डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

30 नोव्हेंबर : आज महिन्याचा शेवटचा दिवस. बघता बघता 2011 संपत आले. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातलं पहिले वर्ष संपत आहे. आपण आता काहीच महिन्यांत ग्रॅज्युएट होणार. बाहेरचं जग फार वेगळं व आव्हानात्मक आहे असं म्हणतात, ते खरंय का? वर्षामागून वर्षं संपत गेली आहेत. आणि माणसांची आयुष्यंसुद्धा. नव्या सुरुवातीसाठी ते आवश्यकच असतं, पण संपण्याच्या प्रक्रियेचं काय? ग्रीक-रोमन-वैदिक संस्कृत्या संपल्या. अशोक, अलेक्झांडर, अब्दाली संपले. ब्रिटिश, जर्मन, रशियन साम्राज्ये संपली. नव्या सत्तांचा, अर्थकारणाचा, तंत्रज्ञानाचा उदय झाला. जुन्याचा ऱ्हास आणि नव्याची निर्मिती हे चक्र अप्रतिहतपणे चालूच राहणार असते. स्थित्यंतरं होतच राहणार. फक्त ह्या सगळ्या प्रचंड व्यापक व गुंतागुंतीच्या डायनॅमिक्समध्ये माझा रोल काय असेल?

प्रिय, 
अगं, मागच्या नोंदी तुला आवडल्याचं तू म्हणालीस. या काही आणखी नोंदी देतोय. 

25 नोव्हेंबर : मी ‘तिचा’ विचार सोडावा का? पण मला ती अगदी मनापासून आवडते. आमच्या आजूबाजूस इतरही अनेक मुली आहेत. पण माझं लक्ष तिच्याकडेच असतं. ती कॉलेजला रेग्युलरली का येत नाही?  ‘रॉकस्टार’ बघितला. ती नर्गिस काय टप्पा आहे यार! सुधीर म्हणतो ती जर ‘सावळी’ असती तर ‘तुफान एक्स्प्रेस’च. ती म्हणे अर्धी झेक-अर्धी पाकिस्तानी आहे. खरं तर मला ‘पाकिस्तान’चा रागच येतो. पण ओके. नर्गिससाठी त्यांना काही गोष्टी माफ. तसा मी ह्या गोष्टींचा फारसा विचार करीत नाही. रूममध्ये असताना सतत ‘नर्गिस’च डोळ्यासमोर येत होती. आमच्या ‘नर्गिस’ला मी आवडतो का? पण मी रणबीर नाही हे नक्की. 

26 नोव्हेंबर : सिगारेट ओढायलाच हवी रे. काय मजा येत असेल ना सिगारेट ओढताना? आज आईशी बोललो. तशी ती चांगली आहे, पण काय आहे, तिला माझा पुरेसा अंदाज नाही. ‘मी काहीतरी चांगलं करावं’ एवढीच तिची इच्छा आहे. मला फोन ठेवल्यावर उगीचच अपराधी वाटायला लागलं. नातेवाईक नावाची जमात पैदाच का होते? आणि त्यात ते नेहमी असे विचित्र का वागतात? आमच्या माता-पित्यांना पण त्यांचं कौतुक. सरळ मारावं फाट्यावर त्यांना. मला तर कायम प्रश्न पडतो की नातेवाईक निवडीचं स्वातंत्र्य का नाही?  रात्री जेवायला पांचट कोबी होती. अर्धपोटीच झोपलो. मेस सोडावीशी वाटते, पण बाहेर खायचं तर पैसे पुरत नाहीत. 

27 नोव्हेंबर : आज मला खूपच मस्त वाटत आहे. कॉलेज एक्झामचे रिझल्ट्‌स्‌ आलेत. मला अपेक्षेइतकेच ‘मार्क्स’ पडलेत. मी ‘मार्क्सवादी’ झालोय का?  गरिबांचं भलं व्हायला हवं हे खरंय. पण त्यासाठी फक्त मार्क्सवादच योग्य का? डाव्या आणि दलित अशा दोन्ही प्रेरणा इतक्या टोकाच्या भूमिका का घेतात? तुमची जर पत वाढायची असेल तर तुम्ही सिगारेट ओढली पाहिजे, कुर्ता घालायला हवा, दाढी व शबनम तर मस्ट! तोंडात गरिबांच्या भल्याची भाषा पण आवश्यकच. आक्रस्ताळ्या आक्रमकतेचं इतकं कौतुक का होतं? ते बरोबर की मी? एकटेपणात वेगळाच आनंद आहे नाही? 

28 नोव्हेंबर : माझा ‘इमोशनल कोशंट’ बराच जास्त असावा. राहुल म्हणतो की तुला ‘आज’पेक्षा ‘काल’मध्येच जास्त रस आहे. मला खरं तर सगळ्यातच खूप रस आहे. पण काय आहे की, मला ‘काल’मध्ये रमायला जास्त आवडतं हे खरं आहे. रूममध्ये एकटा असलो की मला बऱ्याच गोष्टींची फार तीव्रतेने आठवण होते. खरं तर मी आई-बाबांना समजून घ्यायला हवंय. मला खूप बोलायचंय. 

29 नोव्हेंबर : ‘तिचा’ नाद मी सोडायचं असं ठरवलंय. ‘ती’ मनातून जात नाहीये. आज ‘तिला’ मी पूर्ण विसरायचं असा निश्चय केला आहे. माझ्या हातात आत्ता ‘द अल्केमिस्ट’ आहे. पाऊलो कोएलोविषयी मतच बनवता येत नाहीये. पुस्तक वाचलं जातंय, पण आवड-नावड काहीच नाही. अगदी निष्काम भावना. आमचा एक ‘काम्यू’भक्त मित्र आहे. तो आम्हाला ‘निष्काम’ हे विशेष शिवीसारखं लावतो. त्याला असं वाटतं की, जगात फक्त दोघांनाच सत्याचा शोध लागलाय. एक म्हणजे काम्यू व दुसरा म्हणजे ओशो. बाकी जगात सर्वत्र व्यर्थ आहे असं तो तुच्छतेने म्हणतो. 

30 नोव्हेंबर : आज महिन्याचा शेवटचा दिवस. बघता बघता 2011 संपत आले. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकातलं पहिले वर्ष संपत आहे. आपण आता काहीच महिन्यांत ग्रॅज्युएट होणार. बाहेरचं जग फार वेगळं व आव्हानात्मक आहे असं म्हणतात, ते खरंय का? वर्षामागून वर्षं संपत गेली आहेत. आणि माणसांची आयुष्यंसुद्धा. नव्या सुरुवातीसाठी ते आवश्यकच असतं, पण संपण्याच्या प्रक्रियेचं काय? 

ग्रीक-रोमन-वैदिक संस्कृत्या संपल्या. अशोक, अलेक्झांडर, अब्दाली संपले. ब्रिटिश, जर्मन, रशियन साम्राज्ये संपली. नव्या सत्तांचा, अर्थकारणाचा, तंत्रज्ञानाचा उदय झाला. जुन्याचा ऱ्हास आणि नव्याची निर्मिती हे चक्र अप्रतिहतपणे चालूच राहणार असते. स्थित्यंतरं होतच राहणार. फक्त ह्या सगळ्या प्रचंड व्यापक व गुंतागुंतीच्या डायनॅमिक्समध्ये माझा रोल काय असेल? 

चलो बाय. 

Tags: अलेक्झांडर अशोक वैदिक संस्कृती रोमन ग्रीक Alexander Ashoka Vedic Culture Roman Greek weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके