किसिंजर यांच्यावर कोणीही प्रेम केले काय किंवा द्वेष केला काय, त्यांची दखल तर घ्यावीच लागते. त्यांची पुस्तके वाचावीशी वाटतात, भाषणे यूट्यूबवर ऐकावीशी वाटतात. आजही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक किसिंजर काय म्हणत आहेत याकडे लक्ष ठेवून होते. त्यांच्या बरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. मात्र, प्रत्येक वेळी ते तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. एवढ्या एकाच कारणासाठी तरी त्यांचा अभ्यास करायला हवा.
गेल्या आठवड्यात हेनरी किसिंजर यांचा वयाच्या 100 व्या वर्षी मृत्यू झाला. अमेरिकी लष्करात सैनिक, गुप्तहेर आणि दुभाषी, हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक, अमेरिकी सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. त्यांना 1973 चे नोबेल शांतता पारितोषिकदेखील मिळाले. गेल्या शंभर वर्षांतील आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करायचा झाल्यास आपल्याला किसिंजर यांच्याकडे वळावेच लागते. 1970 च्या दशकात ते अमेरिकी सत्तापरिघात क्रमांक दोनच्या पदावर होते व अध्यक्षांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्या दशकातील महत्त्वाच्या घडामोडी ‘अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध, युरोपीय संरक्षणाचे प्रश्न, अण्वस्त्रे, पश्चिम आशियातील संघर्ष, व्हिएतनाम आणि बांगलादेश युद्ध, अमेरिका-चीन संबंध’ विचारात घेताना आपल्याला किसिंजर यांच्या भूमिकांचा, त्यांच्या वर्तनाचा, त्यामागील विचारप्रक्रियेचा अभ्यास करावा लागतो.
अर्थात, आपल्या भूमिकांचा अभ्यास केला जाईल असे त्यांचे वर्तन सत्तेत असताना होते व तो तसा केला जावा यासाठी त्यांनी स्वतःची प्रतिमाही पद्धतशीरपणे तयार केली होती. सत्तेत जाण्याआधी व त्यानंतर त्यांनी नियमितपणे वाचनीय (आणि दणदणीत आकाराची सत्तेत असतानाच्या आठ वर्षांच्या काळातील त्रिखंडात्मक आठवणींची तीन पुस्तके मिळून 3800 पाने होतात) पुस्तके लिहिली. गेल्या पन्नास वर्षांत बराक ओबामा वगळता अमेरिकेच्या सर्व अध्यक्षांना किसिंजर यांची मसलत घ्यावी असे वाटत असे. अगदी ट्रम्प यांनासुद्धा किसिंजर यांना भेटावेसे वाटले (जरी ते त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत राजकारणासाठी आणि स्वतःच्या प्रतिमा-वर्धनासाठी करावेसे वाटले होते) यातच काय ते समजून घेता येईल! आपल्या जिवंतपणीच सन्मान, आदर, प्रेम, द्वेष, शिव्या इ. त्यांच्या वाट्याला आले. मृत्यूनंतरही इकॉनॉमिस्ट, अटलांटिक, न्यू यॉर्क टाइम्स, बीबीसीपासून अगदी प्रादेशिक भाषांतील वर्तमानपत्रांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर मृत्युलेख छापले, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची चिकित्सा केली. त्याचे मूल्यमापन कसे करावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
किसिंजर यांचा जन्म जर्मनीतील. हेनरीच्या वयाच्या पंधराव्या वर्षी, 1938 मध्ये, हिटलरच्या नाझी जर्मनीला सोडून धर्माने ज्यू असलेले किसिंजर कुटुंबीय अमेरिकेत आले. त्यानंतर अमेरिकेच्या लष्करात रुजू झालेल्या हेनरीला 1944-45 मध्ये अमेरिकी लष्कराबरोबर परत जर्मनी पाहण्याची संधी मिळाली. दुसऱ्या महायुद्धाने बेचिराख झालेला युरोप आणि नाझीवादाच्या हव्यासामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीला बघण्याचा खोलवर परिणाम हेनरीच्या मनावर झाला. पुढे 1950च्या दशकात किसिंजर यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियनच्या उदयामुळे युरोपात झालेली सततची युद्धे आणि नेपोलियनचा 1815मध्ये पराभव झाल्यानंतर युरोपीय मुत्सद्द्यांनी शांतता राखण्यासाठी, पुन्हा अशी युद्धे होऊ नयेत यासाठी, कशी सत्तासंतुलनाची व्यवस्था उभी केली हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. (नेपोलियनची युद्धे काय होती याचा अंदाज येण्यासाठी नुकताच प्रदर्शित झालेला ‘नेपोलियन’ हा रिडली स्कॉट दिग्दर्शित इंग्रजी सिनेमा पाहायला हवा.) या अभ्यासात त्यांना तीन गोष्टी फार प्रकर्षाने जाणवल्या - एक, महासत्तांमधील संघर्ष टाळायला हवेत. त्याचे परिणाम फार अनर्थकारी असतात. दोन, मुत्सद्देगिरी हे संघर्ष टाळण्याचे सर्वांत प्रभावी हत्यार आहे. आणि तिसरे, मानवी हक्क व उदारमतवादी मूल्ये आणि राष्ट्रीय सुरक्षा व हितसंबंध यांतून निवड करायची वेळ आल्यास मूल्ये बाजूला ठेवावीत. युरोपीय मुत्सद्द्यांनी 1815नंतर हेच केले होते. त्यांनी पराभूत फ्रान्सला सन्मानाने वागवले. मात्र, फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूल्यव्यवस्थेचा (स्वातंत्र्य, समता आणि बंधुता) युरोपात प्रचार-प्रसार होणार नाही याची खबरदारी घेतली. त्यासाठी झारिस्ट रशिया आणि ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्ये तेथील राजसत्तांसकट टिकून राहायला हवीत, यासाठी त्यांना त्यांच्या सुरक्षेची हमी मिळेल अशी व्यवस्था निर्माण केली गेली. या व्यवस्थेमुळे 1870चे फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातील युद्ध वगळता शंभर वर्षे युरोपात मोठी युद्धे झाली नाहीत, महासत्तांमध्ये थेट संघर्ष झाले नाहीत. हा अभ्यास किसिंजर यांनी आपल्या कार्यकाळात, बदललेल्या परिस्थितीला अनुसरून लागू केला. त्यामुळे किसिंजर यांना समजून घेताना त्यांचे नाझी जर्मनीतील बालपण, 1938 मध्ये म्युनिकमध्ये युरोपीय महासत्तांनी हिटलरचे केलेले लांगूलचालन व त्यातून पुढे उद्भवलेले दुसरे महायुद्ध, पराभूत जर्मनीतले अमेरिकी लष्करी अधिकारी म्हणून घालवलेले दिवस आणि पीएचडीचा अभ्यास यांना समोर ठेवावेच लागते.
1954 मध्ये पीएचडी पूर्ण केल्यापासून ते 1969 मध्ये अमेरिकी सरकारमध्ये प्रवेश होईपर्यंत किसिंजर हे एक पॉलिसी-रेलेव्हंट संशोधन करणारे अभ्यासक म्हणून नावारूपाला आले. सामाजिक शास्त्रांमध्ये फार कमी विषय असे आहेत की ज्यामध्ये तुमच्या अभ्यासविषयाचा थेट सरकारी धोरणांवर प्रभाव पडतो. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थशास्त्र हे असे दोन विषय आहेत. किसिंजर नावारूपाला येत होते त्या काळात एकमेकांशी जोडलेले दोन प्रश्न आंतरराष्ट्रीय राजकारणात केंद्रस्थानी होते. अण्वस्त्रांचे काय करायचे आणि अमेरिका व सोव्हिएत रशिया या महासत्तांमधील संघर्ष कसा टाळायचा. अण्वस्त्रे ही इतर शस्त्रे असतात त्याप्रमाणेच युद्धात वापरायची शस्त्रे आहेत का? अण्वस्त्रांचा वापर युद्ध जिंकण्यासाठी करायचा की युद्ध टाळण्यासाठी करायचा? आण्विक युद्ध जिंकता येऊ शकेल काय? आपल्या शत्रुदेशाने आण्विक शस्त्रांच्या वापराची धमकी दिली तर काय करायचे? आपले अण्वस्त्रांबाबत धोरण काय असायला हवे? जवाहरलाल नेहरू, अल्बर्ट आइन्स्टाईन, बर्ट्रांड रसेलपासून, आयसेन हॉवर आणि क्रुश्चेव्हपर्यंत सगळे महत्त्वाचे जागतिक नेते व विचारवंत आपल्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करत होते. अर्थात, हे प्रश्न केवळ अभ्यासकांमध्ये आणि सरकारी वर्तुळापुरतेच सीमित नव्हते. त्यामध्ये सामान्य वाचकांपैकी अनेकांना रस होता. किसिंजर यांनी या प्रश्नांवर लेखन केले होते. त्यांचे या विषयावरील पहिलेच पुस्तक ‘न्यूक्लियर वेपन्स अँड फॉरेन पॉलिसी’ हे बेस्ट सेलर ठरले होते. पुढे 1970च्या दशकात, ते स्वतः निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असताना, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये अण्वस्त्रांच्या नियंत्रणाविषयीचा महत्वाचा करार Strategic Arms Limitation Treaty (SALT) करण्यात कळीची भूमिका बजावली होती. या करारामुळे आण्विक शस्त्रांची संख्या कमी करणे, अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यात आण्विक स्तरावर stability आणणे हे साध्य झाले. या करारामुळे पुढे इतर महत्त्वाचे करार SALT-2, INF, START 1 आणि 2 केले गेले.
1969 मध्ये किसिंजर अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून रुजू झाले. स्वतःचे बौद्धिक सामर्थ्य व तितकीच महत्त्वाकांक्षा, अध्यक्ष निक्सन व त्यांनतर आलेले जेराल्ड फोर्ड यांचा विश्वास आणि मुत्सद्देगिरीची समज यामुळे 1969 ते 1977 अशी आठ वर्षे ते स्वतःच्या धोरणांनुसार वागू शकले, परिस्थितीला वळण देऊ शकले. त्यांची संशयी वृत्ती, सत्तेशी जुळवून घेण्याचा स्वभाव आणि सत्तेचे केंद्रीकरण यांमुळे निक्सन यांचे परराष्ट्र आणि संरक्षणमंत्री यांच्यापेक्षा जास्त सत्ता व प्रभाव किसिंजर यांना उपभोगता आला. स्वतःच्या नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील स्टाफने परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांबरोबर फार संबंध जुळवू नयेत याकडे किसिंजर यांचे लक्ष असे. (किसिंजर यांच्यासारखे नको तितके सत्ताकांक्षी व वरिष्ठांची कायम मर्जी राखणारे बॉसेस हे कनिष्ठ सहकाऱ्यांसाठी मात्र फारच त्रासदायक ठरतात.) ते सत्तेत असताना त्यांची प्रेमप्रकरणे हादेखील वॉशिंग्टनमध्ये चर्चेचा विषय असे. ते स्वतःचे परराष्ट्र धोरणातील अपयश झाकण्यासाठी या प्रकरणांना जाणीवपूर्वक चर्चेत ठेवतात, असेही म्हटले जात असे.
जागतिक इतिहासात 1963 ते 1979 ही सोळा वर्षे शीतयुद्धाच्या ‘detente’ची महासत्तांनी एकमेकांमधील स्पर्धा आटोक्यात ठेवण्याची वर्षे आहेत. या काळात दोन्ही महासत्ता ‘शक्य तिथे सहकार्य आणि गरज पडेल तिथे स्पर्धा’ अशा धोरणानुसार वागत होत्या. किसिंजर यांनी हा धागा पुढे नेला. मात्र, तसे करतानाच अमेरिकेच्या फायद्यासाठी चीन व रशिया एकमेकांपासून कसे दुरावत जातील यासाठीही प्रयत्न केले. रशिया व चीन यांचे संबंध तणावाचे होते व आहेत हे दिसल्यानंतर त्यांनी 1970-71 मध्ये चीनशी अतिशय गुप्तपणे स्वत:च्या देशाच्या परराष्ट्र खात्याला अंधारात ठेवून चर्चा सुरू केली. याचीच परिणती पुढे किसिंजर व नंतर निक्सन यांच्या चीनभेटीत झाली. (अमेरिका चीनच्या जवळ जाते आहे हे पाहून सोव्हिएत रशियानेदेखील अमेरिकेशी संबंध सुधारायचे असे ठरवले.) चीनला भेट देणारे निक्सन हे पहिलेच अमेरिकी अध्यक्ष होते. यासाठी त्यांना पाकिस्तानचे हुकूमशहा याह्या खान यांची मदत होत असल्यामुळे, 1971च्या बांगलादेश युद्धाच्या काळात अमेरिकेने पूर्णतः भारतविरोधी व पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली होती. किसिंजर यांच्या या चीनभेटीमुळे अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांच्या जवळ यायला सुरुवात झाली. 1971 ते 2023 अशी 52 वर्षे किसिंजर आणि चीन हा धागा तुटला नाही. अगदी मागच्या महिन्यात, अमेरिका आणि चीन यांचे संबंध ताणलेले असताना, किसिंजर यांनी चीनला भेट दिली होती. तेव्हा त्यांचे सम्राटाला लाजवेल असे स्वागत करण्यात आले होते, कोणालाही सहजरीत्या न भेटणारे अध्यक्ष क्षी जिनपिंग किसिंजर यांना आवर्जून भेटले होते.
मात्र, किसिंजर यांची चीनविषयीचे धोरणे व धारणा अमेरिकेला व जगाला फायदेशीर ठरली की नाही हा वादाचा मुद्दा आहे. त्यांनी घातलेल्या पायाच्या बळावर 1990 नंतर जागतिकीकरणाच्या तीन दशकांत अमेरिका आणि चीन यांचे परस्परावलंबन वाढतच गेले. चीनमधून स्वस्त उत्पादने जगाला मिळत राहिली व अमेरिकी उद्योजक फायदा कमावत राहिले. मात्र, याच काळात अमेरिकेतील कारखानदारी घसरणीला लागली, चीनचा महासत्ता म्हणून उदय झाला व आर्थिक दृष्ट्या संपन्न चीन लोकशाहीवादी ठरेल ही आशाही फोल ठरली. मग किसिंजर यांनी पाया घातलेल्या धोरणाचे फळ काय? तसेच या चीन-अमेरिका मैत्रीकडे भारताच्या दृष्टीने पाहिल्यास काय दिसते? किसिंजर यांच्यामुळे चीन-पाकिस्तान-अमेरिका असा त्रिकोण तयार झाला व भारताचे संरक्षणविषयक प्रश्न अधिक तीव्र होते गेले. या देशांनी अफगाणिस्तानात सोव्हिएत रशिया विरोधात मुजाहिदीन गटांना पोसले. पुढे चीनने पाकिस्तानच्या अणू व क्षेपणास्त्र कार्यक्रमाला सक्रिय मदत केली, त्याकडे अमेरिकेने जाणीवपूर्वक काणा डोळा केला. दक्षिण आशियाकडे जागतिक चौकटीत व साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही अशा साच्यातून बघितल्यामुळे किसिंजर यांना येथील प्रश्नांचा अंदाज आला नाही. ही चूक त्यांनी चिली व व्हिएतनाममध्येही केली.
व्हिएतनामचे युद्ध ही भळभळती जखम घेऊन निक्सन व किसिंजर सत्तेत आले होते. त्यांना हे लक्षात आले होते की, अमेरिका व्हिएतनामचे युद्ध जिंकू शकत नाही. अमेरिकेतील जनता युद्धाला केवळ कंटाळली आहे असे नव्हे, तर त्याला होणारा विरोध अधिक तीव्र होत चाललेला आहे. मात्र, त्यांना असेही वाटत असे की, जर अमेरिकेने व्हिएतनाममधून माघार घेतली तर शेजारी देश लाओस आणि कंबोडिया हे कम्युनिझमच्या विळख्यात जातील, सोव्हिएत युनियनचे प्रभावक्षेत्र वाढेल व अंतिमतः अमेरिकेचे खूप नुकसान होईल. त्यामुळे सुरुवातीस त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. उत्तर व्हिएतनामचे ‘व्हिएतकाँग’ या नावाने ओळखले जाणारे सैनिक कंबोडियात आश्रयाला जात असल्यामुळे निक्सन-किसिंजर जोडीने कंबोडियावरदेखील अमानुष बॉम्बहल्ले केले. मात्र, अखेर त्यांना हे लक्षात आले की, हा प्रश्न चर्चेनेच सुटू शकेल. अमेरिकेला व्हिएतनाममधून ‘फेस सेव्हिंग’ पद्धतीने माघार घ्यायची होती. त्यासाठी उत्तर व्हिएतनामशी कठीण चर्चेची जबाबदारी किसिंजर यांनी पार पाडली. या वाटाघाटींसाठीच किसिंजर यांना उत्तर व्हिएतनामी मुत्सद्दी Le Duc Tho यांच्याबरोबर विभागून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. (व्हिएतनामी मुत्सद्द्याने पारितोषिक घ्यायला नकार दिला. मात्र, किसिंजर अशी संधी सोडणे शक्यच नव्हते. कदाचित, आपली यशस्वी कारकिर्द पाहता, आपल्याला एकच नोबेल पारितोषिक का मिळाले असेही त्यांना वाटत असावे.) मात्र, 1973 मध्ये अमेरिकेने व्हिएतनाममधून माघार घेतली व 1975 मध्ये सायगाव - अमेरिकेच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या, दक्षिण व्हिएतनामी सरकारची राजधानी - कम्युनिस्टांच्या ताब्यात आले. या माघारीची तुलना 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून घेतलेल्या माघारीशी केली जाते.
किसिंजर यांचे मुत्सद्दी म्हणून कौशल्य वादातीत होते. त्यांनी 1973च्या अरब-इस्रायल युद्धानंतर इजिप्त आणि इस्रायल यांच्यात यशस्वीरीत्या मध्यस्थी केली होती. त्यातूनच पुढे इजिप्त आणि इस्रायल यांच्यात शांतता प्रस्थापित झाली. हे धोरण इतके यशस्वी ठरले की आज पन्नास वर्षे झाली, पॅलेस्टाइनच्या प्रश्नावरून विविध स्वरूपांचे पेचप्रसंग निर्माण झाले तरीही इजिप्त आणि इस्रायल यांच्यातील संबंध दुरावत नाहीत. सोव्हिएत रशिया हा इजिप्तचा मित्र. किसिंजर यांनी इजिप्तला रशियापासून दूर नेले व अमेरिकेच्या पंखाखाली आणले. त्यानंतर क्रमाने रशियाचे पश्चिम आशियातील स्थान ढळत गेले व पुढील चाळीस वर्षे रशियाला या प्रदेशात आपला प्रभाव प्रस्थापित करता आला नाही.
मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने पाहिल्यास सोव्हिएत रशिया, चीन, व्हिएतनाम, पश्चिम आशिया अशा सर्व महत्त्वाच्या घडामोडींमध्ये किसिंजर यांची भूमिका महत्त्वाची होती. अभ्यासकांमध्ये एक मतप्रवाह असा आहे की, 1960च्या दशकाच्या उत्तरार्धात अंतर्गत अस्वस्थता, जागतिक स्तरावर चाललेली खळबळ, तरुणाईचा उद्रेक, डाव्या विचारांचे वाढत गेलेले. आकर्षण इ.मुळे अमेरिकेचा स्वतःच्या सामर्थ्यावरील विश्वास उडू लागला होता. शीतयुद्धात सोव्हिएत रशियाचे पारडे जड होत चालले होते. अशा परिस्थितीत किसिंजर यांनी, आहे त्या परिस्थितीत अतिशय अवघड प्रश्नांना अमेरिकेसाठी सर्वोत्तम (कमीतकमी हानिकारक) उत्तरे शोधली. त्यामुळे किसिंजर यांचे खरे श्रेय हे प्रतिकूल परिस्थितीत अमेरिकेच्या स्थानाला धक्का लागणार नाही, अशा वर्तनात आहे. काही अभ्यासक असेही मानतात की, चिलीतील लोकशाहीवादी सरकार उलथवून लावणे, बांगलादेशमधील पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणे, कंबोडिया व व्हिएतनाममधील बॉम्बहल्ले इ. मुळे झालेली मनुष्यहानी पाहता किसिंजर हे युद्धगुन्हेगार आहेत, त्यांच्यावर खटला चालवायला हवा. इतके खरे की, काहीही झाले तरी अमेरिकेचे हितसंबंध जपायला हवेत, सोव्हिएत रशियाबरोबर युद्ध टाळायला हवे व त्यासाठी स्थानिक प्रश्नांबाबतचे आकलन चुकले तरी चालेल अशी ही दिशा किसिंजर यांच्या वर्तनाची आहे.
किसिंजर यांच्या या विचार व वर्तनाकडे पाहताना काही प्रश्न सहजपणे समोर येतात : नैतिकतेला आंतरराष्ट्रीय राजकारणात काही जागा आहे का? असेल तर नैतिकता कशाला म्हणायचे? राष्ट्रीय हितसंबंध ‘रूथलेस’पद्धतीने जपायचे व आपल्या देशातील नागरिकांचाच फक्त विचार करायचा ही नैतिकतेची सर्वोच्च पातळी मानावी काय? मग त्यासाठी इतर देशांवर कोणीही कसेही अत्याचार केले तर ते खपवून घ्यावेत काय? की आपल्या देशाच्या हिताच्या पलीकडे जाणारी, माणुसकीला जपणारी अशी काही नैतिकता अस्तित्वात आहे? सोव्हिएत रशियाबरोबर युद्ध झाले तर सर्व जगाचा विनाश अटळ आहे. त्यामुळे युद्ध टाळावे; पण, त्यासाठी जी काही किंमत द्यावी लागेल ती द्यावी काय? बांगलादेश व व्हिएतनाम-कंबोडियामध्ये लाखो लोक अमानुष वागणुकीला सामोरे जात असताना नैतिक वर्तन म्हणजे काय? देशाचे धोरण ठरवताना नेमक्या कशाच्या आधारे तुम्ही निर्णय घ्यावेत? अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा सदोष आकलनामधून निर्णय घेताना चुका झाल्या तर त्याची जबाबदारी कोणाची? निर्णय घेणारी व्यक्ती व तिची धोरणे यात भेद करता येईल का? आपल्या टीकाकारांशी कसे वागावे? कोणाला उत्तर द्यावे व कोणाकडे दुर्लक्ष करावे? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. मात्र, हेही तितकेच खरे की, किसिंजर आयुष्यभर स्वतः अशा प्रश्नांचा विचार करत होते.
किसिंजर यांच्यावर कोणीही प्रेम केले काय किंवा द्वेष केला काय, त्यांची दखल तर घ्यावीच लागते. त्यांची पुस्तके वाचावीशी वाटतात, भाषणे यूट्यूबवर ऐकावीशी वाटतात. आजही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक किसिंजर काय म्हणत आहेत याकडे लक्ष ठेवून होते. त्यांच्या बरोबर तुमचे मतभेद होऊ शकतात. मात्र, प्रत्येक वेळी ते तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. एवढ्या एकाच कारणासाठी तरी त्यांचा अभ्यास करायला हवा.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या