवळपास सत्तर टक्के मुले ग्रामीण पार्श्वभूमीची आहेत. त्यांची प्रचंड मोठी कुटुंबे आहेत. शेती आहे. बंदुका ही त्यांच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये एक पुरुषी अहंपणा काठोकाठ भरलेला आहे. हुकूमशाही प्रवृत्ती आहेत. लोकशाहीविषयी आकर्षण आहे. धर्माची भीती आहे.

मुलींना शिक्षण न देण्याची इच्छा व त्याची अपरिहार्यता यांच्या कात्रीत ते सापडलेले आहेत. लंडनला जाणाऱ्या हसीबने बायको निवडताना मात्र ती कमी शिकलेली असावी याची दक्षता घेतली! सुदाबासारख्या मुलींना अफगाणिस्तानात नवरे मिळणार नाहीत असे अनेकांनी मला सांगितले आहे आणि गंमत अशी की, या पब्लिकलाच तिच्यावर लाइन मारण्याची प्रचंड ओढ आहे. बदलते जग आणि प्रतिगामी रूढी यांचा मेळ घालण्याची कसरत त्यांना करावी लागते. त्यांना अमेरिका व ओसामा दोन्ही नकोय. स्वातंत्र्य हवंय पण ते टिकवण्याची जबाबदारी नकोय. ब्रँडेड कपडे व बुरखा दोन्हींचा हव्यास त्यांना आहे. भारतीय मुलींच्या आधुनिक कपड्यांचा त्यांना तिटकारा आहे, पण याच मुलींच्या सौंदर्याला पाहण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.

जागतिकीकरण म्हणजे फक्त शस्त्रे वा ड्रग्ज यांच्यासाठीचे जागतिक मार्केट नव्हे, मोबाईल, इंटरनेट, फेसबुक ही त्याचीच दुसरी बाजू आहे, हे त्यांना कळू लागले आहे. एका विचित्र अशा भावनिक, मानसिक, सांस्कृतिक कोंडीत सापडणे व त्यातूनच वाट काढत पुढे जाणे हे त्यांना करावे लागते आहे. आधुनिक कायदे, अर्थव्यवहार, मूल्ये, तंत्रज्ञान इत्यादींचा अपरिहार्यपणे ते स्वीकार करताहेत आणि या सगळ्यामागे कारण आहे, गेल्या दहा वर्षांत मिळालेली आधुनिक शिक्षणाची संधी व प्रचंड एक्स्पोजर. 9/11 घडणे, तालिबानचा शेवट होणे, देशात आंतरराष्ट्रीय फौजा येणे या प्रक्रियेचाच पुढचा टप्पा हा आधुनिक शिक्षण ठरला आहे. त्यामुळे अनेक अफगाणांना 9/11 ही इष्टापत्तीच वाटते! 

चलो बाय. 

Tags: आंतरराष्ट्रीय फौजा अफगाणिस्तान अमेरिका बामियान तालिबान International Forces Afghanistan US Bamiyan Taliban weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके