डिजिटल अर्काईव्ह

एकांतिक तत्त्वांचे तुटलेले कडे

हिंसेच्या उन्मादात
अहिंसा कुठं दिसत नसते
दिसत नसली तरी ती
तिथंच शांतपणे वसत असते...

1.

एकांतिक तत्त्वांचे तुटलेले कडे
नजर रोखून बघत असतात
हिंस्र श्वापदांचे कळपचे कळप
आजूबाजूला मोकाट फिरत असतात.

सर्जनशील स्वप्नांचा क्लेशदायी प्रवास
स्वत:च्याच मस्तीत चालू असतो
शिकार शोधणारी क्रूर माकडे
नजरेला नजर देत असतात.

माझी शिकार करण्यासाठी
माझा पाठलाग चालू असतो
माझ्या तपश्चर्येची फुले
मात्र कधीच कोमेजून जात नसतात.

(या कवितेतील पहिल्या दोन ओळी विनय हर्डीकर यांच्या कवितेतून ढापल्या आहेत : संकल्प)

2.

सत्तांध झालेल्या धनानंदाचा
चंद्रगुप्ताने वध केला
मी चंद्रगुप्त व्हावे की
चंद्रगुप्त तयार करावे?
हा खरा प्रश्न असतो

तेजाची उपासना तर लोक
रोज करतातच.
तेजाचे उपासक व्हावे की
स्वत:च तेज व्हावे?
हा खरा प्रश्न असतो

प्रवाहात (वेगळ्या) पोहणारे
बरेचजण असतात
प्रवाहातच पोहायचे की
प्रवाहच व्हायचे?
हा खरा प्रश्न असतो.

उजळलेले दिवे प्रकाश
तर देत असतातच
आपण दिवे पेटवावे की
स्वत:च दिवा व्हावे?
हा खरा प्रश्न असतो

प्रश्नांनी छळ तर
मांडलेलाच असतो
प्रश्न सोडविण्यासाठी कृतियज्ञ मांडावे की
स्वत:च एक प्रश्न व्हावे?
हा खरा प्रश्न असतो.

3.

स्वतंत्र बुद्धीची हुशार मुले
कर्तृत्व गाजविण्यास सिद्ध असतात
मॅक्स वेबरची नेसेसरी इव्हिल्स
त्यांना गिळायला टपून असतात.

मार्क्स, गांधी, प्लेटो यांची
आर्त हाक कानावर येते
धुंदावणाऱ्या पैशाच्या मस्तीमध्ये
चारित्र्य मात्र मार खाते

समुद्राच्या खोलीचा अंदाज घेत
दोन डोळे विस्फारलेले असतात
स्वत:च्या तत्त्वनिष्ठेवरच हसत
एकाकी लढा देत असतात.

4.

स्वत:ची स्वप्ने
स्वत:शीच ठेवावी
पूर्णत्वास आली
म्हणजे जगजाहीर करावी

स्वत:ची प्रतिभा
स्वत:तच ठेवावी
तिला जाग आली की
मग छान बहरू द्यावी

स्वत:ची उंची
स्वत:नेच मोजावी
कर्तृत्वाची भरारी
अनंतातच मारावी

स्वत:चे अश्रू
स्वत:शीच गाळावे
वेळ आल्यावरती
स्फोट घडवून आणावे.

5.

रक्ताच्या अभिषेकाने
तळे काही भरत नसते
हिंसेच्या क्रूर दर्शनाने
अहिंसा कधी मरत नसते

हिंसेच्या उन्मादात
अहिंसा कुठं दिसत नसते
दिसत नसली तरी ती
तिथंच शांतपणे वसत असते

बुद्ध, ख्रिस्त, गांधी यांची
आर्त हाक ऐकू येते
अहिंसेच्या शांतपणात
मानवता फिरून जन्म घेते

Tags: पाच कविता मराठी कवी मराठी कविता संकल्प गुर्जर Marathi Poetry Poet Sankalp Gurjar Poem weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर ( 102 लेख )
Sankalp.gurjar@gmail.com

लेखक मणिपाल यूनिवर्सिटी, उडुपी-कर्नाटक येथे 'आंतरराष्ट्रीय राजकारण' हा विषय शिकवतात.   




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी