डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सर्व आटपलं आणि दिवसभराच्या ताणाचा कापूर एकदम हलका झाला. रितं रितं मन आणि थकलेली गात्रं. संध्याकाळचे पावणेसहा. पोस्टर्स एका खोलीत बंद. आता परत कधीतरी ती निघतील. धूळ साफ होईल, पण मनं? ती होतील स्वच्छ? बावीस दिवसांच्या प्रवासात शेवटचे सात तास हा क्लायमॅक्स. ‘मोहनदास करमचंद गांधी’ नावाचा माणूस अधिक सखोलपणे आणि वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासण्याची गरज ही याच दिवसांची मिळकत! कधीकधी खूप उदास वाटतं. मनात सुन्नता भरून येते. सिनिक व्हायचं नाही असं बजावत आजूबाजूच्या भयाण आणि निराशाजनक वास्तवाकडे सतत नजर खेचली जाते. पण... नैष्कर्म्याचं तत्त्वज्ञान उगाळणारे आम्ही नाही! ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’, म्हणत पुढची वाटचाल आता करायची आहे. महात्म्याच्या शोधप्रवासात तेवढी हिंमत नक्कीच आली आहे. 

सर्व पोस्टर्स नीटपणे ठेवून रूम लॉक करून आम्ही बाहेर आलो. दिवसभर असलेला ताण आता जाणवत नव्हता. रिकामं रिकामं वाटत होतं. काय बोलावं सुचत नव्हतं. नि:शब्दपणे चालत फर्ग्युसनच्या सर्कलजवळ आलो. तिथून डावीकडे गार्डन दिसत होतं. आतमध्ये अभ्यास करणारे ग्रुप्स बसले होते. पण तिथे काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. थोडं पुढे आल्यावर उजवीकडे जमिनीवर असलेली खडूची पांढरी रेघ... चैतन्याने ओसंडून वाहणारं फर्ग्युसन आम्हांला उदासीन वाटत होतं. कॉलेजच्या बाहेर पडलो. रस्त्यावरील गर्दीत हरवून गेलो. 

आपला रस्ता कोणता, हा प्रश्न सरसरत गेला. क्रायसिस ऑफ आयडेंटिटी! अस्मितेचा शोध घ्यावाच का? मी कोण? गुंतागुंतीच्या प्रश्नांनी मनात कोलाज केलेलं असतं. अस्मितेचा शोध आणि आविष्कार अथांग आहेत; म्हणून ते शोधण्याचा प्रवासही अनंत आहे. 2 ऑक्टोबर 1869 ला जन्मलेला मोहनदास असाच एक प्रवासी होता, म्हणून तो प्रेरक असतो. रस्त्यावरचा सांगाती असतो. गांधीजींचा शोध अर्थातच नुसता रक्त-हाडा-मांसाच्या एका ऐहिक अस्तित्वाचा शोध राहत नाही; व्यक्तिकेंद्रित राहत नाही. तो माझ्या संस्कृतीच्याच शोधात रूपांतरित होतो, म्हणजे माझ्या स्वत:च्या सुद्धा!

तेव्हा महात्माजी हे एका वैचारिक, आध्यात्मिक शक्तीचं रूप बनलेलं असतं. या संस्कृतीनं धारण केलेलं विसाव्या शतकातलं एक सर्जनशील रूप! म्हणून प्रेरक. त्या महात्म्याचा जन्मदिवस : 2 ऑक्टोबर. जागतिक शांतता दिवस. महात्म्याच्या शोधासाठी मिळालेलं निमित्त!  साधारणत: 10 सप्टेंबरच्या सुमारास ‘सोशियो क्लब’मध्ये 2 ऑक्टोबरविषयी पहिल्यांदा चर्चा झाली... काय करायचं? कसं? कुठे?... मग ब्रेन स्टॉर्मिंग. कल्पना. कल्पनाच कल्पना. कल्पनांवर कल्पना. कल्पनेतून कल्पना. पोस्टर प्रदर्शन. पोस्टर्स तयार करायची? कोण काढणार?- पहिलाच प्रश्न. ऑफकोर्स आपण. ओ.के. एक प्रोजेक्ट ठरला. त्यावर काम चालू. 

मुख्य प्रश्न : कशाची चित्रं काढणार? मग शांतता, अहिंसा इ. संदर्भात चित्रं जमविणं. नेटवर बसायला आणखी एक निमित्त. आपण काही वेगळं करू या. मान्य. पुन्हा विचार... असं करत करत काही चित्रं सिलेक्ट केली. रंग, ब्रश, कागद इ.ची व्यवस्था. फोटोग्राफी डिपार्टेंटचा घरासारखा वापर म्हणजे घरासारखाच पसारा! तिथे अभ्यास फारसा काही चालू नसतो म्हटल्यावर मस्ती करण्याचा फुल ऑन चान्स. तो सोडणाऱ्यांपैकी आम्ही नक्कीच नाही. चित्रं काढण्याचं, रंगवण्याचं काम चालू झालं. 20 सप्टेंबर नंतर कामाला गती येऊ लागली. कात्री, फडकं, प्लेट्‌स, प्लॅस्टिक, दोरा, खिळे इ. गोष्टी पण पोस्टर्सना लागतात, हे आम्हांला कळलं. 

त्यातच विपुलने एका पथनाट्याची (हिंदी) स्क्रिप्ट आणली. त्यावर काम. बघता बघता काम करणाऱ्यांची संख्या पस्तीसपर्यंत पोचली. अफगाणिस्तानातील मुस्तफा, मतीन पासून श्रीलंकेतील राजिकापर्यंत सर्वजण तिथे यथाशक्ती काम करत होते. मणिपूरच्या निओ, लिऑन, केशवपासून कर्नाटकातील अदिती, एम.पी.ची आयुषी... सर्वांनाच बांधून ठेवणारं काहीतरी होतं. कम्युनिस्ट निधिन डोनाल्डपासून कोणत्याच आयडिऑलॉजीशी बांधिलकी नसणारे... असे सर्वजण एका जिद्दीने झटत होते. सर्वांवर कडी म्हणजे सोशियोच्या सुनीता मॅडमचा उत्साह आम्हांला लाजविणारा होता. आम्ही तर हैराणच झालो होतो, त्यांचा उत्साह बघून!

विषयांची एक चौकट होती, पण त्यानंतर स्वत:चं डोकं चालविण्याचं स्वातंत्र्य होतं. त्यातून अनेक नवे विचार स्फुरले. नवी चित्रं आली. सलग पाच दिवस दुपारचं जेवण मिस करणं तसं फार कठीण नसतं. फक्त तेवढी झिंग हवी. केरळी भाताची अमेझिंग चव पहिल्यांदा तिथेच चाखली आणि सकाळी साडेसहा वाजता भिजवलेले कपडे, रात्री सव्वाअकराला धुण्याचा अनुभव पण याच दिवसांचा! स्ट्रक्चरल व्हायोलन्स, कम्युनल व्हायोलन्स, विविध प्रकारचे भेदभाव, विषमता, शॉविनिझम, फॅनॅटिझम इ. विविध बाबींवर पोस्टर्स बनवली गेली. त्यानिमित्ताने त्या विषयांवर चर्चाही घडल्या. ‘Celebrate the differences’ gmaIr idea त्यातच जन्माला आली. पर्यावरणीय प्रश्नांवरही चर्चा झाली. तसं चर्चेला काही लिमिट्‌स नव्हती. 

मी, कल्याणी, निधिन इ.नी काय काम केलं? (तर इतरांना डिस्टर्ब करण्याचं.) म्हणजे जिथे ज्याची गरज लागेल ती मदत पुरविणं. चित्राचा एखादा पार्ट रंगव, कटिंग करून ती प्लॅस्टिकमध्ये टाक, ‘स्ट्रीट प्ले’वाल्यांची   प्रॅक्टिस घे. त्यांना सुधारणा सुचव आणि काहीच काम नसेल (जे फार कमी वेळा झालं), तर जॉर्ज बुशपासून कॉलेजमधील लफड्यांवर गप्पा ठोक... असं बरंच काही.  आम्ही रविवार पाहत नव्हतो, की रात्र. काम पोस्टर्स बनविणं. मिळतील त्या साधनांनिशी काम चालू ठेवणं. मग असं करत करत जाणवलंच नाही, की 1 ऑक्टोबर आला. (चिनी क्रांतीचा साठावा वर्धापनदिन.) 

त्या दिवशी मग जागा ठरविणं, वेळ आणि इतर डीटेल्सची चर्चा झाली. सर्वांना बेसिक माहिती दिली गेली. महामुनी सरांना भेटून उद्याच्या संदर्भात चर्चा आणि... बाकी त्या दिवशीचं प्रदर्शन हा आता भूतकाळ आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना ते आवडणं, उत्साहवर्धक फीडबॅक इ. बाबी तर काय होतातच...! या सर्व काळात जाणवणारी आणि छळणारी गोष्ट म्हणजे आपल्या लाइफस्टाईलमध्ये नकळतपणे होणारी हिंसा. खूप त्रास दिला आणि अजूनही होतो या जाणिवेमुळे... या प्रदर्शनामुळे किती जण अवेअर झाले? माहीत नाही... 

सर्व आटपलं आणि दिवसभराच्या ताणाचा कापूर एकदम हलका झाला. रितं रितं मन आणि थकलेली गात्रं. संध्याकाळचे पावणेसहा. पोस्टर्स एका खोलीत बंद. आता परत कधीतरी ती निघतील. धूळ साफ होईल, पण मनं? ती होतील स्वच्छ? बावीस दिवसांच्या प्रवासात शेवटचे सात तास हा क्लायमॅक्स. ‘मोहनदास करमचंद गांधी’ नावाचा माणूस अधिक सखोलपणे आणि वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासण्याची गरज ही याच दिवसांची मिळकत! कधीकधी खूप उदास वाटतं. मनात सुन्नता भरून येते. सिनिक व्हायचं नाही असं बजावत आजूबाजूच्या भयाण आणि निराशाजनक वास्तवाकडे सतत नजर खेचली जाते. पण... नैष्कर्म्याचं तत्त्वज्ञान उगाळणारे आम्ही नाही! ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया’, म्हणत पुढची वाटचाल आता करायची आहे. महात्म्याच्या शोधप्रवासात तेवढी हिंमत नक्कीच आली आहे. 

साधना : 9 जानेवारी 2010 (युवा अभिव्यक्ती अंक) 

Tags: रंग कॉलेज हिंसा प्रदर्शन पोस्टर्स मोहनदास करमचंद गांधी Colors College Violence Exhibitions Posters Mohandas Karamchand Gandhi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके