डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नेल्सन मंडेलांच्या उदयापूर्वीची दक्षिण आफ्रिका

देशात गौरवर्णीयांची सत्ता असली तरीही आपल्याच देशाला नीट वागवले जात नाही, ही भावना आफ्रिकानेर समूहात मूळ धरू लागली होती. त्यातूनच आफ्रिकानेर लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 1918 मध्ये एका गुप्त संघटनेचा जन्म झाला. (त्यातूनच पुढे ‘नॅशनल पार्टी’ नावाचा टोकाचा वर्णभेदी पक्ष जन्माला आला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेवर सेहेचाळीस वर्षे राज्य केले.) याआधी सहाच वर्षांपूर्वी 1912 मध्ये गांधीजींच्या प्रेरणेने कृष्णवर्णीय समूहाच्या काही नेत्यांनी एकत्र येऊन देशात समान राजकीय हक्क आणि कृष्णवर्णीय समूहाला स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणाऱ्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती. वर्णभेदी राजवटीच्या काळात आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि नॅशनल पार्टी हे दोन प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते.

विसाव्या शतकाचा इतिहास हा स्वातंत्र्याचा आहे. या शंभर वर्षांच्या काळात ‘स्वातंत्र्य’ या मूल्याचा प्रसार होणे आणि त्यावर बंधने घालण्याचे प्रयत्न करणे यामध्ये अथक संघर्ष चालू होता. वसाहतवाद-साम्राज्यवाद, फॅसिझम-नाझीवाद व कम्युनिझम या तीन विचारधारांवर आधारित सरकारांनी मानवी स्वातंत्र्याचा सर्वाधिक संकोच कसा होईल आणि मानवावर कशा स्वरूपाचे अत्याचार करता येतील याचीच प्रात्यक्षिके दाखवली होती. मात्र याच शतकात या तिन्ही विचारधारांचा आणि त्यांचा पुरस्कार करणाऱ्या सरकारांचा पराभव झाल्याचे चित्रही आपल्याला पाहायला मिळाले. विसावे शतक सुरू झाले तेव्हा प्रामुख्याने युरोप आणि अमेरिका याच खंडांत लोकशाही होती आणि त्या देशांतील नागरिकांना स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत होता. आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांतील जनता वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुलामगिरीत जगत होती.

मात्र हे शतक संपत आले, तेव्हा हे सर्व प्रदेश वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त झाले होते. तेथील नवस्वतंत्र देशांमध्ये जी काही कम्युनिस्ट सरकारे सत्तेत आली होती आणि क्रांतीच्या नावाखाली जनतेला गुलामीत ठेवत होती, त्यांनाही पराभव स्वीकारावा लागलेला होता. अन्यायी लष्करशाही (उदा. म्यानमार) आणि मागासलेल्या धार्मिक सत्ता यांच्या कचाट्यात (उदा. इराण, सौदी अरेबिया) काही देश होते, अजूनही आहेत. मात्र तेथील सरकारांना आपल्या नागरिकांवर किती आणि कशी बंधने घालावीत, याचा पुनर्विचार करावा लागला होता. अजूनही करावा लागत आहे. आणि या देशांतील बदलांची दिशा ही स्वातंत्र्याचीच आहे. अशा या शतकात दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव होणे, भारत आणि इतर देशांना स्वातंत्र्य मिळणे ते पुढे बर्लिनची भिंत कोसळणे व सोव्हिएत रशियाचे विभाजन होणे या साऱ्या प्रक्रियेत मानवी स्वातंत्र्याच्या कक्षा विस्तारतच गेल्या आहेत. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून आपल्याला दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवट संपणे या घटनेकडे पाहावे लागते.

या दृष्टीने पाहिल्यास दुसरे महायुद्ध संपणे (1945) ते दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवट संपणे (1994) हा बरोबर पन्नास वर्षांचा काळ मानवी स्वातंत्र्याची क्षितिजे विस्तारत जाण्याचा आहे, असे म्हणता येईल. त्वचेच्या रंगावरून जनतेत भेदभाव करणारी, गुणवत्ता  आणि क्षमता यांना पूर्ण बाजूला टाकणारी, वैचारिक बाबतीत हिटलरच्या नाझीवादाशी खूप जवळीक दाखवणारी आणि अल्पसंख्य गौरवर्णीय समूहाकडे अमर्याद सत्तेचे केंद्रीकरण करणारी दक्षिण आफ्रिकेतील ही राजवट एकीकडे अण्वस्त्रांसारख्या अतिशय आधुनिक अशा साधनांनी सज्ज होती; तर दुसरीकडे अतिशय मागासलेल्या अशा वर्ण- वंशश्रेष्ठत्वाच्या आदिम प्रेरणांवर आधारित होती. सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीशी, बलवान आणि क्रूर राजवटीशी सामना करून दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी लढा यशस्वी झाला, हा जगभरातल्या लोकशाहीवादीस्वातंत्र्यवादी प्रेरणांचा विजय होता आणि नेल्सन मंडेला त्या विजयाचे शिल्पकार होते.

नेल्सन मंडेलांचा जन्म 18 जुलै 1918 चा. म्हणजे आता त्यांचे जन्मशताब्दी वर्ष संपत आहे. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवट कोसळली त्यालाही आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच मंडेलांच्या मृत्यूलाही आता पाच वर्षे होत आहेत. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासाकडे थोडक्यात नजर टाकणे, मंडेलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणे आणि त्यातून शक्य झाल्यास सध्याच्या काळासाठी काही धडे घेणे असा या चार भागांच्या लेखमालेचा उद्देश आहे. या लेखांमध्ये मंडेलांना केंद्रस्थानी ठेवून दक्षिण आफ्रिकेचे राजकारण आणि तत्कालीन परिस्थिती यांचा विचार आपण करणार आहोत. हा विषय फार मोठा असल्याने तो चार लेखांत संपणारा अजिबात नाही याची प्रस्तुत लेखकाला पूर्ण जाणीव आहे!

एक

नेल्सन मंडेला आणि दक्षिण आफ्रिकेचे राजकारण याकडे लक्ष देण्याआधी दक्षिण आफ्रिका हा देश नेमका कसा आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकावर वसलेला देश असून, त्याची सध्याची लोकसंख्या साडेपाच कोटी आहे. दक्षिण आफ्रिकेला अटलांटिक आणि हिंदी महासागर अशा दोन्ही महासागरांचा किनारा लाभलेला असून अशा प्रकारच्या खास भौगोलिक स्थान असलेल्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा दुर्मिळ देशांपैकी तो एक आहे. दक्षिण आफ्रिकेला ‘विरोधाभासांचा देश’ असेही म्हणता येईल. तिथे कृष्णवर्णीय जनता बहुसंख्य प्रमाणात असूनही साडेतीनशे वर्षे सत्तासूत्रे मात्र अल्पसंख्य गौरवर्णीय समूहाच्या हाती होती. या काळात एकीकडे दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय जनता दोन वेळच्या अन्नाला मोताद असताना सत्ताधारी गौरवर्णीय समूह मात्र अगदी उत्तम दर्जाचे आयुष्य जगत होता.

त्या देशातील अतिशय सुपीक अशा जमिनीची मालकी युरोपातून आलेल्या गौरवर्णीयांकडे होती, तर   स्थानिक रहिवासी असूनही कृष्णवर्णीय जनता त्या शेतांवर गुलामीचे जीवन जगत होती. दक्षिण आफ्रिकेतील रस्ते रेल्वे- हवाई वाहतूक, विद्यापीठे, तंत्रज्ञान याबाबतच्या सुविधा पाहिल्या तर त्या विकसित देशांनाही लाजवतील इतक्या उत्तम आहेत. दक्षिण आफ्रिका हा एक आफ्रिकी देश असूनही तो विकसित देश वाटावा इतका पुढारलेला आहे. खरे तर, आफ्रिका खंडातील तो सर्वांत प्रगत आणि सामर्थ्यवान देश आहे. मात्र तरीही त्या देशातील दारिद्य्र, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि सामाजिक मागासलेपण पाहता तो देश तिसऱ्या जगालाही आपला वाटावा असा आहे. त्यामुळे एका अर्थाने विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यातील दुवा असेही दक्षिण आफ्रिकेचे वर्णन करता येईल.

दक्षिण आफ्रिकेत लोकशाही राजवट असूनही तिथे कृष्णवर्णीय आणि आशियाई समूहांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्या देशात लोकशाही सरकार असूनही, वेळच्या वेळी निवडणुका होऊनही वर्णभेद आणि विषमता फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. दक्षिण आफ्रिकेत सोने आणि हिरे यांच्या जगातल्या सर्वांत मोठ्या खाणी आहेत. तांबे, प्लॅटिनम, कोळसा, क्रोमिअम आणि अण्वस्त्रे बनवण्यासाठी आवश्यक असे युरेनियम अशा खनिजसंपत्तीबाबत दक्षिण आफ्रिका फारच समृद्ध आहे. या देशाच्या उत्पन्नाचा मोठा वाटा खनिजांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. तरीही त्या देशात प्रचंड प्रमाणात दारिद्य्र आहे. एकीकडे हृदय प्रत्यारोपणाची जगातील पहिली शस्त्रक्रिया दक्षिण आफ्रिकेत केली गेली होती, तरीही याच देशात बहुसंख्य नागरिकांना मूलभूत आरोग्यासुविधाही मिळणे कठीण जाते. एड्‌ससारख्या रोगाने या देशातील तरुण पिढीचे आयुष्य उद्‌ध्वस्त केले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही अनेक साम्यस्थळे आहेत. दोन्ही देशांमध्ये ब्रिटिश वसाहतवादाचा वारसा, लोकशाही राजवट, लोकसंख्येतील वैविध्य, निसर्गसौंदर्याने नटलेला भूप्रदेश, विस्तीर्ण आकारमान आणि मोठा सागरकिनारा, भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती, विकासाच्या सारख्याच समस्या यांसारख्या अनेक घटकांबाबत साम्य आहे. तसेच महात्मा गांधी हा दोन्ही देशांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. गांधीजी भारतात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदविरोधी लढ्यात तब्बल 22 वर्षे सक्रिय होते. स्वतंत्र भारताने दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी लढ्याला कायमच पाठिंबा दिलेला होता. गांधीजी आणि जवाहरलाल नेहरू या दोघांकडूनही दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय नेतृत्वाने कायमच प्रेरणा घेतली. अगदी नेहरूंच्या काळापासूनच ‘आफ्रिकन नॅशनल काँग्रेस’ या वर्णभेदविरोधी लढ्यातील सर्वांत महत्त्वाच्या संघटनेला आवश्यक त्या प्रमाणात पैसा, माहिती, राजकीय पाठिंबा आणि गुप्तहेरी व लष्करी प्रशिक्षण अशा स्वरूपाची मदत भारत नियमितपणे देत असे.

मर्यादित अर्थाने पाहता, आता एकविसाव्या शतकात लष्करी व तांत्रिक क्षमता, राजकीय व आर्थिक सामर्थ्य यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान साधारणतः सारखेच आहे. हे दोन्ही देश विकसित देशांच्या दृष्टीने पाहिल्यास विकसनशील देश आहेत आणि विकसनशील देशांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास विकसित मानता येतील इतके प्रगत नक्कीच आहेत. आज भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेकडेही आंतरराष्ट्रीय राजकारणातील उगवती सत्ता असेच पाहिले जाते. असा हा देश विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात (1948 ते 1994 या काळात) आपला इतिहास, राजकारण आणि वर्णभेदी सत्तेचे स्वरूप यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणातला अतिशय महत्त्वाचा व वादग्रस्त घटक बनलेला होता. त्या देशातील वर्णभेदी राजवट जरी 1948 मध्ये प्रत्यक्षात लागू झाली असली, तरीही 1652 ते 1948 या काळात या राजवटीची पाळेमुळे होती. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेच्या या काळातील इतिहासाचा धावता आढावा घेणे आवश्यक आहे.

दोन

पंधराव्या शतकात युरोपातून आशिया खंडाशी व्यापार करण्यासाठी आफ्रिका खंडाला वळसा घालून हिंदी महासागरात येण्याचा समुद्री मार्ग माहीत झाला. त्यानंतर पोर्तुगाल आणि हॉलंड यांसारख्या युरोपीय सत्ता या प्रदेशांशी व्यापार करण्यात आणि तिथे वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होत्या. उदा. पोर्तुगीजांच्या गोव्यात व मोझांबिकमध्ये, तर डचांच्या इंडोनेशियात वसाहती स्थापन झाल्या होत्या. मात्र पश्चिम युरोपीय किनाऱ्यापासून प्रवासाला सुरुवात करून आशिया खंडात पोहोचण्यासाठी जो वेळ लागत असे, त्या काळात जहाजावरील खलाशांचे खूप हाल होत असत. भाज्या आणि फळे यांचा आहार न मिळाल्याने जीवनसत्त्वांच्या अभावी खलाशी आजारी पडत. अनेकांना स्कर्व्ही होत असे.

हे टाळण्यासाठी 1652 मध्ये हॉलंडच्या ‘डच ईस्ट इंडीज’ कंपनीने आपल्या 90 माणसांचे एक पथक  आफ्रिकेत पाठवले. जिथे हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर यांचा संयोग होतो, त्या ‘केप ऑफ गुड होप’मध्ये त्यांनी राहायचे आणि भाज्यांची शेती करावी- असा आदेश त्यांना कंपनीने दिला होता. आज ज्या शहराला आपण केपटाऊन या नावाने ओळखतो, त्या शहराची सुरुवात अशी झाली होती. हे डच पथक या भागात कायमचे स्थायिक होण्यासाठी आले होते. या भागात विविध आफ्रिकन टोळ्या राहत असल्या, तरीही दक्षिण आफ्रिका या नावाचा कोणताही देश जगाच्या नकाशावर तोपर्यंत अस्तित्वात आला नव्हता. युरोपातील थंड हवा मागे ठेवून हे डच लोक आफ्रिकेतील कडक ऊन आणि पावसाच्या प्रदेशात राहायला आले होते. आपला मायदेश सोडून व्यापाराला आणि व्यापाऱ्यांना साह्य व्हावे म्हणून, दिलेले आदेश पाळून आफ्रिकेत हे डच खलाशी भाजी पिकवणारे शेतकरी झाले होते.

डचांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याच्या या सुरुवातीच्या काळात स्थानिक आफ्रिकन टोळ्यांशी कशा स्वरूपाचे संबंध ठेवावेत, असा प्रश्न या खलाशी तुकडीतील नेत्याला पडलेला होता. त्याला कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिला होता की- आफ्रिकन टोळ्यांपासून लांब राहावे, त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. पुढे 1948 मध्ये सत्तेत आलेल्या दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदी राजवटीची पाळेमुळे अशी तीनशे वर्षे जुनी होती. हळूहळू शेती करणाऱ्या या डचांनी आपल्या वसाहतीला सुरक्षित करून घेतले. दरम्यानच्या काळात डचांची संख्या वाढत गेली. एके काळी कंपनीच्या नोकरीत असलेले आणि कंपनीचे आदेश पाळणारे लोक आता आपले निर्णय आपणच स्वतंत्र घेणार, या टप्प्यापर्यंत आले. त्यामुळे कंपनीशी आणि आपल्या मायदेशाशी संबंध पूर्णतः तोडून हे डच लोक दक्षिण आफ्रिकेतच कायमचे स्थायिक झाले. ते स्वतःला त्या प्रदेशाचे कायमचे रहिवासी मानू लागले होते. त्यांची स्वतःची अशी खास संस्कृती तिथे हळूहळू विकसित व्हायला सुरुवात झाली होती.

कितीही नाही म्हटले, तरी या स्थायिक झालेल्या डचांचा स्थानिक आफ्रिकन टोळ्यांशी वाढत्या प्रमाणात संबंध येऊ लागला होता. त्याच काळात पश्चिम आफ्रिकेतून कृष्णवर्णीय गुलामांची अमेरिकेत निर्यात चालत असे. या कृष्णवर्णीय गुलामांना अमानुष वागणूक दिली जात असे. तीच परंपरा डचांनी दक्षिण आफ्रिकेत चालू ठेवली. त्यांनीही शेतात राबण्यासाठी कृष्णवर्णीय गुलाम ठेवले होते. साधारणतः पावणेदोनशे वर्षे शेतकऱ्याचे जीवन जगलेल्या या डचांची दक्षिण आफ्रिकेतील जमीन आणि शेतकरी आयुष्य यांच्याशी नाळ घट्ट जुळत गेली होती. दक्षिण आफ्रिकेतील डचांच्या या आयुष्यात पहिला महत्त्वाचा बदल झाला ब्रिटिशांमुळे. 1790 नंतर युरोपात ब्रिटन आणि इतर सत्ता राज्यक्रांतीनंतरच्या फ्रान्सविरुद्ध लढत होत्या. जर फ्रेंचांनी ‘केप ऑफ गुड होप’वर ताबा मिळवला असता, तर ब्रिटिशांच्या आशिया खंडातील व्यापाराला आणि बंगालातील सत्तेला धोका निर्माण झाला असता. तो टाळण्यासाठी ब्रिटिशांनी स्वतःच ‘केप ऑफ गुड होप’ आपल्या ताब्यात घेतले. अशा रीतीने ब्रिटिशांचा दक्षिण आफ्रिकेत प्रवेश झाला.

त्यानंतरच्या चाळीस वर्षांत ब्रिटिशांचा प्रभाव हळूहळू वाढत गेला. ताब्यात घेतलेल्या प्रदेशात ब्रिटिशांनी आपले कायदे, आपली भाषा आणि आपली संस्कृती यांचा प्रसार करण्यास सुरुवात केली. उदा. ब्रिटिशांनी गुलामगिरी बेकायदा ठरवली होती. तो कायदा त्यांनी दक्षिण आफ्रिकेत लागू केला. त्यामुळे डच शेतकऱ्यांना स्वस्त मजूर- खरे तर गुलाम मिळेनासे झाले. तसेच त्यांनी कृष्णवर्णीयांना जमीनमालकी मिळवण्याचे अधिकार दिले. याला डचांचा तीव्र विरोध होता. तसेच दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या डचांनी ‘आफ्रिकान्स’ नावाची स्वतःची भाषा विकसित केली होती. डच, पोर्तुगीज, क्रेओल, फ्रेंच, आफ्रिकेतीलच खोई टोळ्यांची भाषा आणि मलय भाषा यांच्या मिश्रणातून तयार झालेली ही भाषा होती. अशा या ‘आफ्रिकान्स’ बोलणाऱ्या डच लोकांवर ब्रिटिशांनी आपली इंग्रजी भाषा लादली. शाळा, व्यापार, न्यायालये, प्रशासन अशा सर्व ठिकाणी इंग्रजीचा वापर होऊ लागला. डचांना आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा फार अभिमान होता. त्यांना इंग्रजी भाषेचे वर्चस्व नको होते. (यातील विरोधाभास असा की, इंग्रजी भाषेच्या वर्चस्वावरून ब्रिटिशांना विरोध करणाऱ्या डचांनी पुढे दीडशे वर्षांनी वर्णभेदी राजवटीच्या काळात स्थानिक आफ्रिकन समूहांवर आपली ‘आफ्रिकान्स’ ही भाषा लादली!)

या घटनाक्रमामुळे दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले डच अस्वस्थ झाले. या वेळेपर्यंत ते स्वतःला ‘आफ्रिकानेर’ असे म्हणवून घ्यायला लागले होते. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत पाच हजार इंग्रज आणि  साधारणतः तीसेक हजार आफ्रिकानेर स्थायिक झाले होते. एकोणिसाव्या शतकात दक्षिण आफ्रिकेत राजकीय- आर्थिक सत्ता इंग्रजांची होती, तर संख्येने आफ्रिकानेर जास्त होते. आफ्रिकानेर आणि ब्रिटिश यांच्या चाळीस वर्षांच्या एकत्र साहचर्यानंतर डचांसमोर दोन पर्याय होते- एक तर ब्रिटिश स्वरूपाचे जीवन स्वीकारणे किंवा ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश सोडून आपली जीवनपद्धती टिकवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतच इतरत्र स्थायिक होणे.

आफ्रिकानेर लोकांनी दुसरा पर्याय स्वीकारला. हजारो आफ्रिकानेर लोक ब्रिटिशांच्या ताब्यातील ‘केप ऑफ गुड होप’च्या आजूबाजूचा प्रदेश सोडून दक्षिण आफ्रिकेच्या मध्य आणि उत्तर भागात स्थायिक झाले. हे स्थलांतर 1835 ते 1840 या पाच वर्षांच्या काळात झाले. या स्थलांतराच्या काळात त्यांच्यावर आफ्रिकेतील टोळ्यांनी अनेकदा हल्ले केले. एकदा तर ब्रिटिशांनी पण हल्ला केला होता. मात्र या साऱ्यातून ते बचावले. प्रतिकूल निसर्ग आणि अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करत ही शेकडो मैलांची वाटचाल त्या वेळेस झाली होती. याला ‘द ग्रेट ट्रेक’ असे म्हटले जाते. या काळातील हाल-अपेष्टा, संघर्ष, युद्धे आणि जगण्याची लढाई यामुळे आफ्रिकानेर लोकांच्या मनोवृत्तीवर कायमचा परिणाम झाला. या संघर्षमय काळाने त्यांची स्वतःविषयीची आणि दक्षिण आफ्रिकेतील इतरांविषयीची प्रतिमा, विशिष्ट असा मानसिक दृष्टिकोन व पर्यायाने वर्तन यांना आकार दिला. ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेश सोडून बाहेर पडलेल्या आफ्रिकानेर लोकांनी ‘ऑरेंज फ्री स्टेट’ आणि ‘ट्रान्सव्हाल’ ही दोन राज्ये दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत भागात स्थापन केली. ब्रिटिशांनी 1852 मध्ये या राज्यांना मान्यता दिली.

आता तरी स्वस्थता लाभेल, अशा आशेने आफ्रिकानेर लोक पुन्हा आपल्या परंपरागत शेतीवर आधारित ग्रामीण जीवनाकडे वळले. ब्रिटिशांनी मान्यता दिल्यानंतरच्या पंधरा वर्षांतच- म्हणजे 1867 मध्ये ट्रान्सव्हाल राज्यात किंबर्ली येथे हिऱ्याचे साठे आहेत, असा शोध लागला. त्यानंतर काहीच काळाने दक्षिण आफ्रिकेत सोनेही सापडले. सोने आणि हिऱ्याच्या आशेने व श्रीमंत होण्याच्या स्वप्नाने या प्रदेशाकडे हजारो युरोपीय लोक पुन्हा वळले. स्थानिक डचांना हे असे लोक दक्षिण आफ्रिकेत येणे अजिबात आवडले नव्हते. केवळ पंधरा वर्षांतच ट्रान्सव्हाल राज्याच्या उत्पन्नात वीसपट वाढ झाली होती. हे सारे पाहून ब्रिटिशांनीसुद्धा आपल्या राजकारणाची दिशा बदलली. ‘केप ऑफ गुड होप’च्या परिसरात आणि हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील प्रदेशात- दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व भागात- नाताळ येथे त्यांच्या वसाहती होत्या. आफ्रिकानेर लोकांच्या ‘ऑरेंज फ्री स्टेट’ आणि ‘ट्रान्सव्हाल’ या राज्यांना आपल्या केप व नाताळ या वसाहतींशी जोडून संपूर्ण दक्षिण आफ्रिकेच्या राजकारणावर आपले वर्चस्व निर्माण करावे, अशी ब्रिटिशांची जुनीच मनीषा होती. सोने आणि हिरे सापडल्यानंतर या मनीषेने उचल खाल्ली.

त्यानंतर आफ्रिकानेर आणि ब्रिटिश यांच्यात युद्ध कधी होणार, हा केवळ काळाचा प्रश्न होता. याच काळात दक्षिण आफ्रिकेत सेसिल ऱ्होड्‌स नावाच्या गृहस्थाचा प्रवेश झाला. कडव्या साम्राज्यवादी मनोवृत्तीच्या या ऱ्होड्‌स यांनी ब्रिटिशांचे दक्षिण आफ्रिकेत पूर्ण वर्चस्व निर्माण करण्याचा विडाच उचललेला होता. त्याने केपटाऊन आणि किंबर्ली यांना जोडणारी रेल्वे बांधली. हिरे उत्पादन करणाऱ्या ‘डी बिअर्स’ या कंपनीशी त्याने सूत जुळवले आणि पाहता-पाहता दक्षिण आफ्रिकेतील 90 टक्के हिरे उत्पादनावर त्याचे नियंत्रण आले.

याशिवाय त्याने ‘ब्रिटिश साऊथ आफ्रिकन कंपनी’ नावाची कंपनी स्थापन केली. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तरेस असलेल्या आणि अंगोला व मोझांबिक या पोर्तुगीज वसाहतींच्या दरम्यानच्या प्रदेशात ऱ्होड्‌सच्या कंपनीला रेल्वे बांधणे, खाणकाम, व्यापार व पोलीस यासाठीचे अधिकार मिळवले. या प्रदेशाला ऱ्होडेशिया असेच नाव दिले गेले, त्यातूनच पुढे झिम्बाब्वे आणि झांबिया हे दोन देश तयार झाले. उत्तरेतील इजिप्त आणि दक्षिण आफ्रिका यांना जोडणारी रेल्वे बांधणे हे त्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. ऱ्होड्‌सच्या वर्तनात ब्रिटिश साम्राज्यवादी अहंकार आणि आफ्रिकानेर समूहाबाबतचा द्वेष यांचे मिश्रण होते. ऱ्होड्‌स आणि दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश सत्ताधारी यांच्या या साऱ्या उद्योगांमुळे आफ्रिकानेर समूहाला आपले जीवन शांतपणे जगणे अशक्य झाले.

त्यातूनच 1899 ते 1902 या काळात ब्रिटिश आणि आफ्रिकानेर यांच्यात युद्ध झाले. याला ‘बोअर युद्ध’ असे म्हणतात. आपली सारी शक्ती पणाला लावून दोन्ही बाजू या युद्धात उतरल्या. मात्र तरीही हा विषम सामना होता. या युद्धात जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचा विजय झाला, परंतु दोन्ही बाजूंना अपरिमित हानी सोसावी लागली. ब्रिटिशांनी या युद्धात  आफ्रिकानेर नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले होते. त्यांची दोन्ही राज्ये आणि पारंपरिक शेतकरी-ग्रामीण जीवन पार उद्‌ध्वस्त केले. या युद्धानंतर मूलतः ग्रामीण शेतकरी जीवन जगणाऱ्या आफ्रिकानेर समूहाच्या अनेक लोकांना जगण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित व्हावे लागले. तिथे त्यांना कृष्णवर्णीय समूहाच्या बरोबरीने अतिशय कमी पगारावर निकृष्ट दर्जाचे काम करावे लागले. स्वतःला कृष्णवर्णीयांपेक्षा सर्वार्थाने श्रेष्ठ मानणाऱ्या आणि ब्रिटिशांची संस्कृती स्वीकारावी लागू नये म्हणून आपली स्वतंत्र राज्ये स्थापणाऱ्या आफ्रिकानेर लोकांसाठी हा फार मोठा सांस्कृतिक व मानसिक धक्का होता. ‘ग्रेट ट्रेक’प्रमाणेच या काळाच्या अनुभवांनी आफ्रिकानेर समूहाच्या मनात वर्णभेदी राजवटीची गरज आणि त्याची पाळेमुळे आणखी घट्ट केली.

तीन

‘बोअर युद्ध’ 1902 मध्ये संपुष्टात आले. युद्धात पराभव झालेला असला तरी या युद्धामुळे आफ्रिकानेर समूहामध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत व्हायला मदतच झाली होती आणि युद्धात पराभव होऊनही त्यांच्या मनातील वांशिक श्रेष्ठत्वाची भावना पुसली गेली नाही. उलट, शहरात कृष्णवर्णीयांबरोबर एकत्र काम करणे आणि साहचर्य यामुळे वर्णभेदाचे व वेगवेगळे राहण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर अधिकच प्रमाणात ठसले गेले. एकवीस वर्षांची हुजूर पक्षाची सत्ता संपुष्टात आणून 1906 मध्ये ब्रिटनमध्ये लिबरल पक्ष सत्तेत आला. या पक्षाने ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील धोरणावर कायमच टीका केली होती आणि म्हणूनच त्यांनी सत्तेत आल्या-आल्या दक्षिण आफ्रिकेतील दोन ब्रिटिश आणि दोन आफ्रिकानेर अशा चार राज्यांचा मिळून दक्षिण आफ्रिका नावाचा नवा देश तयार करण्याचा प्रस्ताव आणला.

‘युनियन ऑफ साऊथ आफ्रिका’ या नावाने हा एकसंध देश 1910 मध्ये अस्तित्वात आला. मात्र या देशात राहणाऱ्या कृष्णवर्णीय समूहांच्या अधिकारांचे काय करायचे याबाबत ब्रिटिश आणि आफ्रिकानेर यांच्यात मतभेद होते. ब्रिटिशांच्या ताब्यातील केप वसाहतीत कृष्णवर्णीयांना मर्यादित स्वरूपात का असेना, मतदानाचा अधिकार मिळालेला होता. मात्र कृष्णवर्णीयांना मतदानाचा हक्क द्यायला आफ्रिकानेर समूहांचा पूर्ण विरोध होता. त्याशिवाय आता या नव्या देशात आफ्रिकानेर समूह सत्तेत आल्यामुळे त्यांनी कायदे करून देशातील सर्वोत्तम आणि सर्वांत सुपीक जमीन स्वतःसाठी राखीव करून घेतली. त्यामुळे नव्वद टक्के कृष्णवर्णीय समूहाला केवळ साडेसात टक्के जमीन शिल्लक राहिली होती. तसेच गौरवर्णीयांसाठी राखीव जागांमध्ये राहणाऱ्या कृष्णवर्णीयांना आपली घरे व शेती सोडून त्यांच्यासाठी राखीव प्रदेशात जायला त्यांनी भाग पाडले.

पुढे असाच प्रकार शहरांबाबतही झाला. तिथेही कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय यांच्यासाठी वेगवेगळ्या जागा राखीव केल्या गेल्या. अशा रीतीने दक्षिण आफ्रिका एक देश म्हणून उदयाला आल्यानंतरच्या पहिल्या पंधरा वर्षांतच देशातील कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय समूह वेगवेगळे राहायला लागले होते. त्यासाठी आवश्यक ते कायदे केले होते. कृष्णवर्णीय समूह हा निकृष्ट दर्जाचे जीवनमान जगेल आणि गौरवर्णीय समूहापासून भौगोलिकदृष्ट्यासुद्धा वेगळे आयुष्य जगेल, अशीच तरतूद कायदेशीररीत्या केली गेली होती. म्हणजे आपल्याच देशात कृष्णवर्णीय समूह परके ठरले होते. अशा रीतीने 1652 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पाऊल ठेवल्यापासून डचांनी जे स्वतःला कृष्णवर्णीयांपासून वेगळे ठेवण्याचे धोरण पहिल्यांदा राबवले होते, ते आता अडीचशे वर्षांनी हळूहळू पूर्णत्वाला जाताना दिसत होते. मात्र असे असले, तरीही दक्षिण आफ्रिकेवर आफ्रिकानेर समूहाचे पूर्ण वर्चस्व अजूनही प्रस्थापित झाले नव्हते. या देशाच्या आर्थिक नाड्या ब्रिटिशांच्या हातात होत्या. सोने, हिरे, कोळसा यांच्या उत्पादनावर आणि शहरांतील औद्योगिक विभागांवर ब्रिटिशांचेच नियंत्रण होते.

दक्षिण आफ्रिका हा देश तेव्हा राष्ट्रकुल देशांपैकी एक होता आणि ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता. त्यामुळे देशात सर्वत्र युनियन जॅक फडकत असे. मात्र आफ्रिकानेर लोकांची ‘आफ्रिकान्स’ ही भाषा देशाच्या अधिकृत भाषांपैकी एक बनलेली होती. ब्रिटिशांपेक्षा संख्येने जास्त असल्याने राजकीय व्यवस्थेत आफ्रिकानेर समूहाचे वर्चस्व होते. बोअर युद्धानंतर शहरात आलेल्या आफ्रिकानेर लोकांमुळे शहरांत कृष्णवर्णीय आणि आफ्रिकानेर यांचे संबंध हळूहळू अधिकाधिक प्रमाणात येऊ लागले. त्यातूनच मिश्र वंशाची प्रजा तयार व्हायला सुरुवात झाली. या मिश्र वंशाच्या प्रजेची संख्या लवकरच दहा लाखांवर गेली. हे वेगाने होणारे साहचर्य पाहता, हजारो आफ्रिकानेर कुटुंबे शहरे सोडून खेड्यांकडे परतली. मात्र शहरातील  जीवनाला आणि कृष्णवर्णीय-आफ्रिकानेर साहचर्याला घाबरून खेड्यात आलेले हे आफ्रिकानेर-गौरवर्णीय लोक अजिबात सुखवस्तू नव्हते.

अशा या खेड्यांत राहणाऱ्या गरीब-गौरवर्णीय लोकांनीच पुढे 1948 मध्ये वर्णभेदी राजवटीला निवडून दिले होते. देशात गौरवर्णीयांची सत्ता असली तरीही आपल्याच देशाला नीट वागवले जात नाही, ही भावना आफ्रिकानेर समूहात मूळ धरू लागली होती. त्यातूनच आफ्रिकानेर लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 1918 मध्ये एका गुप्त संघटनेचा जन्म झाला. (त्यातूनच पुढे ‘नॅशनल पार्टी’ नावाचा टोकाचा वर्णभेदी पक्ष जन्माला आला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेवर सेहेचाळीस वर्षे राज्य केले.) याआधी सहाच वर्षांपूर्वी 1912 मध्ये गांधीजींच्या प्रेरणेने कृष्णवर्णीय समूहाच्या काही नेत्यांनी एकत्र येऊन देशात समान राजकीय हक्क आणि कृष्णवर्णीय समूहाला स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणाऱ्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती.

वर्णभेदी राजवटीच्या काळात आफ्रिकन नॅशनल काँग्रेस आणि नॅशनल पार्टी हे दोन प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते. आफ्रिकानेर समूहाच्या हितासाठी स्थापन झालेल्या या गुप्त संघटनेचे आणखी पुढे राजकीय पक्षाचे सदस्यत्व पाहता पाहता हजारोंच्या घरात गेले. दरम्यानच्या काळात 1933 मध्ये जर्मनीत हिटलरचा नाझी पक्ष सत्तेत आला होता. वंशश्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणाऱ्या नाझी पक्षाने त्यांच्याचसारखे विचार असलेल्या नॅशनल पार्टीशी 1934 मध्ये संपर्क साधला आणि निवडक तीस विद्यार्थ्यांना जर्मनीत उच्च शिक्षण घेण्यासाठी आमंत्रित केले.

या तीस विद्यार्थ्यांमध्ये Hendrick Verwoerd यांचा समावेश होता. त्यांना वर्णभेदाच्या धोरणाचे शिल्पकार मानले जाते आणि 1958 ते 1966 अशी आठ वर्षे ते दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान होते. जर्मनीत पाहिलेली हिटलरची भाषणे, नाझी पक्षाचे मेळावे, संचलने-शक्तिप्रदर्शन आणि ज्यूंना दिली जाणारी वागणूक पाहून ते फारच प्रभावित झाले. ते दक्षिण आफ्रिकेत परत आल्यानंतर त्यांनी आपल्या जर्मनीतील वास्तव्याचे सविस्तर वृत्तांत आपल्या गुप्त संघटनेतील सहकाऱ्यांना ऐकवले. त्यानंतर हिटलरच्या कार्यप्रणालीचे अनुकरण करीत, दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकानेर समूहामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी 1938 मध्ये केपटाऊन ते प्रिटोरिया अशा मार्गावर एका भव्य यात्रेचे आयोजन केले गेले. बरोबर शंभर वर्षांपूर्वी ‘द ग्रेट ट्रेक’ केलेल्या आपल्या पूर्वजांची आठवण, इतिहासाचे उदात्तीकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार आणि आफ्रिकानेर समूहाचे शक्तिप्रदर्शन अशी अनेक उद्दिष्टे यातून साध्य झाली.

या यात्रेच्या मार्गावर सर्वत्र आफ्रिकानेर समूहाने या यात्रेचे उत्साहाने स्वागतच केले होते आणि यात्रेच्या समारोपाला लाखो लोक प्रिटोरियामध्ये जमले होते. या यात्रेमुळे आफ्रिकानेर समूहाच्या मनात नॅशनल पार्टीचे स्थान कायमचे पक्के झाले. त्यानंतरच्या दहाच वर्षांत म्हणजे 1948 मध्ये तो पक्ष दक्षिण आफ्रिकेत सत्तेत आला. (इथे वाचकांना लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेची आठवण होऊ शकते. दोन्हींमधील साम्य हे की, या यात्रांनंतर दशकभरातच भारतात भाजप आणि दक्षिण आफ्रिकेत नॅशनल पार्टी सत्तेत आली होती. दोन्हीकडे इतिहासाचा सोईस्कर वापर केला गेला होता आणि आपल्या समर्थकांना mobilize केले होते.)

नॅशनल पार्टी सत्तेत येणे हा दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. वर्णभेदाचे धोरण राबवण्याचे आश्वासन देऊन निवडणूक प्रचार केलेल्या नॅशनल पार्टीने 1948 मध्ये सत्ता हातात येताच आता त्या आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरुवात केली. देशभरातील गौरवर्णीय व कृष्णवर्णीय समूहाला वेगवेगळे करणे आणि त्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात कायदे-शासनप्रणाली तयार करणे, हे एक प्रचंड मोठे काम होते. जगभर जेव्हा सर्वत्र स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले होते, तेव्हाच दक्षिण आफ्रिकेतील शासनसत्ता आधुनिक काळात आपल्याच देशातील नागरिकांना गुलामीत ठेवण्यासाठी अन्यायी यंत्रणा उभी करणार होती. त्यासाठी एक नाही, दोन नाही, तर तब्बल 1750 कायदे तयार केले गेले होते. इतका मोठा उद्योग इतक्या कमी काळात कसा केला गेला आणि त्यावर देशात व जगात काय प्रतिक्रिया उमटली, हे आपण पुढच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

नेल्सन मंडेला यांचे जन्मशताब्दीवर्ष 18 जुलै रोजी पूर्ण होत आहे, त्यानिमित्ताने प्रसिद्ध होणाऱ्या चार भागांच्या लेखमालेतील हा पहिला लेख.

Tags: test मंडेला जन्मशताब्दी-एक नेल्सन मंडेला संकल्प गुर्जर nelson mandela sankalp gurjar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके